लेखक : डॉ. एस. एल. भैरप्पा
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
मराठी अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी
एस. एल. भैरप्पा यांचं प्रत्येक साहित्य वाचकाच्या मन आणि मेंदूचा ताबा घेणारं असतं, वाचत असताना वाचक एका वेगळ्याच विचारचक्रात हरवून जातो आणि याचाच प्रत्यय मला पुन्हा एकदा आला त्यांची रामायणावर आधारित कादंबरी "उत्तरकांड" वाचत असताना! "साक्षी" आणि "आवरण" या कादंबऱ्या वाचल्यानंतर "उत्तरकांड" ही त्यांची तिसरी कादंबरी आज वाचून पूर्ण झाली. प्रत्येक कादंबरीचा विषय जरी वेगळा असला तरी भैरप्पांच्या साहित्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं साहित्य हे मानसिक पातळीवर वाचून संपत नाही असं वाटतं कारण पुस्तक वाचून झाल्यानंतर त्याचा विचार बराच वेळ आपल्या डोक्यात घोळतच राहतो. "उत्तरकांड" ही रामायणावर आधारित कादंबरी रामाने सीतेचा त्याग केल्यानंतर वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात राहत असताना सीतेच्या निवेदनातून उलगडत जाते. रामायणात घडलेल्या घटनांसोबत बरेच चांगले-वाईट प्रसंग सीतेच्या दृष्टिकोनातून उलगडत असताना सीतेचा वर्तमानकाळ आणि भूतकाळ यामधे वाचकाला गुंतवून ठेवत ही कादंबरी पुढे सरकत राहते. रामाची पत्नी म्हणून सीतेच्या वाट्याला जे भोग आले, त्याचं मनोविश्लेषणात्मक चित्रण भैरप्पांनी या कादंबरीत केलेलं आहे. राम, सीता आणि लक्ष्मणाबरोबरच रामायणातील इतरही पात्रांचे जे वर्णन भैरप्पा यांनी केलं आहे ते वाचत असताना आजपर्यंत ज्या पारंपारिक चौकटींमध्ये आपण या पात्रांना पाहत आलो आहोत त्या सर्व भेदून ही पात्रे आपल्यासमोर उभी राहतात. शिवाय रामायणात घडलेल्या सर्वच घटना कोणताही दैवी मुलामा न देता वर्णन केल्याने आणि प्रत्येक व्यक्तिरेखेला मानवी पातळीवर आणून मांडल्यामुळे सीतेच्या वाट्याला आलेलं आयुष्य म्हणजे आजच्या समाजात, आपल्या आसपास घडत असणारी एखादी कथाच असल्याचा भास वाचकाला होत राहतो आणि त्यामुळेच सीतेच्या निवेदनातून पुढे सरकत असताना कादंबरीत एकप्रकारचं नाट्य निर्माण झालं आहे जे रामायणाचा एक नवा अर्थ आपल्यासमोर घेऊन येते. 'पतिव्रता', 'सोशिकतेचं एक मूर्तिमंत उदाहरण' फक्त याच नजरेतून आजपर्यंत सीतेकडे पाहिलं गेलं आणि पुढच्या पिढीतील स्त्रियांसाठी एक आदर्श म्हणून समाजापुढे त्याचं इतकं उदात्तीकरण केलं गेलं की सीतेवर एक स्त्री म्हणून झालेला अन्याय आपसूकच झाकला गेला, तिचा आवाज दबला गेला. एस. एल. भैरप्पांनी सीतेवर झालेल्या याच अन्यायाला वाचा फोडण्याचा, सीतेला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या या "उत्तरकांड" कादंबरीमधून केला आहे. सीतेला एका वेगळ्याच रुपात भैरप्पांनी या कादंबरीतून आपल्यासमोर आणलं आहे ज्यामुळे सीता जणूकाही आजच्या काळातली एखादी स्त्रीवादी व्यक्तिरेखाच वाटत राहते. "उत्तरकांड" या कादंबरीमधे भैरप्पांनी सीतेच्या माध्यमातून स्त्रीची एक तेजस्वी बाजू आपल्यासमोर आणली आहे. रावणाकडून सुटका केल्यानंतर रामाने सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली परंतु सीता जशी रामापासून दूर होती तसाच रामही सीतेपासून दूर होता, मग जो न्याय सीतेला तोच रामाला का नाही? असा सवाल दबक्या आवाजात अनेकदा केला जातो पण सीता ही एक "स्त्री" असल्या कारणाने रामाने जे केलं ते कसं योग्य होतं असंच आजपर्यंत सांगितलं गेलं. भैरप्पांचं "उत्तरकांड" याला अपवाद आहे, भैरप्पांच्या "उत्तरकांड" मधील सीता नेमका असाच सवाल रामाला भर धर्मसभेत करते - ‘रामा माझ्या शीलाबद्दल तुला शंका आहे, पण तुझ्या स्वतःच्या शीलाचं काय?’ आणि राम निरुत्तर राहतो. भैरप्पांनी सीतेच्या माध्यमातून विचारलेला हा प्रश्न म्हणजे एका अर्थाने रामसारखंच दुटप्पीपणे वागणाऱ्या आजच्या समाजपुरुषाला दाखवलेला आरसा आहे. त्यामुळेच पौराणिक पार्श्वभूमी असली तरी आजच्या वास्तविक जगाला अगदी तंतोतंत लागू होणारी भैरप्पांची ही ३०४ पानी कादंबरी "उत्तरकांड" वाचकाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावते.
रामायण असो वा महाभारत ही महाकाव्ये आहेत की खरंच आपला इतिहास हा नेहमीच एक वादाचा विषय राहिला आहे. परंतु जर या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर एक गोष्ट नक्की की या दोन्हींमधील घटनांचा भारतीय जनमानसावर भरपूर प्रभाव आहे. रामायणातील जवळपास सर्वच घटना लोकांच्या मनामध्ये खूप खोलवर रुजल्या आहेत, सीतेइतकी लोकप्रिय आणि जनमानसात रुजलेली पौराणिक व्यक्तिरेखा तर दुसरी कोणतीच सापडणार नाही. त्यामुळेच रामायणातील सीता या उत्तुंग पात्राभोवती गुंफलेले हे "उत्तरकांड" वाचकाला कमालीचे घेरून टाकते. सीता स्वयंवर, रामाचा वनवास आणि त्याची पार्श्वभूमी, शूर्पणखा प्रकरण, सीताहरण, सुग्रीवाला वालीविरुद्ध रामाने केलेली मदत, हनुमान भेट, समुद्रापार जाऊन रामाने लंकेवर केलेली स्वारी, रावणाचा वध करून केलेली सीतेची सुटका, विजयी होऊन अयोध्येत परत आल्यानंतर लोकाभिचाराला सामोरं जाऊन रामाने केलेला सीतात्याग, त्यानंतर सीतेच्या मनातील विचारांचे काहूर आणि त्यावर तिने केलेली मात, जनकाने भूमीतून सापडलेल्या एका कन्येचा केलेला सांभाळ, त्या भूमीबद्दल सीतेची असणारी ओढ आणि त्या ओढीमुळेच रामाने त्यागल्यानंतर कृषक म्हणून केलेली शेतीची कामे, सीतेने महर्षी वाल्मीकींच्या आश्रमात व्यतीत केलेला काळ, आपली सखी सुकेशीच्या मदतीने लव-कुश यांचं केलेलं संगोपन, लव-कुश यांनी पकडलेला अश्वमेध यज्ञाचा घोडा सोडून न देता वाल्मिकी ऋषींनी केलेल्या मध्यस्थीतून अयोध्येत भरवली गेलेली धर्मसभा आणि त्यात सीतेने बजावलेली स्त्रीच्या हक्कासाठीची भूमिका. अशा अगदी तोंडपाठ असणाऱ्या रामायणातील घटना भैरप्पांनी ज्या पद्धतीने त्यांच्या "उत्तरकांड" मधून आपल्यासमोर आणल्या आहेत त्यातून सीतेच्या पारंपरिक रुपाला छेद देणारी एक वेगळीच प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते.
संग्रही ठेऊन आवर्जून वाचण्यासारखी कादंबरी.
संदीप प्रकाश जाधव
No comments:
Post a Comment