Monday, June 28, 2021

"नॉट विदाऊट माय डॉटर"

 



लेखक : बेट्टी महमूदी || विल्यम हॉफर

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

मराठी अनुवाद : सौ. लीना सोहोनी

आईचं आपल्या मुलांसोबतचं नातं शब्दांपलिकडचं! कवितांमधून वर्णन केलेली आई ही नेहमीच तिची एक प्रेमळ, शांत प्रतिमा आपल्यासमोर घेऊन येते. परंतु खऱ्या आयुष्यात आपल्या मुलांसाठी प्रसंगी अतिशय कठोर होऊन धाडसीपणे निर्णय घेण्याची ताकदसुद्धा तिच्यामध्ये असते याची पुष्कळ उदाहरणे मिळतील. माणूसच नाही तर अगदी प्राणी-पक्षीही याला अपवाद नाहीत! अशा काही उदाहरणांचा विचार करायचा म्हटलं तर सर्वात प्रथम डोक्यात विचार येतो तो स्वराज्यातील "हिरकणीचा"! आपल्या तान्ह्या मुलासाठी ४५०० फूट उंच रायगडचा कडा भर अंधारात उतरून जाणाऱ्या हिरकणीकडे नेहमीच एक धाडसी मातृत्वाचं उदाहरण म्हणून पाहिलं जातं. प्रत्यक्ष शिवरायांनासुद्धा दखल घ्यावी लागणारी ती घटना! आज ३५० वर्षांनंतरसुद्धा ती कथा ऐकताना अंगावर शहारे येतात यावरूनच कल्पना करता येईल की आपल्या मुलासाठी "हिरकणीने" केलेलं धाडस किती अचाट होतं. "नॉट विदाऊट माय डॉटर" ही सत्यकथा आहे अशाच एका आधुनिक "हिरकणीची". बेट्टी महमूदी या अमेरिकन स्त्रीने आपल्या मुलीसाठी केलेल्या एका अफाट धाडसाची ही सत्यकथा! अमेरिकेत राहणार्‍या बेट्टी महमूदीला तिचा नवरा "मूडी" काही कारणाने इराणला घेऊन जातो व तिला तिच्या मुलीसोबत तिथेच डांबून ठेवण्याचा प्रयत्न करतो. बेट्टीसोबतच आपल्या चार वर्षांच्या मुलीवरही तो अनन्वित अत्याचार करतो. यातून सुटका होणे जवळजवळ अशक्य आहे याची जाणीव बेट्टीला झाल्यानंतर आपल्या व मुलीच्या सुटकेसाठी अत्यंत कठीण मार्ग अवलंबण्याचं धाडस ती करते. तिच्या या सुटकेच्या संघर्षाची आणि क्षणाक्षणाला वाचकाच्या हृदयाचा ठोका चुकवणारी ही सत्यकथा! बेट्टी महमूदी यांनी स्वतःच त्यांचा अनुभव सांगितल्यामुळे वाचत असताना त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलीवर ओढवलेल्या जीवघेण्या घटनेची दाहकता जाणवत राहते. आजही जिथे अमेरिका आणि इराण यांच्यामधून विस्तवही जात नाही तिथे ३० वर्षांपूर्वी काय परिस्थिती असेल याचा फक्त अंदाजच केलेला बरा. अशा वातावरणात फक्त आपल्या नवऱ्यावरील विश्वासाखातर, आपल्या ४ वर्षांच्या मुलीसोबत तेहरानमधे पाऊल ठेवणारी बेट्टी जेव्हा आपला अनुभव पुस्तकातून आपल्याला सांगायला चालू करते तेव्हा वाचक अक्षरशः त्या प्रवासासोबत चिकटून राहतो. तिच्यावर ओढवणाऱ्या सर्व प्रसंगांसोबत वाचक इतका एकरुप होतो की तिच्या थरारक सुटकेनंतर नकळत वाचकाच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. बेट्टीचा अमेरिका ते तेहरान आणि परत अमेरिका हा प्रवास आपल्याला खूप काही शिकवून जातो. बेट्टी महमुदी यांनी लिहिलेलं "नॉट विदाऊट माय डॉटर" हे पुस्तक म्हणजे इराणसारख्या काही धर्मांध मुस्लिम देशात व्यक्तिस्वातंत्र्य या मूलभूत हक्कासाठी स्त्रियांना आजही द्याव्या लागणार्‍या कठोर लढ्याची एक प्रातिनिधिक कहाणी आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरू नये. तब्बल १८ महिने इराणमधे नवऱ्याच्या नजरकैदेत राहिलेल्या काळात स्त्रियांसाठी जाचक असणाऱ्या मुस्लिम रूढी-परंपरा जपताना बेट्टीची होणारी तारेवरची कसरत, तेथील वातावरणात आपल्या मुलीच्या सुरक्षेसाठी - स्वातंत्र्यासाठीची तिची तळमळ - धडपड, मधेच काही काळासाठी आपल्या मुलीपासून झालेली ताटातूट आणि तेव्हा एक आई म्हणून होणारी तिची मानसिक अवस्था, तिला स्वातंत्र्याची कळालेली किंमत आणि स्वदेशी परतण्याची तीव्र इच्छा, सुटकेसाठी तिने केलेले काही अयशस्वी प्रयत्न, शेवटी नाईलाजास्तव जीवावर उदार होऊन आपल्या ४ वर्षांच्या मुलीसोबत इराणमधून बेकायदेशीररित्या पळून जाण्याचा घेतलेला धाडसी निर्णय आणि त्याच्या पूर्णत्वाचा थरारक प्रवास बेट्टी यांनी त्यांच्या या ३०४ पानी पुस्तकातून,  "नॉट विदाऊट माय डॉटर" मधून लोकांपुढे आणला आहे.

अमेरिकेत राहणारे एक सुखी आणि उच्चशिक्षित कुटुंब! डॉ. सय्यद बोझोर्ग महमुदी उर्फ मूडी, बेट्टी महमूदी आणि मुलगी माहतोब. अमेरिकेत अगदी सुखात चालू असणाऱ्या त्यांच्या संसाराला घरघर लागते ती मूडीच्या डोक्यात इराणला जाऊन आपल्या कुटुंबाला भेट देऊन येण्याच्या विचाराने. सुरुवातीला शंकेने नकार देणारी बेट्टी नंतर तयार होते ती मूडीवर असलेल्या प्रेमाखातर, विश्वासाखातर! शिवाय मूडीने दिलेला शब्द, 'आपण फक्त २ आठवडे तिकडे जाऊन, माझ्या कुटुंबाला भेटून परत यायचे'. परंतु मूडीवर आपण दाखवलेला विश्वास किती खोटा आहे याची जाणीव बेट्टीला इराणमधे पाऊल ठेवताक्षणीच होते. तरीही मूडी आपल्याला धोका देणे शक्यच नाही हा विचार मनात ठेवून ती मूडीच्या इराणमधील मोठ्या बहिणीच्या, आमे बोझोर्गच्या घरात प्रवेश करते आणि इथूनच चालू होते बेट्टीच्या इराणमधील नरकासमान वास्तव्याला! मूडीच्या घरी त्यांचा गृहप्रवेश होतो तोच मुळी एका जिवंत बकरीचे रक्त ओलांडून! जी सुरुवात असते काही विचित्र चालीरिती आणि परंपरांचा बेट्टीच्या आयुष्यातील प्रवेशाची. नंतर आमे बोझोर्गच्या घरातील अतिशय गलिच्छ वातावरण आणि स्त्रियांना दिल्या जाणाऱ्या अतिशय खालच्या पातळीवरील वागणुकीने बेट्टी हादरून जाते. शिवाय मूडीसारख्या उच्चशिक्षित डॉक्टरचा त्या सर्व गोष्टींना असणारा मूक पाठिंबा बेट्टीसाठी जास्त धक्का देऊन जातो. तरीही फक्त २च आठवड्यांचा प्रश्न आहे आणि त्यानंतर अमेरिकेला परत जायचेच आहे या भोळ्या आशेवर त्या सर्व गोष्टी आपल्या मुलीसोबत ती सहन करत राहते. परंतु इराणमधील त्यांच्या १५ दिवसांच्या वास्तव्यानंतर अमेरिकेला परत जाण्यासाठी मूडीकडून मिळालेल्या नकारात्मक प्रतिसादाने बेट्टीच्या पायाखालची जमीन सरकते आणि आपण आता इराणमध्ये पुरते फसले गेलो याची जाणीव होते. यानंतर मूडीकडून बेट्टीचे बाहेरच्या जगाशी असणारे संपर्क जवळपास पूर्णपणे तोडण्यात येतात, तिला नजरकैदेत ठेवलं जातं, तिने पूर्णपणे इस्लाम स्वीकारून इस्लाम चालीरीतीप्रमाणे राहण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जातो, शिवाय मुडीच्या नातेवाईकांकडून होणारा या मायलेकींचा छळ, मुडीकडून दोघींना होणारी जीवघेणी मारहाण आणि बेट्टीसाठी असणारी सर्वांत मोठी अडचण म्हणजे इराणी भाषा या सर्वांचा नेटाने सामना करून मूडीच्या तावडीतून निसटण्यासाठी चालवलेले प्रयत्न हे सर्व बेट्टींच्याच शब्दांत वाचत असताना वाचक सुन्न होऊन जातो. शेवटचा पर्याय म्हणून बेट्टीने पळून जाण्याचा निवडलेला मार्ग वाचकाच्या काळजाचादेखील ठोका चुकवतो. तरीही हा प्रयत्न बेट्टी कसा पूर्णत्वास नेते, ती अमेरिकेत कशी पोहचते, तिला या सर्वांत कोणा कोणाची मदत मिळते, पुढे मूडीचं काय होतं, बेट्टी सध्या कोणत्या परिस्थितीत आहे हे सर्व पुस्तकात वाचण्याचा अनुभव खासच आहे.

