Tuesday, December 14, 2021

"महानायक"

 



लेखक : विश्वास पाटील

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

                                                                           पृष्ठे- ६९३, मूूल्य- ५२५ रुपये.


"पानिपत" या आपल्या पहिल्या कादंबरीच्या माध्यमातून घराघरात पोहचलेल्या विश्वास पाटील या नावाला तसं स्वतंत्र परिचयाची गरज नाही. फक्त मराठीतच नाही तर इतरही भाषांमधील त्यांचं अनुवादित साहित्य लोकांनी डोक्यावर घेतलं. 'पानिपत' नंतर 'झाडाझडती' आणि 'पांगिरा' या त्यांच्या कादंबऱ्यादेखील मी वाचल्या. मराठ्यांच्या शौर्याची गाथा सांगणारी 'पानिपत', धरणग्रस्तांच्या उध्वस्त जीवनाचा जवळून परिचय करून देणारी 'झाडाझडती' आणि पाण्यासारख्या ज्वलंत विषयावर लिहिलेली, दुष्काळाचं विदारक चित्रण करणारी 'पांगिरा' या तीनही कादंबऱ्यांतून त्यांनी वाचकाच्या मनाला हात घातला. कादंबरीच्या माध्यमातून तो काळ किंवा त्या व्यक्तिरेखा वाचकांच्या समोर उभं करण्याचं सामर्थ्य असणाऱ्या मोजक्याच लेखकांची यादी विश्वास पाटील या नावाशिवाय पूर्णच नाही होऊ शकणार. "महानायक" ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर बेतलेली विश्वास पाटील यांची चरित्रात्मक कादंबरी मी बऱ्याच महिन्यांपूर्वी घेऊन ठेवली होती पण तिचा आवाका पाहूनच ठरवलं की ही निवांत वेळ काढूनच वाचली पाहिजे. खरंतर लहानपणापासूनच मला नेताजींबद्दल प्रचंड कुतूहल होतं, प्रत्येक सार्वजनिक किंवा शाळेतील एखाद्या कार्यक्रमात फोटोपूजनाच्या वेळी 'गांधीजी' आणि 'शिवाजी महाराजांसोबत' पुजल्या जाणाऱ्या तिसऱ्या फ्रेममधील पोलीसी वेशातील त्या गुटगुटीत हसऱ्या चेहऱ्याबद्दल नेहमीच एक कमालीचं आकर्षण वाटायचं. पण इतर असंख्य दुर्दैवी भारतीयांप्रमाणेच या थोर व्यक्तीबद्दल खूपच कमी माहिती असणाऱ्यांपैकी मी एक होतो. नेताजींबद्दल पसरणाऱ्या ऐकीव कथा आणि अफवांतून ते भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील एक गूढ पात्र बनून गेले. स्वातंत्र्याच्या इतिहासात जितकं इतर स्वातंत्र्य सैनिकांवर लिहिलं गेलं तितकं कधी नेताजींबद्दल लोकांपर्यंत पोहचलच नाही त्यामुळेच असेल कदाचित की या थोर देशभक्ताबद्दल माहिती नसणारे असंख्य भारतीय आजही सापडतील. विश्वास पाटील यांनी "महानायक" च्या माध्यमातून नेताजींचा अतिशय प्रेरणादायी जीवनप्रवास लोकांसमोर आणला आहे. भारताच्या अखेरच्या स्वातंत्र्यसंग्रामात कर्तृत्व गाजविणाऱ्या एका महानायकाच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि जीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न त्यांनी या कादंबरीतून केला आहे. नेताजींच्या आयुष्यातील बऱ्याच प्रसंगांचं अतिशय बारीक वर्णन या कादंबरीत आपल्याला वाचायला मिळेल. सुभाषचंद्र बोस यांच्या नाट्यमय आणि संघर्षपूर्ण जीवनावर आधारलेल्या या कादंबरीत महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचे परस्पर संबंध, नेताजींचे गुरू देशबंधू चित्तरंजनदास आणि सुभाषचंद्र बोस यांचं नातं, नेताजींच्या प्रत्येक कार्यात त्यांचे वाडीलबंधू शरदचंद्र यांचा असणारा पाठिंबा, तब्बल ११ वेळा नेताजींना झालेला तुरुंगवास, नेताजींचं आजारपण, अवघ्या ८ महिन्यांच्या तयारीतून ISS ची परीक्षा उत्तीर्ण होऊन क्लास वन दर्जाची ब्रिटिशांची नोकरी लाथाडणारे नेताजी, गांधींसारख्या मोठ्या आणि देशव्यापी नेत्यासमोर स्वतःची वेगळी प्रतिमा तयार करून त्यांना पर्याय म्हणून समोर येणारे नेताजी, सुभाषचंद्र बोस हे ब्रिटिश साम्राज्याचे क्रमांक एकचे शत्रू आहेत असं ठरवून त्यांना झालेली नजरकैद, आपल्या मातृभूमीला गुलामगिरीतून सोडवण्यासाठी नजरकैदेतून निसटून देशाबाहेर जाण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास, बाह्यजगाकडून मदत मिळवण्यासाठी नेताजींनी केलेली प्रचंड धडपड, हुकूमशाह हिटलरसोबतची भेट, आझाद हिंद सेनेची स्थापना, नेताजींचं वैवाहिक जीवन, त्या वेळेची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिस्थिती, भारतीय स्वातंत्र्य लढा, आझाद हिंद सेनेतील नेताजींच्या सहकार्‍यांनी केलेला त्याग, तत्कालीन वास्तवाला असलेले विविध आयाम, नेताजींची मानसिक, भावनिक आणि वैचारिक आंदोलने आणि शेवटी झालेला त्यांचा दारुण अंत या सर्वांचे अगदी तपशीलवार वर्णन आहे ज्यातून विश्वास पाटील यांनी घेतलेली प्रचंड मेहनत लक्षात येते. आपल्या मातृभूमीला इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त करायचा एकच ध्यास घेऊन अर्ध जग पालथं घालणाऱ्या या 'महानायकाचा' त्यांच्या शालेय जीवनापासून ते त्यांच्या अपघाती मृत्यूपर्यंतचा धगधगता आणि तितकाच प्रेरणादायी प्रवास म्हणजे ही कादंबरी "महानायक"! अडतीस कोटी देशबांधवांची गुलामगिरीतून मुक्तता या ध्येयासाठी एका कडव्या आणि लढवय्या देशभक्ताने अर्ध्या जगात मारलेली गरुडभरारी म्हणजे ही कादंबरी "महानायक"! आयुष्यभर स्वकीयांशी आणि ब्रिटिश साम्राज्यासारख्या परकियांशी संघर्ष करणाऱ्या नेताजींना एक व्यक्ती न मानता एक राष्ट्र म्हणून भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी जर्मनी-जपान ने केलेल्या मदतीनंतर इंफाळ-कोहिमा- ब्रम्हदेशच्या अरण्यात जुंपलेला घनघोर रणसंग्राम म्हणजे ही कादंबरी "महानायक"! खरंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची झळाळती कारकीर्द ७०४ पानांपुरती मर्यादित नक्कीच नाही पण तरीही विश्वास पाटील यांची ही कादंबरी वाचल्यानंतर वाचक नेताजींना मनोमन वंदन केल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.

देशोदेशींच्या दफ्तरखान्यात आजवर अडकून पडलेल्या दुर्मिळ दस्तावेजांचा, नव्याने संशोधन केलेल्या कागदपत्रांचा अभ्यास करून आणि आझाद हिंद सेनेने तुडवलेल्या त्या 'रणवाटां'वरून भ्रमण करून विश्वास पाटील यांनी चितारलेली, प्रत्येकाने आवर्जून वाचलीच पाहिजे अशी नेताजींची अपरिचित जीवनकहाणी "महानायक"!!!






संदीप प्रकाश जाधव

No comments:

Post a Comment

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये