लेखक : हेन्री शॅरीयर
प्रकाशक : श्रीराम बुक एजन्सी
मराठी अनुवाद : रवींद्र गुर्जर
पृष्ठे- ३८९, मूूल्य- ३५० रुपये
वाचन चालू केल्यापासून आजपर्यंत बऱ्याच प्रेरणादायी आत्मकथा वाचून काढल्या. बहुतांशी आत्मकथा किंवा आत्मचरित्रांमध्ये नेहमीच एक समान धागा असतो, तो म्हणजे अतिशय खडतर आणि प्रतिकूल परिस्तिमध्ये स्वतःला घडवून जगासमोर सिद्ध करणाऱ्या व्यक्तीमत्वांच्या आयुष्याचा प्रवास! माझ्या वाचनात आलेलं याचं सर्वांत चांगलं आणि अतिशय प्रेरणादायी उदाहरण म्हणजे 'आनंद यादव' यांचं आत्मचरित्र! "पॅपिलॉन" ही हेन्री शॅरीयर यांची आत्मचारित्रात्मक कादंबरी मात्र याला थोडी अपवाद आहे. या पुस्तकाबद्दल खूप काही ऐकल्यानंतर ते खरेदीही केलं पण एका गुन्हेगाराची आत्मकथा वाचावी की नको याच विचारात बरेच दिवस हे पुस्तक पडून होते. आज जेव्हा वाचून झालं तेव्हा जाणवलं की आत्मविश्वास, धाडस आणि बळकट शरीराच्या जोरावर मनुष्य किती सामर्थ्य दाखवू शकतो हे जवळून अनुभवायचं असेल तर प्रत्येकाने हे पुस्तक वाचलंच पाहिजे. "पॅपिलॉन"चा फ्रेंच भाषेतील अर्थ फुलपाखरु! हेन्री शॅरीयरचं हे गुन्हेगारी जगतातील टोपण नाव. तरुण वयात गुन्हेगारी जगतात येण्यापूर्वी शॅरीयर यांनी नौदलात काम केलं होतं नंतर पुढे मनुष्यवधाच्या खोट्या गुन्ह्यात अटक होऊन त्यांना फ्रान्सच्या न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा झाली. पंच आणि खोट्या साक्षीदारांमुळे हेन्री हा समाजाला कसा घातक आहे, त्याला समाजापासून दूरच ठेवणं कसं भल्याचं आहे हे न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर गयानाच्या नरकासमान तुरुंगात हेन्रीची रवानगी झाली. आपल्यावर झालेल्या या अत्याचाराचा बदला घायचा या एकाच वेडापायी हेन्रीने तुरूंगातून पळून जाण्यासाठी तब्बल ७ अयशस्वी प्रयत्न केले आणि ८ व्या प्रयत्नात तो यशस्वी झाला. या सुटकेच्या प्रवासात त्यांनी केलेली धडपड, हजारो मैलांचा थरारक समुद्रप्रवास आणि प्रत्येक अयशस्वी पलायनानंतर त्यावेळची त्यांच्या मनाची अवस्था याचा अतिशय रोमांचकारी अनुभव आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळेल. हेन्री शॅरीयर यांची ही आत्मकथा म्हणजे त्यांचा 'अटक ते मुक्ती' हा प्रवास आहे. तुरुंगातील वातावरण, तेथील कैदी, त्यांचे राहणीमान, त्यांची वर्तणूक या सर्वांतून एक वेगळं जगच त्यांनी अतिशय खुमासदार शैलीत आपल्या या आत्मचरित्रात्मक कादंबरीतून जगासमोर आणलं आहे. रवींद्र गुर्जर यांनी तितक्याच प्रभावीपणे याचा मराठी अनुवाद केला आहे जो वाचकाला शेवटपर्यंत हेन्रीच्या या थरारक प्रवासात गुंतवून ठेवतो. वाचनाला सुरुवात केल्यानंतर वाचक त्या कादंबरीत इतका हरवून जातो की त्याला काळ-वेळ कशाचेही भान राहत नाही. एकवेळ तर अशी येते की वाचक विसरूनच जातो की आपण एका गुन्हेगाराचा जीवनप्रवास वाचत आहोत. 'पॅपि' ने केलेले प्रयत्न, त्याचं नशीब, चिकाटी, संयम, चारित्र्य, प्रामाणिकपणा, सचोटी, संघभावना, जीवापाड प्रेम, मैत्री, त्याग, वचन या सर्वांतून गुन्हेगाराच्या आतमध्ये असणारा एक वेगळाच माणूस वाचकांसमोर उभा राहतो. फ्रान्समधे कैद्यांना मिळणारी अतिशय हीन वागणूक आणि त्यांच्यावर होणारा अत्याचार यांच्या वर्णनातून एका कैद्याचं आयुष्य किती भयंकर असू शकतं हेदेखील या आत्मकथेच्या माध्यमातून हेन्री यांनी लोकांसमोर आणलं आहे. तुरुंगवासातील या अंधःकारमय जगातून बाहेर पडण्यासाठी 'पॅपिने' केलेले तब्बल ७ प्रयत्न अयशस्वी होतात आणि या सातही प्रयत्नांमधील त्याचे अनुभव आपल्याला स्वातंत्र्याची किंमत शिकवून जातात. सुटकेच्या प्रयत्नांत 'पॅपि' ज्या विविध बेटांवर जातो तिथे भेटलेल्या लोकांबद्दल वाचताना कळतं की आपलं दुःख तर यांच्यापुढे खुपच क्षुल्लक आहे. अशा बेटांवरील बऱ्याच लोकांनी केवळ हेन्रीच्या स्वभावामुळे आणि त्याच्या प्रचंड आत्मविश्वासामुळे त्याला अनेक प्रकारे मदत केली. 'पॅपिने' देखील इतरांना दिलेला शब्द कधीच मोडला नाही. सुटकेच्या या सर्व प्रयत्नांत पॅपिची त्याच्या मित्रांसोबत अनेकवेळा ताटातुट झाली, काही मित्र कायमचे दुरावले गेले, काहींचा मृत्यु झाला परंतु त्यांच्यातील मैत्री कधीच तुटली नाही. या छोट्या-छोट्या गोष्टी वाचकाला खूप काही शिकवून जातात. पॅपिने सुटकेसाठी केलेल्या ८ व्या प्रयत्नात त्याच्या साथीदाराचा एका छोट्याशा चुकीमुळे होणारा मृत्यू आयुष्यात संयम किती महत्वाचा आहे हे नकळत आपल्याला सांगून जातो. पॅपिलॉन खरंच फुलपाखरासारखं आयुष्य जगला जे ही कादंबरी वाचत असताना पाना-पानावर जाणवत राहते. पॅपिलॉनच्या यशस्वी पलायनानंतरच्या आयुष्यावर बेतलेल्या "बँको" या कादंबरीबद्दल देखील आता खूप उत्सुकता वाढली आहे. पॅपिलॉनचा "बँको" मधील हा प्रवास देखील नक्कीच वाचण्यासारखा असणार यात शंकाच नाही.
शेवटी पॅपिलॉनने दिलेला आणखी एक चांगला संदेश - "अडचणींच्या काळात आपल्या मनात सतत वेगवेगळे विचार येत राहतात, सतत अपयशाची भीती वाटत राहते प्रत्येकवेळी आपल्या विचारांवर आपला ताबा असतोच असं नाही. त्यामुळे अशावेळी ते विचार दाबून टाकण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्या विचारांची दिशा बदलावी कारण प्रवाहाला थोपवणं हे अत्यंत कठीण असतं पण त्याला दिलेली योग्य दिशा माणसाचं आयुष्य बदलू शकतं."
आत्मविश्वास, बळकट शरीरसंपदा आणि अशक्य वाटणार्या गोष्टी करण्याचं धाडस यांच्या जोरावर एक माणूस आयुष्यात किती प्रचंड साहस करू शकतो हे 'पॅपिलॉन' वरून समजेल. प्रत्येकाने संग्रही घेऊन आवर्जून वाचावं असं पुस्तक!
संदीप प्रकाश जाधव
No comments:
Post a Comment