लेखक : रत्नाकर मतकरी
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन
मराठी साहित्यामधे गूढकथा हा प्रकार ज्या लेखकांनी लोकप्रिय केला त्यांमध्ये सर्वात प्रथम ज्यांचे नाव घ्यावं लागेल ते म्हणजे रत्नाकर मतकरी यांचे. यावर्षीच १७ मे २०२० रोजी त्यांचा वयाच्या ८१ व्या वर्षी कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. रंगभूमी आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात मोठं नाव असलेल्या काही मोजक्याच लोकांपैकी ते एक होते. रत्नाकर मतकरी यांनी वेगवेगळ्या विषयांवर बरीच पुस्तके, एकांकिका, नाटके लिहिली पण त्यांनी हटके अंदाजात लिहिलेल्या गूढकथा थोड्या खासच. जवळपास २०० पेक्षा जास्त गूढकथा त्यांनी लिहिल्या आणि वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत पोहचल्या. त्यांनी लिहिलेली काही पुस्तके खेकडा, गहिरे पाणी, बकासुर, कबंध, रंगांधळा, अॅडम, रंगयात्री आणि बरीच. रत्नाकर मतकरींनी जवळपास २३ कथासंग्रह लिहिले त्यांपैकीच एक गूढकथासंग्रह म्हणजे "अंतर्बाह्य".
गूढकथा आणि भयकथा यांमधील नेमका फरक जो एक वाचक म्हणून माहीत असणं महत्त्वाचं आहे, तो रत्नाकर मतकरी यांनी अगदी सहज, सोप्या भाषेत त्यांच्या या "अंतर्बाह्य" पुस्तकाच्या सुरुवातीलाच सांगितला आहे. नेहमीच्या पाहण्यात नसलेलं, ज्याची कदाचित भीती वाटू शकेल पण ते भीतिदायक नाही ते म्हणजे गूढ. एखाद्याला भीती का वाटते हे शोधणे म्हणजे सुद्धा एकप्रकारचे गूढच. नेहमीच्या वास्तवापेक्षा वेगळ्या आणि अतर्क्य गोष्टींची कथेत मांडणी केली तर गूढकथा बनतात, मतकरींनी लिहिलेल्या अशाच १० अतर्क्य गोष्टींचा संग्रह म्हणजे हे पुस्तक "अंतर्बाह्य". रोजचे आयुष्य जगणाऱ्या मनुष्याचे व्यक्तिमत्त्व कधी कधी अचानकच गूढ वाटू लागते, अशा "अंतर्बाह्य" बदलणाऱ्या व्यक्तिमत्वाला केंद्रस्थानी ठेवून लिहील्या गेलेल्या १० गूढकथा आपल्याला या पुस्तकामधे वाचायला मिळतील. १८० पाने आणि १० गूढकथांचे हे पुस्तक वाचत असताना आपणही नकळत त्या कथांमधे हरवून जातो. गूढकथा या तेव्हाच पटण्यासारख्या किंवा परिपूर्ण वाटतात जेव्हा कथेतील पात्रे, घटना, वातावरण आणि आशय यांची योग्य भाषेत मांडणी केली जाते. रत्नाकर मतकरींच्या इतर पुस्तकांप्रमाणे "अंतर्बाह्य" मधेसुद्धा आपल्याला परिपूर्ण अशा गूढकथा वाचायला मिळतील.
"अंतर्बाह्य" या नावाप्रमाणेच रत्नाकर मतकरींची या पुस्तकातील प्रत्येक गूढकथा मानवी मनाच्या विविध भावनांतून जन्म घेते. जसे प्रेमातून गूढतेकडे जाणारी पहिली कथा "अंतर्बाह्य", सूडातून जन्माला येणारी "सावळी", कौटुंबिक अत्याचारतून येणारा एकटेपणा आणि त्यातूनच पूढचे गूढ घेऊन येणारी "कोळसा", दुर्बलतेमुळे आलेली अगतिकता त्यावर आधारित "हे सारे...पूर्वी कधीतरी", तीव्र मानसिक धक्क्याने एखाद्याचे बिघडणारे संतुलन आणि त्याचा गुढकतेतून सुखद शेवट करणारी "ती गेली", जवळच्या प्रिय व्यक्तीकडून दिला जाणारा धोका आणि सतत दुसऱ्याशी केली जाणारी तुलना यातूनच स्वतःला सिध्द करण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून घडलेली "दुसऱ्यासारखा एखादा", स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरदार सोडून मुंबईत आल्यानंतर घडणारी "पत्ता", पुनर्जन्मावर आधारित आठवणींतून घडणारी "जन्मोजन्मी", झपाटलेल्या पुरातन वास्तूत एका रिऍलिटी शोमध्ये भीतीदायक वातावरणात घडलेली "हॉंटेड हाउस" आणि जातीय दंगलीतून समोर आलेली शेवटची कथा "शेला". प्रत्येक कथेचे वेगळेपण आणि वेगळ्या प्रकारचे गूढ हीच रत्नाकर मतकरींनी लिहिलेल्या गूढकथांची खासियत जी आपल्याला "अंतर्बाह्य" वाचत असताना जाणवत राहील.
गूढकथांची आवड असणाऱ्यांनी हे पुस्तक नक्कीच वाचावं पण त्याचबरोबर काहीतरी वेगळं वाचन करावं म्हणून इतरांनीसुद्धा आवर्जून वाचावं असं हे रत्नाकर मतकरी यांचे पुस्तक "अंतर्बाह्य".
संदीप प्रकाश जाधव
No comments:
Post a Comment