Monday, November 30, 2020

"संताजी"

 


लेखक : काका विधाते

प्रकाशक : प्रफुल्लता प्रकाशन


छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बादशाह औरंगजेबाशी मराठ्यांनी सुरू केलेला स्वातंत्र्यसंग्राम हे स्वराज्याच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे मोगलांकडून पकडले जाणे हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक काळा दिवस. संभाजी महाराजांना पकडून त्यांचा अतोनात छळ करून त्यांना मारल्यानंतर मराठे संपले, मराठयांचे स्वराज्य संपले अशा भ्रमात औरंगजेब राहू लागला. मराठयांचा राजा मारला गेला, रायगड पडला, येसूबाई आणि लहान शाहू महाराज मोगलांच्या हाती सापडले, अशा या कठीण काळात अनेक मोठ-मोठे मराठी सरदार मोगलांना जाऊन मिळाले त्यामुळे दख्खन जिंकून संपूर्ण हिंदुस्थानावर आपला अंमल प्रस्थापित करण्याचं आपलं स्वप्न पूर्ण झाल्याच्या आनंदात दिल्लीकडे परत जायची स्वप्ने बघणाऱ्या औरंजेबाला आणि त्याच्या विशाल सागर सेनेला मराठ्यांनी आपली जिद्द आणि पराक्रमाच्या जोरावर पुढची २७ वर्षें लढत ठेवलं. बादशाह औरंगजेबाला त्याच्या मनसुब्यांसोबतच महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकलं. कोणतंही नेतृत्व नसणाऱ्या मराठ्यांकडून झालेला हा अफाट पराक्रम एखाद्या चमत्कारापेक्षा नक्कीच कमी नाही. मराठ्यांच्या या रणसंग्रामाचा विचार करताना एक व्यक्ती अशी आहे जिचे कर्तृत्व डावलून आपण पुढे जाऊच शकत नाही आणि ती म्हणजे "सेनापती संताजी घोरपडे". संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर विस्कटलेलं स्वराज्य पुन्हा नव्या जिद्दीने आणि जोमाने उभं करण्याचा चंग बांधून, औरंगजेबाच्या एकाहून एक सरस सरदारांना, त्यांच्या विशाल सेनेला अंगावर घेऊन त्यांना पळता भुई थोडी करणारा रणधुरंधर म्हणजे "सेनापती संताजी घोरपडे". शिवरायांच्या गनिमी काव्याच्या तंत्राचा अचूक आणि प्रभावीपणे वापर करून अपराजित, बलाढ्य समजल्या जाणाऱ्या मोगल सत्तेला त्यांनी जमिनीवर आणलं. परंतु या स्वातंत्र्यसंग्रामात अत्यंत प्रतिकूल आणि कठीण परिस्थितीत स्वराज्य वाचवण्यासाठी त्यांना काय काय करावं लागलं? किती हाल सोसावे लागले? संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यात अडकून पडले, इतर राजकुटुंबावर लपून रहायची वेळ आली तेव्हा स्वामिनिष्ठ आणि स्वराज्यनिष्ठ मराठी वीरांची मानसिकता काय असेल? रयतेची काय अवस्था झाली असेल? नेतृत्वाचा जरब नसल्यामुळे वाढत जाणारी अंतर्गत दुही आणि त्यामुळे स्वराज्याचं नेमकं काय नुकसान झालं? इतक्या बलाढ्य मोगल साम्राज्याला टक्कर देण्याची ताकत, जिद्द मूठभर मराठ्यांमधे कोठून आली? या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला काका विधाते यांच्या "संताजी" या कादंबरीमधे मिळतील.

मराठ्यांच्या इतिहासात काही पराक्रमी, धाडसी, शूर वीरांची नावे सुवर्णाक्षरांनी नोंदवावी अशी आहेत आणि संताजी घोरपडे हे त्यातीलच एक नाव. म्हालोजी घोरपडे हे शिवरायांच्या स्वराज्यउभारणीच्या कार्यात सोबत असणारे एक मोठं नाव आणि त्यांच्याच ३ पुत्रांपैकी जेष्ठ पुत्र "संताजी". स्वराज्याच्या सैन्यात वडील मोठ्या हुद्द्यावर असूनही एका साध्या शिपायापासून संताजींनी आपला प्रवास सुरु केला. एकाहून एक सरस पराक्रम गाजवत शिपायापासून ते स्वराज्याच्या सेनापतीपर्यंतचा त्यांचा प्रवास कादंबरीत वाचत असताना आपल्याला अचंबित करून जातो. या शूर, रणधुरंधर सेनापतीचे चरित्र काका विधाते यांनी त्यांच्या "संताजी" या ८९२ पानांच्या कादंबरीतून आपल्यापुढे मांडलं आहे. संभाजी महाराजांना मुकर्रबखानाने संगमेश्वरात पकडले तेव्हा झालेल्या लढाईत संताजींचे वडील म्हालोजी कामी आले. शंभू राजांना तिथून सोडवण्याचा सर्वांनी आटोकाट प्रयत्न केला पण शेवटी आपण पूर्णपणे अडकलो आहोत याची जाणीव झाल्यानंतर संभाजी महाराजांनी संताजींना तिथून निघून जाण्याची आज्ञा केली आणि अखेरपर्यंत औरंगजेबाशी लढत राहून स्वराज्य राखण्याचा सल्ला त्यांना दिला. तिथून नाईलाजास्तव संताजी रायगडी आले पण आपण आपल्या राजाला वाचवू शकलो नाही ही सल शेवटपर्यंत त्यांच्या मनात राहिली. संभाजी राजे पकडले गेल्यानंतर त्यांच्या मनात बदल्याची ठिणगी उठली आणि औरंगजेबाने महाराजांना मारल्यानंतर त्याच ठिणगीने वणव्याचे रूप घेऊन अख्ख्या मोगलाईला होरपळून काढले. संताजींनी जेव्हा लाखो सैनिकांच्या छावणीत घुसून औरंगजेबालाच मारण्याचा धाडसी प्रयत्न केला तेव्हा त्या वणव्याचे चटके साक्षात आलमगीर औरंगजेबाला पण बसले. केवळ त्याचं नशीब बलवत्तर म्हणूनच तो वाचला. संगमेश्वर सोडताना महाराजांना मूकपणे दिलेला शब्द प्रमाण मानून संताजी शेवटच्या श्वासापर्यंत मोगलांशी लढत राहिले आणि शेवटी स्वकीयांच्याच राजकारणाचा बळी झाले. अंतर्गत दुही आणि राजकारण हे मराठ्यांच्या पाचवीलाच पुजलेले, त्यातून "संताजी" तरी कसे सुटणार. खेकड्याने चालण्याची काही लोकांची वृत्तीच शेवटी संताजींच्या अंतास कारण ठरली. परंतु कादंबरी वाचून झाल्यानंतर एक गोष्ट नक्कीच मान्य करावी लागेल ती म्हणजे भलेही मोगलांचा प्रत्यक्ष पराभव हा महाराणी ताराबाई, छत्रपती शाहू महाराज आणि पहिल्या बाजीरावांच्या कार्यकाळात झाला असला तरी औरंगजेबासहित मोगलांचे मोठ-मोठे सरदार आणि त्यांची बलाढ्य सेना यांचा मानसिक पराभव संताजींनी आधीच करून ठेवला होता.

काका विधाते यांनी बऱ्याच संशोधनातून आपल्याला माहीत नसलेलं संताजींचं आयुष्य या कादंबरीतून आपल्यासमोर आणलं आहे. संताजींचे बालपण, वैवाहिक आयुष्य, तरुणपणी सरसेनापती हंबीरराव मोहित्यांच्या तालमीत तयार होत असताना त्यांनी गाजवलेले मोठमोठे पराक्रम, संभाजी महाराजांसोबत त्यांनी लढलेल्या लढाया, स्वराज्यासाठी त्यांनी केलेला त्याग, स्वराज्य स्वतंत्र झालं पाहिजे यासाठीची त्यांची तळमळ - धडपड, मोठ-मोठ्या दौडा मारून गनिमी काव्याने त्यांनी केलेल्या असंख्य लढाया आणि त्यामुळे मोगलांमध्ये बसलेली त्यांची जबरदस्त दहशत, स्वकीय सरदार आणि कारभाऱ्यांसोबतच स्वतःच्या राजाचीसुद्धा साथ नसताना त्यांनी मोगलांविरुद्ध खेळलेले डावपेच, संताजींनी बादशाहकडे येऊन हवं ते आणि हवं तेवढं वतन घेऊन मोगली मनसबदार व्हावं म्हणून मोगल त्यांच्यासाठी पायघड्या अंथरून बसलेले असताना स्वकीयच त्यांच्या जीवावर उठले होते तरीही शंभू राजांना दिलेल्या वचनाखातर शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याशी एकनिष्ठ राहून अखेरपर्यंत बादशाही बुडवण्यासाठीच केलेले त्यांचे प्रयत्न, या सर्व प्रवासात मोजक्याच स्वामिनिष्ठ आणि स्वराज्यनिष्ठ लोकांची त्यांना मिळालेली साथ आणि शेवटी या स्वराज्याच्या वीर सेनापतीला डोंगरदाऱ्यांमधे लपत-छपत जगावं लागलेलं आयुष्य आणि तिथेच झालेला त्यांचा शेवट या सर्व गोष्टी आपल्याला या कादंबरीमधे अगदी विस्तृतपणे वाचायला मिळतील. सोबतच त्यावेळी दख्खनेत चालणारं मराठ्यांना अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही प्रकारचं राजकारण, त्याची पार्श्वभूमी या सर्वांचं तपशीलवार वर्णनसुद्धा आपल्याला या कादंबरीमध्ये वाचायला मिळेल.

स्वराज्याच्या या सिंहाचा स्वकीयांकडूनच धोक्याने झालेला शेवट जरी मनाला चटका लावून जात असला तरी स्वराज्यनिष्ठा काय असते हे मोगलाईसोबतच अख्ख्या जगाला त्यांनी दाखवून दिले. प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून वाचावी अशी काका विधाते यांची कादंबरी "संताजी".




संदीप प्रकाश जाधव




Sunday, November 22, 2020

"पांगिरा"

 


लेखक : विश्वास पाटील

प्रकाशक : राजहंस प्रकाशन


"पानिपत" या ऐतिहासिक कादंबरीमुळे घराघरात पोहचलेले लेखक विश्वास पाटील. कोणत्याही कादंबरीला नेहमीच लेखकाच्या कल्पनेची जोड असते आणि लेखकही इतिहासाला किंवा त्या विषयाला धक्का न लावता कादंबरीच्या माध्यमातून तो आपल्यापर्यंत पोहचवत असतात. पण विश्वास पाटलांची "पांगिरा" ही कादंबरी अशा काल्पनिकतेचा आधार घेऊन लिहिल्या गेलेल्या बऱ्याच कादंबऱ्यांना अपवाद आहे. त्याचं कारणही तसंच आहे, या कादंबरीचा विषयच असा आहे जो आपल्याला वास्तविकतेकडे घेऊन जातो. आपण नेहमी म्हणतो विकास झाला, प्रगती झाली पण म्हणजे नेमकं काय झालं? हे आजही कोणी ठामपणे नाही सांगू शकणार. अजूनही शेतकरी आहे त्याच जागी आहे, सामान्य कष्टकऱ्याचं आयुष्य आहे तिथेच राहिलं आहे. विकासाची गंगा शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या दारापर्यंत पोहचलीच नाही. शहरात राहून आपल्याला या गोष्टी कधी समजल्याच नाहीत आणि कधी समजणार पण नाहीत जोपर्यंत त्याचा अनुभव किंवा झळ आपल्याला बसत नाही. "पांगिरा" या कादंबरीच्या माध्यमातून शहरात राहणाऱ्या आपल्यासारख्या माणसांच्या डोळ्यांवरील विकासाच्या सुखाचं कातडं विश्वास पाटील अक्षरशः ओढून काढतात. ही कादंबरी म्हणजे पांगिरा आणि डोंगरवाडी या दोन गावांतील कहाणी आहे. पूर्ण गावच कादंबरीचा नायक आहे आणि याच नायकाभोवती फिरणारी हि कथा. भीषण दुष्काळ, वैराण जमीन आणि मने यांची व्यथा म्हणजे ही कादंबरी. ही केवळ एका माणसाची कथा किंवा व्यथा नाही. हे सामूहिक वास्तव आहे. म्हणूनच "पांगिरा" ही सामूहिक जाणिवांची कादंबरी आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरू नये.

"पांगिरा" हे मांगोला तालुक्यातील एक सधन गाव. आणि त्याचीच धाकटी बहीण म्हणून ओळखले जाणारे "डोंगरवाडी". "पांगिरा" गावच्या सिदुबाच्या जत्रेपासून झालेली या कादंबरीची सुरुवात. एकरी शंभर टन ऊस काढणारे या गावातील शेतकरी. अगदी परंपरागत शेती करणारे हे गाव विकासाच्या नावाखाली गावामध्ये वीज आल्यानंतर कुस बदलायला चालू करते. वीज आल्यामुळे विहिरींवर बसवल्या गेलेल्या मोटारींमधून भरमसाठ पाण्याचा उपसा रात्रंदिवस चालू होतो. घरोघरी केल्या जाणाऱ्या उसाच्या शेतीमुळे लोकांकडे येणारा पैसा, त्यांची वाढती श्रीमंती, रंगीत माडीची घरे, ट्रॅक्टर यामुळे मांगोला तालुक्यातील वेगळेपण जाणवणारे हे गाव. गावात झालेल्या बदलाचा आणि तिथे केल्या जाणाऱ्या ऊस शेतीचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या कृषिसंशोधक शर्मा याने पाण्याच्या वापराविषयी दिलेल्या गंभीर सल्ल्याकडे दुर्लक्ष करून वाटचाल करणाऱ्या पांगिऱ्याची एका तपानंतर झालेली अवस्था आणि त्याचे वास्तविक दर्शन म्हणजेच ही कादंबरी "पांगिरा". या वाटचालीत झालेल्या अनेक छोट्या-मोठ्या घडामोडी विश्वास पाटील यांनी अतिशय सुंदर आणि तितक्याच वास्तववादी पद्धतीने आपल्यासमोर मांडल्या आहेत. जिल्हा परिषदा, पंचायत समिती यांच्यामार्फत बऱ्याच सुधारणा गावाच्या वेशीवर धडकल्या. त्या सुधारणा लोकांपर्यंत पोहचवण्याच्या नावाखाली तयार झालेले, स्वतःची पोळी भाजून घेणारे राजकारणी गट आणि त्यांची आपापसांत होणारी जीवघेणी स्पर्धा यांचे अगदी विस्तृत वर्णन आपल्याला या कादंबरीत वाचायला मिळेल जे सर्व आजही बऱ्याच गावांमध्ये चालते. ऊस हे हमखास उत्पन्न मिळवून देणारे पीक गृहित धरून त्यासाठी केल्या जाणाऱ्या भरमसाठ पाणी वापराने गावातील पाणी पातळी हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते आणि गावकऱ्यांच्या डोळ्यावरील विकासाची झापड तसेच पांगिऱ्याचे पाणी कधीच अटणार नाही हा गावकऱ्यांचा फाजील आत्मविश्वास उडून जाईपर्यंत खूप उशीर होऊन जातो. फक्त एका तपापूर्वी एक सधन-समृद्ध असणारे हे "पांगिरा" गाव दुष्काळी गावांच्या यादीत सामील होते. लोकांची पाण्यासाठी वणवण सुरू होते, शेती हळूहळू ओस पडू लागतात आणि स्वतःला प्रतिष्ठित समजणाऱ्या लोकांवरसुद्धा रोजंदारीवर काम करायची वेळ येते. गावाच्या या १० वर्षांच्या प्रवासात गावाची झालेली वाताहत, गावाच्या गल्ली-गल्लीत चालणारे राजकारण, त्यामधे असणारे सत्ताधारी आणि विरोधक असे दोन गट, त्यांच्यातील एकमेकांवर केल्या जाणाऱ्या कुरघोडी, गावातील भोळ्या लोकांचा स्वतःच्या फायद्यासाठी राजकारणी लोकांनी केलेला वापर, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकमेकांचे पाय ओढण्यासाठी खेळल्या जाणाऱ्या खेळी, सरकारी योजना तळागाळापर्यंत न पोहचवता त्या योजनेतून स्वतःचं उखळ पांढरे करून घेणारी राजकारणी आणि ठेकेदार, फोडाफोडीचे राजकारण आणि विकासाची स्वप्ने यांतून घराघरात चालू झालेल्या भांडणातून एकत्र कुटुंब पद्धतीला गेलेले तडे आणि नाईलाजास्तव या सर्वांमध्ये होरपळत जाणारा गरीब, अडाणी गावकरी यांचं अतिशय प्रखर आणि वास्तववादी वर्णन विश्वास पाटील यांनी या कादंबरीमधे केलेलं आहे. संपूर्ण गावच कादंबरीचा नायक असल्या कारणाने कोणत्याही एका पात्राला जास्त महत्त्व दिलेलं नाहीये पण तरीही विश्वास पाटलांच्या वास्तववादी लिखाणामुळे आणि त्या त्या घटनांमधून त्यांनी केलेल्या वातावरण निर्मितीमुळे अगदी सगळीच पात्रे आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात.

