Tuesday, January 26, 2021

"गांधी का मरत नाही"

 


लेखक : चंद्रकांत वानखडे

प्रकाशक : मनोविकास प्रकाशन


चंद्रकांत वानखडे यांचं सध्या बरंच चर्चेत असणारं पुस्तक "गांधी का मरत नाही" हे आज वाचून पूर्ण केलं. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला माहित असणारे गांधीजी म्हणजे शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकात शिकले किंवा शिकवले गेले इतकाच काय तो परिचय. याच्याव्यतिरिक्त गांधीजी ऐकत आलो ते लहानपणापासून मित्रांमध्ये होणाऱ्या त्यांच्या टिंगलटवाळीतून आणि त्यांच्यावर केलेल्या विनोदांमधून, भले स्वतः कधी त्यांच्याबद्दल वाईट बोललो नसेन पण त्या होणाऱ्या टिंगलटवाळीचा आणि विनोदांचा मी आनंद नक्कीच घेतला होता. पण तसं करणं ही चूक कमी आणि माझा मूर्खपणाच जास्त होता हे चंद्रकांत वानखडेंचे "गांधी का मरत नाही" या पुस्तक वाचनानंतर मला प्रकर्षाने जाणवले. पूर्वीपासूनच आवर्जून असे गांधींविषयी जाणून घेण्याची ना कधी इच्छा झाली ना कधी तसा प्रयत्न केला, फक्त ऐकीव गोष्टींवरून स्वतःच्या डोळ्यांसमोर गांधीजींची एक खलनायकी प्रतिमा बनवून टाकली. आजपर्यंत गांधीजींवर लाखो पुस्तके लिहिली गेली पण सध्या वाचनात आलेल्या चंद्रकांत वानखडेंच्या "गांधी का मरत नाही" या पुस्तकाने माझ्या मनात बनलेल्या गांधीजींच्या त्या खलनायकी प्रतिमेवरील पडदा अक्षरशः फाडून टाकला आणि एक वेगळेच गांधीजी डोळ्यासमोर उभे राहिले. आज गांधी जन्माला १५१ वर्षें होऊनसुद्धा सामान्य लोकांमध्ये त्यांच्याबद्दल अजूनही बऱ्याच अफवा, बरेच गैरसमज आहेत. काही लोकांच्या मते गांधीजी मुस्लिमधार्जिणे होते तर काहींच्या मते ते हिंदुधार्जिणे होते, काहींना वाटते गांधी जातीयवाद मानणारे होते, सर्वांवर कळस म्हणजे काहींना गांधी स्त्रीलंपट होते असं वाटतं, गांधी वर्णभेदी होते, त्यांच्यामुळेच देशाची फाळणी झाली, त्यांनीच पाकिस्तनाला ५५ कोटी देण्यास भाग पाडले, त्यांच्यामुळेच भगतसिंग फासावर गेले असं म्हणणाऱ्यांचीही काहीच कमी नाही पण या आणि अशा बऱ्याच गोष्टी चंद्रकांत वानखडे यांनी त्यांच्या "गांधी का मरत नाही" या पुस्तकातील १५ प्रकरणांमधून खोडून काढल्या आहेत. शिवाय गांधी-सावरकर, गांधी-टिळक, गांधी-सुभाषचंद्र बोस यांच्या नात्यांमधे असणाऱ्या समज-गैरसमजांवरसुद्धा वानखडेंनी "गांधी का मरत नाही" मधून प्रकाश टाकला आहे. भलेही या एका पुस्तकातून पूर्ण गांधीजी समजणार नाहीत पण त्यांच्याविषयी असणारे गैरसमज नक्कीच दूर होतील आणि त्यांच्याबद्दल आणखी जाणून घेण्याची इच्छा निर्माण होईल असं हे चंद्रकांत वानखडेंचे पुस्तक "गांधी का मरत नाही".

