Sunday, November 22, 2020

"पांगिरा"

 


लेखक : विश्वास पाटील

प्रकाशक : राजहंस प्रकाशन


"पानिपत" या ऐतिहासिक कादंबरीमुळे घराघरात पोहचलेले लेखक विश्वास पाटील. कोणत्याही कादंबरीला नेहमीच लेखकाच्या कल्पनेची जोड असते आणि लेखकही इतिहासाला किंवा त्या विषयाला धक्का न लावता कादंबरीच्या माध्यमातून तो आपल्यापर्यंत पोहचवत असतात. पण विश्वास पाटलांची "पांगिरा" ही कादंबरी अशा काल्पनिकतेचा आधार घेऊन लिहिल्या गेलेल्या बऱ्याच कादंबऱ्यांना अपवाद आहे. त्याचं कारणही तसंच आहे, या कादंबरीचा विषयच असा आहे जो आपल्याला वास्तविकतेकडे घेऊन जातो. आपण नेहमी म्हणतो विकास झाला, प्रगती झाली पण म्हणजे नेमकं काय झालं? हे आजही कोणी ठामपणे नाही सांगू शकणार. अजूनही शेतकरी आहे त्याच जागी आहे, सामान्य कष्टकऱ्याचं आयुष्य आहे तिथेच राहिलं आहे. विकासाची गंगा शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या दारापर्यंत पोहचलीच नाही. शहरात राहून आपल्याला या गोष्टी कधी समजल्याच नाहीत आणि कधी समजणार पण नाहीत जोपर्यंत त्याचा अनुभव किंवा झळ आपल्याला बसत नाही. "पांगिरा" या कादंबरीच्या माध्यमातून शहरात राहणाऱ्या आपल्यासारख्या माणसांच्या डोळ्यांवरील विकासाच्या सुखाचं कातडं विश्वास पाटील अक्षरशः ओढून काढतात. ही कादंबरी म्हणजे पांगिरा आणि डोंगरवाडी या दोन गावांतील कहाणी आहे. पूर्ण गावच कादंबरीचा नायक आहे आणि याच नायकाभोवती फिरणारी हि कथा. भीषण दुष्काळ, वैराण जमीन आणि मने यांची व्यथा म्हणजे ही कादंबरी. ही केवळ एका माणसाची कथा किंवा व्यथा नाही. हे सामूहिक वास्तव आहे. म्हणूनच "पांगिरा" ही सामूहिक जाणिवांची कादंबरी आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरू नये.

"पांगिरा" हे मांगोला तालुक्यातील एक सधन गाव. आणि त्याचीच धाकटी बहीण म्हणून ओळखले जाणारे "डोंगरवाडी". "पांगिरा" गावच्या सिदुबाच्या जत्रेपासून झालेली या कादंबरीची सुरुवात. एकरी शंभर टन ऊस काढणारे या गावातील शेतकरी. अगदी परंपरागत शेती करणारे हे गाव विकासाच्या नावाखाली गावामध्ये वीज आल्यानंतर कुस बदलायला चालू करते. वीज आल्यामुळे विहिरींवर बसवल्या गेलेल्या मोटारींमधून भरमसाठ पाण्याचा उपसा रात्रंदिवस चालू होतो. घरोघरी केल्या जाणाऱ्या उसाच्या शेतीमुळे लोकांकडे येणारा पैसा, त्यांची वाढती श्रीमंती, रंगीत माडीची घरे, ट्रॅक्टर यामुळे मांगोला तालुक्यातील वेगळेपण जाणवणारे हे गाव. गावात झालेल्या बदलाचा आणि तिथे केल्या जाणाऱ्या ऊस शेतीचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या कृषिसंशोधक शर्मा याने पाण्याच्या वापराविषयी दिलेल्या गंभीर सल्ल्याकडे दुर्लक्ष करून वाटचाल करणाऱ्या पांगिऱ्याची एका तपानंतर झालेली अवस्था आणि त्याचे वास्तविक दर्शन म्हणजेच ही कादंबरी "पांगिरा". या वाटचालीत झालेल्या अनेक छोट्या-मोठ्या घडामोडी विश्वास पाटील यांनी अतिशय सुंदर आणि तितक्याच वास्तववादी पद्धतीने आपल्यासमोर मांडल्या आहेत. जिल्हा परिषदा, पंचायत समिती यांच्यामार्फत बऱ्याच सुधारणा गावाच्या वेशीवर धडकल्या. त्या सुधारणा लोकांपर्यंत पोहचवण्याच्या नावाखाली तयार झालेले, स्वतःची पोळी भाजून घेणारे राजकारणी गट आणि त्यांची आपापसांत होणारी जीवघेणी स्पर्धा यांचे अगदी विस्तृत वर्णन आपल्याला या कादंबरीत वाचायला मिळेल जे सर्व आजही बऱ्याच गावांमध्ये चालते. ऊस हे हमखास उत्पन्न मिळवून देणारे पीक गृहित धरून त्यासाठी केल्या जाणाऱ्या भरमसाठ पाणी वापराने गावातील पाणी पातळी हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते आणि गावकऱ्यांच्या डोळ्यावरील विकासाची झापड तसेच पांगिऱ्याचे पाणी कधीच अटणार नाही हा गावकऱ्यांचा फाजील आत्मविश्वास उडून जाईपर्यंत खूप उशीर होऊन जातो. फक्त एका तपापूर्वी एक सधन-समृद्ध असणारे हे "पांगिरा" गाव दुष्काळी गावांच्या यादीत सामील होते. लोकांची पाण्यासाठी वणवण सुरू होते, शेती हळूहळू ओस पडू लागतात आणि स्वतःला प्रतिष्ठित समजणाऱ्या लोकांवरसुद्धा रोजंदारीवर काम करायची वेळ येते. गावाच्या या १० वर्षांच्या प्रवासात गावाची झालेली वाताहत, गावाच्या गल्ली-गल्लीत चालणारे राजकारण, त्यामधे असणारे सत्ताधारी आणि विरोधक असे दोन गट, त्यांच्यातील एकमेकांवर केल्या जाणाऱ्या कुरघोडी, गावातील भोळ्या लोकांचा स्वतःच्या फायद्यासाठी राजकारणी लोकांनी केलेला वापर, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकमेकांचे पाय ओढण्यासाठी खेळल्या जाणाऱ्या खेळी, सरकारी योजना तळागाळापर्यंत न पोहचवता त्या योजनेतून स्वतःचं उखळ पांढरे करून घेणारी राजकारणी आणि ठेकेदार, फोडाफोडीचे राजकारण आणि विकासाची स्वप्ने यांतून घराघरात चालू झालेल्या भांडणातून एकत्र कुटुंब पद्धतीला गेलेले तडे आणि नाईलाजास्तव या सर्वांमध्ये होरपळत जाणारा गरीब, अडाणी गावकरी यांचं अतिशय प्रखर आणि वास्तववादी वर्णन विश्वास पाटील यांनी या कादंबरीमधे केलेलं आहे. संपूर्ण गावच कादंबरीचा नायक असल्या कारणाने कोणत्याही एका पात्राला जास्त महत्त्व दिलेलं नाहीये पण तरीही विश्वास पाटलांच्या वास्तववादी लिखाणामुळे आणि त्या त्या घटनांमधून त्यांनी केलेल्या वातावरण निर्मितीमुळे अगदी सगळीच पात्रे आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात.

 दुष्काळी गावांच्या यादीत समावेश झाल्यानंतर वेगळ्याच मार्गाने पांगिऱ्याचा प्रवास चालू होतो. पाण्यासाठी आपापसांत होणारी रोजची भांडणे आणि याच कारणामुळे गावकऱ्यांकडून आपल्याच सख्ख्या लोकांचे पाडले जाणारे मुडदे, पांगिरा आणि डोंगरवाडी या बहिण-भाऊ समजल्या जाणाऱ्या गावांमध्ये झालेली जीवघेणी मारामारी वाचकाला जाणीव करून देतात की पाणी हा खरंच किती ज्वलंत प्रश्न आहे. गावाच्या या सर्व प्रवासात भरडला जातो तो सामान्य शेतकरी, पाण्याअभावी होणारी त्याची परवड, कसंही करून शेतात आलेलं पीक जगवण्याची त्याची धडपड, शेतीशिवाय दुसरे कोणतेही उपजीविकेचे साधन त्याच्याकडे नसल्यामुळे होणारे त्याचे हाल, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आयुष्याशी चालू असणारा त्याचा लढा कादंबरीमधे वाचताना नकळत आपल्या डोळ्यांच्या कडा ओल्या होऊन जातात. हाच शेतकरी दुष्काळ आणि पाण्याची कमतरता यांमुळे ऊस सोडून मग कमी पाण्यावर उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून कांद्याच्या शेतीकडे वळतो. गावच्या जवळच तालुक्याच्या ठिकाणी असणारी कांद्याची मोठी बाजारपेठ आणि उसाला चांगला पर्याय म्हणून हळूहळू सर्वच शेतकरी आपापल्या शेतात कांद्याचे पीक घेतात. कांदा हे पीक म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःच्या जीवावर खेळलेला किती मोठा जुगार असतो हे ते पीक लागवड केल्यापासून ते बाजारपेठेत जाईपर्यंतच्या या कादंबरीतील प्रवासातून आपल्याला जाणवते. पण इथेही पांगिऱ्याच्या नशिबी दुःखच येते. कारण बाजारपेठेत पूर्ण तालुक्यातून आलेल्या विक्रमी कांद्याचा व्यापारी आपल्या सोयीप्रमाणे दर पाडून लिलाव चालू करतात आणि आधीच दुष्काळाने होरपळून गेलेला, पोटाला चिमटे काढून पिकवलेल्या कांद्याची अशी होणारी अवहेलना शांतपणे पाहणारा शेतकरी आपला संयम सोडतो. व्यापारी आणि शेतकऱ्यांमधे चालू झालेला दंगा पोलिसांच्या गोळीबारानेच थांबतो. चिखलाने - रक्ताने माखलेला कांदा, त्यावर निपचित पडलेले काही शेतकरी आणि शांत झालेली बाजारपेठ असा या कादंबरीचा शेवट. हा शेवट वाचून झाल्यानंतर काही वेळ आप सुन्न होऊन जातो आणि एक वाचक म्हणून विचार करायला भाग पडतो की नक्की चुकलं कुठं आणि कुणाचं. 

पाण्यासारख्या अतिशय ज्वलंत विषयाला हात घालत असताना विश्वास पाटील यांनी पुस्तकांमध्ये आणि सरकारी योजनांमध्ये "राजा" म्हणवणारा शेतकरी खऱ्या आयुष्यात कितीतरी संकटांना सामोरा जाऊन आपल्यासारख्या लाखो लोकांचे पोट कसं भरतो याची जाणीव आपल्याला त्यांच्या या "पांगिरा" कादंबरीतून करून दिली आहे. 

प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी वास्तववादी कादंबरी "पांगिरा".





संदीप प्रकाश जाधव

1 comment:

  1. sir tumch vachan afat ashnar he tumchya lekhanatun sahaj lakshat yetay.

    ReplyDelete

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये