लेखक : बेअर ग्रील्स
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन
मराठी अनुवाद : अनिल / मीना किणीकर.
पृष्ठे- ४०८, मूूल्य- ३९५ रुपये.
अशक्य कोटीतील जिद्दीची धगधगती आत्मकथा: बेअर ग्रिल्स यांच्या 'चिखल, घाम आणि अश्रू' या पुस्तकाचा परिचय!!!
टीव्हीच्या स्क्रीनवर एक माणूस येतो... घनदाट, हिंस्त्र प्राण्यांनी वेढलेल्या जंगलात, वाळवंटात किंवा उणे तापमानाच्या बर्फाच्छादित शिखरांवर तो एकटाच वावरताना दिसतो. जगण्याची कोणतीही साधनं नसताना तो जिवंत राहण्यासाठी थेट जिवंत साप चावून खातो, अळ्या गिळतो, आणि दलदलीतून स्वतःचा जीव वाचवत धावतो. 'मॅन व्हर्सेस वाईल्ड' (Man vs. Wild) या शोच्या माध्यमातून जगभरातल्या करोडो लोकांच्या मनावर राज्य करणारं हे नाव म्हणजे—बेअर ग्रिल्स! पण, स्क्रीनवर दिसणारा हा बेअर ग्रिल्स एका रात्रीत स्टार बनलेला नाही. आज तो ज्या अमानुष संकटांना हसतमुखांने सामोरं जातो, त्यामागे त्याच्या आयुष्यात सांडलेला चिखल, गाळलेला घाम आणि वाहलेले रक्ताश्रू आहेत. बेअर ग्रिल्स याच्या 'Mud, Sweat, and Tears' या जगप्रसिद्ध आत्मकथेचा मराठी अनुवाद 'चिखल, घाम आणि अश्रू' नुकताच मी पूर्ण केला. आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर, हे पुस्तक वाचताना माझ्या अंगातली ऊर्जा इतकी वाढली की मला एका जागी शांत बसणं कठीण झालं होतं!
आजवर मी अनेक आत्मचरित्रं वाचली आहेत, पण या पुस्तकाने माझ्या मनावर केलेली मोहिनी आणि मला दिलेली प्रेरणा शब्दातीत आहे. हे केवळ एका जगप्रसिद्ध व्यक्तीचं आत्मचरित्र नाही, तर ती मानवी जिद्दीची, पराभवा धूलिधूसर करून पुन्हा फिनिक्स पक्षासारखं झेप घेण्याची एक थरारक कादंबरी आहे. आज मी तुमच्यासाठी याच अद्भूत पुस्तकाचं सविस्तर, ओघवतं आणि एखाद्या कादंबरीसारखं विश्लेषण घेऊन आलो आहे, जे तुम्हाला थेट बेअरच्या साहसी जगात घेऊन जाईल.
पुस्तकाची सुरुवात होते ती बेअरच्या बालपणापासून. त्याचं खरं नाव एडवर्ड मायकेल ग्रिल्स असं होतं. पण त्याच्या बहिणीने त्याला प्रेमाने 'बेअर' (अस्वल) हे नाव ठेवलं, आणि पुढे जाऊन हेच नाव त्याच्या जगण्याची ओळख बनलं. बेअरच्या लहानपणाचे प्रसंग वाचताना आपल्याला एका अत्यंत चंचल, खोडकर पण तितक्याच धाडसी मुलाची ओळख पटते. त्याचे वडील मायकेल ग्रिल्स हे राजकारणी होते, पण त्यांना निसर्गाची आणि साहसाची प्रचंड आवड होती. बेअरच्या जडणघडणीत त्यांच्या वडिलांचा वाटा कसा सर्वोच्च होता, याचं वर्णन बेअरने अत्यंत भावुक शब्दात केलं आहे. लहान वयातच वडिलांसोबत समुद्रात बटींग करणं, रात्रीच्या अंधारात जंगलात भटकणं आणि उंच कड्यांवर चढण्याचे धडे घेणं, यातूनच त्याच्यातील साहसाची बीजे रोवली गेली. लेखक इथे बालपणाचे प्रसंग सांगताना इतकी ओघवती भाषा वापरतो की, आपल्याला आपल्या स्वतःच्या बालपणातील छोट्या-छोट्या साहसांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
पुस्तकाचा पुढचा भाग वाचताना वाचकाचा श्वास रोखला जातो. बेअर जेव्हा ब्रिटिश सैन्याच्या सर्वात कठीण आणि घातक समजल्या जाणाऱ्या '२१ SAS' (Special Air Service)या विशेष दलात भरती होण्याचा निर्णय घेतो, तिथून एका खऱ्या संघर्षाला सुरुवात होते. SAS ची निवड प्रक्रिया म्हणजे साक्षात नरकाचा प्रवास! शेकडो तरुण या प्रक्रियेत येतात, पण टिकतात फक्त मोजकेच. कडाक्याच्या थंडीत, पाठीवर ३०-४० किलोचं ओझं घेऊन मैलोन्मैल धावणं, दलदलीतून वाट काढणं, आणि मानसिक छळ सोसणं... हे सगळं बेअरने ज्या कादंबरीमय शैलीत लिहिलं आहे, ते वाचून अंगावर काटा येतो. "तुमचं शरीर जेव्हा संपूर्णपणे थकलेलं असतं, पाय रक्ताळलेले असतात आणि मन तुम्हाला सांगत असतं की आता थांब... नेमका त्याच क्षणी तुमचा खरा कस लागतो. कारण साहस हे शरीराने नाही, मनाच्या ताकदीने केलं जातं." बेअरने या निवडी दरम्यान अनुभवलेला शारीरिक आणि मानसिक छळ, अन्नावाचून काढलेले दिवस आणि मित्रांची सुटत गेलेली साथ याचं जे चित्रण केलं आहे, ते वाचकाला अंतर्मुख करतं. अपार कष्टानंतर तो शेवटी SAS चा जवान बनतो, आणि तिथून त्याच्या आयुष्याला एक लष्करी शिस्त आणि धार मिळते.
कादंबरीचा मध्यभाग हा अत्यंत नाट्यमय आणि तितकाच काळजाचा ठोका चुकवणारा आहे. बेअरच्या आयुष्यातील सर्वात मोठा अपघात इथे उलगडतो. १९९६ मध्ये आफ्रिकेतील झांबियामध्ये एका लष्करी मोहिमेदरम्यान, १६ हजार फुटांवरून पॅराशूट जंप करताना बेअरचं पॅराशूट हवेत फाटलं. तो अत्यंत वेगाने थेट जमिनीवर येऊन आदळला. या भीषण अपघातात त्याच्या पाठीच्या कण्याचे तीन मणके तुटले. एका क्षणात, देशासाठी लढणारा, हवेत झेप घेणारा एक तरुण उताणा पडला, हलण्या-चलण्याची ताकदही संपली. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की, "बेअर आता कदाचित आयुष्यात कधीच आपल्या पायावर उभा राहू शकणार नाही." हा भाग वाचताना डोळ्यात पाणी येतं. ज्या माणसाने संपूर्ण आयुष्य साहसाला वाहिलं होतं, तो आता हॉस्पिटलच्या बेडवर छताकडे पाहत पडून होता. नैराश्याचा तो भयंकर काळ, मनात आलेले आत्महत्येचे विचार आणि अंथरुणाला खिळलेली ती काळी वर्षं... बेअरने या सगळ्या वेदना पुस्तकात अगदी प्रामाणिकपणे मांडल्या आहेत. पण इथेच त्याच्यातील 'बेअर' जागा होतो. तो हार मानत नाही. हळूहळू, मिलीमीटरने तो स्वतःच्या शरीरात जीव आणण्याचा प्रयत्न करतो, आणि विज्ञानाला, डॉक्टरांना थक्क करत पुन्हा एकदा उभा राहतो!
पाठीचा कणा मोडल्यानंतर अवघ्या १८ महिन्यांत बेअर ग्रिल्सने जगातील सर्वोच्च शिखर म्हणजेच 'माउंट एव्हरेस्ट' सर करण्याचा वेडेपणा करायचं ठरवलं! विचार करा, ज्या माणसाला नीट उभं राहता येत नव्हतं, तो जगाच्या छतावर चढायला निघाला होता. पुस्तकाचा हा भाग म्हणजे साहसाचा Climax आहे. एव्हरेस्टची चढाई लेखकाने एखाद्या उत्कंठावर्धक कादंबरीसारखी रंगवली आहे. बर्फाची वादळं, उणे चाळीस अंश तापमान, ऑक्सिजनची कमतरता आणि डोळ्यांसमोर पडलेले इतर गिर्यारोहकांचे गोठलेले मृतदेह... हा सगळा प्रवास वाचताना वाचकालाही श्वास घेणं कठीण झाल्यासारखं वाटतं. चढाई दरम्यान अनेक प्रसंग असे येतात जेव्हा बेअर मृत्यूच्या अगदी जवळ पोहोचतो. एका हिमनदीच्या दरीत तो कोसळतो, पण सुदैवाने त्याचा जीव वाचतो. शेवटी, वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी, सर्वात तरुण ब्रिटिश नागरिक म्हणून तो एव्हरेस्टच्या शिखरावर भारताचा आणि जगाचा तिरंगा-ध्वज फडकवतो (त्याच्या टीममध्ये भारतीय गिर्यारोहकही होते). त्या शिखरावर उभं राहून जेव्हा तो रडतो, तेव्हा वाचक म्हणून आपल्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात.
एव्हरेस्ट सर केल्यानंतर बेअरचं आयुष्य कसं बदललं, आणि त्याला टीव्ही शोची ऑफर कशी मिळाली, याची कथा पुस्तकाच्या उत्तरार्धात येते. सुरुवातीला बेअरला कॅमेऱ्यासमोर काम करायची अजिबात आवड नव्हती. पण जेव्हा त्याला समजलं की या शोच्या माध्यमातून तो लोकांना जगण्याची, संकटांशी लढण्याची कला शिकवू शकतो, तेव्हा त्याने हा शो स्वीकारला. 'मॅन व्हर्सेस वाईल्ड'च्या चित्रीकरणादरम्यानचे अनेक पडद्यामागचे किस्से, धोके आणि चमत्कारी अनुभव त्याने यात शेअर केले आहेत. जंगलात जेवण शोधताना आलेली अडचण, भयानक प्राण्यांशी झालेला सामना आणि टीमने घेतलेली मेहनत, हे सगळं वाचताना आपल्याला समजते की, पडद्यावर दिसणाऱ्या ४५ मिनिटांच्या एपिसोडच्या मागे किती दिवसांचा 'चिखल, घाम आणि अश्रू' दडलेले असतात.
या पुस्तकात बेअरने स्वतःला कुठेही सुपरमॅन दाखवण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्याला वाटणारी भीती, त्याचे पराभव, हॉस्पिटलच्या बेडवर तो कसा रडला, हे सगळं त्याने अत्यंत प्रामाणिकपणे मांडलं आहे. यामुळे वाचक त्याच्याशी थेट जोडला जातो. पुस्तकाची भाषाशैली अत्यंत चित्तवेधक आहे. प्रसंगवर्णन इतकं अचूक आहे की, वाचताना आपण स्वतः बेअरसोबत एव्हरेस्टवर चढतोय किंवा पॅराशूटवरून खाली पडतोय असा भास होतो. हे पुस्तक फक्त साहसाची कथा नाही, तर ते 'सर्व्हायव्हल गाईड' (Survival Guide) आहे. संकट कितीही मोठं असो, जर मनात जिद्द असेल तर तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता, हा विचार हे पुस्तक वाचकांच्या मनात पक्का करतो.
आज आपण आपल्या आयुष्यातील छोट्या-छोट्या संकटांनी, अपयशाने खचून जातो. नोकरी गेली, परीक्षेत कमी मार्क्स मिळाले, किंवा नात्यांमध्ये दुरावा आला की आपण हताश होतो. अशा वेळी 'चिखल, घाम आणि अश्रू' हे पुस्तक तुमच्यासाठी एखाद्या संजीवनीसारखं काम करेल.
हे पुस्तक आपल्याला शिकवतं की, आयुष्यात चिखल मिळणारच आहे, घाम गाळावाच लागणार आहे आणि डोळ्यात अश्रूही येणार आहेत; पण या सगळ्याचा स्वीकार करून जो पुढे जातो, तोच शेवटी आपल्या आयुष्याचा 'एव्हरेस्ट' सर करतो.
संदीप प्रकाश जाधव

No comments:
Post a Comment