लेखक : विश्वास पाटील
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
पृष्ठे- ४७३, मूूल्य- ४०० रुपये
धरणं बांधल्यामुळे राज्याची प्रगती झाली, त्या धरणाच्या पाण्यावर शेती आणि इतर उद्योग करणाऱ्या लाखो लोकांचं आयुष्य सुधारलं, एकच नाही तर आपल्या पुढच्या अनेक पिढ्या सुखी राहतील अशी व्यवस्था अनेकांनी करून ठेवली ती फक्त त्या धरणाच्या पाण्यामुळे झालेल्या प्रगतीतूनच! पण त्या लोकांचं काय ज्यांच्या शेतजमिनीवर ही धरणे बांधली गेली? त्या लोकांचं काय जी शतकानुशतके निवांत वसलेल्या गावांमध्ये आपल्या पारंपरिक जाती, निष्ठा, सण, मूल्ये जपत सुखासमाधानाने राहत होती? त्या लोकांचं काय ज्यांच्या येणाऱ्या पुढच्या सगळ्याच पिढ्यांचं कधीच न भरून येणारं नुकसान केलं या धरणाने? त्या लोकांचं काय जे "धरणग्रस्त", "विस्थापित" या नावाखाली खरंतर कायमचे बेघरच झाले? धरणामुळे सुरू झालेल्या वीज निर्मितीतून संपूर्ण राज्य जिथे आज विजेच्या प्रकाशात लखलखत आहे तिथे ज्या लोकांच्या जमिनीवर, घरांवर नांगर फिरवून ही धरणे बांधली गेली ते लोक आजही अंधारातच आहेत. याच धरणग्रस्तांच्या जीवनावर बेतलेली, त्यांच्यावर झालेल्या आणि आजही होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडणारी, त्यांच्या वेदनेचा वेध घेणारी, वास्तववादी कादंबरी म्हणजे "झाडाझडती! कोणत्याही संवेदनशील वाचकाला अक्षरशः सुन्न करून सोडणारी ही कादंबरी वाचत असताना आपल्यातीलच काही लोकांच्या वाट्याला आलेलं आयुष्य पाहून मती गुंग होऊन जाते. पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहूनच वाचकाला थोडी कल्पना येऊन जाते की विश्वास पाटलांची ही कादंबरी आपल्याला कोणत्या जगात घेऊन जाणारी आहे. स्वतःच्या मुलासाठी साखर कारखाना काढता यावा आणि त्याला पाणी मिळावं म्हणून एक खासदार धरणाचा प्रस्ताव मांडतो. साध्या भोळ्या लोकांना आश्वासनाची साखर चारतो. या धरणामुळे काही गावं दुसर्या जागी विस्थापित होणार असतात. गावातील लोक या गोष्टिला विरोध करतात कारण पिढ्यान पिढ्या इथे राहिल्याने त्या मातीशी जडलेलं त्यांचं नातं! स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळलेल्या बागायती शेती, आंबा-पेरूच्या बागा! घाम गाळून उभं केलेलं स्वतःच घर! या गोष्टी सोडून जाणं त्यांना पटत नाही. पण शेवटी सरकारच्या जोरापुढे त्यांना माघार घ्यावीच लागते आणि सुरू होतो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होणारा एक मन सुन्न करणारा प्रवास! या विस्थापित होऊ घातलेल्या गावांपैकीच एक गाव 'जांभळीगाव'. विश्वास पाटील यांनी जांभळीगावाला केंद्रस्थानी ठेवून ही कादंबरी जरी लिहिली असली तरी ही व्यथा आहे त्या सर्व धरणग्रस्तांच्या आयुष्याची जे देशाच्या कित्येक भागांत "धरणग्रस्त, "विस्थापित" म्हणून वर्षानुवर्षे धडपड करत आहेत समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन आपलं गेलेलं वैभव परत मिळवण्याची. याच लोकांच्या ससेहोलपटीची ही विश्वास पाटील यांची कादंबरी "झाडाझडती"!
कादंबरीची सुरुवात होते गोम्या कोळी आणि त्याचा हल्या(रेडा) यांच्यापसून. पखालितून हल्याच्या पाठीवर पाणी आणायचं आणि ते गावात लोकांच्या रांजणात भरून द्यायचं. त्यावर मिळणाऱ्या भाजी-भाकरीवर अगदी सुखात राहणारा गोम्या हे या कादंबरीतील पहिलं पात्र ज्याचं हे सहज, सुंदर जीवन धरणाच्या पाण्यात वाहून जातं. कादंबरी जसजशी पुढे सरकत जाते तसे जांभळी गावातील एक-एक पात्र आपल्यापुढे येऊ लागते. विश्वास पाटलांनी ज्या पद्धतीने या कादंबरीतील पात्रांना जिवंतपणा आणला आहे त्याला तोड नाही. वाचकाला ही कथा अशी काही घेरायला चालू करते की जणूकाही आपण त्या गावातील लोकांच्या व्यथा प्रत्यक्ष त्याठिकाणी उभं राहूनच अनुभवतोय आणि त्यामुळेच की काय कादंबरी वाचून झाल्यानंतर वाचक अक्षरशः सुन्न होऊन जातो हे नक्की! तर जांभळी हे एक साधेसे गाव. तिथले बहुतांश लोक अडाणी, भोळेभाबडे. फार संपन्न नसले तरी खाऊन पिऊन सुखी असलेले या गावातील लोक. अचानक एक दिवस जांभळी गावासह आजूबाजूच्या काही छोट्या खेड्यांची जमीन संपादित करून सरकार धरणाचा प्रकल्प घोषित करते. आता आपलं गावच धरणाखाली जाणार म्हणजे आपली जमीन, आपले घर, आपला परिसर आपले लोक या सर्वांना सोडून कुठल्यातरी परमुलुखात आयुष्याची घडी बसवायला जायला लागणार या एकाच विचाराने गावचे स्वास्थ्य बिघडायला चालू होते, लोक काळजीत पडतात. त्यांचं उरलेलं आयुष्य आणि पुढच्या सर्व पिढ्या एक "धरणग्रस्त", "विस्थापित" म्हणून जगायला भाग पडणार. का? कशासाठी? तर त्या धरणाच्या पाण्यावर इतरांचे मळे फुलवण्यासाठी, स्वतः अंधारात राहून इतरांना प्रकाश देण्यासाठी! एका धरणग्रस्त गावातूनच आपल्या नोकरीचा श्रीगणेशा करणारे जांभळी गावातीलच खैरमोडे गुरुजी या प्रकल्पाला विरोध करतात आणि लोकांनी याविरोधात आवाज उठवावा यासाठी प्रयत्न चालू करतात. कारण अशा धरणग्रस्त लोकांचे प्रश्न कसे वर्षानुवर्षे सुटत नाहीत, त्यांची अक्खी पिढी कशी या धरणामुळे बरबाद होते हे त्यांनी अगदी जवळून पाहिलेलं असतं. आपल्या गावाचे, गावातील लोकांचे असे होऊ नये यासाठी ते निर्धाराने विरोध करतात आणि एक चळवळच उभी करतात. धरण होणार हे निश्चित आहे हे गुरुजींना माहित असल्याने त्यांचा लढा असतो तो गावकऱ्यांच्या होणाऱ्या पुनर्वसनासाठी. आधी पुनर्वसन आणि मग धरण असा त्यांचा आग्रह असतो कारण सरकारचे प्राधान्य धरण बांधण्यास आहे आणि त्यानंतर पुनर्वसन कायमचं लटकत राहणार हे मागच्या किती तरी धरणांच्या बांधणीतून सिद्ध झालेलं असतं. या संघर्षात गुरुजी आणि त्यांची ही चळवळ काही मोजक्याच लोकांच्या विकासातील अडथळा ठरू लागते आणि त्याची परिणती गुरुजींना त्यांच्या सहकाऱ्यांसोबत होणाऱ्या तुरुंगवसात होते. पोलिसांच्या बंदोबस्तात धरणाचे काम सुरु होते. तरीही लोकांच्या भल्यासाठी गुरुजींचा या प्रकल्पाला विरोध चालूच राहतो. सरकारकडून आणि त्या जिल्ह्यातील खासदाराकडून गावातील लोकांना दररोज नव-नवी आमिषे दिली जातात. शेवटी योग्य पुनर्वसन आणि धरणग्रस्तांना नोकऱ्या या घोषणेनंतर गावकऱ्यांचा विरोध थोडा कमी होतो. त्यानंतर चालू होतो या प्रकल्पाचा नवीन अध्याय - "भूसंपादन"! भूसंपादन सुरु होते, सरकारी अधिकारी गावात येऊन जमिनी घरदार यांची मोजणी करून मुल्यमापन सुरु करतात आणि सुरुवात होते भ्रष्टाचाराला. गावातील सधन आणि राजकारणी लोकांकडून जेव्हा आपल्याच लोकांची एकप्रकारे लूट चालू होते तेव्हा खूप वाईट वाटतं. शेतकऱ्याचं कर्ज परस्पर कापून घेऊन सरकारकडून त्यांना पैसा मिळायला चालू होतो. अशाच एका भूसंपादनानंतर एका शेतकऱ्याला त्याच्या वडिलांचे कर्ज कापून, उरलेली रक्कम परस्पर अल्पबचत योजनेसाठी ठेऊन सरकारकडून शेवटी जेव्हा फक्त ५० रुपये हातात मिळतात तेव्हा या लोकांच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलं असेल याचा अंदाज न केलेलाच बरा. गावातल्या जमिनीचं मुल्यांकन, तिचा मोबदला, त्या गावातून नव्या गावात जाण्यासाठीची व्यवस्था, नव्या गावात जमिनी आणि घरासाठीच्या जागांचे वाटप, तिथे घर बांधण्यासाठी मिळणारी मदत, तिथल्या सुविधांची बांधकामे, या सगळ्या गोष्टीत फक्त घोटाळेच होत राहतात. या सर्वांत कारण नसताना भरडला जातो तो असा माणूस जो इतरांच्या सुखासाठी स्वतःच्या आयुष्याचं मातेरं करून घेतो. भ्रष्टाचारानंतरची या धरणग्रस्तांची ही ससेहोलपट इथेच संपत नाही. नव्या ठिकाणी ज्या जमिनी धरणग्रस्त लोकांना देण्यासाठी नोंद झालेल्या असतात त्या आपल्या जमिनी तेथील मूळ मालक काही न काही कारणाने काढून घ्यायला सुरुवात करतात, त्यासाठी कोर्टात सरकार विरुद्ध खटले दाखल करतात. याची परिणीती या धरणग्रस्तांचं पुनर्वसन लांबण्यात होते. शेवटी धरणग्रस्तांना निकृष्ट जमिनी मिळतात. राहण्यासाठी गावाबाहेर खराब जागा मिळते. ज्यांच्या त्यागामुळे आपल्या गावात धरणाचं पाणी आलं त्या लोकांनाच मिळणारी अशी वाईट वागणून पाहून मनाला चिरे पडतात. गुरुजींच्या नेतृत्वाखाली असणारा पुनर्वसनाच्या विरोधातील लढा त्यांच्या अखेरपर्यंत लढला जातो पण तरीही त्यांच्या पुढच्या पिढ्यांची "झाडाझडती" अखंड चालूच राहते.
धरणासारख्या गोष्टीचा हजारो लोकांच्या आयुष्यावर होणारा तितकाच मोठा परिणाम कोणत्याही प्रकारची अतिशयोक्ती न होऊ देता विश्वास पाटलांनी ज्या पद्धतीने आपल्यासमोर आणला आहे त्याला खरंच तोड नाही. मेलेल्या माणसाच्या टाळूवरील लोणी खाणारे राजकारणी, स्वतःच्या फायद्यासाठी आपल्याच लोकांना देशोधडीला लावणारे काही मोजकेच स्वार्थी लोक, अतिशय टोकाचा अन्याय होऊन सुद्धा आपल्यामुळे इतर लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन निर्वासित होऊन राहणारे 'धरणग्रस्त' अशा बऱ्याच गोष्टींमधून विश्वास पाटील यांनी वाचकाला अंतर्मुख केलं आहे. कादंबरी वाचून झाल्यानंतर आपल्या वाट्याला आलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबासोबत अशा लाखो "धरणग्रस्तांचा" विचार नकळत आपल्या डोक्यात येत राहतो हेच या कादंबरीचं यश आहे. संग्रही घेऊन आवर्जून वाचवीच अशी वास्तववादी कादंबरी "झाडाझडती".
संदीप प्रकाश जाधव
No comments:
Post a Comment