Monday, March 15, 2021

"सेपिअन्स"

 मानवजातीचा अनोखा इतिहास



लेखक : युव्हाल नोआ हरारी

प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स

मराठी अनुवाद : वासंती फडके


होमो-सेपिअन्स हा शब्द शाळेत असताना बऱ्याच वेळा प्रत्येकाच्याच वाचनात आला असणार. माकडपासून माणूस होण्यापर्यंतचा आपलाच इतिहास अगदी थोडा का होईना पण सर्वांना नक्कीच माहीत आहे. युव्हाल हरारी यांचं "सेपिअन्स" हे पुस्तक याच मानवी इतिहासाचा वेध घेणारं आहे. सुमारे १ लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर मानवाच्या किमान ६ उपजाती राहत होत्या. पण सध्या फक्त एकच जात शिल्लक आहे आणि ती म्हणजे "आजचे आपण" - "होमो सेपिअन्स". एका भटक्या माणसापासून मानवाने इतकी प्रगती कशी केली असेल? मानव हासुद्धा इतर प्राण्यांसारखा पृथ्वीवरील एक प्राणीच आहे तर आपली उत्क्रांती झाली म्हणजे नेमकं काय झालं? अन्नसाखळीमध्ये खालच्या पातळीवर असणारा मनुष्य इतक्या कमी कालावधीत सर्वांत वरच्या पातळीवर कसा गेला? पृथ्वीवर आपली अधिसत्ता कशी स्थापन झाली असेल? आपल्या भटक्या पूर्वजांनी एकत्र येऊन शहरे आणि राज्यांची स्थापना कशी केली? आधुनिक जग निर्माण करत असताना टप्प्या-टप्प्याने जी अफाट प्रगती मानवाने आज केली आहे त्या प्रवासात पृथ्वीवरील जीवसृष्टीचा एक घटक म्हणून आपण नक्की काय कामावलंय आणि काय गमावलंय? देव, राजे आणि मानवी हक्क अशा गोष्टींवर आपण कसा काय विश्वास ठेवू लागलो? आणि येणाऱ्या पुढच्या सहस्रकांमध्ये आपले जग कसे असेल? या आणि अशा बऱ्याच गोष्टींचा धांडोळा युव्हाल हरारी यांनी त्यांच्या या "सेपिअन्स" मधून घेतला आहे. मानवाची विचार करण्याची पद्धत, वर्तन, बलस्थाने आणि त्याचे भविष्य याबद्दलच्या आपल्या सर्व समजुतींना आव्हान देणारं आणि एक विचार करायला लावणारं असं पुस्तक "सेपिअन्स". एक प्रगत मानव समाज म्हणून असणाऱ्या आपल्या बऱ्याच मान्यतांना हे पुस्तक आव्हान देत असले तरी पुस्तकातील काही गोष्टी पटण्यासारख्या नाहीत पण तरीही एक वेगळा दृष्टिकोन ठेऊन लिहिला गेलेला मानवजातीचा हा अनोखा इतिहास नक्कीच वाचनीय आहे.

युव्हाल हरारी यांच्या या "सेपिअन्स" पुस्तकाचा परिचय थोडक्यात द्यायचा झाला तर तो वेगवेगळ्या भागांत द्यावा लागेल. जसे की पहिल्या भागात पुस्तकाची सुरुवात हरारी यांनी केली आहे ती मानवाची उत्पत्ती आणि उत्क्रांती कशी झाली या विषयापासून. इथे मानवाची उत्क्रांती एका सरळ रेषेत न होता ती एकापासून दुसरा, दुसऱ्यापासून तिसरा अशा साखळीतून झाली आहे असं मत त्यांनी मांडलं आहे जे आपल्या आजपर्यंतच्या समजुतीला धक्का देते. शिवाय पृथ्वीवर एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी ६ वेगवेगळ्या जातीच्या मानवांचे अस्तित्व होते हासुद्धा तितकाच विचार करायला लावणारा मुद्दा. या सर्वच्या सर्व ६ जाती सतत भटकंती करणाऱ्या असल्याने हळूहळू एकमेकांच्या अधिवासात झालेल्या प्रवेशामुळे त्यांच्यातील संघर्ष वाढून "निअंडरथल" आणि "सेपिअन्स" या दोनच मानवाच्या जाती शिल्लक राहिल्या. त्यानंतर "सेपिअन्स" प्रजातीकडे असणाऱ्या अधिक विकसित सामाजिक कौशल्याच्या जोरावर त्यांनी "निअंडरथल" या प्रजातीवर देखील मात केली आणि फक्त "सेपिअन्स" ही एकच मानवाची जात पृथ्वीवर शिल्लक राहिली हेच आजच्या प्रगत मानवाचे पूर्वज. यानंतरच्या दुसऱ्या भागाची सुरुवात हरारी यांनी पृथ्वीवरील ५ मानवी प्रजाती नामशेष झाल्यानंतर सेपिअन्स लोकांनी हळूहळू इतर पृथ्वी पादाक्रांत कशी केली याच्या विस्तृत वर्णनाने केली आहे. सेपिअन्स अगदी ऑस्ट्रेलिया आणि मध्यपूर्व युरोपपर्यंत भटकत कसे पोहचले? आपल्या संघटन आणि सामाजिक कौशल्याच्या जोरावर त्यांनी मोठमोठ्या प्राण्यांच्या शिकारी करून स्वतःचं अस्तित्व कसं टिकवलं? याचं अतिशय सुंदर वर्णन हरारी यांनी या भागात केलं आहे. याच भागात हरारी आणखी एक विचार करण्यासारखा मुद्दा मांडतात तो म्हणजे सेपिअन्स प्रजातीकडे काल्पनिक कथा रचण्याची असणारी क्षमता! त्यांच्या याच क्षमतेने त्यांनी सामाजिक श्रद्धास्थाने निर्माण केली आणि सर्व सेपिअन्सना एक समाज म्हणून एकत्र राहण्यास चालना दिली. यामुळे सामाजिकरित्या एकत्र राहून त्यांनी पृथ्वीवर आपलं वर्चस्व निर्माण केलं. इतर कुठल्याही प्रजातींनी हा अनोखा मार्ग अवलंबला नाही आणि त्या हळूहळू नामशेष झाल्या. सेपिअन्सनी अगदी त्याकाळात देखील नेतृत्व कौशल्य दाखवले आणि आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर अनेक पुरानकथा रचल्या. या पुरानकथाच पुढे जाऊन धर्म संकल्पनेत रूपांतरित झाल्या असाव्यात असा दावा देखील हरारी यांनी या भागात केला आहे. हरारी यांच्या मते याच टप्प्यावर सेपिअन्स म्हणजे आपले पूर्वज नैसर्गिक उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून बाहेर पडायला सुरुवात झाले.

यानंतर तिसऱ्या भागात हरारी यांनी मानवाने शेतीची केलेली सुरुवात आणि त्याचा मानवाच्या प्रगतीच्या पुढच्या प्रवासात काय परिणाम झाला याचं विस्तृत वर्णन केलं आहे. शेती हा जरी मानवी प्रगतीचा महत्वाचा टप्पा असला तरी हरारी यांच्या मते शिकार करणाऱ्या सेपिअन्सचं शरीर शेतीसाठी कराव्या लागणाऱ्या कामांना पूरक नव्हतं. अशा कामांसाठी त्यांचे शरीर पुढे जाऊन जरी विकसित झाले असले तरी ते शरीराने त्यांच्या पूर्वजांपेक्षा कमकुवत होत गेले. शेती चालू केल्यानंतर आपण निसर्गावर आक्रमण करायला चालू झालो ज्याचे दूरगामी परिणाम आज आपण पाहतच आहोत. निसर्गाचे सर्व नियम धाब्यावर बसवून मानव दिवसेंदिवस स्वतःचेच नुकसान करून घेऊ लागला. प्रगतीच्या नावाखाली मानवाने निसर्गाचे अतोनात नुकसान केलं जे इतर कोणत्याही सजीवाने नाही केलं. जसजशी शेती विकसित होत गेली तसे इतर गोष्टींचे शोध लागत गेले आणि माणूस अधिकच महत्त्वकांक्षी बनला. निसर्गाच्या विरोधात जाऊन निर्माण केलेल्या अनेक आभासी गोष्टींमुळे आज माणूस निसर्गापासून जवळपास तुटूनच गेला आहे. मानवी प्रगतीच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर झालेल्या बऱ्याच गोष्टींचं मुद्देसूद वर्णन हरारी यांनी या भागात केलेलं पहायला मिळते. जे अंतर्मुख होऊन विचार करायला लावतं की खरंच जर शेतीचा शोध नसता लागला तर आपण निसर्गाचं इतकं नुकसान केलं असतं का? चौथ्या भागाचा परिचय द्यायचा झाला तर तो मानवाच्या आयुष्यात विज्ञानाचा झालेला प्रवेश आणि त्यानंतर झपाट्याने बदलत गेलेलं जग याचं विस्तृत वर्णन असा द्यावा लागेल. इथून पुढे विज्ञान हे मानवी प्रगतीच्या केंद्रस्थानी आलं आणि पैसा, सत्ता, धर्म, युद्ध यांच्याभोवती माणूस फिरत राहिला. निसर्गासमोर आपण अज्ञानी आहोत हे माणसाने मान्य करून विज्ञानाच्या सहाय्याने प्रगतीची जी झेप घेतली ती आजही अविरत चालूच आहे. आज विज्ञानाने इतकी मोठी झेप घेतली आहे की मानवाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा टप्पा देखील गाठला आहे. मानवाने निसर्गावर मिळवलेला हा एक प्रकारचा विजयच आहे. इथे युव्हाल हरारी आपल्याला अंतर्मुख व्हायला लावणारा प्रश्न विचारतात तो म्हणजे आपण कुठे चाललो आहोत आणि आपल्याला नेमकं काय मिळवायचं आहे हे संपूर्ण मानवजात म्हणून आपल्याला माहिती आहे का? आज आपण एका अशा वळणावर उभे आहोत जिथे एकतर "सेपिअन्स" म्हणजेच आजची आपली मानवजात नष्ट तरी होईल किंवा ते तंत्रज्ञानाचा स्वर्ग तरी निर्माण करतील. इतिहास हा नेहमीच शक्यतेने भरलेला असतो आणि कुठली शक्यता का प्रबळ झाली हे सांगता येणं केवळ अशक्य आहे. एकीकडे हवामान बदल आणि निसर्गाचा ऱ्हास यामुळे पृथ्वी अजून १०० वर्षे तरी टिकेल का ही भिती आहे तर दुसरीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता माणसांवर वरचढ ठरून मशिनयुग येईल अशी भिती या क्षेत्रातील तज्ञ वारंवार बोलून दाखवत आहेत. यांपैकी काहीही होऊ शकतं किंवा काहीच नाही. पण आपली प्रगतीची नेमकी दिशा काय असायला हवी आणि ती सध्या काय आहे या २ प्रश्नांच्यामधे लेखक आपल्याला सोडून देतो आणि आपली जी अस्वस्थता निर्माण होते त्यातच पुस्तकाचा शेवट होतो.

आवर्जून वाचण्यासारखा मानवजातीचा अनोखा इतिहास.




संदीप प्रकाश जाधव

2 comments:

  1. मी हे पुस्तक वाचले आहे खूपच जबरदस्त मांडणी केली आहे आणि विचार करायला लावणारे पुस्तक आहे

    ReplyDelete
    Replies
    1. त्यांच्या 'होमो डेअस : मानवजातीच्या भविष्याचा रोमांचक वेध' बद्दल पण बरंच ऐकलंय... ते सुद्धा इतकंच वाचनीय असणार

      Delete

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये