लेखक : रणजित देसाई
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
मराठी साहित्यात रणजित देसाई या नावाला वेगळ्या परिचयाची गरज नाही. साहित्यविश्वात "स्वामीकार" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देसाईंची "स्वामी" ही पहिली ऐतिहासिक कादंबरी! "स्वामी" कादंबरी म्हणजे थोरल्या माधवराव पेशव्यांची जीवनगाथाच! मराठ्यांच्या इतिहासात जर डोकावून पाहिलं तर स्वराज्य निर्मितीपासून ते पेशवाईच्या अंतापर्यंत अशा बऱ्याच व्यक्ती आपल्यासमोर येतील ज्यांच्या कारकिर्दीला एकाचवेळी आपलं सौभाग्य आणि दुर्भाग्य अशा दोन टोकाच्या दृष्टिकोनांतून पहावं लागेल, अगदी शिवरायांनासुद्धा! सौभाग्याचं कारण सांगायची गरज नसली तरी दुर्भाग्य एवढ्यासाठी म्हणावं लागेल की अशा महान लोकांच्या वाट्याला आलेलं अल्पायुषी जीवन! ऐतिहासिक कादंबरी वाचत असताना माझ्यासारख्या अनेक वाचकांच्या मनाला एकदा तरी नक्कीच असं वाटलं असणार की छत्रपती शिवजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पेशवा बाजीराव, पेशवा माधवराव आणि असे बरेच थोर लोक ज्यांनी स्वराज्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं, आपल्या छोट्याशाच पण देदीप्यमान कारकिर्दीने जगाला त्यांची दखल घेण्यास भाग पाडलं ते जर इतर मुघल किंवा आदिलशाही बादशहांप्रमाणे दीर्घायुषी असते तर आज आपला इतिहास काय असता? इतिहासाला "जर-तर" हे शब्द वर्ज्य असले तरी फक्त असा विचारच आपल्या अंगावर अभिमानाने शहारे घेऊन येतो. अल्पायुषी जरी असल्या तरी इतिहासात अशा काही कारकिर्दी आहेत ज्या सुवर्णाक्षरांनी लिहिल्या गेल्या आहेत. आजही त्या सामान्य लोकांना जगण्याची, लढण्याची उमेद देतात! अशाच कारकिर्दीपैकी एक झळाळती कारकीर्द श्रीमंत माधवराव पेशवे यांची! अवघ्या १६-१७ व्या वर्षी अंगावर पडलेली भारतभर पसरलेल्या मराठा साम्राज्याची मोठी जबाबदारी, पानिपतच्या युद्धानंतर विस्कटलेली राज्यकारभाराची घडी, राघोबादादांसारख्या अटकेपार झेंडे लावणाऱ्या पराक्रमी काकांची घरातूनच त्यांच्याविरुद्ध चाललेली कट-कारस्थाने या सर्वांवर मात करून माधवरावांनी त्यांच्या फक्त ११ वर्षांच्या कारकिर्दीत राज्य तर सावरलेच शिवाय त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली चाललेल्या राजकारणामुळे पानिपतातील पराभवाने सरदार, सैन्य आणि प्रजेच्या मनावर झालेल्या जखमांवर फुंकर घालून एक नवी ऊर्जा निर्माण झाली. रणजित देसाईंची "स्वामी" ही ऐतिहासिक कादंबरी माधवराव पेशव्यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. ४१३ पानांच्या या कादंबरीतून रणजित देसाईंनी माधवराव पेशव्यांची जी कारकीर्द लिहिली आहे ती जणूकाही आपल्या समोरच घडत असावी इतक्या ताकदीने मांडली आहे. त्यामुळेच १९६२ साली लिहिल्या गेलेल्या या कादंबरीची जादू साहित्यविश्वात आजही टिकून आहे. "स्वामी" नंतर शिवरायांवरील "श्रीमानयोगी" ही अजरामर कादंबरी त्यांनी लिहिली परंतु "रणजित देसाई" म्हटलं की आजही पहिला डोक्यात विचार येतो तो "स्वामी"चाच! रणजित देसाईंच्या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे मूळ विषयाला जराही धक्का न लावता वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी मांडणी आणि संवाद! कादंबरी वाचत असताना वाचकाला त्या काळात घेऊन जाण्याची हातोटी असणाऱ्या मोजक्याच लेखकांपैकी एक "रणजित देसाई"! त्यांची "स्वामी" ही कादंबरीदेखील याला अपवाद नाही.
पानिपतचा पराभव ही समस्त मराठ्यांच्या जिव्हारी लागलेली, कधीही भरून न निघणारी जखम! पानिपतच्या संग्रामात भाऊंसोबतच विश्वासराव देखील कामी आले. ज्यांच्याकडे भावी पेशवा म्हणून पाहिलं जात होतं असा आपला मुलगा विश्वासराव आणि बंधू सदाशिवराव भाऊ यांचा मृत्यू शिवाय पानिपतचा पराभव अशा तिहेरी धक्क्याने लढाईनंतरच्या अवघ्या ५ महिन्यांत नानासाहेब पेशव्यांचे निधन झाले. त्यानंतर आपसूकच पेशवाईची वस्त्रे नानासाहेबांचे द्वितीय पुत्र माधवराव यांना मिळाली तीही वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी! पानिपतावर झालेला मोठा पराभव आणि नानासाहेब पेशव्यांच्या अकस्मात जाण्याने मराठा साम्राज्याची घडी विस्कळीत व्हायला सुरुवात झाली होती. दख्खनमधे निजाम तर कर्नाटकात हैदर अली यांना जोर चढला होता, मराठा मुलुखावर हल्ले होऊ लागले होते! त्यामधे भर पडली ती स्वकीयांच्यामुळे, नागपूरकर भोसल्यांना सातारा गादीची स्वप्ने पडू लागली आणि त्यांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला. शिवाय सर्वांत वाईट गोष्ट जर कोणती असेल तर ती पेशव्यांच्या घरात चालू झालेलं गृहयुद्ध! पेशवे पदासाठी आधीच गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले नानासाहेब पेशव्यांचे धाकले भाऊ राघोबादादा यांच्याकडून माधवरावांविरुद्ध वारंवार होणाऱ्या कट-कारस्थानांना ऊत आला. माधवरावांची ११ वर्षांची कारकीर्द या सर्वाचा निकाल लावण्यातच गुंतून जाते. हैदरचा बिमोड करण्यासाठी कर्नाटकवर ४, निजामाला धडा शिकवण्यासाठी त्याच्यावर २ आणि नागपूरकर भोसल्यांवर २ अश्या एकूण आठ स्वाऱ्या माधवरावांनी केल्या. माधवरावांचा सर्वात जास्त काळ हा घरभेद्यांवर लक्ष देण्यातच गेला. कारण राघोबादादा कितीही पराक्रमी असले तरी ते हलक्या कानाचे आणि अविचारी असा त्यांचा लौकिक होता शिवाय सतत त्यांचा पेशवाईवर असणारा डोळा! माधवरावांनी राघोबादादांना अनेक वेळा समजावून सांगितलं, तरीही सखारामबापूंच्या सल्ल्याने ते आळेगावत माधवरावांविरुद्ध युद्धास उभे राहिले. मराठा दौलतीच्या हितासाठी आळेगावच्या लढाईनंतर माधवरावांनी स्वतः नमते घेऊन राज्याची सूत्रे राघोबादादांना देऊ केली परंतु राघोबादादांच्या कारवायांना पूर्णपणे पायबंद होत नसल्याचे पाहून शेवटी त्यांना शनिवार वाड्यातील बदामी महालात नजर कैदेत ठेवण्याचा निर्णय माधवरावांना घ्यावा लागला. राजकारणाच्या दृष्टीने फारसे महत्त्वाचे नसलेले परंतु पेशव्यांच्या घरातील शांततेला बाधा आणणारे "तोतया सदाशिवराव भाऊ" प्रकरण माधवरावांनी ज्यापद्धतीने हातावेगळं केलं ते त्यांच्या हुशारी, धीरोदात्तपणाची साक्ष देते.
राज्यकर्त्यांची खरी कसोटी लागते ती भावनिक पातळीवरच्या प्रकरणांचा निवाडा करताना. याठिकाणीही इतक्या कमी वयात माधवरावांकडे असणारी प्रगल्भता थक्क करून जाते. याचे उदाहरण म्हणजे निजाम पुण्यात येऊन सर्व शहर लुटून पर्वतीवरच्या श्रींची मूर्ती भंग करत असताना पेशव्यांचे सख्खे मामा रास्ते निजामाला मदत करत होते. हे समजल्यानंतर या गुन्ह्यासाठी माधवरावांनी त्यांना दंड ठोठावला. तोही आपल्या मातोश्री, गोपिकाबाईंचा रोष पत्करून! कर्तव्यदक्ष माधवरावांनी दंड मागे न घेतल्याने रागावून गोपिकाबाई कायमच्या गंगापूरला निघून गेल्यानंतर माधवराव मातृप्रेमास पारखे होतात. यानंतर परत माधवराव आणि गोपिकाबाई यांच्या भेटीचा उल्लेख नाही. एकाकी पडलेल्या माधवरावांना पत्नी रमाबाई सोडल्यास जवळचे असे कोणीच रहात नाही. त्यातच त्यांना जडलेला राजयक्ष्मासारखा जीवघेणा आजार! तरीही ते शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त मराठी दौलतीचाच विचार करत राहिले. हे सर्व घटनाक्रम ज्या पद्धतीने रणजित देसाईंनी कादंबरीत दिले आहेत ते वाचत असताना बऱ्याच वेळा वाचकाचे भान हरवून जाते. रणजित देसाईंच्या "स्वामी"ची शेवटची २० पाने तर खूपच भावनिक आहेत. माधवरावांचे थेऊर मधील अखेरचे दिवस आणि मृत्यू समोर दिसत असतानादेखील त्यांची तडफ वाचकाला कमालीचं अस्वस्थ करते, नकळत डोळ्यांत पाणी येते. रमाबाईंचा सती जाण्याचा प्रसंग सुद्धा असाच वाचकाला भावूक करतो. माधवरावांच्या अवघ्या अकरा वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी पानिपतच्या पराभवानंतर विस्कटलेली राज्याची घडी पुन्हा बसवली. हैदर अली, निजाम यांच्यासारखे दौलतीचे शत्रू आणि राघोबादादांसारखे सख्खे काका यांना वठणीवर आणून राज्यात शिस्त व कार्यक्षम प्रशासनव्यवस्था निर्माण केली आणि अल्पावधीत मराठ्यांचा दरारा सर्वत्र निर्माण केला. माधवरावांच्या अकस्मात मृत्यूनंतर मराठा साम्राज्य उतरणीला लागले असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरू नये. म्हणूनच पेशवाईच्या काळात साताऱ्यात वास्तव्याला असणारा ब्रिटिश इतिहासकार, ज्याने मराठ्यांचा इतिहास लिहिला तो ग्रॅंट डफ म्हणतो मराठा साम्राज्याची पानिपतापेक्षाही मोठी हानी म्हणजे माधवराव पेशवे यांचा अकाली मृत्यू!
आवर्जून वाचावी अशी कादंबरी!!
संदीप प्रकाश जाधव
No comments:
Post a Comment