प्रत्येकाने आवर्जून संग्रही ठेऊन वाचावे असं एक प्रेरणादायी पुस्तक.





संदीप प्रकाश जाधव


Tuesday, June 22, 2021

"सत्तर दिवस"

 


लेखक : रवींद्र गुर्जर

प्रकाशक : श्रीराम बूक एजन्सी


पिअर्स पॉल रीड यांच्या "ALIVE" कादंबरीचे मराठी अनुवादित पुस्तक "सत्तर दिवस". रवींद्र गुर्जर यांचं "सत्तर दिवस" हे बऱ्याच जणांकडून वाचायला सुचवलेलं पुस्तक संग्रही घेऊन वाचून काढलं. सकारात्मक आणि समाधानी आयुष्य जगण्याचा संदेश देणारं हे 199 पानांचं अतिशय उत्कृष्ठ पुस्तक वाचायला घेल्यानंतर पुढं काय झालं असेल या एकाच विचाराने एकसारखं वाचून अवघ्या एका दिवसात पूर्ण केलं. जगण्याची जिद्द काय असते याचं पाना-पानावर दर्शन देणारं, सत्यघटनेवर आधारित हे पुस्तक खचलेल्या मनाला उभारी देण्याचं काम करतं. माणसाजवळ जर जिद्द असेल तर कितीही प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहता येऊ शकते हे पुस्तक वाचताना सतत जाणवत राहते. युरुग्वे हा दक्षिण अमेरिकेतील एक छोटासा देश. १२ ऑक्टोबर १९७२, युरुग्वे एअर फोर्सच्या फेअर चाइल्ड ए २२७ ह्या विमानानं पंचेचाळीस प्रवाशांसह आकाशात झेप घेतली. रग्बी खेळाडूंचा संघ चिलीकडे निघाला होता. लांबीने जगातील सर्वात जास्त आणि हिमालयाच्या बरोबरीचा पर्वत समूह, अँडीज ओलांडून त्यांना जायचं होतं. चिलीकडे जायला निघालेल्या विमानातील सर्व ४५ लोकांच्या मनात आनंदाचं उधान आलं होतं. एकमेकांसोबत गप्पा मारत, दंगा-मस्ती करत आणि रग्बी सामना जिंकल्याची स्वप्ने बघत मजेत चाललेल्या त्यातील एकालाही पुढं येऊ घातलेल्या भयानक संकटाची पुसटशीही कल्पना नव्हती. अँडीज मधून फेअर चाइल्ड विमान जाऊ लागलं आणि अचानक ते ढगात शिरलं. हिमवर्षाव तर सतत चालूच होता. दुपारी ३.३० वाजता वैमानिकानं सॅंटियागो विमानतळावर "All Good" चा संदेश दिला. परंतु त्यानंतर एकाच मिनिटात विमानाचा सॅंटियागो टॉवरसोबतचा संपर्क तुटला. झंझावती वाऱ्याने विमानाला दोन प्रचंड तडाखे दिले आणि नियतीने वाढून ठेवलेल्या भयानक संकटाची चाहूल विमानातील ४५ जणांना झाली. काही क्षणात विमान चारही बाजूंनी हिमशिखरांनी वेढलेल्या दरीत कोसळलं. ढगांमुळे आधीच प्रकाश मंदावला होता. त्यात बर्फ पडू लागला. बचावलेले व थोडया सुस्थितीत असलेले प्रवासी जखमी लोकांना बाहेर काढू लागले. फेअर चाइल्ड विमान बेपत्ता झाल्याचं आपल्या देशात सर्वांच्या लक्षात येणार आणि लवकरच आपल्याला मदत मिळणार या आशेवर ते सगळे होते. त्यांनी रेडिओ सुरु करण्याचा प्रयत्न केला पण ट्रान्समीटर निकामी झाला होता. अनेक जण भयंकर जखमी झाले होते तर काही जण जागीच मृत्युमुखी पडले होते. दिवस संपला, रात्र सुरु झाली तरी अजून मदतीचा काही पत्ता नव्हता. रात्रीच्या अंधारात ओरडणे, किंचाळणे यांशिवाय काहीही ऐकायला येत नव्हतं. पुढचे आठ दिवस चिली, अर्जेंटिना आणि युरुग्वेकडून विमानाचा जारीने शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ! अँडीजची शेकडो मैल लांबी, वादळ आणि हिमवृष्टी लक्षात घेता, विमान सापडण्याची शक्यता जवळजवळ नाहीशी झाली सोबतच विमानातील कोणीही वाचले असण्याची आशादेखील सोडून देण्यात आली. परंतु नियतीला हे मान्य नव्हतं, वाचलेल्या लोकांकडून काहीतरी अचाट पराक्रम करून घेण्यासाठीच जणू हा सर्व खेळ मांडला होता. त्या वाचलेल्या लोकांनी जगण्यासाठी केलेल्या संघर्षाची सत्यकथा म्हणजे हे पुस्तक "सत्तर दिवस".

अपघातानंतर मदतीची वाट पाहता तुटपुंज्या अन्नाच्या साठ्यावर ते एक-एक दिवस ढकलत राहतात. पुढे अन्नसाठा संपत आल्यानंतर फक्त एक चॉकलेटचा तुकडा आणि एक घोटभर रम यावर ते दिवस काढू लागतात. प्रत्येक दिवसाची सुरवात काहीतरी मदत मिळेल या आशेने होत होती आणि शेवट मात्र निराशेने होत होता. पुन्हा दुसऱ्या दिवशी नव्या उमेदिने त्यांचे प्रयत्न सुरु होत असत. परंतु आपल्याला मदत मिळणे आता अशक्य आहे त्यामुळे सुटकेचे प्रयत्न आता आपल्यालाच करावे लागतील याची त्यांना लवकरच जाणीव झाली आणि तिथून बाहेर पडण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. इथून पुढचा या सर्वांचा थरारक संघर्ष अंगावर काटा आणतो. प्रत्येक दिवस मरणाच्या दारात उभे राहण्याचा अनुभव घेऊन ते लढत राहतात. मधेच अचानक कोसळलेल्या हिमकडेने आणखीन काही लोकांचा मृत्यू होतो त्यावेळच्या प्रसंगाने तर वाचकाचे मन अक्षरशः चिरून जाते. सांघिक एकीच्या जोरावर येणाऱ्या संकटांवर ते मात करत राहतात. पोटाची आग विझवण्यासाठी आपल्याच मित्रांच्या मृतदेहांचे मांस खायची कठीण वेळ त्यांच्यावर येते. सुटकेसाठी त्यांनी केलेले वेगवेगळे प्रयत्न आणि प्रत्येकवेळी येणारे अपयश तरीही हार न मानता त्यांची चाललेली धडपड त्यांच्याकडे असणाऱ्या जिद्द आणि दुर्दम्य इच्छाशक्तीची साक्ष देते. त्यांच्यापैकीच एक लेनेसा आणि पेराडो यांनी तिथून बाहेर पडण्यासाठी केलेल्या धाडसी शोधमोहिमेला अखेर यश येते. तब्बल १० आठवड्यानंतर त्यांच्या अस्तित्वाबद्दल बाहेरील जगाला समजते. एक चिली शेतकरी आपल्या गुरांना चारण्यासाठी अँडीजच्या खोल दरीत गेला असताना त्याला दूरवर दोन माणसांच्या आकृत्या दिसतात. लेनेसा आणि पेराडो त्या शेतकर्‍याला जवळ येण्यासाठी जोरजोरात खुणावत होते परंतु त्यांचं भयानक स्वरूप आणि गुडघ्यांवर खुरडत येण्यामुळे घाबरलेल्या शेतकऱ्याने दुरुनच रुमालातून कागद-पेन त्यांच्याकडे फेकलं. दाढी वाढलेल्या,भकास चेहेर्‍याच्या आणि कपडयांचा चिंध्या झालेल्या पेराडोने काही तरी लिहून कागद परत फेकला. त्यावर लिहिलं होतं : "पर्वतावर कोसळलेल्या विमानातील मी एक उतारू आहे. मी युरुग्वेचा रहिवासी". शेवटी तब्बल ७० दिवसानंतर सर्वांची त्या जीवघेण्या संकटातून सुटका झाली.

अपघातानंतर बाहेर पडण्यासाठी त्यांनी कोणकोणते प्रयत्न केले? त्यांना कोणकोणतं अपयश येत गेलं? अपयश येवूनही ते पुन्हा दुसऱ्या दिवशी कसे प्रयत्न करत होते? जिवंत राहण्यासाठी, अन्न मिळवण्यासाठी त्यांनी कोणता मार्ग स्वीकारला? त्यानंतर ते कसे बाहेर पडू शकले? त्यांनी विमान अपघातासोबतच इतर नैसर्गिक आपत्तींना कशाप्रकारे तोंड दिलं? शेवटी ते सर्व या संकटातून कसे बाहेर पडले? हे सर्व जाणून घेण्यासाठी हे पुस्तकं नक्कीच वाचायला हवं. त्या दुर्दैवी अपघातातून ४५ जणांपैकी बचावलेल्या सोळा लोकांनी सांगितलेली त्यांच्या ७० दिवसांची ह्रदयद्रावक सत्यकथा "सत्तर दिवस".





संदीप प्रकाश जाधव





Monday, June 14, 2021

"युगांन्त"

 


लेखिका : इरावती कर्वे

प्रकाशक : देशमुख अँड कंपनी


कोणत्याही ऐतिहासिक घटनांवर होणाऱ्या संशोधानातून पुढे येणाऱ्या गोष्टी या कधीच अंतिम सत्य मानता येत नाहीत कारण जितके त्या गोष्टीच्या किंवा घटनेच्या खोलात शिरण्याचा प्रयत्न केला जातो तितक्या नवनवीन गोष्टी बाहेर येतच राहतात. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की जर डोळसपणे बघितलं तर संशोधनामुळे सत्याच्या अधिकाधिक जवळ मात्र पोहचता येते. "महाभारत" आणि "रामायण" यांना आपला इतिहास म्हणायचा की फक्त ग्रंथ याबद्दल बरीच मतमतांतरे असली तरी हजारो वर्षांपूर्वीच्या या दोन्हीही घटनांवर आजही अखंड संशोधन चालूच आहे. अशा संशोधनातून सिद्ध झालेल्या जुन्या गोष्टी वगळणे आणि नवीन गोष्टींचा समावेश करणे हे आजही अविरतपणे चालूच आहे. पण आपण ऐकलं किंवा वाचलं असलेलं "रामायण", "महाभारत" यांचा आपल्यावर असणारा प्रभावच इतका जबरदस्त आहे की बऱ्याचवेळा या संशोधनात्मक शोधांकडे दुर्लक्षच केलं जातं. जय नावाचा इतिहास आज आपण महाभारत म्हणून ओळखतो परंतु व्यासांनी महाभारत लिहिल्यापासून ते आजपर्यंत त्यामधे अनेक बदल झाले. आज आधुनिक जगात इतिहास अभ्यासकांनी महाभारताची शक्य तितकी जुनी प्रत शोधायचा प्रयत्न करून, सर्व संशोधनाअंती जी नवीन प्रत बनवली आहे त्यावर इरावती कर्वे यांचं हे पुस्तक आधारित आहे, महाभारतातील पात्रांवरील "युगान्त" ही त्यांची कादंबरी अशा नवीन संशोधनाचा आधार घेऊनच लिहिली गेली आहे त्यामुळे ही कादंबरी जितकी अलिप्तपणे वाचली जाईल तितक्या अधिक प्रमाणात महाभारतातील पात्रांची नव्याने ओळख झाल्याचा अनुभव वाचकाला मिळत राहतो. इरावती कर्वे यांनी या आवृत्तीत महाभारतातील कोणत्याही पात्राला देवत्व दिलेलं नाही, कोणतेही चमत्कार नाहीत, कठोर असला तरी पटेल असा एक इतिहास आहे. उदाहरणार्थ कादंबरीत श्रीकृष्णाच्या देवाचा अवतार या कल्पनेला छेद दिलेला आहे. नवीन संशोधनाचा दाखला देऊन श्रीकृष्ण हा एक अतुलनीय शक्ती असणारा महापुरुष होता या दृष्टिकोनातूनच त्याचं पात्र वाचकांसमोर आणलं आहे त्यामुळे महाभारत ही काल्पनिक कथा नसून तो आपला इतिहास आहे या दाव्याला एकप्रकारची पुष्टी मिळते. शास्त्रीय संदर्भ लावून जर महाभारताचे वाचन केले तर बऱ्याचशा गोष्टी अमानवीय वाटत नाहीत. फक्त त्या गोष्टी मान्य करायला आपल्या मनाची तयारी असायला हवी. इरावती कर्वे यांची "युगान्त" ही कादंबरी वाचल्यानंतर महाभारताविषयी आपल्या मनातील बऱ्याच शंकांचे निरसन होण्यासोबतच काही नवीन शंका देखील जन्माला येतात, पण साहजिकच येणाऱ्या काळात जे संशोधन होईल त्यातून त्यांचंही निरसन होईलच! सर्वांना परिचित असणाऱ्या महाभारताच्या मुख्य कथेला फाटा देऊन, शक्य तितक्या मुळ प्रतींचा अभ्यास करून महाभारतातील व्यक्तिरेखांवर लिहिलेल्या काही लेखांचा संग्रह म्हणजे हे इरावती कर्वे यांचं पुस्तक "युगान्त" ! भीष्म, गांधारी, कुंती, कर्ण, अर्जुन, भीम, द्रौपदी, द्रोण, विदुर या आणि अशा इतर पात्रांवरील लेखांसोबतच इरावती कर्वे यांनी महाभारताचा काळ शोधण्याचा प्रयत्नदेखील "युगान्त" मधून केला आहे.

महाभारतातील आपण आजपर्यंत मनात ठेवून राहिलेल्या बऱ्याच व्यक्तिरेखांच्या प्रतिमांना छेद देण्याचं काम इरावती कर्वे यांनी "युगान्त" मधून केलंय असं म्हटलं तरी ते चुकीचं नाही होणार. उदाहरणार्थ धृतराष्ट्र आणि गांधारी ह्यांच्या व्यक्तीरेखांबद्दल त्यांनी जे मत मांडलंय ते तांत्रिकदृष्ट्या अगदी योग्य वाटतं. 'गांधारीचे लग्न धृतराष्ट्राशी झाल्यानंतर तिने आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली ती पतीप्रेमाने नाही तर आपण एका मोठ्या देशाची सुंदर राजकन्या असताना भीष्माने जबरदस्ती आंधळ्या राजपुत्राशी आपल्याला लग्न करायला भाग पाडलं पण तिला कुण्या आंधळ्याची  काठी व्हायचे नव्हते म्हणून!' शिवाय दुसरा मुद्दाही असाच पटण्यासारखा आहे, डोळ्याला पट्टी बांधून गांधारीने आपल्याच वंशाच्या नाशाची बीजं पेरली असं लेखिका म्हणतात. अर्थात मुलांवर चांगले संस्कार करणं ही केवळ आईची जबाबदारी नसते. पण धृतराष्ट्राकडून याबाबत काही अपेक्षा ठेवण्यात अर्थ नसल्याने तिच्यावर जास्त जबाबदारी होती आणि ती तिने पार पाडली नाही हेही तितकंच खरं. हा मुद्दा आणखी पटवून देण्यासाठी इथे कुंतीचं उदाहरण दिलं गेलंय जिने शेवटपर्यंत आपल्या पाचही मुलांवर नजर ठेवली आणि चांगल्या वाईटाचं मार्गदर्शन केलं. महाभारतातील एखादे पात्र ठराविक  प्रसंगी एका विशिष्ट प्रकारेच का वागले असावे असा विचार शक्यतो आपण कधी केलाच नाही परंतु इरावती कर्वे लिखित "युगान्त" मधे असे बरेच प्रसंग आहेत जिथे  एखादे पात्र असे का वागले असावे यावर संशोधनात्मक संदर्भ देऊन प्रकाश टाकण्यात आला आहे ज्यामुळे वाचक विचारात पडतो. एखादी व्यक्ती जेव्हा महत्प्रयासाने काही गोष्टी सिद्धीस नेते तेव्हा त्या प्रवासात त्या व्यक्तीने बऱ्याच गोष्टी गमावल्या देखील असतात आणि महाभारतातील प्रत्येक पात्राला हे अगदी तंतोतंत लागू होते. इरावती कर्वे यांनी महाभारतातील  प्रत्येक व्यक्तिरेखेला आपल्यासमोर आणताना जे संदर्भ दिलेले आहेत ते वाचताना मनाला सतत होणारी जाणीव म्हणजे, 'मानवी प्रयत्न निष्फळ असतात, मानवी जीवन नेहमी विफलच राहणार, हा धडा मनावर बिंबवण्यासाठी तर महाभारत रचलेले नाही ना?' इरावती कर्वे यांनी कोणत्याही पात्राला अतिशयोक्ती न होऊ देता "युगान्त" मधून ज्या पद्धतीने वाचकांसमोर आणलं आहे त्यामुळे महाभारताबद्दल वेगळं असं काहीतरी वाचल्याचं समाधान हे पुस्तक देऊन जातं. परंतु मूळ संस्कृत महाभारतावर आणि तत्कालीन साहित्यावर अभ्यास करून केलं गेलेलं इरावती कर्वे यांचं या पुस्तकातील परीक्षण अलिप्तपणे आणि महाभारत-कृष्ण  यांबद्दलच्या आपल्या मनातील पूर्वकल्पना बाजूला ठेऊन वाचलं तरच एक वेगळं साहित्य वाचल्याचं समाधान मिळू शकतं. 

संग्रही ठेऊन आवर्जून वाचण्यासारखं पुस्तक "युगान्त".





संदीप प्रकाश जाधव


Monday, June 7, 2021

"वेडा विश्‍वनाथ"

 


लेखक : नारायण धारप

प्रकाशक : साकेत प्रकाशन

नारायण धारपांच्या माझ्याकडील संग्रहातील आणखीण एक दर्जेदार पुस्तक "वेडा विश्‍वनाथ". वाचकाने एखाद्या अद्भुत, रहस्यमय, अंगावर काटा आणणाऱ्या दुनियेतून सफर करून यावी अशी त्यांच्या प्रत्येक पुस्तकातील कथांची मांडणी. याआधी मी त्यांची "अघटित", "चेटकीण", "लुचाई" ही पुस्तके वाचली होती आणि प्रत्येकात असणारा समान धागा म्हणजे एक थरारक, भयप्रद, अंगावर काटा उभा करणारा, दचकवणारा आणि शेवटी वाईटावर चांगल्याच्या विजय होऊन सर्वकाही ठीकठाक झाल्यानंतर होणारा कथेचा शेवट. त्यांची ही भयकादंबरी "वेडा विश्‍वनाथ" देखील अशा कथानकाला अपवाद नाही. जरी त्यांच्या सर्व पुस्तकांमध्ये आपल्याला हा समान धागा जाणवत असला तरी प्रत्येक पुस्तकातून वाचकांपर्यंत पोहोचवलेल्या वेगवेगळ्या कथांचं श्रेय नारायण धारप यांच्या कल्पनाशक्तीला द्यावं लागेल. नारायण धारप यांच्या प्रचंड कल्पनाशक्तीचा अंदाज त्यांचं पुस्तक वाचायला घेतलं की पाना-पानावर येत राहतो. त्यांच्या कल्पना विलक्षण असण्यासोबतच प्रचंड सुसंगत आणि शात्रीय पायावर आधारित वाटतात. कथेतील शब्द आणि वर्णन यांची अतिशयोक्ती कधीच वाटत नाही. शब्द साधेच पण जबरदस्त परिणामकारक असतात. कोणत्याही प्रकारचं रहस्य जाणून घेण्याची माणसाला असणारी उत्कंठा लक्षात घेऊन लिहिलेल्या नारायण धारपांच्या कथा पहिल्या पानापासून नव्हे तर त्यांच्या कादंबरीच्या मुखपृष्ठापासूनच वाचकाला घेरायला चालू करतात असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये. संपूर्ण उपेक्षित, कोणतीही जाण नसलेला, समाजात कोणतेही स्थान नसलेला ‘वेडा विश्‍वनाथ’ आणि असामान्यांचा मेरूमणी ‘आर्यवर्मन’! आताचा क्षण आणि सहस्रकांपूर्वीचा क्षण असे विलक्षण विरोधी घटक निवडून धारपांनी मन स्तिमित करणारी कथा या कादंबरीत विणली आहे. सज्जन-दुर्जन, पाप-पुण्य, सहिष्णुता-क्रौर्य यांच्यामधे असणाऱ्या अगदी अनादी, अतिप्राचीन संघर्षाची किनार असणारी ही कादंबरी "वेडा विश्‍वनाथ".

एका मध्यमवर्गीय कुटुंबातील, शाळामास्तरांचा मुलगा विश्वनाथ. लहानपणी मलेरियासारख्या आजाराने मेंदूला झालेली दुखापत आणि त्यातूनच त्याच्या वाट्याला कायमचाच आलेला अर्धवटपणा! अशी एखाद्या चित्रपटाला शोभणारी या कथेची सुरुवात. वैचारिक वाढ एखाद्या ३ वर्षांच्या मुलाएवढी आणि शारीरिक वाढ २५-३० वर्षें असणाऱ्या, सगळ्या गावाला "वेडा विश्या" म्हणून परिचित असणाऱ्या "विश्‍वनाथ" भोवती ही कथा फिरते. स्वतःच्या प्रत्येक गोष्टींसाठी पूर्णपणे आई-वडिलांवर अवलंबून असणारा विश्याचा रोजचा दिनक्रम अगदी ठरलेला, दिवसभर गावात कुठे ना कुठे फिरत राहून काही ना काही उद्योग करायचे आणि संध्याकाळी घरी परत यायचं. "अनामिक" आणि "आर्यवर्मन" यांच्या सुप्त संघर्षात ओढला गेलेल्या विश्याच्या नकळत त्याच्याकडून करवून घेतल्या गेलेल्या अनेक गोष्टी वाचताना वाचक त्या वातावरणात हरवून जातो. एखाद्या चित्रपटाला लाजवेल इतक्या सफाईदारपणे एक-एक प्रसंग वाचकांसमोर येत राहतात. लोकांच्या नजरेपासून दूर, निर्जन ठिकाणी आर्यवर्मनकडून आपल्या कामासाठी विश्याला तयार केले जात होते, पण एक दिवस आशा या गावातीलच मुलीवर ओढवलेल्या प्रसंगानंतर कादंबरीचा प्रवास वेगळ्या मार्गाने चालू होतो आणि तो साहजिकच वाचकाला सोबत घेऊनच! गावातील गुंडांकडून आशावर झालेला अतिप्रसंगाचा प्रयत्न कथेला एक वेगळेच वळण देतो. त्या प्रसंगादरम्यान गुंडांशी दोन हात करताना आशाला दिसलेलं विश्याचं वेगळं रुप तिला आश्चर्यचकित करणारं असतं. एक-दोन शब्दांच्या पलीकडेही न बोलणारा वेडा विश्या इतकी अचाट कामगिरी कशी करू शकतो, याचे तिला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. पुढे या कथेत एन्ट्री होते ती पीएसआय अदवंत यांची. इथून पुढचा घटनाक्रम धारपांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये रंगवलेला आहे. अनेक वर्षांपूर्वी घडून गेलेल्या घटना,  "अनामिक" - "आर्यवर्मन" यांचा संघर्ष आणि वेडा विश्‍वनाथ यांचा काय संबंध असू शकतो? या विचारात वाचकाला गुंतवून कथा पुढे सरकत राहते. अनेक रहस्ये हळूहळू उलगडत जातात. अदवंत, आशा आणि विश्‍वनाथ एका दुष्ट चक्रामध्ये फसल्यानंतर त्यातून सुटण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न रंजक पद्धतीने वाचकांसमोर मांडले आहेत. त्यातून ते बाहेर पडतात का आणि वेड्या विश्वनाथाचे पुढे काय होतं? या प्रश्नांची उत्तरे साहजिकच कथेच्या शेवटी मिळतात आणि "धारप स्टाईल" ने कथेचा शेवट होतो.

भयकथांची आवड असणाऱ्यांनी आवर्जून वाचण्यासारखी कादंबरी "वेडा विश्‍वनाथ".





संदीप प्रकाश जाधव

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये