Sunday, February 13, 2022

"अभयारण्य"


 

लेखक : जयंत नारळीकर

प्रकाशक : मौज प्रकाशन

पृष्ठे- ९६, मूूल्य- १५० रुपये                                                                           

 

"यक्षांची देणगी" आणि "प्रेषित" नंतर बऱ्याच वर्षांनी जयंत नारळीकरांचं एखादं पुस्तक वाचायचा योग आला. नारळीकरांच्या वैज्ञानिक कादंबऱ्या नेहमीच वाचकाला एका वेगळ्या जगात घेऊन जातात आणि शेवटी वाचकाला विचारात पाडून नकळत भविष्यात येऊ घातलेल्या धोक्याचा इशाराही देतात. त्यांच्या प्रत्येक कादंबरीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कादंबरीतील विषयांमधे जाणवणारी त्यांची दूरदृष्टी! इतक्या वर्षांपूर्वी लिहिलेल्या त्यांच्या कादंबरीतील कथा आज वाचताना आपल्याला भविष्यात १००-२०० वर्षें पुढे घेऊन जातात. भविष्यातील त्या वातावरणात गेल्यानंतर वाचक बऱ्याच वेळा स्थब्ध होऊन जातो याचं कारण म्हणजे नारळीकरांनी कादंबरी लिहील्यापासून ते आज वर्तमानकाळात आपण वाचत असताना मधल्या काळात मानवाने जी प्रगती केली आहे त्या टप्प्यातील बऱ्याच घटना, माणसाच्या आयुष्यात झालेले बरेच बदल हे अगदी त्या कथांमधील घटनांशी साम्य दाखवतात. वाचत असताना अनेक वेळा आपण कथेतील घटना आज वर्तमानकाळाशी रिलेट करत राहतो. कथेत घडणाऱ्या इतरही घटनांप्रमाणे जर खरंच भविष्यात पृथ्वीवर काही घडलं तर काय? या विचाराने वाचकाच्या अंगावर नकळत शहारे येतात. नारळीकरांची "अभयारण्य" सुद्धा याच पठडीतील एक विज्ञान कादंबरी! "अभयारण्य" चा शब्दशः अर्थ जर पहायचा झाला तर तो म्हणजे एक असं ठिकाण जिथं राहणाऱ्या प्रत्येक प्राणिमात्राला 'अभय' असेल, त्यांच्या जीवाला कोणत्याच प्रकारचा धोका नसेल, प्रत्येक प्राणी जिथे मुक्त संचार करू शकेल आणि नेहमी एक संरक्षक कवच त्यांच्या भोवती राहिल. तर, पृथ्वी म्हणजे मनुष्यप्राण्यासाठी परग्रहवासीयांकडून निर्माण केलेलं एक "अभयारण्य"च समजून नारळीकरांनी लिहिलेली ही एक भन्नाट विज्ञान कादंबरी! अतिशय प्रगत परग्रहवासीयांकडून मानवाची उत्क्रांती कशी झाली याचा अभ्यास करण्यासाठी घातलेला हा पृथ्वीवरील अभयारण्याचा घाट. संपूर्ण मानवजातीवर नजर ठेवून तटस्थपणे मानवी उत्क्रांतीचा अभ्यास करत असताना जिथे जिथे गरज भासेल तिथे मानवाच्या नकळत त्याला मदत करणारे या कादंबरीतील परग्रहवासी! परंतु मानवी उत्क्रांतीच्या या प्रवासात एक वळण असं येतं जिथं प्रगतीच्या गोंडस नावाखाली माणसाने बनवलेली अण्वस्त्रेच पृथ्वीला विनाशाच्या टप्प्यावर घेऊन जातात. अशा वेळी तटस्थ राहणारे परग्रहवासी काय भूमिका घेतात? मानवी आयुष्यात सहसा कोणताच हस्तक्षेप न करणारे हे परग्रहवासी पृथ्वीला अर्थातच त्यांनी बनवलेल्या या "अभयारण्याला" वाचवण्यासाठी काय करतात? अण्वस्त्रांच्या या जीवघेण्या स्पर्धेचा शेवट काय? माणसाच्या प्रगतीला अंत आहे की नाही? या सर्वांची मनोरंजनात्मक पण तितकीच आपल्याला एक माणूस म्हणून विचार करायला लावणारी उत्तरे नारळीकरांच्या या "अभयारण्यातून" आपल्याला मिळतील. पृथ्वीवरील मानवी संस्कृती, पृथ्वीवर आपली वसाहत स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणारा आणखी एक परग्रह 'चटम-४' वरील परग्रहवासी आणि पृथ्वी या आपल्या "अभयारण्याचे" रक्षण करणारे परग्रहवासी यांच्यामधे झालेला छोटासा संघर्ष, अग्नीचा शोध लावणारा गुहामानव टंबू, दुसरे महायुध्द संपण्याच्या काळातील अमेरिका, व्हिक्टोरियन काळातील इंग्लंड, इ.स.पू. ४३० मधील विद्याकलांची समृध्द नगरी अथेन्स, अथेन्सचा प्लेग, कृषिसंस्कृतीचा उदय आणि विस्तार, विसाव्या शतकात जिवशास्त्राने मारलेली मुसंडी, रशियाने स्फुटनिक हा उपग्रह अवकाशात सोडल्यानंतर चालू झालेलं अंतराळयुग, वाढत्या स्पर्धेत संहारक शस्त्रांबरोबर वाढलेली माणसाची हिंसक सत्तालालसा या सर्वांना स्पर्शून नारळीकरांनी हे अतिशय भन्नाट असं "अभयारण्य" साकारलं आहे.

एक पृथ्वीवासी म्हणून जयंत नारळीकर आपल्याला या कादंबरीतून अस्वस्थ, अंतर्मुख करतात. शिवाय विश्वाच्या या अफाट पसार्‍यात पृथ्वी एक नगण्य बिंदू असली तरीही माणसाच्या हाती असलेल्या आतापर्यंतच्या खगोलशास्त्रीय पुराव्यानुसार पृथ्वीच हे एकमेव असं स्थान आहे जिथे सध्या जीवसृष्टी नांदत आहे आणि त्यामुळे या एकमेवाद्वितीय अशा आपल्या पृथ्वीचे रक्षण करण्याची जबाबदारी, पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकवून ठेवण्याची जबाबदारी माणसाचीच आहे हेसुद्धा आपल्याला पटवून देण्यात नारळीकर यशस्वी झाले आहेत.

प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी एक दर्जेदार विज्ञान कादंबरी  "अभयारण्य".





संदीप प्रकाश जाधव

No comments:

Post a Comment

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये