लेखिका : वीणा गवाणकर
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
बऱ्याच दिवसांपूर्वी वाचायचं म्हणून संग्रही घेतलेलं पण इतर पुस्तकांच्या गर्दीत हरवलेलं हे पुस्तक काही दिवसांपूर्वी हाती लागलं. तरीही वाचण्याचा मोह मुद्दामहून आवरता घेतला आणि परत ठेऊन दिलं माझ्या ५०व्या पुस्तक परिचयासाठी, जेणेकरून पुस्तक वाचन आणि परिचय दोन्हीही खास व्हावं. पण वाचून झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे चार ओळींत परिचय देण्यासारखं हे पुस्तक नक्कीच नाही. हे पुस्तक म्हणजे कथा आहे शतकाचा महानायक ठरवता येईल अशा एका व्यक्तिमत्वाची, उभं आयुष्य आपल्या ध्येयासाठी वाहून घेणाऱ्या एका कर्मयोग्याची, अमेरिकेच्या निर्जिव दक्षिण प्रदेशाला अमरत्व देणाऱ्या एका महामानवाची, एका अमेरिकन कृषी तज्ज्ञाची, तपस्वी मुक्तात्म्याची आणि ज्ञानयोग्याची अर्थातच 'डॉक्टर जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर' यांची. अमेरिकेतील निग्रो जमातीत जन्मलेला, वर्णभेदाच्या आणि गुलामगिरीच्या अंधारात पोरकेपणा वाट्याला आलेला हा एक दमेकरी, आजारी आणि कृश मुलगा. अमेरिकेत वर्णभेद जेव्हा अगदी टिपेला होता त्या काळात "निग्रो" म्हणून जन्माला आलेलं, अवघं २ महिन्यांचं असताना ज्याच्या आईला गुलाम म्हणून विकण्यासाठी पळवून नेलं गेलं, पोरकेपणा वाट्याला आल्यानंतर आज मरेल की उद्या अशा अवस्थेत ज्याची आयुष्यासोबत लढाई चालू होती ते मूल पुढे जाऊन एक महान शास्त्रज्ञ होईल असं कोणी जर बोललं असतं तर नक्कीच त्याची गणना तेव्हा मूर्खात केली गेली असती. परंतु आपल्या अपार कष्टाच्या जोरावर, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कार्व्हर यांनी मिळवलेलं यश किती अफाट होतं याची प्रचिती या पुस्तकातून येते. ज्ञानलालसेपोटी अधांतरी फिरून, पडेल ती कामे करून, ज्ञानार्जन करून आयुष्य संपेपर्यंत निष्णात कर्मयोग्याप्रमाणे समाजासाठी झटलेल्या, बंधन नको म्हणून आजन्म अविवाहित राहिलेल्या, समाजसेवेसाठी जीवन वाहिलेल्या डॉक्टर कार्व्हर यांची महानता "एक होता कार्व्हर" च्या माध्यमातून वीणा गवाणकर यांनी आपल्यासमोर मांडली आहे. कार्व्हर यांनी लावलेले फक्त शोधच नाहीत तर प्रतिकूल परिस्तिथीवर मात करून जगण्याची कला आणि अपल्या ज्ञानाचा समाजाच्या भल्यासाठी त्यांनी केलेला वापर याचे सार्थ दर्शन या पुस्तकामधून होते. अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ जॉर्ज वाँश्गिंटन कार्व्हर यांच्या संघर्षमय, प्रेरणादायी जीवनाची गाथा आणि त्यांचा खडतर जीवनप्रवास वीणा गवाणकर यांनी रेखाटला आहे त्यांच्या या १८० पानी पुस्तकात "एक होता कार्व्हर" मधे. हृदय पिळवटून टाकणारा आयुष्याचा प्रवास आणि खडतर गुलामाचे आयुष्य जगूनसुद्धा फक्त आपली मायभूमी आणि स्वतःच्या समाजासाठी झटणाऱ्या एका निस्वार्थी, महान, असामान्य व्यक्तीची ही कहाणी "एक होता कार्व्हर".
अमेरिकेतील मिसोरी प्रांतातील डायमंड ग्रोव्ह पाड्यावर मोझेस कार्व्हर या दांपत्याकडे काम करणारी मेरी ही गुलाम निग्रो स्री अमेरिकेत गुलामांना पळवून विकण्याचा धंदा तेजीत असताना एका टोळीकडून आपल्या २ महिन्यांच्या मुलासोबतच पळवून नेली जाते. पुढे एका उमद्या घोड्याच्या मोबदल्यात मेरीचा दोन महिन्याचा मरणोन्मुख, दमेकरी, दुबळा मुलगा मोझेस दांपत्याला परत मिळाला आणि इथूनच सुरू झाली या महानायकाच्या संघर्षाची. एकाकी आणि अबोल राहणाऱ्या कार्व्हरचं बालपण कामाच्या रगाडयात हरवुन गेलं, सोबत कोणीच नसल्याने संपूर्ण स्वावलंबन अंगी रुजलं, कितीही तडाखे बसले तरी कोणाच्या मदतीशिवाय आपण ताठ उभे राहू शकतो याची जाणीव त्यांना बालपणातच झाली. उन्हाळ्याच्या सुट्टीत मजुरी, स्वयंपाकी, लाकडं फोडणं, लोहाराच्या हाताखाली राबायला जाणं अशी हरप्रकारची कामं करत कार्व्हर शिकत राहिले. पक्ष्यांची पिल्लं, डबक्यातील छोटे मासे, रानावनातील झाडेझुडपे हेच त्यांचे मित्र बनले. दिवसभर शाळा आणि त्यानंतर पोटाचा प्रश्न मिटवण्यासाठी मिळतील ती कामं ते करायचं. त्यांचं शिक्षण हे असंच चाललं होतं, जिथून आणि जसं मिळेल तसं! पुढे अधिकाधिक वाढत जाणाऱ्या ज्ञानलालसेमुळे पडतील ते कष्ट उपसून ते शिकत राहिले. कामधंदा करून पैसे मिळवायचे, मग शाळेत नाव घालायचं. शिकत असताना पैसे संपले की शाळा सोडायची. परत काम करायचं. 'आपण इतकं शिकावं, इतकं शिकावं की एक दिवस कुठल्याच शिक्षकाने शिकवावं असं ज्ञान उरणार नाही आणि मग या सृष्टीचा विधाता त्याचं रहस्य आपल्यापुढे उलगडून ठेवेल.' असं स्वप्न उराशी बाळगणारा कार्व्हर वयाच्या केवळ दहाव्या वर्षी शिक्षणासाठी आपलं गाव ‘डायमंड ग्रोव्ह’, आपले मालक ‘मोझेस आणि सूझन कार्व्हर’ या सगळ्यांना सोडून एकटाच नीओशे गावात गेला. निओशे येथे प्राथमिक शिक्षण घेत असताना दिवसभर शाळा आणि त्यानंतर पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी मरमर काबाडकष्ट करून रात्री झोपायला जुना पडका गोठा अशी कार्व्हरची अवस्था होती. लहानपणापासूनच कोणतीही गोष्ट कलाकाराच्या वृत्तीने शिकणारे जॉर्ज एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून घडू लागले. आभाळाएवढं दारिद्र्य आणि नशिबी आलेला अनाथपणा या अवस्थेत जॉर्ज यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. कृष्णवर्णीय असल्याने पात्रता असूनदेखील हायलड युनिव्हर्सिटीने जेव्हा कॉलेज प्रवेश नाकारला गेला तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला. तरीही त्यांची शिकण्याची इच्छा काही कमी नाही झाली. निग्रो लोकांसाठी खास असणाऱ्या सिंपसन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि माणुस म्हणून जगणं ही काय चीज असते याचा पहिला निखळ अनुभव त्यांना इथे मिळाला. १८६५ साली कृष्णवर्णीयांच्या स्वातंत्र्याला अधिकृत मान्यता मिळूनही निग्रो समाज हिंसाचार आणि जाळपोळ यांमध्ये होरपळून निघत होता. अमेरिकेतील वर्णद्वेषाची यादवी कायद्याने नष्ट करण्यात आली होती, परंतु सामान्य लोकांच्या मनातील गुलामगिरीची धग कायम होती. एका कृष्णवर्णीय कैद्याला जिवंत जाळण्याचा प्रकार बघितल्यानंतर जॉर्ज मुळापासून हादरले, काळ्या कातडीचा अर्थ तेव्हा त्यांना पूर्णपणे समजला. अशा अतिशय प्रतिकूल परिस्तिथीवर मात करून कार्व्हर यांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. १८९४ साली विज्ञान शाखेची पदवी मिळवल्यावर त्याच कॉलेजमध्ये कार्व्हर यांची प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. पुढे १८९६ साली त्यांनी Agricultural and Bacterial Botany या विषयाची उच्च पदवी, MS संपादन केली.
कार्व्हर यांनी केलेल्या कष्टाला खरी झळाळी मिळाली ती त्यांचे 'बुकर टी वाँशिग्टन' यांच्याशी जोडले गेल्यानंतर. मानवाला सुजाण बनवणारा शिक्षणतज्ज्ञ म्हणुन अलाबामा टस्कगी शाळेचे बुकर टी वाँशिग्टन यांची ख्याती झाली होती. बुकर टी वाँशिग्टन यांनी जॉर्ज कार्व्हर यांना शतकानुशतके दारिद्रयाने गांजलेल्या, गुलामीच्या चिखलात रुतलेल्या त्यांच्या समाजबांधवांना उद्धारुन त्यांना सुजाण बनवण्याच्या कामात मदतीचे आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कार्व्हर दक्षिण अमेरिकेत, अलाबामात पाऊल ठेवले आणि सुरुवात झाली जगाला स्तिमित करणाऱ्या एकाहून एक संशोधन मालिकांची! आपल्या शिक्षणाचा आपल्या बांधवांना उपयोग झाला पाहिजे अशी भावना असणाऱ्या कार्व्हर यांनी आपल्या आयुष्याची पुढची जवळपास ४० हून अधिक वर्षें अलाबामा येथे काढली. अलाबामा टस्कगी शिक्षणसंस्थेच्या शेतकरी विभागाचे पहिले डायरेक्टर म्हणून कार्व्हर यांची नेमणुक झाल्यानंतर त्यांचा पगार होता वार्षिक १५०० डॉलर्स. या संस्थेत डॉ. कार्व्हर शेतीतज्ञ म्हणून दाखल झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या अचाट कामगिरीने आपल्या बांधवांच्या अनेक समस्यांचे निराकरण केले. शेतकऱ्यांचे समृध्द जीवनच राष्ट्राचा विकास घडवते हा एकच मंत्र मनात ठेवून डॉ. कार्व्हर यांनी समाजाच्या तळागाळातील घटकांच्या गरजा ओळखून आपल्या संशोधनाला दिशा दिली. कार्व्हर यांनी आपल्या अपार मेहनत आणि चिकाटीने दक्षीण अमेरिकेला स्वयंपूर्ण बनवण्याच्या दृष्टीने लोकांच्या आयुष्यवार दूरगामी परिणाम करणारे संशोधन केलं. कार्व्हर यांच्या बुद्धीचातुर्याने आणि संशोधनाने सारं जग स्तिमित झालं. डॉक्टर कार्व्हर यांनी अमेरिकन निग्रो आणि गो-या या दोन्ही समाजासाठी केलेलं कार्य अजरामर आहे. वर्णभेदाच्या भिंती ओलांडून कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या अष्टपैलू बुद्धीचातुर्याने संगीत, कला, फुल-फळझाडे, विविध शेतपीके, वैद्यकशास्त्र यामध्ये त्यांनी केलेलं संशोधन आज इतक्या वर्षांनंतरदेखील अमेरिकेसाठी एक संजीवनी आहे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या ज्ञानाचा उपयोग गरजू लोकांसाठी करणाऱ्या कार्व्हर यांनी अलाबामामधे आपला अखेरचा श्वास घेतला. कार्व्हर यांच्याबद्दल जितकं लिहावं तितकं कमीच आहे परंतु वीणा गवाणकर यांनी थोडक्यात पण अतिशय उत्कृष्टपणे कार्व्हर यांचं चरित्र ज्या पद्धतीने "एक होता कार्व्हर" मधून लोकांपर्यंत पोहोचवलं आहे ते नक्कीच प्रत्येकाला प्रेरणादायी आहे.
संग्रही ठेवून प्रत्येकाने अगदी आवर्जून वाचावं असं पुस्तक "एक होता कार्व्हर".
संदीप प्रकाश जाधव
No comments:
Post a Comment