लेखक : डॉ. प्रमिला जरग
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठे- ४६८, मूूल्य- ५९५ रुपये.
स्वराज्याच्या इतिहासावर नजर टाकली तर शिवरायांचे द्वितीय पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीकडे नकळत का होईना नेहमीच दुर्लक्ष झालं आहे असं नेहमी वाटतं. त्यामुळेच की काय बऱ्याच ठिकाणी त्यांचा "एक दुर्लक्षित छत्रपती" असा उल्लेख वाचायला मिळतो. परंतु छत्रपती राजाराम महाराजांनी केलेलं कर्तृत्व किती अफाट आहे हे त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, जवळपास धुळीस मिळालेल्या स्वराज्याला दिलेल्या उभारणीकडे पाहून लक्ष्यात येतं. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बादशाह औरंगजेबाशी मराठ्यांनी सुरू केलेला स्वातंत्र्यसंग्राम हे स्वराज्याच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे मोगलांकडून पकडले जाणे हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक काळा दिवस. संभाजी महाराजांना पकडून त्यांचा अतोनात छळ करून त्यांना मारल्यानंतर मराठे संपले, मराठयांचे स्वराज्य संपले अशा भ्रमात औरंगजेब राहू लागला. मराठयांचा राजा मारला गेला, रायगड पडला, येसूबाई आणि लहान शाहू महाराज मोगलांच्या हाती सापडले, अशा या कठीण काळात अनेक मोठ-मोठे मराठी सरदार मोगलांना जाऊन मिळाले त्यामुळे दख्खन जिंकून संपूर्ण हिंदुस्थानावर आपला अंमल प्रस्थापित करण्याचं आपलं स्वप्न पूर्ण झाल्याच्या आनंदात दिल्लीकडे परत जायची स्वप्ने बघणाऱ्या औरंजेबाला आणि त्याच्या विशाल सागर सेनेला मराठ्यांनी आपली जिद्द आणि पराक्रमाच्या जोरावर पुढची २७ वर्षें लढत ठेवलं. बादशाह औरंगजेबाला त्याच्या मनसुब्यांसोबतच महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकलं. या २७ वर्षांमध्ये छत्रपती राजाराम महाराजांची ११ वर्षांची कारकीर्द आणि त्यादरम्यान झालेल्या घटना स्वराज्य राखण्यासाठी खूप महत्वाच्या होत्या. संभाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा मराठा साम्राज्य प्रचंड अडचणीत आले तेव्हा राजाराम महाराजांनी स्वराज्य रक्षणाची जबाबदारी उचलली व औरंगजेबाचे स्वराज्य काबीज करण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. लाखोंची सेना घेऊन आलेल्या औरंगजेबाला रोखणं महाकठीण काम परंतु राजाराम महाराजांचं मुत्सद्दी राजकारण आणि त्याला मिळालेल्या स्वराज्यनिष्ठ सरदारांच्या अतुल्य पराक्रमाच्या जोडीने जवळपास संपुष्टात आलेलं मराठी साम्राज्य पुन्हा उभं राहिलं! फक्त उभंच नाही तर येणाऱ्या काळात पार अटकेपार जाऊन पोहचलं. स्वराज्याच्या अत्यंत कठीण अशा काळात ११ वर्षं नेतृत्व करणाऱ्या छत्रपती राजाराम महाराजांची जीवनगाथा म्हणजे ही डॉ. प्रमिला जरग यांची कादंबरी "शिवपुत्र राजाराम". राजाराम महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत घेतलेल्या वादग्रस्त निर्णयांपैकी एक म्हणजे शिवछत्रपतींनी बंद केलेली वतनदारी पुन्हा चालू करण्याचा! पण हा वादग्रस्त धोरणात्मक निर्णय घेणं का योग्य होतं याचं उत्तर ही कादंबरी वाचत असताना वाचकांना मिळून जाते. या धोरणामुळे मोगलांच्या पदरी असणारी अनेक फौजबंद सरदार मंडळी राजाराम महाराजांजवळ जमा झाली. त्यांना त्यांनी मोगलांच्या ताब्यातील भूभागावर आक्रमण करून तो भाग आपल्या राज्याला जोडल्यास त्याचे वसुलीचे हक्क देऊ, अशा सनदा दिल्या आणि खरेतर त्यामुळे स्वराज्य राखण्याच्या कामात मोलाची मदतच झाली. राजाराम महाराजांचे हे धोरण योग्य होते का? अशा निर्णयाची खरंच आवश्यकता होती का? थोरल्या महाराजांनी उभारलेल्या स्वराज्यावर त्याचे काही विपरीत परिणाम झाले का? असे अनेक प्रश्न निर्माण करून आजही त्यावर चर्चा होतच असतात. परंतु एका गोष्टीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जातं ती म्हणजे जेव्हा मोगल बादशाहा स्वत: मराठा सरदारांना जमिनीची वतनदारी देऊन त्यांना आपल्याकडे आकर्षित करत होता तेव्हा मराठी राज्यकर्त्यांनी तसंच केलं नसतं तर मोगलांशी युद्ध करण्यासाठी आवश्यक सैन्य उभारणे त्यांना कधीच शक्य झाले नसते आणि पाठोपाठ अगदी सहजपणे औरंगजेबाने स्वराज्याचा घास घेतला असता. राजाराम महाराजांनी घेतलेल्या अशा बऱ्याच मुत्सद्दी निर्णयांवर डॉ. जरग यांनी या कादंबरीतून प्रकाश टाकला आहे. मराठा साम्राज्याच्या तिसऱ्या छत्रपतींच्या कारकिर्दीचा अत्यंत रोमहर्षक, अभिमानास्पद परंतु काही कारणांनी दुर्लक्षित राहिलेला इतिहास म्हणजे डॉ. प्रमिला जरग यांची ही कादंबरी "शिवपुत्र राजाराम".
