लेखक : डॉ. एस. एल. भैरप्पा
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
मराठी अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी
पृष्ठे- २७२, मूूल्य- २९५ रुपये
"सार्थ" म्हणजे व्यापाऱ्यांचा तांडा! भैरप्पांच्या या कादंबरीची कथा आहे जवळपास ७व्या-८व्या शतकातील. कादंबरीच्या सुरुवातीलाच लेखक आपल्याला त्या कालखंडात घेऊन जातात. अगदी साधाच विषय पण मानवी मनाचे विविध पैलू उलगडत जाणारे कथानक. नागभट्ट हा या कादंबरीचा नायक. हा नागभट्ट म्हणजे तारावती नगरातील आमरुक राजाचा बालमित्र आणि अत्यंत जवळचा, विश्वासू असा राजदरबारातील एक व्यक्ती. गुरुकुलात वेदाध्ययन केलेल्या तरुण नागभट्टावर अचानकच आमरुक राजा एक गुप्त कामगिरी सोपवतो. देशोदेशी फिरणाऱ्या विविध व्यापारी 'तांड्यां'बरोबर फिरून ते करत असलेल्या व्यापाराची माहिती गोळा करण्याची ही कामगिरी, ज्या माहितीचा वापर आपण आपल्या राज्याच्या विकासासाठी करू असं आमरुक राजा नागभट्टला पटवून देतो. पण आमरुक राजाची ही खेळी खरं तर नागभट्टाच्या पत्नीला हस्तगत करण्यासाठी असते. आपल्या जिवलग मित्राने, तारावती नगराच्या राजाने आपल्याला अतिशय महत्त्वाची जबाबदारी पाड पाडण्यास निवडले या आनंदातच नागभट्ट प्रवासाला लागतो. व्यापारी 'तांड्यां'सोबत काही वर्षांचा काळ घालवल्यानंतर परत आपल्या गावी जाण्याच्या मनस्थितीत आलेल्या नागभट्टाला प्रवासातच एक धक्का बसतो जो त्याच्या पुढच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकतो. राजाच्या आज्ञेनुसार प्रवासाला निघालेल्या नागभट्टला वाटेतच आपल्या पत्नीच्या व्याभिचाराविषयी समजते. आपल्या पत्नीने आणि जिवलग मित्राने केलेल्या या विश्वासघाताने निराश होऊन घरी न परतता सार्थासोबतच वाट मिळेल तिकडे आणि नशीब नेईल तिथे जाण्याचे तो ठरवतो. इथून खऱ्या अर्थाने या कादंबरीची कथा सुरू होते. नागभट्टाच्या या प्रवासात त्याला अनेक व्यक्ती भेटतात. अनेक मानसिक स्थित्यंतरातून त्याला जावे लागते आणि मग त्यानंतर सुरू होते मानसिक द्वंद्व, "वैदीक विरुद्ध बौद्ध", "गृहस्थाश्रम विरुद्ध संन्यास", "जीवन विरुद्ध मृत्यू"! याच प्रवासाची, द्वंद्वाची कहाणी म्हणजे ही कादंबरी "सार्थ"!
सुरुवातीला थोडंस फ्लॅशबॅकमधे जाणारी ही कथा जिथे नागभट्टाला एका "सार्थात" सामिल झाल्यानंतर आलेले अनुभव वाचत असताना नकळत आपणही त्या "सार्थात" सहभागी होऊन जातो. व्यापारातील अनेक खाचाखोचा समजून घेत असताना "सार्थ" म्हणजे आपल्यासारखा सामान्य माणूस कल्पनाही करू शकणार नाही असं प्रकरण असल्याची जाणीव नागभट्टाला येते. हा "सार्थ" साधासुधा नाही तर व्यापार्यांसाठी आवश्यक असलेले सामान लादलेले पंच्याहत्तर घोडे, दोनशे बैलगाड्या, शंभर गाढवं, दररोजच्या आहारासाठी लागणारं धान्य, इतर सामान, गाड्यांची, चाकाची धाव सुटली तर बसवायला सुतार, लोहार इतका प्रचंड काफीला ज्यात बहुतेक माणसं अशी ज्यांना तलवार चालवता येते आणि स्वतःच्या व इतरांच्याही जीवाचं सोबतच मौल्यवान वस्तूंचं संरक्षण करता येतं. अशा सार्थात सहभागी होऊन मार्गक्रमण करणारा नागभट्ट या मोहीमेतून जे काही शिकत जातो त्यातून वाचकालाही बऱ्याच गोष्टी समजत राहतात. हा वरवर दिसणारा फक्त एका भौगोलिक प्रदेशातील प्रवास नसून त्याच्या अंतरंगातही एक अविरत प्रवास चालू असल्याची जाणीव वाचकला विचारात पाडते. या प्रवासात नागभट्टाला अनेक धर्म- पंथातल्या तात्विक मतभेदालाही सामोरं जावं लागतं. काही काळ "सार्था"सोबत प्रवास केल्यानंतर, नागभट्ट एका नाटक मंडळीच्या संपर्कात येतो. कृष्णावर आधारित असणा-या नाटकात त्याला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळते. "कृष्णानंद" नावाने त्याची कीर्ती सर्वदूर पसरते. बायकोने केलेल्या विश्वासघाताने खचलेला नागभट्ट त्याच कृष्णाच्या नाटकातील नटी चंद्रिकाच्या प्रेमात पडतो. परंतु ध्यानमार्गाचा अवलंब करणारी चंद्रिका नागभट्टावर प्रेम करत असूनही ती ते मान्य करत नाही. त्यामुळे नागभट्ट तिच्यापासून दूर जाण्याचे ठरवतो. एक ब्राह्मण असूनही तो तंत्रसाधनेचा मार्गाला लागतो. अनेक अनुचित मार्ग तो अवलंबतो. हटयोग आणि अघोरी तंत्रविद्या आत्मसात करण्याच्या नादात त्याचे जीवन भरकटत जाते. पण तरीही एका वळणावर त्याची आणि चंद्रिकेची पुन्हा एकदा भेट होते. नागभट्टाच्या तंत्रविद्येतील एका विधीसाठी त्याला मदत करण्यास तयार होणारी चंद्रिका नंतर त्याला "सार्थ" जगणे काय असते ते शिकवते. नागभट्ट आणि चंद्रिका यांच्यामधील हे नाते लेखकाने अगदी तरलपणे उलगडले आहे. कादंबरीतील या ७व्या-८व्या शतकातील काळात बौध्द धर्माने बहुतांश भारत व्यापलेला होता. बौध्द धर्मीय लोक वैदिक लोकांना बौद्ध धर्माचे महत्व पटवून देत असल्याचा विलक्षण प्रसंग मोठ्या खुबीने भैरप्पांनी या कादंबरीत लिहिला आहे. नालंदा विद्यापीठ, पूर्वेचं सूर्यमंदिर या ऐतिहासिक स्थळांचं वर्णन वाचकाला आपल्या इतिहासाच्या भव्यतेची जाणीव करून देतात. नागभट्टाला येणारे उलटसुलट अनुभव आयुष्यातला नेमका कोणता मार्ग खरा यावर विचार करायला वाचकाला भाग पाडतात. नागभट्टाची होणारी तगमग, सगळीकडे त्याला येणारा शून्याचा, अपूर्णत्वाचा अनुभव आणि तरीही त्याचं सतत सत्याचा शोध घेत राहाणं हा या कादंबरीतील कथेचा गाभा. चंद्रिकेसोबत राहत असताना पुढे नागभट्टाची गाठ गुरु कुमारील भट्टांशी पडते. तत्कालीन समाजामध्ये पंडित कुमारील भट्ट ही एक अतिशय आदरणीय अशी व्यक्ती होती. कुमारील भट्टांची वैदिक धर्मावर अपार श्रद्धा असूनदेखील बौध्द धर्म समजून घेण्यासाठी ते बौद्ध धर्माचा स्वीकार करतात. धर्मांतरण ही त्या काळात खूप निंदनीय गोष्ट असूनदेखील कुमारील भट्ट ते करतात. धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्माचा नैतिक अधिकार राहत नसे परंतु वैदिक धर्माचरण हा कुमारील भट्टांचा श्वास असल्यामुळे प्रायश्चित्त म्हणून सर्वांसमक्ष, स्वतः चिता रचून ते आत्मदहन करायचं ठरवतात. स्वधर्माची महती जाणून घेण्यासाठी प्रसंगी धर्मांतरणाचे पाप करून, प्रायश्चित्त म्हणून प्राणांचे बलिदान देणाऱ्या कुमारील भट्टांची धर्मनिष्ठा आणि चंद्रीकेचे निर्व्याज प्रेम या दोन गोष्टींमुळे नागभट्टाच्या भरकटलेल्या आयुष्यात खूप मोठा बदल होतो आणि शेवटी "सार्थासोबत" चालू झालेल्या या प्रवासात त्याला जीवनाची 'सार्थता' लाभते.
आपले वाचन 'सार्थ' झाल्याचा अनुभव देणारी, आवर्जून वाचावी अशी कादंबरी, "सार्थ"!!

No comments:
Post a Comment