 दुष्काळी गावांच्या यादीत समावेश झाल्यानंतर वेगळ्याच मार्गाने पांगिऱ्याचा प्रवास चालू होतो. पाण्यासाठी आपापसांत होणारी रोजची भांडणे आणि याच कारणामुळे गावकऱ्यांकडून आपल्याच सख्ख्या लोकांचे पाडले जाणारे मुडदे, पांगिरा आणि डोंगरवाडी या बहिण-भाऊ समजल्या जाणाऱ्या गावांमध्ये झालेली जीवघेणी मारामारी वाचकाला जाणीव करून देतात की पाणी हा खरंच किती ज्वलंत प्रश्न आहे. गावाच्या या सर्व प्रवासात भरडला जातो तो सामान्य शेतकरी, पाण्याअभावी होणारी त्याची परवड, कसंही करून शेतात आलेलं पीक जगवण्याची त्याची धडपड, शेतीशिवाय दुसरे कोणतेही उपजीविकेचे साधन त्याच्याकडे नसल्यामुळे होणारे त्याचे हाल, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आयुष्याशी चालू असणारा त्याचा लढा कादंबरीमधे वाचताना नकळत आपल्या डोळ्यांच्या कडा ओल्या होऊन जातात. हाच शेतकरी दुष्काळ आणि पाण्याची कमतरता यांमुळे ऊस सोडून मग कमी पाण्यावर उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून कांद्याच्या शेतीकडे वळतो. गावच्या जवळच तालुक्याच्या ठिकाणी असणारी कांद्याची मोठी बाजारपेठ आणि उसाला चांगला पर्याय म्हणून हळूहळू सर्वच शेतकरी आपापल्या शेतात कांद्याचे पीक घेतात. कांदा हे पीक म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःच्या जीवावर खेळलेला किती मोठा जुगार असतो हे ते पीक लागवड केल्यापासून ते बाजारपेठेत जाईपर्यंतच्या या कादंबरीतील प्रवासातून आपल्याला जाणवते. पण इथेही पांगिऱ्याच्या नशिबी दुःखच येते. कारण बाजारपेठेत पूर्ण तालुक्यातून आलेल्या विक्रमी कांद्याचा व्यापारी आपल्या सोयीप्रमाणे दर पाडून लिलाव चालू करतात आणि आधीच दुष्काळाने होरपळून गेलेला, पोटाला चिमटे काढून पिकवलेल्या कांद्याची अशी होणारी अवहेलना शांतपणे पाहणारा शेतकरी आपला संयम सोडतो. व्यापारी आणि शेतकऱ्यांमधे चालू झालेला दंगा पोलिसांच्या गोळीबारानेच थांबतो. चिखलाने - रक्ताने माखलेला कांदा, त्यावर निपचित पडलेले काही शेतकरी आणि शांत झालेली बाजारपेठ असा या कादंबरीचा शेवट. हा शेवट वाचून झाल्यानंतर काही वेळ आप सुन्न होऊन जातो आणि एक वाचक म्हणून विचार करायला भाग पडतो की नक्की चुकलं कुठं आणि कुणाचं. 

पाण्यासारख्या अतिशय ज्वलंत विषयाला हात घालत असताना विश्वास पाटील यांनी पुस्तकांमध्ये आणि सरकारी योजनांमध्ये "राजा" म्हणवणारा शेतकरी खऱ्या आयुष्यात कितीतरी संकटांना सामोरा जाऊन आपल्यासारख्या लाखो लोकांचे पोट कसं भरतो याची जाणीव आपल्याला त्यांच्या या "पांगिरा" कादंबरीतून करून दिली आहे. 

प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी वास्तववादी कादंबरी "पांगिरा".





संदीप प्रकाश जाधव

Monday, November 9, 2020

"बाजिंद"

 


लेखक : पै. गणेश मानुगडे

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस


गुप्तचर विभाग आणि गुप्तचर विभागाचं काम हे सामान्य लोकांसाठी नेहमीच एक कुतूहलाचा विषय असतो. आज २१ व्या शतकात प्रत्येक देशाचा स्वतंत्र असा गुप्तचर विभाग आहे आणि अहोरात्र त्यांचे काम अतिशय गुप्त पध्दतीने चालूच असते. आज इस्त्रायलची मोसाद किंवा अमेरिकेची CIA या गुप्तचरसंस्था अतिशय प्रगत आणि शक्तिशाली समजल्या जातात, त्यांच्या कारवाया किती गुप्त आणि धाडसी असतात याचे गोडवे नेहमीच गायले जातात. पण जगाच्या इतिहासात असंही एक हेरखाते होतं ज्याच्या कामाचे कौतुक आजही अगदी ३५० वर्षांनंतरही केलं जातं आणि ज्याची काम करण्याची पद्धत आजही एक अभ्यासाचा विषय आहे ते म्हणजे छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे हेरखाते. स्वराज्य उभारणीत जितका वाटा शिवरायांच्या आणि त्यांच्यासोबत मैदानात शत्रूसोबत लढणाऱ्या मावळ्यांच्या अफाट कर्तृत्वाचा होता तितकाच किंवा त्याहून थोडा जास्तच तो पडद्याआड राहून काम करणाऱ्या बहिर्जी नाईक आणि त्यांच्या गुप्तहेरखात्याचासुद्धा होता असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरू नये. गुप्तहेरखात्याचा प्रमुख जितका कुशल, बुद्धिमान तितकेच ते गुप्तहेरखाते जास्त प्रभावी.  शिवरायांच्या याच प्रभावी गुप्तहेरखात्याचे प्रमुख असणारे बहिर्जी नाईक. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणून त्यांचा सहभाग असायचा. त्यात अफजलखानाचा वध, पन्हाळ्यावरून सुटका, शाहिस्तेखानाची बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा किंवा सुरतेची लूट असो, अशा प्रत्येक प्रसंगात बहिर्जी नाईक महाराजांचे अर्धे काम पूर्ण करत असत. ह्या प्रत्येक घटनेत नाईकांनी शत्रूची इत्यंभूत माहिती महाराजांना दिली होती. महाराज बहिर्जींनी दिलेल्या सल्ल्यांचा विचार करून पाऊल टाकत असत यावरूनच आपण कल्पना करू शकतो बहिर्जी नाईकांबद्दल. कोणत्याही गुप्तहेर खात्याच्या कामाचे मूल्यमापन त्या कामाची गुप्तता आणि त्यानंतर मिळालेलं यश यावरून केलं जातं. आज आपण इतिहासात डोकावताना शिवरायांच्या सर्व मोहिमांत सहभागी असूनही बहिर्जी नाईक आणि त्यांच्या शिलेदारांमार्फत झालेल्या कारवायांबद्दल खूपच कमी माहिती किंवा पुरावे आपल्याला उपलब्ध दिसतील आणि त्यामध्येच त्यांच्या कार्याची महती किती मोठी आहे याचा अंदाज आपण लावू शकतो कारण कोणत्याही प्रकारची आधुनिक साधने नसताना ३००० पेक्षाही जास्त गुप्तहेरांचे जाळे भारतभर विणने आणि तेही कमालीची गुप्तता पाळून ही खरंच अचंबित करणारी गोष्ट आहे. स्वराज्यनिर्मितीपासून शिवरायांसोबत असणारे बहिर्जी नाईक पावलापावलावर गनिमांचा वावर असूनसुद्धा एकदा देखील शत्रूला सापडू शकले नाहीत, यातच बहिर्जी नाईक यांची बुद्धिमत्ता व चातुर्य दिसुन येते. बरीच आधुनिक साधने असूनही जिथे आज माहितीची देवाणघेवाण करण्यात आपल्याकडून चूक होऊ शकते तिथे आपण फक्त कल्पनाच केलेली बरी की बहिर्जी नाईक आणि त्यांच्या शिलेदारांनी त्याकाळी केलेलं कर्तृत्व किती अफाट आहे. शिवरायांच्या आणि संभाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्वाच्या कारवायांमधील बहिर्जी नाईकांचा धावता उल्लेख सोडला तर त्यांच्याबद्दल फारच कमी लिहिलं गेलेलं आहे, त्यांपैकीच एक पै. गणेश मानुगडे यांनी लिहिलेली कादंबरी "बाजिंद".

"बाजिंद" ही रायगडाच्या पायथ्याशी टकमक टोकाखालच्या खोल दरीत, घनदाट जंगलात घडलेली, कल्पनेला इतिहासाची जोड देऊन लिहिलेली एक ऐतिहासिक रहस्यकथा आहे. टकमक टोकावरून दिली जाणारी कडेलोटाची शिक्षा आणि त्यानंतर पायथ्याशी असणाऱ्या धनगरवाडीतील लोकांच्या आयुष्यावर होणारा त्याचा परिणाम यातून जन्म घेणारी ही रहस्यकथा. धनगरवाडीचा कारभारी सखाराम आपल्या तीन विश्वासू साथीदारांसोबत टकमक टोकावरून होणाऱ्या कडेलोटासंधर्भात एक फिर्याद घेऊन रायगडावर शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी जायला निघतो. घनदाट जंगलातील प्रवासात वाटेत त्यांना नाट्यमयरीत्या सामोरा आलेला खंडोजी हा बहिर्जी नाईकांचा चेला रायगडावर प्रवेश मिळवून देऊन शिवरायांची भेट घालून देण्याचं वचन देऊन त्यांना सोबत घेऊन जायला निघतो आणि इथून सुरुवात होते या रहस्यमय कथेची. त्यानंतर यशवंत माचीचा इतिहास, यशवंत माची स्वराज्यात सामील करून घेण्यासाठी बहिर्जी नाईकांनी उघडलेली एक धाडसी मोहीम, खंडोजी आणि सावित्रीची प्रेमकथा, शिर्के - कदंब यांचे वैर, बहिर्जी नाईकांनी शिर्क्यांवर केलेला हल्ला, चंद्रगडची कथा शिवाय बाजी आणि मुघल सरदार हुसेनखानची कथा, बाजीला अवगत असणारी जंगलातील पशू-पक्षांची भाषा, ती गूढ भाषा अवगत करण्याचं रहस्य यासोबत इतरही अनेक थरारक, धक्कादायक आणि नाट्यमय घटनांची वळणे घेत कादंबरी पुढे सरकत राहते. वाचकाला गुंतवून ठेऊन शेवटपर्यंत उत्कंठा ताणून धरणारी ही कादंबरी जशी बहिर्जी नाईकांच्या अफाट बुद्धीचातुर्याची साक्ष देते तशीच ती शिवरायांनी निर्माण केलेलं स्वराज्य हे सुराज्यही होतं हे पण आपल्याला दाखवून देते.

बहिर्जींनी त्यांच्या आयुष्यात केलेल्या हजारो कारवायांचा विचार करता या एका पुस्तकामधून बहिर्जी नाईक समजून घेणे निव्वळ अशक्य आहे पण तरीही गणेश मानुगडेंनी आपल्यासमोर मांडलेल्या या एका घटनेतून बहिर्जी नाईक आणि त्यांच्या गुप्तहेरांची त्या काळी म्हणजेच ३५० वर्षांपूर्वीची काम करण्याची पद्धत कशी होती याचा अंदाज आपण नक्कीच बांधू शकतो. युद्धाचा थरार, भावनांची गुंतागुंत, प्रखर राष्ट्रप्रेम या सर्वांतून साकार होणारी, बहिर्जी नाईकांच्या काम करण्याची पद्धत कशी होती हे जाणून घेण्यासाठी आवर्जून वाचण्यासारखी पै. गणेश मानुगडे यांची ही कादंबरी "बाजिंद".




संदीप प्रकाश जाधव


एखाद्या ऐतिहासिक ठिकाणाबद्दल वाचल्यानंतर किंवा जाणून घेतल्यानंतर लगेचच त्या ठिकाणाला भेट देण्याचा आलेला अनुभव हा नेहमीच शब्दांत न सांगता येण्यासारखा असतो. "बाजिंद" या कादंबरी वाचनानंतर आज (०८/११/२०२०) असाच योग आला स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या समाधी दर्शनाचा. समाधी दर्शनानंतर जितका अभिमान वाटला तितकंच वाईटही वाटलं या ठिकाणाकडे झालेलं दुर्लक्ष पाहून. स्वराज्य उभारणीत महाराजांसोबत अतिशय महत्त्वाची भुमिका पार पाडणारा हा वीर शिलेदार त्याचे कर्तव्य पार पाडत असताना स्वतःच्या बुद्धीचातुर्याने नेहमीच दुश्मन लोकांच्या नजरेआड रहायचा पण स्वराज्य उभारणीत असणाऱ्या त्यांच्या अमुल्य योगदानानंतर त्यांना आज आपल्याच लोकांनी असे नजरेआड ठेवणं नक्कीच भूषणावह नाही. 







Sunday, November 1, 2020

"चेटकीण"

 




लेखक : नारायण धारप

प्रकाशक : साकेत प्रकाशन


आपल्या लिखाणाने एक काळ गाजवलेले लेखक नारायण धारप. मराठी साहित्यात रहस्यकथा आणि कादंबऱ्यांचे दालन समृध्द करणारे लेखक म्हणून त्यांची अशी एक वेगळी ओळख आहे. भीतीचा अनुभव घ्यायचा असेल तर नारायण धारप यांच्या भयकथा वाचन हा त्यासाठी सर्वात योग्य पर्याय ठरेल. भीतीने अंगावर शहारे येणे म्हणजे काय याची जाणीव धारपांच्या भयकथा वाचताना होते. एखादा अतिशय हॉरर चित्रपट पाहताना जितकी भीती आपल्याला वाटू शकते तितकीच किंबहुना त्याच्यातून थोडी जास्तच भीती धारपांच्या कथांमधून जाणवते आणि याचं कारण म्हणजे त्यांची कथा सांगण्याची पद्धत ज्याद्वारे वाचक त्यामध्ये हरवून जाऊन स्वतःला त्या वातावरणासोबत, त्या घटनांसोबत रिलेट करत राहतो. नारायण धारप यांचे "अघटित" हे मी वाचलेलं पहिलं पुस्तक आणि तो वाचनाचा अनुभवच इतका वेगळा, रोमांचक होता की नकळत त्यांच्या इतरही काही पुस्तकांची यादी बनून गेली. त्यांपैकीच एक अतिशय रहस्यमय आणि गूढतेने खच्चून भरलेली, २०८ पानांची छोटीशीच पण अगदी जवळून भीतीचा अनुभव देणारी कादंबरी "चेटकीण".

कोणत्याही भयकथेसाठी आवश्यक असणारी सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे त्या कथेसाठीचे व्यासपीठ अर्थातच ते ठिकाण जिथे अशा कथा जन्म घेतात. आणि कोकण हे नेहमीच अशा कथांसाठी प्रसिद्ध आहे. तर इथेसुद्धा कथानकाची सुरुवात होते आजही रहस्य आणि गूढकथांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोकणातून. कोकणातील श्रीवर्धनजवळ, गजबजलेल्या वस्तीपासून दूर असणारी दांडेकरांची वाडी ही या कथेच्या केंद्रस्थानी आहे.  समुद्राला येणाऱ्या भरतीच्यावेळी जगापासून पूर्णपणे संपर्क तुटणारी अशी ही दांडेकरांची वाडी आणि तिथे असणारी दोन घरे. एक ज्यामध्ये गोविंदराव त्यांच्या आईच्या मृत्यूनंतरच्या विधीसाठी आपल्या कुटुंबासोबत रहायला येतात आणि एक जे वर्षांनुवर्षे बंद आहे. कथेची नायिका सोनाली अमेरिकेहून भारतात परतल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या वडिलोपार्जित वाडीमध्ये कुटुंबासोबत राहायला येते आणि इथून सुरू होतो या कादंबरीचा गूढ प्रवास. वाडीमध्ये पहिल्यांदाच आलेल्या सोनालीला त्या बंद घराबद्दल असणारे आकर्षण आणि तिच्या कुटुंबातील प्रत्येकाचे त्या घराबद्दल निघणारा कोणताही विषय टाळत राहणे सोनालीसोबतच एक वाचक म्हणून आपलीही उत्सुकता वाढवत राहते. आजीने लिहून ठेवलेला त्या बंद घराचा इतिहास आणि वर्षांनुवर्षे त्या वाडीवर आजीसोबत राहिलेल्या रखमाकडून मिळालेल्या माहितीतून हळूहळू त्या वास्तूबद्दल उलगडत जाणारी रहस्ये जी सोनालीसोबतच आपलंही कुतूहल वाढवत राहतात. त्या बंद वास्तूमध्ये असणारी एक गूढ शक्ती, तिचे वेगवेगळ्या रुपांमधे लोकांना दर्शन देऊन त्या वास्तूकडे आकर्षित करणे, त्या वास्तूत घडणाऱ्या मानवाच्या आकलनापलीकडच्या आणि आवाक्याबाहेरच्या घटना, या सर्वांचे चित्रण कादंबरीमध्ये वाचत असताना नकळत आपल्याही अंगावर शहारे येत राहतात. कथानकात पुढे काय होणार याची उत्सुकता कायम ठेवून अतिशय रहस्यमय आणि गूढ पद्धतीने पुढे सरकणारी या कादंबरीची कथा ज्यामध्ये भीतीच्या पाशात एखादी व्यक्ती कशी अडकते, तिला येणारे भयानक अनुभव आणि त्यातून भूत-पिशाच्च-क्रूर शक्ती या काल्पनिक जगाचे जाणवणारे अस्तित्व शिवाय दैवी शक्ती किंवा चमत्कारांनी त्यातून होणारी माणसाची सुटका याचे अतिशय रोमांचक वर्णन कादंबरीत आहे. शेवटी त्या गूढ आणि वाईट शक्तींपासून लोकांचे रक्षण करण्याची कला अनुवंशिकतेमुळे आजीकडून सोनालीकडे आल्याचे समजल्यानंतर सोनालीने घेतलेला एक धाडसी निर्णय कादंबरीचा शेवट करतो.

अतिशय चित्तथराक, रोमहर्षक, अकल्पित आणि गुढतेने खचाखच भरलेली, वाचकाला जागेवर खिळवून ठेवणारी, एखाद्या भयपटाला शोभणारी आवर्जून वाचण्यासारखी नारायण धारप यांची कादंबरी "चेटकीण".





संदीप प्रकाश जाधव

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये