प्रचार | जाहिरात | अपमाहिती | आणि बरेच काही
लेखक : रवि आमले
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन
रवि आमले यांचं "रॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा" हे पुस्तक वाचल्यानंतर खरं तर मी त्यांच्या अभ्यासू लिखाणाचा "फॅन" झालो असं म्हटलं तरी चालेल. कारण "रॉ" वाचून झाल्यानंतर लगेचच त्यांचे "राखीव जागा - वस्तुस्थिती आणि विपर्यास", "प्रोपगंडा" याशिवाय त्यांनी मराठीमधे अनुवादित केलेलं "मॅनहंट" ही आणखी ३ पुस्तके मी माझ्या संग्रही घेतली. यांपैकीच एक वाचकांच्या मन आणि मेंदूला अक्षरशः घेरून टाकणारं पुस्तक "प्रोपगंडा" आज वाचून पूर्ण झालं. "प्रोपगंडा" या शब्दाचा शब्दशः अर्थ घ्यायचा झाला तर तो प्रचार किंवा माहितीची पेरणी असा होऊ शकतो. रवि आमले यांचे "प्रोपगंडा" हे पुस्तक म्हणजे कहाणी आहे सामान्य माणसांपर्यंत पोहचणाऱ्या अपमाहितीची, अर्धसत्यांची आणि बनावट वृत्तांची. या प्रोपगंडाचे नेमके तंत्र कोणते? ते कोणी आणि कसे शोधून काढले? ते लोकांवर सर्वप्रथम कसे वापरले गेले? लोक या प्रोपगंडामधे कसे अडकत गेले? आजची फॅशन - मग ती कपड्यांची असो, की विचारांची ती नेमकी येते कोठून? कोणाची निर्मिती असते ती? कोणापासून सुरू होते ती? सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपण ती फॅशन का अंगीकारतो? आपली मते खरोखरच आपली असतात का? आपण जे वास्तव समजतो ते वास्तवच असते का? आपण जे सत्य मानत असतो ते सत्यच असते का? की एखाद्या संगणकाच्या प्रोग्रॅमप्रमाणे कोणीतरी आपल्याला ते भरवत असते? तसे नसेल, तर मग माणसांच्या झुंडी कशा निर्माण होतात? या झुंडींना हवे तसे, हव्या त्या मार्गाने कसे वळविले जाते? साधी साधी माणसे अचानक हिंसक का होतात? बासरीवाल्याच्या मागे उंदरांनी जावे तशी एखाद्या नेत्याच्या मागे का जातात? एखाद्या वस्तूचे, विचाराचे, नेत्याचे अवडंबर कसे माजविले जाते? कसे बदल केले जातात समाजाच्या वर्तनात? सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादी गोष्ट आपल्या मनावर कशी बिंबवली जाते? कालांतराने ती गोष्ट आपल्याला खरी कशी वाटू लागते? एखाद्या वस्तूचा खप अचानक कसा वाढतो?(पतंजली ची उत्पादने याचं सर्वांत उत्तम उदाहरण) एखादा नेता अचानक लोकप्रिय तर एखादा नेता अचानक तुच्छ कसा काय वाटू लागतो? (मोदी, केजरीवाल, डोनाल्ड ट्रम्प, राहूल गांधी यांच्याकडे याचे उदाहरण म्हणून पाहता येईल) हे सारे करणारे असते तरी कोण? सामान्य लोकांचे विचार आणि त्यांचा एखाद्या गोष्टीकडे असणारा कल कसा बदलला जातो? या सर्व गोष्टींची माहिती देणारं आणि वाचकांची झोप उडवणारं असं हे रवि आमलेंचं पुस्तक "प्रोपगंडा". अगदी पहिल्या महायुद्धाच्या काळापासून ते अलीकडच्या मोदी लाटेपर्यंत प्रोपोगंडाकारांनी वापरलेली वेगवेगळी तंत्रे आणि त्यातून सामान्य जनमानसाच्या विचारांवर पडलेला प्रभाव याचं वाचकाला विचार करायला लावणारं वर्णन रवि आमले यांनी त्यांच्या या "प्रोपगंडा" पुस्तकात केलेलं आहे.
एकूण ४० प्रकरणे आणि ३७६ पानांच्या या पुस्तकातून रवि आमले वाचकाला प्रोपगंडाच्या थरारक आणि तितक्याच अंतर्मुख व्हायला लावणाऱ्या इतिहासातून फिरवून आणतात. आज २१व्या शतकात प्रोपगंडाचे तंत्र जरी बदलले असले तरी त्याचा इच्छित परिणाम आजही तोच असतो जो पहिल्या महायुद्धाच्या काळात होता. तो म्हणजे आपल्याला हवी तेवढीच, हवी तशी आणि हवी तेव्हाच एखादी माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहचवून त्यांचे विचार, त्यांचा कल बदलणे. आज व्हाट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून फिरणाऱ्या बऱ्याच गोष्टी याला उदाहरण म्हणून सांगता येतील. अगदी अलिकडच्या काळातील सामान्य लोकांच्या लक्ष्यात येण्यासारखं उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिकेने इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेन बद्दल पेरलेल्या बातम्यांचे देता येईल. सद्दाम हुसेनकडे संहारक शस्त्रे आहेत, ती जगाला कशी धोकादायक आहेत हे अमेरिकेने प्रोपगंडाच्या माध्यमातून जगाला असं काही पटवून दिलं की आता इराकवर हल्ला केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं जगाचं मत आपल्या बाजूने झाल्यानंतर अमेरिकेने इराक वर हल्ला करून सद्दामला संपवलं पण ती संहारक शस्त्रे आजही जगाच्या समोर काही आली नाहीत. खरं तर अमेरिकेच्या या इराकवरील हल्ल्यामागे तेलाचे राजकारण दडले होते पण त्यासाठी इराकवर हल्ला करायचा तर संपूर्ण जग अमेरिकेच्या विरोधात गेले असते आणि ते होऊ नये म्हणूनच हा संहारक शस्त्रांचा "प्रोपगंडा". यासारखी बरीच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय उदाहरणे रवि आमले यांनी या पुस्तकात दिलेली आहेत जी वाचत असताना सामान्य माणूस म्हणून आपण हादरून जातो. "प्रोपगंडा" करताना माहिती जाणिवपूर्वक पेरली जाते. महत्वाची माहिती दाबून ठेवली जाते, आपल्याला हवी तितकीचं माहीती दिली जाते आणि तिचा हवा तसा वापर हे प्रोपगंडाकार करत असतात. अनेकदा टीबी, कॅन्सर सारख्या समाजपयोगी जाहीराती पटवून देण्यासाठीसुद्धा हे तंत्र वापरले जाते. पहिल्या महायुद्धात युद्धज्वर वाढवण्यासाठी ब्रिटनने प्रपोगंडाचा वापर अगदी सफाईदारपणे केल्याचं पाहायला मिळतं, याची बरीच उदाहरणे रवि आमले यांनी पुस्तकात दिली आहेत. एखाद्याची प्रतिमा उच्च स्तरावर नेऊन ठेवायची आणि त्याला विरोध करणारे हे कसे देशद्रोही आहेत हे लोकांच्या मनात बिंबवण्याचे काम प्रोपगंडाच्या माध्यमातून कसं होऊ शकतं याचीही अनेक उदाहरणे आपल्याला वाचायला मिळतील. मीठ तेच असते पण “देश का नमक” टॅग जोडून त्याला देश भावनेशी कसं जोडलं जातं. डेअरी मिल्क या चॉकलेटमध्ये आळ्या सापडल्यानंतर त्याच्या विक्रीवर परिणाम झाला. तीच गत सर्वांच्या आवडत्या मॅगीची, पण मग त्याच गोष्टी नव्या पॅकींगमध्ये येऊन पुन्हा लोकांना कशा आवडू लागल्या. दिवाळीत मिठाईची जागा "कॅडबरीने" व्यापून टाकली आणि अंघोळीची जागा "मोती साबणाने" पण या आणि अशा हजारो परिणामकारक जाहीरातींमागे काय विचार असतो? राजकिय मंडळी या प्रोपगंडाचा वापर कसा करतात तसेच जाहीरातदार आपल्या वस्तूंची विक्री वाढण्यासाठी हे तंत्र कशा पद्धतीने वापरतात हे वाचताना बऱ्याच वेळा चीडदेखील येते. पहिल्या महायुद्धापासून ते भारतातील सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये प्रोपगंडाचा कसा वापर झाला? “अच्छे दिन”, “अब की बार मोदी सरकार” पासून ते "कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?" या संकल्पना कशा सुचल्या? राहुल गांधी, केजरीवाल यांची अपरिपक्व प्रतिमा कशी तयार झाली होती? या प्रतिमेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी कोणत्या तंत्राचा वापर केला? आण्णा हजारेंचं आंदोलन देशव्यापी कसं झालं? त्यानंतर आण्णा प्रसिद्धीमाध्यमांपासून कसे दूर फेकले गेले? या आणि अशा बऱ्याच प्रश्नांच्या खोलात हे पुस्तक आपल्याला घेऊन जाते. पुस्तकातील शेवटची १० प्रकरणे भारतात या प्रोपगंडाचा वापर कसा केला जातो आणि त्याचे सामान्य भारतीयांवर काय परिणाम होतात यावर बेतलेली आहेत.
आवर्जून वाचून संग्रही ठेवण्यासारखं असं हे रवि आमले यांचं पुस्तक "प्रोपगंडा".
No comments:
Post a Comment