लेखक : आनंद यादव
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
एखाद्याची आत्मकथा म्हणजे त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात आलेले वेगवेगळे अनुभव आणि त्यातून घडत गेलेलं त्याचं आयुष्य इतकी सरळ सोपी व्याख्या. बऱ्याच लोकांच्या प्रेरणादायी आत्मकथा मी आजपर्यंत वाचल्या, ज्या शक्यतो अतिशय खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी घडवलेलं त्यांचं आयुष्य आपल्यासमोर मांडत असतात. आनंद यादव यांची "झोंबी" वाचायला घेण्यापूर्वी हिसुद्धा अशाच पठडीतील एक आत्मकथा असावी असा ग्रह मनात ठेवून वाचायला सुरुवात केली पण पु. ल. देशपांडेंची सुरुवातीची प्रस्तावना वाचल्यानंतरच लक्षात आले की आपण काहीतरी वेगळं, अतिशय उत्कृष्ट असं वाचायला हातात घेतलं आहे. सुरुवातीलाच पु. ल. देशपांडे म्हणतात की आनंद यादव ह्यांना साष्टांग दंडवतच घालायला हवा, कारण ह्या कथनात इतक्या भयंकर परिस्थितीतलं बालपण दाखवलंय ज्याची की आपण कल्पनाही करु शकत नाही. अतिशय हट्टी आणि कामचुकार वडील, आपल्या अकरा मुलांचा जीवाच्या आकांताने सांभाळ करुन संसार सावरणारी आई आणि भीषण दारिद्र्य ह्याचं खूपच विदारक शब्दचित्र लेखकाने चितारलंय. आनंद यादव यांनी हे सगळं स्वत: भोगलं असल्यामुळे त्यातला निखार वाचकाच्या अंगावर येतो. झोंबीचा शब्दशः अर्थ म्हणजे लढाई! दोघांमध्ये झालेली लढाई म्हणजेच "झोंबी". आनंद यादव यांची ही आत्मकथा म्हणजे दारिद्र्याची विद्याप्राप्तीसाठी केलेली लढाई आहे. आनंद यादवांच्या आयुष्यातला शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष म्हणजे ही आत्मचरित्रात्मक कादंबरी "झोंबी".
आनंद यादव यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड पण ते ज्या समाजात रहायचे तिथे त्यांनी अशी आवड ठेवणं, स्वप्न बघणं म्हणजे जणू गुन्हाच. ज्या समाजात 'शाळा शिकणे' म्हणजे आपल्या कुळाला बट्टा लावणे असं मानलं जायचं त्या समाजात जन्माला येऊन आनंद यादव यांनी 'मॅट्रिक' पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं तेही घरी अठराविश्वे दारिद्र्य असताना. त्यांचा हा मॅट्रिकपर्यंतचा प्रवास म्हणजेच ही कादंबरी "झोंबी". आनंद यादव यांच्या या कादंबरीत त्यांनी फक्त शिकण्यासाठी भोगलेल्या व्यथा, हालच आहेत असे नाही तर अज्ञानी, ग्रामीण कुटुंबाचे, भीषण दारिद्र्याचे जवळून होणारे दर्शनसुद्धा आहे. लेखकाचे गाव, गावातील रितीरिवाज, गावाच्या आसपासचा निसर्ग, बापाचा आडमुठेपणा, आईचा होणारा अपरिमित छळ, लागोपाठ होणारी मुले, मुलांचे अपमृत्यू, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील प्रसंग, मास्तरांचे स्वभाव, तर्हा,गावातले उरूस, जत्रा, महात्मा गांधी यांच्या वधानंतर झालेली स्थिती या आणि अशा अनेक गोष्टींचे वास्तव चित्रण आहे. आपण विचारसुद्धा करू शकणार नाही अशा अतिशय हालाखीच्या परिस्थितीतदेखील आनंद यादव यांच्या मनातली शिक्षणाची ओढ काही कमी होत नाही. घरची परिस्थिती आणि वडिलांचा शाळेसाठी असणारा प्रखर विरोध यामुळे अर्धवट सोडावी लागणारी शाळा ते ज्या जिद्दीने मॅट्रिक पर्यंत पूर्ण करतात त्याला तोड नाही. त्या जिद्दीला आपल्या मेहनतीची जोड देऊन अगदी जीव जायची वेळ येईपर्यंत त्यांनी उपाशी पोटी वेगवेगळी कामे करून, वेळप्रसंगी चोरी करून आणि त्या आलेल्या पैशांत शाळेची पुस्तके विकत घेऊन, फी भरून, सोबतच आपल्या बरोबरीच्या मुलाची शिकवणी घेऊन, वेगवेगळ्या ठिकाणच्या शाळांमध्ये फिरून नकलांचे कार्यक्रम करून ते मॅट्रिक पर्यंत शिकतात. मुलगा शाळेत गेला तर शेतातली सगळी कामं आपल्यावर पडणार शिवाय शाळेसाठी पैसे नाहीत त्यामुळे वडिलांचा नेहमीच असणारा विरोध आणि त्या विरोधापायीच त्यांनी वडीलांचा खाल्लेला बेदम मार हे सर्व कादंबरीत वाचत असताना नकळत वाचकालाही लेखकाच्या वडिलांचा राग येऊ लागतो. कादंबरीमध्ये प्रत्येक पानावर वाचकाला अस्वस्थ करणारे प्रसंग आहेत पण मला सर्वात जास्त अस्वस्थ करून गेला तो आनंद यादव यांच्या मोठ्या बहिणीचा, अनसाचा तिच्या बाळंतपणात झालेला मृत्यू.
लेखकाच्या घरात अकरा भावंडं, तीही अगदी एका पाठोपाठ एक झालेली त्यामुळे १-२ सोडले तर बाकी सगळी रोगट आणि अशक्त. घरात दोन्ही वेळेच्या जेवणाची भ्रांत त्यात भावंडांमध्ये मोठे असल्यामुळे आणि वडिलांच्या कामचुकारपणामुळे शेतातील सर्व कामे लेखकालाच करावी लागत. शेतकाम करुन शाळेत गेल्यामुळे कायम मळलेले कपडे, आंघोळीला, कपडे धुवायला साबण सुद्धा नाही. वह्या , पुस्तकं घ्यायला पण पैसे नाहीत. फी भरायला पैसे नाहीत. शेतातल्या कामामुळे नेहमीच शाळेत जायला होणारा उशीर आणि या सर्वामुळे शिक्षणाचे होणारे नुकसान! तरीही अगदी हट्टाने त्यांनी एक-एक वर्ष शिक्षण घेतलं. काही वेळेला शिक्षकांनी त्यांची परिस्थिती समजून त्यांना मदत केली तर काही वेळेला त्यांना मुद्दाम त्रासही दिला. मुळातच हुशार असल्यामुळे शाळा बुडाली तरी पाठांतराचे वेगवेगळे प्रकार त्यांनी शोधून काढले. कामाच्या रगाड्यातही त्यांनी कविता, शब्दार्थ, प्रश्नोत्तरं चालूच ठेवले. इतकं सगळं सांभाळूनही ते शाळेत नेहमीच पहिला, दुसरा क्रमांक मिळवत राहिले. त्यांच्या शिक्षणाच्या वेडाला त्यांच्या वडीलांनी कधीच दाद दिली नाही पण शेवटी असह्य होऊन जेव्हा लेखक घर सोडून जातात तेव्हा त्यांच्या वडिलांनाही हार मानावीच लागली. मोठ्या कष्टाने वडिलांनी त्यांना एस.एस.सी. ची परिक्षा देण्याची परवानगी दिली आणि आनंद यादव यांनी त्या संधीचं सोनं केलं. "झोंबी" या कादंबरीमध्ये आनंद यादव यांनी एस.एस.सी. पर्यंतच केलेल्या संघर्षाचे चित्रण आहे. त्यामुळे कादंबरी वाचून झाल्यानंतर आनंद यादव यांचे पुढे काय झाले असेल? एस. एस. सी. नंतर त्यांनी पुढे काय केले असेल? एस. एस. सी. पास झाल्यानंतर त्यांच्या वडिलांची प्रतिक्रिया काय असेल? त्यांच्या भावंडांचे पुढे काय झाले असेल? असे एक ना अनेक प्रश्न वाचकांना पडतात आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला त्यांच्या यापुढील नांगरणी, घरभिंती आणि काचवेल या पुस्तकांमध्ये मिळतील.
आनंद यादव यांची ही आत्मकथा वाचकाला प्रचंड अस्वस्थ तर करतेच पण शिक्षणाच्या बाबतीत आपण किती नशिबवान आहोत हे जाणून घ्यायचं असेल तर प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी आहे.
No comments:
Post a Comment