Tuesday, December 22, 2020

"साक्षी"

 



लेखक : डॉ. एस. एल. भैरप्पा

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

मराठी अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी


एस. एल. भैरप्पा, एक अतिशय लोकप्रिय कन्नड कादंबरीकार. सौ. उमा कुलकर्णी यांनी अनुवादित केलेल्या त्यांच्या काही मराठी कादंबऱ्या अंचू, पर्व, अवेषण, आवरण, सार्थ, वंशवृक्ष या आणि बऱ्याच ज्या कन्नड इतक्याच मराठीमध्येसुद्धा खूप प्रसिद्धीस आल्या. त्यांच्या अशाच साहित्यांपैकी एक गाजलेलं आणि अतिशय उत्कृष्ट साहित्य म्हणजे त्यांची कादंबरी "साक्षी". "साक्षी" चा अर्थ खरं बोलणं, परंतु आज समाजात वावरत असताना एखाद्या साक्षीदाराकडून बोललं जाणारं खरं हे ते ज्या व्यक्तीसाठी बोललं जातं त्या व्यक्तीला त्याचा फायदा व्हावा अशाच प्रकारचं असतं. अगदी देवाशपथ खरं बोलेन असं म्हणून दिल्या गेलेल्या "साक्षी" या बऱ्याच वेळा खोट्याच असतात. परंतु तत्वज्ञानानुसार बोलायचं झालं तर "साक्षी" म्हणजे आपला अंतरात्मा आहे. ज्याचा संबंध मानवाच्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाशी आहे तसेच शरीरात असणाऱ्या आपल्या मन, बुद्धी आणि आत्म्याशी आहे. जेव्हा "साक्षी" च्या त्या स्तरापर्यंत एखादी व्यक्ती पोहोचते तेव्हा ती खोटं बोलूच शकत नाही. परंतु प्रत्येक व्यक्ती त्या स्तरापर्यंत पोहचू शकत नसल्याने बऱ्याच वेळा त्यांचा आपल्या अंतरात्म्याशी संघर्ष चालू होतो. हाच मानवी मनाचा संघर्ष आणि भाव-भावना डोळ्यासमोर ठेऊन लिहिली गेलेली तत्वज्ञानावर आधारित अशी ही कादंबरी "साक्षी".

परमेश्वरय्या या अतिशय सज्जन, गांधीवादी, कधीही खोटं न बोलणारा अशी समाजात ओळख असणाऱ्या व्यक्तीभोवती फिरणारी ही कादंबरी. खुनाच्या आरोपाखाली ज्याच्यावर खटला चालू असतो असा त्यांचा जावई मंजय्या त्यांना खोटा साक्षीदार म्हणून न्यायालयात येऊन त्याच्या बाजूने साक्ष देण्यासाठी विनंती करतो. परमेश्वरय्यांची समाजात असणारी प्रतिमा, त्यांच्या शब्दाला असणारा मान आपल्याला न्यायालयात निर्दोष सिद्ध करण्यास पुरेसा आहे हे ओळखून मंजय्या त्यांना भावनिक पातळीवर कात्रीत पकडतो. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील चढउतार, आईविना वाढलेल्या मुलीवर असणारे प्रेम आणि आपली तत्वनिष्ठा, समाजात असणारी आपली प्रतिमा या सर्वांमुळे द्विधा मनःस्थितीत असणारे परमेश्वरय्या अखेर न्यायालयात खोटी साक्ष देण्यासाठी तयार होतात. न्यायालयात उभे राहून देवाच्या साक्षीने खरे बोलायचे वचन देऊन ते खोटे बोलतात आणि त्यांच्या त्या एका "साक्षी" ने मंजय्याची खुनाच्या आरोपातून सुटका होते. परंतु आयुष्यभर तत्वनिष्ठ राहिलेले परमेश्वरय्या या घटनेनंतर मनातून खचून जातात, आपण दिलेल्या खोट्या साक्षीसाठी स्वतःला दोषी माननारे परमेश्वरय्या पश्चात्तापातून आत्महत्या करतात आणि यमसदनी पोहोचतात. यमसदनात चालू झालेल्या त्यांच्या निवाड्यापासून वेगळ्या वळणाने कादंबरीचा प्रवास चालू होतो जो बघता बघता वाचकाला घेरून टाकतो. यमसदनात यम आणि चित्रगुप्तापुढे उलगडत जाणारी परमेश्वरय्यांची कहाणी आपल्याला हेच सांगते की मनुष्याने आयुष्यात कितीही साक्षीभावाने राहण्याचा प्रयत्न केला तरीही काही प्रश्नांकडे इतक्या अलिप्तपणे पाहणं त्याला जमतंच असं नाही. धर्म, अर्थ आणि काम या तीन मार्गानी मोक्षापर्यंत नक्कीच जाता येईल परंतु यांपैकी एकाचाही जरी अतिरेक झाला तर व्यक्तिगत आयुष्यासोबतच कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्यही ढवळून जाते हेच आपल्याला परमेश्वरय्यांची कथा वाचत असताना जाणवत राहते.

आपण आत्महत्या करण्याचा घेतलेला निर्णय चूक की बरोबर हे जाणून घेण्यासाठी पुढे यमधर्माच्या परवानगीने परमेश्वरय्यांना सूक्ष्मदेहाने पुन्हा भूतलावर पाठवण्यात येते आणि त्यांचा भोवताल "साक्षीभावाने" पाहण्यास सांगितलं जातं. पृथ्वीवर परत येऊन सत्याचा शोध घेत, जीवनाचं वास्तव पाहता पाहता शेवटी परमेश्वरय्याला पडणारा प्रश्न, "असत्याचं मूळ कोणतं? त्याला अंतच नाही का?" हा नकळत प्रत्येक मानवी मनात चाललेल्या संघर्षाचं प्रतिनिधित्व करतो. मानवी भाव-भावनांकडे अलिप्तपणे पाहिलं की आपल्या जाणिवांना खरे रुप मिळू शकते हे कादंबरी वाचत असताना जाणवत राहते. मानवी भाव-भावनांचा निरंतर संघर्ष दाखवणारी, यमलोक-यमधर्म-चित्रगुप्त यांच्यासमोर निवाड्यासाठी उभी राहिलेली ही कथा जितकी परमेश्वरय्या, नागप्पा आणि मंजय्याची आहे तितकीच ती या तिघांच्या सहवासात ग्रासलेल्या सावित्री, सत्यप्पा आणि रामकृष्ण यांचीही आहे. शेवटी नकळत ती वाचकाचीही होऊन जाते.

एस. एल. भैरप्पा यांच्या "साक्षी" ची कथा जरी चाकोरीबाहेरची असली तरी विषय नक्कीच वास्तवाकडे घेऊन जाणारा आहे. मानवी भाव-भावना आणि त्यांच्या निरंतर संघर्षाची जाणीव करून देणारी, आवर्जून वाचण्यासारखी कादंबरी.





संदीप प्रकाश जाधव

No comments:

Post a Comment

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये