बिन लादेनच्या शोधाची थरारक सत्यकथा
लेखक : पीटर बर्गन
प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स
मराठी अनुवाद : रवी आमले
११/९/२००१ ला अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरचे ट्वीन टॉवर्स अपहरण केलेल्या विमानांच्या धडकेने उध्वस्त करून "अल कायदाने" खरे तर अमेरिकेच्या अस्मितेवरच हल्ला केला. हा दहशतवादी हल्ला होईपर्यंत "ओसामा बिन लादेन" नावाचा, जगाला फारसा माहीत नसणारा अल कायदाचा "म्होरक्या" अचानकच संपूर्ण जगाच्या कुतूहलाचा विषय झाला. या अतिरेकी हल्ल्यात जवळपास ३००० लोकांचा मृत्यू तर ६००० हून अधिक लोक जखमी झाले आणि या विध्वंसकारी हल्ल्यानंतर ओसामा बिन लादेनचे नाव "क्रूरकर्मा" या विशेषणासोबत जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले, खरे तर जगाच्या इतिहासात या एका हल्ल्यामुळे तो अजरामर होऊन गेला असं म्हटलं तरी ते चुकीचं नाही. अमेरिकेवर झालेल्या या दुर्दैवी दहशतवादी हल्ल्यानंतर अल्पावधीतच त्यांच्या सी. आय. ए. आणि इतर तपास संस्थांनी दहशतवादाविरोधात जोरदार मोहीम उघडली. या मोहिमेदरम्यान सुरुवातीला त्यांच्या हाती आलेल्या माहितीनुसार "अल्-कायदा" ही दहशतवादी संघटना आणि तिचा प्रमुख ओसामा बिन लादेन यांचा या हल्ल्यामागे हात आहे हे सिद्ध झाल्यानंतर "अल कायदा" आणि "ओसामा बिन लादेन" अमेरिकेचे क्रमांक एकचे शत्रू बनले. त्यानंतर बिन लादेनला मारण्यासाठी अमेरिकेने अक्षरशः जंग जंग पछाडलं, त्यासाठी बऱ्याच गोष्टी करत असताना काहीवेळा काही देशांची नाराजी देखील अमेरिकेला सहन करावी लागली पण आपल्या इतिहासातील आजवरचा झालेला हा मोठा दहशतवादी हल्ला त्यांच्या इतका जिव्हारी लागला होता की सतत १० वर्षें ते "लादेनच्या" मागावर होते आणि अखेर २ मे २०११ रोजी अमेरिकन नेव्ही सील्जच्या पथकाकडून पाकिस्तानातील अबोटाबादमधे केलेल्या एका धाडसी जमिनी कारवाईत "लादेन" मारला गेला. जागतिक महासत्ता म्हणून जगात ओळख असणाऱ्या, अत्यंत आधुनिक आणि अद्ययावत यंत्रणा असणाऱ्या अमेरिकेसारख्या देशाला "ओसामा बिन लादेन" तब्बल १० वर्षें गुंगारा देण्यात यशस्वी झाला. त्यामुळेच त्याच्या शोधमोहिमेचा प्रवास लक्षवेधी आणि तितकाच थरारक ठरतो. अमेरिकेच्या १० वर्षें चाललेल्या "ओसामा बिन लादेन" च्या याच थरारक शोधाची सत्यकथा पीटर बर्गन यांनी "मॅन हंट" या पुस्तकातून आपल्यासमोर मांडली आहे. शिवाय अमेरिकेवर झालेल्या या हल्ल्यापुर्वीच्या आणि हल्ल्यानंतर चाललेल्या शोधमोहिमेदरम्यान बऱ्याच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटनांमधे "अल कायदाचा" असणारा सहभाग, त्याची पार्श्वभूमी, त्यामधील अमेरिकेची भुमिका यांची देखील अतिशय विस्तृत माहिती पीटर बर्गन यांनी "मॅन हंट" मधे दिली आहे. पीटर बर्गन हे एक टीव्ही पत्रकार आणि लेखक आहेत. अमेरिकेवर ९/११ ला झालेल्या हल्ल्याच्या चार वर्षं आधीच बर्गन यांनी सीएनएन या वृत्तवाहिनीसाठी अफगाणिस्तानात जाऊन ओसामा बिन लादेनची मुलाखत घेतली होती. त्या वेळी त्यांना "लादेन" म्हणजे अमेरिकेबद्दल द्वेष व्यक्त करणारा एखादा साधारण मुल्ला वाटला होता. त्याच साधारण वाटणाऱ्या "ओसामाने" ९/११ ला जेव्हा अमेरिकेवर हल्ला केला तेव्हापासूनच एक प्रकारे बर्गन यांनी या पुस्तकाची तयारी सुरू केली होती, कारण अमेरिका या हल्ल्यामागच्या सूत्रधाराला शोधून ठार मारणार याबद्दल त्यांना खात्री होती. पुस्तक लिहिण्यासाठी लागणारे आवश्यक ते संदर्भ, कागदपत्रं, या शोधप्रवासातील व्यक्तींच्या प्रत्यक्ष भेटी, इतकंच नाही, तर अबोटाबादमधे ज्या घरात लादेन मारला गेला तिथे जाण्याची परवानगी हे सर्व त्यांना मिळालं आणि "मॅन हंट" चा हा थरार वाचकांसाठी कागदावर उतरला.
