Monday, February 8, 2021

"आवरण"

 



लेखक : डॉ. एस. एल. भैरप्पा

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

मराठी अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी


एस. एल. भैरप्पा यांच्या "साक्षी" या अतिशय सुंदर कादंबरीनंतर माझ्या वाचनात आलेली "आवरण" ही त्यांची दुसरी कादंबरी. त्यांच्या लिखाणाचं वेगळेपण "साक्षी" या कादंबरी वाचनावेळीच जाणवलं होतं आणि त्याचीच पुन्हा एकदा प्रचिती आली "आवरण" ही त्यांची ऐतिहासिक कादंबरी वाचत असताना. भैरप्पांच्या पुस्तकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं पुस्तक मानसिक पातळीवर वाचून संपत नाही असं वाटतं कारण पुस्तक वाचून झाल्यानंतर त्याचा विचार बराच वेळ आपल्या डोक्यात घोळतच राहतो. भारतासारख्या अतिशय प्राचीन सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा असणाऱ्या देशावर शेकडो वर्षांपूर्वी बऱ्याच परकीय मुस्लिम राजांनी आक्रमणे केली, सत्ता काबीज करून राज्य केलं. त्यांपैकी क्वचितच एखादा अपवाद वगळता सर्वच मुस्लिम राजांनी भारतातील हिंदूंवर इस्लाम लादून त्यांचे जबरदस्तीने इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न केला. तरीही वेगवेगळ्या मुस्लिम बादशहांनी शेकडो वर्षें प्रयत्न करूनही हजारो वर्षांचा वारसा असणारी हिंदू संस्कृती, परंपरा, हिंदू धर्म टिकून राहिले. हिंदू धर्मातील लोकांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी सर्वच मुस्लिम राजांनी एकच पद्धत वापरली आणि ती म्हणजे हिंदूंची प्रार्थनास्थळे नष्ट करणे, मंदिरे उध्वस्त करणे. यातूनच पुढे औरंजेबाने कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या काशी विश्वनाथाचे मंदीर जमीनदोस्त करून त्याजागी त्याच मंदिराचे खांब वापरून "ग्याणवापी मस्जिद" उभारली. यातून दुखावला गेलेला हिंदू हळूहळू एकवटू लागला आणि शेवटी इस्लामी सत्ता उलथवून टाकली. हे सत्तांतर होत असताना आणि झाल्यानंतरदेखील इतिहासात असं एकही उदाहरण नाही सापडणार जिथे हिंदू राजाने मुस्लिम लोकांचे जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केलंय किंवा त्यांची प्रार्थनास्थळे नष्ट केलीत. एस. एल. भैरप्पांनी याच मुस्लिम आक्रमणाला आणि काशी विश्वनाथ मंदिराच्या विध्वंसाला केंद्रस्थानी ठेवून, बरेच ऐतिहासिक संदर्भ देऊन अगदी तटस्थपणे लिहिलेली ही ऐतिहासिक कादंबरी "आवरण". काही सेक्युलर लोकांना हे वाटणं साहजिक आहे की भैरप्पांनी या कादंबरीतून मांडलेले ऐतिहासिक मुद्दे, ऐतिहासिक घटना आज वर्तमानकाळात वावरताना भारतातील हिंदू-मुस्लिम सलोख्याला घातक ठरू शकतात पण त्यांनी इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मागे इतिहासात कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे लोक जबाबदार नाहीत हे जरी खरं असलं, तरी "आपण त्यांचे वारसदार" आहोत अशा भावनेत राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या पुर्वजांनी केलेल्या कर्माची जबाबदारीसुद्धा स्वीकारली पाहिजे हेही तितकेच खरे आहे. इतिहासाकडून मिळवण्याइतकंच, त्याच्याकडून सोडवून घेणं हेसुद्धा परिपक्वतेचं द्योतक आहे. प्रत्येक धर्म, जाती आणि व्यक्तीला लागू पडणारी अशी ही गोष्ट भैरप्पांनी त्यांच्या या कादंबरी "आवरण" मधून लोकांपुढे आणली आहे. "आवरणचे" आणखी एक वेगळेपण म्हणजे या कादंबरी मधेच जन्म घेणारी आणखी एक कादंबरी.

"आवरण" ची नायिका आहे पूर्वाश्रमीची लक्ष्मी, धर्मपरिवर्तन करून मुस्लिम झालेली रझिया. १९९२ ला बाबरी मशिद पाडण्यात आल्यानंतर समाजात धार्मिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी सरकार प्रयत्न करत असते आणि याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून प्राचीन वास्तू-शिल्पांवर आधारित माहितीपट बनवण्याचे काम आमिर आणि रझिया कुरेशी यांच्यावर सोपवण्यात येते. माहितीपटाच्या प्राथमिक तयारीसाठी जेव्हा ते दोघेही विजयनगर (हंपी) येथे येतात तेव्हा तेथील उद्ध्वस्त मंदिरे पाहून रझिया म्हणजेच लक्ष्मी अंतर्मुख होऊन जाते आणि इथूनच फ्लॅशबॅक मधे सुरुवात होते या कादंबरीची. वर्तमानासोबतच इतिहासामध्ये डोकावत चालू झालेला या कादंबरीचा प्रवास वाचकाला अक्षरशः घेरून टाकतो, त्या फ्लॅशबॅक मधील प्रवासात वाचक कधी ओढला जातो हे त्याला लक्ष्यात येईपर्यंत एक विचारचक्र वाचकाच्या डोक्यात चालू होऊन जाते आणि प्रस्तावानेपासूनच चालू झालेले हे विचारचक्र पुस्तक वाचून पूर्ण झाल्यानंतर सुद्धा बराच वेळ तसेच राहते. पूर्वाश्रमीची हिंदू असणारी रझिया, आमीरच्या प्रेमात पडल्यानंतर घरातून असणारा वडिलांचा विरोध झुगारून, पुरोगामी विचारांच्या प्राध्यापक शास्त्री यांच्या प्रोत्साहनामुळे धर्मांतर करून मुस्लिम बनते आणि आमीरसोबत लग्न करते. आमीरच्या आधुनिक विचारांमुळे  आपले धर्मस्वातंत्र्य अबाधित राहिल हा तिचा विश्वास लग्नानंतर काहीच दिवसात फोल ठरतो. मुस्लिम धर्मातील जाचक चालिरिती आणि रुढी, खास करून स्त्रियांची केली जाणारी मुस्कटदाबी आणि आमीरने दिलेली तलाकची धमकी यामुळे ती हादरून जाते. अशा वातावरणात विजयनगरमधील हिंदू मंदिरांचा विध्वंस बघून दुखावलेली लक्ष्मी आमीरसोबत माहितीपट बनवण्यास नकार देते. याचदरम्यान गावाकडे एकटेच राहणाऱ्या लक्ष्मीच्या गांधीवादी विचारांच्या वडिलांचा मृत्यू होतो आणि लक्ष्मी तब्बल 28 वर्षांनंतर आपल्या गावी येते. इथून खऱ्या अर्थाने कादंबरीला कलाटणी मिळते आणि कादंबरी वेग पकडते. एका वेगळ्याच मार्गाने, लक्ष्मीच्या मनात सुरू झालेल्या वैचारिक द्वंद्वाने कादंबरीचा प्रवास सुरु होतो. लक्ष्मीने मुस्लिम धर्मात जाऊन विवाह केल्यानंतर तिच्या वडिलांनी म्हणजेच आप्पांनी मुस्लिम धर्म, मुस्लिम चालीरीती, त्यांची भारतावर झालेली आक्रमणे, भारतात आणि भारताबाहेर केलेला विध्वंस यांचा अभ्यास सुरू केलेला असतो. यावर आधारित एक गंभीर पुस्तक लिहायचादेखील त्यांचा विचार असतो, पण त्यांच्या अकस्मात झालेल्या मृत्यूने ते काम अपूर्ण राहून जाते. आपल्या वडिलांनी, अप्पांनी जमवलेली ग्रंथसंपदा आणि त्यांचा अभ्यास करून त्यांनी काढून ठेवलेली टिपणे पाहून लक्ष्मी आश्चर्यचकित होते. वडिलांनी जमविलेल्या पुस्तकांचा अभ्यास करून आणि त्यांनी काढलेल्या टिपणांच्या सहाय्याने वडिलांचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्याचे लक्ष्मी ठरवते. इथे जन्म होतो या कादंबरीतील कादंबरीचा.

लक्ष्मीने लिहायला घेतलेल्या या कादंबरीचा नायक आहे एक किशोरवयीन रजपूत राजपुत्र. देवगढच्या युद्धात झालेल्या पराभवानंतर गुलाम बनून राहत असताना त्याला खोजा बनवून बादशहाच्या जनानखान्यात ठेवलं जातं आणि या कादंबरीच्या प्रवासात तो हळूहळू इस्लाम धर्माच्या प्रभावाखाली जायला लागतो. इस्लाम धर्मात घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी, इस्लाम राजांची आक्रमणे, त्यांनी केलेले अत्याचार, हिंदूंसाठी असणारे त्यांचे जाचक कायदे या आणि अशा बऱ्याच गोष्टी खोजा झालेल्या राजपुत्राच्या माध्यमातून लक्ष्मी तिच्या या कादंबरीमधे उलगडत जाते. अत्याचारी मुस्लिम राजवटीत खोजा म्हणून, मुस्लिम चालीरीतींचे पालन करत बरीच वर्षें राहिल्यानंतर युद्धात आपण घेतलेल्या शरणागतीचा पश्चात्ताप करणारा राजपुत्र इतका ताकतीने कादंबरीमध्ये मांडलाय की नकळतपणे वाचकाचे डोळे त्याच्यासाठी पाणावतात. मुस्लिम झाल्यानंतर या राजपुत्राच्या वाट्याला वाट्याला आलेलं अत्याचारी आयुष्य, एका उमद्या राजपुत्राला जबरदस्तीने खोजा बनवण्याची घटना, विश्वनाथाचे मंदिर स्वतःच्या डोळ्यादेखत उद्‌ध्वस्त होताना झालेली त्या राजपुत्राची अवस्था या सर्व गोष्टी लक्ष्मीच्या कादंबरीमधून वाचत असताना अंगावर शहारे येतात. त्यानंतर त्या राजपुत्राचा गंगेच्या किनारी भेटलेल्या साधूशी झालेला संवाद आणि त्यातून त्याच्या मनाला आलेली उभारी हे सारं प्रत्यक्ष कादंबरीत वाचतानाचा अनुभव जितका अप्रतिम तितकाच तो वाचकाला अंतर्मुख व्हायला लावणारा असा. त्यानंतर खोजा झालेला राजपुत्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने स्वातंत्र्याचा बिगुल वाजविणाऱ्या छत्रसालाकडे जायला निघतो आणि रझियाच्या कादंबरीचा शेवट होतो. लक्ष्मीने / रझियाने लिहिलेल्या या कादंबरीच्या प्रकाशनानंतर उठलेला कल्लोळ आणि त्यातून पुढे वेगाने घडणाऱ्या घडामोडी याचं वर्णन "आवरण" च्या शेवटच्या भागात वाचायला मिळेल. स्वत:ला निधर्मी, पुरोगामी म्हणवणाऱ्या विचारवंतांचे खरे स्वरूप अतिशय परखड आणि वास्तवादीपणे शेवटच्या भागात रेखाटले गेले आहे. "आवरण" मधे मांडलेल्या सर्व मुद्द्यांसाठी, लेखकांनी लक्ष्मीच्या कादंबरीत 136 संदर्भग्रंथांची यादीच दिल्यामुळे पुरोगाम्यांच्या टीकेला वेगळे उत्तर देण्याची आवश्यकताच राहिलेली नाही यातून भैरप्पांचे चातुर्य लक्ष्यात येते. 

"कुणाचा तिरस्कार करणं, हेटाळणी करणं, मनं कलुषीत करणं हा इतिहासाचा उद्देश कधीच नसतो. असता कामा नये. आपल्या आधी होऊन गेलेल्यांच्या चुका डोळसपणे समजून घेऊन आपण आजचं जीवन शक्यतो निदान त्या दोषांपासून तरी मुक्त करून घेतलं पाहिजे. म्हणूनच ऐतिहासिक सत्याला कुठलाही रंग न देता थेट त्याकडे पाहण्याचा प्रामाणीकपणा हवा."

इतिहासात होऊन गेलेल्या हिंदू-मुस्लिम राज्यकर्त्यांच्या मानसिकतेवर आणि त्यातून झालेल्या परिणामांवर एस. एल. भैरप्पांनी अतिशय परखडपणे, उत्कटतेने आणि तितक्याच तटस्थपणे आपले विचार त्यांच्या "आवरण" या कादंबरीतून मांडले आहेत. अवघ्या दोन वर्षांत 22 आवृत्त्यांचा पल्ला गाठणारी, आवर्जून वाचण्यासारखी कादंबरी "आवरण".





संदीप प्रकाश जाधव

2 comments:

  1. Nice review, now I must read the book

    ReplyDelete
    Replies
    1. आवर्जून वाचा... आवडेल नक्कीच तुम्हाला 👍

      Delete

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये