लेखक : रत्नाकर मतकरी
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठे- १५३, मूूल्य- १८० रुपये.
गूढकथा किंवा रहास्यकथांचा उल्लेख आल्यानंतर सर्वात प्रथम डोळ्यासमोर येणारी नावे नारायण धारप आणि रत्नाकर मतकरी! गूढ आणि रहास्यकथांचा मराठीतील साहित्यप्रकार या दोन नावांशिवाय पूर्णच नाही होऊ शकत! मराठी साहित्यविश्वात गूढ आणि रहास्यकथांचं दालन समृद्ध करण्यात या दोन व्यक्तींचं खूप मोठं योगदान आहे. ६०-७० च्या दशकात लिहिल्या गेलेल्या यांच्या कथा आजही लोक तितक्याच आवडीने वाचतात यातच त्यांच्या लेखनाचं वेगळेपण लक्षात येतं. नेहमीच्या पाहण्यात नसलेलं, ज्याची कदाचित भीती वाटू शकेल पण ते भीतिदायक नाही ते म्हणजे गूढ. एखाद्याला भीती का वाटते हे शोधणे म्हणजे सुद्धा एकप्रकारचे गूढच. गूढकथा म्हणजे आयुष्याच्या एखाद्या मुलुखावेगळ्या गूढपैलूविषयी लिहिलेली कथा. मृत्यू ही गोष्ट अशीच एक गूढ आहे. मृत्यू होताना नेमके काय होते याचे रहस्य अजून उमगलेले नाही. विज्ञानाने मानवी शरीर नष्ट होण्याचे स्वरूप उलगडले परंतु मानवी मन, त्याच्या भावना, वासना हे शरीराबरोबरच नष्ट होते का? याचे समाधानकारक उत्तर अजून मिळालेले नाही. अशा सर्व गूढ गोष्टींचे सर्वसामान्यांना नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. याच आकर्षणाला केंद्रस्थानी ठेवून, आपल्या प्रचंड कल्पनाशक्तीच्या जोरावर या दोन्ही लेखकांचे बरेच कथासंग्रह प्रकाशित झाले. अशाच दर्जेदार कथासंग्रहातील रत्नाकर मतकरी यांचा एक गूढकथासंग्रह "कबंध". भेदक रहस्यांची गुंफण करत लिहिला गेलेला रत्नाकर मतकरींचा प्रत्येक कथासंग्रह खासच आहे आणि "कबंध" देखील त्याला अपवाद नाही. रहस्यकथेतील रहस्य हे त्या कथेसोबतच संपून जाते पण गूढकथांचं वैशिष्ट म्हणजे कथा संपल्यानंतरसुद्धा वाचकाच्या मनात राहून जाणारी त्या गूढतेची एक अदृश्य किनार! "कबंध" मधील प्रत्येक कथा वाचकाला त्या गूढ वातावरणात घेऊन जाते. "कबंध" चा अर्थ शिरावेगळे धड! यावरच बेतलेल्या या कथासंग्रहातील पहिल्या गूढकथेचे नावच या संग्रहाला दिलेलं आहे, "कबंध". अशाच इतर ११ गूढकथांमधून, कथेच्या नायकाला येणाऱ्या वेगवेगळ्या पातळ्यांवरील गूढ अनुभव व तर्कापलीकडील घटना यांची सांगड घालून रत्नाकर मतकरींनी अतिशय प्रभावी शैलीने या कथा पेश केल्या आहेत ज्या वाचत असताना त्यांच्या कल्पनाशक्तीला दाद दिल्याशिवाय वाचक राहूच शकत नाही. १५३ पाने आणि १२ कथांचा एका बैठकीत वाचून पूर्ण होण्यासारखा, गूढतेने खचाखच भरलेला असा हा कथासंग्रह "कबंध".
"कबंध" या पहिल्याच कथेत मतकरींनी अतिशय भन्नाट वातावरणनिर्मिती केली आहे. नायकाचा भूतकाळ अचानक त्याच्या समोर उभा राहिल्यानंतर हळूहळू त्या रहस्यमय घटनांचा फ्लॅशबॅकमधे होणारा उलगडा म्हणजे ही कथा. मधुरा आणि रवी हे नवविवाहित दांपत्य लग्नानंतर जेव्हा पहिल्यांदाच एका लांबच्या बंगल्यात, निसर्गरम्य वातावरणात येतात त्याच रात्री सुरुवात होते या गूढ प्रकरणाची. पहिल्याच रात्री रवीला एका स्त्रीचं शीर नसलेलं फक्त धड दिसतं. तिचा आणि रवीचा काय संबंध? ती त्याचा पाठलाग का करते? या पाठलागाचा शेवट काय होतो? या गोष्टी रत्नाकर मतकरी यांनी अतिशय ताकदीने रंगवल्या आहेत. दुसरी कथा "श्रीमंत"! अत्यंत गरिबीत जगणारा रमाकांत व त्याची पत्नी रजनी यांच्याभोवती फिरणारी ही कथा. कामधंदा नसल्यामुळे होणारी आर्थिक ओढाताण, औषध न मिळाल्याने त्याच्या लहान मुलीचं झालेलं निधन आणि हताश झालेली पत्नी रजनी. अशा वातावरणात, झटपट श्रीमंत होण्यासाठी रमाकांत अघोरी मार्गाला लागतो. हा मार्ग त्याला श्रीमंतीकडे कसा घेऊन जातो? त्याचे काय परिणाम होतात? या सर्वांत त्याला काय अनुभव येतात? याचं थरारक चित्रण या कथेत वाचायला मिळेल. "दृष्टा" अशीच वेगळ्या पद्धतीची कथा! लहानपणापासून बुद्धी नसलेल्या, पूर्णपणे आपल्या आईवर अवलंबून असणाऱ्या मुलाची, पंडितची ही कथा. बुद्धीने कमी असला तरी एक असाधारण अशी शक्ती लाभलेला हा पंडीत. म्हणूनच स्वत:च्या आईचं मरण, साने वकिलांनी केलेला आपल्या सुंदर पत्नीचा खून अशा गोष्टी त्याला आधीच दिसतात आणि या अतिशय वेगळ्या धाटणीच्या कथेचा शेवटही अगदी तसाच धक्का देणारा असा आहे. "लपा-छपी" ही लहानपणीच जन्म देऊन आई वारल्याने वडिलांचा रोष निर्माण झालेल्या विल्कूची कथा. वडील त्याला मुंबईला घेऊन जात नसल्याने आजीकडे शहाड या छोट्याशा गावी राहणाऱ्या विल्कूची खुनशी वृत्ती कशी उफाळते आणि शेवटी तो आपल्या आजीलाच कसा ठार मारतो याचं अतिशय परिणामकारक चित्रण कथेत वाचायला मिळेल. प्रेम, माया न मिळाल्याने एकाच शरीरात वावरणारे दोन विल्कू कसे वागतात हे अतिशय रोमांचक पद्धतीने मतकरींनी या कथेत रंगवले आहे. "म्हणे कोण मागे आले"! एकाच सुंदर नर्सवर प्रेम करणाऱ्या दोन डॉक्टर मित्रांभोवती फिरणारी ही कथा. आपल्या प्रतिस्पर्ध्याचा काटा काढण्यासाठी डॉ. दिवेकर यांनी निवडलेला, कोणाच्याही लक्षात न आलेला एक अफलातून मार्ग! पण आपल्या प्रतिस्पर्ध्याला मारल्यानंतर खरेच ते सुखी होऊ शकले का? त्यांना त्यांची प्रेयसी नीलिमा मिळाली का? हे वाचनीय आहे. स्वत:पासून स्वतंत्र होऊन कुठेही संचार करू शकणाऱ्या माणसाच्या इच्छा–देहाची कल्पना "इच्छा-देह" या कथेतून मतकरींनी मांडली आहे त्याचप्रमाणे अपघातात मृत्यू आला असताना फक्त आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या सामर्थ्यावर त्याला दूर ठेवून इष्ट कार्यसिद्धीसाठी देहरूपाने जगणाऱ्या नानांची कथा "लांबणीवर". नानांना आपल्या मुलीचे लग्न जमविण्यासाठी लागलेला ध्यास आणि त्याच ध्यासापायी मृत्यूलाही "लांबणीवर" टाकून काही दिवसांसाठी वाट पहायला लावणारे नाना यांच्याभोवती फिरणारी ही कथा. कथेचा शेवटही धक्कादायक! अंधश्रद्धेवर आधारित असणारी पुढची कथा "बाबल्या रावळाचा पेटारा". मुलबाळ नसलेलं दांपत्य बाबल्या आणि त्याची पत्नी गोकुळा! मुलबाळ नसणारी गोकुळा करणी करते या संशयातून होळीच्या आगीत होणारा गोकुळाचा शेवट! हा शेवट वाचकाच्या मनाला आणखीच चटका लावून जातो कारण बाबल्याने होळीला अर्पण केलेल्या पेटाऱ्यात काय आहे हे बाबल्याच माहित नसते. वाद्यं जोरजोरात वाजवली जातात. होळीची बोंब सुरू होते आणि होळीच्या आगीत पेटारा टाकला जातो. नंतर गोकुळा गावकऱ्यांना परत कधीच दिसत नाही. "असाही एक कलावंत" आणि "ट्रिंग-ट्रिंग-हॅलो क्लिक" या कथा खून, व्यभिचार, फसवणूक या माध्यमातून आपला गुढपणा टिकवून असल्या तरी यांचं वेगळेपण म्हणजे गूढ असूनही विनोदी अंगाने केलेली या कथांची मांडणी. यानंतर थोडीशी चमत्कारिक वाटणारी कथा "एक माणूस आणि एक पशू"! एका डॉक्टरने दुसऱ्याच्या पत्नीवर डोळा ठेवून, इंजेक्शन देऊन त्याला माणसाचा पशू केल्यानंतर घडणारी ही कथा. शेवटी त्याच पशू झालेल्या माणसाकडून डॉक्टरचाच जीव घेतला जातो आणि त्यानंतर पशूच्या धक्कादायक शेवटाने संपणारी ही कथा. रहस्यमय गूढ निर्माण करणाऱ्या या कथासंग्रहातील सगळ्याच कथा वाचनीय आहेत.
आवर्जून वाचण्यासारखा गूढकथासंग्रह "कबंध".
संदीप प्रकाश जाधव
No comments:
Post a Comment