Monday, May 10, 2021

"तांडव"

 



लेखक : महाबळेश्वर सैल

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

महाबळेश्वर सैल यांच्या "तांडव" या कादंबरीबद्दल बऱ्याच लोकांकडून ऐकून होतो. "धर्म" या संकल्पनेवर लिहिलेली एक रोखठोक आणि तटस्थपणे वाचकांपर्यंत पोहोचवली गेलेली ही ऐतिहासिक घटनेवर आधारीत कादंबरी बऱ्याच जणांनी आवर्जून वाचण्यासाठी सुचवली होती. जितकं काही ऐकलं होतं त्या सर्व गोष्टींवर अगदी पुरेपूर उतरणारी अशी ही कादंबरी "तांडव". धर्मांतरावर आधारीत या कादंबरीचे मुखपृष्ठच इतकं जबरदस्त आणि बोलकं आहे की त्यावरूनच कादंबरीतील "पसाऱ्याचा" अंदाज यावा. ५ शतकांपूर्वी सातासमुद्रापारहून येऊन पोर्तुगीजांनी आदिलशाहीकडून गोवा जिंकून घेतले. परंतु गोवा जिंकल्यानंतर फक्त त्या प्रदेशावर आपली सत्ता स्थापन करून ते थांबले नाहीत तर जो राजाचा धर्म तोच प्रजेचादेखील असला पाहिजे अशा धर्मवेडानं पछाडलेल्या पोर्तुगीजांनी गोव्यातील प्रजेचं जबरदस्तीने धर्मांतर करण्यासाठी आणि त्यांना ख्रिश्चन धर्मात आणण्यासाठी त्यांच्यावर पाशवी अत्याचार चालू केले, त्यांचा अतोनात छळ चालू केला या अत्याचारांचंच रौद्र रूप म्हणजे महाबळेश्वर सैल यांनी लिहिलेली ही कादंबरी "तांडव". पूर्वापारपासून चालत आलेल्या आपल्या रूढी-परंपरांना जपत, वेगवेगळ्या जाती-धर्माच्या चौकटीत स्वतःला बांधून घेऊन आपलं आयुष्य जगणाऱ्या लोकांवर सातासमुद्रापारहून आलेला पोर्तुगीज आणि त्यांचा ख्रिस्ती धर्म अचानकच चक्रीवादळासारखा येऊन धडकल्यानंतर गोव्याच्या धरतीवर धर्मांतराचा जो "तांडव" सुरू झाला त्याचीच ही कहाणी. धर्मांतराची जबरदस्ती, धार्मिक अत्याचारातून विस्कळीत झालेली सामाजिक घडी, देवा-धर्माला डोक्यावर घेऊन, जीवावर उदार होऊन अनेकांनी केलेली पलायनं आणि या साऱ्या घडामोडींमध्ये देशोधडीला लागलेली अनेक कुटुंबं यांचं अतिशय विदारक चित्रण महाबळेश्वर सैल यांनी "तांडव" मध्ये केलेलं पहायला मिळेल. धर्माच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांना वेठीस धरत असताना त्या धर्मातून येणारी क्रूरता कादंबरीतून लोकांपर्यंत पोहचवण्याचा यशस्वी प्रयत्न लेखकांनी केला आहे. अत्याचारातून झालेलं धर्मांतर आणि आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्मात गेल्यानंतर त्या लोकांची होणारी घालमेल वाचकालासुद्धा अस्वस्थ करून जाते. ५ शतकांपूर्वी घडलेल्या या ऐतिहासिक घटनेला कादंबरी स्वरूपात लोकांसमोर आणत असताना महाबळेश्वर सैल यांनी कल्पनेची जी जोड त्या घटनांना दिलेली आहे त्यामुळे त्या धर्मांतराची दाहकता जाणवत राहते जी पुढे वाचकाच्या मनामध्ये देखील विचारांचा "तांडव" चालू करते. "धर्म" या अतिशय संवेदनशील संकल्पनेवर बेतलेली, ऐतिहासिक सत्यावर आधारीत ही कादंबरी महाबळेश्वर सैल यांनी जितक्या तटस्थपणे लिहिली आहे तितक्याच तटस्थपणे एक वाचक म्हणून ती वाचनंदेखील आवश्यक आहे. ३६३ पानांच्या या कादंबरीतून गोवा आणि आसपासच्या परिसरातील गावांमध्ये ५ शतकांपूर्वी धर्मांतराच्या नावाखाली झालेल्या स्थित्यंतराचा अचूक धागा पकडून महाबळेश्वर सैल यांनी उभा केलेला हा "तांडव".

आज गोवा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो गोव्याचा स्वच्छ समुद्र, गोव्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे, ओसंडून वाहणारे मद्याचे प्याले, असंख्य चर्च आणि बऱ्याच "फिरंगी" गोष्टी. पण खरंच पूर्वीचं गोवा असं होतं का? तर नाही! पोर्तुगीजांनी आक्रमण करण्यापूर्वीचं गोव्याचं एक अतिशय वेगळं दर्शन आपल्याला "तांडव" मधून वाचायला मिळेल. पश्चिम घाटाच्या कुशीत, गर्द जंगलात वसलेल्या छोट्या छोट्या वाड्या - गावं यांनी सजलेलं गोवा! याच गोव्यातील आदोळशी या गावात घडणारी या कादंबरीची कथा ५ शतकापूर्वीच्या संपूर्ण गोव्याची एक सामाजिक आणि मानसिक अवस्था आपल्यासमोर उभी करते. आदोळशी गावाची ही कथा प्रातिनिधिक स्वरूपात आपल्यासमोर मांडत असताना लेखकांनी संपूर्ण गोव्याची त्याकाळातील अवस्था सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आदोळशी गावावर धाड टाकल्यानंतर सातासमुद्रापलीकडून आलेल्या या "सुसंस्कृत" ख्रिस्तांनी धर्मांतराचा जो "तांडव" चालू केला त्यामध्ये आदोळशी सारखी अशी असंख्य गावं होरपळून निघाली, गावंच्या गावं ख्रिश्चन झाली आणि सोबतच संपूर्ण गोवा! लोकांच्या अंगणातील तुळस, बायकांच्या गळ्यातील मंगळसूत्र, घरांचे कळस जाऊन त्या जागी क्रॉस आले तरीही हा जबरदस्तीचा क्रॉस घेऊन आणि अत्याचार सहन करूनदेखील असंख्य घरातील हळदी-कुंकू जपले जात होते. स्वधर्म टिकवला जात होता. धर्मांतराच्या तडाख्यातून वाचण्यासाठी जीवावर उदार होऊन असंख्य पलायने केली जात होती. जीवनाचा सर्व हवाला देवावर टाकलेला, जगण्यासाठी शेती हा एकमेव आधार असणारा आदोळशी गावातील समाजात आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी फक्त देवाच्याच हातात असतात आणि देऊळ पाडणाऱ्यालाही देवच शिक्षा करील ही भावना इतकी खोलवर रुजली होती की त्यांना पोर्तुगीजांच्या अन्याया विरोधात पेटून उठण्याची, विद्रोह करण्याची बुद्धीच कधी सुचली नाही. त्या काळच्या गरीब समाजाचं, देवावर सारी भिस्त ठेवून जगणाऱ्या गरीब लोकांचं चित्रण कादंबरीत वाचत असताना वाईट तर वाटतंच पण अशा देवा-धर्माच्या खुळचट समजुतींना कवटाळून घेऊन स्वतःहून या धर्मांतराला पायघड्या अंथरणाऱ्या लोकांची चीडपण येते. हिंदू धर्मातल्या लोकांना बाटवणं हे नको इतकं सोपं आहे, केवळ घरात पाणी शिंपडून किंवा परधर्माच्या माणसानं प्रवेश केल्यानं त्या घराचा वा कुटुंबाचा धर्म बदलतो अशी समजूत असणाऱ्या लोकांना पोर्तुगीजांनी अगदी चतुराईने धर्मांतरास भाग पाडले. साम, दाम, दंड या सर्व मार्गांनी लोकांचे धर्मांतर चालू असताना देवच आपल्याला यातून वाचवू शकेल या भोळ्या विश्वासानेच त्यांचा घात केला आणि बरीच कुटुंबं रस्त्यावर आली. शेतजमिनीच्या बदल्यात, चाकरीच्या बदल्यात, स्वतःचं मुल परत हवं असेल, शील वाचवायचं असेल तर ख्रिश्चन धर्म स्वीकारा आणि नाही स्वीकारला तर घरं जाळण्यात येतील, तलवारीच्या जोरावर तुम्हाला तो स्वीकारणं भाग पाडू म्हणणाऱ्या मूठभर पोर्तुगीजांच्या अत्याचाराविरोधात संघर्ष करायच्या ऐवजी गावकरी गाव सोडून दिगंतराला जाऊ लागले. त्यांच्या याच असहाय्यतेचा फायदा घेऊन, घरं जाळून, संसार उद्ध्वस्त करून असंख्य कुटुंबांना जबरदस्तीने बाप्तिस्मा देऊन ख्रिश्चन करण्यात आलं. त्या काळातील हे "तांडव" वाचत असताना वाचक गलबलून जातो. गावकऱ्यांना ख्रिश्चन झाल्याशिवाय जगणंही मुश्कील व्हावं इतका टोकाचा अत्याचार! यासर्वांपासून सुटका करून घेण्याचे तीनच उपाय एक तर हिंदू धर्म सोडणे, गाव सोडणे किंवा जगणं सोडणे! जे लोक धर्म सोडत होते त्यांचीही तशी सुटका होतच नव्हती कारण ख्रिश्चन झाल्यानंतर चुकून जरी हिंदू धर्मातील एखादी परंपरा पाळली गेली किंवा नव्या धर्माचा अपमान झाला तर इनिक्विझिशनच्या क्रूर शिक्षांना सामोरं जावं लागणार, म्हणजे इथेही पुन्हा मरणच! अशा विदारक परिस्थितीचे कादंबरीतील वर्णन अंगावर काटा आणते.

धर्मसंकटात सापडलेल्या माणसाच्या आयुष्यात घडणारे विविध प्रसंग कादंबरीत आपल्याला वाचायला मिळतील. धाकातून, निराशेतून, स्वार्थातून, दुःखातून, अविचारातून, चिंतेतून, नाईलाजातून, द्वेषातून परधर्म स्वीकारणाऱ्या माणसांचं दर्शन आपल्याला कादंबरीत पानापानावर होत राहते. धर्मांतर करून दुसऱ्या धर्मात जाऊनही आपल्या मनाची तगमग शांत न झालेले, अस्वस्थ लोकसुद्धा आपल्याला कादंबरीत वाचायला मिळतील आणि आपण आपल्या जुन्या धर्मातलं काय गमावलं आणि नव्या धर्मातलं काय कमावलं याचा हिशोब कधीच न लागलेले संभ्रमी लोकही इथे आपल्याला दिसतील. किमान देवाला तरी या दुष्टचक्रातून बाहेर काढूत असं म्हणून देवासह परागंदा झालेली माणसं दिसतील. आपण ख्रिश्चन झाल्यावर एका क्षणात दुरावलेली आपली जुनी माणसं आणि ती दुरावलेली माणसं पुढे स्वतःच ख्रिश्चन झाल्याने पुन्हा जवळ आल्याचे चमत्कारिक प्रसंगही वाचायला मिळतील. श्रद्धेने धर्मपालन करणाऱ्या लोकांवर एका लादल्या गेलेल्या धर्मामुळे जी जी म्हणून उलथापालथ होऊ शकते ती ती सगळी आपल्याला या कादंबरीत वाचायला मिळेल. हे सर्व मांडत असताना हिंदू धर्मातील काही गोष्टी या धर्मांतरास कसे हातभार लावत होत्या याचंही तितकंच तटस्थ वर्णन कादंबरीत लेखकांनी केलेलं आहे. देव, धर्मावर नितांत श्रद्धा असणाऱ्या गावकऱ्यांच्या मनात ठाण मांडून बसलेल्या खुळचट धारणा जसे की 'ख्रिश्चनांच्या नुसत्या स्पर्शाने आणि त्यांचं उष्टं खाल्ल्याने आपण बाटले जातो!' ही एक अशी मूर्ख समजूत ज्यामुळे आपल्या कितीतरी आप्तेष्टांना आपण आपल्यापासून तोडून टाकलं आणि स्वतःहूनच धर्मांतर करायला भाग पाडलं याचा हिशोबच लागत नाही. शिवाय जातिश्रेष्ठत्वाच्या अहंकारातून समाजातल्या अनेक घटकांना कसं दूर लोटलं याबद्दलही परखड भाष्य कादंबरीत आपल्याला वाचायला मिळेल. 

महाबळेश्वर सैल यांनी साकारलेला धर्मांतराचा हा "तांडव" कोणत्याही धर्माविषयी पूर्वग्रह मनात न ठेवता वाचला तर नक्कीच एक दर्जेदार साहित्य वाचल्याचं समाधान देऊन जातो. आवर्जून वाचण्यासारखी कादंबरी "तांडव".




संदीप प्रकाश जाधव

No comments:

Post a Comment

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये