लेखक : हृषिकेश गुप्ते
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन
एक काळ असा होता की गूढकथा किंवा रहस्यकथा वाचाव्यात तर रत्नाकर मतकरी आणि नारायण धारप यांच्याच. इतक्या वर्षांपूर्वी लिहिलेल्या त्यांच्या कथांना आजही तोड नाही. गूढकथा आणि रहस्यकथांची आवड असल्याने रत्नाकर मतकरी आणि नारायण धारप यांची बरीच पुस्तके माझ्या संग्रही आहेत. ६० च्या दशकात लिहिल्या गेलेल्या या कथा वाचत असताना आजही अंगावर शहारे आणतात. पण आजच्या घडीला मोजकेच काही लेखक वाचकांची अशा साहित्याची आवड पूर्ण करत आहेत. अशा कथा लिहिणाऱ्या मोजक्या लेखकांपैकी आवर्जून घ्यावे असं एक नाव म्हणजे हृषिकेश गुप्ते! भयकथा - गूढकथा लिहिताना त्या कथांना कधीच वास्तवाचा आधार नसतो, त्या नेहमीच कल्पनेवर आधारित असतात आणि हृषिकेश गुप्ते यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची जबरदस्त कल्पनाशक्ती. पण कल्पनाशक्तीतून साकारलेल्या कथा या तेव्हाच परिणामकारक होतात जेव्हा त्यांची उत्कृष्ट मांडणी केली जाते. हृषिकेश गुप्ते यांनी लिहिलेलं प्रत्येक पुस्तक आणि कथा परिणामकारक असण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्या कथांची केलेली मांडणी, जी वाचकाला त्या घटना आपल्या डोळ्यासमोर उभ्या करतात. हृषिकेश गुप्ते यांच्या कल्पनेतून साकारलेल्या अशाच ६ वेगवेगळ्या दर्जेदार भयकथांचा संग्रह "अंधारवारी". "अंधारवारी" पुस्तकातील प्रत्येक कथा जणू लेखकाच्या जबरदस्त कल्पनाशक्तीची साक्षच देते. प्रेम, दु:खं, क्रोध आणि क्रौर्य या मानवी भावनांमध्ये थोडीशी "भीती" मिसळली गेली की या भावनांचा बाजच कसा बदलून जातो याची प्रचिती पुस्तकातील प्रत्येक कथेत येते. "अंधारवारी" मधील सर्व कथांमधील कथानके जरी वेगवेगळी असली तरी प्रत्येक कथेचे सूत्र एकच आहे आणि ते म्हणजे कथा वाचताना वाचकाचे डोळे विस्फारत जाऊन त्याला अखेपर्यंत खिळवून ठेवणे, कथेमध्ये पूर्णपणे गुंतवून ठेवणे. एखाद्या भयपटाला साजेल अशी वातावरण निर्मिती आणि जबर अशा धक्क्यातून प्रत्येक कथेचा शेवट हे आणखी एक वैशिष्ट्य. ’काळ्याकपारी’, ’गानूआजींची अंगाई’, 'बांदेकरांचं बाळ’, ’ती गेली तेव्हा’, ’वॉचमन’ आणि ’गोष्ट अजून संपली नाही’ अशा सहा दर्जेदार भयकथांचा संग्रह म्हणजेच हे हृषिकेश गुप्ते यांचे १६० पानी पुस्तक "अंधारवारी".
भीती ही मानवी मनाचा एक अविभाज्य भाग आहे. या भीतीचा अनुभव घेणंदेखील कधीकधी तितकंच आनंददायक असतं, कारण तिचा संबंध गूढतेशी, रहस्याशी आणि साहसाशी असतो. गूढ आणि रहस्यमय असं काही अनुभवणं ही खरे तर मानवी मनाची गरजच असते. आणि हीच वाचकांची गरज "अंधारवारी" मधील प्रत्येक कथा पूर्ण करते. ’काळ्याकपारी’ ही पहिली कथा विराज नाडगौडा या मानसोपचारतज्ञाने केलेल्या आत्महत्येतून जन्म घेते. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या एका पत्राच्या माध्यमातून फ्लॅशबॅकमधे ही कथा उलगडत जाते. आपल्याकडे उपचारासाठी आलेला मानसिक रोगी "ज्ञ" याला काळोखदरी नावाच्या ठिकाणी आलेले काही विलक्षण अनुभव आणि त्या अनुभवानंतर त्याला जडलेल्या काही विचित्र सवयी याभोवती फिरणारी ही कथा पण सोबतच लेखक मानवी मनोव्यापारांच्या अनेक गुंतावळी सोडवण्याचा प्रयत्न या कथेत करतात. "ज्ञ" सोबत घडणाऱ्या विचित्र गोष्टी समजून घेत असताना अचानकच "ज्ञ" ने केलेली आत्महत्या आणि त्यानंतर "ज्ञ" सोबत घडणाऱ्या त्याच विचित्र गोष्टींची विराजच्या आयुष्यात झालेली सुरुवात, पुढे त्याचाही आत्महत्येतून झालेला शेवट या सर्वांच्यामधे घडणारी ही रोमांचक भयकथा. कथा जितकी रोमांचक तितकाच तिचा शेवटसुद्धा धक्कादायक. पुस्तकातील ६ कथांमधील सर्वांत भीतीदायक कथा जर कोणती असेल तर ती 'गानूआजींची अंगाई'. "तुंबाड" मधील बांधून घातलेली ती "आजी" आणि "हस्तर" ची आठवण करून देणारी अशी ही कथा. कोकणातील सरपणी या छोट्याशा गावातील गानूवाड्यात घडणाऱ्या या कथेत काही काही प्रसंगांत लेखकांनी जी वातावरण निर्मिती केली आहे त्याने वाचताना अक्षरशः अंगावर शहारे येतात. लहान-लहान गोष्टींचे इतके जबरदस्त वर्णन लेखकाने केलं आहे की वाचकाला आपण स्वतः गानूवाड्यात असल्याचाच भास व्हावा. नाट्यमय वर्णनांसह कथानकाचा आलेख अधिकाधिक उंचावत जातो आणि शेवटी एक वेगळाच धक्का देत तो थांबतो. 'वॉचमन’ ची कथा फिरते एका लेखकाभोवती. बेकारीतून आलेल्या वैफल्यामधून 'वॉचमन' या कथेच्या नायकाची झालेली मानसिक अवस्था आणि या वैफल्याचा क्रौर्यात झालेला स्फोट वाचकाला अक्षरश: हादरवून सोडतो. 'वॉचमन’ नावाच्या बागुलबुवाने लेखकाच्या मन-मेंदूचा घेतलेला ताबा, त्यातून घडलेली ही कथा आणि मनाला चटका लावून जाणारा कथेचा शेवट. बाळंतपणामध्ये आपल्या पत्नी आणि बाळाचा झालेल्या मृत्यूनंतर जन्म घेणारी कथा 'बांदेकरांचं बाळ’, कथेचा नायक आयुष्यातील दु:ख सहन न होऊन स्वप्नरंजनाकडे वळतो आणि त्यानंतर घडणाऱ्या कथेचा शेवट वाचकाला नकळत गहिवरून यायला भाग पाडतो. 'ती गेली तेव्हा’, स्वतःला कामाच्या व्यापात झोकून दिल्याने पत्नीला न देता आलेला वेळ आणि त्या एकटेपणात पत्नीचे भीतीदायक वागणे यांतून पुढे सरकणारी, पत्नीच्या जाण्याने आयुष्यात निर्माण होणारी पोकळी आणि त्याच पश्चात्तापातून घडलेली ही कथा. सुरुवातीपासून शेवटापर्यंत एखाद्या प्रेमकथेसारखी ही कथा पुढे सरकत राहते पण भयकथा म्हणून असलेली आपली पकड कुठेही ढिली होऊ देत नाही. शेवटची कथा ’गोष्ट अजून संपली नाही’ ही नावाला साजेशी अशीच आहे. एक वाचक म्हणून आपल्या अपेक्षा वाढवणारी ही कथा अचानकच संपते आणि हे भान कदाचित लेखकालाही असल्यामुळे ते शेवटी म्हणतात, 'गोष्ट अजून संपली नाही'. चार मुलांचा एका अंधाऱ्या गुहेतील प्रवास, त्यातून एका मुलाची झालेली हत्या आपल्या अंगावर शहारे तर आणतेच पण त्या हत्येचे वर्णन किळसही निर्माण करते. या हत्येचा बदला म्हणून पुढे गावातील एका स्त्रीवर झालेला बलात्कार आणि तिला पेटत्या होळीत टाकून जाळणं या क्रौर्याच्या परिसीमा गाठणाऱ्या घटना वाचकाच्या मनात चीड निर्माण करतात. गुहेतील मुलाच्या हत्येचे कारण सांगणाऱ्या जाधव नावाच्या मुलाकडून आपल्या आईला जिवंत जाळलेल्या गावाचा सूड घेण्याच्या केलेल्या वाक्याने कथा संपते आणि संपूनही पुढे चालूच राहते, लेखकाने सांगितल्याप्रमाणे! 'गोष्ट अजून संपली नाही'.
हृषिकेश गुप्ते यांच्या काही कथांवर सध्या होत असलेला वाङ्मयचोरीचा आरोप एक वाचक म्हणून मला निरर्थक वाटतो कारण जरी त्यांच्या एक-दोन कथा या परकीय कथाकल्पनांचा आधार घेऊन किंवा त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन लिहिल्या गेल्या असल्या तरी त्या कथा त्यांनी त्यांच्या खास शैलीत ज्याप्रकारे वाचकांपर्यंत पोहोचवल्या आहेत त्यामुळे अशा कथांचा वाचकवर्ग वाढण्यास एकप्रकारे मदतच झाली आहे. भीतीची जाणीव करून द्यायला हिंसा किंवा ओंगळवाण्या घटनांची आवश्यकता नसते, हे या कथासंग्रहातून हृषिकेश गुप्ते यांनी दाखवून दिले आहे. प्रेम, दु:ख, मत्सर, क्रौर्य या मानवी भावभावनांच्या जोडीनं येणारं गूढत्व आणि भीती "अंधारवारी" मधील कथांना एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात.
संदीप प्रकाश जाधव

No comments:
Post a Comment