Tuesday, August 24, 2021

"पॅलेस्टाईन - इस्रायल : एका अस्तित्वाचा संघर्ष"

 


लेखक : अतुल कहाते

प्रकाशक : मनोविकास प्रकाशन

                                                                           पृष्ठे- २५४, मूूल्य- २५० रुपये.


लेखकाप्रमाणेच अगदी शाळेत असल्यापासून मला जर कोणत्या देशाबद्दल कुतूहल असेल तर तो म्हणजे इस्रायल. इस्रायलबद्दल चालू असणाऱ्या कोणत्याही चर्चेत इस्रायल म्हणजे नायक आणि पॅलेस्टाईन म्हणजे खलनायक हे ठरलेलंच! तेव्हा वाचन फारसं नसलं तरी मित्रांच्या गप्पांतून इस्रायल म्हणजे एक अफाट शक्तीचा देश आहे, चारी बाजूंनी दुश्मन अरब देशांनी घेरलेला असूनही स्वतःचं वेगळेपण त्यानं कसं जगावर ठसवलंय, पाण्याची कमी असूनही त्याने आधुनिक शेती कशी केली आहे, त्याचं 'water management', तंत्रज्ञानावरची त्याची मजबूत पकड, त्याची गुप्तचर संघटना 'मोसाद' सोबतच अमेरिकेच्या तोडीस तोड असणारी त्याची सैनिकी ताकद, त्याने मोडीस काढलेला दहशतवाद हेच ऐकत आलो. असेच आणखी एक ऐकून ऐकून पारायणे झालेलं वाक्य म्हणजे पॅलेस्टाईनमधल्या अतिरेक्यांनी इस्रायलवर हल्ला केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलकडून असा जबरदस्त हवाईहल्ला केला जातो की कमीतकमी १-२ वर्षें तरी पॅलेस्टाईनकडे कोणताही दहशतवादी हल्ला करण्याची ताकद राहत नाही त्यामुळे भारतानेही पाकिस्तानच्या बाबतीत असंच काही तर केलं पाहिजे तरच पाकिस्तान वठणीवर येईल! दहशतवादाच्या बाबतीत भारतानेही इस्रायल सारखंच वागलं पाहिजे! परंतु अतुल कहाते यांच्या या पुस्तक वाचनानंतर आपल्या देशाबद्दलचा अभिमान आणखी वाढेल कारण आपण इस्रायल सारखं नाही याची होणारी जाणीव! आपल्याच आश्रयदात्याला मारून, त्याला देशोधडीला लावण्याचं कृत्य करणाऱ्या इस्रायलसारखा भारत नाही याची होणारी जाणीव! पॅलेस्टाईन-इस्रायल हा संघर्ष खरं तर पॅलेस्टिनी अरब विरूद्ध ज्यू यांच्यातला आहे. हिटलरकडून लाखो ज्यू लोकांचं झालेलं हत्याकांड ही या संघर्षाची पहिली पायरी म्हंटलं तरी ते चुकीचं नाही होणार. जर्मनीचा नाझी हुकूमशहा हिटलरच्या छळछावणीतून निसटलेल्या ज्यू लोकांनी पॅलेस्टाईन या अरबांच्या देशात आश्रय घेतला सोबतच जर्मनीसह युरोपच्या अन्य भागात आश्रित म्हणून राहणाऱ्या ज्यू लोकांनीही पॅलेस्टाईनमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले. नंतर याच अल्पसंख्याक ज्यूंनी त्यांच्या आश्रयदात्या बहुसंख्य पॅलेस्टिनींना त्यांच्याच देशात निर्वासित बनवलं, अगदी नियोजनबद्धरित्या! आश्रित म्हणून राहणाऱ्या ज्यूंना आपल्या स्वतंत्र ज्यू राष्ट्राच्या निर्मितीच्या विचाराने इतकं पछाडलं की त्यांनी १२०० वर्षांच्या वास्तव्याचा वैभवशाली इतिहास लाभलेल्या पॅलेस्टिनींच्या स्वप्नांची अक्षरशः राखरांगोळी केली. आपल्याच आश्रयदात्याला देशोधडीला लावले. नंतर आपलं गेलेलं वैभव परत मिळवण्यासाठी, आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या पॅलेस्टिनींच्या चळवळीला दहशतवादाचं लेबल लावण्यात आलं आणि उलट इस्रायलच कसा वर्षानुवर्षे दहशतवाद झेलत आहे, आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ज्यूंना कसा सतत संघर्ष करावा लागत आहे हेच ठासून सांगण्यात आलं. अतुल कहाते यांनी नेमका हाच धागा पकडून या संघर्षाचा खरा इतिहास त्यांच्या पुस्तकातून समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. हा इतिहास सांगत असताना ज्यूंचा जेवढा छळ हिटलरने केला नसेल तेवढा अत्याचार ज्यूंकडून पॅलेस्टिनी अरबांवर केला गेला आणि हे पटण्यासारखे बरेच मुद्दे या पुस्तकात कहाते यांनी मांडले आहेत. पुराव्यादाखल कहाते यांनी पॅलेस्टिनी भूमीवरील नरसंहाराच्या अनेक घटनांची मुद्देसुद माहिती पुस्तकात दिली आहे. पॅलेस्टाईन-इस्रायल हा संघर्ष नेमका काय आहे? या संघर्षाला कारण असणारा नेमका खलनायक कोण आहे? दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शांततेसाठी सतत प्रयत्न चालू असताना हा वाद का आणि कशामुळे आजही चिघळत पडला आहे? जागतिक महासत्ता म्हणून मिरवणारी अमेरिका आणि आपल्या वसाहती उठवून पॅलेस्टाईनमधून निघून गेलेल्या ब्रिटनसह पाश्चिमात्य देशांची या वादात नेमकी काय भूमिका आहे? भारत या संघर्षाकडे कोणत्या नजरेने बघतो आणि भारताची यामध्ये काय भूमिका राहिली आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अतुल कहाते यांनी त्यांच्या "पॅलेस्टाईन-इस्रायल : एका अस्तित्वाचा संघर्ष" या पुस्तकातून देण्याचा प्रयत्न केला आहे.

मध्यपूर्व आशियातील स्थित्यंतरं आणि इस्लामचा उदय या पहिल्या प्रकारणापासून सुरुवात करताना लेखकांनी ज्यूंचा इतिहास, त्यांचा राष्ट्रवाद म्हणजेच झियोनिझम, बॅल्फोरच्या घोषणेचे परिणाम, पॅलेस्टाईनमधील अस्थिरता, ब्रिटिशांनी केलेला पॅलेस्टिनींच्या चळवळीवरील हल्ला आणि इस्रायलची निर्मिती, निर्मितीनंतरचा काळ, अरबांची युती, इतिहासात गाजलेली दोन युद्धे 'सहा दिवसांचं युद्ध' आणि 'दहा दिवसांचं युद्ध', यासीर अराफतचा उदय, मध्यंतरीच्या काळात शांत झालेला हा संघर्ष आणि पुन्हा चालू झालेलं हिंसाचाराचं थैमान, शेवटी इस्रायल - पॅलेस्टाईन यांच्यासोबत भारताचं असणारं नातं या आणि इतरही काही प्रकरणांतून जवळपास सात दशकांपेक्षा जास्त काळापासून चालू असणाऱ्या या संघर्षाची जवळून ओळख वाचकाला करून दिली आहे. १४ मे १९४८ ला झालेल्या इस्रायलच्या निर्मितीनंतर बळाच्या जोरावर साडेसात ते दहा लाख पॅलेस्टिनी अरबांना देशाबाहेर हाकलून लावण्यात आलं. स्वतःच्याच भूमीवरील त्यांच्या वस्त्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. या काळातल्या घटनाक्रमाचं वर्णन पॅलेस्टिनी अरब ‘अल-नक्बा’ असं करतात म्हणजेच अत्यंत दुर्दैवी आणि महाभयानक संकट! अमेरिकेने इस्रायलच्या निर्मितीला सर्वात प्रथम मान्यता तर दिलीच शिवाय संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून अनेक देशांवर दबाव टाकून इस्रायलच्या निर्मितीसाठी मार्ग मोकळा होईल याची दक्षता घेतली. याशिवाय इतरही पाश्चिमात्य देशांनी आपलं मत इस्रायलच्या बाजूने टाकलं. सोव्हिएत युनियननेही इस्रायल हा स्वतंत्र देश असल्याचं मान्य केलं. त्यामुळे ज्यूंच्या महत्त्वकांक्षी झियोनिझमला पॅलेस्टाईनचा घास गिळण्यासाठी जणू रानच मोकळं झालं. संयुक्त राष्ट्रासह कोणालाही न जुमानता इस्रायलने पॅलेस्टाईन लोकांवर जो अत्याचार केला त्याचं अगदी विस्तृत आणि मन सुन्न करणारं वर्णन पुस्तकात वाचायला मिळेल. पॅलेस्टाईन-इस्रायल वादावर दिशाभूल करणारा इतिहास लिहून ज्यू इतिहासकारांनी पॅलेस्टाईनला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं काम नेटाने पार पाडलं आहे असं सांगत असताना त्याबद्दल लेखकांनी बरेच दाखले दिले आहेत. आपली गुप्त कागदपत्रं राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली कधीही बाहेर येऊ न देणाऱ्या इस्रायलने पॅलेस्टाईनचा ऐतिहासिक दस्तावेज मात्र जाणीवपूर्वक नष्ट करून टाकला. याच्याबद्दल देखील पुस्तकात वाचायला मिळेल. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या तिन्ही धर्मांसाठी समान ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असणाऱ्या जेरुसलेम या शहराच्या वादावरसुद्धा लेखकांनी प्रकाश टाकला आहे. या सात दशकांच्या काळात इस्रायलचा प्रतिकार करण्यासाठी पॅलेस्टिनींच्या अनेक संघटनांचा आणि नेत्यांचा ठराविक अंतराने उदय होत राहिला. त्यात सर्वांत लक्ष्यात राहण्यासारखी संघटना म्हणजे पीएलओ आणि तिच्याच एका उपसंघटनेचा, फताहचा नेता 'यासिर अराफत'! फताहकडून इस्रायला तोडीस तोड उत्तर मिळू लागले आणि अराफात अरब देशांमध्ये हीरो ठरला, पुढे जाऊन तो पीएलओचाही प्रमुख बनला. त्यानंतर अराफातचा वाढता प्रभाव, दहशतवादाचं लेबल पुसण्यासाठी अराफातनं केलेल्या तडजोडी, चार दशकांच्या अखंड संघर्षानंतर १९९३ मधे इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पुढाकारानं झालेला ऐतिहासिक शांतता करार, वेस्ट बँक आणि गाझा पट्टा या भागांमध्ये पॅलेस्टिनी लोकांचं तात्पुरतं सरकार स्थापन करण्यास मिळालेली मान्यता, अराफातना मिळालेलं शांततेचं नोबेल, अराफात यांचं जन्मठिकाण आणि मृत्यूबद्दलचं गूढ याबद्दलदेखील पुस्तकात वाचायला मिळेल. नोव्हेंबर २००४ मधे अराफातच्या निधनानंतर पूर्णत्वास जात असलेली ही पॅलेस्टिनी चळवळ पुन्हा एकदा भरकटली. आजही मूळ पॅलेस्टाईनचा ७८ टक्के भूभाग इस्रायलच्या ताब्यात आहे. ५० लाखांहूनही जास्त पॅलेस्टिनी लोक आज निर्वासित छावण्यांमध्ये राहत आहेत. आपल्याच देशातून, आपल्याच भूमीवरून हाकलले गेल्याने पॅलेस्टाईन लोकांची होणारी मानसिक आणि शारीरिक फरफट शब्दांत सांगणे महाकठीण. लेखकाच्या मते, पॅलेस्टिनी लोकांची संख्या कमी करत राहणं, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणं आणि आपली दहशत आणखी वाढवणं, हाच इस्रायलचा इतिहास आहे आणि तेच त्यांचं भविष्यही असणार आहे!

इस्रायलच्या निर्मितीपासून पॅलेस्टाईन लोकांवर झालेल्या अत्याचाराची कहाणी म्हणजेच हे अतुल कहाते यांचं आवर्जून वाचण्यासारखं पुस्तक "पॅलेस्टाईन-इस्रायल : एका अस्तित्वाचा संघर्ष".






संदीप प्रकाश जाधव

No comments:

Post a Comment

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये