Monday, March 15, 2021

"सेपिअन्स"

 मानवजातीचा अनोखा इतिहास



लेखक : युव्हाल नोआ हरारी

प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स

मराठी अनुवाद : वासंती फडके


होमो-सेपिअन्स हा शब्द शाळेत असताना बऱ्याच वेळा प्रत्येकाच्याच वाचनात आला असणार. माकडपासून माणूस होण्यापर्यंतचा आपलाच इतिहास अगदी थोडा का होईना पण सर्वांना नक्कीच माहीत आहे. युव्हाल हरारी यांचं "सेपिअन्स" हे पुस्तक याच मानवी इतिहासाचा वेध घेणारं आहे. सुमारे १ लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर मानवाच्या किमान ६ उपजाती राहत होत्या. पण सध्या फक्त एकच जात शिल्लक आहे आणि ती म्हणजे "आजचे आपण" - "होमो सेपिअन्स". एका भटक्या माणसापासून मानवाने इतकी प्रगती कशी केली असेल? मानव हासुद्धा इतर प्राण्यांसारखा पृथ्वीवरील एक प्राणीच आहे तर आपली उत्क्रांती झाली म्हणजे नेमकं काय झालं? अन्नसाखळीमध्ये खालच्या पातळीवर असणारा मनुष्य इतक्या कमी कालावधीत सर्वांत वरच्या पातळीवर कसा गेला? पृथ्वीवर आपली अधिसत्ता कशी स्थापन झाली असेल? आपल्या भटक्या पूर्वजांनी एकत्र येऊन शहरे आणि राज्यांची स्थापना कशी केली? आधुनिक जग निर्माण करत असताना टप्प्या-टप्प्याने जी अफाट प्रगती मानवाने आज केली आहे त्या प्रवासात पृथ्वीवरील जीवसृष्टीचा एक घटक म्हणून आपण नक्की काय कामावलंय आणि काय गमावलंय? देव, राजे आणि मानवी हक्क अशा गोष्टींवर आपण कसा काय विश्वास ठेवू लागलो? आणि येणाऱ्या पुढच्या सहस्रकांमध्ये आपले जग कसे असेल? या आणि अशा बऱ्याच गोष्टींचा धांडोळा युव्हाल हरारी यांनी त्यांच्या या "सेपिअन्स" मधून घेतला आहे. मानवाची विचार करण्याची पद्धत, वर्तन, बलस्थाने आणि त्याचे भविष्य याबद्दलच्या आपल्या सर्व समजुतींना आव्हान देणारं आणि एक विचार करायला लावणारं असं पुस्तक "सेपिअन्स". एक प्रगत मानव समाज म्हणून असणाऱ्या आपल्या बऱ्याच मान्यतांना हे पुस्तक आव्हान देत असले तरी पुस्तकातील काही गोष्टी पटण्यासारख्या नाहीत पण तरीही एक वेगळा दृष्टिकोन ठेऊन लिहिला गेलेला मानवजातीचा हा अनोखा इतिहास नक्कीच वाचनीय आहे.

युव्हाल हरारी यांच्या या "सेपिअन्स" पुस्तकाचा परिचय थोडक्यात द्यायचा झाला तर तो वेगवेगळ्या भागांत द्यावा लागेल. जसे की पहिल्या भागात पुस्तकाची सुरुवात हरारी यांनी केली आहे ती मानवाची उत्पत्ती आणि उत्क्रांती कशी झाली या विषयापासून. इथे मानवाची उत्क्रांती एका सरळ रेषेत न होता ती एकापासून दुसरा, दुसऱ्यापासून तिसरा अशा साखळीतून झाली आहे असं मत त्यांनी मांडलं आहे जे आपल्या आजपर्यंतच्या समजुतीला धक्का देते. शिवाय पृथ्वीवर एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी ६ वेगवेगळ्या जातीच्या मानवांचे अस्तित्व होते हासुद्धा तितकाच विचार करायला लावणारा मुद्दा. या सर्वच्या सर्व ६ जाती सतत भटकंती करणाऱ्या असल्याने हळूहळू एकमेकांच्या अधिवासात झालेल्या प्रवेशामुळे त्यांच्यातील संघर्ष वाढून "निअंडरथल" आणि "सेपिअन्स" या दोनच मानवाच्या जाती शिल्लक राहिल्या. त्यानंतर "सेपिअन्स" प्रजातीकडे असणाऱ्या अधिक विकसित सामाजिक कौशल्याच्या जोरावर त्यांनी "निअंडरथल" या प्रजातीवर देखील मात केली आणि फक्त "सेपिअन्स" ही एकच मानवाची जात पृथ्वीवर शिल्लक राहिली हेच आजच्या प्रगत मानवाचे पूर्वज. यानंतरच्या दुसऱ्या भागाची सुरुवात हरारी यांनी पृथ्वीवरील ५ मानवी प्रजाती नामशेष झाल्यानंतर सेपिअन्स लोकांनी हळूहळू इतर पृथ्वी पादाक्रांत कशी केली याच्या विस्तृत वर्णनाने केली आहे. सेपिअन्स अगदी ऑस्ट्रेलिया आणि मध्यपूर्व युरोपपर्यंत भटकत कसे पोहचले? आपल्या संघटन आणि सामाजिक कौशल्याच्या जोरावर त्यांनी मोठमोठ्या प्राण्यांच्या शिकारी करून स्वतःचं अस्तित्व कसं टिकवलं? याचं अतिशय सुंदर वर्णन हरारी यांनी या भागात केलं आहे. याच भागात हरारी आणखी एक विचार करण्यासारखा मुद्दा मांडतात तो म्हणजे सेपिअन्स प्रजातीकडे काल्पनिक कथा रचण्याची असणारी क्षमता! त्यांच्या याच क्षमतेने त्यांनी सामाजिक श्रद्धास्थाने निर्माण केली आणि सर्व सेपिअन्सना एक समाज म्हणून एकत्र राहण्यास चालना दिली. यामुळे सामाजिकरित्या एकत्र राहून त्यांनी पृथ्वीवर आपलं वर्चस्व निर्माण केलं. इतर कुठल्याही प्रजातींनी हा अनोखा मार्ग अवलंबला नाही आणि त्या हळूहळू नामशेष झाल्या. सेपिअन्सनी अगदी त्याकाळात देखील नेतृत्व कौशल्य दाखवले आणि आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर अनेक पुरानकथा रचल्या. या पुरानकथाच पुढे जाऊन धर्म संकल्पनेत रूपांतरित झाल्या असाव्यात असा दावा देखील हरारी यांनी या भागात केला आहे. हरारी यांच्या मते याच टप्प्यावर सेपिअन्स म्हणजे आपले पूर्वज नैसर्गिक उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून बाहेर पडायला सुरुवात झाले.

यानंतर तिसऱ्या भागात हरारी यांनी मानवाने शेतीची केलेली सुरुवात आणि त्याचा मानवाच्या प्रगतीच्या पुढच्या प्रवासात काय परिणाम झाला याचं विस्तृत वर्णन केलं आहे. शेती हा जरी मानवी प्रगतीचा महत्वाचा टप्पा असला तरी हरारी यांच्या मते शिकार करणाऱ्या सेपिअन्सचं शरीर शेतीसाठी कराव्या लागणाऱ्या कामांना पूरक नव्हतं. अशा कामांसाठी त्यांचे शरीर पुढे जाऊन जरी विकसित झाले असले तरी ते शरीराने त्यांच्या पूर्वजांपेक्षा कमकुवत होत गेले. शेती चालू केल्यानंतर आपण निसर्गावर आक्रमण करायला चालू झालो ज्याचे दूरगामी परिणाम आज आपण पाहतच आहोत. निसर्गाचे सर्व नियम धाब्यावर बसवून मानव दिवसेंदिवस स्वतःचेच नुकसान करून घेऊ लागला. प्रगतीच्या नावाखाली मानवाने निसर्गाचे अतोनात नुकसान केलं जे इतर कोणत्याही सजीवाने नाही केलं. जसजशी शेती विकसित होत गेली तसे इतर गोष्टींचे शोध लागत गेले आणि माणूस अधिकच महत्त्वकांक्षी बनला. निसर्गाच्या विरोधात जाऊन निर्माण केलेल्या अनेक आभासी गोष्टींमुळे आज माणूस निसर्गापासून जवळपास तुटूनच गेला आहे. मानवी प्रगतीच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर झालेल्या बऱ्याच गोष्टींचं मुद्देसूद वर्णन हरारी यांनी या भागात केलेलं पहायला मिळते. जे अंतर्मुख होऊन विचार करायला लावतं की खरंच जर शेतीचा शोध नसता लागला तर आपण निसर्गाचं इतकं नुकसान केलं असतं का? चौथ्या भागाचा परिचय द्यायचा झाला तर तो मानवाच्या आयुष्यात विज्ञानाचा झालेला प्रवेश आणि त्यानंतर झपाट्याने बदलत गेलेलं जग याचं विस्तृत वर्णन असा द्यावा लागेल. इथून पुढे विज्ञान हे मानवी प्रगतीच्या केंद्रस्थानी आलं आणि पैसा, सत्ता, धर्म, युद्ध यांच्याभोवती माणूस फिरत राहिला. निसर्गासमोर आपण अज्ञानी आहोत हे माणसाने मान्य करून विज्ञानाच्या सहाय्याने प्रगतीची जी झेप घेतली ती आजही अविरत चालूच आहे. आज विज्ञानाने इतकी मोठी झेप घेतली आहे की मानवाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा टप्पा देखील गाठला आहे. मानवाने निसर्गावर मिळवलेला हा एक प्रकारचा विजयच आहे. इथे युव्हाल हरारी आपल्याला अंतर्मुख व्हायला लावणारा प्रश्न विचारतात तो म्हणजे आपण कुठे चाललो आहोत आणि आपल्याला नेमकं काय मिळवायचं आहे हे संपूर्ण मानवजात म्हणून आपल्याला माहिती आहे का? आज आपण एका अशा वळणावर उभे आहोत जिथे एकतर "सेपिअन्स" म्हणजेच आजची आपली मानवजात नष्ट तरी होईल किंवा ते तंत्रज्ञानाचा स्वर्ग तरी निर्माण करतील. इतिहास हा नेहमीच शक्यतेने भरलेला असतो आणि कुठली शक्यता का प्रबळ झाली हे सांगता येणं केवळ अशक्य आहे. एकीकडे हवामान बदल आणि निसर्गाचा ऱ्हास यामुळे पृथ्वी अजून १०० वर्षे तरी टिकेल का ही भिती आहे तर दुसरीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता माणसांवर वरचढ ठरून मशिनयुग येईल अशी भिती या क्षेत्रातील तज्ञ वारंवार बोलून दाखवत आहेत. यांपैकी काहीही होऊ शकतं किंवा काहीच नाही. पण आपली प्रगतीची नेमकी दिशा काय असायला हवी आणि ती सध्या काय आहे या २ प्रश्नांच्यामधे लेखक आपल्याला सोडून देतो आणि आपली जी अस्वस्थता निर्माण होते त्यातच पुस्तकाचा शेवट होतो.

आवर्जून वाचण्यासारखा मानवजातीचा अनोखा इतिहास.




संदीप प्रकाश जाधव

Monday, March 8, 2021

"मॅन हंट"

बिन लादेनच्या शोधाची थरारक सत्यकथा


लेखक : पीटर बर्गन

प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स

मराठी अनुवाद : रवी आमले


११/९/२००१ ला अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरचे ट्वीन टॉवर्स अपहरण केलेल्या विमानांच्या धडकेने उध्वस्त करून "अल कायदाने" खरे तर अमेरिकेच्या अस्मितेवरच हल्ला केला. हा दहशतवादी हल्ला होईपर्यंत "ओसामा बिन लादेन" नावाचा, जगाला फारसा माहीत नसणारा अल कायदाचा "म्होरक्या" अचानकच संपूर्ण जगाच्या कुतूहलाचा विषय झाला. या अतिरेकी हल्ल्यात जवळपास ३००० लोकांचा मृत्यू तर ६००० हून अधिक लोक जखमी झाले आणि या विध्वंसकारी हल्ल्यानंतर ओसामा बिन लादेनचे नाव "क्रूरकर्मा" या विशेषणासोबत जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले, खरे तर जगाच्या इतिहासात या एका हल्ल्यामुळे तो अजरामर होऊन गेला असं म्हटलं तरी ते चुकीचं नाही. अमेरिकेवर झालेल्या या दुर्दैवी दहशतवादी हल्ल्यानंतर अल्पावधीतच त्यांच्या सी. आय. ए. आणि इतर तपास संस्थांनी दहशतवादाविरोधात जोरदार मोहीम उघडली. या मोहिमेदरम्यान सुरुवातीला त्यांच्या हाती आलेल्या माहितीनुसार "अल्-कायदा" ही दहशतवादी संघटना आणि तिचा प्रमुख ओसामा बिन लादेन यांचा या हल्ल्यामागे हात आहे हे सिद्ध झाल्यानंतर "अल कायदा" आणि "ओसामा बिन लादेन" अमेरिकेचे क्रमांक एकचे शत्रू बनले. त्यानंतर बिन लादेनला मारण्यासाठी अमेरिकेने अक्षरशः जंग जंग पछाडलं, त्यासाठी बऱ्याच गोष्टी करत असताना काहीवेळा काही देशांची नाराजी देखील अमेरिकेला सहन करावी लागली पण आपल्या इतिहासातील आजवरचा झालेला हा मोठा दहशतवादी हल्ला त्यांच्या इतका जिव्हारी लागला होता की सतत १० वर्षें ते "लादेनच्या" मागावर होते आणि अखेर २ मे २०११ रोजी अमेरिकन नेव्ही सील्जच्या पथकाकडून पाकिस्तानातील अबोटाबादमधे केलेल्या एका धाडसी जमिनी कारवाईत "लादेन" मारला गेला. जागतिक महासत्ता म्हणून जगात ओळख असणाऱ्या, अत्यंत आधुनिक आणि अद्ययावत यंत्रणा असणाऱ्या अमेरिकेसारख्या देशाला "ओसामा बिन लादेन" तब्बल १० वर्षें गुंगारा देण्यात यशस्वी झाला. त्यामुळेच त्याच्या शोधमोहिमेचा प्रवास लक्षवेधी आणि तितकाच थरारक ठरतो. अमेरिकेच्या १० वर्षें चाललेल्या "ओसामा बिन लादेन" च्या याच थरारक शोधाची सत्यकथा पीटर बर्गन यांनी "मॅन हंट" या पुस्तकातून आपल्यासमोर मांडली आहे. शिवाय अमेरिकेवर झालेल्या या हल्ल्यापुर्वीच्या आणि हल्ल्यानंतर चाललेल्या शोधमोहिमेदरम्यान बऱ्याच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटनांमधे "अल कायदाचा" असणारा सहभाग, त्याची पार्श्वभूमी, त्यामधील अमेरिकेची भुमिका यांची देखील अतिशय विस्तृत माहिती पीटर बर्गन यांनी "मॅन हंट" मधे दिली आहे. पीटर बर्गन हे एक टीव्ही पत्रकार आणि लेखक आहेत. अमेरिकेवर ९/११ ला झालेल्या हल्ल्याच्या चार वर्षं आधीच बर्गन यांनी सीएनएन या वृत्तवाहिनीसाठी अफगाणिस्तानात जाऊन ओसामा बिन लादेनची मुलाखत घेतली होती. त्या वेळी त्यांना "लादेन" म्हणजे अमेरिकेबद्दल द्वेष व्यक्त करणारा एखादा साधारण मुल्ला वाटला होता. त्याच साधारण वाटणाऱ्या "ओसामाने" ९/११ ला जेव्हा अमेरिकेवर हल्ला केला तेव्हापासूनच एक प्रकारे बर्गन यांनी या पुस्तकाची तयारी सुरू केली होती, कारण अमेरिका या हल्ल्यामागच्या सूत्रधाराला शोधून ठार मारणार याबद्दल त्यांना खात्री होती. पुस्तक लिहिण्यासाठी लागणारे आवश्यक ते संदर्भ, कागदपत्रं, या शोधप्रवासातील व्यक्तींच्या प्रत्यक्ष भेटी, इतकंच नाही, तर अबोटाबादमधे ज्या घरात लादेन मारला गेला तिथे जाण्याची परवानगी हे सर्व त्यांना मिळालं आणि "मॅन हंट" चा हा थरार वाचकांसाठी कागदावर उतरला.

पुस्तकाची सुरुवात "सुखद निवृत्ती" या प्रस्तावनेपासून होते. यामधे अबोटाबाद या पाकिस्तनातील शहराचं वर्णन, लादेनच्या कुटुंबाची माहिती, लादेनच्या बायकांचं उच्चविद्याविभूषित असूनही धार्मिक असणं आणि त्यांचा लादेनच्या जिहादवर असणारा विश्वास, लादेनचे दैनंदिन जीवन, जगात दहशत पसरवणाऱ्या लादेनचा कंजूषपणा, त्याच्या कट्टर मुस्लिमतेला धरून असणारे त्याचे वागणे या आणि अशा बऱ्याच बारीकसारीक गोष्टींचे तपशील दिलेले आहेत. सुरुवातीच्या लादेनबद्दलच्या या विस्तृत महितीनंतर ९/११ च्या हल्ल्याचे  वर्णन करून बर्गन थेट लादेनच्या भुतकाळात शिरतात. १० वर्षांच्या शोधमोहिमेच्या प्रवासाची कथा सांगत असतानाच ९/११ चा हल्ला प्रत्यक्षात कसा घडवला गेला, त्यासाठीची तयारी याबद्दलही बऱ्याच गोष्टी बर्गन यांनी वाचकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. लादेनचे तोरा बोरा या अतिशय दुर्गम पर्वतरांगांतील वास्तव्य, अज्ञातवासात असताना अल कायदा वाढवण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न शिवाय "अल कायदाचे पुनरुत्थान", "शोधमोहिमेचा सिद्धांत", "युद्धमैदानात ओबामा", "शोधदुव्याची संरचना", "ओसामा बिन लादेनची अखेरची वर्षं", "गुप्त योद्धे", "कारवाईच्या विविध दिशा" या प्रकरणांतून लादेनमधील धर्मवेडा, क्रूरकर्मा, चार बायकांचा पती, कुटुंबवत्सल पिता असे अनेक पैलू उलगडत जातात. पुस्तकाची अखेर "दिवा लावू नकोस" या प्रकरणातून होते. कदाचित हेच लादेनचे शेवटचे शब्द होते.  २००१ नंतरची पहिली ६-७ वर्षें अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील डोंगर रांगांत लादेनला शोधल्यानंतर तो डोंगराळ भागाऐवजी पाकिस्तानातच एखाद्या शहरात लपला असावा असा अमेरिकेच्या तपाससंस्थांचा संशय वाढत चालला होता. त्यानंतर लादेनने पाठवलेल्या ध्वनी चित्रफितींच्या मार्फत त्याचा माग काढत तो पाकिस्तानातील अबोटाबादला असण्याच्या निष्कर्षाला येईपर्यंत (तोही फक्त ५०% च!) आणि त्यांनंतर प्रत्यक्ष त्याच्यावरील कारवाई करण्यापूर्वी अमेरिकी नेव्ही सील्जच्या पथकाने केलेला सराव, अमावस्येच्या रात्री लादेन लपून बसलेल्या घरामध्ये घुसून केलेल्या हल्ल्याचा थरार, लादेनला मारून त्याची केलेली उत्तरक्रिया, पाकिस्तानी सरकार आणि सेनेला अंधारात ठेऊन केलेल्या कारवाईमुळे तयार झालेले वातावरण, लादेनला मारल्यानंतर अमेरिकेत झालेला जल्लोष या सर्व गोष्टी अगदी एखाद्या थरारक चित्रपटाला शोभेल अशा आहेत.

"ओसामा बिन लादेन" वर आजपर्यंत बरीच पुस्तके लिहिली गेली परंतु पीटर बर्गन यांचं हे पुस्तक त्याच धाटणीचे आहे असं म्हणणं थोडं धाडसाचंच ठरेल कारण पुस्तकाच्या शेवटी देण्यात आलेले संदर्भ वाचूनच लक्षात येते की पीटर बर्गन यांचे हे पुस्तक म्हणजे ओसामा बिन लादेन आणि अल्-कायदा यांच्या विषयीच्या माहितीचा अधिकृत दस्तऐवजच आहे. रवी आमले यांनी अतिशय सुंदररीत्या अनुवादित केलेलं, आवर्जून वाचण्यासारखं पुस्तक "मॅन हंट".





संदीप प्रकाश जाधव

Monday, March 1, 2021

"अंश"

 


लेखक : रत्नाकर मतकरी

प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस


रत्नाकर मतकरींचा आणखी एक दर्जेदार कथासंग्रह "अंश" वाचून झाला. यापूर्वी त्यांचं "अंतर्बाह्य" आणि "खेकडा" वाचलं होतं आणि तेव्हा जो अनुभव आला अगदी तसाच किंबहुना त्याहून थोडं जास्त शहारून आलं त्यांचा "अंश" हा कथासंग्रह वाचताना. गूढकथा हा रत्नाकर मतकरींच्या सर्वच पुस्तकांचा गाभा असला तरी त्यातील प्रत्येक कथेचा विषय वेगळा, त्यातून वाचकाला मिळणारे अनुभव वेगळे. "अंश" ची प्रत्येक कथा वाचत असताना सतत माझ्या डोक्यात एकच विचार येत होता की एखाद्या व्यक्तीची कल्पनाशक्ती इतकी अफाट कशी असू शकते? शेकडोंनी गूढकथा लिहून देखील प्रत्येक कथा मतकरींच्या कल्पनाशक्तीला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते. त्यांच्या "अंश" या कथासंग्रहातील १० कथा आणि १५४ पानांतून रत्नाकर मतकरी वाचकाला एका अतिशय गूढ विश्वात घेऊन जातात. मतकरींचा हा कथासंग्रह अगदी एका बैठकीत जरी वाचून पूर्ण होण्यासारखा असला तरी प्रत्येक कथेला थोडक्यात आणि तितक्याच ताकदीने दिला गेलेला गूढपणा वाचकाला अक्षरशः त्या कथेतील पात्रांसोबतच वावरत असल्याचा भास निर्माण करतो. कथांमधील काही काही प्रसंग तर वाचत असताना अंगावर काटा यावा इतकी भन्नाट वातावरण निर्मिती मतकरींनी त्यांच्या शब्दांतून केली आहे. खासकरून शेवटची कथा "आपुलीच प्रतीमा होते..." मधील मध्यरात्री बंद नाट्यगृहामधे कथेच्या नायकासोबत घडलेला प्रसंग अंगावर शहारे आणणारा आहे. या कथेसोबतच इतर कथा "अंश", "वारं", "राजाराव राणीबाई", "ऋणको", "पांदेगा", "स्वप्न आणि मार्ग", "शेवटची कादंबरी", "पर्जन्य", "जन्म" या कथासुद्धा तितक्याच दर्जेदार आहेत. 

एखादा गूढकथाकार जेव्हा कथेची पेरणी करत असतो तेव्हा त्याचा उद्देश असतो तो मानवी जीवनातील आणि त्याच्याही पलीकडील सत्याचा शोध घेण्याचा. गूढकथा या कितीही अवास्तव वाटणाऱ्या असल्या तरी लेखकाचा प्रयत्न असतो वास्तवाच्या जवळ जाण्याचा आणि त्या वास्तवाचा व्यापक अर्थ लावण्याचा. जेणेकरून गूढकथा या फक्त गूढकथा न राहता त्या वाचकाला अंतर्मुख करणाऱ्या असाव्यात, त्यांनी वाचकाला विचार करायला भाग पाडावं की खरंच असं होऊ शकतं का? खरंच असं काही असू शकतं का? परंतु हे करत असताना गूढकथा या तेव्हाच पटण्यासारख्या किंवा परिपूर्ण वाटतात जेव्हा कथेतील पात्रे, घटना, वातावरण आणि आशय यांची योग्य भाषेत मांडणी केली जाते. रत्नाकर मतकरींचा प्रत्येक कथासंग्रह या कसोटीवर पुरेपूर उतरतो आणि "अंश" सुध्दा त्याला अपवाद नाही.

- पंचमहाभूतांमधील वायूचे झपाटून टाकणे…

- कलावंताचे आणि त्याच्या प्रतिमेचे नाते…

- केवळ बुद्धीने प्रगती साधू पाहणार्‍या मानवजातीचे भविष्य…

- कादंबरीकाराच्या वर्तमानात मिसळलेला त्याचा भूतकाळ…

- माणूस आणि निसर्ग यांचा मित्र-शत्रू संबंध…

- माणसामध्ये नकळत नांदणारा सनातनाचा अंश…

मानवी जीवनाला लपेटून राहिलेल्या या आणि अशा कितीतरी गहन गूढांवर, वाचकाला गुंगवून टाकणार्‍या कथानकांच्या द्वारे अत्यंत नेमकेपणाने, सहजसुंदर भाषेत लिहिलेल्या, वाचकाला समग्र जीवनाचाच पुन्हा एकदा खोलवर विचार करायला लावणाऱ्या अशा रत्नाकर मतकरींच्या "अंश" या कथासंग्रहातील कथा.



एक आवर्जून वाचण्यासारखा गूढकथासंग्रह "अंश".



Monday, February 22, 2021

"रहस्य"

 


लेखक : गणेश महादेव

प्रकाशक : विश्वकर्मा पब्लिकेशन्स


कोणत्याही प्रकारचे "रहस्य" हे प्रत्येक माणसासाठी एक कुतूहलाचा विषय असतो आणि त्यामुळेच अशा विषयांवर लिहिलेली पुस्तके नेहमीच वाचकांच्या पसंतीस उतरत असतात. गणेश महादेव यांची "रहस्य" ही कादंबरी अशा वाचकांसाठी जणू खजिनाच आहे. १० प्रकरणे आणि २५४ पानांमधून उलगडत जाणारी या कादंबरीची कथा एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच आहे. निसर्ग - निसर्गाचे नियम, अध्यात्म - आधुनिक विज्ञान, सत्प्रवृत्ति - दुष्प्रवृत्ति या सर्वांना एका धाग्यात बांधून गणेश महादेव यांनी "रहस्य" ही अतिशय सुंदर कादंबरी साकारली आहे. आजपर्यंत जितक्या काही रहस्यकथा,कादंबऱ्या माझ्या वाचनात आल्या त्या प्रत्येकात असणारा समान धागा म्हणजे वाचकाला गुंतवून ठेऊन, अनपेक्षित धक्क्यातून पुढे सरकणारे कथानक आणि शेवटी होणारा अपेक्षित शेवट. पण गणेश महादेव यांची "रहस्य" कादंबरी याला अपवाद वाटली कारण कोणताही अनपेक्षित धक्का न देता अगदी सरळमार्गी जाणारी कथा, तरीही वाचक त्यामध्ये गुंतलेला राहून शेवटपर्यंत कथेसोबत जोडला राहतो, शेवटपर्यंत त्याची रहस्य जाणून घेण्याची उत्कंठा वाढतच राहते. कादंबरी वाचत असताना याचा शेवट काय होऊ शकतो किंवा काय होणार हा अंदाज सतत येत राहतो पण तरीही कथेची मांडणी जी गणेश महादेव यांनी केलेय, जी वातावरण निर्मिती त्यांच्या लिखाणातून झाली आहे त्यामुळे वाचक शेवटपर्यंत कथेत अडकून राहतो. इतिहास, अध्यात्म आणि तंत्रविद्या याभोवतीच जरी कादंबरीची कथा फिरत असली तरी आधुनिक म्हणजेच वर्तमान जगाचे संदर्भ कायम ठेऊन कथा लिहिली असल्याने ती वाचत असताना वाचक एका वेगळ्याच अनुभवातून जातो आणि कथेतील इतर पात्रांसोबतच आपल्याला देखील ते "रहस्य" खुणावत राहते. 

ऐतिहासिक वारसा असणाऱ्या होळकर घराण्याचं शेंडेफळ हर्षवर्धन होळकर हा या रहस्यकथेचा नायक. हर्षवर्धन जरी या कथेचा नायक असला तरी आबासाहेब होळकर, राजराजेश्वर गोसावी, बाबसा जंगम, कृष्णा जंगम, आर्यभाती, संजीवननाथ, अघोरी कपाली, प्रा. गोरक्षनाथ जाधव, सर्जेराव होळकर आणि त्याचा मुलगा संपतराव होळकर या सर्वांचा कथेतील सहभागसुद्धा तितकाच महत्वाचा आहे किंबहुना यांच्याशिवाय ही कथा पूर्णच नाही होऊ शकत. होळकरांचा ऐतिहासिक वाडा, मार्तंडगड, चंद्रगड, भैरवगड आणि या सर्वांच्या आसपासच्या प्रदेशात असणाऱ्या रहस्यांचा शोध म्हणजेच ही कादंबरी "रहस्य". मार्तंडगडचा राजा अधिरवर्मन याचा त्याच्याच सेनापती रुधिरवर्मनकडून धोक्याने झालेला खून आणि त्यानंतर अधिरवर्मनचा विश्वासू गुप्तहेर चंद्रगुप्ताने रुधिरवर्मनचा युद्धात केलेला पराभव अशी थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी कथेला देऊन लेखकाने वाचकला इतिहास आणि वर्तमानकाळात गुंतवून ठेवलंय. भक्ती, शक्ती, तंत्रविद्या, मंत्रसामार्थ्य, तपश्चर्या, सिद्धी अशा अनेक संदर्भातून पुढे सरकरणारे हे कथानक आणखीनच रहस्यमय होऊन जाते. काही काही ठिकाणी अतिरेक वाटावा इतके रहस्यमय संदर्भ कथेत दिले गेले आहेत पण कादंबरीची कथाच रहस्यावर आधारित असल्यामुळे ते योग्यही वाटतात. वाड्यातील जुनी कागदपत्रे चाळत असताना हर्षवर्धनला सापडलेला अगम्य भाषेतील ग्रंथ आणि त्यानंतर हर्षवर्धनच्या स्वप्नात येणारा साधू, बारवेच्या तळातील गुपित, त्यामधील प्राचीन मायावी यंत्र, आबांसोबत पोहायला गेल्यानंतर हर्षवर्धनला बारवेच्या तळाशी दिसलेला प्रकाशझोत, वाड्यातील जिन्याखाली असणारा गुप्त मार्ग, गुप्त खोलीचा जीवघेणा शोध, सुक्ष्मदेह धारण करणारा गोसावी, अघोरी तंत्रसाधना आणि त्यात दिला गेलेला नरबळी, चुकलेल्या तंत्रसाधनेमुळे संपतरावाची झालेली भ्रमिष्ट अवस्था, मार्तंडगड आणि चंद्रगडाच्या गुप्त संरचना, गुप्त वाटा, अभिमंत्रित जलपंचायतन यंत्र, या सर्वांवर असणारा भैरवगडावरील संजीवन नाथांचा अदृश्य पहारा, पाड्यातील ओढ्याशेजारील स्मशानभूमीत अघोरीकडून होणारी तंत्रसाधना अशा एक ना अनेक गोष्टींमुळे या रहस्यकथेला एक वेगळंच वलंय प्राप्त होते. नकळत वाचक त्या वातावरणात ओढला जातो. गणेश महादेव यांनी त्यांच्या लेखनातून या सर्व गोष्टी वाचकाच्या डोळ्यासमोर उभ्या केल्या आहेत. कादंबरीत उल्लेख झालेलं ३००० वर्षांपूर्वीचे शिवलिंग, नाथ संप्रदाय आणि त्याच्या स्थापनेचा इतिहास, ऋग्वेदातील १२ रुद्र, शिवाय होळकर घराण्याचा इतिहास आणि त्यांचं मार्तंडगड - चंद्रगड यांच्याशी असणारं नातं, हर्षवर्धनच्या काकांचं या रहास्याच्या शोधात अचानक नाहीसं होणं या सर्व गोष्टी कथेला आणखीनच गूढ बनवतात.

गणेश महादेव यांनी केलेला मराठी साहित्यातील एक वेगळा प्रयोग आणि चाकोरीबाहेरील एक भन्नाट रहस्यमय कादंबरी म्हणून वाचण्यासारखे पुस्तक "रहस्य".




संदीप प्रकाश जाधव

Monday, February 15, 2021

"बेरड"


लेखक : भीमराव गस्ती

प्रकाशक : राजहंस प्रकाशन


दया पवारांचं "बलुतं" हे दलित आत्मचरित्र मी काही दिवसांपूर्वी वाचलं होतं. मनाला अतिशय अस्वस्थ करणारं आणि आतून बाहेरून अक्षरशः हलवून टाकणारं असं हे आत्मचरित्र पण तितकंच प्रेरणादायी सुद्धा. जातीव्यवस्थेच्या नावावर होणारा भेदभाव आपल्या समाजात किती घट्ट रुतून बसलाय याची जाणीव दया पवारांचं "बलुतं" वाचताना झाली. आजही अशा भेदभावाची बरीच उदाहरणे आपल्याला "प्रगतशील भारतात" सहज  सापडतील. पण जेव्हा अशा कर्मठ, जाचक रूढी-परंपरा आणि समाजव्यवस्था यांना झुगारून, प्रचंड मेहनतीने स्वतःला सिद्ध करणारा एखादा दलित त्याच जातीव्यवस्थेसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व बनतो तेव्हा याच समाजव्यवस्थेतील विरोधाभास लक्षात येतो. दया पवारांच्या "बलुतं" नंतर माझ्या वाचनात आलेलं "बेरड" हे भीमराव गस्ती यांचं आणखी एक दलित आत्मचरित्र, तितक्याच तोडीचं आणि तितकंच प्रेरणादायी. दोन्हीही जरी दलित आत्मचरित्रे असली तरीही दोघांची तुलना करणं तसं चुकीचंच ठरेल कारण दोघांना आलेले अनुभव, दोघांचा संघर्ष हा पूर्णपणे भिन्न पातळीवरचे आहेत. भीमराव गस्ती यांनी बेरड समाजाच्या व्यथा, वेदना आणि होणाऱ्या छळाचे चित्रण त्यांच्या '"बेरड" या आत्मचरित्राच्या रुपात आपल्यासमोर आणले आहे. "रामोशी" हा शब्द कानावर पडला की आपल्या डोळ्यासमोर येतात ते चोरी, दरोडा, लूटमार करणारे लोक. आज स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरदेखील याच एका गोष्टीसाठी त्यांची असणारी ओळख आपल्याला समजण्यास पुरेशी आहे की हे लोक समाजापासून आजही किती तुटलेले राहिलेत. "रामोशी" ही महाराष्ट्रातील मागासलेली एक विमुक्त जमात. जंगलाच्या आसऱ्याने राहणारे हे लोक. महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आढळून येणाऱ्या या "रामोशी" समाजाचे कर्नाटकच्या सीमावर्ती भागातदेखील तुरळक प्रमाणात अस्तित्व आहे आणि तिथे कर्नाटकात यांना ओळखलं जातं ते "बेरड" या नावाने. "बेरड" हे पुस्तक आत्मचरित्रापेक्षा एका संपूर्ण समाजाचे जीवन आणि ते जीवन सुसह्य होण्यासाठी गस्ती यांनी उभ्या केलेल्या चळवळीचीच कहाणी आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरू नये. ज्या समाजात जन्माला येणारा प्रत्येकजण भले तो स्त्री असो वा पुरुष आपल्या माथी गुन्हेगाराचा शिक्का घेऊनच जगायला सुरुवात करतो. पोलिसांकडे असणाऱ्या गुन्हेगारांच्या यादीत आपोआपच ज्यांचे नाव जाते. गुन्हा केला असो व नसो "रामोशी", "बेरड" म्हणजे गुन्हेगारच! अशा समाजातून पुढे येऊन गस्ती यांनी स्वतःला सिद्ध तर केलंच शिवाय आपल्या समाज बांधवांच्या वाट्याला पिढ्यांपिढ्यापासून येणारा त्रास कमी होण्यासाठी आणि त्यांना इतर समाजांच्या प्रवाहासोबत आणण्यासाठी चळवळीच्या रुपात आयुष्यभर जी मेहनत घेतली त्याला तोड नाही. या समाजाच्या वाट्याला आलेल्या, अंगावर शहारे आणणाऱ्या जळजळीत अत्याचाराच्या कहाण्या गस्ती यांच्या आत्मचरित्राच्या रुपात वाचत असताना आपल्याला पडणारा प्रश्न, एखाद्याच्या आयुष्यात असं आणि इतकं कसं घडू शकतं? आणि त्याहूनही मोठा प्रश्न म्हणजे स्वतः इतके सहन करूनही एखादी व्यक्ती स्वतःपेक्षा जास्त इतरांचे जीवन कसे सुसह्य होईल याचाच विचार कसा करू शकतो? बेरड जातीच्या लोकांच्या कल्याणासाठी आयुष्य वेचलेल्या, जेष्ठ साहित्यिक, समाजसेवक अशी समाजात ओळख असणाऱ्या डॉ. भीमराव गस्ती यांच्या संघर्षाची कहाणी म्हणजेच हे पुस्तक "बेरड", त्याचबरोबर "रामोशी" किंवा "बेरड"  यांसारख्या शोषित, दुर्बल जातीच्या लोकांवर होणारे अन्याय कमी होऊन त्यांनाही प्रतिष्ठा मिळावी आणि इतर समाजातील  लोकांप्रमाणेच त्यांनाही माणुसकीची वागणूक मिळावी म्हणून प्रस्थापित समाजव्यवस्थेविरुद्ध दिलेला लढा, उभारलेली चळवळ म्हणजेच हे आत्मचरित्र "बेरड".

मुळातच हुशार असणाऱ्या भीमराव गस्ती यांनी वडिलांच्या शिक्षणासाठी असणाऱ्या भक्कम पाठिंब्यामुळे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांच्यावर असणाऱ्या "बेरड" या जातीच्या शिक्क्यामुळे पावलापावलावर त्यांना संघर्ष करतच शिक्षण घ्यावे लागले, काही वेळा तर न केलेल्या गुन्ह्यांसाठी देखील शिक्षा सहन करावी लागली. तरीही ते शिकत राहिले. इलेक्ट्रॉनिक्ससारख्या विषयातील त्यांनी  मिळवलेली पदव्युत्तर पदवी आणि याच विषयातील रशियन विद्यापीठातील डॉक्टरेट मिळवलेल्या त्यांच्यासारख्या व्यक्तीला कुठेही बक्कळ पगाराची नोकरी करून सामान्य माणसासारखे सरळ आयुष्य जगणे सहज शक्य होते. पण या सर्व सुखाचा त्याग करून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य बेरड समाजासाठी वाहून घेतलं. बेरड लोकांचे जीवन सुधारावं म्हणून स्वतःच्या घरादाराची पर्वा न करता रात्रंदिवस कष्ट घेतले. कोणताही पाठिंबा नसताना चळवळ उभी केली. देवदासी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि अंधश्रद्धा, रूढी-परंपरांनी जखडलेल्या "बेरड-रामोशी" समाजाच्या विकासासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. प्रसंगी स्वतःच्याच लोकांचा विरोध सहन केला. लहानपणापासूनच बेरडांवर होणारा अन्याय, अत्याचार त्यांनी स्वतः अनुभवला होता, पोलिसांकडून सतत होणारे अत्याचार, त्यांची बेरडांवर असणारी प्रचंड दहशत त्यांनी खूप जवळून पहिली होती त्यामुळे या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे असं त्यांना नेहमी वाटायचं पण खऱ्या अर्थाने त्यांच्या पुढील कार्याचा पाया रचला गेला तो त्यांच्या मोठ्या भावाचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत झालेल्या मृत्यूनंतर. पुढे शिक्षण पूर्ण करून ते पूर्णवेळ या सामाजिक कार्यात उतरले. बेरडांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात त्यांनी वर्तमानपत्रात लेख लिहिले, बऱ्याच पुढाऱ्यांच्या भेटी घेतल्या, वेगवेगळ्या दलित नेत्यांना मंचावर आणून परिषदा घेतल्या, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना सतत पत्रे लिहिली, प्रसंगी बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या स्वतः भेटी घेतल्या. बेरडांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात ते वेगवेगळ्या मार्गांनी सतत वाचा फोडत राहिले. काही स्वार्थी लोकांचा त्यांच्या या कार्याला असणाऱ्या विरोधातून त्यांच्यावर जीवघेणे हल्लेसुद्धा झाले पण तरीही न डगमगता ते या समाजाच्या विकासासाठी झटतच राहिले. बेरड लोकांची संघटना उभी करून त्यांना त्यांचे हक्क मिळावेत म्हणून संघर्ष करत असताना गस्ती यांना आलेले अनुभव पुस्तकात वाचताना मन सुन्न होऊन जाते. पोलिसांकडून होणाऱ्या अत्याचाराच्या घटना तर वाचकाच्या डोळ्यात पाणी घेऊन येतात. आपल्या या निस्वार्थी कार्याला आतून आणि बाहेरून असणारा प्रचंड विरोध सहन करत, येणाऱ्या प्रत्येक संकटाला न डगमगता धैर्याने सामोरे जाताना गस्ती यांनी दिलेल्या लढ्याची व्याप्ती पुस्तकात वाचताना अंगावर शहारे येतात.

"बेरड" ही भीमराव गस्ती यांच्या संघर्षाची, एकाकी लढ्याची कहाणी जितकी प्रेरणादायी तितकीच वाचकाला अंतर्मुख व्हायला लावणारी अशी आहे. आवर्जून वाचण्यासारखे आणि संग्रही ठेवण्यासारखे पुस्तक.







संदीप प्रकाश जाधव

Monday, February 8, 2021

"आवरण"

 



लेखक : डॉ. एस. एल. भैरप्पा

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

मराठी अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी


एस. एल. भैरप्पा यांच्या "साक्षी" या अतिशय सुंदर कादंबरीनंतर माझ्या वाचनात आलेली "आवरण" ही त्यांची दुसरी कादंबरी. त्यांच्या लिखाणाचं वेगळेपण "साक्षी" या कादंबरी वाचनावेळीच जाणवलं होतं आणि त्याचीच पुन्हा एकदा प्रचिती आली "आवरण" ही त्यांची ऐतिहासिक कादंबरी वाचत असताना. भैरप्पांच्या पुस्तकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं पुस्तक मानसिक पातळीवर वाचून संपत नाही असं वाटतं कारण पुस्तक वाचून झाल्यानंतर त्याचा विचार बराच वेळ आपल्या डोक्यात घोळतच राहतो. भारतासारख्या अतिशय प्राचीन सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा असणाऱ्या देशावर शेकडो वर्षांपूर्वी बऱ्याच परकीय मुस्लिम राजांनी आक्रमणे केली, सत्ता काबीज करून राज्य केलं. त्यांपैकी क्वचितच एखादा अपवाद वगळता सर्वच मुस्लिम राजांनी भारतातील हिंदूंवर इस्लाम लादून त्यांचे जबरदस्तीने इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न केला. तरीही वेगवेगळ्या मुस्लिम बादशहांनी शेकडो वर्षें प्रयत्न करूनही हजारो वर्षांचा वारसा असणारी हिंदू संस्कृती, परंपरा, हिंदू धर्म टिकून राहिले. हिंदू धर्मातील लोकांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी सर्वच मुस्लिम राजांनी एकच पद्धत वापरली आणि ती म्हणजे हिंदूंची प्रार्थनास्थळे नष्ट करणे, मंदिरे उध्वस्त करणे. यातूनच पुढे औरंजेबाने कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या काशी विश्वनाथाचे मंदीर जमीनदोस्त करून त्याजागी त्याच मंदिराचे खांब वापरून "ग्याणवापी मस्जिद" उभारली. यातून दुखावला गेलेला हिंदू हळूहळू एकवटू लागला आणि शेवटी इस्लामी सत्ता उलथवून टाकली. हे सत्तांतर होत असताना आणि झाल्यानंतरदेखील इतिहासात असं एकही उदाहरण नाही सापडणार जिथे हिंदू राजाने मुस्लिम लोकांचे जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केलंय किंवा त्यांची प्रार्थनास्थळे नष्ट केलीत. एस. एल. भैरप्पांनी याच मुस्लिम आक्रमणाला आणि काशी विश्वनाथ मंदिराच्या विध्वंसाला केंद्रस्थानी ठेवून, बरेच ऐतिहासिक संदर्भ देऊन अगदी तटस्थपणे लिहिलेली ही ऐतिहासिक कादंबरी "आवरण". काही सेक्युलर लोकांना हे वाटणं साहजिक आहे की भैरप्पांनी या कादंबरीतून मांडलेले ऐतिहासिक मुद्दे, ऐतिहासिक घटना आज वर्तमानकाळात वावरताना भारतातील हिंदू-मुस्लिम सलोख्याला घातक ठरू शकतात पण त्यांनी इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मागे इतिहासात कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे लोक जबाबदार नाहीत हे जरी खरं असलं, तरी "आपण त्यांचे वारसदार" आहोत अशा भावनेत राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या पुर्वजांनी केलेल्या कर्माची जबाबदारीसुद्धा स्वीकारली पाहिजे हेही तितकेच खरे आहे. इतिहासाकडून मिळवण्याइतकंच, त्याच्याकडून सोडवून घेणं हेसुद्धा परिपक्वतेचं द्योतक आहे. प्रत्येक धर्म, जाती आणि व्यक्तीला लागू पडणारी अशी ही गोष्ट भैरप्पांनी त्यांच्या या कादंबरी "आवरण" मधून लोकांपुढे आणली आहे. "आवरणचे" आणखी एक वेगळेपण म्हणजे या कादंबरी मधेच जन्म घेणारी आणखी एक कादंबरी.

"आवरण" ची नायिका आहे पूर्वाश्रमीची लक्ष्मी, धर्मपरिवर्तन करून मुस्लिम झालेली रझिया. १९९२ ला बाबरी मशिद पाडण्यात आल्यानंतर समाजात धार्मिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी सरकार प्रयत्न करत असते आणि याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून प्राचीन वास्तू-शिल्पांवर आधारित माहितीपट बनवण्याचे काम आमिर आणि रझिया कुरेशी यांच्यावर सोपवण्यात येते. माहितीपटाच्या प्राथमिक तयारीसाठी जेव्हा ते दोघेही विजयनगर (हंपी) येथे येतात तेव्हा तेथील उद्ध्वस्त मंदिरे पाहून रझिया म्हणजेच लक्ष्मी अंतर्मुख होऊन जाते आणि इथूनच फ्लॅशबॅक मधे सुरुवात होते या कादंबरीची. वर्तमानासोबतच इतिहासामध्ये डोकावत चालू झालेला या कादंबरीचा प्रवास वाचकाला अक्षरशः घेरून टाकतो, त्या फ्लॅशबॅक मधील प्रवासात वाचक कधी ओढला जातो हे त्याला लक्ष्यात येईपर्यंत एक विचारचक्र वाचकाच्या डोक्यात चालू होऊन जाते आणि प्रस्तावानेपासूनच चालू झालेले हे विचारचक्र पुस्तक वाचून पूर्ण झाल्यानंतर सुद्धा बराच वेळ तसेच राहते. पूर्वाश्रमीची हिंदू असणारी रझिया, आमीरच्या प्रेमात पडल्यानंतर घरातून असणारा वडिलांचा विरोध झुगारून, पुरोगामी विचारांच्या प्राध्यापक शास्त्री यांच्या प्रोत्साहनामुळे धर्मांतर करून मुस्लिम बनते आणि आमीरसोबत लग्न करते. आमीरच्या आधुनिक विचारांमुळे  आपले धर्मस्वातंत्र्य अबाधित राहिल हा तिचा विश्वास लग्नानंतर काहीच दिवसात फोल ठरतो. मुस्लिम धर्मातील जाचक चालिरिती आणि रुढी, खास करून स्त्रियांची केली जाणारी मुस्कटदाबी आणि आमीरने दिलेली तलाकची धमकी यामुळे ती हादरून जाते. अशा वातावरणात विजयनगरमधील हिंदू मंदिरांचा विध्वंस बघून दुखावलेली लक्ष्मी आमीरसोबत माहितीपट बनवण्यास नकार देते. याचदरम्यान गावाकडे एकटेच राहणाऱ्या लक्ष्मीच्या गांधीवादी विचारांच्या वडिलांचा मृत्यू होतो आणि लक्ष्मी तब्बल 28 वर्षांनंतर आपल्या गावी येते. इथून खऱ्या अर्थाने कादंबरीला कलाटणी मिळते आणि कादंबरी वेग पकडते. एका वेगळ्याच मार्गाने, लक्ष्मीच्या मनात सुरू झालेल्या वैचारिक द्वंद्वाने कादंबरीचा प्रवास सुरु होतो. लक्ष्मीने मुस्लिम धर्मात जाऊन विवाह केल्यानंतर तिच्या वडिलांनी म्हणजेच आप्पांनी मुस्लिम धर्म, मुस्लिम चालीरीती, त्यांची भारतावर झालेली आक्रमणे, भारतात आणि भारताबाहेर केलेला विध्वंस यांचा अभ्यास सुरू केलेला असतो. यावर आधारित एक गंभीर पुस्तक लिहायचादेखील त्यांचा विचार असतो, पण त्यांच्या अकस्मात झालेल्या मृत्यूने ते काम अपूर्ण राहून जाते. आपल्या वडिलांनी, अप्पांनी जमवलेली ग्रंथसंपदा आणि त्यांचा अभ्यास करून त्यांनी काढून ठेवलेली टिपणे पाहून लक्ष्मी आश्चर्यचकित होते. वडिलांनी जमविलेल्या पुस्तकांचा अभ्यास करून आणि त्यांनी काढलेल्या टिपणांच्या सहाय्याने वडिलांचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्याचे लक्ष्मी ठरवते. इथे जन्म होतो या कादंबरीतील कादंबरीचा.

लक्ष्मीने लिहायला घेतलेल्या या कादंबरीचा नायक आहे एक किशोरवयीन रजपूत राजपुत्र. देवगढच्या युद्धात झालेल्या पराभवानंतर गुलाम बनून राहत असताना त्याला खोजा बनवून बादशहाच्या जनानखान्यात ठेवलं जातं आणि या कादंबरीच्या प्रवासात तो हळूहळू इस्लाम धर्माच्या प्रभावाखाली जायला लागतो. इस्लाम धर्मात घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी, इस्लाम राजांची आक्रमणे, त्यांनी केलेले अत्याचार, हिंदूंसाठी असणारे त्यांचे जाचक कायदे या आणि अशा बऱ्याच गोष्टी खोजा झालेल्या राजपुत्राच्या माध्यमातून लक्ष्मी तिच्या या कादंबरीमधे उलगडत जाते. अत्याचारी मुस्लिम राजवटीत खोजा म्हणून, मुस्लिम चालीरीतींचे पालन करत बरीच वर्षें राहिल्यानंतर युद्धात आपण घेतलेल्या शरणागतीचा पश्चात्ताप करणारा राजपुत्र इतका ताकतीने कादंबरीमध्ये मांडलाय की नकळतपणे वाचकाचे डोळे त्याच्यासाठी पाणावतात. मुस्लिम झाल्यानंतर या राजपुत्राच्या वाट्याला वाट्याला आलेलं अत्याचारी आयुष्य, एका उमद्या राजपुत्राला जबरदस्तीने खोजा बनवण्याची घटना, विश्वनाथाचे मंदिर स्वतःच्या डोळ्यादेखत उद्‌ध्वस्त होताना झालेली त्या राजपुत्राची अवस्था या सर्व गोष्टी लक्ष्मीच्या कादंबरीमधून वाचत असताना अंगावर शहारे येतात. त्यानंतर त्या राजपुत्राचा गंगेच्या किनारी भेटलेल्या साधूशी झालेला संवाद आणि त्यातून त्याच्या मनाला आलेली उभारी हे सारं प्रत्यक्ष कादंबरीत वाचतानाचा अनुभव जितका अप्रतिम तितकाच तो वाचकाला अंतर्मुख व्हायला लावणारा असा. त्यानंतर खोजा झालेला राजपुत्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने स्वातंत्र्याचा बिगुल वाजविणाऱ्या छत्रसालाकडे जायला निघतो आणि रझियाच्या कादंबरीचा शेवट होतो. लक्ष्मीने / रझियाने लिहिलेल्या या कादंबरीच्या प्रकाशनानंतर उठलेला कल्लोळ आणि त्यातून पुढे वेगाने घडणाऱ्या घडामोडी याचं वर्णन "आवरण" च्या शेवटच्या भागात वाचायला मिळेल. स्वत:ला निधर्मी, पुरोगामी म्हणवणाऱ्या विचारवंतांचे खरे स्वरूप अतिशय परखड आणि वास्तवादीपणे शेवटच्या भागात रेखाटले गेले आहे. "आवरण" मधे मांडलेल्या सर्व मुद्द्यांसाठी, लेखकांनी लक्ष्मीच्या कादंबरीत 136 संदर्भग्रंथांची यादीच दिल्यामुळे पुरोगाम्यांच्या टीकेला वेगळे उत्तर देण्याची आवश्यकताच राहिलेली नाही यातून भैरप्पांचे चातुर्य लक्ष्यात येते. 

"कुणाचा तिरस्कार करणं, हेटाळणी करणं, मनं कलुषीत करणं हा इतिहासाचा उद्देश कधीच नसतो. असता कामा नये. आपल्या आधी होऊन गेलेल्यांच्या चुका डोळसपणे समजून घेऊन आपण आजचं जीवन शक्यतो निदान त्या दोषांपासून तरी मुक्त करून घेतलं पाहिजे. म्हणूनच ऐतिहासिक सत्याला कुठलाही रंग न देता थेट त्याकडे पाहण्याचा प्रामाणीकपणा हवा."

इतिहासात होऊन गेलेल्या हिंदू-मुस्लिम राज्यकर्त्यांच्या मानसिकतेवर आणि त्यातून झालेल्या परिणामांवर एस. एल. भैरप्पांनी अतिशय परखडपणे, उत्कटतेने आणि तितक्याच तटस्थपणे आपले विचार त्यांच्या "आवरण" या कादंबरीतून मांडले आहेत. अवघ्या दोन वर्षांत 22 आवृत्त्यांचा पल्ला गाठणारी, आवर्जून वाचण्यासारखी कादंबरी "आवरण".





संदीप प्रकाश जाधव

Tuesday, February 2, 2021

"काळजात धावतोय ससा"

 


लेखक : उत्तम कांबळे

प्रकाशक : सकाळ प्रकाशन


उत्तम कांबळे, संपादक-पत्रकार-साहित्यिक अशा वेगवेगळ्या रुपात लोकांपर्यंत पोहचलेलं एक नाव. सकाळ वर्तमानपत्रामधील सप्तरंग या पुरवणीच्या माध्यमातून त्यांचे बरेच लेख वाचकांपर्यंत पोहचले आणि जे वाचकांच्या पसंतीसदेखिल उतरले. सकाळमध्ये पत्रकार म्हणून सुरुवात केल्यानंतर पुढच्या प्रवासात मराठी साहित्यविश्वात वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली. सकाळमधील संपादकीय लेख असोत किंवा त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या, कथासंग्रह, चरित्र आणि संशोधन ग्रंथ किंबहुना त्यांचे कवितासंग्रह या सर्वांचंच एक वेगळंपण त्यांच्या लिखाणातून जाणवते. त्यांच्या "फिरस्ती" या लेखसंग्रहातील ५ पुस्तकांमधील एक सुंदर पुस्तक "काळजात धावतोय ससा". अतिशय साध्या, शेतकरी कुटुंबातून पुढे आल्यामुळे ते साधेपण त्यांच्या लेखनातही पुरेपूर उतरलंय ज्यामुळे वाचकाला त्यांचं साहित्य अधिक जवळचं वाटतं. उत्तम कांबळे यांचे हे १११ पानांचे "काळजात धावतोय ससा" सजलंय २७ प्रकरणांनी आणि प्रत्येक प्रकरण वाचकाला विचार करायला लावणारं.

माणूस म्हणून जगत असताना प्रत्येकाला आपल्या आयुष्याच्या वाटेवर येणाऱ्या अनेक वळणांवर विविध प्रकारची, विविध स्वभावाची बरीच माणसे भेटत असतात. त्या भेटलेल्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यामागे अनेक अनामिक गोष्टी, किस्से, त्यांच्या आयुष्याचा संघर्ष दडलेला असतो आणि प्रत्येकवेळी तो आपल्याला दिसतोच किंवा जाणवतोच असं नसतं. पण उत्तम कांबळे यांनी त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या विविध लोकांना बोलतं करून त्यांचा अनुभव टिपण्याचे कसब चांगलंच आत्मसात केलंय हे त्यांच्या "फिरस्ती" या लेखसंग्रहावरून सहज लक्षात येते. उत्तम कांबळे यांच्या फिरस्तीत त्यांना अशी अनेक माणसे भेटली आणि या प्रवासात वास्तव आयुष्याचे अनेक पदर त्यांच्यासमोर उलगडत गेले. फिरस्तीत भेटलेल्या याच अशा माणसांच्या जगण्याच्या, संघर्षाच्या कथा उत्तम कांबळे यांनी २७ प्रकरणांमधून त्यांच्या "काळजात धावतोय ससा" या पुस्तकात शब्दबद्ध केलेल्या आहेत. "काळजात धावतोय ससा" या लेखसंग्रहात आजच्या काळातल्या आतून-बाहेरून असुरक्षित असणाऱ्या माणसाचं मनोदर्शन उत्तम कांबळे यांनी करून दिलं आहे. आजच्या युगात स्वतःला अतिशय प्रगत म्हणवणाऱ्या माणसाची स्वत:च्या सावलीलासुद्धा भिणाऱ्या सशासारखी मानसिकता नेमकी कशामुळे झाली असावी, याचा धांडोळा उत्तम कांबळे यांनी त्यांच्या या पुस्तकात घेतला आहे. आज आपल्या भोवतालची व्यवस्था, पर्यावरण व आयुष्य तुडवायच्या वाटा हे सगळंच जसं माणसाच्या मनात धावणाऱ्या सशाला घाबरवू लागले आहेत. उत्तम कांबळे यांनी शब्दबद्ध केलेलं प्रत्येक प्रकरण वाचकाला खडबडून जागं करतं. पुस्तकातील काही लेखांमधून उत्तम कांबळे यांनी आधुनिक जगातल्या माणसाच्या जगण्यातला विरोधाभास, अपरिहार्य दु:खाची धग व अगतिकता अतिशय संवेदनशीलतेने व्यक्त केली आहे जी वाचकाला अंतर्मुख होण्यास भाग पडते.

एक वेगळं वाचन म्हणून आवर्जून वाचण्याआरखं उत्तम कांबळे यांच्या फिरस्ती या लेखसंग्रहातील एक सुंदर पुस्तक "काळजात धावतोय ससा".





संदीप प्रकाश जाधव

Tuesday, January 26, 2021

"गांधी का मरत नाही"

 


लेखक : चंद्रकांत वानखडे

प्रकाशक : मनोविकास प्रकाशन


चंद्रकांत वानखडे यांचं सध्या बरंच चर्चेत असणारं पुस्तक "गांधी का मरत नाही" हे आज वाचून पूर्ण केलं. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला माहित असणारे गांधीजी म्हणजे शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकात शिकले किंवा शिकवले गेले इतकाच काय तो परिचय. याच्याव्यतिरिक्त गांधीजी ऐकत आलो ते लहानपणापासून मित्रांमध्ये होणाऱ्या त्यांच्या टिंगलटवाळीतून आणि त्यांच्यावर केलेल्या विनोदांमधून, भले स्वतः कधी त्यांच्याबद्दल वाईट बोललो नसेन पण त्या होणाऱ्या टिंगलटवाळीचा आणि विनोदांचा मी आनंद नक्कीच घेतला होता. पण तसं करणं ही चूक कमी आणि माझा मूर्खपणाच जास्त होता हे चंद्रकांत वानखडेंचे "गांधी का मरत नाही" या पुस्तक वाचनानंतर मला प्रकर्षाने जाणवले. पूर्वीपासूनच आवर्जून असे गांधींविषयी जाणून घेण्याची ना कधी इच्छा झाली ना कधी तसा प्रयत्न केला, फक्त ऐकीव गोष्टींवरून स्वतःच्या डोळ्यांसमोर गांधीजींची एक खलनायकी प्रतिमा बनवून टाकली. आजपर्यंत गांधीजींवर लाखो पुस्तके लिहिली गेली पण सध्या वाचनात आलेल्या चंद्रकांत वानखडेंच्या "गांधी का मरत नाही" या पुस्तकाने माझ्या मनात बनलेल्या गांधीजींच्या त्या खलनायकी प्रतिमेवरील पडदा अक्षरशः फाडून टाकला आणि एक वेगळेच गांधीजी डोळ्यासमोर उभे राहिले. आज गांधी जन्माला १५१ वर्षें होऊनसुद्धा सामान्य लोकांमध्ये त्यांच्याबद्दल अजूनही बऱ्याच अफवा, बरेच गैरसमज आहेत. काही लोकांच्या मते गांधीजी मुस्लिमधार्जिणे होते तर काहींच्या मते ते हिंदुधार्जिणे होते, काहींना वाटते गांधी जातीयवाद मानणारे होते, सर्वांवर कळस म्हणजे काहींना गांधी स्त्रीलंपट होते असं वाटतं, गांधी वर्णभेदी होते, त्यांच्यामुळेच देशाची फाळणी झाली, त्यांनीच पाकिस्तनाला ५५ कोटी देण्यास भाग पाडले, त्यांच्यामुळेच भगतसिंग फासावर गेले असं म्हणणाऱ्यांचीही काहीच कमी नाही पण या आणि अशा बऱ्याच गोष्टी चंद्रकांत वानखडे यांनी त्यांच्या "गांधी का मरत नाही" या पुस्तकातील १५ प्रकरणांमधून खोडून काढल्या आहेत. शिवाय गांधी-सावरकर, गांधी-टिळक, गांधी-सुभाषचंद्र बोस यांच्या नात्यांमधे असणाऱ्या समज-गैरसमजांवरसुद्धा वानखडेंनी "गांधी का मरत नाही" मधून प्रकाश टाकला आहे. भलेही या एका पुस्तकातून पूर्ण गांधीजी समजणार नाहीत पण त्यांच्याविषयी असणारे गैरसमज नक्कीच दूर होतील आणि त्यांच्याबद्दल आणखी जाणून घेण्याची इच्छा निर्माण होईल असं हे चंद्रकांत वानखडेंचे पुस्तक "गांधी का मरत नाही".

"मोहनदास करमचंद गांधी" अर्थातच "महात्मा गांधी" जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात या नावाचा उल्लेख जरी झाला तर डोळ्यासमोर येणारी पहिली प्रतिमा म्हणजे धोतर नेसलेला, हातामध्ये काठी घेतलेला, डोळ्यावर गोल चष्मा चढवून आणि चेहऱ्यावर लहान मुलासारखे निर्मळ, मन प्रसन्न करणारे हसू घेऊन उभा असणारा एक वृध्द. आज पूर्ण जगाने ज्यांची दखल घेतली त्या गांधीजींना खरंच आपण ओळखलंय का? खरंच आपल्याला ते समजलेत का? असा प्रश्न पडावा इतके ते आणि त्यांचे विचार आज दुर्लक्षिले जातात. चलनी नोटांवर किंवा प्रत्येक चौकात असणाऱ्या त्यांच्या पुतळ्याच्या रुपात रोज दर्शन देणाऱ्या गांधीजींना पाहून वाटतं की सध्याच्या घडीला ते फक्त यापुरतेच मर्यादित असावेत. कोणत्याही जाती आणि धर्मापलीकडचा हा माणूस नेहमीच फक्त टिंगलटवाळीचा विषय राहिला. त्यांची बदनामी, द्वेष तर इतका पराकोटीचा की खरं काय नी खोटं काय हा प्रश्न पडावा. सातत्याने कोणते ना कोणते आरोप झेलणारे गांधीजी समजायला तसे कठीणच, कोणत्याही प्रकारचे आरोप करायलाही गांधी गरीबच कारण त्यांच्या पाठीशी कोणतीही जात नाही. तर्काबाहेरचे आरोप आणि अतिशय खालच्या पातळीवरची केलेली निंदा मग कालांतराने तीच खरी मानली गेली, पण प्रश्न पडतो त्यांच्या मागे एखाद्या "जातीची" भिंत असती तर असे आरोप त्यांच्यावर त्या जातीच्या भिंतीने लावू दिले असते का? जातीय अस्मितेचा भडका उडेल या भीतीने त्यांच्यावर आरोप करताना जरा जपून केले गेले नसते का? तरीही कधी कधी वाटते गांधींमागे एखादी जात भिंतीसारखी उभी नाही हे खरंतर त्यांचं सर्वात मोठं वैभव आहे कारण आजही लोकमान्य असणाऱ्या टिळकांवर ब्राम्हण मक्तेदारी गाजवतात, महात्मा फुल्यांना माळ्यांचे नेते म्हटले जाते, बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचे नेते इतकेच मर्यादित ठेवलं गेलं. परंतु गांधीजींच्या नशिबी हे भाग्य आलेच नाही, ते ना कोणत्या एका धर्माचे राहिले ना कोणत्या एका जातीचे, खरे तर ते एका देशापुरतेही राहिले नाहीत, ते वैश्विक झाले आणि त्यामुळेच त्यांच्यावर बेछूट आरोप करायलाही सोपे होऊन गेले. गांधींच्या बाबतीत दुर्दैव एवढंच की ज्यांच्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य झिजवलं, त्यांना त्याची तेवढी जाणीव नाही. त्यामुळेच संपूर्ण जगाने दखल घेतलेल्या या महापुरुषाबद्दल सध्या समाजात जो द्वेष, तिरस्कार वाढलेला आहे, वाढत आहे तो खरंच विचार करायला भाग पाडणारा आहे. लाखो अनुयायी असणाऱ्या गांधीजींचे मूठभर का होईनात विरोधकही आहेतच. त्यांपैकी कोणीही त्यांच्यावर काहीही बोलू शकतो, शिव्या देऊन तोंडसुख घेऊ शकतो कारण या विरोधात बोलायला गांधींच्या मागे कोणताही एक विशेष समाज किंवा जात उभी राहत नाही. गांधीजींवर सतत आरोपांच्या फैरी उडवल्या गेल्या, हिंदूनीं त्यांना मुस्लिमधार्जिणा ठरवून टाकले तर मुस्लिमांनी त्यांना हिंदूधार्जिणा, पण मग प्रश्न पडतो की गांधी नक्की होते तरी कोण आणि कोणाचे? तर गांधी फक्त आणि फक्त माणूसधार्जिणा होते. जात, धर्म, भाषा, प्रांत, देश यांपैकी कोणत्याही चौकटीत न बसणारे, कोणत्याही बंधनात न अडकणारे, या सर्वांपलीकडे जाऊन केवळ माणसांवर प्रेम करणारा एक महात्मा म्हणजे गांधीजी. मग प्रश्न असा पडतो की ज्या गांधींना संपूर्ण विश्व मानतो त्यांना त्यांच्याच देशात काही लोकांच्या एवढ्या द्वेषाचा आणि तिरस्काराचा सामना कशामुळे करावा लागतो? याच द्वेषापायी त्यांच्यावर गोळ्या घालून त्यांना ठार करण्यात आले आणि तरीही आज त्यांचे  पुतळे का तोडले जातात? त्यांचा पुतळा बनवून त्यावर गोळ्या का चालवल्या जातात?अहिंसेची शपथ घेतलेल्या निःशस्त्र गांधींची ३ गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली आणि त्या हत्येचे आजही या ना त्या मार्गाने समर्थन केलं जातं ते कशासाठी? एकाचवेळी गांधीजी हिंदू हिताचे मारेकरीही असतात आणि मुस्लिमविरोधीही, हे कसे? गांधीजी खरेच इतके वाईट होते तर त्यांच्याच नावाने आजही आपला देश का ओळखला जातो? आज गांधींचा इतका विरोध का होतोय? या सर्व गोष्टींचा विचार केला तर लक्षात येते याला कारणीभूत आहे वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांच्याबद्दल पसरवले गेलेले गैरसमज. चंद्रकांत वानखडे यांनी त्यांच्या पुस्तकातून याच वर्षानुवर्षे पसरत आलेल्या गैरसमजांना तडा दिला आहे.

बॅरिस्टर होऊन सुटाबुटात वावरणाऱ्या मोहनदास करमचंद गांधींचा, राष्ट्रपिता महात्मा गांधी होण्यापर्यंतचा प्रवास १६६ पाने आणि १५ प्रकरणांमधून थोडक्यात पण त्यांच्याबद्दलच्या तमाम गैरसमजांना फाटा देऊन तितक्याच ताकदीने चंद्रकांत वानखडे यांनी लोकांसमोर आणला आहे. आजपर्यंत ऐकत आलो "मजबुरी का नाम महात्मा गांधी" पण चंद्रकांत वानखडे यांनी या पुस्तकातून समोर आणलेले गांधीजी वाचत असताना लक्षात येते की "सामर्थ्याचेच नाव महात्मा गांधी होते, आहे आणि पुढेही राहील". अत्यंत पराकोटीचा द्वेष आणि तेवढेच भरभरून प्रेम या दोहोंच्या मधे मिश्कीलपणे हसत उभा असणारा हा चेहरा कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहील. कारण "गांधी मरत नाही".

प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे पुस्तक "गांधी का मरत नाही".





संदीप प्रकाश जाधव


Tuesday, January 19, 2021

"खेकडा"

 


लेखक : रत्नाकर मतकरी

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस


मराठी साहित्यविश्वाला मिळालेलं एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे रत्नाकर मतकरी. रंगभूमी आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला पण दुर्दैवाने कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला आणि मराठी साहित्यविश्वातील "रत्नाकर" नावाचं हे "रत्न" कायमचं निखळून पडलं. रत्नाकर मतकरी यांनी मराठी साहित्यामधे गूढकथा हा प्रकार आणला आणि प्रचंड लोकप्रिय झाला. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर बरीच पुस्तके, एकांकिका, नाटके लिहिली पण ते खास लक्षात राहतात ते त्यांनी लिहिलेल्या गूढकथांमुळे. जवळपास २०० पेक्षा जास्त गूढकथा त्यांनी लिहिल्या आणि कथासंग्रहाच्या रूपाने वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत पोहचल्या. त्यांनी लिहिलेली काही पुस्तके गहिरे पाणी, बकासुर, कबंध, रंगांधळा, अ‍ॅडम, रंगयात्री, अंतर्बाह्य आणि इतरही बरीच. "अंतर्बाह्य" हा मी वाचलेला त्यांचा पहिला गूढकथासंग्रह, ज्यामधील कथांचा गूढपणा वाचत असतानाच त्यांच्या प्रचंड कल्पनाशक्तीची जाणीव झाली आणि त्यांच्या इतर पुस्तकांबद्दलसुद्धा एक उत्सुकता जागी झाली. त्या उत्सुकतेतूनच वाचनात आलेला, त्यांच्या पुस्तकांच्या पंक्तीतील आणखी एक दर्जेदार गूढकथा संग्रह म्हणजे "खेकडा".

१० कथांच्या या संग्रहातील पहिलीच कथा म्हणजे "खेकडा" जी फिरते एका छोट्याशा अपंग मुलगीभोवती. आईविना जगणाऱ्या त्या मुलीचे तिच्या पित्याच्या प्रेयसीने उपहासाने आणि अपंगत्वातून झालेल्या तिच्या शरीराच्या अवस्थेमुळे तिला ठेवलेलं नाव "खेकडा". या पहिल्या कथेपासूनच रत्नाकर मतकरींच्या कथा वाचकाला घेरायला चालू करतात आणि आपल्याला गूढकथांच्या एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात, ज्या वाचत असताना त्यांच्या सर्वच कथांमध्ये दाटून राहिलेलं भय वाचकाला पानापानावर जाणवत राहतं. प्रत्येक कथेमधील भय हे वाचकाला कडकडून दंश करणारे आणि जिव्हारी झोंबणारे तर आहेच शिवाय बऱ्याच ठिकाणी या गूढकथा ज्या पात्राभोवती फिरतात त्या पात्राबद्दल नकळत वाचकाच्या मनात सहानुभूतीसुद्धा निर्माण करतात. हे मतकरींच्या गूढकथांचं आणखी एक वेगळं वैशिष्ट्य. पुस्तकातील प्रत्येक गूढकथा वाचकाला एकप्रकारे आपल्या प्रवासात सोबत घेऊनच पुढे सरकते. त्यामुळेच वाचकाचे मन झपाटून टाकण्याची शक्ति असणाऱ्या या कथा वाचून अंगावर जो सरसरून काटा उभा राहतो तो दीर्घकाळ तसाच टिकून राहतो. "खेकडा" या पहिल्या कथेपासून सुरू होऊन "तुमची गोष्ट" या कथेने या पुस्तकाचा शेवट होतो. तो शेवटसुद्धा इतका विलक्षण की जो वाचत असताना वाचक शहारून जावा. "तुमची गोष्ट" या कथेच्या सुरुवातीलाच मतकरी सांगतात की ही "तुमची गोष्ट आहे, म्हणजे तुमच्याही बाबतीत घडू शकेल अशी गोष्ट" आणि शेवटीही निक्षून सांगतात, "तुमची म्हणून सांगीतलेली  ही गोष्ट तुमची नव्हेच, मी आपली एक शक्यता सांगितली एवढेच ", पण तरीही या शेवटच्या कथेत ज्या थरारक अनुभवांचे निवेदन मतकरींनी दिलेलं आहे त्याचा प्रभावच इतका विलक्षण आहे की अपराधाचा स्पर्श वाचकाच्या मनाला नसूनही आपल्या गळ्याभोवती फासाचा स्पर्श झाल्याची भावना वाचक अनुभवतो. प्रत्येक कथेला एका वेगळ्या उंचीवर, एका वेगळ्या वळणावर घेऊन जाऊन वाचकाला मिळणाऱ्या अनपेक्षित धक्क्यातून होणारा शेवट हे मतकरींच्या कथांचे वैशिष्ट्य इथेही प्रकर्षाने जाणवते. या दोन कथांव्यतिरिक्त इतरही कथा जशा "कुणास्तव कुणीतरी", "अंतराय", "कळकीचे बाळ", "पावसातला पाहुणा", "शाळेचा रस्ता", "ती, मी आणि तो", "निमाची निमा", "एक विलक्षण आरसा", आणि "आल्बम" या एकाहून एक गूढ कथा वाचकाला स्तब्ध करून टाकतात. यातील प्रत्येक कथेचा शेवटसुद्धा वाचकाच्या विचारा पलीकडचा, अनपेक्षित धक्का देणारा आणि बराच वेळ डोक्यात घोळत राहणारा असा.

गूढकथांची आवड असणाऱ्यांनी हे पुस्तक नक्कीच वाचावं पण त्याचबरोबर इतरांनीसुद्धा आवर्जून वाचण्यासारखं असं हे रत्नाकर मतकरी यांचं पुस्तक "खेकडा".






संदीप प्रकाश जाधव

Tuesday, January 12, 2021

"व्यक्ती आणि वल्ली"

 


लेखक : पु. ल. देशपांडे

प्रकाशक : मौज प्रकाशन


पु. ल देशपांडे अर्थातच महाराष्ट्राचे लाडके भाई. मराठी साहित्यविश्वाला मिळालेलं एक असं रत्न ज्याला वेगळ्या ओळखीची गरज नाही. वाचनाची आवड असो वा नसो पु.लंच्या एखाद्या तरी पुस्तकाचे नाव प्रत्येक मराठी माणूस नक्कीच सांगू शकेल इतके ते आणि त्यांचं साहित्य लोकांपर्यंत पोहचले. पु.लंच्या लेखणीची ताकद न अनुभवणारे लोक अगदी अपवादानेच सापडतील. अगदी सहज सुंदर भाषेत लिहिलेल्या त्यांच्या लेखनाची जादूच अशी आहे की आपण मनाच्या आनंदी अवस्थेत पु.लंचे एखादे पुस्तक जर वाचले तर आपला आनंद द्विगुणित होईल तसेच जर दु:खी अवस्थेत वाचले तर त्या दु:खाची तीव्रता खूप कमी होईल आणि या गोष्टीचा अनुभव बऱ्याच वाचकांनी घेतलाही असेल. पु.लंनी त्यांच्या आयुष्यात अनेक लेख, कथा, कादंबऱ्या लिहिल्या ज्या लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या त्यांपैकीच एक अतिशय सुंदर आणि अजरामर पुस्तक म्हणजे "व्यक्ती आणि वल्ली". हे पुस्तक म्हणजे पु.लंनी लिहिलेल्या १८ काल्पनिक व्यक्तिरेखांचा एक संग्रहच आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्याला अनेक बहुरंगी, बहुढंगी माणसं भेटत असतात. अगदी सामान्य आयुष्य जगत असणाऱ्या अशा बऱ्याच व्यक्ती आपल्याला जीवनाचं तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगून - शिकवून जातात पण सामान्यांच्या आयुष्यातील या असामान्य वल्लींना अजरामर केलं ते पु. ल देशपांडेंच्या "व्यक्ती आणि वल्ली" या पुस्तकाने. या पुस्तकातील व्यक्तीरेखा जरी पु.लंच्या कल्पनेतून अवतरल्या असल्या तरी हे पुस्तक आपल्याला अंतू बर्वा, सखाराम गटणे, नारायण, चितळे मास्तर, नंदा प्रधान अशा अनेक पात्रांशी साधर्म्य असणाऱ्या आपल्या आयुष्यातील अनेक लोकांना आपल्या डोळ्यासमोर घेऊन येते तसेच नकळतपणे आपण आपल्या आसपास वावरणाऱ्या अशा अवली पात्रांचा शोध घ्यायलासुद्धा नक्कीच सुरूवात करतो.

"व्यक्ती आणि वल्ली" या १८ विविध व्यक्तिचित्रांच्या संग्रहातून पु.लंनी सामान्य माणसांच्या आयुष्यात येणाऱ्या विसंगत आणि विचित्र अनुभवांना अतिशय विनोदी शैलीनं गहिरेपणा प्राप्त करून दिला आहे. पुस्तकातल्या व्यक्ती आणि वल्लीही मनाला भावतात. अतिशय मिश्किल अशी शैली आणि तितक्याच निर्मळ विनोदाच्या मांडणीमुळे वाचकाच्या मनाची मरगळ दूर होते. काही संवाद वाचत असताना नकळत चेहऱ्यावर एक हलकेसे स्मित येते तर काही संवाद खदखदून हसवून जातात. प्रत्येक पात्राचे वर्णन इतकं जबरदस्त की त्यातून ते पात्रच वाचकाच्या समोर येऊन उभे रहावे. मन प्रसन्न करणारे हलकेफुलके संवाद वाचकाला त्या पात्राच्या आणखीनच जवळ घेऊन जातात. पुलंच्या प्रतिभेचा चौरस आणि मुक्त संचार या "व्यक्ती आणि वल्ली" पुस्तकात आपल्याला पाहायला मिळेल. तसे पु.लंनी पुस्तकातील सर्वच्या सर्व १८ पात्रे अतिशय अफलातून रंगवली आहेत पण मला अंतूबर्वा ही वल्ली थोडी जास्तच आवडली. "वल्ली" म्हणजे "नमुना" असा पु.लंना अभिप्रेत असणारा अर्थ, पु.लंनी आपल्यासमोर आणलेला या पुस्तकातील प्रत्येक "नमुना" इतका प्रभावी आहे की १९६५ मधे संग्रहित झालेली ही व्यक्तिचित्रे आजही तितकीच ताजी - टवटवीत वाटतात.

प्रत्येकाने वाचावे आणि आवर्जून संग्रही ठेवावे असे हे पु. ल. देशपांडे यांचं पुस्तक "व्यक्ती आणि वल्ली".





संदीप प्रकाश जाधव

Monday, January 4, 2021

"विश्वस्त"



लेखक : वसंत वसंत लिमये

प्रकाशक : राजहंस प्रकाशन


रहस्यकथा किंवा रहस्य कादंबरी वाचकाला नेहमीच एका वेगळ्या जगात घेऊन जातात आणि ती रहस्य कादंबरी जर एखाद्या ऐतिहासिक घटनेला, स्थानाला किंवा व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून लिहिली गेली असेल तर त्याचं एक वेगळंच वलय वाचकाभोवती तयार होतं जे नेहमीच शब्दांत वर्णन न करता येण्यासारखं असतं. याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे प्रत्येक माणसाला आपल्या इतिहासाबद्दल असणारं एक कुतूहलमिश्रित आकर्षण. मुरलीधर खैरनार यांची "शोध" ही मी वाचलेली पहिली "ऐतिहासिक रहस्यमय कादंबरी" आजही ज्याचा विचार जरी मनात आला तरी त्यातील घटनांचे संदर्भ आठवून डोक्यात एक विचारचक्र सुरू होते. असाच काहीसा अनुभव "प्रतिपश्चंद्र" आणि "महाभारताचे रहस्य" या दोन ऐतिहासिक रहस्यमय कादंबऱ्या वाचनानंतरही आला. भारतासारख्या देशाचा अगदी रामायण-महाभारतापासून ते पेशवाई पर्यंतचा इतिहास हा नेहमीच एक स्वतंत्र संशोधनाचा विषय राहिला आहे आणि सामान्य लोकांसाठी तो कुतूहलाचा. अशाच एका महाभारतकालीन घटनेला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली ही वसंत वसंत लिमये यांची कादंबरी "विश्वस्त". महाभारत काळातील सर्वांच्या परिचयाचं किंबहुना अनेकांचं आवडतं व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्णाच्या बालपणातील, तरुणपणातील अनेक पराक्रम आपण कथांच्या रुपात अगदी लहानपणापासून ऐकत-वाचत आलो आहोत. मात्र "विश्वस्त"च्या निमित्ताने कृष्णाचा वृद्धापकाळ आपल्यासमोर येतो. कृष्णाला मिळालेल्या शापामुळे आपल्या वारसदारांचा, यादवांचा आपापसांत लढून स्वतःच्या डोळ्यादेखत होणारा शेवट पाहत असतानादेखील पुढच्या अनादि-अनंत काळातील आपल्या पिढ्यांसाठी कृष्णाने करून ठेवलेली तजवीज म्हणजेच ही कादंबरी "विश्वस्त". श्रीकृष्णाच्या असीम दूरदृष्टीची कथा म्हणजेच वसंत वसंत लिमये यांची ही कादंबरी "विश्वस्त". वसंत लिमये यांनी लिहिलेल्या या कथानाकाचा पाया आहे महाभारतकालीन अतिशय वैभवसंपन्न असं साम्राज्य असणारी श्रीकृष्णाची द्वारका. परंतु द्वारका बुडत असताना द्वारकेचे प्रचंड वैभव देखील बुडाले असेल का? आणि जर ते वैभव बुडाले असेल तर ते सध्या कुठे आहे? द्वारका बुडण्यापूर्वी "विश्वस्त" म्हणजेच श्रीकृष्णाने द्वारकेचे ते अफाट वैभव वाचवण्यासाठी काही प्रयत्न केले असतील का? आणि तसे प्रयत्न जर केले गेले असतील तर ते पूर्ण झाले असतील का? या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ऐतिहासिक संदर्भाना कल्पनेची जोड देऊन आज वर्तमानकाळात केले गेलेले प्रयत्न म्हणजेच ही वसंत वसंत लिमये यांची कादंबरी "विश्वस्त".

पुण्यातील एका कॉफीशॉपमधे जमणारा, इतिहासाची आवड असणारा आणि त्या आवडीतूनच ऐतिहासिक रहस्यांचा मागोवा घेणारा एक ग्रुप "जे एफ के" म्हणजेच 'जस्ट फॉर किक'. या ग्रुपमधील जोआन, अनिरुद्ध, प्रसाद, शब्बीर (शॅबी), मकरंद (मॅक) ही महत्त्वाची पात्रे तसेच अनेक ऐतिहासिक संदर्भ, वर्तमानकाळातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकीय-सामाजिक चालू घडामोडी या सर्वांतून साकार झालेली अत्यंत थरारक, रोमांचक अशी ही कादंबरी "विश्वस्त". वसंत लिमये यांनी या कादंबरीत भारतीय प्राचीन काळ, त्याकाळातील घडलेल्या काही घटना, त्यांचे समकालीन संदर्भ आणि पुरातत्वीय संदर्भ यांची सांगड घालून वाचकाची रंजकता अगदी शेवटच्या पानापर्यंत टिकून राहील याची पुरेपूर काळजी घेतली आहे. काळाची चौकट मोडून ऐतिहासिक संदर्भ आणि कल्पना यांचा मिलाफ कांदबरीत अतिशय उत्तमरित्या जमवून आणला आहे. श्रीकृष्णाची बुडालेली द्वारका आणि द्वारकेचं प्रचंड वैभव यासोबत अनेक महाभारतकालीन गूढ रहस्ये नेमकेपणाने, कौशल्याने उलगडण्यात आली आहेत. जेएफके ग्रुपला ब्रह्मगिरी आणि दुर्गभांडारच्या भटकंतीत एक वस्तू सापडल्यानंतर सुरू होतो या कादंबरीचा एक भन्नाट, रोमांचक प्रवास. द्वारकेचे वैभव शोधण्याच्या या प्रवासात जेएफके टिमने केलेल्या इतरही मोहिमा जसे विजयदुर्गची मोहिम, मुंबईतील जमिनीखालील भुयारे शोधण्यासाठी केलेली धडपड यांचेही अगदी विस्तृत आणि रोमांचक वर्णन कादंबरीत वाचायला मिळेल. ‘विश्वस्त’ व ‘वारसदार’ या दोन संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन कृष्णाच्या काळापासून ते आज वर्तमानकाळात घडत असलेल्या घटनांचा सांधा जोडण्याचा प्रयत्न वसंत लिमये यांनी "विश्वस्त"मध्ये केला आहे. हे करत असताना लिमये यांनी यादवीनंतर द्वारकेमध्ये माजलेले अराजक, प्रलयंकारी वादळानंतर बुडालेली द्वारका, चाणक्य, चंद्रगुप्त, भारतावर झालेले महमद गझनीचे आक्रमण, सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराचा केलेला जिर्णोद्धार, २०१४ ची मोदींची लोकसभा निवडणूक, संघाची भूमिका या सर्वांना एका काल्पनिक साखळीत बांधले आहे. मोदी आणि संघ यांच्यासाठी कादंबरीमध्ये नावे भलेही वेगळी घेतली असली तरी वाचकाला त्यांचा संदर्भ सहज लक्षात येतो.

एखाद्या ऐतिहासिक रहस्यमय कादंबरीला शोभेल अशीच या कादंबरीची सुरुवात अतिशय संथ आहे. बऱ्याच ठिकाणी ती विनाकारण ताणलेलीसुद्धा वाटते, परंतु तरीही वाचक कथेसोबत जोडलेला राहतो. विविध पात्रांचा परिचय करून देत असताना महाराष्ट्रातील ट्रेकिंगची स्थाने, कोकण, शिवाजी महाराजांचा इतिहास अशी वेगवेगळी वळणे घेत अमेरिका, इंग्लंड, गुजरात अशा अनेक ठिकाणी घडणाऱ्या थरारक घाटनांतून कादंबरी पुढे सरकत राहते. भारतीय नौदलापासून ते इतिहास संशोधनातील चोरी, आध्यात्मिक संप्रदायातील गुन्हेगारी अशा अनेक प्रसंगांतून वेगवेगळ्या मानवी स्वभावांचे दर्शन  लिमये यांनी या कादंबरीतून करून दिले आहे. हळूहळू कादंबरीचा हा प्रवास इतका वेग पकडतो की, वाचक त्या कथेसोबत ओढला जातो. वाचकाला धक्क्यामागून धक्के बसत असताना एक उत्कंठावर्धक कादंबरी एवढेच त्याचे स्वरूप न राहता आपला इतिहास जिवंत रूपात पुढे येत राहतो. महाभारतातील काळ आपल्यासमोर जिवंत होऊन पुढे उभा राहतो. चाणक्याचा काळ हा आपण आपला इतिहास मानतो परंतु महाभारताचा काळ म्हणजे एक पौराणिक कथा असंच आपण आजपर्यंत ऐकत-वाचत आलो आहोत. पण चाणक्याच्या काळापूर्वी आपल्या देशाला इतिहास नव्हता का हा विचार सहसा केला जात नाही? जर तो इतिहास असेल तर तो काय होता? याचा विचार करायला लावणारी अशी ही कादंबरी "विश्वस्त". वसंत लिमये यांनी या कादंबरीमध्ये भारतातील तसेच भारताबाहेरील अनेक ठिकाणांची ऐतिहासिक आणि पौराणिक दाखले देत एक गुंफण केली आहे जीला कल्पनेची जोड असली तरी त्याची अतिशयोक्ती कुठेच जाणवत नाही. एकदा हातात घेतलेली ही कादंबरी संपूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवावीशी वाटतच नाही इतका वाचक या प्रवासात हरवून जातो. 

अज्ञात इतिहास आणि वर्तमान वास्तव, कल्पित आणि सत्य यांच्यामधल्या पुसट, धूसर सीमारेषांवर आटयापाटया खेळणारी नाटयपूर्ण, वेगवान घटनांच्या प्रवाहात वाचकाला खेचून नेणारी आणि खिळवूनही ठेवणारी वसंत लिमये यांची एकदा आवर्जून वाचावी अशी कादंबरी "विश्वस्त".




संदीप प्रकाश जाधव

Monday, December 28, 2020

"लुचाई"

 


लेखक : नारायण धारप

प्रकाशक : साकेत प्रकाशन


नारायण धारप यांच्याबद्दल फार आधी कुठेतर वाचलं होतं की " नारायण धारप हे एक असं रसायन आहे की ज्यांचं एक पुस्तक वाचलं तर इतरही पुस्तके वाचल्याशिवाय चैन पडत नाही, त्यांनी लिहिलेल्या भयकथा वाचनाचं व्यसनच लागून जाते." मीही सध्या अशाच काहीशा अनुभवातून जात आहे असंच म्हणावं लागेल कारण त्यांच्या "अघटित" आणि "चेटकीण" या दोन पुस्तकांनंतर "लुचाई" हे तिसरे पुस्तक  वाचून हातावेगळं केलं आणि लगेचच त्यांचं आणखी एखादं संग्रहित पुस्तक वाचण्याचा विचार मनात घोळूही लागला. आज बऱ्याच लेखकांचे अतिशय उत्कृष्ट असे गूढकथा संग्रह आणि कादंबऱ्या वाचायला उपलब्ध आहेत आणि मी त्यातील काही वाचले देखील आहेत पण ६० च्या दशकात लिहिल्या गेलेल्या नारायण धारप यांच्या लेखनाला आजही तोड नाही. माझ्यासारख्या आजच्या पिढीला जरी नारायण धारप हे नाव नवीन असले तरी आपल्या भयकथा - कादंबऱ्यांनी त्यांनी मराठी साहित्यविश्वाचा एक काळ गाजवला होता. नारायण धारप यांच्या प्रचंड कल्पनाशक्तीचा अंदाज त्यांचं पुस्तक वाचायला घेतलं की पाना-पानावर येत राहतो. त्यांच्या कल्पना विलक्षण असण्यासोबतच प्रचंड सुसंगत आणि शात्रीय पायावर आधारित वाटतात. कथेतील शब्द आणि वर्णन यांची अतिशयोक्ती कधीच वाटत नाही. शब्द साधेच पण जबरदस्त परिणामकारक. नारायण धारप यांची आजपर्यंत ५० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आणि त्यांपैकीच एक प्रचंड गाजलेली अतिशय गूढ, रहस्यमय, वाचत असताना अंगावर शहारे आणणारी, २७० पानांमध्ये भीतीचा अगदी जवळून अनुभव देणारी कादंबरी "लुचाई".

दुर्गापूर या गावात असणारा नाईकांचा वाडा आणि गोपाळ शंकर जावडेकर म्हणजेच जयदेव व्यास यांच्या भोवती फिरणारी या कादंबरीची कथा. भर उन्हात एक १२-१३ वर्षांचा मुलगा एका तरुणासोबत ओसाड पडलेल्या गावातील प्रत्येक घरात जाऊन ते घर पेटवून देऊन बाहेर पडत आहे आणि हे सर्व करत असताना कोणत्यातरी जबर अशा भीतीचा पगडासुद्धा त्यांच्या मनावर आहे, अशी एखाद्या भयपटाला शोभण्यासारखी या कादंबरीची सुरुवात. त्या पेटवलेल्या घरांचे वर्णन वाचता वाचता इथूनच एक कुतूहल मिश्रित भीती वाचकाला घेरायला चालू करते जी पुस्तक वाचून पूर्ण झाल्यानंतरसुद्धा बराच वेळ अपल्यासोबत राहते. त्यानंतर मग फ्लॅशबॅकमधे जाऊन जयदेवचा दुर्गापूरमधला भूतकाळ आणि वर्तमानकाळातील घटना यांना जोडत चालू होतो या कादंबरीचा रहस्यमय, भीतीदायक असा प्रवास. १९४८ च्या जाळपोळीनंतर आपल्या आजोबांसोबत दुर्गापूर सोडून मुंबईला गेलेला जयदेव जवळपास २२ वर्षांनी पुन्हा दुर्गापूरमध्ये येतो आणि त्याचदरम्यान काही गूढ घटनांची मालिका गावात चालू होते. गावातील एकामागून एक लोकांचे रहस्यमयरीत्या आजारी पडणे आणि शेवटी एखाद्या रस शोषून घेतल्यानंतर दिसणाऱ्या फळासारखे शरीर होऊन मरून जाणे अशी रोज एखादी तरी घटना जयदेवच्या आसपास घडायला चालू होते. दिवसा सूर्यप्रकाशात हसत खेळत राहणारे गाव दररोज अंधार पडल्यानंतर हळूहळू एका वेगळ्या जगाच्या स्वाधीन होण्यास सुरुवात होते. रोज सायंकाळनंतर कोण ना कोण त्या "लुचाई" चा शिकार व्हायला लागतो. "लुचाई" म्हणजे लुचने, गळ्यामध्ये लुचून रक्त शोषून घेणारी म्हणजेच "लुचाई". अतिशय अप्रतिम आणि खिळवून ठेवणाऱ्या कथेतून नारायण धारप यांनी लुचाई एकदम जिवंत आपल्या डोळ्यासमोर आणली आहे जे वाचताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. भितीने रक्त गोठून टाकणारा सैतानी नंगानाचच त्यांनी या कादंबरीतून आपल्यासमोर उभा केला आहे. नाईकांचा गूढ वाडा, शिंदेंचा पडका वाडा, गावातील बाग, स्मशानभूमी, गावाची वेस, एकनाथचं घर अशा एकामागून एक ठिकाणी प्रकट होणारी "लुचाई" आपल्या समोर पण येते की काय अशी नकळत एक भीती वाचकाला वाटावी इतकी भयानक पार्श्वभूमी धारप यांनी कथेला दिलेली आहे. जयदेव गावात आल्यानंतर सुरुवातीला १-२ लोकांना लुचणारी ती "लुचाई" हळूहळू संपूर्ण गावाला लुचते आणि मागे राहतात फक्त जयदेव, त्याचा मित्र डॉ. रामदास आणि १३ वर्षांचा गावातीलच एक मुलगा एकनाथ. या तिघांनी त्या अतिशय गूढ, रहस्यमय, भयानक घटनांचा लावलेला छडा आणि त्या वाईट शक्तीचा केलेला शेवट यांची थरारक कथा म्हणजेच ही कादंबरी "लुचाई". 

भयकथांची आवड असणाऱ्यांना नारायण धारप हे नाव आणि त्यांचे लेखन वेगळ्याने सांगायची आवश्यकता नक्कीच नाही पण इतरांनीसुद्धा एक वेगळं वाचन, एक वेगळा अनुभव म्हणून आवर्जून वाचावे अशा धारपांच्या पुस्तकांपैकी एक पुस्तक "लुचाई".





संदीप प्रकाश जाधव



Tuesday, December 22, 2020

"साक्षी"

 



लेखक : डॉ. एस. एल. भैरप्पा

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

मराठी अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी


एस. एल. भैरप्पा, एक अतिशय लोकप्रिय कन्नड कादंबरीकार. सौ. उमा कुलकर्णी यांनी अनुवादित केलेल्या त्यांच्या काही मराठी कादंबऱ्या अंचू, पर्व, अवेषण, आवरण, सार्थ, वंशवृक्ष या आणि बऱ्याच ज्या कन्नड इतक्याच मराठीमध्येसुद्धा खूप प्रसिद्धीस आल्या. त्यांच्या अशाच साहित्यांपैकी एक गाजलेलं आणि अतिशय उत्कृष्ट साहित्य म्हणजे त्यांची कादंबरी "साक्षी". "साक्षी" चा अर्थ खरं बोलणं, परंतु आज समाजात वावरत असताना एखाद्या साक्षीदाराकडून बोललं जाणारं खरं हे ते ज्या व्यक्तीसाठी बोललं जातं त्या व्यक्तीला त्याचा फायदा व्हावा अशाच प्रकारचं असतं. अगदी देवाशपथ खरं बोलेन असं म्हणून दिल्या गेलेल्या "साक्षी" या बऱ्याच वेळा खोट्याच असतात. परंतु तत्वज्ञानानुसार बोलायचं झालं तर "साक्षी" म्हणजे आपला अंतरात्मा आहे. ज्याचा संबंध मानवाच्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाशी आहे तसेच शरीरात असणाऱ्या आपल्या मन, बुद्धी आणि आत्म्याशी आहे. जेव्हा "साक्षी" च्या त्या स्तरापर्यंत एखादी व्यक्ती पोहोचते तेव्हा ती खोटं बोलूच शकत नाही. परंतु प्रत्येक व्यक्ती त्या स्तरापर्यंत पोहचू शकत नसल्याने बऱ्याच वेळा त्यांचा आपल्या अंतरात्म्याशी संघर्ष चालू होतो. हाच मानवी मनाचा संघर्ष आणि भाव-भावना डोळ्यासमोर ठेऊन लिहिली गेलेली तत्वज्ञानावर आधारित अशी ही कादंबरी "साक्षी".

परमेश्वरय्या या अतिशय सज्जन, गांधीवादी, कधीही खोटं न बोलणारा अशी समाजात ओळख असणाऱ्या व्यक्तीभोवती फिरणारी ही कादंबरी. खुनाच्या आरोपाखाली ज्याच्यावर खटला चालू असतो असा त्यांचा जावई मंजय्या त्यांना खोटा साक्षीदार म्हणून न्यायालयात येऊन त्याच्या बाजूने साक्ष देण्यासाठी विनंती करतो. परमेश्वरय्यांची समाजात असणारी प्रतिमा, त्यांच्या शब्दाला असणारा मान आपल्याला न्यायालयात निर्दोष सिद्ध करण्यास पुरेसा आहे हे ओळखून मंजय्या त्यांना भावनिक पातळीवर कात्रीत पकडतो. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील चढउतार, आईविना वाढलेल्या मुलीवर असणारे प्रेम आणि आपली तत्वनिष्ठा, समाजात असणारी आपली प्रतिमा या सर्वांमुळे द्विधा मनःस्थितीत असणारे परमेश्वरय्या अखेर न्यायालयात खोटी साक्ष देण्यासाठी तयार होतात. न्यायालयात उभे राहून देवाच्या साक्षीने खरे बोलायचे वचन देऊन ते खोटे बोलतात आणि त्यांच्या त्या एका "साक्षी" ने मंजय्याची खुनाच्या आरोपातून सुटका होते. परंतु आयुष्यभर तत्वनिष्ठ राहिलेले परमेश्वरय्या या घटनेनंतर मनातून खचून जातात, आपण दिलेल्या खोट्या साक्षीसाठी स्वतःला दोषी माननारे परमेश्वरय्या पश्चात्तापातून आत्महत्या करतात आणि यमसदनी पोहोचतात. यमसदनात चालू झालेल्या त्यांच्या निवाड्यापासून वेगळ्या वळणाने कादंबरीचा प्रवास चालू होतो जो बघता बघता वाचकाला घेरून टाकतो. यमसदनात यम आणि चित्रगुप्तापुढे उलगडत जाणारी परमेश्वरय्यांची कहाणी आपल्याला हेच सांगते की मनुष्याने आयुष्यात कितीही साक्षीभावाने राहण्याचा प्रयत्न केला तरीही काही प्रश्नांकडे इतक्या अलिप्तपणे पाहणं त्याला जमतंच असं नाही. धर्म, अर्थ आणि काम या तीन मार्गानी मोक्षापर्यंत नक्कीच जाता येईल परंतु यांपैकी एकाचाही जरी अतिरेक झाला तर व्यक्तिगत आयुष्यासोबतच कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्यही ढवळून जाते हेच आपल्याला परमेश्वरय्यांची कथा वाचत असताना जाणवत राहते.

आपण आत्महत्या करण्याचा घेतलेला निर्णय चूक की बरोबर हे जाणून घेण्यासाठी पुढे यमधर्माच्या परवानगीने परमेश्वरय्यांना सूक्ष्मदेहाने पुन्हा भूतलावर पाठवण्यात येते आणि त्यांचा भोवताल "साक्षीभावाने" पाहण्यास सांगितलं जातं. पृथ्वीवर परत येऊन सत्याचा शोध घेत, जीवनाचं वास्तव पाहता पाहता शेवटी परमेश्वरय्याला पडणारा प्रश्न, "असत्याचं मूळ कोणतं? त्याला अंतच नाही का?" हा नकळत प्रत्येक मानवी मनात चाललेल्या संघर्षाचं प्रतिनिधित्व करतो. मानवी भाव-भावनांकडे अलिप्तपणे पाहिलं की आपल्या जाणिवांना खरे रुप मिळू शकते हे कादंबरी वाचत असताना जाणवत राहते. मानवी भाव-भावनांचा निरंतर संघर्ष दाखवणारी, यमलोक-यमधर्म-चित्रगुप्त यांच्यासमोर निवाड्यासाठी उभी राहिलेली ही कथा जितकी परमेश्वरय्या, नागप्पा आणि मंजय्याची आहे तितकीच ती या तिघांच्या सहवासात ग्रासलेल्या सावित्री, सत्यप्पा आणि रामकृष्ण यांचीही आहे. शेवटी नकळत ती वाचकाचीही होऊन जाते.

एस. एल. भैरप्पा यांच्या "साक्षी" ची कथा जरी चाकोरीबाहेरची असली तरी विषय नक्कीच वास्तवाकडे घेऊन जाणारा आहे. मानवी भाव-भावना आणि त्यांच्या निरंतर संघर्षाची जाणीव करून देणारी, आवर्जून वाचण्यासारखी कादंबरी.





संदीप प्रकाश जाधव

Tuesday, December 15, 2020

"झोंबी"

 


लेखक : आनंद यादव

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस


एखाद्याची आत्मकथा म्हणजे त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात आलेले वेगवेगळे अनुभव आणि त्यातून घडत गेलेलं त्याचं आयुष्य इतकी सरळ सोपी व्याख्या. बऱ्याच लोकांच्या प्रेरणादायी आत्मकथा मी आजपर्यंत वाचल्या, ज्या शक्यतो अतिशय खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी घडवलेलं त्यांचं आयुष्य आपल्यासमोर मांडत असतात. आनंद यादव यांची "झोंबी" वाचायला घेण्यापूर्वी  हिसुद्धा अशाच पठडीतील एक आत्मकथा असावी असा ग्रह मनात ठेवून वाचायला सुरुवात केली पण पु. ल. देशपांडेंची सुरुवातीची प्रस्तावना वाचल्यानंतरच लक्षात आले की आपण काहीतरी वेगळं, अतिशय उत्कृष्ट असं वाचायला हातात घेतलं आहे. सुरुवातीलाच पु. ल. देशपांडे म्हणतात की आनंद यादव ह्यांना साष्टांग दंडवतच घालायला हवा, कारण ह्या कथनात इतक्या भयंकर परिस्थितीतलं बालपण दाखवलंय ज्याची की आपण कल्पनाही करु शकत नाही. अतिशय हट्टी आणि कामचुकार वडील, आपल्या अकरा मुलांचा जीवाच्या आकांताने सांभाळ करुन संसार सावरणारी आई आणि भीषण दारिद्र्य ह्याचं खूपच विदारक शब्दचित्र लेखकाने चितारलंय. आनंद यादव यांनी हे सगळं स्वत: भोगलं असल्यामुळे त्यातला निखार वाचकाच्या अंगावर येतो. झोंबीचा शब्दशः अर्थ म्हणजे लढाई! दोघांमध्ये झालेली लढाई म्हणजेच "झोंबी". आनंद यादव यांची ही आत्मकथा म्हणजे दारिद्र्याची विद्याप्राप्तीसाठी केलेली लढाई आहे. आनंद यादवांच्या आयुष्यातला शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष म्हणजे ही आत्मचरित्रात्मक कादंबरी "झोंबी".

आनंद यादव यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड पण ते ज्या समाजात रहायचे तिथे त्यांनी अशी आवड ठेवणं, स्वप्न बघणं म्हणजे जणू गुन्हाच. ज्या समाजात 'शाळा शिकणे' म्हणजे आपल्या कुळाला बट्टा लावणे असं मानलं जायचं त्या समाजात जन्माला येऊन आनंद यादव यांनी 'मॅट्रिक' पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं तेही घरी अठराविश्वे दारिद्र्य असताना. त्यांचा हा मॅट्रिकपर्यंतचा प्रवास म्हणजेच ही कादंबरी "झोंबी". आनंद यादव यांच्या या कादंबरीत त्यांनी फक्त शिकण्यासाठी भोगलेल्या व्यथा, हालच आहेत असे नाही तर अज्ञानी, ग्रामीण कुटुंबाचे, भीषण दारिद्र्याचे जवळून होणारे दर्शनसुद्धा आहे. लेखकाचे गाव, गावातील रितीरिवाज, गावाच्या आसपासचा निसर्ग, बापाचा आडमुठेपणा, आईचा होणारा अपरिमित छळ, लागोपाठ होणारी मुले, मुलांचे अपमृत्यू, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील प्रसंग, मास्तरांचे स्वभाव, तर्‍हा,गावातले उरूस, जत्रा, महात्मा गांधी यांच्या वधानंतर झालेली स्थिती या आणि अशा अनेक गोष्टींचे वास्तव चित्रण आहे. आपण विचारसुद्धा करू शकणार नाही अशा अतिशय हालाखीच्या परिस्थितीतदेखील आनंद यादव यांच्या मनातली शिक्षणाची ओढ काही कमी होत नाही. घरची परिस्थिती आणि वडिलांचा शाळेसाठी असणारा प्रखर विरोध यामुळे अर्धवट सोडावी लागणारी शाळा ते ज्या जिद्दीने मॅट्रिक पर्यंत पूर्ण करतात त्याला तोड नाही. त्या जिद्दीला आपल्या मेहनतीची जोड देऊन अगदी जीव जायची वेळ येईपर्यंत त्यांनी उपाशी पोटी वेगवेगळी कामे करून, वेळप्रसंगी चोरी करून आणि त्या आलेल्या पैशांत शाळेची पुस्तके विकत घेऊन, फी भरून, सोबतच आपल्या बरोबरीच्या मुलाची शिकवणी घेऊन, वेगवेगळ्या ठिकाणच्या शाळांमध्ये फिरून नकलांचे कार्यक्रम करून ते मॅट्रिक पर्यंत शिकतात. मुलगा शाळेत गेला तर शेतातली सगळी कामं आपल्यावर पडणार शिवाय शाळेसाठी पैसे नाहीत त्यामुळे वडिलांचा नेहमीच असणारा विरोध आणि त्या विरोधापायीच त्यांनी वडीलांचा खाल्लेला बेदम मार हे सर्व कादंबरीत वाचत असताना नकळत वाचकालाही लेखकाच्या वडिलांचा राग येऊ लागतो. कादंबरीमध्ये प्रत्येक पानावर वाचकाला अस्वस्थ करणारे प्रसंग आहेत पण मला सर्वात जास्त अस्वस्थ करून गेला तो आनंद यादव यांच्या मोठ्या बहिणीचा, अनसाचा तिच्या बाळंतपणात झालेला मृत्यू. 

लेखकाच्या घरात अकरा भावंडं, तीही अगदी एका पाठोपाठ एक झालेली त्यामुळे १-२ सोडले तर बाकी सगळी रोगट आणि अशक्त. घरात दोन्ही वेळेच्या जेवणाची भ्रांत त्यात भावंडांमध्ये मोठे असल्यामुळे आणि वडिलांच्या कामचुकारपणामुळे शेतातील सर्व कामे लेखकालाच करावी लागत. शेतकाम करुन शाळेत गेल्यामुळे कायम मळलेले कपडे, आंघोळीला, कपडे धुवायला साबण सुद्धा नाही. वह्या , पुस्तकं घ्यायला पण पैसे नाहीत. फी भरायला पैसे नाहीत. शेतातल्या कामामुळे नेहमीच शाळेत जायला होणारा उशीर आणि या सर्वामुळे शिक्षणाचे होणारे नुकसान! तरीही अगदी हट्टाने त्यांनी एक-एक वर्ष शिक्षण घेतलं. काही वेळेला शिक्षकांनी त्यांची परिस्थिती समजून त्यांना मदत केली तर काही वेळेला त्यांना मुद्दाम त्रासही दिला. मुळातच हुशार असल्यामुळे शाळा बुडाली तरी पाठांतराचे  वेगवेगळे प्रकार त्यांनी शोधून काढले. कामाच्या रगाड्यातही त्यांनी कविता, शब्दार्थ, प्रश्नोत्तरं चालूच ठेवले. इतकं सगळं सांभाळूनही ते शाळेत नेहमीच पहिला, दुसरा क्रमांक मिळवत राहिले. त्यांच्या शिक्षणाच्या वेडाला त्यांच्या वडीलांनी कधीच दाद दिली नाही पण शेवटी असह्य होऊन जेव्हा लेखक घर सोडून जातात तेव्हा त्यांच्या वडिलांनाही हार मानावीच लागली. मोठ्या कष्टाने वडिलांनी त्यांना एस.एस.सी. ची परिक्षा देण्याची परवानगी दिली आणि आनंद यादव यांनी त्या संधीचं सोनं केलं. "झोंबी" या कादंबरीमध्ये आनंद यादव यांनी एस.एस.सी. पर्यंतच केलेल्या संघर्षाचे चित्रण आहे. त्यामुळे कादंबरी वाचून झाल्यानंतर आनंद यादव यांचे पुढे काय झाले असेल? एस. एस. सी. नंतर त्यांनी पुढे काय केले असेल? एस. एस. सी. पास झाल्यानंतर त्यांच्या वडिलांची प्रतिक्रिया काय असेल? त्यांच्या भावंडांचे पुढे काय झाले असेल? असे एक ना अनेक प्रश्न वाचकांना पडतात आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला त्यांच्या यापुढील नांगरणी, घरभिंती आणि काचवेल या पुस्तकांमध्ये मिळतील.

आनंद यादव यांची ही आत्मकथा वाचकाला प्रचंड अस्वस्थ तर करतेच पण शिक्षणाच्या बाबतीत आपण किती नशिबवान आहोत हे जाणून घ्यायचं असेल तर प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी आहे.






संदीप प्रकाश जाधव

Monday, December 7, 2020

"नदीष्ट"

 


लेखक : मनोज बोरगावकर

प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन


मनोज बोरगावकरांच्या "नदीष्ट" या कादंबरीबद्दल बरंच ऐकलं होतं आणि आज ती वाचायचा योग आला. कादंबरीचे नाव वाचून आणि मुखपृष्ठ पाहूनच आपण एक अंदाज बांधू शकतो की कादंबरीचा विषय हा नदीशी निगडीत असणार. नदीला केंद्रस्थानी ठेवून लिहिली गेलेली, अतिशय वेगळा आणि चाकोरीबाहेरचा विषय अगदी सहज, सुंदर भाषेत आपल्यासमोर घेऊन येणारी ही मनोज बोरगावकरांची कादंबरी. पूर्णपणे नदीच्या काठावर घडलेली, वेगवेगळ्या घटनांमधून, लोकांमधून उलगडत जाणारी "नदीष्ट" ही कादंबरी नदीची  विविध रूपे आणि नदीची संस्कृती टिपते. माणूस आणि नदी यांचं आदिम नातं लेखकाने या कादंबरीतून अधोरेखित केलं आहे. नदी आणि माणूस यांचा समांतर प्रवास म्हणजेच "नदीष्ट".

सतत १० वर्षे, दररोज न चुकता नदीला पोहायला जाणारा या कादंबरीचा नायक. आणि नायकाच्या याच दैनंदिन आयुष्यात त्याला नदीवर आणि नदीच्या आसपासच्या परिसरात भेटणारे लोक, त्यामधून त्याला येणारे नवनवीन अनुभव शिवाय नदीवर भेटणाऱ्या उपेक्षित लोकांच्या कहाण्या जाणून घेण्याचा नायकाचा प्रवास म्हणजेच ही कादंबरी. या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे नायकाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक पात्राला नाव आहे पण नायकाला नाव नाही. आज आपण बर्‍याचदा आत्मकेंद्री आयुष्य जगत असतो आणि आपल्या आजुबाजुला काय घडतंय याचंही आपल्याला कधी-कधी भान नसते. आसपासच्या लोकांशी आपल्याला काहीच देणे घेणे नसते. बऱ्याचदा हेच आत्मकेंद्री वागणं आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांचा स्वभावच नाही तर जीवनशैलीच होऊन जाते. मात्र या कादंबरीचा नायक, आयुष्य जगत असताना नेहमीच एक माणूसपण सोबतीला ठेऊन राहतो त्यामुळे तो त्याला नदीवर भेटणाऱ्या उपेक्षित लोकांच्या कहाण्या जाणून घेतो. समाजाने ज्यांचे माणूसपण नाकारले अशा लोकांना माणूस म्हणून समजून घेतो. त्यांच्याशी माणूस म्हणून वागतो, बोलतो आणि त्यातून उलगडत गेलेल्या त्या उपेक्षित लोकांच्या दुःखाची ही गोष्ट आहे. या कादंबरीत आपल्याला सकिनाबी, कालुभैय्या, नदीवरील मंदिराचा पुजारी, बामनवाड, सगुणा, मालाडी, दादाराव, सर्पमित्र प्रसाद, भिकाजी ही पात्रे भेटतात.  या सगळ्यांची प्रत्येकाची एक वेगळी कहाणी आहे.  या सगळ्यांचं जगणं - त्यांचा भूतकाळ जाणून घेण्याचा नायकाने प्रयत्न केला आहे. कादंबरीतले अनेक प्रसंग, घटना ह्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात.  ही कादंबरी आपल्याला माणूसपणाचा नवा दृष्टीकोन आणि जगण्याचं भान देऊन, संवेदनशील बनवते. नायकाला नदी किनाऱ्यावर भेटलेले सगुणा हे तृतीयपंथी पात्र आणि भिकाजी हा भिकारी या दोघांचा संवेदनशील भूतकाळ नायकापुढे उलगडत जाताना मधेमधे मिळालेल्या इतर पात्रांच्या कथा आपल्याला बऱ्याच वेळा सुन्न करून जातात. सगुणाची कहाणी तर आपल्याला खूपच संवेदनशील बनवते. सगुणा ही  प्रस्थापित समाज व्यवस्थेकडून नाकारली गेलेली एक तृतीयपंथी व्यक्ती. सुरुवातीला जेव्हा ट्रेनमध्ये सगुणा भेटते तेव्हा तिच्याकडे तुच्छ नजरेने बघणाऱ्या, सगुणापासून दूर पळणाऱ्या नायकाला जेव्हा सगुणाचा भूतकाळ समजतो तेव्हा नकळत त्याला ती आणि तिच्या समाजाबद्दल आदर वाटायला लागतो. सगुणा आपली भळभळणारी जखम नायकापुढे धरत आपला भूतकाळ त्याच्या पुढ्यात ठेवते. जो वाचत असताना कोणत्याही संवेदनशील व्यक्तीच्या डोळ्यांच्या कडा नक्कीच ओलावतील. तृतीय पंथातील अनेक बारकावे लेखकाने अचूक टिपले आहेत. त्यांची जीवनशैली- भाषाशैली याचं अगदी यथार्थ दर्शन कादंबरीत होते. तृतीयपंथीयांचे  दैनंदिन शब्द लेखकाने कादंबरीत वापरले आहेत त्यामुळे लेखकाची संशोधन वृत्तीसुद्धा आपल्याला दिसून येते. या तृतीयपंथी लोकांविषयी आपल्या मनात अनेक प्रश्न असतात, त्याची उत्तरे आपल्याला या कादंबरीत नक्कीच मिळतात. तृतीयपंथीयामधील दीक्षा देण्याची प्रथा वाचताना तर अंगावर काटा येतो. तृतीयपंथीयांच्या व्यथा - वेदना यांचं दाहक आणि वास्तव चित्रण या कादंबरीत आहे.

सगुणाप्रमाणेच आणखीन एक संवेदनशील पात्र म्हणजे नायकाला रोज भेटणारा भिकारी "भिकाजी". भिकाजीच्या वागण्याबोलण्यातून तो जन्मजात भिकारी नाही हे लक्ष्यात आल्यानंतर नायकसोबतच वाचकालाही त्याच्या भूतकाळाबादद्दल कुतूहल निर्माण होते. कादंबरीतील भिकारी असलेला भिकाजी हा दारूच्या नशेत आपल्या तान्ह्या मुलीला जिवानिशी मारून टाकतो, त्यामुळे कादंबरी वाचताना सुरुवातीला भिकाजीचा तिरस्कार वाटत राहतो. त्याच्या हातून अनवधानाने झालेल्या बाळाच्या मृत्युसाठी भिकाजीला पंधरा वर्षाचा तुरुंगवास देखील होतो.  मात्र तो कायम स्वतःला अपराधी समजत राहतो. शिक्षा भोगून आल्यानंतर त्याचं भिकारी बनून गावोगावी फिरणं मनाला चटका लावून जाते. बाळाच्या मृत्युनंतर भिकाजीचं बदललेलं जगणं, त्याचं दुःख, अबोलवृत्ती, त्याला झालेला मांजराचा फोबिया या गोष्टी त्याच्याविषयी वाचकांच्या मनात सहानुभूती निर्माण करतात. नायकाला नदीवर पोहताना धडे देणारे दादाराव जेव्हा त्यांच्या आईच्या मरणाचा प्रसंग नायकाला सांगतात तेव्हा त्याच्यासोबतच आपणही भावूक होऊन जातो. तान्ह्या दादारावांनी मेलेल्या आईचे दूध पिण्याचा हा प्रसंग आपण वाचतो तेव्हा सुन्न व्हायला होतं. कादंबरीतील इतर पात्रे जसे नदीवर मासे पकडायला येणारा बामनवाड, त्याची नदीच्या व्हर्जिन जागेतील वाळूची कहाणी, मंदिराचा पुजारी, दररोज आपल्या म्हैशीना नदीवर घेऊन येणारे कालूभैय्या आणि त्याची प्रेयसी, पहाटे-पहाटे नदीवर अंघोळीसाठी येणारी भिकारीण सकिनाबी, नदीवर नायकाला अचानकच भेटलेला अगदी तरुण वयातला सर्पमित्र प्रसाद आणि त्याने तो लहान असताना पहिल्यांदाच नाग कसा पकडला याची सांगितलेली कहाणी  या सर्व गोष्टी आपल्यालाही नदी किनाऱ्यावर घेऊन जातात. कादंबरीत निसर्गातील अनेक सूक्ष्म बारकावे आले आहेत. माकडांच्या टोळी पासून ते मोरांच्या थव्यापर्यंत आणि आकाशाकडे एक डोळा करून नदीत पोहणाऱ्या माशांपासून ते खेकड्यापर्यंत सर्वच गोष्टींतील बारकावे लेखकाने अगदी अचूक टिपले आहेत. रोजच्या नदीवर येण्याने निसर्ग आणि निसर्गातील अनेक गोष्टी नायकाला कळल्या. लेखकाला निसर्गाने आणि नदीने समृद्ध केलं. लेखकाचा जीवनानुभव प्रचंड समृद्ध आहे, असं कादंबरी वाचताना आपल्या लक्षात येतं. शिवाय परिसरातील अनेक गोष्टींचे प्रचंड ताकतीने वर्णन केलं आहे, त्यामुळे ही कादंबरी वाचताना डोळ्यांसमोर अगदी हुबेहुब चित्र येतं, जणूकाही आपणच प्रत्यक्षच त्या घटनांचे साक्षीदार आहोत. 

वेगवेगळे लोक नदीकिनारी नायकाच्या आयुष्यात येत राहतात आणि ठराविक अंतराने आपल्या पुढच्या प्रवासाला निघून जातात. पण या छोट्याशा भेटीमध्ये स्वतःच्या भूतकाळातून नायकाला खूप काही शिकवून जातात, साध्या साध्या घटनांमधून जगण्याचं मोठं तत्वज्ञान शिकवून जातात. नायकाला भेटलेली सर्व पात्रे, नायकाने अनुभवलेले सर्व प्रसंग त्याच्याप्रमाणेच वाचकाच्या मनावरसुद्धा कोरली जातात.  कादंबरी वाचताना संपुच नये, असं वाटत राहतं. एक एक करून सर्व पात्रे निघून गेल्यानंतर शेवटी सगुणा जेव्हा निघून जाते तेव्हा कादंबरी संपली असं वाटतं पण नायक घाटाच्या पायऱ्या चढून वर येत असताना त्याला पायऱ्या उतरून नदीवर येणारा फकीर भेटतो आणि कादंबरीचा ओपन एंडेड शेवट होतो जो वाचकाला पुन्हा नव्याने जन्माला येणाऱ्या कथेचा विचार करायला भाग पाडतो.

चाकोरीबाहेरचा आणि वाचकाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारा विषय अनुभवण्यासाठी आवर्जून वाचण्यासारखी कादंबरी "नदीष्ट".





संदीप प्रकाश जाधव




"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये सह्याद्रीचा श्वास आणि पेशवाईचा रक्तरंजित इतिहास: ना...