Monday, February 15, 2021

"बेरड"


लेखक : भीमराव गस्ती

प्रकाशक : राजहंस प्रकाशन


दया पवारांचं "बलुतं" हे दलित आत्मचरित्र मी काही दिवसांपूर्वी वाचलं होतं. मनाला अतिशय अस्वस्थ करणारं आणि आतून बाहेरून अक्षरशः हलवून टाकणारं असं हे आत्मचरित्र पण तितकंच प्रेरणादायी सुद्धा. जातीव्यवस्थेच्या नावावर होणारा भेदभाव आपल्या समाजात किती घट्ट रुतून बसलाय याची जाणीव दया पवारांचं "बलुतं" वाचताना झाली. आजही अशा भेदभावाची बरीच उदाहरणे आपल्याला "प्रगतशील भारतात" सहज  सापडतील. पण जेव्हा अशा कर्मठ, जाचक रूढी-परंपरा आणि समाजव्यवस्था यांना झुगारून, प्रचंड मेहनतीने स्वतःला सिद्ध करणारा एखादा दलित त्याच जातीव्यवस्थेसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व बनतो तेव्हा याच समाजव्यवस्थेतील विरोधाभास लक्षात येतो. दया पवारांच्या "बलुतं" नंतर माझ्या वाचनात आलेलं "बेरड" हे भीमराव गस्ती यांचं आणखी एक दलित आत्मचरित्र, तितक्याच तोडीचं आणि तितकंच प्रेरणादायी. दोन्हीही जरी दलित आत्मचरित्रे असली तरीही दोघांची तुलना करणं तसं चुकीचंच ठरेल कारण दोघांना आलेले अनुभव, दोघांचा संघर्ष हा पूर्णपणे भिन्न पातळीवरचे आहेत. भीमराव गस्ती यांनी बेरड समाजाच्या व्यथा, वेदना आणि होणाऱ्या छळाचे चित्रण त्यांच्या '"बेरड" या आत्मचरित्राच्या रुपात आपल्यासमोर आणले आहे. "रामोशी" हा शब्द कानावर पडला की आपल्या डोळ्यासमोर येतात ते चोरी, दरोडा, लूटमार करणारे लोक. आज स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरदेखील याच एका गोष्टीसाठी त्यांची असणारी ओळख आपल्याला समजण्यास पुरेशी आहे की हे लोक समाजापासून आजही किती तुटलेले राहिलेत. "रामोशी" ही महाराष्ट्रातील मागासलेली एक विमुक्त जमात. जंगलाच्या आसऱ्याने राहणारे हे लोक. महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आढळून येणाऱ्या या "रामोशी" समाजाचे कर्नाटकच्या सीमावर्ती भागातदेखील तुरळक प्रमाणात अस्तित्व आहे आणि तिथे कर्नाटकात यांना ओळखलं जातं ते "बेरड" या नावाने. "बेरड" हे पुस्तक आत्मचरित्रापेक्षा एका संपूर्ण समाजाचे जीवन आणि ते जीवन सुसह्य होण्यासाठी गस्ती यांनी उभ्या केलेल्या चळवळीचीच कहाणी आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरू नये. ज्या समाजात जन्माला येणारा प्रत्येकजण भले तो स्त्री असो वा पुरुष आपल्या माथी गुन्हेगाराचा शिक्का घेऊनच जगायला सुरुवात करतो. पोलिसांकडे असणाऱ्या गुन्हेगारांच्या यादीत आपोआपच ज्यांचे नाव जाते. गुन्हा केला असो व नसो "रामोशी", "बेरड" म्हणजे गुन्हेगारच! अशा समाजातून पुढे येऊन गस्ती यांनी स्वतःला सिद्ध तर केलंच शिवाय आपल्या समाज बांधवांच्या वाट्याला पिढ्यांपिढ्यापासून येणारा त्रास कमी होण्यासाठी आणि त्यांना इतर समाजांच्या प्रवाहासोबत आणण्यासाठी चळवळीच्या रुपात आयुष्यभर जी मेहनत घेतली त्याला तोड नाही. या समाजाच्या वाट्याला आलेल्या, अंगावर शहारे आणणाऱ्या जळजळीत अत्याचाराच्या कहाण्या गस्ती यांच्या आत्मचरित्राच्या रुपात वाचत असताना आपल्याला पडणारा प्रश्न, एखाद्याच्या आयुष्यात असं आणि इतकं कसं घडू शकतं? आणि त्याहूनही मोठा प्रश्न म्हणजे स्वतः इतके सहन करूनही एखादी व्यक्ती स्वतःपेक्षा जास्त इतरांचे जीवन कसे सुसह्य होईल याचाच विचार कसा करू शकतो? बेरड जातीच्या लोकांच्या कल्याणासाठी आयुष्य वेचलेल्या, जेष्ठ साहित्यिक, समाजसेवक अशी समाजात ओळख असणाऱ्या डॉ. भीमराव गस्ती यांच्या संघर्षाची कहाणी म्हणजेच हे पुस्तक "बेरड", त्याचबरोबर "रामोशी" किंवा "बेरड"  यांसारख्या शोषित, दुर्बल जातीच्या लोकांवर होणारे अन्याय कमी होऊन त्यांनाही प्रतिष्ठा मिळावी आणि इतर समाजातील  लोकांप्रमाणेच त्यांनाही माणुसकीची वागणूक मिळावी म्हणून प्रस्थापित समाजव्यवस्थेविरुद्ध दिलेला लढा, उभारलेली चळवळ म्हणजेच हे आत्मचरित्र "बेरड".

मुळातच हुशार असणाऱ्या भीमराव गस्ती यांनी वडिलांच्या शिक्षणासाठी असणाऱ्या भक्कम पाठिंब्यामुळे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांच्यावर असणाऱ्या "बेरड" या जातीच्या शिक्क्यामुळे पावलापावलावर त्यांना संघर्ष करतच शिक्षण घ्यावे लागले, काही वेळा तर न केलेल्या गुन्ह्यांसाठी देखील शिक्षा सहन करावी लागली. तरीही ते शिकत राहिले. इलेक्ट्रॉनिक्ससारख्या विषयातील त्यांनी  मिळवलेली पदव्युत्तर पदवी आणि याच विषयातील रशियन विद्यापीठातील डॉक्टरेट मिळवलेल्या त्यांच्यासारख्या व्यक्तीला कुठेही बक्कळ पगाराची नोकरी करून सामान्य माणसासारखे सरळ आयुष्य जगणे सहज शक्य होते. पण या सर्व सुखाचा त्याग करून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य बेरड समाजासाठी वाहून घेतलं. बेरड लोकांचे जीवन सुधारावं म्हणून स्वतःच्या घरादाराची पर्वा न करता रात्रंदिवस कष्ट घेतले. कोणताही पाठिंबा नसताना चळवळ उभी केली. देवदासी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि अंधश्रद्धा, रूढी-परंपरांनी जखडलेल्या "बेरड-रामोशी" समाजाच्या विकासासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. प्रसंगी स्वतःच्याच लोकांचा विरोध सहन केला. लहानपणापासूनच बेरडांवर होणारा अन्याय, अत्याचार त्यांनी स्वतः अनुभवला होता, पोलिसांकडून सतत होणारे अत्याचार, त्यांची बेरडांवर असणारी प्रचंड दहशत त्यांनी खूप जवळून पहिली होती त्यामुळे या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे असं त्यांना नेहमी वाटायचं पण खऱ्या अर्थाने त्यांच्या पुढील कार्याचा पाया रचला गेला तो त्यांच्या मोठ्या भावाचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत झालेल्या मृत्यूनंतर. पुढे शिक्षण पूर्ण करून ते पूर्णवेळ या सामाजिक कार्यात उतरले. बेरडांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात त्यांनी वर्तमानपत्रात लेख लिहिले, बऱ्याच पुढाऱ्यांच्या भेटी घेतल्या, वेगवेगळ्या दलित नेत्यांना मंचावर आणून परिषदा घेतल्या, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना सतत पत्रे लिहिली, प्रसंगी बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या स्वतः भेटी घेतल्या. बेरडांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात ते वेगवेगळ्या मार्गांनी सतत वाचा फोडत राहिले. काही स्वार्थी लोकांचा त्यांच्या या कार्याला असणाऱ्या विरोधातून त्यांच्यावर जीवघेणे हल्लेसुद्धा झाले पण तरीही न डगमगता ते या समाजाच्या विकासासाठी झटतच राहिले. बेरड लोकांची संघटना उभी करून त्यांना त्यांचे हक्क मिळावेत म्हणून संघर्ष करत असताना गस्ती यांना आलेले अनुभव पुस्तकात वाचताना मन सुन्न होऊन जाते. पोलिसांकडून होणाऱ्या अत्याचाराच्या घटना तर वाचकाच्या डोळ्यात पाणी घेऊन येतात. आपल्या या निस्वार्थी कार्याला आतून आणि बाहेरून असणारा प्रचंड विरोध सहन करत, येणाऱ्या प्रत्येक संकटाला न डगमगता धैर्याने सामोरे जाताना गस्ती यांनी दिलेल्या लढ्याची व्याप्ती पुस्तकात वाचताना अंगावर शहारे येतात.

"बेरड" ही भीमराव गस्ती यांच्या संघर्षाची, एकाकी लढ्याची कहाणी जितकी प्रेरणादायी तितकीच वाचकाला अंतर्मुख व्हायला लावणारी अशी आहे. आवर्जून वाचण्यासारखे आणि संग्रही ठेवण्यासारखे पुस्तक.







संदीप प्रकाश जाधव

No comments:

Post a Comment

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये