लेखक : जगन फडणीस
प्रकाशक : लोकवाङ्मय गृह
पृष्ठे- १३९, मूूल्य- १५० रुपये.
'कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळंच दिसतं' अशी एक मराठी म्हण आहे. हे खरं की खोटं हा जरी संशोधनाचा विषय असला तरी गांधींचा द्वेष करणाऱ्यांच्या बाबतीत ही म्हण अगदी तंतोतंत लागू होते. "गांधीदोष" झालेल्या माणसाला "गांधी" ही व्यक्ती सर्व ठिकाणी चुकीचीच दिसते. बऱ्याच वेळा इतिहासातील थोर लोकांबद्दल जाणून न घेता आपण ऐकीव गोष्टींवरच त्यांच्याबद्दल आपले मत बनवत असतो आणि गांधी, टिळक, सावरकर, आंबेडकर या लोकांबाबत हे थोडं जास्तच झालंय असं माझं वयक्तिक मत आहे. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर चंद्रकांत वानखडे यांचं "गांधी का मरत नाही" हे वाचण्यापूर्वी गांधींबद्दल अशा बऱ्याच ऐकीव गोष्टी डोक्यात घर करून होत्या आणि त्यानुसारच गांधींची एक प्रतिमा(खलनायकी) नेहमी समोर उभी रहायची, पण या पुस्तक वाचनानंतर त्या प्रतिमेला तडा तर गेलाच शिवाय गांधींच्या समकालीन लोकांबद्दल जाणून घेण्याची इच्छादेखील निर्माण झाली. गांधींच्या वाट्याला टोकाचं प्रेम आणि टोकाचा विरोध या दोन्ही गोष्टी आल्या हे चंद्रकांत वानखडे यांचं पुस्तक वाचल्यानंतर प्रकर्षाने जाणवलं. परंतु "गांधी का मरत नाही" हे पुस्तक वाचल्यानंतर डोक्यात नवीनच एका प्रश्नाने उचल खाल्ली तो म्हणजे गांधींसारख्या अशा निस्वार्थी माणसाची हत्या का झाली असावी? गांधींची हत्या का केली असावी असं जेव्हा जेव्हा कोणालाही विचारलं तेव्हा फाळणी, पंचावन्न कोटी आणि गांधींच्या मुस्लिमधार्जिणेपणामुळे हिंदूंवर होणारा अन्याय ही कारणे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे समोर येत आणि इतकी वर्षे मीही हेच समजत होतो. परंतु जगन फडणीस यांच्या "महात्म्याची अखेर" या पुस्तकाने गांधी हत्येबद्दलचा माझा हा समज पूर्णपणे खोडून काढला. हे पुस्तक हातात आलं आणि त्यांच्या हत्येचं कारण त्यामुळे उलगडलं. अगदी एकाच शब्दात सांगायचं, तर फक्त आणि फक्त "द्वेष" हे एकच कारण त्यांच्या हत्येमागे होतं हेच हे पुस्तक वाचून लक्षात येतं. जगन फडणीस यांनी तत्कालीन घटनांना जे संदर्भ आणि पुरावे दिलेले आहेत त्यावरून आजपर्यंत आपल्या मनात असणाऱ्या बऱ्याच गैरसमजांचे निरसन होते. गांधींमुळे फाळणी झाली, गांधींनी पाकिस्तानला ५५ कोटी द्यायला भाग पाडले, गांधी मुस्लिमधार्जिणे होते अशी कारणे देऊन नथुराम गोडसे कडून झालेल्या त्यांच्या खुनाचे नेहमीच समर्थन केले जाते. गांधीद्वेष करणारे हे लोक नेहमी गांधी हत्येचेदेखील समर्थन करत असतात, पण या हत्येचे असे समर्थन करणाऱ्यांपैकी किती जणांनी खरोखरच गांधी समजून घेतलाय हा एक प्रश्नच आहे. ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेने गांधींचा खून केला आणि त्यानंतर आजतागायत वरील कारणे देऊन गांधींना मारणे देशहितासाठी कसे योग्य होते म्हणणारे सोयीस्करपणे एका गोष्टीकडे साफ दुर्लक्ष करतात. ती म्हणजे १९४८ पूर्वीसुध्दा गांधींना मारण्याचे जवळपास ७ वेळा प्रयत्न केले गेले आणि तेदेखील तेव्हा, जेव्हा फाळणी आणि ५५ कोटी हे विषय चर्चेतसुद्धा नव्हते. इतकेच काय तर देशाला स्वातंत्र्य कधी मिळेल हे देखील अजून कोणी सांगू शकत नव्हते तेव्हा! म्हणजे १९३४ पासून गांधींना मारण्याचे प्रयत्न झाले. ते का? कशासाठी? याची उत्तरे न देता ३० जानेवारी १९४८ ला झालेली त्यांची हत्या खोटी कारणे देऊन कशी योग्य होती हेच सांगितले गेले आणि तोच खरा इतिहास समजून पुढच्या पिढीने या "महात्म्याला" चेष्टेचा विषय करून टाकले. अलिकडील काही वर्षांत तर हा गांधीविरोध काही लोकांनी इतका टोकाला नेऊन ठेवला आहे की गांधींना 'राष्ट्रपिता' मानण्यासदेखील विरोधाची भाषा चालू झाली आहे. जगन फडणीस यांचं हे पुस्तक गांधी द्वेष करणाऱ्या लोकांना, ते करत असलेल्या चुकीच्या प्रचाराला दिलेलं एक प्रकारचं उत्तरच आहे. सुरुवातीलाच लेखकांनी म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक म्हणजे काही महात्मा गांधींचे चरित्र नाही, गांधींवर आतापर्यंत देश-विदेशातील विद्वानांनी बरेच लिखाण केले आहे पण या सर्वांतून एक विचार सुटला आहे आणि तो म्हणजे गांधींचा खून कोणत्या कारणांतून करण्यात आला हा! गांधींच्या खुनाचे तसेच खुन्याचे सामर्थन करणारे कधी फाळणी तर कधी ५५ कोटींचे कारण पुढे करतात, पण गांधींचा खून या दोन कारणांनी नाही तर त्याहीपलीकडे असलेल्या काही कारणांमुळे झाला हे पुराव्यानिशी सांगण्याचा प्रयत्न जगन फडणीस यांनी केला आहे. महात्मा गांधींच्या आयुष्याची अखेर आणि त्यांच्या राजकारणातील काही अखेरच्या घटना यावर या पुस्तकातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न लेखकांनी केला आहे त्यामुळे "महात्म्याची अखेर" हे नाव सुद्धा तितकंच समर्पक वाटतं. ९ प्रकरणे आणि १३९ पानांतून जगन फडणीस यांनी १९३४ पासून १९४६ पर्यंत घडलेल्या बऱ्याच घटनांचा पुराव्यानिशी उल्लेख करून गांधी हत्येच्या कारणांचा नव्याने शोध घेतला आहे.
प्रत्येकाने आवर्जून वाचावे असं पुस्तक "महात्म्याची अखेर".
संदीप प्रकाश जाधव

महात्मा गांधी हिंदू हितेशी होते?
ReplyDeleteशुल्लक कारणासाठी इंदिरा गांधी यांना मारले जाते
महात्मा गांधी यांना का मारले याचं उत्तर द्या
उत्तरासाठी तुम्हाला हे पुस्तक वाचावं लागेल साहेब
Delete