Monday, March 29, 2021

"श्यामची आई"

 



लेखक : साने गुरुजी

प्रकाशक : रिया पब्लिकेशन्स


काही पुस्तके अशी असतात ज्यांचा विचार आपल्या डोक्यामध्ये सतत चालू असतो पण ती वाचायचा योग काही लवकर येत नाही. त्याच्याव्यतिरिक्त इतर बरीच पुस्तके आपल्याकडून वाचली देखील जातात पण समोर असूनही असं एखादं तरी पुस्तक असतंच जे आपल्याकडून वाचलं जात नाही. माझ्याबाबतीत सांगायचं तर ते पुस्तक "श्यामची आई". अगदी प्राथमिक शाळेत असल्यापासून "श्यामची आई" या पुस्तकाबद्दल भरभरून ऐकत आलो पण ते वाचायचा योग आज इतक्या वर्षांनी आला. साधारणपणे ८० वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या या पुस्तकातून साने गुरुजींनी त्यांच्या मनामध्ये आपल्या आईबद्दल असणाऱ्या प्रेम, भक्ती, कृतज्ञता या भावनांना ४२ कथांच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली आहे. मराठी साहित्यात अजरामर ठरलेल्या साहित्यांपैकी एक असं हे पुस्तक. जानेवारी १९३२ ते ऑक्टोबर १९३३ या २१ महिन्यांच्या काळात नाशिकच्या तुरुंगात असताना साने गुरुजींनी आपल्या सहकार्‍यांना दररोज रात्री आपल्या आईच्या आठवणी सांगितल्या. नंतर त्यांनी आपल्या सहकार्‍यांच्या आग्रहावरून त्या गोष्टी लिहून काढल्या. ते पुस्तक म्हणजेच "श्यामची आई". अगदी कोणतंही पान उघडावं आणि कोणतीही कथा वाचायला सुरूवात करावी. प्रत्येक कथेतून अगदी सहज, सुंदर भाषेत मिळणारा बोध आणि आईचा जिव्हाळा वाचून डोळे पाणावले नाहीत तरच नवल. प्रत्येक घरात घडणारे अगदी साधे साधे प्रसंग पण तरीही ते कथेच्या रुपात वाचत असताना "आई-मुलाच्या" नात्याला एकप्रकारचा उजाळा मिळतो. प्रत्येक आईला आपलं मूल सुसंस्कारित व्हावं असं नेहमी वाटत असतं आणि त्यासाठी नेहमीच तिचा प्रयत्न चालू असतो परंतु आईकडून मिळणारे संस्कार मुलाने कसे अंगीकारायचे हे आजूबाजूच्या परिस्थितीवर देखील तितकंच अवलंबून असतं. या दोन्ही गोष्टींसाठी श्याम आणि त्याची आई हे दोघेही एक आदर्श उदाहरण आहेत. पुस्तकातील ४२ कथांमधून कोणतेही उपदेशाचे डोस न देता आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगात आपण प्रेमाने कसं वागलं पाहिजे हेच सांगायचा गुरुजींचा प्रयत्न जाणवतो. भूतदया, श्यामचे पोहणे, बंधुप्रेमाची शिकवण, सांब सदाशिव पाऊस पडू दे, आईचा शेवटचा आजार, सात्त्विक प्रेमाची भूक, तेल आहे तर मीठ नाही, अब्रूचे धिंडवडे अशा कथांमधून सर्वसामान्य घरातले प्रसंगच वर्णन केलेले असले तरी त्या प्रसंगांकडे पाहण्याची सात्त्विक दृष्टी, लबाडपणा आणि खोटेपणा नसलेलं निर्मळ मन यामुळे ते प्रसंग आपल्या मनावर कोरले जातात. आचार्य अत्रे यांनी या पुस्तकाला "मातृप्रेमाचं स्तोत्र" असं म्हटलं होतं. आजपर्यंत आईवर असंख्य लेखक, कवींनी जगातल्या सर्व भाषांत लेख-कविता केल्या आहेत. परंतु अतिशय मांगल्यानं आणि माधुर्यानं ओथंबलेलं असं महाकाव्य दुसऱ्या कोणत्या भाषेत असेल असं वाटत नाही असंही अत्रे यांनी लिहून ठेवलं आहे.

"श्यामची आई" ही कोकणातील सर्वसामान्य कुटुंबातील  एक साधी आई; परंतु श्याममुळे त्या माऊलीला जी प्रसिद्धी मिळाली त्याचे कारण साने गुरुजींनी त्यांचे हे पुस्तक जणूकाही आपल्या अश्रूंनीच लिहिले आहे असे वाटावे इतके वाचकाच्या मनाला भिडते. खरेतर त्यामुळेच गुरुजींनी लिहिलेली प्रत्येक कथा वाचकाला आई-मुलाच्या नात्याची नव्याने ओळख करून देते. गरिबीतही आपली नीतीमूल्ये जपून स्वाभिमानाने व सुखाने कसे जगावे हे आई आपल्या मुलाला कशाप्रकारे शिकविते आणि त्यामुळे एक लहान मुलगा भावी आयुष्यात एक संवेदनशील आणि आदर्श माणूस म्हणून कसा घडला हे "श्यामची आई" वाचत असताना पानापानावर जाणवत राहते. श्याम आणि त्याच्या आईमध्ये घडलेल्या बऱ्याच प्रसंगांमधून त्यांच्या नात्यातील विश्वास आणि एकमेकांवर असलेले प्रेम दिसून येते. आपल्या मुलाचे वर्तन नेहमी कसे सदाचारपूर्णच असले पाहिजे हे श्यामची आई त्याला दैनंदिन जीवनात घडणाऱ्या छोट्याछोट्या प्रसंगांतून समजावते. जसे की जेव्हा श्याम पूजेसाठी झाडावरून कळ्या तोडून आणतो, तेव्हा घरी आल्यावर आई त्याला प्रेमाने सांगते “पूर्ण उमललेलेच फूल झाडावरून तोडावे आणि कळ्या कधीच तोडू नयेत, कारण जसे लहान बाळांना आईची गरज असते तसेच कळ्यांना झाडाची गरज असते.”  आणखी एका प्रसंगात श्यामला पुस्तके हवी असतात तेव्हा तो त्याच्या काकांचे पैसे चोरतो, त्याबाबत त्याला जाब विचारला असता तो घाबरून “मी पैसे चोरले नाही” असे खोटंच सांगतो. आईला जेव्हा खरी गोष्ट समजते, तेव्हा कठोर होत खोटं बोलल्याबद्दल ती श्यामला मारते. नंतर जवळ घेत समजावते की “नेहमी खरे बोलावे, जर काही चूक आपल्या हातून झाली असेल तर ती निर्भयपणे व प्रामाणिकतेने मान्य करावी.” आणखी एका प्रसंगात दारावरून लाकडाची मोळी घेऊन जाणारी अस्पृश्य जातीची एक अशक्त वृद्ध बाई तोल जाऊन खाली पडते, तेव्हा तिला कुणीच स्पर्श करायला तयार होत नाही हे पाहून श्यामची आई श्यामला तिची मदत करण्यास सांगून मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म असल्याचे शिकवते. श्यामच्या मनातील पोहण्याबद्दलची भीती घालवण्यासाठी, त्याला शिस्त लावण्यासाठी, त्याने इंग्रजी शाळेत शिकावे म्हणून किंवा तिच्यापासून दूर पाठवण्यासाठी तिला प्रसंगी श्यामसोबत कठोर व्हावे लागते. श्यामच्या आईनं आपल्या वागण्यातून त्याला गाईगुरांवर, झाडांवर प्रेम करायला शिकवलं, कोंडय़ाचा मांडा करून खायला शिकवलं, गरिबीतही आपलं स्वत्व आणि सत्त्व टिकवून राहायला शिकवलं. यातूनच पुढे घडलेले "साने गुरुजी" आपल्याला खूप काही सांगून जातात. आज जरी साने गुरुजींच्या रूपातील श्याम पडद्याआड गेला असला तरी प्रत्येक घरी नवीन श्याम तयार करण्याची ताकद असणारं, प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना आवर्जून वाचून दाखवावं असं हे पुस्तक "श्यामची आई".

प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी वाचावं असं पुस्तक "श्यामची आई".





संदीप प्रकाश जाधव



Monday, March 22, 2021

"प्रोपगंडा"

 प्रचार | जाहिरात | अपमाहिती | आणि बरेच काही


लेखक : रवि आमले

प्रकाशक : मनोविकास प्रकाशन


रवि आमले यांचं "रॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा"  हे पुस्तक वाचल्यानंतर खरं तर मी त्यांच्या अभ्यासू लिखाणाचा "फॅन" झालो असं म्हटलं तरी चालेल. कारण "रॉ" वाचून झाल्यानंतर लगेचच त्यांचे "राखीव जागा - वस्तुस्थिती आणि विपर्यास", "प्रोपगंडा" याशिवाय त्यांनी मराठीमधे अनुवादित केलेलं "मॅनहंट" ही आणखी ३ पुस्तके मी माझ्या संग्रही घेतली. यांपैकीच एक वाचकांच्या मन आणि मेंदूला अक्षरशः घेरून टाकणारं पुस्तक "प्रोपगंडा" आज वाचून पूर्ण झालं. "प्रोपगंडा" या शब्दाचा शब्दशः अर्थ घ्यायचा झाला तर तो प्रचार किंवा माहितीची पेरणी असा होऊ शकतो. रवि आमले यांचे "प्रोपगंडा" हे पुस्तक म्हणजे कहाणी आहे सामान्य माणसांपर्यंत पोहचणाऱ्या अपमाहितीची, अर्धसत्यांची आणि बनावट वृत्तांची. या प्रोपगंडाचे नेमके तंत्र कोणते? ते कोणी आणि कसे शोधून काढले? ते लोकांवर सर्वप्रथम कसे वापरले गेले? लोक या प्रोपगंडामधे कसे अडकत गेले? आजची फॅशन - मग ती कपड्यांची असो, की विचारांची ती नेमकी येते कोठून? कोणाची निर्मिती असते ती? कोणापासून सुरू होते ती? सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपण ती फॅशन का अंगीकारतो? आपली मते खरोखरच आपली असतात का? आपण जे वास्तव समजतो ते वास्तवच असते का? आपण जे सत्य मानत असतो ते सत्यच असते का? की एखाद्या संगणकाच्या प्रोग्रॅमप्रमाणे कोणीतरी आपल्याला ते भरवत असते? तसे नसेल, तर मग माणसांच्या झुंडी कशा निर्माण होतात? या झुंडींना हवे तसे, हव्या त्या मार्गाने कसे वळविले जाते? साधी साधी माणसे अचानक हिंसक का होतात? बासरीवाल्याच्या मागे उंदरांनी जावे तशी एखाद्या नेत्याच्या मागे का जातात? एखाद्या वस्तूचे, विचाराचे, नेत्याचे अवडंबर कसे माजविले जाते? कसे बदल केले जातात समाजाच्या वर्तनात? सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादी गोष्ट आपल्या मनावर कशी बिंबवली जाते? कालांतराने ती गोष्ट आपल्याला खरी कशी वाटू लागते? एखाद्या वस्तूचा खप अचानक कसा वाढतो?(पतंजली ची उत्पादने याचं सर्वांत उत्तम उदाहरण) एखादा नेता अचानक लोकप्रिय तर एखादा नेता अचानक तुच्छ कसा काय वाटू लागतो? (मोदी, केजरीवाल, डोनाल्ड ट्रम्प, राहूल गांधी यांच्याकडे याचे उदाहरण म्हणून पाहता येईल) हे सारे करणारे असते तरी कोण? सामान्य लोकांचे विचार आणि त्यांचा एखाद्या गोष्टीकडे असणारा कल कसा बदलला जातो? या सर्व गोष्टींची माहिती देणारं आणि वाचकांची झोप उडवणारं असं हे रवि आमलेंचं पुस्तक "प्रोपगंडा". अगदी पहिल्या महायुद्धाच्या काळापासून ते अलीकडच्या मोदी लाटेपर्यंत प्रोपोगंडाकारांनी वापरलेली वेगवेगळी तंत्रे आणि त्यातून सामान्य जनमानसाच्या विचारांवर पडलेला प्रभाव याचं वाचकाला विचार करायला लावणारं वर्णन रवि आमले यांनी त्यांच्या या "प्रोपगंडा" पुस्तकात केलेलं आहे.

एकूण ४० प्रकरणे आणि ३७६ पानांच्या या पुस्तकातून रवि आमले वाचकाला प्रोपगंडाच्या थरारक आणि तितक्याच अंतर्मुख व्हायला लावणाऱ्या इतिहासातून फिरवून आणतात. आज २१व्या शतकात प्रोपगंडाचे तंत्र जरी बदलले असले तरी त्याचा इच्छित परिणाम आजही तोच असतो जो पहिल्या महायुद्धाच्या काळात होता. तो म्हणजे आपल्याला हवी तेवढीच, हवी तशी आणि हवी तेव्हाच एखादी माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहचवून त्यांचे विचार, त्यांचा कल बदलणे. आज व्हाट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून फिरणाऱ्या बऱ्याच गोष्टी याला उदाहरण म्हणून सांगता येतील. अगदी अलिकडच्या काळातील सामान्य लोकांच्या लक्ष्यात येण्यासारखं उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिकेने इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेन बद्दल पेरलेल्या बातम्यांचे देता येईल. सद्दाम हुसेनकडे संहारक शस्त्रे आहेत, ती जगाला कशी धोकादायक आहेत हे अमेरिकेने प्रोपगंडाच्या माध्यमातून जगाला असं काही पटवून दिलं की आता इराकवर हल्ला केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं जगाचं मत आपल्या बाजूने झाल्यानंतर अमेरिकेने इराक वर हल्ला करून सद्दामला संपवलं पण ती संहारक शस्त्रे आजही जगाच्या समोर काही आली नाहीत. खरं तर अमेरिकेच्या या इराकवरील हल्ल्यामागे तेलाचे राजकारण दडले होते पण त्यासाठी इराकवर हल्ला करायचा तर संपूर्ण जग अमेरिकेच्या विरोधात गेले असते आणि ते होऊ नये म्हणूनच हा संहारक शस्त्रांचा "प्रोपगंडा". यासारखी बरीच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय उदाहरणे रवि आमले यांनी या पुस्तकात दिलेली आहेत जी वाचत असताना सामान्य माणूस म्हणून आपण हादरून जातो. "प्रोपगंडा" करताना माहिती जाणिवपूर्वक पेरली जाते. महत्वाची माहिती दाबून ठेवली जाते, आपल्याला हवी तितकीचं माहीती दिली जाते आणि तिचा हवा तसा वापर हे प्रोपगंडाकार करत असतात. अनेकदा टीबी, कॅन्सर सारख्या समाजपयोगी जाहीराती पटवून देण्यासाठीसुद्धा हे तंत्र वापरले जाते. पहिल्या महायुद्धात युद्धज्वर वाढवण्यासाठी ब्रिटनने प्रपोगंडाचा वापर अगदी सफाईदारपणे केल्याचं पाहायला मिळतं, याची बरीच उदाहरणे रवि आमले यांनी पुस्तकात दिली आहेत. एखाद्याची प्रतिमा उच्च स्तरावर नेऊन ठेवायची आणि त्याला विरोध करणारे हे कसे देशद्रोही आहेत हे लोकांच्या मनात बिंबवण्याचे काम प्रोपगंडाच्या माध्यमातून कसं होऊ शकतं याचीही अनेक उदाहरणे आपल्याला वाचायला मिळतील. मीठ तेच असते पण “देश का नमक” टॅग जोडून त्याला देश भावनेशी कसं जोडलं जातं. डेअरी मिल्क या चॉकलेटमध्ये आळ्या सापडल्यानंतर त्याच्या विक्रीवर परिणाम झाला. तीच गत सर्वांच्या आवडत्या मॅगीची, पण मग त्याच गोष्टी नव्या पॅकींगमध्ये येऊन पुन्हा लोकांना कशा आवडू लागल्या. दिवाळीत मिठाईची जागा "कॅडबरीने" व्यापून टाकली आणि अंघोळीची जागा "मोती साबणाने" पण या आणि अशा हजारो परिणामकारक जाहीरातींमागे काय विचार असतो? राजकिय मंडळी या प्रोपगंडाचा वापर कसा करतात तसेच जाहीरातदार आपल्या वस्तूंची विक्री वाढण्यासाठी हे तंत्र कशा पद्धतीने वापरतात हे वाचताना बऱ्याच वेळा चीडदेखील येते. पहिल्या महायुद्धापासून ते भारतातील सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये प्रोपगंडाचा कसा वापर झाला?  “अच्छे दिन”, “अब की बार मोदी सरकार” पासून ते "कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?" या संकल्पना कशा सुचल्या? राहुल गांधी, केजरीवाल यांची अपरिपक्व प्रतिमा कशी तयार झाली होती? या प्रतिमेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी कोणत्या तंत्राचा वापर केला? आण्णा हजारेंचं आंदोलन देशव्यापी कसं झालं? त्यानंतर आण्णा प्रसिद्धीमाध्यमांपासून कसे दूर फेकले गेले? या आणि अशा बऱ्याच प्रश्नांच्या खोलात हे पुस्तक आपल्याला घेऊन जाते. पुस्तकातील शेवटची १० प्रकरणे भारतात या प्रोपगंडाचा वापर कसा केला जातो आणि त्याचे सामान्य भारतीयांवर काय परिणाम होतात यावर बेतलेली आहेत.

आवर्जून वाचून संग्रही ठेवण्यासारखं असं हे रवि आमले यांचं पुस्तक "प्रोपगंडा".





संदीप प्रकाश जाधव



Monday, March 15, 2021

"सेपिअन्स"

 मानवजातीचा अनोखा इतिहास



लेखक : युव्हाल नोआ हरारी

प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स

मराठी अनुवाद : वासंती फडके


होमो-सेपिअन्स हा शब्द शाळेत असताना बऱ्याच वेळा प्रत्येकाच्याच वाचनात आला असणार. माकडपासून माणूस होण्यापर्यंतचा आपलाच इतिहास अगदी थोडा का होईना पण सर्वांना नक्कीच माहीत आहे. युव्हाल हरारी यांचं "सेपिअन्स" हे पुस्तक याच मानवी इतिहासाचा वेध घेणारं आहे. सुमारे १ लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर मानवाच्या किमान ६ उपजाती राहत होत्या. पण सध्या फक्त एकच जात शिल्लक आहे आणि ती म्हणजे "आजचे आपण" - "होमो सेपिअन्स". एका भटक्या माणसापासून मानवाने इतकी प्रगती कशी केली असेल? मानव हासुद्धा इतर प्राण्यांसारखा पृथ्वीवरील एक प्राणीच आहे तर आपली उत्क्रांती झाली म्हणजे नेमकं काय झालं? अन्नसाखळीमध्ये खालच्या पातळीवर असणारा मनुष्य इतक्या कमी कालावधीत सर्वांत वरच्या पातळीवर कसा गेला? पृथ्वीवर आपली अधिसत्ता कशी स्थापन झाली असेल? आपल्या भटक्या पूर्वजांनी एकत्र येऊन शहरे आणि राज्यांची स्थापना कशी केली? आधुनिक जग निर्माण करत असताना टप्प्या-टप्प्याने जी अफाट प्रगती मानवाने आज केली आहे त्या प्रवासात पृथ्वीवरील जीवसृष्टीचा एक घटक म्हणून आपण नक्की काय कामावलंय आणि काय गमावलंय? देव, राजे आणि मानवी हक्क अशा गोष्टींवर आपण कसा काय विश्वास ठेवू लागलो? आणि येणाऱ्या पुढच्या सहस्रकांमध्ये आपले जग कसे असेल? या आणि अशा बऱ्याच गोष्टींचा धांडोळा युव्हाल हरारी यांनी त्यांच्या या "सेपिअन्स" मधून घेतला आहे. मानवाची विचार करण्याची पद्धत, वर्तन, बलस्थाने आणि त्याचे भविष्य याबद्दलच्या आपल्या सर्व समजुतींना आव्हान देणारं आणि एक विचार करायला लावणारं असं पुस्तक "सेपिअन्स". एक प्रगत मानव समाज म्हणून असणाऱ्या आपल्या बऱ्याच मान्यतांना हे पुस्तक आव्हान देत असले तरी पुस्तकातील काही गोष्टी पटण्यासारख्या नाहीत पण तरीही एक वेगळा दृष्टिकोन ठेऊन लिहिला गेलेला मानवजातीचा हा अनोखा इतिहास नक्कीच वाचनीय आहे.

युव्हाल हरारी यांच्या या "सेपिअन्स" पुस्तकाचा परिचय थोडक्यात द्यायचा झाला तर तो वेगवेगळ्या भागांत द्यावा लागेल. जसे की पहिल्या भागात पुस्तकाची सुरुवात हरारी यांनी केली आहे ती मानवाची उत्पत्ती आणि उत्क्रांती कशी झाली या विषयापासून. इथे मानवाची उत्क्रांती एका सरळ रेषेत न होता ती एकापासून दुसरा, दुसऱ्यापासून तिसरा अशा साखळीतून झाली आहे असं मत त्यांनी मांडलं आहे जे आपल्या आजपर्यंतच्या समजुतीला धक्का देते. शिवाय पृथ्वीवर एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी ६ वेगवेगळ्या जातीच्या मानवांचे अस्तित्व होते हासुद्धा तितकाच विचार करायला लावणारा मुद्दा. या सर्वच्या सर्व ६ जाती सतत भटकंती करणाऱ्या असल्याने हळूहळू एकमेकांच्या अधिवासात झालेल्या प्रवेशामुळे त्यांच्यातील संघर्ष वाढून "निअंडरथल" आणि "सेपिअन्स" या दोनच मानवाच्या जाती शिल्लक राहिल्या. त्यानंतर "सेपिअन्स" प्रजातीकडे असणाऱ्या अधिक विकसित सामाजिक कौशल्याच्या जोरावर त्यांनी "निअंडरथल" या प्रजातीवर देखील मात केली आणि फक्त "सेपिअन्स" ही एकच मानवाची जात पृथ्वीवर शिल्लक राहिली हेच आजच्या प्रगत मानवाचे पूर्वज. यानंतरच्या दुसऱ्या भागाची सुरुवात हरारी यांनी पृथ्वीवरील ५ मानवी प्रजाती नामशेष झाल्यानंतर सेपिअन्स लोकांनी हळूहळू इतर पृथ्वी पादाक्रांत कशी केली याच्या विस्तृत वर्णनाने केली आहे. सेपिअन्स अगदी ऑस्ट्रेलिया आणि मध्यपूर्व युरोपपर्यंत भटकत कसे पोहचले? आपल्या संघटन आणि सामाजिक कौशल्याच्या जोरावर त्यांनी मोठमोठ्या प्राण्यांच्या शिकारी करून स्वतःचं अस्तित्व कसं टिकवलं? याचं अतिशय सुंदर वर्णन हरारी यांनी या भागात केलं आहे. याच भागात हरारी आणखी एक विचार करण्यासारखा मुद्दा मांडतात तो म्हणजे सेपिअन्स प्रजातीकडे काल्पनिक कथा रचण्याची असणारी क्षमता! त्यांच्या याच क्षमतेने त्यांनी सामाजिक श्रद्धास्थाने निर्माण केली आणि सर्व सेपिअन्सना एक समाज म्हणून एकत्र राहण्यास चालना दिली. यामुळे सामाजिकरित्या एकत्र राहून त्यांनी पृथ्वीवर आपलं वर्चस्व निर्माण केलं. इतर कुठल्याही प्रजातींनी हा अनोखा मार्ग अवलंबला नाही आणि त्या हळूहळू नामशेष झाल्या. सेपिअन्सनी अगदी त्याकाळात देखील नेतृत्व कौशल्य दाखवले आणि आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर अनेक पुरानकथा रचल्या. या पुरानकथाच पुढे जाऊन धर्म संकल्पनेत रूपांतरित झाल्या असाव्यात असा दावा देखील हरारी यांनी या भागात केला आहे. हरारी यांच्या मते याच टप्प्यावर सेपिअन्स म्हणजे आपले पूर्वज नैसर्गिक उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून बाहेर पडायला सुरुवात झाले.

यानंतर तिसऱ्या भागात हरारी यांनी मानवाने शेतीची केलेली सुरुवात आणि त्याचा मानवाच्या प्रगतीच्या पुढच्या प्रवासात काय परिणाम झाला याचं विस्तृत वर्णन केलं आहे. शेती हा जरी मानवी प्रगतीचा महत्वाचा टप्पा असला तरी हरारी यांच्या मते शिकार करणाऱ्या सेपिअन्सचं शरीर शेतीसाठी कराव्या लागणाऱ्या कामांना पूरक नव्हतं. अशा कामांसाठी त्यांचे शरीर पुढे जाऊन जरी विकसित झाले असले तरी ते शरीराने त्यांच्या पूर्वजांपेक्षा कमकुवत होत गेले. शेती चालू केल्यानंतर आपण निसर्गावर आक्रमण करायला चालू झालो ज्याचे दूरगामी परिणाम आज आपण पाहतच आहोत. निसर्गाचे सर्व नियम धाब्यावर बसवून मानव दिवसेंदिवस स्वतःचेच नुकसान करून घेऊ लागला. प्रगतीच्या नावाखाली मानवाने निसर्गाचे अतोनात नुकसान केलं जे इतर कोणत्याही सजीवाने नाही केलं. जसजशी शेती विकसित होत गेली तसे इतर गोष्टींचे शोध लागत गेले आणि माणूस अधिकच महत्त्वकांक्षी बनला. निसर्गाच्या विरोधात जाऊन निर्माण केलेल्या अनेक आभासी गोष्टींमुळे आज माणूस निसर्गापासून जवळपास तुटूनच गेला आहे. मानवी प्रगतीच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर झालेल्या बऱ्याच गोष्टींचं मुद्देसूद वर्णन हरारी यांनी या भागात केलेलं पहायला मिळते. जे अंतर्मुख होऊन विचार करायला लावतं की खरंच जर शेतीचा शोध नसता लागला तर आपण निसर्गाचं इतकं नुकसान केलं असतं का? चौथ्या भागाचा परिचय द्यायचा झाला तर तो मानवाच्या आयुष्यात विज्ञानाचा झालेला प्रवेश आणि त्यानंतर झपाट्याने बदलत गेलेलं जग याचं विस्तृत वर्णन असा द्यावा लागेल. इथून पुढे विज्ञान हे मानवी प्रगतीच्या केंद्रस्थानी आलं आणि पैसा, सत्ता, धर्म, युद्ध यांच्याभोवती माणूस फिरत राहिला. निसर्गासमोर आपण अज्ञानी आहोत हे माणसाने मान्य करून विज्ञानाच्या सहाय्याने प्रगतीची जी झेप घेतली ती आजही अविरत चालूच आहे. आज विज्ञानाने इतकी मोठी झेप घेतली आहे की मानवाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा टप्पा देखील गाठला आहे. मानवाने निसर्गावर मिळवलेला हा एक प्रकारचा विजयच आहे. इथे युव्हाल हरारी आपल्याला अंतर्मुख व्हायला लावणारा प्रश्न विचारतात तो म्हणजे आपण कुठे चाललो आहोत आणि आपल्याला नेमकं काय मिळवायचं आहे हे संपूर्ण मानवजात म्हणून आपल्याला माहिती आहे का? आज आपण एका अशा वळणावर उभे आहोत जिथे एकतर "सेपिअन्स" म्हणजेच आजची आपली मानवजात नष्ट तरी होईल किंवा ते तंत्रज्ञानाचा स्वर्ग तरी निर्माण करतील. इतिहास हा नेहमीच शक्यतेने भरलेला असतो आणि कुठली शक्यता का प्रबळ झाली हे सांगता येणं केवळ अशक्य आहे. एकीकडे हवामान बदल आणि निसर्गाचा ऱ्हास यामुळे पृथ्वी अजून १०० वर्षे तरी टिकेल का ही भिती आहे तर दुसरीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता माणसांवर वरचढ ठरून मशिनयुग येईल अशी भिती या क्षेत्रातील तज्ञ वारंवार बोलून दाखवत आहेत. यांपैकी काहीही होऊ शकतं किंवा काहीच नाही. पण आपली प्रगतीची नेमकी दिशा काय असायला हवी आणि ती सध्या काय आहे या २ प्रश्नांच्यामधे लेखक आपल्याला सोडून देतो आणि आपली जी अस्वस्थता निर्माण होते त्यातच पुस्तकाचा शेवट होतो.

आवर्जून वाचण्यासारखा मानवजातीचा अनोखा इतिहास.




संदीप प्रकाश जाधव

Monday, March 8, 2021

"मॅन हंट"

बिन लादेनच्या शोधाची थरारक सत्यकथा


लेखक : पीटर बर्गन

प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स

मराठी अनुवाद : रवी आमले


११/९/२००१ ला अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरचे ट्वीन टॉवर्स अपहरण केलेल्या विमानांच्या धडकेने उध्वस्त करून "अल कायदाने" खरे तर अमेरिकेच्या अस्मितेवरच हल्ला केला. हा दहशतवादी हल्ला होईपर्यंत "ओसामा बिन लादेन" नावाचा, जगाला फारसा माहीत नसणारा अल कायदाचा "म्होरक्या" अचानकच संपूर्ण जगाच्या कुतूहलाचा विषय झाला. या अतिरेकी हल्ल्यात जवळपास ३००० लोकांचा मृत्यू तर ६००० हून अधिक लोक जखमी झाले आणि या विध्वंसकारी हल्ल्यानंतर ओसामा बिन लादेनचे नाव "क्रूरकर्मा" या विशेषणासोबत जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले, खरे तर जगाच्या इतिहासात या एका हल्ल्यामुळे तो अजरामर होऊन गेला असं म्हटलं तरी ते चुकीचं नाही. अमेरिकेवर झालेल्या या दुर्दैवी दहशतवादी हल्ल्यानंतर अल्पावधीतच त्यांच्या सी. आय. ए. आणि इतर तपास संस्थांनी दहशतवादाविरोधात जोरदार मोहीम उघडली. या मोहिमेदरम्यान सुरुवातीला त्यांच्या हाती आलेल्या माहितीनुसार "अल्-कायदा" ही दहशतवादी संघटना आणि तिचा प्रमुख ओसामा बिन लादेन यांचा या हल्ल्यामागे हात आहे हे सिद्ध झाल्यानंतर "अल कायदा" आणि "ओसामा बिन लादेन" अमेरिकेचे क्रमांक एकचे शत्रू बनले. त्यानंतर बिन लादेनला मारण्यासाठी अमेरिकेने अक्षरशः जंग जंग पछाडलं, त्यासाठी बऱ्याच गोष्टी करत असताना काहीवेळा काही देशांची नाराजी देखील अमेरिकेला सहन करावी लागली पण आपल्या इतिहासातील आजवरचा झालेला हा मोठा दहशतवादी हल्ला त्यांच्या इतका जिव्हारी लागला होता की सतत १० वर्षें ते "लादेनच्या" मागावर होते आणि अखेर २ मे २०११ रोजी अमेरिकन नेव्ही सील्जच्या पथकाकडून पाकिस्तानातील अबोटाबादमधे केलेल्या एका धाडसी जमिनी कारवाईत "लादेन" मारला गेला. जागतिक महासत्ता म्हणून जगात ओळख असणाऱ्या, अत्यंत आधुनिक आणि अद्ययावत यंत्रणा असणाऱ्या अमेरिकेसारख्या देशाला "ओसामा बिन लादेन" तब्बल १० वर्षें गुंगारा देण्यात यशस्वी झाला. त्यामुळेच त्याच्या शोधमोहिमेचा प्रवास लक्षवेधी आणि तितकाच थरारक ठरतो. अमेरिकेच्या १० वर्षें चाललेल्या "ओसामा बिन लादेन" च्या याच थरारक शोधाची सत्यकथा पीटर बर्गन यांनी "मॅन हंट" या पुस्तकातून आपल्यासमोर मांडली आहे. शिवाय अमेरिकेवर झालेल्या या हल्ल्यापुर्वीच्या आणि हल्ल्यानंतर चाललेल्या शोधमोहिमेदरम्यान बऱ्याच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटनांमधे "अल कायदाचा" असणारा सहभाग, त्याची पार्श्वभूमी, त्यामधील अमेरिकेची भुमिका यांची देखील अतिशय विस्तृत माहिती पीटर बर्गन यांनी "मॅन हंट" मधे दिली आहे. पीटर बर्गन हे एक टीव्ही पत्रकार आणि लेखक आहेत. अमेरिकेवर ९/११ ला झालेल्या हल्ल्याच्या चार वर्षं आधीच बर्गन यांनी सीएनएन या वृत्तवाहिनीसाठी अफगाणिस्तानात जाऊन ओसामा बिन लादेनची मुलाखत घेतली होती. त्या वेळी त्यांना "लादेन" म्हणजे अमेरिकेबद्दल द्वेष व्यक्त करणारा एखादा साधारण मुल्ला वाटला होता. त्याच साधारण वाटणाऱ्या "ओसामाने" ९/११ ला जेव्हा अमेरिकेवर हल्ला केला तेव्हापासूनच एक प्रकारे बर्गन यांनी या पुस्तकाची तयारी सुरू केली होती, कारण अमेरिका या हल्ल्यामागच्या सूत्रधाराला शोधून ठार मारणार याबद्दल त्यांना खात्री होती. पुस्तक लिहिण्यासाठी लागणारे आवश्यक ते संदर्भ, कागदपत्रं, या शोधप्रवासातील व्यक्तींच्या प्रत्यक्ष भेटी, इतकंच नाही, तर अबोटाबादमधे ज्या घरात लादेन मारला गेला तिथे जाण्याची परवानगी हे सर्व त्यांना मिळालं आणि "मॅन हंट" चा हा थरार वाचकांसाठी कागदावर उतरला.

पुस्तकाची सुरुवात "सुखद निवृत्ती" या प्रस्तावनेपासून होते. यामधे अबोटाबाद या पाकिस्तनातील शहराचं वर्णन, लादेनच्या कुटुंबाची माहिती, लादेनच्या बायकांचं उच्चविद्याविभूषित असूनही धार्मिक असणं आणि त्यांचा लादेनच्या जिहादवर असणारा विश्वास, लादेनचे दैनंदिन जीवन, जगात दहशत पसरवणाऱ्या लादेनचा कंजूषपणा, त्याच्या कट्टर मुस्लिमतेला धरून असणारे त्याचे वागणे या आणि अशा बऱ्याच बारीकसारीक गोष्टींचे तपशील दिलेले आहेत. सुरुवातीच्या लादेनबद्दलच्या या विस्तृत महितीनंतर ९/११ च्या हल्ल्याचे  वर्णन करून बर्गन थेट लादेनच्या भुतकाळात शिरतात. १० वर्षांच्या शोधमोहिमेच्या प्रवासाची कथा सांगत असतानाच ९/११ चा हल्ला प्रत्यक्षात कसा घडवला गेला, त्यासाठीची तयारी याबद्दलही बऱ्याच गोष्टी बर्गन यांनी वाचकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. लादेनचे तोरा बोरा या अतिशय दुर्गम पर्वतरांगांतील वास्तव्य, अज्ञातवासात असताना अल कायदा वाढवण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न शिवाय "अल कायदाचे पुनरुत्थान", "शोधमोहिमेचा सिद्धांत", "युद्धमैदानात ओबामा", "शोधदुव्याची संरचना", "ओसामा बिन लादेनची अखेरची वर्षं", "गुप्त योद्धे", "कारवाईच्या विविध दिशा" या प्रकरणांतून लादेनमधील धर्मवेडा, क्रूरकर्मा, चार बायकांचा पती, कुटुंबवत्सल पिता असे अनेक पैलू उलगडत जातात. पुस्तकाची अखेर "दिवा लावू नकोस" या प्रकरणातून होते. कदाचित हेच लादेनचे शेवटचे शब्द होते.  २००१ नंतरची पहिली ६-७ वर्षें अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील डोंगर रांगांत लादेनला शोधल्यानंतर तो डोंगराळ भागाऐवजी पाकिस्तानातच एखाद्या शहरात लपला असावा असा अमेरिकेच्या तपाससंस्थांचा संशय वाढत चालला होता. त्यानंतर लादेनने पाठवलेल्या ध्वनी चित्रफितींच्या मार्फत त्याचा माग काढत तो पाकिस्तानातील अबोटाबादला असण्याच्या निष्कर्षाला येईपर्यंत (तोही फक्त ५०% च!) आणि त्यांनंतर प्रत्यक्ष त्याच्यावरील कारवाई करण्यापूर्वी अमेरिकी नेव्ही सील्जच्या पथकाने केलेला सराव, अमावस्येच्या रात्री लादेन लपून बसलेल्या घरामध्ये घुसून केलेल्या हल्ल्याचा थरार, लादेनला मारून त्याची केलेली उत्तरक्रिया, पाकिस्तानी सरकार आणि सेनेला अंधारात ठेऊन केलेल्या कारवाईमुळे तयार झालेले वातावरण, लादेनला मारल्यानंतर अमेरिकेत झालेला जल्लोष या सर्व गोष्टी अगदी एखाद्या थरारक चित्रपटाला शोभेल अशा आहेत.

"ओसामा बिन लादेन" वर आजपर्यंत बरीच पुस्तके लिहिली गेली परंतु पीटर बर्गन यांचं हे पुस्तक त्याच धाटणीचे आहे असं म्हणणं थोडं धाडसाचंच ठरेल कारण पुस्तकाच्या शेवटी देण्यात आलेले संदर्भ वाचूनच लक्षात येते की पीटर बर्गन यांचे हे पुस्तक म्हणजे ओसामा बिन लादेन आणि अल्-कायदा यांच्या विषयीच्या माहितीचा अधिकृत दस्तऐवजच आहे. रवी आमले यांनी अतिशय सुंदररीत्या अनुवादित केलेलं, आवर्जून वाचण्यासारखं पुस्तक "मॅन हंट".





संदीप प्रकाश जाधव

Monday, March 1, 2021

"अंश"

 


लेखक : रत्नाकर मतकरी

प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस


रत्नाकर मतकरींचा आणखी एक दर्जेदार कथासंग्रह "अंश" वाचून झाला. यापूर्वी त्यांचं "अंतर्बाह्य" आणि "खेकडा" वाचलं होतं आणि तेव्हा जो अनुभव आला अगदी तसाच किंबहुना त्याहून थोडं जास्त शहारून आलं त्यांचा "अंश" हा कथासंग्रह वाचताना. गूढकथा हा रत्नाकर मतकरींच्या सर्वच पुस्तकांचा गाभा असला तरी त्यातील प्रत्येक कथेचा विषय वेगळा, त्यातून वाचकाला मिळणारे अनुभव वेगळे. "अंश" ची प्रत्येक कथा वाचत असताना सतत माझ्या डोक्यात एकच विचार येत होता की एखाद्या व्यक्तीची कल्पनाशक्ती इतकी अफाट कशी असू शकते? शेकडोंनी गूढकथा लिहून देखील प्रत्येक कथा मतकरींच्या कल्पनाशक्तीला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते. त्यांच्या "अंश" या कथासंग्रहातील १० कथा आणि १५४ पानांतून रत्नाकर मतकरी वाचकाला एका अतिशय गूढ विश्वात घेऊन जातात. मतकरींचा हा कथासंग्रह अगदी एका बैठकीत जरी वाचून पूर्ण होण्यासारखा असला तरी प्रत्येक कथेला थोडक्यात आणि तितक्याच ताकदीने दिला गेलेला गूढपणा वाचकाला अक्षरशः त्या कथेतील पात्रांसोबतच वावरत असल्याचा भास निर्माण करतो. कथांमधील काही काही प्रसंग तर वाचत असताना अंगावर काटा यावा इतकी भन्नाट वातावरण निर्मिती मतकरींनी त्यांच्या शब्दांतून केली आहे. खासकरून शेवटची कथा "आपुलीच प्रतीमा होते..." मधील मध्यरात्री बंद नाट्यगृहामधे कथेच्या नायकासोबत घडलेला प्रसंग अंगावर शहारे आणणारा आहे. या कथेसोबतच इतर कथा "अंश", "वारं", "राजाराव राणीबाई", "ऋणको", "पांदेगा", "स्वप्न आणि मार्ग", "शेवटची कादंबरी", "पर्जन्य", "जन्म" या कथासुद्धा तितक्याच दर्जेदार आहेत. 

एखादा गूढकथाकार जेव्हा कथेची पेरणी करत असतो तेव्हा त्याचा उद्देश असतो तो मानवी जीवनातील आणि त्याच्याही पलीकडील सत्याचा शोध घेण्याचा. गूढकथा या कितीही अवास्तव वाटणाऱ्या असल्या तरी लेखकाचा प्रयत्न असतो वास्तवाच्या जवळ जाण्याचा आणि त्या वास्तवाचा व्यापक अर्थ लावण्याचा. जेणेकरून गूढकथा या फक्त गूढकथा न राहता त्या वाचकाला अंतर्मुख करणाऱ्या असाव्यात, त्यांनी वाचकाला विचार करायला भाग पाडावं की खरंच असं होऊ शकतं का? खरंच असं काही असू शकतं का? परंतु हे करत असताना गूढकथा या तेव्हाच पटण्यासारख्या किंवा परिपूर्ण वाटतात जेव्हा कथेतील पात्रे, घटना, वातावरण आणि आशय यांची योग्य भाषेत मांडणी केली जाते. रत्नाकर मतकरींचा प्रत्येक कथासंग्रह या कसोटीवर पुरेपूर उतरतो आणि "अंश" सुध्दा त्याला अपवाद नाही.

- पंचमहाभूतांमधील वायूचे झपाटून टाकणे…

- कलावंताचे आणि त्याच्या प्रतिमेचे नाते…

- केवळ बुद्धीने प्रगती साधू पाहणार्‍या मानवजातीचे भविष्य…

- कादंबरीकाराच्या वर्तमानात मिसळलेला त्याचा भूतकाळ…

- माणूस आणि निसर्ग यांचा मित्र-शत्रू संबंध…

- माणसामध्ये नकळत नांदणारा सनातनाचा अंश…

मानवी जीवनाला लपेटून राहिलेल्या या आणि अशा कितीतरी गहन गूढांवर, वाचकाला गुंगवून टाकणार्‍या कथानकांच्या द्वारे अत्यंत नेमकेपणाने, सहजसुंदर भाषेत लिहिलेल्या, वाचकाला समग्र जीवनाचाच पुन्हा एकदा खोलवर विचार करायला लावणाऱ्या अशा रत्नाकर मतकरींच्या "अंश" या कथासंग्रहातील कथा.



एक आवर्जून वाचण्यासारखा गूढकथासंग्रह "अंश".



"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये सह्याद्रीचा श्वास आणि पेशवाईचा रक्तरंजित इतिहास: ना...