छत्रपती राजाराम महाराज हे शिवरायांचे द्वितीय चिरंजीव. त्यांच्या वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी आधी पित्याचे आणि वर्षभरातच आईचे छत्र गमावले. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर लाखोंचे सैन्य आणि एकाहून एक मातब्बर सरदार घेऊन औरंगजेब स्वराज्यावर चालून आला. सतत ९ वर्षें संभाजी महाराज औरंगजेबाशी लढत राहिले आणि शेवटी दगाबाजीमुळे ते पकडले गेले. जवळपास सव्वामहिन्याच्या अतोनात छळानंतर औरंगजेबाने अतिशय निर्घृणपणे त्यांना ठार केले आणि संभाजी महाराजांनी अतिशय पराक्रमाने बसवलेली स्वराज्याची घडी विस्कळीत व्हायला लागली. अशा कठीण परिस्थितीत येसूबाईंनी राजाराम महाराजांचा राज्याभिषेक केला आणि ध्यानी-मनी नसताना अचानक छत्रपतीपदाची जबाबदारी त्यांच्यावर आली. स्वराज्यावर आलेल्या अतिशय भयानक संकटाच्या सावलीत, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली. औरंगजेबाने आधीच आदीलशाही आणि कुतुबशाही गिळंकृत करून तेथील बादशहांना कैदेत ठेवलं होतं! छत्रपती संभाजी महाराजांना, मराठ्यांच्या शूर-पराक्रमी छत्रपतीला ठार मारले होते! त्यानंतरच्या फक्त २च आठवड्यांत इतिकदखानाने रायगडाला वेढा घातला होता! राजधानी रायगड पडली की मराठ्यांचे साम्राज्य नष्ट झाल्यात जमा होते! राजाराम महाराजांना आणि शिवरायांच्या कुटुंबाला ताब्यात घेऊन आपली दख्खन मोहीम यशस्वी करून दिल्लीला परतायची स्वप्ने औरंगजेब पाहत होता! औरंगजेबाला जणू गगन ठेंगणे झाले होते! दख्खन मोहीम फते झाल्याच्या आनंदात त्याच्या फौजेत तर जल्लोषाला सुरुवातसुद्धा झाली होती! आपल्या पराक्रमी पतीचा मृत्यू आणि राजधानीला पडलेला वेढा, अशा कठीण प्रसंगीसुद्धा येसूबाई आपले दुःख विसरून कणखर पणे उभ्या राहिल्या आणि राजाराम महाराजांना त्यांच्या दोन पत्नी ताराराणी, राजसबाई यांच्यासह वेढ्यातून निसटून प्रतापगडाकडे पाठवण्याचा धाडसी निर्णय घेतला. रायगडला पडलेला वेढा आणि त्यातून राजाराम महाराजांची थरारक सुटका कादंबरीत वाचताना वाचक शहारून जातो. इथे शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटलेली घटना वाचकाला सहज आठवून जाते पण यावेळची परिस्थिती त्याहूनही किती कठीण होती याची जाणीवदेखील होते. रायगडावरून निसटून राजे प्रतापगाडी पोहचले आणि राजे प्रतापगडावर आहेत हे समजल्यानंतर मुक्रबखानने प्रतापगडाला वेढा दिला. राजाराम महाराज परत एकदा वेढ्यात अडकले! मग पुन्हा तिथून राजे निसटले ते पन्हाळ्यावर. तिथून त्यांनी आपला कबिला पाठवला सुरक्षित अशा विशाळगडावर. त्यानंतर राजाराम राजांनी स्वतः जिंजीच्या किल्ल्यावर निसटायचं ठरवलं. दक्षिण मोहिमेवर असताना शिवाजी महाराजांनी जिंकलेला हा जिंजीचा अभेद्य किल्ला. अगदी बेलाग असणाऱ्या या किल्ल्यामुळे महाराजांना सुरक्षितता लाभणार होती आणि औरंगजेबाशी मुकाबला करण्यासाठी थोडी फुरसत मिळणार होती. परंतु स्वराज्यापासून जवळपास ८०० किलोमीटर लांब असणाऱ्या या किल्ल्यावर पोहचणे त्यावेळच्या परिस्थितीत जवळपास अशक्य होतं. ८०० किलोमीटरचा प्रवास आणि तोही मुघल साम्राज्यातून याचा फक्त विचारच केलेला बरा पण पर्याय नव्हता! अवघ्या १८-१९ वर्षें वयाचे राजाराम महाराज लिंगायत स्वामींच्या वेषात मोजक्या लोकांच्या बरोबर अपरिमित संकटाना तोंड देऊन जिंजीच्या अलीकडे असलेल्या वेल्लोरला पोहचले. राजाराम महाराजांचा हा थरारक प्रवास वाचकाला आग्र्याहून झालेल्या शिवाजी महाराजांच्या सुटकेच्या प्रसंगाची आठवण करुन देतो. राजाराम महाराजांच्या या प्रवासादरम्यानच्या काळात दोन अतिशय दुर्दैवी घटना घडल्या. पहिली, कपटी औरंगजेबाने राजाराम राजांच्या अटकेची आणि वधाची खोटी अफवा उठवून कोणत्याही विरोधाशिवाय रायगडवर ताबा मिळवला आणि येसूबाई, शाहूराजे, जानकीबाई यांना जीव न घेण्याच्या बोलीवर ताब्यात घेतले. रायगड पडल्यानंतर स्वराज्यात फक्त विशाळगड हा एकच किल्ला शिल्लक राहिला. दुसरी दुर्दैवी गोष्ट म्हणजे ज्यांच्या जीवावर राजांनी जिंजीला जायचं एवढं मोठं धाडस केलं होतं ते हरजीराजे महाडिक आजाराने मरण पावले होते. तरीही अतिशय खडतर परिस्थितीत शांत चित्ताने राजकारण करुन, सैन्याची पुन्हा एकदा जमवाजमव करुन, दक्षिणेतील आजूबाजूच्या छोट्या राजांना आपल्याकडे वळवून, औरंगजेबासारख्या सामर्थ्यशाली शत्रूला समर्थपणे सामोरे जाऊन, त्याच्या तोडीस तोड राजकारण करून ज्या तडफेने राजाराम राजांनी स्वराज्य उभं केलं त्याला तोड नाही. अवघ्या २ किल्ल्यांपुरतं उरलेलं स्वराज्य पुन्हा २५० किल्ले जिंकून समृद्ध बनवलं. औरंगजेबाच्या ताब्यातील जवळपास सगळा मुलुख परत मिळवला. जिंजीतून पुन्हा एकदा महाराष्ट्रात येऊन साताऱ्याला राजधानी वसवली. उत्तर हिंदुस्तानात स्वाऱ्या करून औरंगजेबाला अक्षरशः हतबल करून सोडलं. मराठेशाहीला परत एकदा गतवैभव मिळवून दिले. हे सर्व केले फक्त ११ वर्षांच्या कारकिर्दीत. देवीच्या रोगाने अचानक आजारी पडून वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी सिंहगडावर अखेरचा श्वास घेण्यापूर्वी या छत्रपतींनी मराठेशाही पुन्हा मानाने उभी केली होती. छत्रपती राजाराम महाराजांची ही झळाझळती पण दुर्दैवाने दुर्लक्षित कारकीर्द डॉ. प्रमिला जरग यांनी "शिवपुत्र राजाराम" मधून वाचकांसमोर आणली आहे. तारीख-ए-महंमदी या समकालीन फारसी ग्रंथाचा लेखक छत्रपती राजारामांचा उल्लेख ‘कार्रोफर नमुदा’ (फारसी भाषेतील अर्थ 'बेडर हल्ले करणारा') असे करतो आणि या कादंबरीतील पानापानावर वाचकाला या शब्दांचा प्रत्यय येत राहतो.
आवर्जून वाचवी अशी कादंबरी.
No comments:
Post a Comment