Sunday, August 2, 2020

"वादळ"





लेखक : दिलीप बर्वे

प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन


"वादळ" म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहणारे चित्र म्हणजे अतिशय वेगाने घोंगावत येणारा वारा, त्या वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे उन्मळून पडणारे मोठ-मोठाले वृक्ष, उडून जाणारी घरांची छपरे, उघड्यावर पडलेले संसार, घाबरून भांबावून गेलेले प्राणी-पक्षी आणि त्या प्रचंड वाऱ्यामुळे झालेला विध्वंस. "वादळ" तशी एक अचानक येणारी नैसर्गिक आपत्ती पण अशा वादळाची विध्वंसकता ते शांत झाल्यानंतर त्याने केलेली उलथापालथ पाहूनच समजते.माणूस म्हणून जगत असताना प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही घटना घडत असतात किंवा घडून जातात ज्यामुळे आयुष्याची बरीच उलथापालथ होते आणि त्यामुळे होऊन गेलेलं नुकसान आपल्या मनावर खोलवर आघात देऊन जाते. अशा घटनांमुळे एखाद्याचे होणारे मानसिक, सामाजिक आणि शारीरिक नुकसान नैसर्गिक वादळांमुळे होणाऱ्या विध्वंसापेक्षा नक्कीच कमी नसते. म्हणूनच मग लोक या घटनांचा उल्लेख आपल्या आयुष्यात आलेलं "वादळ" असं करतात. तीन मध्यमवर्गीय कुटुंबांवर ओढवलेल्या अशाच वादळी घटनांवर आधारीत, दिलीप बर्वे यांनी आपल्या खास शैलीत, सहज, सुंदर शब्दांत लिहिलेली  कादंबरी म्हणजे "वादळ". अशा वादळी घटनांबरोबरच लेखकाने अजून एका चिंताजनक विषयाला इथे हात घातला आहे तो म्हणजे तरुण पिढीमध्ये अगदी कमी वयात फोफावत चाललेली व्यसनाधीनता.

कादंबरीची कथा फिरते जोशी, प्रधान, वैद्य या तीन मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय आणि एक अरोरा नामक पंजाबी कुटुंबाभोवती. सातारा बस स्टॉपवरील एका पेपर विक्रेत्याचा मुलगा म्हणजेच माधवराव जोशी. जो आपल्या मेहनतीवर शिकून शिक्षक बनतो आणि सांगली सारख्या शहरामधून आपल्या नोकरीचा श्रीगणेशा करतो. इथूनच होते या कथेची सुरुवात. सांगलीतील नोकरी करत असतानाच माधवच्या आयुष्यात अतिशय रूपवान अशी माधवी येते आणि त्यानंतर अगदी अनपेक्षितरित्या त्याला पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमधून आलेल्या नोकरीच्या ऑफरमुळे तो आपला संसार हलवतो पुण्यमधील नारायण पेठेतील देशपांडे वाडयात. इथून पुढे अगदी एखाद्या चित्रपटाला शोभावे असे या कादंबरीचे कथानक पुढे सरकत जाते. इथे देशपांडे वाड्यातच झालेली जोशी आणि प्रधान कुटुंबाची भेट, माधवराव-माधवीच्या जुळ्या मुली ज्योती-स्मृती यांची प्रधान कुटुंबातील दिपक-स्वाती सोबत झालेली घट्ट मैत्री, दोन्ही कुटुंबांमधे निर्माण झालेले एक भावनिक नाते, अगदी लहानपणापासून एकत्र असलेले दिपक आणि स्मृती यांच्यामध्ये जुळलेले प्रेम, त्यांनी एकत्र बघितलेली स्वप्ने,त्यांच्या प्रेमाला असलेला घरच्यांचा अबोल पाठिंबा, दिपकचे एम.बी.बी.एस. पूर्ण करून डॉक्टर होणे, ज्योतीचा प्रकाश वैद्य या केमिकल इंजिनिअर सोबत साखरपुडा होऊन जोशी-वैद्य कुटुंबांचे जोडले जाणे या आणि अशा बऱ्याच गोष्टी लेखकाने इतक्या सहज,सुंदर भाषेत लिहिल्या आहेत की वाटते जणू आपल्या आसपासच्याच कुटुंबांमधे हे सर्व घडत असावे. इथेपर्यंत अगदी सरळमार्गी आयुष्य चालणाऱ्या या तिनही कुटुंबांना पुढे येऊ घातलेल्या "वादळाची" पुसटशीही कल्पना नसते.

ज्योतीच्या साखरपुड्यानंतर स्मृतीचे अचानक तेजा अरोरा या पंजाबी मुलासोबत पळून जाणे आणि त्यामुळे जोशी कुटुंबावर झालेला मानसिक आघात म्हणजे या वादळाची सुरुवात. त्यानंतर एकामागून एक घडत जाणाऱ्या घटना जसे स्मृतीच्या जाण्याने डॉक्टर दिपकचे दिल्लीतील मेडिकल कॉन्फरन्सच्या निमित्ताने कायमचे घर सोडून आत्महत्या करण्यासाठी निघून जाणे, केमिकल फॅक्टरीत झालेल्या स्फोटामधे ज्योतीचा पती प्रकाश वैद्य याची दृष्टी गेल्यामुळे माधवरावांचा प्रकाश-ज्योतीच्या लग्नाला विरोध करणे या आणि अशा अनेक धक्कादायक घटनांमुळे या तीनही कुटुंबांच्या आयुष्यात झालेली उलथापालथ कादंबरी रुपात वाचत असताना लक्षात येते की दिलिप बर्वे यांनी दिलेलं "वादळ" हे या कादंबरीचे नाव किती सार्थ आहे.

डॉक्टर दिपक प्रधानचा स्वामी दिव्यानंद होण्यापर्यंतचा प्रवास वाचून जाणवते की काही वादळी घटनांचा आघात एखाद्याच्या मनावर किती खोलवर होऊ शकतो. आत्महत्येपासून परावृत्त होऊन दिपकचे स्वतःला सामाजिक कार्यात वाहून घेणे अशा लोकांसाठी आदर्श आहे  जे आयुष्यात आलेल्या वादळांनी खचून जातात.

भरपूर आणि फटाफट पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी तेजाचा ब्राउन शुगर स्मगलिंग पर्यंतचा प्रवास आणि त्यामुळे होणारी अरोरा कुटुंबाची वाताहत विचार करायला लावतेच पण त्याचबरोबर हेच ब्राउन शुगरचे व्यसन तेजा-स्मृतीचा किशोरवयीन मुलगा अमरला सुद्धा आहे हे समजल्यानंतर वाईट वाटते. स्वातीचा पती ए.सि.पि. धनंजय जाधव याच्याकडे आलेली ब्राउन शुगर स्मगलिंगची केस, एका पिढीला व्यसनाधीन होण्यापासून वाचवण्यासाठी धनंजयने केलेले प्रयत्न आणि हे सर्व करत असताना त्याचे तेजा पर्यंत जाऊन पोहचणे कादंबरीरुपात वाचताना एक वेगळाच अनुभव येतो. सुरवातीपासून शेवटपर्यंत घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीचे लेखकांनी अगदी साध्या भाषेत केलेले वर्णन त्या घटना आपल्या डोळ्यासमोर घेऊन येते.

कितीही वाईट, धक्कादायक घटनांनी भरलेल्या एखाद्या चित्रपटाचा शेवट जसा नेहमी आनंदीच होतो तसाच काहीसा या कादंबरीचा शेवट. स्मृतीचे जोशी कुटुंबात परत येणे, दिपकचे स्वामी दिव्यानंद म्हणून प्रधान कुटुंबाला २०-२२ वर्षांनी भेटणे, तेजाला आपण केलेल्या कृत्याचा झालेला पश्चात्ताप, दिव्यानंद स्वामींच्या आश्रमात अमरची ब्राउन शुगरसारख्या व्यसनातून झालेली मुक्ती आणि निपुत्रिक प्रकाश-ज्योतीच्या आयुष्यात झालेला अमरचा प्रवेश असा या "वादळाचा" दिलिप बर्वे यांनी केलेला अगदी सहज,सुंदर,आनंदी शेवट.

काहीतरी वेगळे वाचन म्हणून आवर्जून वाचावी अशी दिलिप बर्वे यांची कादंबरी "वादळ".




संदीप प्रकाश जाधव

No comments:

Post a Comment

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये