Monday, December 28, 2020

"लुचाई"

 


लेखक : नारायण धारप

प्रकाशक : साकेत प्रकाशन


नारायण धारप यांच्याबद्दल फार आधी कुठेतर वाचलं होतं की " नारायण धारप हे एक असं रसायन आहे की ज्यांचं एक पुस्तक वाचलं तर इतरही पुस्तके वाचल्याशिवाय चैन पडत नाही, त्यांनी लिहिलेल्या भयकथा वाचनाचं व्यसनच लागून जाते." मीही सध्या अशाच काहीशा अनुभवातून जात आहे असंच म्हणावं लागेल कारण त्यांच्या "अघटित" आणि "चेटकीण" या दोन पुस्तकांनंतर "लुचाई" हे तिसरे पुस्तक  वाचून हातावेगळं केलं आणि लगेचच त्यांचं आणखी एखादं संग्रहित पुस्तक वाचण्याचा विचार मनात घोळूही लागला. आज बऱ्याच लेखकांचे अतिशय उत्कृष्ट असे गूढकथा संग्रह आणि कादंबऱ्या वाचायला उपलब्ध आहेत आणि मी त्यातील काही वाचले देखील आहेत पण ६० च्या दशकात लिहिल्या गेलेल्या नारायण धारप यांच्या लेखनाला आजही तोड नाही. माझ्यासारख्या आजच्या पिढीला जरी नारायण धारप हे नाव नवीन असले तरी आपल्या भयकथा - कादंबऱ्यांनी त्यांनी मराठी साहित्यविश्वाचा एक काळ गाजवला होता. नारायण धारप यांच्या प्रचंड कल्पनाशक्तीचा अंदाज त्यांचं पुस्तक वाचायला घेतलं की पाना-पानावर येत राहतो. त्यांच्या कल्पना विलक्षण असण्यासोबतच प्रचंड सुसंगत आणि शात्रीय पायावर आधारित वाटतात. कथेतील शब्द आणि वर्णन यांची अतिशयोक्ती कधीच वाटत नाही. शब्द साधेच पण जबरदस्त परिणामकारक. नारायण धारप यांची आजपर्यंत ५० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आणि त्यांपैकीच एक प्रचंड गाजलेली अतिशय गूढ, रहस्यमय, वाचत असताना अंगावर शहारे आणणारी, २७० पानांमध्ये भीतीचा अगदी जवळून अनुभव देणारी कादंबरी "लुचाई".

दुर्गापूर या गावात असणारा नाईकांचा वाडा आणि गोपाळ शंकर जावडेकर म्हणजेच जयदेव व्यास यांच्या भोवती फिरणारी या कादंबरीची कथा. भर उन्हात एक १२-१३ वर्षांचा मुलगा एका तरुणासोबत ओसाड पडलेल्या गावातील प्रत्येक घरात जाऊन ते घर पेटवून देऊन बाहेर पडत आहे आणि हे सर्व करत असताना कोणत्यातरी जबर अशा भीतीचा पगडासुद्धा त्यांच्या मनावर आहे, अशी एखाद्या भयपटाला शोभण्यासारखी या कादंबरीची सुरुवात. त्या पेटवलेल्या घरांचे वर्णन वाचता वाचता इथूनच एक कुतूहल मिश्रित भीती वाचकाला घेरायला चालू करते जी पुस्तक वाचून पूर्ण झाल्यानंतरसुद्धा बराच वेळ अपल्यासोबत राहते. त्यानंतर मग फ्लॅशबॅकमधे जाऊन जयदेवचा दुर्गापूरमधला भूतकाळ आणि वर्तमानकाळातील घटना यांना जोडत चालू होतो या कादंबरीचा रहस्यमय, भीतीदायक असा प्रवास. १९४८ च्या जाळपोळीनंतर आपल्या आजोबांसोबत दुर्गापूर सोडून मुंबईला गेलेला जयदेव जवळपास २२ वर्षांनी पुन्हा दुर्गापूरमध्ये येतो आणि त्याचदरम्यान काही गूढ घटनांची मालिका गावात चालू होते. गावातील एकामागून एक लोकांचे रहस्यमयरीत्या आजारी पडणे आणि शेवटी एखाद्या रस शोषून घेतल्यानंतर दिसणाऱ्या फळासारखे शरीर होऊन मरून जाणे अशी रोज एखादी तरी घटना जयदेवच्या आसपास घडायला चालू होते. दिवसा सूर्यप्रकाशात हसत खेळत राहणारे गाव दररोज अंधार पडल्यानंतर हळूहळू एका वेगळ्या जगाच्या स्वाधीन होण्यास सुरुवात होते. रोज सायंकाळनंतर कोण ना कोण त्या "लुचाई" चा शिकार व्हायला लागतो. "लुचाई" म्हणजे लुचने, गळ्यामध्ये लुचून रक्त शोषून घेणारी म्हणजेच "लुचाई". अतिशय अप्रतिम आणि खिळवून ठेवणाऱ्या कथेतून नारायण धारप यांनी लुचाई एकदम जिवंत आपल्या डोळ्यासमोर आणली आहे जे वाचताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. भितीने रक्त गोठून टाकणारा सैतानी नंगानाचच त्यांनी या कादंबरीतून आपल्यासमोर उभा केला आहे. नाईकांचा गूढ वाडा, शिंदेंचा पडका वाडा, गावातील बाग, स्मशानभूमी, गावाची वेस, एकनाथचं घर अशा एकामागून एक ठिकाणी प्रकट होणारी "लुचाई" आपल्या समोर पण येते की काय अशी नकळत एक भीती वाचकाला वाटावी इतकी भयानक पार्श्वभूमी धारप यांनी कथेला दिलेली आहे. जयदेव गावात आल्यानंतर सुरुवातीला १-२ लोकांना लुचणारी ती "लुचाई" हळूहळू संपूर्ण गावाला लुचते आणि मागे राहतात फक्त जयदेव, त्याचा मित्र डॉ. रामदास आणि १३ वर्षांचा गावातीलच एक मुलगा एकनाथ. या तिघांनी त्या अतिशय गूढ, रहस्यमय, भयानक घटनांचा लावलेला छडा आणि त्या वाईट शक्तीचा केलेला शेवट यांची थरारक कथा म्हणजेच ही कादंबरी "लुचाई". 

भयकथांची आवड असणाऱ्यांना नारायण धारप हे नाव आणि त्यांचे लेखन वेगळ्याने सांगायची आवश्यकता नक्कीच नाही पण इतरांनीसुद्धा एक वेगळं वाचन, एक वेगळा अनुभव म्हणून आवर्जून वाचावे अशा धारपांच्या पुस्तकांपैकी एक पुस्तक "लुचाई".





संदीप प्रकाश जाधव



No comments:

Post a Comment

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये सह्याद्रीचा श्वास आणि पेशवाईचा रक्तरंजित इतिहास: ना...