लेखक : ल. सि. जाधव
प्रकाशक : रोहन प्रकाशन
एखाद्या व्यक्तीच्या आत्मकथनाचे विश्लेषण करणं तसं थोडंसं कठीणच, कारण त्यांच्या नजरेतून त्यांनी पाहिलेलं - जगलेलं त्यांचं आयुष्यच त्यांनी पुस्तकरूपात लिहिलेलं असल्यामुळे आपण ते आपल्या भाषेत इतरांना सांगणं तसं अवघडच. बऱ्याच लोकांच्या आत्मकथा मी आजपर्यंत वाचल्या त्यांपैकीच एक मनाला भावलेली आणि अत्यंत प्रेरणादायी अशी ल.सि. जाधव यांची आत्मकथा "होरपळ".
स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरसुध्दा मातंगवस्ती किंवा महारवाडा असे शब्द ऐकल्यानंतर नाके मुरडणाऱ्या लोकांची आपल्या देशात काहीच कमी नाही, अशा लोकांची नेहमीच मला कीव करावीशी वाटते. देशाच्या कोणत्याही गावा - शहराच्या हद्दीबाहेर वसवलेल्या मांगामहारांच्या वस्त्या पाहून जाणवते की आजही आपल्याला एक समाज म्हणून खूप मोठा पल्ला गाठायचा बाकी आहे. कर्मठ रूढी-परंपरा जपणाऱ्या जाचक समाजव्यवस्थेमुळे कित्येक पिढ्यांची "होरपळ" आजही होतच आहे. अशाच एका सोलापूरातील मातंग वस्तीत जन्मलेले या पुस्तकाचे लेखक. आपण मातंग समाजात जन्माला आलो म्हणून दुःख करत बसण्यापेक्षा आपल्या बुद्धिमत्ता आणि मेहनतीच्या जोरावर आपले शिक्षण पूर्ण करून भारतीय स्टेट बँकेमधून सेवानिवृत्त झालेले ल.सि. जाधव, त्यांनी लिहिलेलं सर्वांना प्रेरणादायक असं त्यांचं आत्मकथन म्हणजेच हे पुस्तक "होरपळ".लेखकांचे हे आत्मकथन म्हणजे मातंग समाजाचा आपल्या या समाजव्यवस्थेसोबत जगत असताना दाखवलेला व्यावसायिक, सामाजिक, शैक्षणिक जीवनाचा खडतर प्रवास तर आहेच शिवाय अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा आपल्यातील माणुसकी न सोडता जगण्याची असलेली या समाजाची कला. सोबतच शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे असे हे आत्मकथन - "होरपळ".
लेखकाचा जन्म स्वातंत्र्यापूर्वीचा, १९४५ चा. शहराच्या हद्दीबाहेर स्वतंत्र प्लॉटींग करून, पाटबंधारे विभागाने शेतीसाठी खोदलेल्या एका मोठ्या कॅनॉलच्या बाजूला वसवलेली दलित वस्ती आणि त्याचाच एक भाग असलेला मांगवाडा जिथे लहानाचे मोठे झाले ल.सि. जाधव. या वस्तीभोवतीचे निसर्गाचे जे वर्णन लेखकाने केलेलं आहे ते माझ्यासारख्या ८० - ९० आणि त्यापूर्वीच्या दशकात जन्माला आलेल्या प्रत्येक वाचकाला त्याच्या बालपणात घेऊन जाते. कारण आजकाल सिमेंटच्या जंगलात हरवलेलं असं निसर्ग सौंदर्य फक्त लहान-सहान खेड्यापाड्यातच शिल्लक राहिलंय. लेखकाचे आपल्या मित्रांच्या टोळक्याने कॅनॉलच्या काठाने निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त फिरणे, पारधी लोकांची शिकार करण्याची पध्दत, कॅनॉलच्या बारमाही पाण्यामुळे आसपास वाढलेली दाट झाडीं आणि त्यामुळे नेहमीच असणारी वेगवेगळ्या पक्ष्यांची हजेरी, वड-पिंपळ असे मोठमोठाले वृक्ष,कॅनॉलच्या जवळच असणारे घनदाट शिंदीचं बन यासह आणखीही बऱ्याच गोष्टींचे या वस्तीभोवतीचे जे वर्णन आत्मकथनाच्या सुरवातीलाच लेखकाने केलेलं आहे ते खरंच खूप सुंदर. इथेच दलीतवस्तीच्या आजूबाजूच्या परिसरात निसर्गतःच उपलब्ध असणाऱ्या बऱ्याच गोष्टींचा उपयोग करून या वस्तीतील कुटुंबे आपली पोटं भरायची. गरीबी असूनसुद्धा प्रत्येक सण अगदी आनंदाने - उत्साहाने साजरा करणारा असा हा समाज. लेखकाच्या आयुष्यातील काही घटना पुस्तक वाचून संपेपर्यंत आपल्यालासुध्दा आठवत राहतात, जसे वस्तीमध्ये भीक मागायला येणारा लहान मुलगा त्यांचाच वर्गमित्र असल्याचं लक्षात येणं किंवा मनाला चटका लावून जाणारा लेखकाचा चुलत मामा येडा कोंड्या याचा झालेला भयानक मृत्यू. स्मशानभूमीत राहून, दिवसरात्र काम करणारा आणि तिथेच येणाऱ्या पिंडाच्या निवदावर जगणारा हा येडा कोंड्या. पुढे महारोग होऊन स्मशानभूमीत रात्री अगोदरच जळत असणाऱ्या एका चितेच्या बाजूला भाजून होणारा त्याचा मृत्यू मन हेलावून टाकतो. या आणि अशा बऱ्याच गोष्टी या समाजाचे आयुष्य किती खडतर असतं हे सांगतात.दलित वस्तीमध्ये जरी इतरही समाज जसे भंगी, लोहार, चांभार,वडार राहत असले तरी सामाजिक भान ठेवून त्यांचे आपापसातील व्यवहार, वेगवेगळे उत्सव यांचे चित्रण लेखकाने या आत्मकथनात केलेलं आहे.थोडक्यात, दलितवस्तीतील चांगल्या - वाईट अशा अनेक अनुभवांसोबतच तेथील लोकांचे दैनंदिन जीवन लेखकाने अगदी बारकाईने मांडलंय आपल्या या आत्मकथनात. जे वाचताना प्रतिकूल परिस्थितीमध्ये - वातावरणामध्ये लेखक ल.सि. जाधव यांनी मिळवलेले यश नक्कीच आपल्या सर्वांना प्रेरणा देते.
जन्मजातच असणाऱ्या हुशारीमुळे आणि ती हुशारी हेरून लहानपणीच शाळेतील शिक्षकांनी केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे लेखक शिकत गेले.लेखकाला प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणात मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा आवर्जून उल्लेख त्यांनी या आत्मकथनात केलेला आहे. योग्यवेळी मिळणारे मार्गदर्शन किती महत्त्वाचे असते हे लेखकाच्या कारकिर्दीकडे पाहूनच लक्षात येते. पाचवीलाच पुजलेले दारिद्र्य, अगतिकता आणि अज्ञानामुळे वाढीस लागलेली अंधश्रद्धा अशा या दलित समाजात त्याकाळी जिथे मुले शाळेत जायचा विचारसुध्दा करत नसत आणि कोणी गेलेच तर त्यांचा प्रवास मॅट्रिकपर्यंतच थांबे, त्यावेळी लेखकांनी त्यांना असणाऱ्या शिक्षणाच्या आवडीमुळे तसेच आपल्या अपार कष्टाच्या जोरावर, आई-वडिलांच्या पाठिंब्याने,महानगरपालिकेत काम करत बी.ए. आणि त्यानंतर एम. ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.या दरम्यान जवळपास १० वर्षे त्यांनी महानगरपालिकेत काम केले. पुढे महानगरपालिकेतील नोकरी सोडून ते भारतीय स्टेट बँकेत रुजू झाले आणि अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी साहित्यलेखनास सुरुवात केली.त्यांच्या आत्मकथनाबरोबरच त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या आणि कवितासंग्रह सुध्दा खासच.
ज्या मनुष्याचे अर्ध्याहून जास्त आयुष्य गावाबाहेरच्या दलित वस्तीमध्ये गेले.जिथे पिढ्यान पिढ्या कोणाला साधी अक्षरओळख सुध्दा नव्हती. तिथून त्यांनी घडवलेलं त्यांचं आयुष्य जितकं आपल्याला थक्क करते तितकेच ते प्रेरणादायी सुध्दा आहे.
आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवणारे आणि प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे ल.सि. जाधव यांचे प्रेरणादायी आत्मकथन "होरपळ".
संदीप प्रकाश जाधव
No comments:
Post a Comment