Monday, August 16, 2021

"चक्रीवादळ"

 


लेखक : प्रभाकर पेंढारकर

प्रकाशक : मौज प्रकाशन

                                                                           पृष्ठे- १६६, मूूल्य- १५० रुपये.


उत्तरोत्तर प्रगती करणाऱ्या मानवाने निसर्गावर कितीही मात करायचा प्रयत्न केला तरी शेवटी तो निसर्गाच्या एक पाऊल मागेच राहतो. भविष्यात चंद्र आणि मंगळवार वसाहती निर्माण करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या माणसाकडे आजही निसर्गातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे नाहीत. भूकंप, त्सुनामी, वादळ, पाऊस, दुष्काळ यांद्वारे सतत निसर्गाने माणसाला त्याची जागा दाखवून दिली आहे. तरीही मानवाची प्रगती आणि निसर्ग यांचा संघर्ष असाच अविरत चालू आहे. "चक्रीवादळ" ही कादंबरी आहे अशाच एका नैसर्गिक आपत्तीवरील! सत्यघटना आणि लेखक प्रभाकर पेंढारकर यांच्या स्वानुभवातून लिहिली गेलेली ही अतिशय विदारक परिस्थितीचे दर्शन घडवणारी, माणूस निसर्गापुढे किती खूजा आहे याची जाणीव करून देणारी एका वेगळ्या प्रकारची कादंबरी "चक्रीवादळ"! ४० वर्षांपूर्वी आंध्रप्रदेशच्या सागरकिनाऱ्यावर घोंगावत आलेल्या एका राक्षसी चक्रीवादळाच्या तडाख्यात उडालेल्या हाहाकाराची विदारक कहाणी म्हणजे ही कादंबरी. आपल्या व्यवसायाचा भाग म्हणून चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचं चित्रण करणाऱ्या पेंढारकर यांनी त्यांना आलेला प्रत्यक्ष अनुभव या कादंबरीच्या माध्यमातून मांडला आहे. १९ नोव्हेंबर १९७७ ला आंध्रप्रदेशच्या समुद्रकिनाऱ्यावरील काही जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळामुळे आलेला भयानक जलप्रलय आणि त्यानंतर झालेला मृत्यूचा तांडव पेंढारकर यांनी या कादंबरीत उतरवत असताना कादंबरीला आवश्यक असणाऱ्या नायक किंवा नायिकेच्या पात्रांना छेद देऊन एका वेगळ्या पद्धतीने ती वाचकांसमोर मांडली आहे. पेंढारकर म्हणतात त्याप्रमाणे या विनाशकारी वादळाचा हा काही अहवाल नाही, तसेच ही पूर्णपणे नेहमीच्या वळणाने जाणारी कादंबरीही नाही. यातील घटना खऱ्या आहेत. कितीतरी माणसे खरी आहेत. त्यांची दुःखे खरी आहेत. दृश्य स्वरूपात दिसतो तेवढाच हा हाहाकार सिमीत नाही तर त्याचे विविध स्तरांवरील मन सुन्न करणारे परिणाम या कादंबरीत वाचायला मिळतील. ३०,००० हून अधिक लोकांचा मृत्यू, १० लाखांहून अधिक गुरांचा मृत्यू, जवळपास ३ लाख एकरातील पाण्याखाली गेलेली शेती आणि ३००० कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान या आकडेवरूनच आपण आज अंदाज बांधू शकतो ४० वर्षांपूर्वीच्या त्या महाप्रलयाचा! या भयानक नैसर्गिक आपत्तीने झालेल्या निर्घृण मृत्यूंनी पोळलेली मनं, त्यांच्या प्राणांतिक जखमा, तरीही जगण्याचा अपरिहार्य संघर्ष आणि या संघर्षाला सावरणारे मदतीचे हजारो उबदार हात या सर्वांतून साकारणारा, एकाच भयाण वास्तवाच्या असंख्य छटांचा कोलाज म्हणजे ही प्रभाकर पेंढारकरांची कादंबरी "चक्रीवादळ".

माझ्यासारख्या आजच्या पिढीतील लोकांना अलीकडे येऊन गेलेली त्सुनामी आणि त्यामुळे झालेलं नुकसान परिचयाचं आहे. त्या त्सुनामीमुळे लोकांचं झालेलं मानसिक, आर्थिक नुकसान किती भयानक आहे याच्या चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचल्या आणि मदतीचा प्रचंड ओघ त्सुनामी पीडितांसाठी चालू झाला, ज्याच्या सहाय्याने आजही ते लोक उभे रहायचा प्रयत्न करत आहेत. विविध माध्यमातून या त्सुनामीची दाहकता जगभरातल्या लोकांपर्यंत पोहचली परंतु ४० वर्षांपूर्वी येऊन गेलेलं हे "चक्रीवादळ" या त्सुनामीच्या कितीतरी पट अधिक प्रलयंकारी होतं याची जाणीव पेंढारकरांची ही कादंबरी करून देते. ताशी २५० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने वाहणाऱ्या या चक्रीवादळाने गावेच्या गावे ओसाड करून टाकली. या चक्रीवादळाने ना गरीब बघितला ना श्रीमंत! वादळाचा हा प्रचंड हाहाकार जसा असंख्य गरीब आणि सुखवस्तू माणसांच्या मृत्यूचा, तसाच तो त्यांच्या मागं उरलेल्या अनेकांच्या स्वप्नांचा व आकांक्षांचाही होता. त्यांच्या हतबल मनांचा होता तसाच तो आपल्याच घरादारांतून निर्वासित होण्याच्या असहायतेचा व निराधारतेचाही होता. येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना मानसिकदृष्ट्या विकलांग करणारा हा प्रलय माणुसकीचे अनेक पदर दाखवणारा देखील होता. प्रभाकर पेंढारकरांच्या या कादंबरीला नायक नसला तरी त्यांनी समुद्रकिनाऱ्यावर राहणारे सर्वस्व हरवलेले कोळी, सामान्य गरीब जनता, सचिवालयातील सरकारी अधिकारी, राजकीय पुढारी, रेल्वेचा इंजिन ड्राइव्हर, एका विदेशी बोटीचा कप्तान, वायुदलाचे वैमानिक, न्यूजरिलचे चित्रण करणारा भास्कर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, सोबतच या भयानक प्रलयाला माणुसकीचा धडा शिकवणारी मधु आणि तिचे सहकारी अशा आणखीणही काही पात्रांच्या माध्यमातून एक जिवंतपणा दिला आहे. अशा पात्रांच्या माध्यमातून त्या "चक्रीवादळाची" दाहकता वाचकांपर्यंत पोहचवण्यात पेंढारकर यशस्वी झाले आहेत. शिवाय अशा भयानक संकटसमयी आपल्या लोकांमागे ठामपणे उभे न राहता लालफितीच्या बंधनात अडकलेल्या यंत्रणेला देखील पेंढारकरांनी इथं फटकारलेलं पहायला मिळेल.

आवर्जून वाचण्यासारखी वास्तवदर्शी कादंबरी "चक्रीवादळ".






संदीप प्रकाश जाधव



 


No comments:

Post a Comment

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये