Monday, April 19, 2021

"इंधन"

 


लेखक : हमीद दलवाई

प्रकाशक : मौज प्रकाशन


हमीद दलवाई यांनी लिहिलेली एकमेव कादंबरी "इंधन". या आत्मचरित्रात्मक कादंबरीबद्दल बऱ्याच लोकांकडून ऐकून होतो, बऱ्याच लोकांनी ही आवर्जून वाचण्यासाठी सुचवली आणि अखेर ही उत्कृष्ठ कादंबरी संग्रही घेऊन वाचून काढली. अगदी छोटेखानी आणि एका बैठकीत वाचून पूर्ण होणाऱ्या या कादंबरीमध्ये ज्या विषयाला दलवाई यांनी लोकांसमोर मांडलं आहे ते खरंच शब्दांत वर्णन न करता येण्यासारखं आहे. १९६५ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी आजही वाचकाच्या मनावर तितकाच प्रभाव पाडत आहे, एका गावातील विविध घटनांचा आणि त्यांच्या आपापसातील नात्यांचा वेध घेणारी ही कादंबरी. कादंबरीमध्ये शेवटपर्यंत ज्याच्या नावाचा उल्लेखच नाही झाला असा हा कादंबरीचा नायक जेव्हा १५ वर्षांनी गावात परत येतो तेव्हा त्याच्या निवेदनातून उलगडत जाणारी या कादंबरीची कथा. स्वातंत्र्याच्या दोन दशकानंतरच्या वातावरणात घडलेली या कादंबरीची कथा आज वर्तमान काळातील वातावरणाला देखील तितकीच लागू होते. देशाच्या फाळणीमुळे झालेली जखम मनात ठेवून स्वतःचे अस्तित्व शोधणारा मागासलेला समाज आणि त्याच वेळी खोती-जमिनदारी यांसारख्या सरंजामी प्रवृत्तींना बसत जाणारा चाप या काळामधे घडणारी ही कथा. आपल्या तत्त्वापेक्षाही अहंकाराला जपण्याचा आणि स्वत:चंच खरं करण्याच्या सामूहिक अट्टहासाचा एकत्रित परिपाक म्हणजे ही कादंबरी. तसं पाहिलं तर भडका उडण्यासाठी वाऱ्याचा एक झोतदेखील पुरेसा असतो पण त्या परिस्थितीत जर त्यामध्ये इंधन ओतले गेल्यानंतरचा वणवा ज्या पद्धतीने पेटू शकतो तसाच गावातल्या काही छोट्या छोट्या घटनांमुळे संपूर्ण गाव कसं गढळून निघते, त्याचे चित्रण म्हणजे ही कादंबरी "इंधन". स्वतःच्याच समाजातल्या वाईट प्रवृत्ती आणि चालीरितींच्या विरोधात ठामपणे उभा राहणारा या कादंबरीचा नायक! धर्म या संकल्पनेवरच विश्वास नसणारा, कधीही नमाज न पडणारा, अतिशय विवेकवादी असला तरी चांगले-वाईट, उच्च-नीच या गोष्टींची जाणीव ठेवून आपली वैयक्तिक मूल्ये जपणारा आणि ती कधीही इतरांवर न थोपवता समाजपरिवर्तनासाठी प्रयत्न करणारा नायक! गांधी टोपी मुस्लिमांसाठी निषिद्ध असताना ती टोपी घालून राष्ट्रसेवादलात सामील होऊन समाजकारणात स्वतःला झोकून देणारा नायक! याच समाजकारणातून पुढे कुणबी आणि मुस्लिम खोतांमध्ये असणाऱ्या जमिनीच्या वादात त्याने मुस्लिमांच्या विरोधात कुणब्यांना दिलेल्या सल्ल्यामुळे घरातील लोकांसोबतच गावातील इतर मुसलमान त्याच्यासोबत अंतर राखून रहायला चालू करतात. नायकामधला प्रखर विवेकीवाद गावामधे कुणालाच आवडत नसल्याने शेवटी गाव सोडून मुंबईला जाऊन राजकारण-समाजकारणात नाव कमावणारा नायक तब्बल १५ वर्षांनी जेव्हा गावात परत येतो त्यानंतर उलगडत जाणारी ही कादंबरी "इंधन".

मुंबईमध्ये राजकारण आणि समाजकारणासोबत समाज प्रबोधनाचे काम करत असणारा नायक हर्ट-अटॅकच्या दुखण्यातून सावरून गावी विश्रांतीसाठी येतो. गावात पाऊल ठेवल्यानंतर त्याला होणारी पहिली जाणीव म्हणजे त्याच्याबद्दल असणारा तिरस्कार लोकांच्या मनातून कमी झाल्याची. १५ वर्षांनी परिस्थिती बरीच बदलेली त्याला जाणवते, आता गावातील लोकांना आपल्या गावच्या या नेत्याचे कौतुक आहे हेसुद्धा त्याच्या लक्षात येते. १५ वर्षांनंतर आलेला नायक मात्र शक्य तितके तटस्थ राहून गावातल्या नात्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. गावामधील मुस्लिम, ब्राह्मण, परीट, न्हावी, वाणी, कुळवाडी, कुणबी आणि पूर्वीचे महार पण आता बौद्ध झालेले दलित अशा अनेक समाजघटकांमधे या १५ वर्षांत झालेले बदल तसेच काही ठिकाणी अजिबातच न झालेले बदल नायक टिपत जातो. गावातील सगळेच लोक रोजच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या कारणासाठी एकमेकांवर अवलंबून असले तरी सर्वांच्या मनामधे एकमेकांबद्दल असणारी सूक्ष्म अढी लेखकाला खटकते. असे असूनदेखील गावामध्ये “भानगडी” करणाऱ्या लोकांची काहीच कमी नाही याचे नायकाला आश्चर्य वाटते. अशा अनेक "भानगडींमध्ये" खुद्द नायकाच्या भावाची एका ब्राह्मण विद्यार्थिनीसोबत असणारी "भानगड" नायकाला धक्का देऊन जाते. गावात घडणाऱ्या अशा गोष्टी गावाला नवीन नसल्याने गावातील सलोखा कधीच बिघडला नव्हता, एकमेकांबद्दल असणारी अढी मनातच धुमसत राही पण कधी त्याचा गावातील वातावरणावर परिणाम नाही झाला. परंतु गावामधे नवीन घर बांधणारा इसाक त्याच्या बांधकामावर मजुरी करणार्‍या बौद्धाच्या लक्षुमीला घरी ठेवून घेतो आणि इथे ठिणगी पडते पुढे येऊ घातलेल्या वणव्याची. आताच्या बदललेल्या काळात एका मुसलमान खोताने राजरोसपणे एका विवाहित स्त्रीला आपल्या घरात ठेवून घेणं बौद्धांना रूचत नाही. आपल्या स्वतंत्र अस्तित्त्वाची, आपल्या स्त्रियांच्या अब्रू इज्जतीची त्यांना झालेली जाणीव गावात एक वेगळाच संघर्ष उभा करते. या संघर्षामधे दोन्ही बाजूंचं कधीही भरून न निघणारं नुकसान होणार हे सर्वांना समजत असलं तरीदेखील तो संघर्ष वाढतच जातो कारण ही लढाई असते स्वत:च्या धर्माभिमानाची, जातीच्या अभिमानाची! शिमग्याला निघणाऱ्या पालखीच्या मिरवणुकीत हा संघर्ष अत्यंत रौद्र आणि भेसूर रूप धारण करतो जो नायकसोबतच वाचकालादेखील विचारात पाडतो. त्या धक्कादायक घटनेनंतर नायक गाव सोडून परत मुंबईला निघून जातो, पण तरीही गावामधे घटनांची साखळी पुढे चालूच राहते. नायक गावामधून बाहेर पडल्यानंतर वर्तमानात चालू असणारं या कथेचं निवेदन भविष्यकाळात चालू होतं. इथून पुढच्या भविष्यकाळातील घटना म्हणजे “हे असंच घडेल” अशी नायकाच्या मनाची धारणा आहे की नायकाच्या आजपर्यंतच्या अनुभवावरून “हे असं घडायला हवं” हा त्याचा स्वप्नविलास या विचारत वाचकाला सोडून देऊन कथेचा शेवट होतो.

जितकं लोकांकडून ऐकलं होतं त्या सर्व अपेक्षांना खरं उतरणारी, आवर्जून वाचण्यासारखी कादंबरी "इंधन".


संदीप प्रकाश जाधव

No comments:

Post a Comment

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये