Sunday, September 20, 2020

"समांतर"

 



लेखक : सुहास शिरवळकर

प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन


सुहास शिरवळकरांची "दुनियादारी" ही कादंबरी मी १४ वर्षांपूर्वी वाचली होती. चित्रपटाच्या माध्यमातून या कादंबरीची कथा बऱ्याच लोकांपर्यंत पोहचली, पण पुस्तकामध्ये कादंबरीरूपात सुशिंच्या लेखनातून उलगडत जाणारी "दुनियादारी" वाचण्याचा अनुभव खासच होता. आयुष्यात वाचलेली ही माझी पहिलीच कादंबरी आणि जिथून पुस्तक वाचनाला खरी गती मिळाली. त्यानंतर आजअखेर बऱ्याच लेखकांची पुस्तके वाचून झाली पण सुशिंचे एखादे पुस्तक वाचायचा योग इतक्या वर्षांनंतर पुन्हा आला तो "समांतर" या सुशिंच्या कादंबरीवर आधारीत वेब सिरिजमुळे. या वेब सिरीजची माध्यमांमध्ये जी चर्चा चालू होती त्यामुळे ती पाहण्याची खूप इच्छा होती पण "दुनियादारीच्या" असणाऱ्या अनुभवामुळे तो मोह टाळून मी पहिला पुस्तक वाचायचा निर्णय घेतला आणि तो निर्णय किती योग्य होता हे कादंबरी वाचनास सुरुवात केल्यानंतर जाणवले. आपल्या आयुष्यात भविष्यकाळात काय वाढून ठेवलंय याची कोणालाच कल्पना नसते पण तरीही अशी एकही व्यक्ती नाही सापडणार जीला आपले भविष्य जाणून घेण्याची इच्छा नसेल. याच इच्छेखातर आणि उत्सुकतेमुळे आपण कधी वर्तमानपत्रात तर कधी एखाद्या ज्योतिष्याकडे आपले भविष्य जाणून घेण्याचा निष्फळ प्रयत्न करत असतो. याच विषयावर आधारीत सुहास शिरवळकरांनी लिहिलेली ही १९६ पानांची, वाचकाला एका वेगळ्याच जगात घेऊन जाणारी, भविष्याचा वेध घेणारी थरारक आणि रहस्यमयी कादंबरी "समांतर". 

नशिबाला कंटाळलेली एक व्यक्ती, कुमार महाजन हा या कादंबरीचा नायक. मुंबईमध्ये आपली पत्नी आणि मुलासोबत राहणारा तिशीतला एक मध्यमवर्गीय तरुण म्हणजे हा कुमार महाजन. आयुष्यात घडू नयेत अशा घडणाऱ्या घटना आणि आर्थिक विवंचनेत नेहमीच संघर्षमय जीवन जगावे लागणारा हा कुमार. त्याला या परिस्थितीला कंटाळलेला पाहून आणि त्याच्यावर असलेल्या प्रेमाखातर त्याचा कार्यालयीन मित्र वाफगावकर त्याला एका प्रसिद्ध ज्योतिष्याकडे येण्यासाठी आग्रह करतो. देवांवर आणि ज्योतिष्यावर विश्वास नसणारा कुमार मित्राच्या आग्रहास्तव ज्योतिष्याकडे जातो खरा पण त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलेल्या काही अचूक गोष्टींमुळे त्याचा स्वामींवर विश्वास बसतो. पण कुमारचा हात पहायला घेताच स्वामी त्याला भविष्य सांगण्यास नकार देतात आणि अशा व्यक्तीचे नाव घेतात जे कुमारने पूर्वी कधीच ऐकलेलं नसतं. तीस वर्षांपूर्वी स्वामींकडे आलेला सुदर्शन चक्रपाणी आणि कुमार यांच्या भविष्यरेषा सारख्याच असल्याचं स्वामी कुमारला सांगतात. स्वामींनी अपले भविष्य सांगण्यास नकार दिल्याने चिडलेला कुमार दोन लोकांच्या हस्तरेषा समान असणं केवळ अशक्य आहे असं म्हणून तिथून बाहेर पडतो पण त्यानंतर त्याच्या आयुष्यात एकामागून एक घडणाऱ्या धक्कादायक गोष्टींमुळे अस्वस्थ होतो. स्वामींवर बसलेल्या विश्वासामुळे कुमार त्याचा मित्र वाफगावकरसोबत सुदर्शन चक्रपाणी बद्दल माहिती मिळवायला चालू करतो. शोध घेत असताना त्यांना कुमार आणि सुदर्शन चक्रपाणीच्या आयुष्यात घडलेल्या समान गोष्टीबद्दल समजतं आणि इथेच कुमारला झालेली, अंगावर काटा आणणारी जाणीव म्हणजे सुदर्शन चक्रपाणीचा भूतकाळ हा कुमारचा भविष्यकाळ आहे. "समांतर" म्हणजे एकाचा भूतकाळ तो दुसऱ्याचा भविष्यकाळ ! इथून सुरुवात होते या कादंबरीच्या थरारक आणि रहस्यमयी प्रवासाची.

कुमारने त्याच्या कंपनीमध्ये केलेल्या अफरातफरीमुळे त्याच्या पन्हाळ्याला झालेल्या बदलीनंतर ही कथा एका वेगळ्या वळणावर जाऊन वेग पकडते. या दरम्यान सुदर्शन चक्रपाणीच्या आयुष्यात घडून गेलेल्या बऱ्याच घटनांची कुमारला मिळालेली माहिती आणि त्या सर्व घटनांचे कुमारच्या आयुष्यात घडत असणाऱ्या घटनांशी असणारे साधर्म्य यामुळे कथेचं गूढ वाढत जाते. आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींचं चक्रपाणीच्या भूतकाळाशी असणारं साधर्म्य कुमारला बेचैन करत राहतं आणि त्यातूनच तो सुदर्शन चक्रपाणीला प्रत्यक्ष भेटता यावं यासाठी पुन्हा एकदा जोमाने त्याचा शोध चालू करतो. चक्रपाणीच्या शोधात कुमारचा मध्यप्रदेशातील पालान हे छोटेसे गाव आणि तिथून रेतीमैदानातील चक्रपाणीच्या हवेलीपर्यंतचा प्रवास यांचं सुशिंनी केलेलं थरारक, रोमांचक  वर्णन वाचकाला कथेत गुंतवून ठेवते. पालानमध्ये जेव्हा कुमार सुदर्शन चक्रपाणीला प्रत्यक्ष भेटतो तेव्हाही त्याला त्याच्या आयुष्यात घडत असणाऱ्या आणि सुदर्शन चक्रपाणीच्या आयुष्यात घडून गेलेल्या अनेक समांतर गोष्टींचा उलगडा होतो. कुमारला स्वतःचं भविष्य जाणून घेण्याची असणारी उत्सुकता आणि त्याने केलेल्या आग्रहामुळे चक्रपाणी त्याला आपण लिहिलेल्या डायरी वाचायला देतो पण त्यासाठीची असणारी अट म्हणजे कुमारला दररोज एकच पान वाचावं लागणार. डायरी मिळाल्यानंतर कुमारला स्वर्ग जणू दोन बोटे उरतो. पण नियती कोणाला चुकत नाही या उक्तीप्रमाणे चक्रपाणीच्या भूतकाळातील घटना कुमारच्या आयुष्यात घडत राहतात, भले त्या घडण्याचे कारण वेगळे असेल पण परिणाम तेच असतात जे चक्रपाणीने अनुभवलेले. डायरीतले प्रत्येक पान हे कुमारचा उद्याचा दिवस कसा आहे हे सांगत असतं, पण शेवट मात्र अधांतरीच असतो. सुदर्शन चक्रपाणीच्या भुतकाळात घडून गेलेल्या घटना आपल्या भविष्यकाळात घडू नयेत म्हणून कुमार काळजी घ्यायला सुरुवात करतो. तरीही मध्यंतरी त्याच्या आयुष्यात एक अशी घटना घडते की त्यामुळे त्याच्या पुढच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळते आणि ही कथा शेवटाकडे जायला लागते. कुमार महाजन भोवती फिरत राहणाऱ्या या कथेचा अतिशय अनपेक्षितरित्या होणारा शेवट वाचकाला धक्का देऊन जातो.

हातामध्ये डायऱ्यांच्या रुपात स्वतःचं भविष्य माहित असणारा कुमार महाजन भविष्यात होऊ घातलेल्या घटना टाळण्यात यशस्वी होतो की नाही हे आपल्याला कादंबरी वाचल्यावरच समजेल. वाचकाला कादंबरीमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवण्यात सुशिंनी प्रचंड यश मिळवलंय. रहस्यमय घटनांनी खचाखच भरलेली आणि वाचत असताना शेवट काय असेल या विचाराने सतत आपली उत्कंठा वाढवणारी आवर्जून वाचण्यासारखी  सुहास शिरवळकरांची ही कादंबरी "समांतर".



संदीप प्रकाश जाधव

No comments:

Post a Comment

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये