Sunday, July 26, 2020

"रावण"...राजा राक्षसांचा


लेखक : शरद तांदळे

प्रकाशक : New Era Publications


रावण म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येणारी पहिली प्रतिमा म्हणजे एक दहा तोंडी क्रूर राक्षस. रावणाबद्दल अगदी लहानपणापासून वेगवेगळ्या पुस्तकांमधून, गोष्टींमधून, सिनेमांमधून जे ऐकत-वाचत-पाहत आलो तीच त्याची प्रतिमा डोळ्यासमोर ठेऊन त्याला आपण खलनायक ठरवून टाकलं. सीता हरण आणि त्यामुळे रामाकडून मारला गेलेला एक क्रूर,अहंकारी राक्षस-असुर म्हणजे रावण इतकीच काय ती आपल्याला त्याच्याबद्दल असणारी माहिती. सीता हरण आणि त्यातून रावणाचा झालेला अंत हा कालावधी जवळपास १२ महिन्यांचा.सीता रावणाच्या लंकेत फक्त ११ महिने १४ दिवस राहिली आणि १३ दिवस चाललेल्या राम-रावण यांच्या युध्दात रावणाचा अंत झाला, परंतु या १२ महिन्यांव्यतिरिक्तचे रावणाचे आयुष्य नेहमी अंधारातच राहिले आणि आपणही कधी ते जाणून घेण्याचा प्रयत्न नाही केला. लंकेचा असुर राजा सुमालीची मुलगी कैकसी आणि पराक्रमी ऋषि महर्षि विश्रवा यांचा "रावण" हा संकरित पुत्र. बालपणी विश्रवा ऋषिंच्या आश्रमात राहून एक ऋषिपुत्र म्हणून अभिमानाने स्वतःची ओळख करून देणारा "दशग्रीव" म्हणजेच "रावण" पुढे जाऊन लंकाधिपती झाला आणि एक असुर राजा म्हणून रामाच्या हातून त्याचा अंत झाला.एका ऋषिपुत्रापासून ते असुरांचा राजा, लंकाधिश होण्यापर्यंतचा रावणाचा प्रवास नेहमीच दुर्लक्षित राहिला. रावणाच्या आपल्याला माहिती नसलेल्या आयुष्यावर प्रकाश टाकणारी आणि एक वेगळाच रावण आपल्यासमोर उभा करणारी शरद तांदळे यांनी लिहिलेली ही कादंबरी "रावण" राजा राक्षसांचा.

विश्रवा ऋषींच्या आश्रमात जन्मल्यामुळे स्वतःला आर्य कुळातील ऋषीपुत्र समजणाऱ्या रावण आणि त्याच्या इतर भावंडांना एक दिवस अचानकच आपण असुर कुळातील असल्याचे समजल्यानंतर मिळणाऱ्या धक्क्यातून सुरुवात होते या कादंबरीची. या धक्क्यामुळे त्यांच्या बालमनावर झालेल्या आघातातून पुढे स्वतःला सिद्ध करण्यासाठी रावणाचा चालू झालेला संघर्ष आपल्याला या कादंबरीमधे वाचायला मिळेल. बालपणीच विश्रवा ऋषींचे आश्रम सोडल्यामुळे, इंद्र-विष्णुसोबतच्या युद्धानंतर लंकेतून परागंदा झालेले आपले आजोबा सुमाली आणि इतर असुरांसोबत भटकंतीचे जीवन जगत अतिशय कठीण संघर्षातून स्वतःला घडवणारा रावण, हेच सिद्ध करतो की जन्मजात मिळालेल्या कुळाने कोणीही श्रेष्ठ ठरत नाही. ज्ञान, कर्म आणि कर्तृत्वावर श्रेष्ठत्व ठरवलं जातं. हाच मंत्र जपत रावणाने स्वकर्तुत्वावर स्वतःला सिद्ध केलं. आपल्या भावंडांवर भरपूर प्रेम करणारा,आई,आजोबा आणि समस्त असुर जातीवर झालेल्या अत्याचाराने हळवा होणारा, सर्वप्रकारच्या ज्ञानार्जनासाठी नेहमीच भुकेला असणारा, महत्वकांक्षा, प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासासोबतच धैर्य,सामर्थ्य, न्याय-नितीमत्ता अशा गुणांनी संपन्न असा रावण आपल्याला या कादंबरीमधे वाचायला मिळेल. वैदिक संस्कृतीसारखी नवी राक्षस संस्कृती निर्माण करण्याची महत्वकांक्षा असणारा रावण जरी बंडखोर वाटत असला तरी असा बंडखोरच आपल्याला प्राप्त असलेल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावून नवनिर्मिती करू शकतो हे रावणाच्या आयुष्याकडे पाहून लक्षात येते.

रावणाच्या अंतास कारणीभूत असे, सीता हरण हे प्रकरण जर आपण थोडंसं बाजूला ठेवलं तर उर्वरित आयुष्यातील त्याचा संघर्ष, पराक्रम आणि कठीण परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व सिद्ध करून, लंकाधिपती राक्षसांचा राजा म्हणून एक वेगळं  साम्राज्य उभं करण्यापर्यंतचा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. दैवी किंवा काल्पनिक गोष्टींना बाजूला सारून, शरद तांदळे यांनी एक सामान्य राजा डोळ्यासमोर ठेऊन रावण लिहिल्यामुळे त्याचा संघर्ष वाचकाला जाणवत राहतो. इंद्र आणि विष्णुसोबतच्या युद्धात सुमालीने गमावलेली लंका कुबेराकडून परत मिळवणारा, समस्त विखुरलेल्या भटक्या जमाती,दैत्य,असुर, दानव यांना एका छताखाली आणून एका नवीन राक्षस संस्कृतीचा पाया रचनारा आणि स्वतःसोबतच आपल्या प्रजेलासुद्धा सोन्याच्या घरात ठेवणारा असा हा प्रजादक्ष राजा. २९ प्रकरणे आणि ४३२ पानांच्या या कादंबरीतून शरद तांदळे यांनी रावणाचे जे आयुष्य आपल्यासमोर मांडलं आहे ते वाचत असताना लेखकाप्रमाणेच आपल्यालासुद्धा पडणारे काही प्रश्न म्हणजे, आजपर्यंत आपण ज्या रावणाची दुर्गुणी,क्रूर,अहंकारी अशी विशेषणे लावून अवहेलना केली ती खरंच योग्य आहे का? महादेवाचा निस्सीम भक्त असणारा, शिवतांडवस्तोत्र, रावणसंहिता, कुमारतंत्र लिहिणारा, बुद्धिबळ व रुद्रवीणा निर्मिती करणारा विद्वान रावण खलनायक कसा काय असू शकतो?आयुर्वेद, व्यापार, वेदशास्त्र, राज्यशास्त्र, दर्शनशास्त्र यांसारख्या अनेक विषयांमधे पांडित्य मिळवूनसुद्धा  रावणाच्या वाट्याला अवहेलनाच कशी? हजारो वर्षांपासून आपण त्याचे दहन करत आलो तरी आजही न संपलेला रावण खरंच खलनायक असू शकतो का? यांसारख्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे या कादंबरीमध्ये आपल्याला मिळू शकतील आणि त्यानंतर एक वाचक म्हणून आपण ठरवू शकतो की रावण खरोखरच एक खलनायक होता की स्वतःच्या सामर्थ्यावर उभा राहिलेला एक महानायक.

कादंबरीतील काही आवडलेली वाक्ये - 

"स्वाभिमान हा कर्तृत्वाने वाढतो आणि कर्तृत्वाला मर्यादा कुळानं नाही, तर न्यूनगंडानं येतात"

"शारीरिक संघर्षापेक्षा वैचारिक संघर्ष हा मोठं यश संपादन करून देतो"

"अहंकार हा अर्धवट ज्ञानाने तयार होत असतो, ज्ञान प्राप्त झाल्यावर मत व्यक्त केलं तर अहंकारी नाही तर बंडखोर तयार होतात"

"निसर्गानं निर्माण केलेल्या गोष्टी निषिद्ध आणि अपवित्र ठरवतो,तो नास्तिक. नास्तिकपणा हा मानवनिर्मित धर्म आणि वेदांना न माननं यावरून नाही ठरत"

"युद्धातील विजय आपल्याला सामर्थ्यशाली बनवतो, पण आपण शक्तिशाली तेव्हाच होतो जेव्हा आपल्याला शस्त्र उचलण्याची गरज पडत नाही"

"ज्या धर्माच्या धारणा कालानुरूप बदलत नाहीत तो धर्म गुलामांची फौज तयार करत असतो"

"स्वकीयांवर दाखवलेला अविश्वास संकटाकडे घेऊन जातो"

"अति सुख उपभोगलं की संघर्षाची अभिलाषा कमी होते"

"स्वतःशी केलेला संवाद हा ज्ञानाच्या कक्षा रुंदावत असतो"

"धर्म, न्याय आणि भूमिका सगळं काही स्वार्थावर निर्भर असतं"


शरद तांदळे यांनी बऱ्याच अभ्यासाअंती आणि संशोधनात्मकदृष्ट्या संदर्भ शोधून, काल्पनिक घटनांना फाटा देऊन रावणाचे आयुष्य आपल्या समोर कादंबरी रुपात मांडले आहे. एक वेगळा रावण जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी ही कादंबरी "रावण" राजा राक्षसांचा.






संदीप प्रकाश जाधव






Sunday, July 19, 2020

"रॉ" भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा



लेखक : रवी आमले

प्रकाशक : मनोविकास प्रकाशन


गुप्तचरसंस्था किंवा हेरखाते हा शब्द ऐकला तर माझ्यासारख्या मराठी माणसाच्या ओठांवर येेेणारेे पहिले नाव म्हणजे स्वराज्याच्या हेरखात्याचे प्रमुख म्हणून इतिहासात नोंद असलेले बहिर्जी नाईक - जाधव यांचे. पण खरे तर गुप्तचरसंस्था ही हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेली संकल्पना आहे, अगदी महाभारतपासून त्याचे पुरावे मिळतील. कोणतेही साम्राज्य, देश राखायचे असेल तर हेरखात्याचे महत्व हे अनन्यसाधारण. इतिहासात डोकावून पाहिले तर अशी बरीच उदाहरणे मिळतील जिथे शत्रूशी समोरासमोर न लढता सुद्धा बरीच साम्राज्ये नष्ट झाली आहेत आणि त्याचे सगळे श्रेय शत्रूच्या मजबूत,प्रभावी गुप्तचरसंस्थेला तसेच पडद्यामागे राहून काम करणाऱ्या त्यांच्या हेरांना. म्हणूनच गुप्तचरसंस्था किंवा हेरखाते जितके प्रभावी तितकी त्या देशाची सुरक्षितता अबाधित. कोणत्याही देशाची गुप्तचरसंस्था ही त्या देशाचे डोळे आणि कान असतात असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. इतिहास लिहिणे एकवेळ सोपे पण एखाद्या देशाच्या गुप्तचरसंस्थेच्या कामांबद्दल, मोहिमांबद्दल लिहिणे अवघड कारण कोणत्याही गुप्तचरसंस्थेचे कामच हे इतके गुप्तपणे चालत असते की त्यांनी केलेल्या कामाचा कागदोपत्री पुरावा मिळणे महाकठीण. तरी झालेल्या किंवा होत असलेल्या घटनांची सांगड घालून अशा मोहिमांची सत्यता आणि वस्तुस्थिती यांच्या जवळ नक्कीच जाता येऊ शकते. रवि आमले यांच्या मेहनतीतून साकारलेले हे पुस्तक म्हणजे "रॉ"...रिसर्च अँड अनालिसिस विंग या संस्थेची बखरच.

"रॉ" हा प्रत्येक भारतीय माणसाच्या मनात नेहमीच असलेला कुतूहलाचा शब्द. त्याच कुतूहलामुळे "रॉ" च्या थरारक मोहिमांवर आधारलेले बरेच थ्रिलर चित्रपट सुद्धा आपण अगदी आवडीने पाहतो. पण रवि आमलेंचं हे पुस्तक वाचल्यानंतर त्या आवडीच्या जागी "रॉ" बद्दल अभिमान नक्कीच जागृत होईल. "रॉ" ने केलेल्या अनेक खऱ्याखुऱ्या थरारक, अविश्वसनीय मोहिमांबद्दल फारच कमी माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहचत असते, त्यामुळे पडद्यामागे राहून देशासाठी काम करणाऱ्या अनेक वीर हेरांना जितका मिळाला पाहिजे तितका सन्मान नाही मिळत. रवि आमले यांनी लिहिलेली ही "रॉ" ची यशोगाथा म्हणजे "रॉ" ने केलेल्या अनेक पराक्रमी मोहिमांची अभिमानास्पद कहाणी. "रॉ" ची निर्मिती करण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या काही घटना, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकारण यांचे अगदी विस्तृत वर्णन या पुस्तकामध्ये वाचायला मिळेल.  देशाची सुरक्षितता लक्षात घेऊन इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाच्या काळात २१ सप्टेंबर १९६८ मधे झालेला "रॉ" चा जन्म आणि तेव्हापासून आजअखेरपर्यंत "रॉ" ने केलेल्या अनेक कारवायांच्या कहाण्या या पुस्तकामध्ये वाचायला मिळतील. स्वातंत्र्यानंतर भारत हा एक देश म्हणून घडत असताना त्या वाटचालीमधे असणारे "रॉ" चे महत्त्व आणि पडद्यामागे  राहून त्यांनी देशाचे सार्वभौमत्व - एकात्मता टिकून राहण्यासाठी केलेल्या कारवाया या पुस्तकात वाचताना उर अभिमानाने भरून येतो. 

"रॉ" चे पहिले प्रमुख रामेश्वरनाथ काव यांच्यापासून सुरू झालेला प्रवास आजही ५२ वर्षे अविरतपणे चालू आहे तो सध्याचे प्रमुख समंत गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली. "रॉ" ने केलेल्या सगळ्याच मोहिमांची माहिती जरी या पुस्तकामध्ये नसली तरी जी २४ प्रकरणे लेखकाने मांडली आहेत ती वाचताना एक गोष्ट नक्कीच जाणवते, ती म्हणजे अमेरिकेच्या "सि.आय.ए" किंवा इस्रालायच्या "मोसाद" या अतिशय भक्कम, शक्तिशाली आणि प्रभावी मानल्या जाणाऱ्या गुप्तचरसंस्थांइतकी प्रसिद्धी जरी "रॉ" ला मिळाली नसली तरी "रॉ"ने केलेल्या धाडसी मोहिमा या दोघांहून सरस नक्कीच आहेत. जगाच्या पाठीवर "रॉ" ही अशी एकमेव गुप्तचरसंस्था आहे जिच्यामुळे स्वदेशाचा भौगोलिक नकाशा वाढला आहे आणि शत्रूराष्ट्राचा नकाशा बिघडून गेला आहे. याचे या पुस्तकामध्ये दिलेले उत्तम उदाहरण म्हणजे बांगलादेश मुक्तियुद्ध आणि त्यातून झालेली पाकिस्तानची फाळणी तसेच सिक्कीमचे भारतामध्ये झालेले सामिलीकरण. "रॉ" च्या गुप्तचरांनी केलेल्या अशा बऱ्याच थरारक, रोमांचक आणि धाडसी कारवायांचा उल्लेख रवि आमले यांनी या पुस्तकामध्ये केलेला आहे. यासोबतच "रॉ" भोवती फिरणारे भारतीय राजकारण आणि काही राजकारणी मंडळींचा हस्तक्षेप यांचाही बऱ्याच ठिकाणी उल्लेख आपल्याला पुस्तकात वाचायला मिळेल.आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचे सरकार जाऊन जनता सरकार सत्तेत आले, त्यानंतर पंतप्रधानपदी बसलेल्या मोरारजी देसाईंनी "रॉ" सोबतचे सूडबुद्धीने घेतलेले निर्णय वाचून थोडं वाईट नक्कीच वाटतं. तरीही अशा राजकारणापासून स्वतःला अलिप्त ठेऊन, फक्त आणि फक्त देशाच्या सुरक्षिततेचा विचार करून निरंतर काम करणाऱ्या "रॉ" च्या सर्व पडद्यामागच्या वीरांचे कौतुक करावे तेवढे कमीच.

जगाच्या पाठीवर दररोज कुठे ना कुठे गुप्तचारांच्या कारवाया या अखंडपणे चालूच असतात आणि त्यांना पार्श्वभूमी असते ती राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चालणाऱ्या राजकारणाची. ज्या देशाचे राजकारणी अधिक मुत्सद्दी तितक्याच त्या देशाच्या गुप्तचरसंस्थेच्या कारवाया धाडसी आणि थरारक असतात. "रॉ" सोबतसुध्दा असंच काहीसं घडलं इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाच्या काळात. इंदिरा गांधींनी घेतलेले मुत्सद्दी निर्णय आणि त्याला "रॉ" च्या मोहिमांची मिळालेली साथ हे या पुस्तकात एकत्रितपणे वाचताना आपण एका वेगळ्याच विश्वात हरवून जातो. "जसं दिसतं तसं नसतं" या वाक्याची प्रचिती पुस्तकातील प्रत्येक प्रकरण वाचताना येत राहते. स्वातंत्र्यानंतरच्या अर्धशतकापेक्षा जास्त काळात एक देश म्हणून आपण काय केलं हे जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तक नक्कीच वाचावं.

भारतीय गुप्तचरसंस्था "रॉ" चा पडद्याआडचा इतिहास, त्यांची काम करण्याची पद्धत यांबद्दल जाणून घेण्यासाठी प्रत्येक भारतीयाने अभिमानाने वाचावे असे रवि आमले यांचे पुस्तक "रॉ"...भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा.



संदीप प्रकाश जाधव



 








Sunday, July 12, 2020

"होरपळ"


लेखक : ल. सि. जाधव

प्रकाशक : रोहन प्रकाशन


एखाद्या व्यक्तीच्या आत्मकथनाचे विश्लेषण करणं तसं थोडंसं कठीणच, कारण त्यांच्या नजरेतून त्यांनी पाहिलेलं - जगलेलं त्यांचं आयुष्यच त्यांनी पुस्तकरूपात लिहिलेलं असल्यामुळे आपण ते आपल्या भाषेत इतरांना सांगणं तसं अवघडच. बऱ्याच लोकांच्या आत्मकथा मी आजपर्यंत वाचल्या त्यांपैकीच एक मनाला भावलेली आणि अत्यंत प्रेरणादायी अशी ल.सि. जाधव यांची आत्मकथा "होरपळ".

स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरसुध्दा मातंगवस्ती किंवा महारवाडा असे शब्द ऐकल्यानंतर नाके मुरडणाऱ्या लोकांची आपल्या देशात काहीच कमी नाही, अशा लोकांची नेहमीच मला कीव करावीशी वाटते. देशाच्या कोणत्याही गावा - शहराच्या हद्दीबाहेर वसवलेल्या मांगामहारांच्या वस्त्या पाहून जाणवते की आजही आपल्याला एक समाज म्हणून खूप मोठा पल्ला गाठायचा बाकी आहे. कर्मठ रूढी-परंपरा जपणाऱ्या जाचक समाजव्यवस्थेमुळे कित्येक पिढ्यांची "होरपळ" आजही होतच आहे. अशाच  एका सोलापूरातील मातंग वस्तीत जन्मलेले या पुस्तकाचे लेखक. आपण मातंग समाजात जन्माला आलो म्हणून दुःख करत बसण्यापेक्षा आपल्या बुद्धिमत्ता आणि मेहनतीच्या जोरावर आपले शिक्षण पूर्ण करून भारतीय स्टेट बँकेमधून सेवानिवृत्त झालेले ल.सि. जाधव, त्यांनी लिहिलेलं सर्वांना प्रेरणादायक असं त्यांचं आत्मकथन म्हणजेच हे पुस्तक "होरपळ".लेखकांचे हे आत्मकथन म्हणजे मातंग समाजाचा आपल्या या समाजव्यवस्थेसोबत जगत असताना दाखवलेला व्यावसायिक, सामाजिक, शैक्षणिक जीवनाचा खडतर प्रवास तर आहेच शिवाय अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा आपल्यातील माणुसकी न सोडता जगण्याची असलेली या समाजाची कला. सोबतच शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे असे हे आत्मकथन - "होरपळ". 

लेखकाचा जन्म स्वातंत्र्यापूर्वीचा, १९४५ चा. शहराच्या हद्दीबाहेर स्वतंत्र प्लॉटींग करून, पाटबंधारे विभागाने शेतीसाठी खोदलेल्या एका मोठ्या कॅनॉलच्या बाजूला वसवलेली दलित वस्ती आणि त्याचाच एक भाग असलेला मांगवाडा जिथे लहानाचे मोठे झाले ल.सि. जाधव. या वस्तीभोवतीचे निसर्गाचे जे वर्णन लेखकाने केलेलं आहे ते माझ्यासारख्या ८० - ९० आणि त्यापूर्वीच्या दशकात जन्माला आलेल्या प्रत्येक वाचकाला त्याच्या बालपणात घेऊन जाते. कारण आजकाल सिमेंटच्या जंगलात हरवलेलं असं निसर्ग सौंदर्य फक्त लहान-सहान खेड्यापाड्यातच शिल्लक राहिलंय. लेखकाचे आपल्या मित्रांच्या टोळक्याने कॅनॉलच्या काठाने निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त फिरणे, पारधी लोकांची शिकार करण्याची पध्दत, कॅनॉलच्या बारमाही पाण्यामुळे आसपास वाढलेली दाट झाडीं आणि त्यामुळे नेहमीच असणारी वेगवेगळ्या पक्ष्यांची हजेरी, वड-पिंपळ असे मोठमोठाले वृक्ष,कॅनॉलच्या जवळच असणारे घनदाट शिंदीचं बन यासह आणखीही बऱ्याच गोष्टींचे या वस्तीभोवतीचे जे वर्णन आत्मकथनाच्या सुरवातीलाच लेखकाने केलेलं आहे ते खरंच खूप सुंदर. इथेच दलीतवस्तीच्या आजूबाजूच्या परिसरात निसर्गतःच उपलब्ध असणाऱ्या बऱ्याच गोष्टींचा उपयोग करून या वस्तीतील कुटुंबे आपली पोटं भरायची. गरीबी असूनसुद्धा प्रत्येक सण अगदी आनंदाने - उत्साहाने साजरा करणारा असा हा समाज. लेखकाच्या आयुष्यातील काही घटना पुस्तक वाचून संपेपर्यंत आपल्यालासुध्दा आठवत राहतात, जसे वस्तीमध्ये भीक मागायला येणारा लहान मुलगा त्यांचाच वर्गमित्र असल्याचं लक्षात येणं किंवा मनाला चटका लावून जाणारा लेखकाचा चुलत मामा येडा कोंड्या याचा झालेला भयानक मृत्यू. स्मशानभूमीत राहून, दिवसरात्र काम करणारा आणि तिथेच येणाऱ्या पिंडाच्या निवदावर जगणारा हा येडा कोंड्या. पुढे महारोग होऊन स्मशानभूमीत रात्री अगोदरच जळत असणाऱ्या एका चितेच्या बाजूला भाजून होणारा त्याचा मृत्यू मन हेलावून टाकतो. या आणि अशा बऱ्याच गोष्टी या समाजाचे आयुष्य किती खडतर असतं हे सांगतात.दलित वस्तीमध्ये जरी इतरही समाज जसे भंगी, लोहार, चांभार,वडार राहत असले तरी सामाजिक भान ठेवून त्यांचे आपापसातील व्यवहार, वेगवेगळे उत्सव यांचे चित्रण लेखकाने या आत्मकथनात केलेलं आहे.थोडक्यात, दलितवस्तीतील चांगल्या - वाईट अशा अनेक अनुभवांसोबतच तेथील लोकांचे  दैनंदिन जीवन लेखकाने अगदी बारकाईने मांडलंय आपल्या या आत्मकथनात. जे वाचताना प्रतिकूल परिस्थितीमध्ये - वातावरणामध्ये लेखक ल.सि. जाधव यांनी मिळवलेले यश नक्कीच आपल्या सर्वांना प्रेरणा देते.

जन्मजातच असणाऱ्या हुशारीमुळे आणि ती हुशारी हेरून लहानपणीच शाळेतील शिक्षकांनी केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे लेखक शिकत गेले.लेखकाला प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणात मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा आवर्जून उल्लेख त्यांनी या आत्मकथनात केलेला आहे. योग्यवेळी मिळणारे मार्गदर्शन किती महत्त्वाचे असते हे लेखकाच्या कारकिर्दीकडे पाहूनच लक्षात येते. पाचवीलाच पुजलेले दारिद्र्य, अगतिकता आणि अज्ञानामुळे वाढीस लागलेली अंधश्रद्धा अशा या दलित समाजात त्याकाळी जिथे मुले शाळेत जायचा विचारसुध्दा करत नसत आणि कोणी गेलेच तर त्यांचा प्रवास मॅट्रिकपर्यंतच थांबे, त्यावेळी लेखकांनी त्यांना असणाऱ्या शिक्षणाच्या आवडीमुळे तसेच आपल्या अपार कष्टाच्या जोरावर, आई-वडिलांच्या पाठिंब्याने,महानगरपालिकेत काम करत बी.ए. आणि त्यानंतर एम. ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.या दरम्यान जवळपास १० वर्षे त्यांनी महानगरपालिकेत काम केले. पुढे महानगरपालिकेतील नोकरी सोडून ते भारतीय स्टेट बँकेत रुजू झाले आणि अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी साहित्यलेखनास सुरुवात केली.त्यांच्या आत्मकथनाबरोबरच त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या आणि कवितासंग्रह सुध्दा खासच. 

ज्या मनुष्याचे अर्ध्याहून जास्त आयुष्य गावाबाहेरच्या दलित वस्तीमध्ये गेले.जिथे पिढ्यान पिढ्या कोणाला साधी अक्षरओळख सुध्दा नव्हती. तिथून त्यांनी घडवलेलं त्यांचं आयुष्य जितकं आपल्याला थक्क करते तितकेच ते प्रेरणादायी सुध्दा आहे.

आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवणारे आणि प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे ल.सि. जाधव यांचे प्रेरणादायी आत्मकथन "होरपळ".




संदीप प्रकाश जाधव


Sunday, July 5, 2020

"अद्भुत शक्तींचे मायाजाल"


लेखक : बाळ भागवत

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस


आज माणसाने कितीही प्रगती केली असली तरी काही प्रश्नांची उत्तरे आजही त्याच्यापाशी नाहीत आणि भविष्यातपण ती मिळण्याची शक्यताही तशी कमीच. जसे की मृत्यूनंतर माणसाचे काय होते? भविष्यात होणारी एखादी घटना काही लोकांना आधिच कशी काय समजते? स्वतःच्याच मृत्यूची चाहूल एखाद्याला कशी काय लागू शकते? सतत आपल्यासोबत कोणीतरी अदृश्यपणे असल्याचा भास का होतो? अगदी धडधाकट असणाऱ्या व्यक्तीचा अचानक कसा काय मृत्यू होतो?माझा पुनर्जन्म झालाय असं जेव्हा एखादा पुराव्यानिशी सांगत असतो तेव्हा खरंच त्याचा पुनर्जन्म झालेला असतो का?आत्मा किंवा भूत नावाची गोष्ट असणे व तिचे लोकांसोबत वावरणे, बोलणे हे खरे का? अतिशय साधे आयुष्य जगत असणाऱ्या काही लोकांसोबत अचानकच विचित्र घटना का घडू लागतात? या आणि अशा अनेक प्रश्नांसोबतच आपल्या या सृष्टीमधे आपल्यासोबत असल्याची जाणीव होणाऱ्या अद्भुत, अदृश्य, अमानवीय, अविश्वसनीय शक्तींचा असण्याचा ठोस पुरावा जरी नसला तरी त्यांचे अस्तित्व आपल्याला कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या प्रकारे सतत जाणवत राहते.आपल्या आसपास घडणाऱ्या काही घटनांची उत्तरे आपल्याकडे नसल्यामुळे अशा शक्तींचे अस्तित्व नाकारताही येत नाही.या अद्भुत, अदृश्य शक्तींबद्दल जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असणारी उत्सुकता, भीती ही एकाच प्रकारची आहे.आजही अनेक ठिकाणी करणी झाली,शाप दिला असे कळल्यावरच त्या धक्क्याने माणसे अन्न-पाणी सोडून देतात आणि मृत्यूचे खरे कारण अंधारातच राहते. अशा घटना सतत विज्ञानाला आव्हान देत राहतात. बाळ भागवतांनी अशा जगभरात घडलेल्या घटनांचे वर्णन त्यांच्या या "अद्भुत शक्तींचे मायाजाल" पुस्तकामध्ये केले आहे.

या गूढ शक्तींविषयी सांगताना भागवतांनी जगभरात घडलेल्या अशा अविश्वासनिय,अदृश्य घटनांची जंत्रीच या पुस्तकामध्ये दिली आहे आणि त्यासाठी त्यांनी आधार घेतला आहे तो  Arthur C. Clarke यांच्या ' The World Of Strange Powers'  या पुस्तकाचा. यामधे दिलेल्या घटना आणि त्यांचे संदर्भ वाचले की आपण एवढेच म्हणू शकतो की आपल्याला जे दिसतं,समजतं तेच फक्त खरं आहे असे म्हणणे साफ चुकीचे आहे. शिवाय या पुस्तकातील  घटना वाचताना आणखी एक गोष्ट जी सतत मनाला जाणवत राहते ती म्हणजे आपल्याला न दिसणारे, स्पर्श न करता येणारे अपल्यासोबतच असलेले अजून एक जग अस्तित्वातच नाही असे म्हणणेसुद्धा धाडसाचेच ठरेल. अशा शक्तींचा खरोखरच विचार केला पाहिजे जोपर्यंत त्यांचं असणं किंवा नसणं पुराव्यानिशी सिद्ध होत नाही.

बाळ भागवतांनी या पुस्तकामध्ये ज्या घटनांचा उल्लेख केला आहे त्या खरेच विचार करायला लावणाऱ्या आहेत.पुस्तक वाचताना त्या आपली उत्कंठा वाढवल्याशिवाय राहणार  नाहीत. १३६ पानांचे हे छोटेखानी पुस्तक वाचताना जगातील विविध देशांमध्ये या अमानवी, अदृश्य शक्तींनी आपले "मायाजाल" कसे पसरवले आहे याची जाणीव होते.पुस्तकामध्ये दिलेल्या काही काही घटना तर अशा आहेत जिथे या अदृश्य, अनाकलनीय शक्तींसामोर मोठ मोठया डॉक्टरांनी आणि मानसोपचारतज्ञांनी सुद्धा हात टेकलेत.जगभरातील अनेक थोर संशोधकांना सुद्धा बुचकळ्यात टाकणाऱ्या घटनांची नोंद बाळ भागवत यांनी या पुस्तकामध्ये केली आहे, विज्ञानाला आव्हान देत राहणाऱ्या या अदृश्य शक्ती आपण कितीही नाकारत राहिलो तरी जगभरात घडलेल्या ज्या घटनांचा उल्लेख लेखकाने इथे केला आहे त्या आपले कुतूहल वाढवण्यासाठी पुरेशा आहेत. 

पुस्तकामध्ये दिल्या गेलेल्या बऱ्याचश्या घटना वाचताना समजते की मानवी मनाची शक्ती खरंच किती आश्चर्यकारक आहे.मानवी मन हे वर्तमानकाळात राहून भूतकाळ आणि भविष्यकाळ यांसोबत नेहमीच जोडले गेलेले असते. केवळ आपल्यामध्ये असणाऱ्या मनःशक्तीचा वापर करून बऱ्याच अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी घडवून आणणारे लोक नेहमीच विज्ञानाला आव्हान देत राहतात,त्यांच्यामध्ये असणारी अदृश्य शक्ती एक कोडेच बनून राहते.हे सांगताना बाळ भागवत यांनी बऱ्याच घटनांचे संदर्भ या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. बाळ भगवतांचे हे पुस्तक वाचल्यानंतर, कुतूहल आणि आश्चर्य सोडून आता एका वेगळ्या दृष्टिकोनातून या शक्तींचा विचार करायला हवा असे वाटून जाते.मृत्यूनंतर सुद्धा माणसाचे आयुष्य असू शकतं हे दाखवणाऱ्या किंवा तसा विचार करायला लावणाऱ्या बऱ्याच घटनांचा उल्लेख या पुस्तकामध्ये आहे.अदृश्य शक्तीचे आणखी एक उदाहरण म्हणजे टेलिपथी, त्याचीही बरीच उदाहरणे पुस्तकात वाचायला मिळतील. या उदाहरणांची सत्यता पडताळण्यासाठी शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगातून ठोस काही हाती आले नसले तरी त्या शक्ती असण्याची शक्यताही नाकारता आलेली नाही. दैवी शक्ती असणारी किंवा दैवी देणगी असणारी व्यक्ती, असे आपण जेव्हा एखाद्यबद्दल ऐकतो तेव्हा खरेच अशी शक्ती असू शकते का? असा प्रश्न आपल्याला पडतो.अशा प्रश्नांची उत्तरे सुद्धा या पुस्तकामध्ये दिलेल्या घटनांमधून आपल्याला शोधता येतील.

पुस्तकामध्ये दिलेल्या घटनांवरून निष्कर्ष हा शेवटी वाचकालाच काढायचा आहे.जरी अशा अनाकलनीय, अदृश्य, गूढ शक्तींच्या असण्याबद्दल लोकांची वेगवेगळी मते असली तरी आजही बऱ्याच प्रगत देशांमध्ये हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय होऊन गेला आहे. त्यामुळेच एका रोमांचकारी अनुभवासाठी आणि आपल्या कुतुहलामध्ये आणखी भर घालण्यासाठी आपण आवर्जून वाचावे असे हे बाळ भागवत यांचे "अद्भुत शक्तींचे मायाजाल".




संदीप प्रकाश जाधव

Sunday, June 28, 2020

"लक्ष्यवेध"


लेखक : रणजित देसाई

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस



शिवचरित्राला बऱ्याच लेखकांनी हात घातला पण त्यांपैकी काही मोजक्याच लेखकांना ते लोकांपर्यंत व्यवस्थित पोहचवता आलं आणि त्यांपैकीच एक म्हणजे कादंबरीकार रणजित देसाई. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र श्रीमानयोगी सारख्या अजरामर कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी लोकांसमोर आणले. त्यांनीच लिहिलेल्या आणखीन ही काही कादंबऱ्या स्वामी,राधेय,पावनखिंड,मेख मोगरी,लक्ष्यवेध. एखाद्या लेखकासाठी कादंबरी ही एक अशी गोष्ट आहे जिथे लिहिताना त्याला आपल्या काल्पनिक विचारांना हवी तेवढी मुभा देता येते पण रणजित देसाईंनी ती मुभा देताना त्यांच्या सर्व कादंबऱ्या मूळ विषयाला जराही धक्का न लावता ज्याप्रमाणे वाचकांसमोर आणल्या आहेत त्यातच त्यांच्यासारख्या लेखकाचं मोठेपण. त्यांची कोणतीही कादंबरी वाचताना त्यातील पात्रे,ठिकाणे,घटना आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतातच.

रणजित देसाईंसारख्या लेखकाच्या एखाद्या पुस्तकाचे विश्लेषण करण्याइतका मोठा मी नक्कीच नाही पण तरीही त्यांनी लिहिलेल्या "लक्ष्यवेध" या ऐतिहासिक कादंबरीचा माझ्या शब्दांत परिचय करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न.

शिवाजी महाराजांचं कर्तृत्व मोठं असण्याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्यावर चालून आलेल्या शत्रूंचं असणारं अफाट कर्तृत्व,अफाट पराक्रम आणि या अशाच मोठ मोठ्या शत्रूंवर आपल्या बुद्धीचातुर्याने, युद्धकौशल्याने, पराक्रमाने शिवाजी महाराजांनी केलेली मातच त्यांचं मोठेपण सिद्ध करते. शिवचरित्र सुद्धा सजलेय ते अशा बऱ्याच अचाट, अतुलनीय, अलौकिक, अविश्वनिय ऐतिहासिक घटनांनी. तसं पहायला गेलं तर शिवचरित्रातील प्रत्येक घटना ही स्वतंत्र कादंबरीचा विषय आणि त्याच घटनांमधील एक ऐतिहासिक घटना म्हणजे शिवाजी महाराज - अफजलखान भेट. याच शिवाजी महाराज - अफजलखान ऐतिहासिक भेटीवर लिहिली गेलेली रणजित देसाई यांची ही थरारक कादंबरी "लक्ष्यवेध". 

अफजलखानाचं स्वराज्यावर चालून येणं हे त्यावेळच्या एका मोठ्या संकटांपैकी एक होतं आणि त्या संकटाचा झालेला शेवट हा स्वराज्य उभारणीस मिळालेली सर्वांत मोठी चालना होती.त्याचं कारणही तसंच होतं, अफजलखान हा एक अचाट शक्तीचा माणूस ज्याने औरंगजेबासारख्या पराक्रमी माणसाला सुद्धा नमवलं होतं.अत्यंत हुशार, कुशल सेनापती, राजकारणात पटाईत, कपटी अशी ओळख असलेला असा हा अदिलशाही सरदार जेव्हा अफाट सैन्यानिशी स्वराज्यावर चालून येण्यास विजापुरहून निघाला तिथूनच सुरु होतो या कादंबरीचा प्रवास. "लक्ष्यवेध" मधे रणजित देसाईंनी ज्या बारकाईने या ऐतिहासिक घटनेची पार्श्वभूमी लिहिलेय तेसुध्दा घटनेच्या मूळ गाभ्याला धक्का लागू न देता ते खरंच अप्रतिम. अफझलखानासारखे संकट शिवाजी महाराजांनी अत्यंत संयमाने हाताळले आणि परतवून लावले.पण या संकटासोबतच शिवाजी महाराजांच्या वैयक्तिक आयुष्यात आलेलं वादळ म्हणजे त्यांची पहिली पत्नी सईबाईंचा झालेला मृत्यू.या वाईट घटनेची पार्श्वभूमी सुद्धा रणजित देसाईंनी ज्याप्रमाणे या कादंबरीच्या सुरुवातीलाच मांडलेय ती वाचताना डोळ्यांत पाणी येणारच. या वादळाला मागे सारून स्वराज्यावर घोंगावत येणाऱ्या अफजलखान नामक वादळाला सामोरे जायला त्वरित तयार होणारे महाराज देसाईंनी या कादंबरीमधे रंगवताना कुठेही अतिशयोक्ती होणार नाही याची काळजी घेतलेय.

वाईपासून प्रतापगडापर्यंत हिरव्यागार रानावर राजकारणाचा पट मांडला जात होता.चढे घोड्यानिशी राजांना पकडून नेण्याची अफझलखानाची गर्जना होती आणि खानाला मारल्याशिवाय स्वराज्य साधणार नाही हे राजे पुरते जाणून होते. तर या दोन राजकारण - धुरंधरांनी खेळलेला डाव म्हणजे "लक्ष्यवेध". या सर्व घटनाक्रमात शिवाजी महाराज आणि अफझलखान या दोन्हीही बाजूंकडून ज्या इतर धुरंधरांनी मेहनत घेतली मग ते वाटाघाटी करणारे दोन्ही बाजूंचे वकील असोत वा प्रत्यक्ष भेटीच्या वेळी महाराज-अफझलखानासोबत असणारे त्यांचे निवडक सैनिक, यासर्वांचंही खूपच बारकाईने वर्णन देसाईंनी केलेलं आहे. 

एवढ्या प्रचंड फौजेनिशी आलेला अफझलखान वाई सोडून कोयना खोऱ्यात का उतरला? आणि निःशस्त्रपणे गडावर का गेला? याला ठोस असं उत्तर आजघडीला तरी कोणाकडेच नाही.पण तरीही ही कादंबरी वाचल्यानंतर अशा प्रश्नांचे उत्तर काही प्रमाणात तर नक्कीच मिळू शकेल.

जरी अफझलखान वध ही सर्वांना अगदी लहानपणापासून माहीत असलेली ऐतिहासिक घटना असली तरीही रणजित देसाईंनी लिहिलेल्या उत्कृष्ट लिखाणासाठी आवर्जून वाचण्यासारखी ही कादंबरी "लक्ष्यवेध".




संदीप प्रकाश जाधव








Sunday, June 21, 2020

"जुगाड"


लेखक : किरण गुरव

प्रकाशक : दर्या प्रकाशन


मराठी साहित्यातील एक सशक्त कथाकार किरण गुरव यांची "जुगाड" ही पहिलीच कादंबरी.

आपल्यापैकी प्रत्येकाच्याच अगदी ओळखीचा शब्द "जुगाड" आणि प्रत्येकाने आयुष्यात कधी ना कधी, कुठे ना कुठे, कशासाठी तरी नक्कीच केला असेल असा हा "जुगाड". पण पुस्तक वाचत असताना मला जाणवलेला लेखकांना याठिकाणी अभिप्रेत असणारा "जुगाड" म्हणजे अतिशय कठीण परिस्थितीत टिकून राहण्यासाठी केलेली धडपड. हिच धडपड किरण गुरव यांनी अतिशय साध्या आणि शैलीदार भाषेत मांडली आहे त्यांच्या पहिल्याच कादंबरी "जुगाड" मधे.

अभियांत्रिकी शिक्षणाचे पेव फुटल्यानंतर जो तो हेच शिक्षण घेऊन जेव्हा बाहेरच्या जगामध्ये प्रवेश करतो आणि मग स्वप्नांचा पाठलाग करताना असणारी जीवघेणी स्पर्धा, त्यातून होणारी घुसमट सहन करत करत बेकारीच्या खाईमधे होरपळून जाणारी एक पिढी यांचं किरण गुरव यांनी या कादंबरीमधे केलेलं वर्णन विचार तर करायलाच लावतं पण मनसुद्धा अक्षरशः हेलावून टाकतं. जरी कादंबरीची कथा एका व्यक्तीला डोळ्यासमोर ठेऊन लिहिली असली तरी ती कथा अशा सर्वांची आहे जे गावा-गावातून अभियांत्रिकी शिक्षण घेऊन महानगरांमधे अशाश्वत अशा रोजगारासोबत जगण्याची आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्याची कसरत करत आहेत.

या कादंबरीचे कथानक फिरते कथेचा नायक शशा भोवती. शशा जो आपले अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून कोल्हापूर जिल्ह्यातील एका लहानशा गावातून पुण्यासारख्या महानगरामधे नोकरीनिमित्त आलेला तरुण.या कादंबरीचे विश्लेषण करायचं झाल्यास ते दोन भागात करावे लागेल, पहिला भाग म्हणजे शशाचे पुण्यातील दिवस तर दुसरा भाग म्हणजे नोकरी गेल्यामुळे त्याच नोकरीसाठी पुण्यातून परत गावाकडे येऊन सुरु केलेली नवीन नोकरी आणि तिचा पुन्हा तसाच शेवट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिक्षण पूर्ण करून महानगरांमध्ये नोकरीच्या शोधात आलेल्या प्रत्येक तरुणाचे पहिले काम म्हणजे राहण्यासाठी स्वस्त-कामचलाऊ जागा शोधणं आणि या कथेपुरती ही जागा आहे "श्री" लॉज. कथेची सुरुवात होते खोली नंबर ५७, "श्री" लॉज पासून जिथे राहतो कथेचा नायक शशा त्याच्यासारख्या अशा अनेक तरुणांसोबत. लॉजचे मालक शितोळे हे एक अवली पात्र, भाडेकरूने कितीही टांगा मारायचा प्रयत्न केला तरी शितोळेची त्यांच्याकडून भाडे वसूल करण्याची पद्धत आणि लॉजच्या एखाद्या गोष्टीबद्दल कोणी तक्रार घेऊन आलाच तरी लॉजची खरी गरज मालकाला नसून इथे राहणाऱ्यालाच आहे हे पटवून सांगणारा शितोळे लेखकाने अगदी मस्त रंगवलाय.सुरवातीला कडक आणि व्यवहारी वाटणारा शितोळे इतकाही भावनाशून्य नाही हे पहिल्या भागाच्या शेवटी जाणवते. लॉजमधे राहणारे सर्वचजण वेगवेगळ्या क्षेत्रात - वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करणारे, सगळ्यांच्या कामाच्या वेळा वेगळ्या आणि त्यामुळेच सकाळी सकाळी ऑफिससाठी आवरताना सगळ्यांची जी कसरत चालू असते ती सांगताना लेखकांनी जे वर्णन केलंय भले ते संडास-बाथरूम च्या लाईनचे असो वा पावसात गळणाऱ्या खोलीच्या भिंतीचे असो वाचताना वाटत राहतं की आपणही तिथेच त्यांच्यासोबतच आहोत.फर्स्ट, सेकंड, थर्ड शिफ्टमधे काम करणारा प्रत्येकजण इथे धडपडतोय छोट्याश्या कंपनीत का असेना पण पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी. कारण कंत्राटी कामगार भरतीचे जे पेव महानगरांमध्ये फुटलेय त्यामुळे वाढीस लागलेली नोकरीची अशाश्वतता. प्रत्येक कंपनीमध्ये असलेले प्रोडक्शन आणि कॉलिटी मधिल विळा-हातोड्याचे नाते लेखकाने इथेही मस्त रंगवलंय. कंत्राटी कामगार आणि पर्मनंट कामगार यांच्यातील शीतयुद्ध सुद्धा वाचताना सतत जाणवत राहते.याच कंत्राटी कामगारांच्या गर्दीमधला नोकरी गेलेला शशा आणि त्याचा परममित्र पुषप्या. नोकरी गेल्यानंतर नोकरीच्या शेवटच्या दिवशी शशाची होणारी घालमेल आपल्यालाही अस्वस्थ केल्याशिवाय राहत नाही.नोकरी गेल्यामुळे क्षणा क्षणाला शशाला घरच्यांची काळजीने येणारी आठवण वाचणाऱ्या प्रत्येक नोकरदाराला आपले कुटुंब डोळ्यासमोर डोळ्यासमोर घेऊन येते. कंत्राटी कामगाराला किती तारेवरची कसरत करावी लागते हे वाचताना समजते. नवीन नोकरीच्या शोधासाठी रोज सकाळी उठून तयार होऊन शशा आणि पुष्प्याचे पुण्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फिरणे, नोकरीच्या शोधात नकळत अगदी भंगार वाल्यापर्यंत जाऊन पोहोचणं मनाला चटका लावून जाते. शशाचे नोकरीसाठी सासवडच्या एका कंपनी पर्यंत जाणे आणि त्याच्या तिथेपर्यंतच्या प्रवासाचे वर्णन अप्रतिम. तिथून परतत असताना तयार झालेले पावसाळी वातावरण, त्यानंतर पडलेला तुफान पाऊस, शश्याच्या अगदी जवळच आकाशातून पडलेला तो विजेचा लोळ, त्यातून अक्षरशः मरणाला शिवून आलेला शशा आणि त्याही परिस्थितीत शशाचे "श्री" लॉज वर येऊन पोहचणे सगळे कसे लेखक आपल्या डोळ्यासमोर उभे करतात. पुण्यात येऊन नोकरी करण्यापूर्वी नोकरीच्या सुरुवातीच्या काळात शशा कोल्हापूरच्या उद्यमनगर सारख्या ठिकाणी काम करायचा. याठिकाणी उद्यमनगरमधे काम करणाऱ्या जुन्या मेस्त्री लोकांचे लेखकांनी केलेल्या वर्णनामुळे लेखकांचे बारिक निरीक्षण दिसून येतं. तर अशा उद्यमनगर सारख्या ठिकाणी केलेल्या कामाच्या अनुभवामुळे शशाला सासवडच्या कंपनीमधे नोकरीची ऑफर मिळते खरी पण नियतीला ते मान्य नसल्यामुळे किंवा कदाचित शशालासुद्धा मनातून सासवडला जायचंच नसलेल्या इच्छेमुळे त्याचं अचानक आजारी पडणं आणि हे आजारपण गावी समजल्यामुळे गावाकडून मामाने त्याला घरी परत घेऊन जाण्यासाठी येणं या सगळ्यात शशाच्या मनाची अस्वस्थता लेखकाने अगदि बारकाईने मांडली आहे.इतके दिवस राहिलेला "श्री" लॉज सोडताना झालेली शशाची मानसिक अवस्था आणि स्वारगेट स्टँड मधून कोल्हापूरला गाडी निघताना आपला परममित्र पुष्प्याला जड अंतःकरणाने दिलेला अखेरचा निरोप यांचं वर्णन वाचताना थोडंसं वाईट नक्कीच वाटतं. पुण्याला अखेरचा रामराम करून गावाकडे परत जाणं हा झाला कथेचा एक भाग जो कादंबरी रुपात वाचताना एक वेगळाच अनुभव देऊन जातो.

शशाच्या मामाने केलेल्या खटपटीमुळे शशाला गावाकडे जी दुसरी नोकरी मिळते ती एका नवीन चालू होणार असणाऱ्या बॉक्साइट कॅल्सीनेशन फॅक्टरीत मेकॅनिकल इंजिनिर/साईट इंजिनिर म्हणून आणि तेही अगदी त्याच्या गावशेजारच्या पाटगाव तालुक्यातील कोकणात. गावापासून, घरच्यांपासून जवळ शिवाय नवीनच चालू होणारी फॅक्टरी आल्यामुळे लवकर पर्मनंट होण्याची शक्यता या सगळ्यामुळे खुश होऊन नोकरीवर लागलेला शशा पुढे परत कसा बेरोजगार होतो याची कथा आहे दुसऱ्या भागामध्ये. गावाकडची एक प्रतिष्ठित व्यक्ती, राधामाई मिनरल प्रॉडक्ट चे चेअरमनसाहेब श्रीयुत शेळनोलीकर चव्हाण यांनी घातलेला घाट म्हणजे ही नवीन फॅक्टरी.इथे शशाची भेट होते साईटवरच्या फिटर लोकांसोबत युसूफ, साजी आणि जय ज्यांना अगदी देशभर फिरून अशा नवीन चालू होणाऱ्या फॅक्टरिंमध्ये मोठ मोठ्या मशनरी फिटिंगचा दांडगा अनुभव.कोणत्याही प्रकारचे आणि कितीही मोठे मशीन "जुगाड" करून का होईना फिट करण्यात ही मंडळी पटाईत. साईटवर आलेल्या मोठ मोठ्या मशनरिंचं युसूफने आपल्या खास अंदाजात आणि काही ठिकाणी "जुगाड"करून केलेल्या फिटिंगचे लेखकाने केलेलं वर्णन वाचताना आपल्याला हे सर्व त्या साईटवरच उभे राहून पाहत असल्याचा भास होतो.गावाकडे डोंगर उतारावर उभ्या राहत असलेल्या या फॅक्टरीच्या आसपासच्या निसर्गाचे उत्तम असे वर्णन करायला लेखक नाही विसरला. याच ठिकाणी शशाची भेट होते त्याच्या थोडे आधी या फॅक्टरीत जॉईन केलेल्या सिव्हिल इंजिनिर सीमा मॅडम सोबत.सुरवातीला खडूसपणे आणि शशापासून अंतर ठेवून राहणारी सीमा मॅडम नंतर शशाची चांगली मैत्रीण बनते ती शशाने अगदी कठीण समयी तिला केलेल्या कामातील मदतीमुळे. नंतर चेअरमन साहेबांच्या लहरीपणामुळे म्हणा किंवा मी पणामुळे मटेरियल सप्लायर सोबत झालेला वाद आणि त्यामुळे हळूहळू बंद पडत गेलेलं फॅक्टरीचं काम याचं वर्णन वाचताना नायकाची दया आल्याशिवाय राहत नाही.याच वेळी शशाचं गावी जाऊन येणं, तिथल्या मित्रांना भेटल्यावर झालेली जाणीव जी की अभियांत्रिकीशिवाय इतर पर्याय ज्यांनी निवडले त्यांचं आयुष्यात स्थिरस्थावर होणं आणि आपण अजूनही नोकरीसाठी धडपड करत राहणं. तरीही शशा परत साईटवर जातो हा विचार करून की टिकून राहणं हेच आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि त्यातच पुढच्या उज्वल यशाची शक्यताही दडलेली आहे.पण बंद पडत जाणाऱ्या फॅक्टरी मधून एक एक करून सर्व कामगारांचं निघून जाणं, सीमा मॅडमचं अचानक कामावर यायचं बंद होणं आणि नोकरीत लागल्यापासून न मिळालेल्या पगारासाठी शशाने चेअरमन साहेबांना सतत आठवण करून देऊनसुद्धा पगार न देताच त्याला नोकरीवरून काढून टाकणे या सर्वांमुळे खचून गेलेला शशा आणि त्याचं पुन्हा बेरोजगार होणं हा दुसऱ्या भागाचा शेवट.


प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी ही मनाला भिडणारी, वाचल्यानंतर आयुष्याचा नव्याने विचार करायला लावणारी,कठीण परिस्थितीत टिकून राहण्यासाठी ऊर्जा देणारी किरण गुरव यांची कादंबरी "जुगाड".





संदीप प्रकाश जाधव

















Sunday, June 14, 2020

"दंशकाल"


लेखक : हृषीकेश गुप्ते

प्रकाशक : राजहंस प्रकाशन


हृषीकेश गुप्ते....माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक...जे मला आवडतात त्यांच्या गूढकथा आणि रहस्य कथांसाठी....हा परिचय त्यांच्याच एका कादंबरी विषयी "दंशकाल"....

तसे कादंबरीचे नाव आणि मुखपृष्ठ पाहून अंदाज आलाच असेल की ही एक रहस्यकथा आहे.कादंबरीच्या माध्यमातून लेखकाने अशा विषयाला हात घातला आहे जो आजही इतक्या वर्षांनंतर सुद्धा आपल्या समाजमनाने घट्ट पकडून ठेवला आहे आणि त्याची जाणीव वाचताना प्रत्येकवेळी होत राहते, तो म्हणजे 'अंधश्रद्धा'. त्याचबरोबर ज्या कुटुंबासोबत हे कथानक जोडलं गेलंय त्या कुटुंबातील नात्यांची गुंतागुंत ज्या पद्धतीने मांडली आहे ते अगदिच अप्रतिम.रहस्यमय पद्धतीने पुढे सरकणाऱ्या कथानकाचा आश्चर्याच्या धक्क्याने केलेला शेवट हा सर्वांवर कळस.

कथानकाची सुरुवात होते आजसुद्धा रहस्य आणि गुढकथांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोकणातून.कोकणातील भूगाव मध्ये देशमुखांच्या वाड्यात राहणाऱ्या कुटुंबाभोवती फिरणारी ही रहस्यमय कादंबरी - कथा. कथेच्या मध्यभागी आहे कथेचा नायक अनिरुद्ध. नायकाच्या लहान काकाला, भानूकाकाला अचानक लागलेले वेड ही या रहस्यमय कथेची पहिली पायरी. भानूकाकाला लागलेल्या वेडानंतर वाड्यामध्ये  ज्या एका अनामिक शक्तीची चाहूल नायकाला सतत लागत राहते तिचे अगदि अफलातून वर्णन हृषीकेश गुप्ते यांनी केलंय जे वाचताना अंगावर काटा आणि डोळ्यासमोर ते दृश्य उभे राहिल्याशिवाय राहत नाही.जसे की मध्यरात्री अंधारात बाईच्या वेषात प्राण्यासारखे चार पायांवर चालत वाड्यात फिरणारी एखादी आकृती असो किंवा विहिरीमध्ये पडलेल्या आपल्या आईला वाचवण्यासाठी नायकाने केलेले प्रयत्न असोत किंवा भानू काकाला वेडाचा झटका आल्यानंतर त्याचं केलेलं वर्णन सगळेच अगदि थरारक. हे वर्णन करताना त्याला आवश्यक अशी जी वातावरण निर्मिती लेखकाने आपल्या शब्दांमध्ये केलेय त्याला तोड नाही.

देशमुख कुटुंबातील इतर सदस्य आण्णा,आई,नंदाकाका,रेवती काकू, गारगी,आत्या, आत्यांचे यजमान,नायकाची पत्नी अनु या प्रत्येकाचं भानूकाका आणि नायकाभोवतीचं आयुष्य गुप्तेनीं अगदी अशा पध्दतीने मांडलंय की ते वाचताना वाटावे आपल्याच आजूबाजूला हे सर्व कुठे तरी घडत असावे.अण्णांचा नायकाबरोबरच संपूर्ण गावाला असणारा धाक,आईची भानुकाकासाठी असणारी काळजी, पैलवानी ताकद असलेल्या नंदाकाकाची समलैंगिकता तसेच नायकाचे रेवा काकू आणि अनु सोबतचे नाजूक नाते कादंबरीच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता अगदि सहजपणे मांडलंय लेखकाने.

नंतर नायकाला येणाऱ्या गूढ अनुभवांसोबतच देशमुख कुटुंबाने भानूकाकाला दिलेला दत्ताचा अवतार आणि त्याच्या नावाने बांधलेल्या मठातून वाढीस लागणारी अंधश्रद्धा, आजही समाजात वावरताना आपल्याला जी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या रुपात दिसते.याचबरोबरच ज्या विहिरीमध्ये पडून नायकाच्या आईचा मृत्यू होतो त्या विहिरीला देवपण देऊन तिथे चालू केलेली लोकांना कौल देण्याची पद्धत यांचे अगदि बारकाईने वर्णन लेखकानेे केले आहे. पुढे हीच लोकांच्या भावनांशी केलेली खेळी देशमुख कुटुंबाला कशी देशोधडीला लावते हे कादंबरीमधे ज्या रितीने लेखकाने मांडलंय ते खरंच विचार करण्यासारखं आहे.मठामध्ये चालणारा गैरप्रकार लोकांच्या लक्षात आल्यानंतर लोकांकडून देशमुख वाड्याची होणारी जाळपोळ आणि सोबतच देशमुख कुटुंबाची होणारी फरफट हे वाचून मनाला कुठेतरी सतत वाटत राहतं, नक्की चूक कोणाची होती?वेड लागलेल्या भानूची? की त्याच्या वेडाचा बाजार मांडून लोकांच्या भावनांशी खेळणाऱ्या आईची? की मठामध्ये येणाऱ्या लोकांच्या भक्तीचा गैरफायदा घेऊन वेगळेच धंदे चालवणाऱ्या यजमानांची?

शेवटी देशोधडीला लागलेले देशमुख कुटुंब जेव्हा नायकाच्या घरी मुंबईला राहायला येते तेव्हा तिथे अनुला, नायक व रेवती काकूच्या नाजूक नात्याबद्दल समजणे आणि नायकाला भूगावच्या वाड्यामध्ये मध्ये जाणवलेल्या गूढ-अनामिक शक्ती नेमक्या काय होत्या हे लक्ष्यात येणे म्हणजे या रहस्यमय कथेची शेवटची पायरी.

रहस्य व गूढकथांची आवड असणाऱ्यांनी आवर्जून वाचावी अशी ही एक थरारक आणि वाचताना नक्कीच अंगावर काटा आणणारी हृषीकेश गुप्ते यांनी लिहिलेली कादंबरी  "दंशकाल'.




संदीप प्रकाश जाधव




Sunday, June 7, 2020

"शोध"


लेखक : मुरलीधार खैरनार

प्रकाशक : राजहंस प्रकाशन


एखाद्या पुस्तकाचा परिचय स्वतःच्या भाषेत इतरांसाठी करून देण्याचा माझा हा पहिलाच प्रयत्न. "शोध" ही मुरलीधर खैरनार यांची कादंबरी बऱ्याच दिवसांपूर्वी वाचून पूर्ण केली होती आणि वाचनातूनच जोडला गेलेला मित्र श्रीजीवन तोंदले याने तेव्हाच सुचवले होते या पुस्तकाबद्दल blog लिहिण्यासाठी,पण लिहिण्यासाठी नसलेले धाडस म्हणा किंवा ती आली नसलेली वेळ यामुळे ते राहूनच गेले.तर असो, आता थोडंसं या पुस्तकाविषयी.....

एखादा रहस्यपट पहायला खुर्चीमध्ये बसावे आणि तो संपेपर्यंत जागेवरून उठूच नये असंच काहीसं होतं "शोध" ही कादंबरी वाचायला हाती घेतल्यानंतर. श्वास रोखून धरायला लावणारं रहस्य,अत्यंत वेगवान - उत्कंठावर्धक असा घटनाक्रम,धाडस,रोमांचक अद्भुत थरार,कुटनीती या सर्वांतून साकारलेली उत्कृष्ट अशी कादंबरी म्हणजे "शोध". 

शोध या कादंबरी चा विषयच मुळी जोडला गेलेला आहे तो म्हणजे आपले सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या एका अतुलनीय पराक्रमा सोबत. ही गोष्ट सुरू होते १६७० साली शिवरायांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली तेव्हापासून. साडेतीनशे वर्षांपूर्वी सुरतेहून स्वराज्यात परत येताना,जवळपास ७ हजार जनावरांवर लादलेला लुटीतला २५ लाख कोटी रुपये किंमतीचा प्रचंड ऐवज हरवला! हो हो हरवला.....कुठे गडप झाला तो खजिना? काय रहस्य दडलं होतं त्या खजिन्यात? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आणि तो हरवलेला खजिना शोधण्यासाठी आज वर्तमानात केलेली धडपड म्हणजेच "शोध".

वाचत असताना अगदी पहिल्या पानापासून शेवटपर्यंत मनात येत राहतो एकच प्रश्न तो म्हणजे "आता पुढे काय होणार?" आणि याच एका प्रश्नामुळे वाचक शेवटपर्यंत कथेसोबत जोडलेला राहतो.प्रत्येक २०-२५ पानां नंतर इतिहास आणि वर्तमानामध्ये होणाऱ्या थरारक घटनांची सांगड वाचकांचा कुठेही गोंधळ उडू न देता ज्या पद्धतीने केली आहे याचे सगळे श्रेय लेखकाला.वाचताना वर्तमानासोबतच इतिहास सुद्धा आपल्या डोळ्यासमोर उभा राहील अशी मांडणी.

शिवकाळातील अस्सल संदर्भ आणि  वर्तमान काळातील वास्तव घटना यांची सांगड घालून अतिशय उत्कृष्टपणे लिहिली गेलेली ही मुरलीधर खैरनार यांची आवर्जून वाचावी अशी अस्सल मराठी थ्रिलर कादंबरी  "शोध". 





संदीप प्रकाश जाधव





"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये सह्याद्रीचा श्वास आणि पेशवाईचा रक्तरंजित इतिहास: ना...