लेखक : डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे
प्रकाशक : New Era Publishing House
फक्त "शिवाजी" हे नाव कधीही, कुठेही ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येणारी पहिली प्रतिमा एकच, आपल्या मनात येणारे पहिले विचार एकच ते म्हणजे "छत्रपती शिवाजी महाराज" यांचे. या नावात जादूच अशी आहे की आजही अगदी ३५० वर्षांनंतरसुद्धा त्यांच्याबद्दल काहीही लिहिलं गेलं तरी ते आपल्याला वाचण्याचा मोह होतोच, अगदी लहानपणापासून आपण त्यांच्या पराक्रमाच्या, शौर्याच्या गोष्टी ऐकत आलो असलो तरी आजही प्रत्येकवेळी त्या ऐकताना, वाचताना ऊर अभिमानाने भरून येतो. शिवरायांच्या नंतर आणि त्यांच्या आधीही अनेक राजे होऊन गेले पण त्यांपैकी किती राजे लोकांच्या आठवणीत आहेत हा एक प्रश्नच आहे. शिवरायांचं एक महान राजा म्हणून असणारं स्थान जितकं त्यांच्या पराक्रम आणि कर्तृत्वामुळे आहे तितकंच किंवा त्याहून थोडं जास्तच ते त्यांच्या चारित्र्यामुळे आहे. अशा या चारित्र्यसंपन्न, पराक्रमी, कर्तृत्ववान राजाच्या आयुष्यावर आजवर अनेक पुस्तके लिहीली गेली, अनेक रहस्यकथा, चित्रपट, कादंबऱ्या लोकांपर्यंत पोहचल्या आणि तरीही समुद्रातून कितीही काढून घेतले तरी कमी न होणाऱ्या पाण्यासारख्या त्यांच्या आयुष्यातील एक एक घटना, पराक्रम आजही लोकांसमोर येतच असतात. शिवरायांच्या आयुष्यात घडलेल्या अशाच एका घटनेचा संदर्भ घेऊन डॉ. प्रकाश कोयाडे यांनी लिहिलेली ही कादंबरी "प्रतिपश्चंद्र". जरी शिवरायांच्या आयुष्यातील घडलेल्या एका घटनेची पार्श्वभूमी या पुस्तकाला असली तरी "प्रतिपश्चंद्र" हा काही इतिहास नाही तर इतिहासातील काही दुवे घेऊन रचलेली एक काल्पनिक रहस्यकथा आहे. इतिहासाला थोडाही धक्का न लावता लेखकाचा हा एक कल्पना अविष्कार आहे. "प्रतिपश्चंद्र" जशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारीत आहे तशीच ती १३ व्या शतकापासून ते २१ व्या शतकाच्या कालखंडात आपल्या भारत भूमीवर घडलेल्या इतिहासाचे धागे पकडून त्याला कल्पनेची जोड देऊन तयार झालेली एक रहस्यमय कादंबरी आहे. ही कादंबरी म्हणजे कहाणी आहे छत्रपती शिवरायांच्या ३२ मणी सुवर्ण सिंहासनाच्या थरारक, रोमांचक शोधाची आणि त्याबरोबरच दक्षिण भारतातील विजयनगर साम्राज्याचा प्रचंड खजिना जो शिवाजी महाराजांनी संरक्षणाची हमी देऊन बहिर्जी नाईक आणि त्यांच्या शिलेदारांमार्फत ३५० वर्षें वाईट लोकांपासून सुरक्षित ठेवला त्या खजिन्यापर्यंत पोहचण्याचा थरारक, रोमांचक प्रवास म्हणजे ही कादंबरी "प्रतिपश्चंद्र".
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांनी राजमुद्रेमध्ये लपवलेले एक रहस्य, जे ३५० वर्षांपासून बाहेर येण्याची वाट पाहत आहे आणि ते रहस्य उलगडण्यासाठी केलेला थरारक प्रवास म्हणजे ही कादंबरी "प्रतिपश्चंद्र". विजयनगर साम्राज्याचा प्रचंड खजिना शोधण्यासाठी सुरू झालेला या कादंबरीचा प्रवास ४ दिवसानंतर त्या खजिन्यासोबतच शिवरायांच्या ३२ मण सुवर्णसिंहासनाच्या शोधाने संपतो. कोणत्याही रहस्यकादंबरीमध्ये वाचकाने हरवून जाण्यासाठी लेखकाकडून लिहिल्या जाणाऱ्या कथेला एक असं व्यासपीठ लागतं जिथे वाचत असताना वाचकांच्या मनामध्ये पानापानावर प्रश्नचिन्हांची एक साखळी उभी रहावी, वाचक त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नात असतानाच एक भांबावून सोडणारा धक्का बसावा आणि त्या धक्क्यातून बाहेर येण्याच्या आतच त्याच्यासमोर होणारा रहस्याचा उलगडा. डॉ. कोयाडे यांची अतिशय थरारक घटनांच्या मालिकेतून पुढे सरकणारी "प्रतिपश्चंद्र" ही कादंबरी म्हणजे अशी बरीच प्रशचिन्हे, रहस्ये आणि एकामागून एक बसणारे धक्के यांनी खचाखच भरलेलं एक व्यासपीठच आहे जिथे वाचक थक्क होऊन हरवून जातो.
डॉ. रवीकुमार हा या कथेचा नायक. कथेचा नायक एक हुशार तरुण, डॉक्टर, अतिशय श्रीमंत कुटुंबात जन्मलेला, अगदी मजेत आयुष्य जगणारा एक तरुण. नागपूरहून एका डॉक्टर परिषदेसाठी औरंगाबादला आपला मित्र आदित्यला सोबत घेऊन आलेला रवी एक दिवस अनपेक्षितपणे एका भोवऱ्यात अडकतो, कादंबरीच्या सुरुवातीलाच तो एका रहस्यात अडकतो पण एकटा नाही तर एक वाचक म्हणून आपल्याला सोबत घेऊनच. पुढे पानापानावर मिळणाऱ्या सांकेतिक संकेतांचे अर्थ शोधत रवीचा आदित्यसोबत एक थरारक प्रवास सुरु होतो आणि पुढच्या ४ दिवसांच्या या सर्व प्रवासात आपण एक वाचक म्हणून त्यांच्यासोबतच प्रवास करत राहतो, अगदी शेवटच्या पानापर्यंत. कारण अनपेक्षितपणे सुरू झालेल्या या प्रवासाचे रहस्य उलगडने जेवढी नायकाची गरज आहे तेवढीच एक वाचक म्हणून आपलीही होऊन जाते. या सर्व थरारक प्रवासासोबत पुढे सरकणाऱ्या या कथेमध्ये अधून मधून इतिहासात डोकावून तिथले संदर्भ देत असताना कोयाडे यांनी वाचक कुठेही न हरवता, त्याचा कुठेही गोंधळ न उडता तो कथेसोबतच जोडला राहील याची पुरेपूर काळजी घेतली आहे. या थरारक घटनांना असणारी ऐतिहासिक पार्श्वभूमी समजावून सांगण्यासाठी इतिहासात डोकावत असताना बऱ्याच गोष्टींची अगदी सविस्तर माहितीसुद्धा लेखकाने कादंबरीमध्ये दिलेली आहे जसे भारतातील प्राचीन वैभव, विजयनगर साम्राज्य आणि त्यांचा इतिहास, हम्पी आणि त्याठिकाणची प्रसिद्ध स्थळे, प्राचीन गडकिल्ले, वेरुळच्या लेण्या, जगप्रसिद्ध कैलास मंदिर, चिंदबरम येथील नटराजाची मुर्ती, मुंबई - औरंगाबाद शहर, निळावंती ग्रंथ, ऐतिहासिक सांकेतिक भाषा, गौतम बुद्ध, प्राचीन शिल्पकला, घृष्णेश्वर मंदिर, शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, छत्रपती शिवाजी महाराजांची दक्षिणदिग्विजय मोहीम, महाराजांचे सुवर्णसिंहासन, बहिर्जी नाईक यांची बुद्धिमत्ता आणि बरंच काही. फक्त इतिहास व रहस्य या मध्ये अडकून न राहता एक सुंदर प्रवास वर्णनसुद्धा कादंबरीमध्ये आहे. यासोबतच नायकाला या थरारक प्रवासात साथ देणारे आदित्य, प्रियल, प्रशिक, ज्योती आणि सुर्यकांतराव यांची श्रद्धा, देव,भक्ती, आस्तिक - नास्तिक, ग्रह, तारे, ते अगदी विष्णूचा दशावतार आणि डार्विनच्या मानवाच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतापर्यंत अगदी सोप्या भाषेत रवीसोबत होणारी चर्चा वाचकाच्या ज्ञानात नक्कीच भर घालते. नायकाला शेवटपर्यंत साथ देणारा त्याचा मित्र आदित्य आणि त्यांचे सवांद लाजवाब आहेत. कादंबरी वाचायला चालू केल्यानंतर पुढे काय होणार या उत्सुकतेमुळे ती पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवणे अवघड आहे.
शेवटी सापडलेल्या त्या अफाट खजिन्यात रवीला जेव्हा जरीकापडात गुंडाळलेली महाराजांची कवड्यांची माळ आणि भगवा नजरेस पडतो तेव्हा रवीसोबतच एक वाचक म्हणून अभिमानाने आपलाही ऊर भरून नाही आला तरच नवल. खजिन्यापाठोपाठ सापडलेल्या महाराजांच्या सुवर्णसिंहासनावर कवड्यांची माळ अर्पण करून होणारा या कथेचा शेवट. हातात पडलेल्या कवड्यांच्या माळेसमोर त्या अफाट खजिन्यालासुद्धा तुच्छ माननारा रवी हेच सिद्ध करतो की आज ३५० वर्षें होऊनपण महाराजांबद्दल असणारा अभिमान, आदर थोडाही कमी झालेला नाही. आणि याचे कारण म्हणजे, शिवनेरीहून सुरू होऊन रायगडावर शेवट झालेला तो केवळ शरीराचा प्रवास कधीच नव्हता. शिवराय हा एक विचारांचा प्रवास आहे ज्याचा शेवट कधीच नाही होऊ शकत.
मुरलीधर खैरनार यांच्या "शोध" या रहस्यमय कादंबरीनंतर वाचनात आलेली ही आणखी एक उत्कृष्ट कादंबरी. अतिशय उत्कंठावर्धक, रोमांचक, थरारक आणि वाचत असताना लागलेल्या आपल्या तंद्रीला धक्क्या मागून धक्के देत एक एक रहस्य उलगडत जाणारी आवर्जून वाचण्यासारखी डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे यांची ही रहस्यमय कादंबरी "प्रतिपश्चंद्र".
संदीप प्रकाश जाधव