"मोहनदास करमचंद गांधी" अर्थातच "महात्मा गांधी" जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात या नावाचा उल्लेख जरी झाला तर डोळ्यासमोर येणारी पहिली प्रतिमा म्हणजे धोतर नेसलेला, हातामध्ये काठी घेतलेला, डोळ्यावर गोल चष्मा चढवून आणि चेहऱ्यावर लहान मुलासारखे निर्मळ, मन प्रसन्न करणारे हसू घेऊन उभा असणारा एक वृध्द. आज पूर्ण जगाने ज्यांची दखल घेतली त्या गांधीजींना खरंच आपण ओळखलंय का? खरंच आपल्याला ते समजलेत का? असा प्रश्न पडावा इतके ते आणि त्यांचे विचार आज दुर्लक्षिले जातात. चलनी नोटांवर किंवा प्रत्येक चौकात असणाऱ्या त्यांच्या पुतळ्याच्या रुपात रोज दर्शन देणाऱ्या गांधीजींना पाहून वाटतं की सध्याच्या घडीला ते फक्त यापुरतेच मर्यादित असावेत. कोणत्याही जाती आणि धर्मापलीकडचा हा माणूस नेहमीच फक्त टिंगलटवाळीचा विषय राहिला. त्यांची बदनामी, द्वेष तर इतका पराकोटीचा की खरं काय नी खोटं काय हा प्रश्न पडावा. सातत्याने कोणते ना कोणते आरोप झेलणारे गांधीजी समजायला तसे कठीणच, कोणत्याही प्रकारचे आरोप करायलाही गांधी गरीबच कारण त्यांच्या पाठीशी कोणतीही जात नाही. तर्काबाहेरचे आरोप आणि अतिशय खालच्या पातळीवरची केलेली निंदा मग कालांतराने तीच खरी मानली गेली, पण प्रश्न पडतो त्यांच्या मागे एखाद्या "जातीची" भिंत असती तर असे आरोप त्यांच्यावर त्या जातीच्या भिंतीने लावू दिले असते का? जातीय अस्मितेचा भडका उडेल या भीतीने त्यांच्यावर आरोप करताना जरा जपून केले गेले नसते का? तरीही कधी कधी वाटते गांधींमागे एखादी जात भिंतीसारखी उभी नाही हे खरंतर त्यांचं सर्वात मोठं वैभव आहे कारण आजही लोकमान्य असणाऱ्या टिळकांवर ब्राम्हण मक्तेदारी गाजवतात, महात्मा फुल्यांना माळ्यांचे नेते म्हटले जाते, बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचे नेते इतकेच मर्यादित ठेवलं गेलं. परंतु गांधीजींच्या नशिबी हे भाग्य आलेच नाही, ते ना कोणत्या एका धर्माचे राहिले ना कोणत्या एका जातीचे, खरे तर ते एका देशापुरतेही राहिले नाहीत, ते वैश्विक झाले आणि त्यामुळेच त्यांच्यावर बेछूट आरोप करायलाही सोपे होऊन गेले. गांधींच्या बाबतीत दुर्दैव एवढंच की ज्यांच्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य झिजवलं, त्यांना त्याची तेवढी जाणीव नाही. त्यामुळेच संपूर्ण जगाने दखल घेतलेल्या या महापुरुषाबद्दल सध्या समाजात जो द्वेष, तिरस्कार वाढलेला आहे, वाढत आहे तो खरंच विचार करायला भाग पाडणारा आहे. लाखो अनुयायी असणाऱ्या गांधीजींचे मूठभर का होईनात विरोधकही आहेतच. त्यांपैकी कोणीही त्यांच्यावर काहीही बोलू शकतो, शिव्या देऊन तोंडसुख घेऊ शकतो कारण या विरोधात बोलायला गांधींच्या मागे कोणताही एक विशेष समाज किंवा जात उभी राहत नाही. गांधीजींवर सतत आरोपांच्या फैरी उडवल्या गेल्या, हिंदूनीं त्यांना मुस्लिमधार्जिणा ठरवून टाकले तर मुस्लिमांनी त्यांना हिंदूधार्जिणा, पण मग प्रश्न पडतो की गांधी नक्की होते तरी कोण आणि कोणाचे? तर गांधी फक्त आणि फक्त माणूसधार्जिणा होते. जात, धर्म, भाषा, प्रांत, देश यांपैकी कोणत्याही चौकटीत न बसणारे, कोणत्याही बंधनात न अडकणारे, या सर्वांपलीकडे जाऊन केवळ माणसांवर प्रेम करणारा एक महात्मा म्हणजे गांधीजी. मग प्रश्न असा पडतो की ज्या गांधींना संपूर्ण विश्व मानतो त्यांना त्यांच्याच देशात काही लोकांच्या एवढ्या द्वेषाचा आणि तिरस्काराचा सामना कशामुळे करावा लागतो? याच द्वेषापायी त्यांच्यावर गोळ्या घालून त्यांना ठार करण्यात आले आणि तरीही आज त्यांचे  पुतळे का तोडले जातात? त्यांचा पुतळा बनवून त्यावर गोळ्या का चालवल्या जातात?अहिंसेची शपथ घेतलेल्या निःशस्त्र गांधींची ३ गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली आणि त्या हत्येचे आजही या ना त्या मार्गाने समर्थन केलं जातं ते कशासाठी? एकाचवेळी गांधीजी हिंदू हिताचे मारेकरीही असतात आणि मुस्लिमविरोधीही, हे कसे? गांधीजी खरेच इतके वाईट होते तर त्यांच्याच नावाने आजही आपला देश का ओळखला जातो? आज गांधींचा इतका विरोध का होतोय? या सर्व गोष्टींचा विचार केला तर लक्षात येते याला कारणीभूत आहे वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांच्याबद्दल पसरवले गेलेले गैरसमज. चंद्रकांत वानखडे यांनी त्यांच्या पुस्तकातून याच वर्षानुवर्षे पसरत आलेल्या गैरसमजांना तडा दिला आहे.

बॅरिस्टर होऊन सुटाबुटात वावरणाऱ्या मोहनदास करमचंद गांधींचा, राष्ट्रपिता महात्मा गांधी होण्यापर्यंतचा प्रवास १६६ पाने आणि १५ प्रकरणांमधून थोडक्यात पण त्यांच्याबद्दलच्या तमाम गैरसमजांना फाटा देऊन तितक्याच ताकदीने चंद्रकांत वानखडे यांनी लोकांसमोर आणला आहे. आजपर्यंत ऐकत आलो "मजबुरी का नाम महात्मा गांधी" पण चंद्रकांत वानखडे यांनी या पुस्तकातून समोर आणलेले गांधीजी वाचत असताना लक्षात येते की "सामर्थ्याचेच नाव महात्मा गांधी होते, आहे आणि पुढेही राहील". अत्यंत पराकोटीचा द्वेष आणि तेवढेच भरभरून प्रेम या दोहोंच्या मधे मिश्कीलपणे हसत उभा असणारा हा चेहरा कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहील. कारण "गांधी मरत नाही".

प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे पुस्तक "गांधी का मरत नाही".





संदीप प्रकाश जाधव


1 comment:

  1. Great book.मी पण वाचत आहे सध्या.

    ReplyDelete

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये