Wednesday, January 19, 2022

"ईश्वर डॉट कॉम"

 


लेखक : विश्राम गुप्ते

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

पृष्ठे- २९१, मूूल्य- ३०० रुपये                                                                           


"ईश्वर डॉट कॉम"! पुस्तकाचं नाव आणि मुखपृष्ठ पाहूनच खरं तर हे पुस्तक मी विकत घेतलं होतं. मुखपृष्ठावरील शीर्षासनाच्या पवित्र्यातील तीन धर्माच्या तीन व्यक्ती आपलं या पुस्तकाबद्दलचं कुतूहल वाढवतात. डोकं घरीच ठेऊन एखादा चित्रपट पहायला चित्रपटगृहात जाणं आणि निखळ मनोरंजनाच्या आस्वादासोबतच अंतर्मुख होऊन काही गोष्टींचा नव्याने विचार करायला लागणं, असंच काहीसं होतं हे पुस्तक वाचून झाल्यानंतर. "ईश्वर डॉट कॉम" ही विश्राम गुप्ते यांची एक धमाल काल्पनिक कादंबरी! अगदी हसतखेळत आणि विनोदी अंगाने पुढे सरकणारी या कादंबरीची कथा जरी काल्पनिक असली तरी यातील विषय आज प्रत्येक माणसाने विचार केलाच पाहिजे असा आहे. आपल्या आसपासच घडणारी ही कथा पण त्यासाठी आवश्यकता आहे ती उघड्या डोळयांनी तिला पाहण्याची. देव, धर्म, संस्कृती आणि परंपरेच्या व्यापारीकरणात आज माणसाच्या हृदयातला ईश्वर हृदयातच हरवतो आहे. क्षणाक्षणाला प्रगती करत फक्त आणि फक्त पुढेच वाटचाल करणाऱ्या माणसाने थोडं थांबून मागं वळून बघण्याची आज गरज आहे. सध्या जरी हे आपल्याकडून होत नसलं तरी येणाऱ्या आधुनिक काळात तरी आपण 'विवेक हा तारणहार', 'समता हा ईश्वर' आणि 'प्रेम ही सर्वात टिकाऊ परंपरा' असते ही त्रिसूत्री मानणार आहोत का? निकोप समाजजीवन आणि विवेकशील नागरिकत्व डोळसपणे अंगात मुरवणार आहोत का? या प्रश्नांची उत्तरे लेखकांनी या कादंबरीच्या माध्यमातून आपल्याला शोधायला भाग पाडलं आहे. विश्राम गुप्ते यांच्या काल्पनिक जगात, अर्थातच 'देवनगरीत' आपल्याला ही कथा घेऊन जाते. 'देवनगरीत' राहणारे वेगवेगळ्या स्तरांवरचे लोक, त्यांचं आपापसातील मानसिक व भावनिक नातं, धर्म-संस्कृतीबद्दल असणारे त्यांचे विचार या सर्वांतून आकारास येणारं एक वैचारिक आणि सांस्कृतिक नाट्य असं थोडक्यात वर्णन या कादंबरीचं करता येईल. लेखकांच्या मते जिथे देवाची सत्ता चालते ती जागा म्हणजे 'देवनगरी'! विश्राम गुप्ते यांच्या कथेतील ही काल्पनिक 'देवनगरी' आहे भारत आणि सारे भारतीय आहेत या देवनगरीतील रहिवाशी! देव, धर्म, संस्कृती आणि परंपरांच्या नावाखाली आपल्या देशात म्हणजेच देवनगरीत होणाऱ्या व्यापारीकरणाच्या या धमाल विनोदी कथेत इतरही अनेक उपकथा जन्माला येतात ज्या आजच्या आपल्या देशातील वातावरणाशी मेळ तर खातातच पण सोबतच वाचकाला विचारात पाडतात. एकप्रकारे आजच्या समाजाची जी मानसिकता आहे तीच आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न गुप्ते यांनी विनोदाच्या माध्यमातून केला आहे. देवनगरीतील लोकांचा देव-धर्म या संकल्पनेवर असणारा टोकाचा विश्वास बऱ्याच ठिकाणी आपल्याला आजच्या आपल्या सामाजिक परिस्थितीच्या जवळ घेऊन जाणारा आहे. बऱ्याचशा घटना या आजच्या वातावरणाशी मिळत असल्याने एक समाज म्हणून आपला प्रवास आज कोणत्या दिशेला चालला आहे आणि त्याचा शेवट काय होऊ शकतो याचाही अंदाज वाचकाला येत राहतो. आज आपल्या देशात धर्म आणि संस्कृतीवरील खोट्या प्रेमाच्या नावाखाली जो नवीनच एक भयावह समाज तयार होऊ पाहतोय त्याचं प्रातिनिधिक स्वरूपातील, देवनगरीतील हे काल्पनिक पण सत्याच्या जवळ जाणारं चित्र म्हणजे विश्राम गुप्ते यांची कादंबरी "ईश्वर डॉट कॉम"!

आज जर आपण समाजाकडे डोळे उघडून पाहिले तर ढोबळमानाने तीन प्रकारचे लोक आपल्याला समाजात दिसतील एक 'जे पूर्णपणे नास्तिक आहेत ज्यांना धर्म आणि धर्मावर आधारित संकल्पनेवर अजिबात विश्वास नाही', दोन 'ज्यांना धर्म आणि धर्मापलिकडे काहीच दिसत नाही' आणि तीन 'जे देव-धर्म तर मानतात पण देवा-धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या कर्मकांडांवर ज्यांना संशय आहे'. भले मग हे तीनही गट कोणत्याही धर्माचे असोत कमीअधिक प्रमाणात प्रत्येक ठिकाणची वैचारिक पातळी ही सारखीच असल्याची आपल्याला जाणवेल. एक वाचक म्हणून विश्राम गुप्ते यांची ही कादंबरी आवडणं किंवा न आवडणं आपण समाजातील यांपैकी कोणत्या गटात मोडतो यावर बऱ्याच अंशी अवलंबून आहे. पण तरीही या सर्वांच्या पलिकडे जाऊन, तटस्थपणे जर आपण ही कादंबरी वाचली तर नक्कीच काहीतरी वेगळं वाचन केल्याचं समाधान देऊन जाते. देशातील आजच्या वातावरणातील संदर्भ सतत डोळ्यासमोर येत राहिल्याने कादंबरीची कथा अधिकच वाचनीय होऊन जाते. धर्म संकल्पना आणि आपले व्यवहार यावर आपण नक्कीच थोडा विचार करायला भाग पडतो.

एक वेगळं वाचन म्हणून नक्की वाचावी अशी कादंबरी "ईश्वर डॉट कॉम"!





संदीप प्रकाश जाधव


No comments:

Post a Comment

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये