लेखक : रत्नाकर मतकरी
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
मराठी साहित्यविश्वाला मिळालेलं एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे रत्नाकर मतकरी. रंगभूमी आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला पण दुर्दैवाने कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला आणि मराठी साहित्यविश्वातील "रत्नाकर" नावाचं हे "रत्न" कायमचं निखळून पडलं. रत्नाकर मतकरी यांनी मराठी साहित्यामधे गूढकथा हा प्रकार आणला आणि प्रचंड लोकप्रिय झाला. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर बरीच पुस्तके, एकांकिका, नाटके लिहिली पण ते खास लक्षात राहतात ते त्यांनी लिहिलेल्या गूढकथांमुळे. जवळपास २०० पेक्षा जास्त गूढकथा त्यांनी लिहिल्या आणि कथासंग्रहाच्या रूपाने वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत पोहचल्या. त्यांनी लिहिलेली काही पुस्तके गहिरे पाणी, बकासुर, कबंध, रंगांधळा, अॅडम, रंगयात्री, अंतर्बाह्य आणि इतरही बरीच. "अंतर्बाह्य" हा मी वाचलेला त्यांचा पहिला गूढकथासंग्रह, ज्यामधील कथांचा गूढपणा वाचत असतानाच त्यांच्या प्रचंड कल्पनाशक्तीची जाणीव झाली आणि त्यांच्या इतर पुस्तकांबद्दलसुद्धा एक उत्सुकता जागी झाली. त्या उत्सुकतेतूनच वाचनात आलेला, त्यांच्या पुस्तकांच्या पंक्तीतील आणखी एक दर्जेदार गूढकथा संग्रह म्हणजे "खेकडा".
१० कथांच्या या संग्रहातील पहिलीच कथा म्हणजे "खेकडा" जी फिरते एका छोट्याशा अपंग मुलगीभोवती. आईविना जगणाऱ्या त्या मुलीचे तिच्या पित्याच्या प्रेयसीने उपहासाने आणि अपंगत्वातून झालेल्या तिच्या शरीराच्या अवस्थेमुळे तिला ठेवलेलं नाव "खेकडा". या पहिल्या कथेपासूनच रत्नाकर मतकरींच्या कथा वाचकाला घेरायला चालू करतात आणि आपल्याला गूढकथांच्या एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात, ज्या वाचत असताना त्यांच्या सर्वच कथांमध्ये दाटून राहिलेलं भय वाचकाला पानापानावर जाणवत राहतं. प्रत्येक कथेमधील भय हे वाचकाला कडकडून दंश करणारे आणि जिव्हारी झोंबणारे तर आहेच शिवाय बऱ्याच ठिकाणी या गूढकथा ज्या पात्राभोवती फिरतात त्या पात्राबद्दल नकळत वाचकाच्या मनात सहानुभूतीसुद्धा निर्माण करतात. हे मतकरींच्या गूढकथांचं आणखी एक वेगळं वैशिष्ट्य. पुस्तकातील प्रत्येक गूढकथा वाचकाला एकप्रकारे आपल्या प्रवासात सोबत घेऊनच पुढे सरकते. त्यामुळेच वाचकाचे मन झपाटून टाकण्याची शक्ति असणाऱ्या या कथा वाचून अंगावर जो सरसरून काटा उभा राहतो तो दीर्घकाळ तसाच टिकून राहतो. "खेकडा" या पहिल्या कथेपासून सुरू होऊन "तुमची गोष्ट" या कथेने या पुस्तकाचा शेवट होतो. तो शेवटसुद्धा इतका विलक्षण की जो वाचत असताना वाचक शहारून जावा. "तुमची गोष्ट" या कथेच्या सुरुवातीलाच मतकरी सांगतात की ही "तुमची गोष्ट आहे, म्हणजे तुमच्याही बाबतीत घडू शकेल अशी गोष्ट" आणि शेवटीही निक्षून सांगतात, "तुमची म्हणून सांगीतलेली ही गोष्ट तुमची नव्हेच, मी आपली एक शक्यता सांगितली एवढेच ", पण तरीही या शेवटच्या कथेत ज्या थरारक अनुभवांचे निवेदन मतकरींनी दिलेलं आहे त्याचा प्रभावच इतका विलक्षण आहे की अपराधाचा स्पर्श वाचकाच्या मनाला नसूनही आपल्या गळ्याभोवती फासाचा स्पर्श झाल्याची भावना वाचक अनुभवतो. प्रत्येक कथेला एका वेगळ्या उंचीवर, एका वेगळ्या वळणावर घेऊन जाऊन वाचकाला मिळणाऱ्या अनपेक्षित धक्क्यातून होणारा शेवट हे मतकरींच्या कथांचे वैशिष्ट्य इथेही प्रकर्षाने जाणवते. या दोन कथांव्यतिरिक्त इतरही कथा जशा "कुणास्तव कुणीतरी", "अंतराय", "कळकीचे बाळ", "पावसातला पाहुणा", "शाळेचा रस्ता", "ती, मी आणि तो", "निमाची निमा", "एक विलक्षण आरसा", आणि "आल्बम" या एकाहून एक गूढ कथा वाचकाला स्तब्ध करून टाकतात. यातील प्रत्येक कथेचा शेवटसुद्धा वाचकाच्या विचारा पलीकडचा, अनपेक्षित धक्का देणारा आणि बराच वेळ डोक्यात घोळत राहणारा असा.
No comments:
Post a Comment