Monday, January 4, 2021

"विश्वस्त"



लेखक : वसंत वसंत लिमये

प्रकाशक : राजहंस प्रकाशन


रहस्यकथा किंवा रहस्य कादंबरी वाचकाला नेहमीच एका वेगळ्या जगात घेऊन जातात आणि ती रहस्य कादंबरी जर एखाद्या ऐतिहासिक घटनेला, स्थानाला किंवा व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून लिहिली गेली असेल तर त्याचं एक वेगळंच वलय वाचकाभोवती तयार होतं जे नेहमीच शब्दांत वर्णन न करता येण्यासारखं असतं. याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे प्रत्येक माणसाला आपल्या इतिहासाबद्दल असणारं एक कुतूहलमिश्रित आकर्षण. मुरलीधर खैरनार यांची "शोध" ही मी वाचलेली पहिली "ऐतिहासिक रहस्यमय कादंबरी" आजही ज्याचा विचार जरी मनात आला तरी त्यातील घटनांचे संदर्भ आठवून डोक्यात एक विचारचक्र सुरू होते. असाच काहीसा अनुभव "प्रतिपश्चंद्र" आणि "महाभारताचे रहस्य" या दोन ऐतिहासिक रहस्यमय कादंबऱ्या वाचनानंतरही आला. भारतासारख्या देशाचा अगदी रामायण-महाभारतापासून ते पेशवाई पर्यंतचा इतिहास हा नेहमीच एक स्वतंत्र संशोधनाचा विषय राहिला आहे आणि सामान्य लोकांसाठी तो कुतूहलाचा. अशाच एका महाभारतकालीन घटनेला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली ही वसंत वसंत लिमये यांची कादंबरी "विश्वस्त". महाभारत काळातील सर्वांच्या परिचयाचं किंबहुना अनेकांचं आवडतं व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्णाच्या बालपणातील, तरुणपणातील अनेक पराक्रम आपण कथांच्या रुपात अगदी लहानपणापासून ऐकत-वाचत आलो आहोत. मात्र "विश्वस्त"च्या निमित्ताने कृष्णाचा वृद्धापकाळ आपल्यासमोर येतो. कृष्णाला मिळालेल्या शापामुळे आपल्या वारसदारांचा, यादवांचा आपापसांत लढून स्वतःच्या डोळ्यादेखत होणारा शेवट पाहत असतानादेखील पुढच्या अनादि-अनंत काळातील आपल्या पिढ्यांसाठी कृष्णाने करून ठेवलेली तजवीज म्हणजेच ही कादंबरी "विश्वस्त". श्रीकृष्णाच्या असीम दूरदृष्टीची कथा म्हणजेच वसंत वसंत लिमये यांची ही कादंबरी "विश्वस्त". वसंत लिमये यांनी लिहिलेल्या या कथानाकाचा पाया आहे महाभारतकालीन अतिशय वैभवसंपन्न असं साम्राज्य असणारी श्रीकृष्णाची द्वारका. परंतु द्वारका बुडत असताना द्वारकेचे प्रचंड वैभव देखील बुडाले असेल का? आणि जर ते वैभव बुडाले असेल तर ते सध्या कुठे आहे? द्वारका बुडण्यापूर्वी "विश्वस्त" म्हणजेच श्रीकृष्णाने द्वारकेचे ते अफाट वैभव वाचवण्यासाठी काही प्रयत्न केले असतील का? आणि तसे प्रयत्न जर केले गेले असतील तर ते पूर्ण झाले असतील का? या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ऐतिहासिक संदर्भाना कल्पनेची जोड देऊन आज वर्तमानकाळात केले गेलेले प्रयत्न म्हणजेच ही वसंत वसंत लिमये यांची कादंबरी "विश्वस्त".

पुण्यातील एका कॉफीशॉपमधे जमणारा, इतिहासाची आवड असणारा आणि त्या आवडीतूनच ऐतिहासिक रहस्यांचा मागोवा घेणारा एक ग्रुप "जे एफ के" म्हणजेच 'जस्ट फॉर किक'. या ग्रुपमधील जोआन, अनिरुद्ध, प्रसाद, शब्बीर (शॅबी), मकरंद (मॅक) ही महत्त्वाची पात्रे तसेच अनेक ऐतिहासिक संदर्भ, वर्तमानकाळातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकीय-सामाजिक चालू घडामोडी या सर्वांतून साकार झालेली अत्यंत थरारक, रोमांचक अशी ही कादंबरी "विश्वस्त". वसंत लिमये यांनी या कादंबरीत भारतीय प्राचीन काळ, त्याकाळातील घडलेल्या काही घटना, त्यांचे समकालीन संदर्भ आणि पुरातत्वीय संदर्भ यांची सांगड घालून वाचकाची रंजकता अगदी शेवटच्या पानापर्यंत टिकून राहील याची पुरेपूर काळजी घेतली आहे. काळाची चौकट मोडून ऐतिहासिक संदर्भ आणि कल्पना यांचा मिलाफ कांदबरीत अतिशय उत्तमरित्या जमवून आणला आहे. श्रीकृष्णाची बुडालेली द्वारका आणि द्वारकेचं प्रचंड वैभव यासोबत अनेक महाभारतकालीन गूढ रहस्ये नेमकेपणाने, कौशल्याने उलगडण्यात आली आहेत. जेएफके ग्रुपला ब्रह्मगिरी आणि दुर्गभांडारच्या भटकंतीत एक वस्तू सापडल्यानंतर सुरू होतो या कादंबरीचा एक भन्नाट, रोमांचक प्रवास. द्वारकेचे वैभव शोधण्याच्या या प्रवासात जेएफके टिमने केलेल्या इतरही मोहिमा जसे विजयदुर्गची मोहिम, मुंबईतील जमिनीखालील भुयारे शोधण्यासाठी केलेली धडपड यांचेही अगदी विस्तृत आणि रोमांचक वर्णन कादंबरीत वाचायला मिळेल. ‘विश्वस्त’ व ‘वारसदार’ या दोन संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन कृष्णाच्या काळापासून ते आज वर्तमानकाळात घडत असलेल्या घटनांचा सांधा जोडण्याचा प्रयत्न वसंत लिमये यांनी "विश्वस्त"मध्ये केला आहे. हे करत असताना लिमये यांनी यादवीनंतर द्वारकेमध्ये माजलेले अराजक, प्रलयंकारी वादळानंतर बुडालेली द्वारका, चाणक्य, चंद्रगुप्त, भारतावर झालेले महमद गझनीचे आक्रमण, सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराचा केलेला जिर्णोद्धार, २०१४ ची मोदींची लोकसभा निवडणूक, संघाची भूमिका या सर्वांना एका काल्पनिक साखळीत बांधले आहे. मोदी आणि संघ यांच्यासाठी कादंबरीमध्ये नावे भलेही वेगळी घेतली असली तरी वाचकाला त्यांचा संदर्भ सहज लक्षात येतो.

एखाद्या ऐतिहासिक रहस्यमय कादंबरीला शोभेल अशीच या कादंबरीची सुरुवात अतिशय संथ आहे. बऱ्याच ठिकाणी ती विनाकारण ताणलेलीसुद्धा वाटते, परंतु तरीही वाचक कथेसोबत जोडलेला राहतो. विविध पात्रांचा परिचय करून देत असताना महाराष्ट्रातील ट्रेकिंगची स्थाने, कोकण, शिवाजी महाराजांचा इतिहास अशी वेगवेगळी वळणे घेत अमेरिका, इंग्लंड, गुजरात अशा अनेक ठिकाणी घडणाऱ्या थरारक घाटनांतून कादंबरी पुढे सरकत राहते. भारतीय नौदलापासून ते इतिहास संशोधनातील चोरी, आध्यात्मिक संप्रदायातील गुन्हेगारी अशा अनेक प्रसंगांतून वेगवेगळ्या मानवी स्वभावांचे दर्शन  लिमये यांनी या कादंबरीतून करून दिले आहे. हळूहळू कादंबरीचा हा प्रवास इतका वेग पकडतो की, वाचक त्या कथेसोबत ओढला जातो. वाचकाला धक्क्यामागून धक्के बसत असताना एक उत्कंठावर्धक कादंबरी एवढेच त्याचे स्वरूप न राहता आपला इतिहास जिवंत रूपात पुढे येत राहतो. महाभारतातील काळ आपल्यासमोर जिवंत होऊन पुढे उभा राहतो. चाणक्याचा काळ हा आपण आपला इतिहास मानतो परंतु महाभारताचा काळ म्हणजे एक पौराणिक कथा असंच आपण आजपर्यंत ऐकत-वाचत आलो आहोत. पण चाणक्याच्या काळापूर्वी आपल्या देशाला इतिहास नव्हता का हा विचार सहसा केला जात नाही? जर तो इतिहास असेल तर तो काय होता? याचा विचार करायला लावणारी अशी ही कादंबरी "विश्वस्त". वसंत लिमये यांनी या कादंबरीमध्ये भारतातील तसेच भारताबाहेरील अनेक ठिकाणांची ऐतिहासिक आणि पौराणिक दाखले देत एक गुंफण केली आहे जीला कल्पनेची जोड असली तरी त्याची अतिशयोक्ती कुठेच जाणवत नाही. एकदा हातात घेतलेली ही कादंबरी संपूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवावीशी वाटतच नाही इतका वाचक या प्रवासात हरवून जातो. 

अज्ञात इतिहास आणि वर्तमान वास्तव, कल्पित आणि सत्य यांच्यामधल्या पुसट, धूसर सीमारेषांवर आटयापाटया खेळणारी नाटयपूर्ण, वेगवान घटनांच्या प्रवाहात वाचकाला खेचून नेणारी आणि खिळवूनही ठेवणारी वसंत लिमये यांची एकदा आवर्जून वाचावी अशी कादंबरी "विश्वस्त".




संदीप प्रकाश जाधव

No comments:

Post a Comment

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये