लेखक : नारायण धारप
प्रकाशक : साकेत प्रकाशन
भयकथा वाचाव्यात तर त्या धारपांच्याच असं कोणाकडून तरी एकदा ऐकलं होतं आणि त्यामध्ये खरंच किती तथ्य आहे याची जाणीव त्यांचं कोणतंही पुस्तक वाचताना येते. "अघटित", "चेटकीण", "लुचाई", "वेडा विश्वनाथ" आणि आता "स्वाहा" हे धारपांचं माझ्या वाचनात आलेलं ५वं पुस्तक! त्यांचा कथासंग्रह असो की कादंबरी प्रत्येकात असणारा समान धागा म्हणजे एक थरारक, भयप्रद, अंगावर काटा उभा करणारा, दचकवणारा आणि शेवटी वाईटावर चांगल्याच्या विजय होऊन सर्वकाही ठीकठाक झाल्यानंतर होणारा कथेचा शेवट! जरी या समान धाग्याला पकडून त्यांची सर्व पुस्तके लिहिली गेली असली तरीही सर्व पुस्तकांत एक वेगळेपणा आहे जो वाचकाला प्रत्येकवेळी खिळवून ठेवतो! याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे नारायण धारप यांची प्रचंड कल्पनाशक्ती! नारायण धारप यांच्या भयकथा म्हणजे कल्पनाशक्तीचा कळसच म्हणावं लागेल. त्यांच्या प्रचंड कल्पनाशक्तीचा अंदाज त्यांचं पुस्तक वाचायला घेतलं की पाना-पानावर येत राहतो. त्यांच्या कल्पना विलक्षण असण्यासोबतच प्रचंड सुसंगत आणि शात्रीय पायावर आधारित वाटतात. कथेतील शब्द आणि वर्णन यांची अतिशयोक्ती कधीच वाटत नाही. शब्द साधेच पण जबरदस्त परिणामकारक! मानवी मन हे नेहमीच रहस्याकडे आकर्षित होते, त्याला नेहमीच कोणतंही रहस्य जाणून घेण्याची आणि उलगडण्याची उत्सुकता असते. कोणत्याही प्रकारचं रहस्य जाणून घेण्याची माणसाला असणारी हीच उत्कंठा लक्षात घेऊन लिहिलेल्या नारायण धारपांच्या कथा पहिल्या पानापासून नव्हे तर त्यांच्या कादंबरीच्या मुखपृष्ठापासूनच वाचकाला घेरायला चालू करतात. त्यांच्या उत्कंठावर्धक रहस्य कथांचा एक भाग बनून, पुढे काय होणार या उत्सुकतेने वाचक कथेमध्ये शेवटपर्यंत गुंतून पडतो आणि एका वेगळ्याच जगात गेल्याचा रोमांचक अनुभव घेत राहतो. भीतीने अंगावर शहारे येणे म्हणजे काय याची जाणीव धारपांच्या भयकथा वाचताना होते. एखादा अतिशय हॉरर चित्रपट पाहताना जितकी भीती आपल्याला वाटू शकते तितकीच किंबहुना त्याच्याहून थोडी जास्तच भीती धारपांच्या कथांमधून जाणवते. भीतीचा अनुभव घ्यायचा असेल तर नारायण धारप यांच्या भयकथा वाचन हा त्यासाठी सर्वात योग्य पर्याय ठरेल. त्यांच्या ५०हून अधिक पुस्तकांच्या पंक्तीमधील ही भय कादंबरी "स्वाहा"! अतिशय गूढ, रहस्यमय, वाचत असताना अंगावर शहारे आणणाऱ्या, २४० पानांच्या "स्वाहा" मधून धारपांनी वाचकाला भीतीचा अगदी जवळून अनुभव करून दिला आहे.
शहरालगतच्या, स्टेशन रोडवरील विरळ वस्तीतील एक तीन मजली इमारत आणि तिच्या आसपासच्या परिसरामध्ये घडणारी ही थरारक कादंबरी "स्वाहा"! एखाद्या भयपटाला साजेशी सुरुवात. या तीन मजली जुन्या वास्तूचा रहस्यमय तिसरा मजला आणि दर ३ वर्षांनी त्या वास्तूमध्ये जागृत होणारी एक दुष्ट शक्ती यांना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली ही कादंबरी! श्रीधरची अमेरिका रिटर्न बहीण तिच्या कुटुंबासोबत भारतात स्थायिक होण्यासाठी आल्यानंतर तात्पुरत्या वास्तव्यासाठी नेमकी हीच इमारत भाड्याने घेतात आणि मग सुरुवात होते या थरारक प्रवासाला! त्या वास्तूत रहायला गेल्यानंतर श्रीधरची बहीण विनिता आणि भाचा सुनील यांना येणारे विचित्र अनुभव वाचताना अंगावर शहारे येतात. तिसरा मजला आणि तिथे वावरणाऱ्या अनामिक शक्तीचे धारपांनी केलेलं वर्णन तर खासच! नंतर अचानकच त्या संपूर्ण कुटुंबाच्या गायब होण्याने कथेमध्ये एका गूढ रहस्याचा प्रवेश होतो. बाहेरगावी जाऊन परत आल्यानंतर श्रीधर जेव्हा त्यांच्या या अचानक गायब होण्याच्या कारणांचा शोध घ्यायला सुरुवात करतो तेव्हा त्याला त्या वास्तूबाबत येणाऱ्या विविध अनुभवांतून या कादंबरीची कथा उलगडत जाते. या शोधादरम्यान पुढे ३ वर्षें ही वास्तू सुप्तावस्थेत राहते आणि पुन्हा त्याच घटनांची पुनरावृत्ती होते जेव्हा श्रीधरच्या बहिणीप्रमाणेच अरुणाचे कुटुंब त्या वास्तूत रहायला येते. कथेतील सर्व घटना धारपांनी इतक्या ताकदीने रंगवल्या आहेत की वाचकाला स्वतःच त्या वास्तूत असण्याचा भास काही क्षण व्हावा आणि याच धारपांच्या जादूमुळे आजही वाचक त्यांच्या कथांचा चाहता आहे. दर ३ वर्षांनी घडणाऱ्या या घटनांचा नेमका अर्थ काय? श्रीधर आणि अरुणा यांच्याशिवाय आणखी कोणा-कोणाला या दुष्ट चक्रातून जावं लागलं? त्या दुष्ट शक्तीला दर ३ वर्षांनी द्याव्या लागणाऱ्या मनुष्याच्या प्राणांच्या आहुतीसाठी माणसांची निवड कोण, कशी आणि कधी करते? ही आहुती का द्यावी लागते? त्याचे नेमके कारण काय? या दुष्टचक्राचा शेवट कसा होतो? त्यासाठी श्रीधर कोणकोणते मार्ग वापरतो? या प्रश्नांच्या उत्तरासाठी आणि धारपांच्या रहस्यात्मक लेखनाचा थरार अनुभवण्यासाठी "स्वाहा" वाचावीच लागेल.
भयकथा वाचनाची आवड असणाऱ्यांनी आवर्जून वाचण्यासारखी कादंबरी "स्वाहा".
संदीप प्रकाश जाधव
No comments:
Post a Comment