पुस्तकाची सुरुवात "सुखद निवृत्ती" या प्रस्तावनेपासून होते. यामधे अबोटाबाद या पाकिस्तनातील शहराचं वर्णन, लादेनच्या कुटुंबाची माहिती, लादेनच्या बायकांचं उच्चविद्याविभूषित असूनही धार्मिक असणं आणि त्यांचा लादेनच्या जिहादवर असणारा विश्वास, लादेनचे दैनंदिन जीवन, जगात दहशत पसरवणाऱ्या लादेनचा कंजूषपणा, त्याच्या कट्टर मुस्लिमतेला धरून असणारे त्याचे वागणे या आणि अशा बऱ्याच बारीकसारीक गोष्टींचे तपशील दिलेले आहेत. सुरुवातीच्या लादेनबद्दलच्या या विस्तृत महितीनंतर ९/११ च्या हल्ल्याचे वर्णन करून बर्गन थेट लादेनच्या भुतकाळात शिरतात. १० वर्षांच्या शोधमोहिमेच्या प्रवासाची कथा सांगत असतानाच ९/११ चा हल्ला प्रत्यक्षात कसा घडवला गेला, त्यासाठीची तयारी याबद्दलही बऱ्याच गोष्टी बर्गन यांनी वाचकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. लादेनचे तोरा बोरा या अतिशय दुर्गम पर्वतरांगांतील वास्तव्य, अज्ञातवासात असताना अल कायदा वाढवण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न शिवाय "अल कायदाचे पुनरुत्थान", "शोधमोहिमेचा सिद्धांत", "युद्धमैदानात ओबामा", "शोधदुव्याची संरचना", "ओसामा बिन लादेनची अखेरची वर्षं", "गुप्त योद्धे", "कारवाईच्या विविध दिशा" या प्रकरणांतून लादेनमधील धर्मवेडा, क्रूरकर्मा, चार बायकांचा पती, कुटुंबवत्सल पिता असे अनेक पैलू उलगडत जातात. पुस्तकाची अखेर "दिवा लावू नकोस" या प्रकरणातून होते. कदाचित हेच लादेनचे शेवटचे शब्द होते. २००१ नंतरची पहिली ६-७ वर्षें अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील डोंगर रांगांत लादेनला शोधल्यानंतर तो डोंगराळ भागाऐवजी पाकिस्तानातच एखाद्या शहरात लपला असावा असा अमेरिकेच्या तपाससंस्थांचा संशय वाढत चालला होता. त्यानंतर लादेनने पाठवलेल्या ध्वनी चित्रफितींच्या मार्फत त्याचा माग काढत तो पाकिस्तानातील अबोटाबादला असण्याच्या निष्कर्षाला येईपर्यंत (तोही फक्त ५०% च!) आणि त्यांनंतर प्रत्यक्ष त्याच्यावरील कारवाई करण्यापूर्वी अमेरिकी नेव्ही सील्जच्या पथकाने केलेला सराव, अमावस्येच्या रात्री लादेन लपून बसलेल्या घरामध्ये घुसून केलेल्या हल्ल्याचा थरार, लादेनला मारून त्याची केलेली उत्तरक्रिया, पाकिस्तानी सरकार आणि सेनेला अंधारात ठेऊन केलेल्या कारवाईमुळे तयार झालेले वातावरण, लादेनला मारल्यानंतर अमेरिकेत झालेला जल्लोष या सर्व गोष्टी अगदी एखाद्या थरारक चित्रपटाला शोभेल अशा आहेत.
"ओसामा बिन लादेन" वर आजपर्यंत बरीच पुस्तके लिहिली गेली परंतु पीटर बर्गन यांचं हे पुस्तक त्याच धाटणीचे आहे असं म्हणणं थोडं धाडसाचंच ठरेल कारण पुस्तकाच्या शेवटी देण्यात आलेले संदर्भ वाचूनच लक्षात येते की पीटर बर्गन यांचे हे पुस्तक म्हणजे ओसामा बिन लादेन आणि अल्-कायदा यांच्या विषयीच्या माहितीचा अधिकृत दस्तऐवजच आहे. रवी आमले यांनी अतिशय सुंदररीत्या अनुवादित केलेलं, आवर्जून वाचण्यासारखं पुस्तक "मॅन हंट".
संदीप प्रकाश जाधव

No comments:
Post a Comment