Sunday, January 23, 2022

"काहून"

 




लेखक : अभिषेक कुंभार

प्रकाशक : NEW ERA पब्लिशिंग हाऊस

पृष्ठे- २४४, मूूल्य- ३०० रुपये                                                                           


पुस्तकाचा परिचय देण्यापूर्वी लेखक अभिषेक कुंभार यांना मनापासून धन्यवाद द्यावसं वाटतं कारण वैयक्तिकरित्या तरी माझ्यासाठी मराठ्यांचा हा पराक्रम अपरिचितच होता, ज्याबद्दल कधी कोणाकडून ऐकलंदेखील नव्हतं असा इतिहासातील हा मराठ्यांचा पराक्रम कादंबरीरूपात वाचत असताना आलेला अनुभव शब्दांत न सांगता येण्यासारखा असाच!!!


आता थोडंस पुस्तकाबद्दल.....

भारताचा इतिहास 'मराठ्यांच्या' उल्लेखाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. अशक्यप्राय असणाऱ्या हिंदवी स्वराज्य निर्मितीपासून ते अटकेपार झेंडा रोवून अखंड हिंदुस्थानभर आपलं राज्य स्थापन करणाऱ्या मराठा साम्राज्याचा इतिहास अनंत पराक्रमांनी भरलेला आहे. पण 'दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा' असं अभिमानाने बोलणाऱ्या आपल्यापैकी किती लोकांना 'पानिपतच्या' महासंग्रामाशिवाय मराठ्यांचे इतर पराक्रम माहित आहेत ही शंकाच आहे. आपलं दुर्दैव असं की तुकड्या-तुकड्यांनी लिहिल्या गेलेल्या मराठ्यांच्या या इतिहासातील फारच कमी आणि ठराविक गोष्टीच आज आपल्याला माहित आहेत. एक वेळ अशी होती की मराठ्यांच्या सल्ल्याशिवाय आणि मध्यस्थीशिवाय हिंदुस्थानातील कोणत्याही संस्थानचे काम होत नसे, कोणतंही राजकारण पूर्णत्वास जात नसे पण परिस्थिती हळूहळू बदलत गेली आणि मराठ्यांच्या अधिपत्याखालील एक-एक संस्थान सातासमुद्रापारहून आलेल्या मूठभर ब्रिटिशांनी आपल्या टाचेखाली घेतले. साधारणपणे १८१८ च्या दरम्यान ब्रिटिशांनी स्वराज्यातील जवळपास सर्वच किल्ले आपल्या ताब्यात घेतले. त्यांपैकीच एक किल्ला सिंहगड आणि त्याच्या पायथ्याशी असलेल्या 'कल्याण' या गावापासून या कादंबरीची कथा सुरू होते जी संपते तिथून शेकडो मैल दूर असणाऱ्या अफगाणिस्तानच्या सीमेवरील 'काहून' या ठिकाणी. एका अपरिचित ऐतिहासिक घटनेला कल्पनेची जोड देऊन पुस्तकबद्ध केलेला 'कल्याण'पासून ते 'काहून'पर्यंतचा प्रवास म्हणजेच ही कादंबरी "काहून"! मातृभूमीपासून शेकडो मैल दूर जाऊन, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मराठ्यांनी दिलेला "काहूनचा" हा लढा २४३ पानांमधून अभिषेक कुंभार यांनी ज्या पद्धतीने आपल्यासमोर उभा केला आहे तो वाचत असताना अंगावर येणारा काटा आणि शिवरायांच्या त्या मावळ्यांच्या अतुल्य पराक्रमाने होणारा अभिमान अशा दुहेरी अनुभवातून जाणारा वाचक कादंबरीच्या शेवटी भावनिक होऊन जातो. "काहून" ही एक सत्य युद्धकथा आहे जिचा संदर्भ इंग्रजी पत्रव्यवहारात सापडतो. काहूनच्या या युद्धाची आठवण म्हणून पुण्यातील एका रोडला ब्रिटिशांकडून दिलं गेलेलं 'काहून रोड' हे नावच आपल्याला मराठ्यांच्या त्या अपरिचित पराक्रमाची उंची सांगून जातं. या ऐतिहासिक घटनेबद्दल अतिषय कमी संदर्भ आणि साहित्य उपलब्ध असतानादेखील अभिषेक कुंभार यांनी या युद्धातील मराठा वीरांचा पराक्रम अतिशय सविस्तरपणे त्यांच्या कादंबरीतून मांडला आहे. कथेत गरजेनुसार काही काल्पनिक पात्रांचा समावेश लेखकांनी केला असला तरी या पराक्रमात कुठेही अतिशयोक्ती होऊ दिलेली नाही. काहूनसारख्या ठिकाणी फक्त मराठेच लढाई करू शकतात असं ब्रिटिशांना का वाटत होतं याचं उत्तरही आपल्याला कादंबरी वाचत असताना मिळून जाते. मूठभर मराठी सैनिकांनी हजारो अफगाणी टोळीवाल्यांसोबत केलेला संघर्ष आपल्याला अलीकडेच येऊन गेलेल्या 'केसरी' या चित्रपटाची आठवण करून देतो. इंग्रजांकडून लढलेल्या शीख जवानांचे 'केसरी' मधील हे युद्ध झाले होते साधारणपणे १८९७ मध्ये पण मराठ्यांनी लढलेली 'काहून'ची ही लढाई त्याच्याही आधी ५० वर्षें म्हणजे १८४० मधे लढली गेली होती. "काहून"मधील मराठ्यांचं युद्ध हे फक्त अफगाण टोळीवाल्यांसोबत नव्हतं तर मातृभूमीपासून शेकडो मैल दूर येऊन समोर उभी ठाकलेली अतिशय प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती आणि नियती यांच्याशीदेखील होतं. मराठ्यांच्या याच धगधगत्या पराक्रमाची ही अपरिचित शौर्य गाथा म्हणजे "काहून"!

एक मोठं साम्राज्य म्हणून उदयास येत असताना ब्रिटिशांचा जागतिक राजकारणातील दबदबा वाढत होता आणि याच जागतिक राजकारणाचा भाग म्हणून त्यांच्याकडून आखली गेलेली अफगाणिस्तान मोहिम म्हणजे "काहून"मधील मराठ्यांच्या पराक्रमाची सुरुवात! मातृभूमीच्या रक्षणासाठी पानिपतच्या महासंग्रामात ज्या अहमदशाह अब्दाली सोबत मराठे प्राणपणाने लढले त्याच अहमदशाहचा नातू शाह शूजा याला अफगाणिस्तानच्या गादीवर बसवण्यासाठी ब्रिटिशांनी उघडलेली ही मोहिम! स्वराज्यनिर्मितीपूर्वी आणि नंतरही मराठी सैनिकांनी आपल्या पराक्रमाने अनेक लढाया गाजवल्या, शासनकर्ते बदलत गेले पण मराठा तलवार आपल्या पराक्रमाने येणाऱ्या प्रत्येक दुश्मनाला पाणी पाजतच राहिली. म्हणूनच मराठी सैनिकांची ही ताकद जाणून असणाऱ्या ब्रटिशांची खात्री झाली होती की अफगाणिस्तानची ही अतिशय कठीण कामगिरी फक्त आणि फक्त मराठेच करू शकतात आणि त्यासाठी ब्रिटिशांनी आपल्या "बॉम्बे रेजिमेंट" अर्थातच "मराठा लाईफ इन्फंट्री"च्या तुकडीवर ही मोहिम सोपवली. अफगाणिस्तानच्या या मोहिमेत "मराठा लाईफ इन्फंट्री"कडून गझनी किल्ल्याचा पाडाव झाल्यानंतर ब्रिटिशांनी अहमदशाह अब्दालीचा नातू शाह शूजाला अफगाणिस्तानच्या गादीवर बसवले. पुढे या म्हाताऱ्या शाह शुजाला मदत करता यावी तसेच तेथील राजकारणात आपलाही वचक राहिला पाहिजे या हेतूने अफगाणिस्तानात सैन्य ठेवणं गरजेचं आहे याची जाणीव ब्रिटिशांना झाली. त्यामुळे या कामासाठी अफगाणिस्तानात येणाऱ्या आपल्या सैन्यास परतीच्या मार्गावर विसावा मिळावा म्हणून एका ठाण्याची असणारी आवश्यकता लक्षात घेऊन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बलुची टोळीवाल्यांच्या ताब्यात असणाऱ्या, अफगाणिस्तान सीमेवरील 'काहून' या गावाची निवड केली. गझनीचा पाडाव करताना सोबत असणाऱ्या मराठा सैनिकांच्या जीवावरच ही दुसरी "काहून" जिंकण्याची मोहिम आखली गेली. गझनी किल्ल्यापासून काहूनच्या गढी पर्यंतच्या मराठा सैन्याच्या खडतर प्रवासाचं लेखकांनी केलेलं वर्णन या मोहिमेत मराठ्यांच्यापुढे काय वाढून ठेवलं असेल याचा अंदाज देऊन जातं. उंचच उंच डोंगर, खोल दऱ्या, दिवसा आग ओकणारा सूर्य आणि रात्री हाडे गोठवणारी थंडी असा हा सैन्याचा प्रवास मजल-दरमजल करत "काहून"च्या गढीवर येऊन पोहचतो आणि सुरू होतो खरा संघर्ष! टोळीवाल्यांकडून "काहून"ची गढी तर सहजच ताब्यात येते पण मराठ्यांची खरी कसोटी लागते ती ही गढी राखण्यात! तब्बल ५ महिने अपुऱ्या अन्न, पाणी, दारुगोळा आणि मनुष्यबळाच्या जोरावर मराठे टोळीवाल्यांशी लढत राहतात. या ५ महिन्यांमध्ये युद्धाचे अनेक पदर अभिषेक कुंभार यांनी आपल्यासमोर उलगडून दाखवले आहेत. ५ महिने काहूनच्या पठारावर चाललेला हा थरार अंगावर शहारे आणतो. अखेर नाईलाजास्तव मराठ्यांना माघार घ्यावी लागते पण तोपर्यंत अफगाणी टोळ्यांमधे मराठ्यांच्या या शौर्याची अशी काही भीती पसरते की शेवटी होणाऱ्या तहात सर्व गोष्टी मराठ्यांच्या मनाप्रमाणेच पार पडतात आणि मातृभूमीपासून इतक्या दूर जाऊन दाखवलेल्या अतुल्य अशा पराक्रमानंतर सुरू होतो मराठ्यांचा काहून मधून परतीचा प्रवास! त्याच खडतर रस्त्यावरून!

प्रत्येकाने वाचलीच पाहिजे अशी मराठ्यांची अपरिचित शौर्यगाथा "काहून"!





संदीप प्रकाश जाधव







No comments:

Post a Comment

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये