Monday, July 26, 2021

"पारखा"

 


लेखक : डॉ. एस. एल. भैरप्पा

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

मराठी अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी

पृष्ठे- २७६, मूूल्य- २९५ रुपये.


एस. एल. भैरप्पा म्हटलं की हमखास एका वेगळ्या साहित्याची सफर वाचकाला होणार हे नक्की! "साक्षी" ही भैरप्पांची मी वाचलेली पहिली कादंबरी आणि त्यातील भावलेल्या विषयाच्या वेगळेपणामुळेच त्यांच्या "आवरण", "उत्तरकांड" आणि आता "पारखा" या कादंबऱ्या देखील वाचून काढल्या. प्रत्येक पुस्तक वाचत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि ती म्हणजे त्यांचं प्रत्येक पुस्तक वाचकाच्या मन आणि मेंदूचा ताबा घेणारं असतं. मानसिक पातळीवर वाचून ते संपतच नाही असं वाटतं कारण पुस्तक वाचून झाल्यानंतर त्याचा विचार बराच वेळ आपल्या डोक्यात घोळतच राहतो. पण एक गोष्ट नक्की की कोणताही पूर्वग्रह न ठेवता, अलिप्तपणे जर त्यांचं साहित्य वाचलं तरच त्याचा वेगळेपणा वाचकाच्या मनाचा ठाव घेतो आणि अंतर्मुख होऊन विचार करायला लावतो. "पारखा" या शब्दाचा शब्दशः अर्थ घायचा झाला तर तो एखाद्या गोष्टीला परके होणे! प्राचीन भारतीय संस्कृतीप्रमाणे गायीकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन आणि पाश्चात्य संस्कृतीचा व्यावहारिक दृष्टिकोन यांतील संघर्षांची कथा म्हणजे ही कादंबरी "पारखा". १९६८ साली कानडी भाषेत प्रकाशित झालेल्या या कादंबरीचा विषय आजच्या घडीला देशात गायीवरून होणारं, चीड आणणारं राजकारण आपल्या डोळ्यासमोर घेऊन येतो. वाघाच्या तावडीत सापडणाऱ्या पुण्यकोटी गायीची कथा बऱ्याच लोकांना परिचयाची आहे. वाघाला दिलेल्या वचनाप्रमाणे आपल्या वासरांना दूध पाजून परत खरोखरच त्याच्या पुढ्यात त्याचं भक्ष म्हणून उभी राहणारी पुण्यकोटी, सत्यवचनी गाय आणि तिच्या याच गुणामुळे प्रभावित होऊन तिला न खाता स्वतःचा प्राण त्याग करणारा वाघ अशी ती कथा! याच कथेचा वापर करून भैरप्पांनी त्यांच्या या "पारखा" चा पाया रचला आहे. या पुण्यकोटी गायीचा वंश ज्याच्या गोठयात आहे असा काळेनहळी गावचा काळींगगौडा जो गायीमध्ये ३३ कोटी देव-देवतांचा वास असतो असे मानून भक्तिभावाने गायीची पूजा करून तिचा सांभाळ करतो आणि तिला केवळ दूध - मांस देणारा प्राणी मानणारा अमेरिकेतून शिकून आलेला त्याचा नातू काळिंगा यांच्यामधील संघर्षाची ही कथा. पाश्चात्त्य संस्कृतीचा स्वीकार केल्यानंतर, अमेरिकन मुलीशी लग्न करून आपल्या शिक्षणाच्या जोरावर आधुनिक शेती करण्यासाठी आपल्या पत्नीसोबत भारतात परतल्यानंतर काळींगाला इथे आलेल्या अनुभवांनी त्याच्या मनातली मूळची भारतीय संस्कृती जागी होते, तो तळमळायला लागतो. पण तोपर्यंत साहजिकच तो इथल्या संस्कृतीला, मातीला, कुटुंबाला, आईला आणि अर्थातच गोमातेलासुध्दा तो "पारखा" झालेला असतो अशी अगदी साधी कथा घेऊन भैरप्पांनी ही कादंबरी लिहिली आहे. परंतु भावनिक आणि व्यावहारिक पातळीवर होणारा दोन संस्कृतींमधील संघर्ष कादंबरीत ज्यापद्धतीने भैरप्पांनी दाखवला आहे त्याला खरोखरच तोड नाही. संस्कृती, श्रद्धा आणि व्यवहार यांच्या संघर्षाचं चित्रण भैरप्पा यांनी त्यांच्या या २७६ पानी कादंबरी "पारखा" मधून केलेलं आहे.

कादंबरीतील काळिंगगौडा म्हणजे गोपाळसंस्कृतीचे पालन करणारी, गायीला स्वतःच्या आईच्या ठिकाणी मानणारी, तीची अगदी मनापासून देखभाल करणारी एक हृदयस्पर्शी व्यक्तिरेखा आहे. या प्राचीन संस्कृतीत तो इतका मुरलेला आहे की गायीचा होणारा व्यावहारीक पातळीवरचा वापर त्याच्या आकलनापलिकडचा आहे. गायीच्या वासराने पिऊन जे काही दूध शिल्लक राहील तेवढेच दूध आपले, तेवढ्याच दुधावर आपला हक्क असं मानणारा हा काळींगगौडा! गायीच्या बाबतीत अतिशय भावनिक असणाऱ्या या काळींगगौडाचं एक उदाहरण भैरप्पांनी कादंबरीत दिलं आहे, जेव्हा गावातील कोंडवाडय़ातल्या एका गाभण गायीचा मालक तिला दिवसभर शोधायलाच येत नाही हे काळींगगौडाला समजतं तेव्हा तो तिचं ‘लेकमाणसासारखी आली’ म्हणून स्वतःच्या गाईंच्या गोठ्यात यथासांग बाळंतपण करतो. तो मालक आपल्या गायीला शोधत आल्यावर त्याला दोन दिवसांनी यायला सांगतो, कारण ओल्या बाळंतिणीला त्याने चालवत घरी न्यायला नको हे म्हणून. नंतरही कोवळ्या वासराला चालायला न लावता त्याला हातात घेऊन जायला काळिंगगौडा सांगतो, इतका तो गायीच्या बाबतीत हळवा आहे. आपल्या शिकलेल्या नातवाचे बोलणे त्याला समजत नाही. ‘ज्यानं घरातलं ज्ञानच समजावून घेतलेलं नाही, तो परदेशातून काय आणि किती शिकणार आहे?’ असं म्हणणारा हा काळींगगौडा! माळरानावर चरायला गेलेल्या गायींना तरसाच्या हल्ल्यातून वाचवताना काळींगगौडाच्या मुलाचा मृत्यू होतो. त्यानंतर आपला नातूच आपला गायीचा गोठा सांभाळेल, गाईंची काळजी घेईल या भोळ्या आशेवर असणाऱ्या काळींगगौडाचा आपल्या नातवाकडून इतका भ्रमनिरास होतो की तो परदेशातून परत येईल की नाही आणि आल्यावर घरात राहील की नाही याचीदेखील त्याला शाश्वती राहत नाही. आपल्या नातवाची आशा सोडून देऊन स्वतःला जमेल तसे गाईंची सेवा करणाऱ्या काळींगगौडाच्या समोर गाईंना सांभाळताना बऱ्याच समस्या येत राहतात आणि त्यातून मार्ग काढत भैरप्पांची ही कादंबरी पुढे सरकत राहते. विकासाच्या नावाखाली कमी होणारी चारायोग्य जमीन आणि त्यामुळे गाईंचे होणारे भविष्यातील नुकसान ओळखून काळींगगौडाची चाललेली धडपड काहीवेळा वाचकालाही भावूक करते. नातवाच्या अमेरिकेहून परत येण्यापूर्वीच काळींगगौडाचा मृत्यू होतो तेव्हा नकळत आता गाईंचे काय होणार हा प्रश्न वाचकाच्यादेखील मनात येतो. काळिंगगौडाच्या मरणाचे वर्णन म्हणजे जणूकाही भैरप्पांची कविताच आहे. आपण त्याच्यासमोर गोठ्यात उभे राहून जणूकाही त्याचं समाधानी मरणच बघत आहोत असा भास वाचकाला होतो. मरण्यापूर्वी तो यंग्टाकडे आपल्या गोठय़ाची जबाबदारी सुपूर्द करतो. गायींचे रोग, त्यावरची औषधे, निगा घेण्याची पद्धत वगैरे सगळं त्याला सांगतो. गायीच्या औषधाचे पैसे घेतलेस तर तुझा वंश टिकणार नाही, असेही वर बजावतो. आपल्या वाट्याला आलेलं कर्म गाढ श्रद्धेने, निष्ठेने आणि समर्पित भावाने करणाऱ्या काळिंगज्जाला शांत सुंदर मरण येतं आणि तेही त्याच्या गाईंच्या गोठयातच. इथून पुढे कादंबरीचा उत्तरार्ध सुरू होतो म्हटलं तरी चालेल. काळींगगौडाच्या मृत्यूनंतर अमेरिकेतून परतलेला त्याचा नातू आधुनिक शेतीच्या नावाखाली गावाबाहेर फार्महाऊस बांधून सर्व गाईंना तिकडे घेऊन जातो आणि सुरू होते त्याच्या मनातील भावनिक संघर्षाला! त्याच्या पत्नीकडून रागाच्या भरात पुण्यकोटी गायीला मारून तिचं मांस खाल्ल्यानंतर गावाकडून झालेला प्रखर विरोध आणि त्यातून उठलेल्या वादळात त्याला मनोमन होणाऱ्या पश्चात्तापामुळे पुन्हा त्याला आपल्याला बालपणी मिळालेल्या संस्करांची, शिकलेल्या संस्कृतीची ओढ निर्माण होते. अमेरिकन पत्नीसोबत गावाबाहेर राहत असताना सतत होणारी एकटेपणाची जाणीव त्याला नकळत पुन्हा त्याच्या जुन्या संस्कृतीशी जोडायला सुरुवात करते. परंतु तोपर्यंत खूप उशीर होतो आणि तो इथल्या संस्कृतीला, मातीला, कुटुंबाला, आईला आणि अर्थातच गोमातेलासुध्दा "पारखा" होतो! विविध वळणे घेत कादंबरी शेवटाकडे जात असताना काळींगगौडाच्या नातवाला येणाऱ्या विविध अनुभवांतून, दोन संस्कृतीमधला संघर्ष भैरप्पांनी अतिशय उत्कृष्टपणे कादंबरीत उतरवला आहे. 

काळानुरूप संस्कृतीचा ऱ्हास होणे हे अपरिहार्यच आहे आणि ही एक अविरत चालणारी प्रक्रियाच आहे परंतु तिच्या जागी येणाऱ्या यंत्रसंस्कृतीचा पूर्णपणे स्वीकार करणे पाश्चात्त्य जीवनशैली स्वीकारून आधुनिक झालेल्या काळिंगगौडाच्या नातवाला नाही जमत. शेवटी तो म्हणतो, ‘‘विद्युतशक्ती, वैज्ञानिक खतं यासारखं विज्ञान मलाही हवंय. पशूंना आजार झाले तर त्यांना बरं करणारं विज्ञानदेखील मला पाहिजे. पण हे पशू केवळ माणसाच्या उपयोगासाठीच आहेत असं मानणारा दृष्टिकोन मला अजिबात नकोय! आपणा भारतीयांची गोष्ट वेगळी आहे. आम्हाला ट्रॅक्टर पाहिजे आणि गोपूजाही पाहिजे.’’ या वाक्यातून भैरप्पांनी कादंबरीतल्या समस्येचा गाभा मांडला आहे. शेवटी श्रद्धा आणि व्यवहार यांचा योग्य समन्वय व्हायला हवा असेही ते सुचवतात. भैरप्पा यांच्या लेखनशैलीमुळे कादंबरीच्या पहिल्या पानापासून शेवटपर्यंत वाचक कथेसोबत चिकटून राहतो.

आवर्जून वाचावी अशी कादंबरी "पारखा".





संदीप प्रकाश जाधव



Monday, July 19, 2021

"स्वाहा"

 


लेखक : नारायण धारप

प्रकाशक : साकेत प्रकाशन

भयकथा वाचाव्यात तर त्या धारपांच्याच असं कोणाकडून तरी एकदा ऐकलं होतं आणि त्यामध्ये खरंच किती तथ्य आहे याची जाणीव त्यांचं कोणतंही पुस्तक वाचताना येते. "अघटित", "चेटकीण", "लुचाई", "वेडा विश्वनाथ" आणि आता "स्वाहा" हे धारपांचं माझ्या वाचनात आलेलं ५वं पुस्तक! त्यांचा कथासंग्रह असो की कादंबरी प्रत्येकात असणारा समान धागा म्हणजे एक थरारक, भयप्रद, अंगावर काटा उभा करणारा, दचकवणारा आणि शेवटी वाईटावर चांगल्याच्या विजय होऊन सर्वकाही ठीकठाक झाल्यानंतर होणारा कथेचा शेवट! जरी या समान धाग्याला पकडून त्यांची सर्व पुस्तके लिहिली गेली असली तरीही सर्व पुस्तकांत एक वेगळेपणा आहे जो वाचकाला प्रत्येकवेळी खिळवून ठेवतो! याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे नारायण धारप यांची प्रचंड कल्पनाशक्ती! नारायण धारप यांच्या भयकथा म्हणजे कल्पनाशक्तीचा कळसच म्हणावं लागेल. त्यांच्या प्रचंड कल्पनाशक्तीचा अंदाज त्यांचं पुस्तक वाचायला घेतलं की पाना-पानावर येत राहतो. त्यांच्या कल्पना विलक्षण असण्यासोबतच प्रचंड सुसंगत आणि शात्रीय पायावर आधारित वाटतात. कथेतील शब्द आणि वर्णन यांची अतिशयोक्ती कधीच वाटत नाही. शब्द साधेच पण जबरदस्त परिणामकारक! मानवी मन हे नेहमीच रहस्याकडे आकर्षित होते, त्याला नेहमीच कोणतंही रहस्य जाणून घेण्याची आणि उलगडण्याची उत्सुकता असते. कोणत्याही प्रकारचं रहस्य जाणून घेण्याची माणसाला असणारी हीच उत्कंठा लक्षात घेऊन लिहिलेल्या नारायण धारपांच्या कथा पहिल्या पानापासून नव्हे तर त्यांच्या कादंबरीच्या मुखपृष्ठापासूनच वाचकाला घेरायला चालू करतात. त्यांच्या उत्कंठावर्धक रहस्य कथांचा एक भाग बनून, पुढे काय होणार या उत्सुकतेने वाचक कथेमध्ये शेवटपर्यंत गुंतून पडतो आणि एका वेगळ्याच जगात गेल्याचा रोमांचक अनुभव घेत राहतो. भीतीने अंगावर शहारे येणे म्हणजे काय याची जाणीव धारपांच्या भयकथा वाचताना होते. एखादा अतिशय हॉरर चित्रपट पाहताना जितकी भीती आपल्याला वाटू शकते तितकीच किंबहुना त्याच्याहून थोडी जास्तच भीती धारपांच्या कथांमधून जाणवते. भीतीचा अनुभव घ्यायचा असेल तर नारायण धारप यांच्या भयकथा वाचन हा त्यासाठी सर्वात योग्य पर्याय ठरेल. त्यांच्या ५०हून अधिक पुस्तकांच्या पंक्तीमधील ही भय कादंबरी "स्वाहा"! अतिशय गूढ, रहस्यमय, वाचत असताना अंगावर शहारे आणणाऱ्या, २४० पानांच्या "स्वाहा" मधून धारपांनी वाचकाला भीतीचा अगदी जवळून अनुभव करून दिला आहे. 

शहरालगतच्या, स्टेशन रोडवरील विरळ वस्तीतील एक तीन मजली इमारत आणि तिच्या आसपासच्या परिसरामध्ये घडणारी ही थरारक कादंबरी "स्वाहा"! एखाद्या भयपटाला साजेशी सुरुवात. या तीन मजली जुन्या वास्तूचा रहस्यमय तिसरा मजला आणि दर ३ वर्षांनी त्या वास्तूमध्ये जागृत होणारी एक दुष्ट शक्ती यांना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली ही कादंबरी! श्रीधरची अमेरिका रिटर्न बहीण तिच्या कुटुंबासोबत भारतात स्थायिक होण्यासाठी आल्यानंतर तात्पुरत्या वास्तव्यासाठी नेमकी हीच इमारत भाड्याने घेतात आणि मग सुरुवात होते या थरारक प्रवासाला! त्या वास्तूत रहायला गेल्यानंतर श्रीधरची बहीण विनिता आणि भाचा सुनील यांना येणारे विचित्र अनुभव वाचताना अंगावर शहारे येतात. तिसरा मजला आणि तिथे वावरणाऱ्या अनामिक शक्तीचे धारपांनी केलेलं वर्णन तर खासच! नंतर अचानकच त्या संपूर्ण कुटुंबाच्या गायब होण्याने कथेमध्ये एका गूढ रहस्याचा प्रवेश होतो. बाहेरगावी जाऊन परत आल्यानंतर श्रीधर जेव्हा त्यांच्या या अचानक गायब होण्याच्या कारणांचा शोध घ्यायला सुरुवात करतो तेव्हा त्याला त्या वास्तूबाबत येणाऱ्या विविध अनुभवांतून या कादंबरीची कथा उलगडत जाते. या शोधादरम्यान पुढे ३ वर्षें ही वास्तू सुप्तावस्थेत राहते आणि पुन्हा त्याच घटनांची पुनरावृत्ती होते जेव्हा श्रीधरच्या बहिणीप्रमाणेच अरुणाचे कुटुंब त्या वास्तूत रहायला येते. कथेतील सर्व घटना धारपांनी इतक्या ताकदीने रंगवल्या आहेत की वाचकाला स्वतःच त्या वास्तूत असण्याचा भास काही क्षण व्हावा आणि याच धारपांच्या जादूमुळे आजही वाचक त्यांच्या कथांचा चाहता आहे. दर ३ वर्षांनी घडणाऱ्या या घटनांचा नेमका अर्थ काय? श्रीधर आणि अरुणा यांच्याशिवाय आणखी कोणा-कोणाला या दुष्ट चक्रातून जावं लागलं? त्या दुष्ट शक्तीला दर ३ वर्षांनी द्याव्या लागणाऱ्या मनुष्याच्या प्राणांच्या आहुतीसाठी माणसांची निवड कोण, कशी आणि कधी करते? ही आहुती का द्यावी लागते? त्याचे नेमके कारण काय? या दुष्टचक्राचा शेवट कसा होतो? त्यासाठी श्रीधर कोणकोणते मार्ग वापरतो? या प्रश्नांच्या उत्तरासाठी आणि धारपांच्या रहस्यात्मक लेखनाचा थरार अनुभवण्यासाठी "स्वाहा" वाचावीच लागेल.

भयकथा वाचनाची आवड असणाऱ्यांनी आवर्जून वाचण्यासारखी कादंबरी "स्वाहा".




संदीप प्रकाश जाधव






Monday, July 12, 2021

"मी माणूस शोधतोय"

 



लेखक : व. पु. काळे

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस


वसंत पुरुषोत्तम काळे अर्थातच "वपु" यांच्या नावाचं एक वेगळंच वलय मराठी साहित्यविश्वात आहे. वाचनाची आवड असो वा नसो "वपु" हे नाव माहीत नसणारी व्यक्ती सापडणे कठीणच! सध्याच्या "सोशल मिडिया"च्या जमान्यात तर वपुंनी लिहिलेल्या त्यांच्या बऱ्याच पुस्तकांतील वाक्यांची खूपच "चलती" आहे. "वपुं" सारख्या अगदी बोटांवर मोजता येण्यासारख्या लेखकांचं वैशिष्ट्य म्हणा किंवा सर्वांत मोठं यश म्हणा, ते प्रत्येक पिढीतील वाचकांना आपलेसे वाटतात. त्यामुळेच ६०-७० च्या दशकात लिहिल्या गेलेल्या त्यांच्या बऱ्याच पुस्तकांची जादू आजही कायम आहे. वपु म्हटलं की चटकन डोक्यात विचार येणारी पुस्तके "पार्टनर" आणि "वपुर्झा". परंतु याखेरीज ४० वर्षांमध्ये त्यांनी ६० हून अधिक पुस्तके लिहिली. आपल्या लिखाणातून जगण्याचं तत्त्वज्ञान सोप्या पण तितक्याच रंजक पद्धतीने लोकांना सांगणारे वपु पेशाने आर्किटेक्ट असल्याने त्यांना शब्दांचे महाल बांधणारा लेखक म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. वपुंच्या पुस्तकांचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे लिखाण हे आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांशी साधर्म्य दाखवणारे असते त्यामुळे वाचक त्यामध्ये हरवून जातो. "मी माणूस शोधतोय" हे माझ्या वाचनात आलेलं वपुंच्या दर्जेदार पुस्तकांमधील आणखी एक पुस्तक. वपुंच्याच भाषेत सांगायचं झालं तर - "मी माणूस शोधतोय", माणूस नावाचा प्राणी अनेकदा भेटला. कधी खऱ्या स्वरूपात, कधी खोट्या तर कधी संपूर्ण स्वरूपात; पुष्कळदा तो निसटलाही. या माणसानं मला कधी हसवलं, कधी रडवलं, कधी भुलवलं, कधी हरवलं, कधी फुलवलं, कधी थकवलं, कधी बैचेन केलं, तर कधी अंतर्मुख! तरीही माझा शोध चालूच आहे आणि चालूच राहणार; माझा 'पेशन्स' दांडगा आहे. याचं श्रेयही पुन्हा माणसांनाच! वाट पाहत राहण्याची माझी ताकद माणसांनीच वाढवली. वपुंचा हा निरंतर शोधाचा प्रवास पूर्ण झालेला नसला तरी त्यांनी निष्कर्ष मात्र काढला आहे आणि तो म्हणजे - "जगात चांगल्या माणसांची संख्या जास्त आहे"... "मी माणूस शोधतोय" हा कथासंग्रह आहे वपुंना भेटलेल्या अशाच चांगल्या माणसांचा! प्रत्येक कथेला साजेसं असं शीर्षक आणि अगदी सहज - सुंदर मांडणीतून त्यांना भेटलेल्या माणसांच्या कथा आणि व्यथा खास वपु स्टाईलने "मी माणूस शोधतोय" मधे वपुंनी उतरवल्या आहेत.

"मी माणूस शोधतोय" या कथा संग्रहातील प्रत्येक कथेत वपुंना भेटलेल्या अशा लोकांच्या कथा आहेत ज्यांचं आयुष्य कोणत्या ना कोणत्या छंदाने किंवा वेडाने व्यापून गेलं आहे आणि आपला छंद किंवा वेड जोपासण्यासाठी चालू असणाऱ्या त्यांच्या विविध गोष्टींनी या सर्व कथा सजलेल्या आहेत. चांगल्या माणसांच्या शोधात असणाऱ्या वपुंची पहिली कथा "मी माणूस शोधतोय" ही फिरते कौतुक सप्तर्षी या अवलिया भोवती. वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी लोकांना तब्बल २ तपे कौतुकास्पर पत्रे लिहिणारा, नकळत त्यांच्यासोबत फोटो काढून घेणारा आणि तेही आपली कोणतीही ओळख त्या लोकांपर्यंत न पोहचवणारा असा हा कौतुक सप्तर्षी! पत्तादेखील माहीत नसताना वपुंची कौतुक सप्तर्षींसोबत होणारी भेट, प्रत्यक्ष लोकांपर्यंत न पोहचता देखील त्यांनी अनेकांची जिंकलेली मने, त्यातून त्यांना प्राप्त झालेली नोकरी, त्यांचा जीवन प्रवास, हळूहळू त्यांच्या छंदाचा वाढत जाणारा परीघ, हे सर्व होत असतानाही त्यांनी आपल्या अंगी जोपासलेला विनम्र भाव आणि शेवटी या अवलियाचे अपघाताने दुर्दैवी निघून जाणे हे वपुंनी अगदी सहज साध्या शब्दांत मांडले आहे. अनेक माणसं जन्माला येतात, जगतात आणि निघून जातात पण कौतुक सप्तर्षी यांच्यासारखी छंद वेडी माणसं मरून सुद्धा त्या छंदाने कायम जिवंत राहतात आणि हेच माणसाच्या जगण्यातील मोठेपण आहे हे सांगणारी ही पहिली कथा "मी माणूस शोधतोय". या कथासंग्रहातील आणखी एक मनाचा ठाव घेणारी कथा "नालायक". शाळेतील खोडकर मुलांना सतत "नालायक" म्हणून ओरडणारे शिक्षक आणि त्यांच्या या अशा ओरडण्यातून मुलांच्या मनावर होणारा परिणाम, आपण कोणतीच गोष्ट करण्यासाठी लायक नाही असा त्यांच्या मनात निर्माण होणारा न्यूनगंड यामुळे वाहवत जाणारी काही मुले तर याच ओरडण्यातून काही मुलांच्या मनावर होणारा सकारात्मक परिणाम या दोन्हींच्यामधे वाचकाला गुंतवून ठेवणारी ही कथा. या कथासंग्रहातील इतर कथा हप्ता, अंतर, हुतात्मा, रमी, मुहूर्त, टाहो, टेरीलिन, शोध, ऋतू बसंती रुठ गयी समाजातील चांगुलपणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. समाजामध्ये जगत असताना आपल्याला अनेक माणसं भेटत असतात, आपल्या वेगवेगळ्या गुणवैशिष्टांनी ते आपलं व्यक्तित्व सिद्ध करतात आणि अशा चांगुलपणा असणाऱ्या माणसांची संख्या समाजामध्ये जास्त आहे हाच निष्कर्ष वपुंनी या कथासंग्रहातून काढलेला आहे तोही खास वपुंच्या शैलीतून!

वपुंच्या दर्जेदार लिखाणासाठी आवर्जून वाचावा असा कथासंग्रह.





संदीप प्रकाश जाधव

 

Monday, July 5, 2021

"स्वामी"

 


लेखक : रणजित देसाई

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस


मराठी साहित्यात रणजित देसाई या नावाला वेगळ्या परिचयाची गरज नाही. साहित्यविश्वात "स्वामीकार" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देसाईंची "स्वामी" ही पहिली ऐतिहासिक कादंबरी! "स्वामी" कादंबरी म्हणजे थोरल्या माधवराव पेशव्यांची जीवनगाथाच! मराठ्यांच्या इतिहासात जर डोकावून पाहिलं तर स्वराज्य निर्मितीपासून ते पेशवाईच्या अंतापर्यंत अशा बऱ्याच व्यक्ती आपल्यासमोर येतील ज्यांच्या कारकिर्दीला एकाचवेळी आपलं सौभाग्य आणि दुर्भाग्य अशा दोन टोकाच्या दृष्टिकोनांतून पहावं लागेल, अगदी शिवरायांनासुद्धा! सौभाग्याचं कारण सांगायची गरज नसली तरी दुर्भाग्य एवढ्यासाठी म्हणावं लागेल की अशा महान लोकांच्या वाट्याला आलेलं अल्पायुषी जीवन! ऐतिहासिक कादंबरी वाचत असताना माझ्यासारख्या अनेक वाचकांच्या मनाला एकदा तरी नक्कीच असं वाटलं असणार की छत्रपती शिवजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पेशवा बाजीराव, पेशवा माधवराव आणि असे बरेच थोर लोक ज्यांनी स्वराज्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं, आपल्या छोट्याशाच पण देदीप्यमान कारकिर्दीने जगाला त्यांची दखल घेण्यास भाग पाडलं ते जर इतर मुघल किंवा आदिलशाही बादशहांप्रमाणे दीर्घायुषी असते तर आज आपला इतिहास काय असता? इतिहासाला "जर-तर" हे शब्द वर्ज्य असले तरी फक्त असा विचारच आपल्या अंगावर अभिमानाने शहारे घेऊन येतो. अल्पायुषी जरी असल्या तरी इतिहासात अशा काही कारकिर्दी आहेत ज्या सुवर्णाक्षरांनी लिहिल्या गेल्या आहेत. आजही त्या सामान्य लोकांना जगण्याची, लढण्याची उमेद देतात! अशाच कारकिर्दीपैकी एक झळाळती कारकीर्द श्रीमंत माधवराव पेशवे यांची! अवघ्या १६-१७ व्या वर्षी अंगावर पडलेली भारतभर पसरलेल्या मराठा साम्राज्याची मोठी जबाबदारी, पानिपतच्या युद्धानंतर विस्कटलेली राज्यकारभाराची घडी, राघोबादादांसारख्या अटकेपार झेंडे लावणाऱ्या पराक्रमी काकांची घरातूनच त्यांच्याविरुद्ध चाललेली कट-कारस्थाने या सर्वांवर मात करून माधवरावांनी त्यांच्या फक्त ११ वर्षांच्या कारकिर्दीत राज्य तर सावरलेच शिवाय त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली चाललेल्या राजकारणामुळे पानिपतातील पराभवाने सरदार, सैन्य आणि प्रजेच्या मनावर झालेल्या जखमांवर फुंकर घालून एक नवी ऊर्जा निर्माण झाली. रणजित देसाईंची "स्वामी" ही ऐतिहासिक कादंबरी माधवराव पेशव्यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. ४१३ पानांच्या या कादंबरीतून रणजित देसाईंनी माधवराव पेशव्यांची जी कारकीर्द लिहिली आहे ती जणूकाही आपल्या समोरच घडत असावी इतक्या ताकदीने मांडली आहे. त्यामुळेच १९६२ साली लिहिल्या गेलेल्या या कादंबरीची जादू साहित्यविश्वात आजही टिकून आहे. "स्वामी" नंतर शिवरायांवरील "श्रीमानयोगी" ही अजरामर कादंबरी त्यांनी लिहिली परंतु "रणजित देसाई" म्हटलं की आजही पहिला डोक्यात विचार येतो तो "स्वामी"चाच! रणजित देसाईंच्या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे मूळ विषयाला जराही धक्का न लावता वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी मांडणी आणि संवाद! कादंबरी वाचत असताना वाचकाला त्या काळात घेऊन जाण्याची हातोटी असणाऱ्या मोजक्याच लेखकांपैकी एक "रणजित देसाई"! त्यांची "स्वामी" ही कादंबरीदेखील याला अपवाद नाही.

पानिपतचा पराभव ही समस्त मराठ्यांच्या जिव्हारी लागलेली, कधीही भरून न निघणारी जखम! पानिपतच्या संग्रामात भाऊंसोबतच विश्वासराव देखील कामी आले. ज्यांच्याकडे भावी पेशवा म्हणून पाहिलं जात होतं असा आपला मुलगा विश्वासराव आणि बंधू सदाशिवराव भाऊ यांचा मृत्यू शिवाय पानिपतचा पराभव अशा तिहेरी धक्क्याने लढाईनंतरच्या अवघ्या ५ महिन्यांत नानासाहेब पेशव्यांचे निधन झाले. त्यानंतर आपसूकच पेशवाईची वस्त्रे नानासाहेबांचे द्वितीय पुत्र माधवराव यांना मिळाली तीही वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी! पानिपतावर झालेला मोठा पराभव आणि नानासाहेब पेशव्यांच्या अकस्मात जाण्याने मराठा साम्राज्याची घडी विस्कळीत व्हायला सुरुवात झाली होती. दख्खनमधे निजाम तर कर्नाटकात हैदर अली यांना जोर चढला होता, मराठा मुलुखावर हल्ले होऊ लागले होते! त्यामधे भर पडली ती स्वकीयांच्यामुळे, नागपूरकर भोसल्यांना सातारा गादीची स्वप्ने पडू लागली आणि त्यांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला. शिवाय सर्वांत वाईट गोष्ट जर कोणती असेल तर ती पेशव्यांच्या घरात चालू झालेलं गृहयुद्ध! पेशवे पदासाठी आधीच गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले नानासाहेब पेशव्यांचे धाकले भाऊ राघोबादादा यांच्याकडून माधवरावांविरुद्ध वारंवार होणाऱ्या कट-कारस्थानांना ऊत आला. माधवरावांची ११ वर्षांची कारकीर्द या सर्वाचा निकाल लावण्यातच गुंतून जाते. हैदरचा बिमोड करण्यासाठी कर्नाटकवर ४, निजामाला धडा शिकवण्यासाठी त्याच्यावर २ आणि नागपूरकर भोसल्यांवर २ अश्या एकूण आठ स्वाऱ्या माधवरावांनी केल्या. माधवरावांचा सर्वात जास्त काळ हा घरभेद्यांवर लक्ष देण्यातच गेला. कारण राघोबादादा कितीही पराक्रमी असले तरी ते हलक्या कानाचे आणि अविचारी असा त्यांचा लौकिक होता शिवाय सतत त्यांचा पेशवाईवर असणारा डोळा! माधवरावांनी राघोबादादांना अनेक वेळा समजावून सांगितलं, तरीही सखारामबापूंच्या सल्ल्याने ते आळेगावत माधवरावांविरुद्ध युद्धास उभे राहिले. मराठा दौलतीच्या हितासाठी आळेगावच्या लढाईनंतर माधवरावांनी स्वतः नमते घेऊन राज्याची सूत्रे राघोबादादांना देऊ केली परंतु राघोबादादांच्या कारवायांना पूर्णपणे पायबंद होत नसल्याचे पाहून शेवटी त्यांना शनिवार वाड्यातील बदामी महालात नजर कैदेत ठेवण्याचा निर्णय माधवरावांना घ्यावा लागला. राजकारणाच्या दृष्टीने फारसे महत्त्वाचे नसलेले परंतु पेशव्यांच्या घरातील शांततेला बाधा आणणारे "तोतया सदाशिवराव भाऊ" प्रकरण माधवरावांनी ज्यापद्धतीने हातावेगळं केलं ते त्यांच्या हुशारी, धीरोदात्तपणाची साक्ष देते. 

राज्यकर्त्यांची खरी कसोटी लागते ती भावनिक पातळीवरच्या प्रकरणांचा निवाडा करताना. याठिकाणीही इतक्या कमी वयात माधवरावांकडे असणारी प्रगल्भता थक्क करून जाते. याचे उदाहरण म्हणजे निजाम पुण्यात येऊन सर्व शहर लुटून पर्वतीवरच्या श्रींची मूर्ती भंग करत असताना पेशव्यांचे सख्खे मामा रास्ते निजामाला मदत करत होते. हे समजल्यानंतर या गुन्ह्यासाठी माधवरावांनी त्यांना दंड ठोठावला. तोही आपल्या मातोश्री, गोपिकाबाईंचा रोष पत्करून! कर्तव्यदक्ष माधवरावांनी दंड मागे न घेतल्याने रागावून गोपिकाबाई कायमच्या गंगापूरला निघून गेल्यानंतर माधवराव मातृप्रेमास पारखे होतात. यानंतर परत माधवराव आणि गोपिकाबाई यांच्या भेटीचा उल्लेख नाही. एकाकी पडलेल्या माधवरावांना पत्नी रमाबाई सोडल्यास जवळचे असे कोणीच रहात नाही. त्यातच त्यांना जडलेला राजयक्ष्मासारखा जीवघेणा आजार! तरीही ते शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त मराठी दौलतीचाच विचार करत राहिले. हे सर्व घटनाक्रम ज्या पद्धतीने रणजित देसाईंनी कादंबरीत दिले आहेत ते वाचत असताना बऱ्याच वेळा वाचकाचे भान हरवून जाते. रणजित देसाईंच्या "स्वामी"ची शेवटची २० पाने तर खूपच भावनिक आहेत. माधवरावांचे थेऊर मधील अखेरचे दिवस आणि मृत्यू समोर दिसत असतानादेखील त्यांची तडफ वाचकाला कमालीचं अस्वस्थ करते, नकळत डोळ्यांत पाणी येते. रमाबाईंचा सती जाण्याचा प्रसंग सुद्धा असाच वाचकाला भावूक करतो. माधवरावांच्या अवघ्या अकरा वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी पानिपतच्या पराभवानंतर विस्कटलेली राज्याची घडी पुन्हा बसवली. हैदर अली, निजाम यांच्यासारखे दौलतीचे शत्रू आणि राघोबादादांसारखे सख्खे काका यांना वठणीवर आणून राज्यात शिस्त व कार्यक्षम प्रशासनव्यवस्था निर्माण केली आणि अल्पावधीत मराठ्यांचा दरारा सर्वत्र निर्माण केला. माधवरावांच्या अकस्मात मृत्यूनंतर मराठा साम्राज्य उतरणीला लागले असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरू नये. म्हणूनच पेशवाईच्या काळात साताऱ्यात वास्तव्याला असणारा ब्रिटिश इतिहासकार, ज्याने मराठ्यांचा इतिहास लिहिला तो ग्रॅंट डफ म्हणतो मराठा साम्राज्याची पानिपतापेक्षाही मोठी हानी म्हणजे माधवराव पेशवे यांचा अकाली मृत्यू! 

आवर्जून वाचावी अशी कादंबरी!!



संदीप प्रकाश जाधव


Monday, June 28, 2021

"नॉट विदाऊट माय डॉटर"

 



लेखक : बेट्टी महमूदी || विल्यम हॉफर

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

मराठी अनुवाद : सौ. लीना सोहोनी

आईचं आपल्या मुलांसोबतचं नातं शब्दांपलिकडचं! कवितांमधून वर्णन केलेली आई ही नेहमीच तिची एक प्रेमळ, शांत प्रतिमा आपल्यासमोर घेऊन येते. परंतु खऱ्या आयुष्यात आपल्या मुलांसाठी प्रसंगी अतिशय कठोर होऊन धाडसीपणे निर्णय घेण्याची ताकदसुद्धा तिच्यामध्ये असते याची पुष्कळ उदाहरणे मिळतील. माणूसच नाही तर अगदी प्राणी-पक्षीही याला अपवाद नाहीत! अशा काही उदाहरणांचा विचार करायचा म्हटलं तर सर्वात प्रथम डोक्यात विचार येतो तो स्वराज्यातील "हिरकणीचा"! आपल्या तान्ह्या मुलासाठी ४५०० फूट उंच रायगडचा कडा भर अंधारात उतरून जाणाऱ्या हिरकणीकडे नेहमीच एक धाडसी मातृत्वाचं उदाहरण म्हणून पाहिलं जातं. प्रत्यक्ष शिवरायांनासुद्धा दखल घ्यावी लागणारी ती घटना! आज ३५० वर्षांनंतरसुद्धा ती कथा ऐकताना अंगावर शहारे येतात यावरूनच कल्पना करता येईल की आपल्या मुलासाठी "हिरकणीने" केलेलं धाडस किती अचाट होतं. "नॉट विदाऊट माय डॉटर" ही सत्यकथा आहे अशाच एका आधुनिक "हिरकणीची". बेट्टी महमूदी या अमेरिकन स्त्रीने आपल्या मुलीसाठी केलेल्या एका अफाट धाडसाची ही सत्यकथा! अमेरिकेत राहणार्‍या बेट्टी महमूदीला तिचा नवरा "मूडी" काही कारणाने इराणला घेऊन जातो व तिला तिच्या मुलीसोबत तिथेच डांबून ठेवण्याचा प्रयत्न करतो. बेट्टीसोबतच आपल्या चार वर्षांच्या मुलीवरही तो अनन्वित अत्याचार करतो. यातून सुटका होणे जवळजवळ अशक्य आहे याची जाणीव बेट्टीला झाल्यानंतर आपल्या व मुलीच्या सुटकेसाठी अत्यंत कठीण मार्ग अवलंबण्याचं धाडस ती करते. तिच्या या सुटकेच्या संघर्षाची आणि क्षणाक्षणाला वाचकाच्या हृदयाचा ठोका चुकवणारी ही सत्यकथा! बेट्टी महमूदी यांनी स्वतःच त्यांचा अनुभव सांगितल्यामुळे वाचत असताना त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलीवर ओढवलेल्या जीवघेण्या घटनेची दाहकता जाणवत राहते. आजही जिथे अमेरिका आणि इराण यांच्यामधून विस्तवही जात नाही तिथे ३० वर्षांपूर्वी काय परिस्थिती असेल याचा फक्त अंदाजच केलेला बरा. अशा वातावरणात फक्त आपल्या नवऱ्यावरील विश्वासाखातर, आपल्या ४ वर्षांच्या मुलीसोबत तेहरानमधे पाऊल ठेवणारी बेट्टी जेव्हा आपला अनुभव पुस्तकातून आपल्याला सांगायला चालू करते तेव्हा वाचक अक्षरशः त्या प्रवासासोबत चिकटून राहतो. तिच्यावर ओढवणाऱ्या सर्व प्रसंगांसोबत वाचक इतका एकरुप होतो की तिच्या थरारक सुटकेनंतर नकळत वाचकाच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. बेट्टीचा अमेरिका ते तेहरान आणि परत अमेरिका हा प्रवास आपल्याला खूप काही शिकवून जातो. बेट्टी महमुदी यांनी लिहिलेलं "नॉट विदाऊट माय डॉटर" हे पुस्तक म्हणजे इराणसारख्या काही धर्मांध मुस्लिम देशात व्यक्तिस्वातंत्र्य या मूलभूत हक्कासाठी स्त्रियांना आजही द्याव्या लागणार्‍या कठोर लढ्याची एक प्रातिनिधिक कहाणी आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरू नये. तब्बल १८ महिने इराणमधे नवऱ्याच्या नजरकैदेत राहिलेल्या काळात स्त्रियांसाठी जाचक असणाऱ्या मुस्लिम रूढी-परंपरा जपताना बेट्टीची होणारी तारेवरची कसरत, तेथील वातावरणात आपल्या मुलीच्या सुरक्षेसाठी - स्वातंत्र्यासाठीची तिची तळमळ - धडपड, मधेच काही काळासाठी आपल्या मुलीपासून झालेली ताटातूट आणि तेव्हा एक आई म्हणून होणारी तिची मानसिक अवस्था, तिला स्वातंत्र्याची कळालेली किंमत आणि स्वदेशी परतण्याची तीव्र इच्छा, सुटकेसाठी तिने केलेले काही अयशस्वी प्रयत्न, शेवटी नाईलाजास्तव जीवावर उदार होऊन आपल्या ४ वर्षांच्या मुलीसोबत इराणमधून बेकायदेशीररित्या पळून जाण्याचा घेतलेला धाडसी निर्णय आणि त्याच्या पूर्णत्वाचा थरारक प्रवास बेट्टी यांनी त्यांच्या या ३०४ पानी पुस्तकातून,  "नॉट विदाऊट माय डॉटर" मधून लोकांपुढे आणला आहे.

अमेरिकेत राहणारे एक सुखी आणि उच्चशिक्षित कुटुंब! डॉ. सय्यद बोझोर्ग महमुदी उर्फ मूडी, बेट्टी महमूदी आणि मुलगी माहतोब. अमेरिकेत अगदी सुखात चालू असणाऱ्या त्यांच्या संसाराला घरघर लागते ती मूडीच्या डोक्यात इराणला जाऊन आपल्या कुटुंबाला भेट देऊन येण्याच्या विचाराने. सुरुवातीला शंकेने नकार देणारी बेट्टी नंतर तयार होते ती मूडीवर असलेल्या प्रेमाखातर, विश्वासाखातर! शिवाय मूडीने दिलेला शब्द, 'आपण फक्त २ आठवडे तिकडे जाऊन, माझ्या कुटुंबाला भेटून परत यायचे'. परंतु मूडीवर आपण दाखवलेला विश्वास किती खोटा आहे याची जाणीव बेट्टीला इराणमधे पाऊल ठेवताक्षणीच होते. तरीही मूडी आपल्याला धोका देणे शक्यच नाही हा विचार मनात ठेवून ती मूडीच्या इराणमधील मोठ्या बहिणीच्या, आमे बोझोर्गच्या घरात प्रवेश करते आणि इथूनच चालू होते बेट्टीच्या इराणमधील नरकासमान वास्तव्याला! मूडीच्या घरी त्यांचा गृहप्रवेश होतो तोच मुळी एका जिवंत बकरीचे रक्त ओलांडून! जी सुरुवात असते काही विचित्र चालीरिती आणि परंपरांचा बेट्टीच्या आयुष्यातील प्रवेशाची. नंतर आमे बोझोर्गच्या घरातील अतिशय गलिच्छ वातावरण आणि स्त्रियांना दिल्या जाणाऱ्या अतिशय खालच्या पातळीवरील वागणुकीने बेट्टी हादरून जाते. शिवाय मूडीसारख्या उच्चशिक्षित डॉक्टरचा त्या सर्व गोष्टींना असणारा मूक पाठिंबा बेट्टीसाठी जास्त धक्का देऊन जातो. तरीही फक्त २च आठवड्यांचा प्रश्न आहे आणि त्यानंतर अमेरिकेला परत जायचेच आहे या भोळ्या आशेवर त्या सर्व गोष्टी आपल्या मुलीसोबत ती सहन करत राहते. परंतु इराणमधील त्यांच्या १५ दिवसांच्या वास्तव्यानंतर अमेरिकेला परत जाण्यासाठी मूडीकडून मिळालेल्या नकारात्मक प्रतिसादाने बेट्टीच्या पायाखालची जमीन सरकते आणि आपण आता इराणमध्ये पुरते फसले गेलो याची जाणीव होते. यानंतर मूडीकडून बेट्टीचे बाहेरच्या जगाशी असणारे संपर्क जवळपास पूर्णपणे तोडण्यात येतात, तिला नजरकैदेत ठेवलं जातं, तिने पूर्णपणे इस्लाम स्वीकारून इस्लाम चालीरीतीप्रमाणे राहण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जातो, शिवाय मुडीच्या नातेवाईकांकडून होणारा या मायलेकींचा छळ, मुडीकडून दोघींना होणारी जीवघेणी मारहाण आणि बेट्टीसाठी असणारी सर्वांत मोठी अडचण म्हणजे इराणी भाषा या सर्वांचा नेटाने सामना करून मूडीच्या तावडीतून निसटण्यासाठी चालवलेले प्रयत्न हे सर्व बेट्टींच्याच शब्दांत वाचत असताना वाचक सुन्न होऊन जातो. शेवटचा पर्याय म्हणून बेट्टीने पळून जाण्याचा निवडलेला मार्ग वाचकाच्या काळजाचादेखील ठोका चुकवतो. तरीही हा प्रयत्न बेट्टी कसा पूर्णत्वास नेते, ती अमेरिकेत कशी पोहचते, तिला या सर्वांत कोणा कोणाची मदत मिळते, पुढे मूडीचं काय होतं, बेट्टी सध्या कोणत्या परिस्थितीत आहे हे सर्व पुस्तकात वाचण्याचा अनुभव खासच आहे.

प्रत्येकाने आवर्जून संग्रही ठेऊन वाचावे असं एक प्रेरणादायी पुस्तक.





संदीप प्रकाश जाधव


Tuesday, June 22, 2021

"सत्तर दिवस"

 


लेखक : रवींद्र गुर्जर

प्रकाशक : श्रीराम बूक एजन्सी


पिअर्स पॉल रीड यांच्या "ALIVE" कादंबरीचे मराठी अनुवादित पुस्तक "सत्तर दिवस". रवींद्र गुर्जर यांचं "सत्तर दिवस" हे बऱ्याच जणांकडून वाचायला सुचवलेलं पुस्तक संग्रही घेऊन वाचून काढलं. सकारात्मक आणि समाधानी आयुष्य जगण्याचा संदेश देणारं हे 199 पानांचं अतिशय उत्कृष्ठ पुस्तक वाचायला घेल्यानंतर पुढं काय झालं असेल या एकाच विचाराने एकसारखं वाचून अवघ्या एका दिवसात पूर्ण केलं. जगण्याची जिद्द काय असते याचं पाना-पानावर दर्शन देणारं, सत्यघटनेवर आधारित हे पुस्तक खचलेल्या मनाला उभारी देण्याचं काम करतं. माणसाजवळ जर जिद्द असेल तर कितीही प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहता येऊ शकते हे पुस्तक वाचताना सतत जाणवत राहते. युरुग्वे हा दक्षिण अमेरिकेतील एक छोटासा देश. १२ ऑक्टोबर १९७२, युरुग्वे एअर फोर्सच्या फेअर चाइल्ड ए २२७ ह्या विमानानं पंचेचाळीस प्रवाशांसह आकाशात झेप घेतली. रग्बी खेळाडूंचा संघ चिलीकडे निघाला होता. लांबीने जगातील सर्वात जास्त आणि हिमालयाच्या बरोबरीचा पर्वत समूह, अँडीज ओलांडून त्यांना जायचं होतं. चिलीकडे जायला निघालेल्या विमानातील सर्व ४५ लोकांच्या मनात आनंदाचं उधान आलं होतं. एकमेकांसोबत गप्पा मारत, दंगा-मस्ती करत आणि रग्बी सामना जिंकल्याची स्वप्ने बघत मजेत चाललेल्या त्यातील एकालाही पुढं येऊ घातलेल्या भयानक संकटाची पुसटशीही कल्पना नव्हती. अँडीज मधून फेअर चाइल्ड विमान जाऊ लागलं आणि अचानक ते ढगात शिरलं. हिमवर्षाव तर सतत चालूच होता. दुपारी ३.३० वाजता वैमानिकानं सॅंटियागो विमानतळावर "All Good" चा संदेश दिला. परंतु त्यानंतर एकाच मिनिटात विमानाचा सॅंटियागो टॉवरसोबतचा संपर्क तुटला. झंझावती वाऱ्याने विमानाला दोन प्रचंड तडाखे दिले आणि नियतीने वाढून ठेवलेल्या भयानक संकटाची चाहूल विमानातील ४५ जणांना झाली. काही क्षणात विमान चारही बाजूंनी हिमशिखरांनी वेढलेल्या दरीत कोसळलं. ढगांमुळे आधीच प्रकाश मंदावला होता. त्यात बर्फ पडू लागला. बचावलेले व थोडया सुस्थितीत असलेले प्रवासी जखमी लोकांना बाहेर काढू लागले. फेअर चाइल्ड विमान बेपत्ता झाल्याचं आपल्या देशात सर्वांच्या लक्षात येणार आणि लवकरच आपल्याला मदत मिळणार या आशेवर ते सगळे होते. त्यांनी रेडिओ सुरु करण्याचा प्रयत्न केला पण ट्रान्समीटर निकामी झाला होता. अनेक जण भयंकर जखमी झाले होते तर काही जण जागीच मृत्युमुखी पडले होते. दिवस संपला, रात्र सुरु झाली तरी अजून मदतीचा काही पत्ता नव्हता. रात्रीच्या अंधारात ओरडणे, किंचाळणे यांशिवाय काहीही ऐकायला येत नव्हतं. पुढचे आठ दिवस चिली, अर्जेंटिना आणि युरुग्वेकडून विमानाचा जारीने शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ! अँडीजची शेकडो मैल लांबी, वादळ आणि हिमवृष्टी लक्षात घेता, विमान सापडण्याची शक्यता जवळजवळ नाहीशी झाली सोबतच विमानातील कोणीही वाचले असण्याची आशादेखील सोडून देण्यात आली. परंतु नियतीला हे मान्य नव्हतं, वाचलेल्या लोकांकडून काहीतरी अचाट पराक्रम करून घेण्यासाठीच जणू हा सर्व खेळ मांडला होता. त्या वाचलेल्या लोकांनी जगण्यासाठी केलेल्या संघर्षाची सत्यकथा म्हणजे हे पुस्तक "सत्तर दिवस".

अपघातानंतर मदतीची वाट पाहता तुटपुंज्या अन्नाच्या साठ्यावर ते एक-एक दिवस ढकलत राहतात. पुढे अन्नसाठा संपत आल्यानंतर फक्त एक चॉकलेटचा तुकडा आणि एक घोटभर रम यावर ते दिवस काढू लागतात. प्रत्येक दिवसाची सुरवात काहीतरी मदत मिळेल या आशेने होत होती आणि शेवट मात्र निराशेने होत होता. पुन्हा दुसऱ्या दिवशी नव्या उमेदिने त्यांचे प्रयत्न सुरु होत असत. परंतु आपल्याला मदत मिळणे आता अशक्य आहे त्यामुळे सुटकेचे प्रयत्न आता आपल्यालाच करावे लागतील याची त्यांना लवकरच जाणीव झाली आणि तिथून बाहेर पडण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. इथून पुढचा या सर्वांचा थरारक संघर्ष अंगावर काटा आणतो. प्रत्येक दिवस मरणाच्या दारात उभे राहण्याचा अनुभव घेऊन ते लढत राहतात. मधेच अचानक कोसळलेल्या हिमकडेने आणखीन काही लोकांचा मृत्यू होतो त्यावेळच्या प्रसंगाने तर वाचकाचे मन अक्षरशः चिरून जाते. सांघिक एकीच्या जोरावर येणाऱ्या संकटांवर ते मात करत राहतात. पोटाची आग विझवण्यासाठी आपल्याच मित्रांच्या मृतदेहांचे मांस खायची कठीण वेळ त्यांच्यावर येते. सुटकेसाठी त्यांनी केलेले वेगवेगळे प्रयत्न आणि प्रत्येकवेळी येणारे अपयश तरीही हार न मानता त्यांची चाललेली धडपड त्यांच्याकडे असणाऱ्या जिद्द आणि दुर्दम्य इच्छाशक्तीची साक्ष देते. त्यांच्यापैकीच एक लेनेसा आणि पेराडो यांनी तिथून बाहेर पडण्यासाठी केलेल्या धाडसी शोधमोहिमेला अखेर यश येते. तब्बल १० आठवड्यानंतर त्यांच्या अस्तित्वाबद्दल बाहेरील जगाला समजते. एक चिली शेतकरी आपल्या गुरांना चारण्यासाठी अँडीजच्या खोल दरीत गेला असताना त्याला दूरवर दोन माणसांच्या आकृत्या दिसतात. लेनेसा आणि पेराडो त्या शेतकर्‍याला जवळ येण्यासाठी जोरजोरात खुणावत होते परंतु त्यांचं भयानक स्वरूप आणि गुडघ्यांवर खुरडत येण्यामुळे घाबरलेल्या शेतकऱ्याने दुरुनच रुमालातून कागद-पेन त्यांच्याकडे फेकलं. दाढी वाढलेल्या,भकास चेहेर्‍याच्या आणि कपडयांचा चिंध्या झालेल्या पेराडोने काही तरी लिहून कागद परत फेकला. त्यावर लिहिलं होतं : "पर्वतावर कोसळलेल्या विमानातील मी एक उतारू आहे. मी युरुग्वेचा रहिवासी". शेवटी तब्बल ७० दिवसानंतर सर्वांची त्या जीवघेण्या संकटातून सुटका झाली.

अपघातानंतर बाहेर पडण्यासाठी त्यांनी कोणकोणते प्रयत्न केले? त्यांना कोणकोणतं अपयश येत गेलं? अपयश येवूनही ते पुन्हा दुसऱ्या दिवशी कसे प्रयत्न करत होते? जिवंत राहण्यासाठी, अन्न मिळवण्यासाठी त्यांनी कोणता मार्ग स्वीकारला? त्यानंतर ते कसे बाहेर पडू शकले? त्यांनी विमान अपघातासोबतच इतर नैसर्गिक आपत्तींना कशाप्रकारे तोंड दिलं? शेवटी ते सर्व या संकटातून कसे बाहेर पडले? हे सर्व जाणून घेण्यासाठी हे पुस्तकं नक्कीच वाचायला हवं. त्या दुर्दैवी अपघातातून ४५ जणांपैकी बचावलेल्या सोळा लोकांनी सांगितलेली त्यांच्या ७० दिवसांची ह्रदयद्रावक सत्यकथा "सत्तर दिवस".





संदीप प्रकाश जाधव





Monday, June 14, 2021

"युगांन्त"

 


लेखिका : इरावती कर्वे

प्रकाशक : देशमुख अँड कंपनी


कोणत्याही ऐतिहासिक घटनांवर होणाऱ्या संशोधानातून पुढे येणाऱ्या गोष्टी या कधीच अंतिम सत्य मानता येत नाहीत कारण जितके त्या गोष्टीच्या किंवा घटनेच्या खोलात शिरण्याचा प्रयत्न केला जातो तितक्या नवनवीन गोष्टी बाहेर येतच राहतात. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की जर डोळसपणे बघितलं तर संशोधनामुळे सत्याच्या अधिकाधिक जवळ मात्र पोहचता येते. "महाभारत" आणि "रामायण" यांना आपला इतिहास म्हणायचा की फक्त ग्रंथ याबद्दल बरीच मतमतांतरे असली तरी हजारो वर्षांपूर्वीच्या या दोन्हीही घटनांवर आजही अखंड संशोधन चालूच आहे. अशा संशोधनातून सिद्ध झालेल्या जुन्या गोष्टी वगळणे आणि नवीन गोष्टींचा समावेश करणे हे आजही अविरतपणे चालूच आहे. पण आपण ऐकलं किंवा वाचलं असलेलं "रामायण", "महाभारत" यांचा आपल्यावर असणारा प्रभावच इतका जबरदस्त आहे की बऱ्याचवेळा या संशोधनात्मक शोधांकडे दुर्लक्षच केलं जातं. जय नावाचा इतिहास आज आपण महाभारत म्हणून ओळखतो परंतु व्यासांनी महाभारत लिहिल्यापासून ते आजपर्यंत त्यामधे अनेक बदल झाले. आज आधुनिक जगात इतिहास अभ्यासकांनी महाभारताची शक्य तितकी जुनी प्रत शोधायचा प्रयत्न करून, सर्व संशोधनाअंती जी नवीन प्रत बनवली आहे त्यावर इरावती कर्वे यांचं हे पुस्तक आधारित आहे, महाभारतातील पात्रांवरील "युगान्त" ही त्यांची कादंबरी अशा नवीन संशोधनाचा आधार घेऊनच लिहिली गेली आहे त्यामुळे ही कादंबरी जितकी अलिप्तपणे वाचली जाईल तितक्या अधिक प्रमाणात महाभारतातील पात्रांची नव्याने ओळख झाल्याचा अनुभव वाचकाला मिळत राहतो. इरावती कर्वे यांनी या आवृत्तीत महाभारतातील कोणत्याही पात्राला देवत्व दिलेलं नाही, कोणतेही चमत्कार नाहीत, कठोर असला तरी पटेल असा एक इतिहास आहे. उदाहरणार्थ कादंबरीत श्रीकृष्णाच्या देवाचा अवतार या कल्पनेला छेद दिलेला आहे. नवीन संशोधनाचा दाखला देऊन श्रीकृष्ण हा एक अतुलनीय शक्ती असणारा महापुरुष होता या दृष्टिकोनातूनच त्याचं पात्र वाचकांसमोर आणलं आहे त्यामुळे महाभारत ही काल्पनिक कथा नसून तो आपला इतिहास आहे या दाव्याला एकप्रकारची पुष्टी मिळते. शास्त्रीय संदर्भ लावून जर महाभारताचे वाचन केले तर बऱ्याचशा गोष्टी अमानवीय वाटत नाहीत. फक्त त्या गोष्टी मान्य करायला आपल्या मनाची तयारी असायला हवी. इरावती कर्वे यांची "युगान्त" ही कादंबरी वाचल्यानंतर महाभारताविषयी आपल्या मनातील बऱ्याच शंकांचे निरसन होण्यासोबतच काही नवीन शंका देखील जन्माला येतात, पण साहजिकच येणाऱ्या काळात जे संशोधन होईल त्यातून त्यांचंही निरसन होईलच! सर्वांना परिचित असणाऱ्या महाभारताच्या मुख्य कथेला फाटा देऊन, शक्य तितक्या मुळ प्रतींचा अभ्यास करून महाभारतातील व्यक्तिरेखांवर लिहिलेल्या काही लेखांचा संग्रह म्हणजे हे इरावती कर्वे यांचं पुस्तक "युगान्त" ! भीष्म, गांधारी, कुंती, कर्ण, अर्जुन, भीम, द्रौपदी, द्रोण, विदुर या आणि अशा इतर पात्रांवरील लेखांसोबतच इरावती कर्वे यांनी महाभारताचा काळ शोधण्याचा प्रयत्नदेखील "युगान्त" मधून केला आहे.

महाभारतातील आपण आजपर्यंत मनात ठेवून राहिलेल्या बऱ्याच व्यक्तिरेखांच्या प्रतिमांना छेद देण्याचं काम इरावती कर्वे यांनी "युगान्त" मधून केलंय असं म्हटलं तरी ते चुकीचं नाही होणार. उदाहरणार्थ धृतराष्ट्र आणि गांधारी ह्यांच्या व्यक्तीरेखांबद्दल त्यांनी जे मत मांडलंय ते तांत्रिकदृष्ट्या अगदी योग्य वाटतं. 'गांधारीचे लग्न धृतराष्ट्राशी झाल्यानंतर तिने आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली ती पतीप्रेमाने नाही तर आपण एका मोठ्या देशाची सुंदर राजकन्या असताना भीष्माने जबरदस्ती आंधळ्या राजपुत्राशी आपल्याला लग्न करायला भाग पाडलं पण तिला कुण्या आंधळ्याची  काठी व्हायचे नव्हते म्हणून!' शिवाय दुसरा मुद्दाही असाच पटण्यासारखा आहे, डोळ्याला पट्टी बांधून गांधारीने आपल्याच वंशाच्या नाशाची बीजं पेरली असं लेखिका म्हणतात. अर्थात मुलांवर चांगले संस्कार करणं ही केवळ आईची जबाबदारी नसते. पण धृतराष्ट्राकडून याबाबत काही अपेक्षा ठेवण्यात अर्थ नसल्याने तिच्यावर जास्त जबाबदारी होती आणि ती तिने पार पाडली नाही हेही तितकंच खरं. हा मुद्दा आणखी पटवून देण्यासाठी इथे कुंतीचं उदाहरण दिलं गेलंय जिने शेवटपर्यंत आपल्या पाचही मुलांवर नजर ठेवली आणि चांगल्या वाईटाचं मार्गदर्शन केलं. महाभारतातील एखादे पात्र ठराविक  प्रसंगी एका विशिष्ट प्रकारेच का वागले असावे असा विचार शक्यतो आपण कधी केलाच नाही परंतु इरावती कर्वे लिखित "युगान्त" मधे असे बरेच प्रसंग आहेत जिथे  एखादे पात्र असे का वागले असावे यावर संशोधनात्मक संदर्भ देऊन प्रकाश टाकण्यात आला आहे ज्यामुळे वाचक विचारात पडतो. एखादी व्यक्ती जेव्हा महत्प्रयासाने काही गोष्टी सिद्धीस नेते तेव्हा त्या प्रवासात त्या व्यक्तीने बऱ्याच गोष्टी गमावल्या देखील असतात आणि महाभारतातील प्रत्येक पात्राला हे अगदी तंतोतंत लागू होते. इरावती कर्वे यांनी महाभारतातील  प्रत्येक व्यक्तिरेखेला आपल्यासमोर आणताना जे संदर्भ दिलेले आहेत ते वाचताना मनाला सतत होणारी जाणीव म्हणजे, 'मानवी प्रयत्न निष्फळ असतात, मानवी जीवन नेहमी विफलच राहणार, हा धडा मनावर बिंबवण्यासाठी तर महाभारत रचलेले नाही ना?' इरावती कर्वे यांनी कोणत्याही पात्राला अतिशयोक्ती न होऊ देता "युगान्त" मधून ज्या पद्धतीने वाचकांसमोर आणलं आहे त्यामुळे महाभारताबद्दल वेगळं असं काहीतरी वाचल्याचं समाधान हे पुस्तक देऊन जातं. परंतु मूळ संस्कृत महाभारतावर आणि तत्कालीन साहित्यावर अभ्यास करून केलं गेलेलं इरावती कर्वे यांचं या पुस्तकातील परीक्षण अलिप्तपणे आणि महाभारत-कृष्ण  यांबद्दलच्या आपल्या मनातील पूर्वकल्पना बाजूला ठेऊन वाचलं तरच एक वेगळं साहित्य वाचल्याचं समाधान मिळू शकतं. 

संग्रही ठेऊन आवर्जून वाचण्यासारखं पुस्तक "युगान्त".





संदीप प्रकाश जाधव


Monday, June 7, 2021

"वेडा विश्‍वनाथ"

 


लेखक : नारायण धारप

प्रकाशक : साकेत प्रकाशन

नारायण धारपांच्या माझ्याकडील संग्रहातील आणखीण एक दर्जेदार पुस्तक "वेडा विश्‍वनाथ". वाचकाने एखाद्या अद्भुत, रहस्यमय, अंगावर काटा आणणाऱ्या दुनियेतून सफर करून यावी अशी त्यांच्या प्रत्येक पुस्तकातील कथांची मांडणी. याआधी मी त्यांची "अघटित", "चेटकीण", "लुचाई" ही पुस्तके वाचली होती आणि प्रत्येकात असणारा समान धागा म्हणजे एक थरारक, भयप्रद, अंगावर काटा उभा करणारा, दचकवणारा आणि शेवटी वाईटावर चांगल्याच्या विजय होऊन सर्वकाही ठीकठाक झाल्यानंतर होणारा कथेचा शेवट. त्यांची ही भयकादंबरी "वेडा विश्‍वनाथ" देखील अशा कथानकाला अपवाद नाही. जरी त्यांच्या सर्व पुस्तकांमध्ये आपल्याला हा समान धागा जाणवत असला तरी प्रत्येक पुस्तकातून वाचकांपर्यंत पोहोचवलेल्या वेगवेगळ्या कथांचं श्रेय नारायण धारप यांच्या कल्पनाशक्तीला द्यावं लागेल. नारायण धारप यांच्या प्रचंड कल्पनाशक्तीचा अंदाज त्यांचं पुस्तक वाचायला घेतलं की पाना-पानावर येत राहतो. त्यांच्या कल्पना विलक्षण असण्यासोबतच प्रचंड सुसंगत आणि शात्रीय पायावर आधारित वाटतात. कथेतील शब्द आणि वर्णन यांची अतिशयोक्ती कधीच वाटत नाही. शब्द साधेच पण जबरदस्त परिणामकारक असतात. कोणत्याही प्रकारचं रहस्य जाणून घेण्याची माणसाला असणारी उत्कंठा लक्षात घेऊन लिहिलेल्या नारायण धारपांच्या कथा पहिल्या पानापासून नव्हे तर त्यांच्या कादंबरीच्या मुखपृष्ठापासूनच वाचकाला घेरायला चालू करतात असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये. संपूर्ण उपेक्षित, कोणतीही जाण नसलेला, समाजात कोणतेही स्थान नसलेला ‘वेडा विश्‍वनाथ’ आणि असामान्यांचा मेरूमणी ‘आर्यवर्मन’! आताचा क्षण आणि सहस्रकांपूर्वीचा क्षण असे विलक्षण विरोधी घटक निवडून धारपांनी मन स्तिमित करणारी कथा या कादंबरीत विणली आहे. सज्जन-दुर्जन, पाप-पुण्य, सहिष्णुता-क्रौर्य यांच्यामधे असणाऱ्या अगदी अनादी, अतिप्राचीन संघर्षाची किनार असणारी ही कादंबरी "वेडा विश्‍वनाथ".

एका मध्यमवर्गीय कुटुंबातील, शाळामास्तरांचा मुलगा विश्वनाथ. लहानपणी मलेरियासारख्या आजाराने मेंदूला झालेली दुखापत आणि त्यातूनच त्याच्या वाट्याला कायमचाच आलेला अर्धवटपणा! अशी एखाद्या चित्रपटाला शोभणारी या कथेची सुरुवात. वैचारिक वाढ एखाद्या ३ वर्षांच्या मुलाएवढी आणि शारीरिक वाढ २५-३० वर्षें असणाऱ्या, सगळ्या गावाला "वेडा विश्या" म्हणून परिचित असणाऱ्या "विश्‍वनाथ" भोवती ही कथा फिरते. स्वतःच्या प्रत्येक गोष्टींसाठी पूर्णपणे आई-वडिलांवर अवलंबून असणारा विश्याचा रोजचा दिनक्रम अगदी ठरलेला, दिवसभर गावात कुठे ना कुठे फिरत राहून काही ना काही उद्योग करायचे आणि संध्याकाळी घरी परत यायचं. "अनामिक" आणि "आर्यवर्मन" यांच्या सुप्त संघर्षात ओढला गेलेल्या विश्याच्या नकळत त्याच्याकडून करवून घेतल्या गेलेल्या अनेक गोष्टी वाचताना वाचक त्या वातावरणात हरवून जातो. एखाद्या चित्रपटाला लाजवेल इतक्या सफाईदारपणे एक-एक प्रसंग वाचकांसमोर येत राहतात. लोकांच्या नजरेपासून दूर, निर्जन ठिकाणी आर्यवर्मनकडून आपल्या कामासाठी विश्याला तयार केले जात होते, पण एक दिवस आशा या गावातीलच मुलीवर ओढवलेल्या प्रसंगानंतर कादंबरीचा प्रवास वेगळ्या मार्गाने चालू होतो आणि तो साहजिकच वाचकाला सोबत घेऊनच! गावातील गुंडांकडून आशावर झालेला अतिप्रसंगाचा प्रयत्न कथेला एक वेगळेच वळण देतो. त्या प्रसंगादरम्यान गुंडांशी दोन हात करताना आशाला दिसलेलं विश्याचं वेगळं रुप तिला आश्चर्यचकित करणारं असतं. एक-दोन शब्दांच्या पलीकडेही न बोलणारा वेडा विश्या इतकी अचाट कामगिरी कशी करू शकतो, याचे तिला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. पुढे या कथेत एन्ट्री होते ती पीएसआय अदवंत यांची. इथून पुढचा घटनाक्रम धारपांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये रंगवलेला आहे. अनेक वर्षांपूर्वी घडून गेलेल्या घटना,  "अनामिक" - "आर्यवर्मन" यांचा संघर्ष आणि वेडा विश्‍वनाथ यांचा काय संबंध असू शकतो? या विचारात वाचकाला गुंतवून कथा पुढे सरकत राहते. अनेक रहस्ये हळूहळू उलगडत जातात. अदवंत, आशा आणि विश्‍वनाथ एका दुष्ट चक्रामध्ये फसल्यानंतर त्यातून सुटण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न रंजक पद्धतीने वाचकांसमोर मांडले आहेत. त्यातून ते बाहेर पडतात का आणि वेड्या विश्वनाथाचे पुढे काय होतं? या प्रश्नांची उत्तरे साहजिकच कथेच्या शेवटी मिळतात आणि "धारप स्टाईल" ने कथेचा शेवट होतो.

भयकथांची आवड असणाऱ्यांनी आवर्जून वाचण्यासारखी कादंबरी "वेडा विश्‍वनाथ".





संदीप प्रकाश जाधव

Monday, May 31, 2021

"माणसं"

 


लेखक : अनिल अवचट

प्रकाशक : मौज प्रकाशन

अनिल अवचट हे सामाजिक क्षेत्रात काम करणारं एक आदरणीय व्यक्तिमत्त्व! डॉक्टर, पत्रकार, लेखक आणि समाजसेवक म्हणून समाजात परिचित असले तरी ते खास ओळखले जातात पुण्यातील येरवडा येथे त्यांनी चालू केलेल्या व्यसनमुक्ती केंद्र, "मुक्तांगण"मुळे. मुक्तांगणमधे येणाऱ्या विविध व्यसनी लोकांवर उपचार करून त्या व्यक्तीला शारीरिक, मानसिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जातो. आपण आपल्या समाजाप्रती काहीतरी देणं लागतो या भावनेतून ते इथे बऱ्याच लोकांना व्यसनापासून परावृत्त करून समाजात ताठ मानेनं उभं करायचं काम करत आहेत. अशा समाजकार्यासोबतच साहित्यक्षेत्रातील त्यांचं योगदानसुद्धा भरपूर मोलाचं आहे. आजपर्यंत त्यांची जवळपास २२पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत आणि समाजातील उपेक्षित लोकांप्रती असणारी त्यांची भावना त्यांच्या प्रत्येक पुस्तकातदेखील उतरली आहे. त्यामुळेच त्यांच्या बऱ्याच पुस्तकांचा विषय हा नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी झालेल्या असहाय्य लोकांना नजरेसमोर ठेऊन मांडला गेला आहे. अशाच पुस्तकांच्या पंक्तीमधील मन सुन्न करणारं, वाचकाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारं, प्रत्येक ठिकाणाहून हाकललं जाणं हेच ज्यांच्या जीवनाचे सूत्र आहे अश्या कष्टकरी, नडलेल्या, आपल्याच समाजातील एका वेगळ्या समाजचं दर्शन घडवून आणणारं एक पुस्तक "माणसं". हमाल, भंगी, वेश्या, ऊसतोड कामगार, धार्मिक भोंदूगिरी करणारे अशा कितीतरी समाजात असून नसलेल्या लोकांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारं हे पुस्तक. अनिल अवचट यांचं "माणसं" हे पुस्तक त्यांनी वेगवेगळ्या लोकांच्या आयुष्यावर लिहिलेल्या पाच लेखांचा संग्रह आहे. जन्माला आल्यामुळे केवळ जगत राहणं आणि जगण्यासाठी म्हणून एखाद्या जनावरापेक्षा जास्त राबत राहणं एवढंच आयुष्य असणाऱ्या समाजातील काही लोकांची ही करुण कहाणी. अंगातील धग जोपर्यंत तेवत राहील तोपर्यंत फक्त मेहनत आणि शेवटी खाटिकखान्यात पोहचलेल्या एखाद्या ढोरासारखं मरण हेच ज्यांच्या पाचवीला पुजले आहे असे काही आपल्याच आजूबाजूला असणारे लोक, मग ते गावाकडे मानाने जगणारे पण दुष्काळग्रस्त झाल्याने देशोधडीला लागणारे लोक असोत की जन्मभर कशाकशाची ओझी वाहत त्या ओझ्यांखाली पिचत रहाणारे हमाल असोत, शहरात उदारनिर्वाहसाठी येऊन नरकावस्थेतील झोपडपट्ट्यांमधे रहाणारे लोक असोत की रस्त्याच्या कडेला मिळेल तो आसरा घेऊन जगायची धडपड करणारे लोक असोत किंवा डोंबारी, कोल्हाटी, मदारी, फासेपारधी अशा अनेक दुर्लक्षित लोकांचं आयुष्य असो. अनिल अवचट यांचं "माणसं" ही अशा सर्वांची कथा आहे. १९८० साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकात अशा समाजाचं जे आयुष्य अवचट यांनी लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे त्याची आजच्या सामाजिक परिस्थितीशी तुलना केली तर म्हणावा तसा फरक या लोकांच्या आयुष्यात नाहीच पडला याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपला या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन! 'हे असेच लोक आहेत आणि हे असंच जगत राहणार' या एकाच नजरेने त्यांच्याकडे पाहिलं गेल्यानं ते नेहमीच मुख्य प्रवाहापासून दूर राहत आले आणि त्यांची एक माणूस म्हणून जगण्यासाठी चालू असणारी धडपड कधी समोर आलीच नाही. परंतु अनिल अवचट यांचं "माणसं" मधे आपला हा दृष्टिकोन बदलण्याची ताकत नक्कीच आहे.

अनिल अवचट यांनी "माणसं" मधून केलेलं आपल्याच आजूबाजूला असून देखील एक समाज म्हणून मुख्य प्रवाहापासून नेहमीच वेगळं आयुष्य जगणाऱ्या अनेक जाती, जमाती आणि लोकांचं दर्शन वाचकाच्या मनाला चटका लावून जाते. "माणसं", "कोण माणसं...कोण जनावरं", "वस्त्या माणसांच्या", "अनिकेत" आणि "अंधेरनगरी निपाणी" या पाच लेखांतून समोर आलेल्या लोकांचं आयुष्य वाचत असताना पानापानावर सतत जाणीव होत राहते की आपण किती नशिबवान आहोत जे आपल्या वाट्याला असं आयुष्य नाही आलं परंतु मनाच्या एका कोपऱ्यात तितकंच वाईटही वाटतं की एखाद्याच्या वाट्याला इतकं हालाखीचं आयुष्य कसं येऊ शकतं? तेही जगताहेत आणि आपणही जगत आहोत पण दोन्ही जगण्यातला विरोधाभास वाचकाच्या मनाला अक्षरशः घरे पाडतो. याचं श्रेय अवचट यांच्या ओघवत्या भाषेलादेखील दिलं पाहिजे कारण त्यांच्या प्रत्येक लेखासोबत वाचक जणू काही वहावत जातो. पुस्तकामधे तंबाखूच्या गोदामात काम करणाऱ्या, मिरचीच्या किंवा सिमेंटच्या गोदामात पोत्यांच्या थप्प्या लावणाऱ्या कामगारांच्या हालअपेष्टांचं जे वर्णन अवचट यांनी केलेलं आहे ते अंगावर शहारे आणणारं आहे.  शिवाय दुष्काळी भागातील आपलं घरदार विकून दोनवेळच्या पोटाचा प्रश्न मिटावा म्हणून बायकामुलांसह शहराकडे आलेल्या शेतकऱ्यांचे हाल वाचकाच्या डोळ्यात अश्रू घेऊन येतात. गावकडचं घरदार विकून आल्यामुळे परतही जाता येत नाही आणि शहरी वातावरणाशी जुळवूनही घेता येत नाही अशा कात्रीत सापडलेल्या व्यक्तीच्या वाट्याला येणाऱ्या आयुष्याची फक्त कल्पनाच केलेली बरी. भंग्यांच्या आयुष्यावर त्यांनी टाकलेला प्रकाश वाचताना अंगावर काटा येतो. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे पुस्तकातील प्रत्येक समाजातील लोकांमध्ये प्रत्यक्ष मिसळून त्यांचं आयुष्य जवळून पाहिल्यानंतर अवचट यांनी त्याला पुस्तकबद्ध केलेलं आहे त्यामुळे या "माणसांच्या" आयुष्याची दाहकता अजूनच जाणवत राहते.

समाजातील दुर्लक्षित अशा लोकांप्रती असणारे आपले विचार बदलवणारे आणि प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं पुस्तक "माणसं".





संदीप प्रकाश जाधव

Monday, May 24, 2021

"एक होता कार्व्हर"

 



लेखिका : वीणा गवाणकर

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

बऱ्याच दिवसांपूर्वी वाचायचं म्हणून संग्रही घेतलेलं पण इतर पुस्तकांच्या गर्दीत हरवलेलं हे पुस्तक काही दिवसांपूर्वी हाती लागलं. तरीही वाचण्याचा मोह मुद्दामहून आवरता घेतला आणि परत ठेऊन दिलं माझ्या ५०व्या पुस्तक परिचयासाठी, जेणेकरून पुस्तक वाचन आणि परिचय दोन्हीही खास व्हावं. पण वाचून झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे चार ओळींत परिचय देण्यासारखं हे पुस्तक नक्कीच नाही. हे पुस्तक म्हणजे कथा आहे शतकाचा महानायक ठरवता येईल अशा एका व्यक्तिमत्वाची, उभं आयुष्य आपल्या ध्येयासाठी वाहून घेणाऱ्या एका कर्मयोग्याची, अमेरिकेच्या निर्जिव दक्षिण प्रदेशाला अमरत्व देणाऱ्या एका महामानवाची, एका अमेरिकन कृषी तज्ज्ञाची, तपस्वी मुक्तात्म्याची आणि ज्ञानयोग्याची अर्थातच 'डॉक्टर जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर' यांची. अमेरिकेतील निग्रो जमातीत जन्मलेला, वर्णभेदाच्या आणि गुलामगिरीच्या अंधारात पोरकेपणा वाट्याला आलेला हा एक दमेकरी, आजारी आणि कृश मुलगा. अमेरिकेत वर्णभेद जेव्हा अगदी टिपेला होता त्या काळात "निग्रो" म्हणून जन्माला आलेलं, अवघं २ महिन्यांचं असताना ज्याच्या आईला गुलाम म्हणून विकण्यासाठी पळवून नेलं गेलं, पोरकेपणा वाट्याला आल्यानंतर आज मरेल की उद्या अशा अवस्थेत ज्याची आयुष्यासोबत लढाई चालू होती ते मूल पुढे जाऊन एक महान शास्त्रज्ञ होईल असं कोणी जर बोललं असतं तर नक्कीच त्याची गणना तेव्हा मूर्खात केली गेली असती. परंतु आपल्या अपार कष्टाच्या जोरावर, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कार्व्हर यांनी मिळवलेलं यश किती अफाट होतं याची प्रचिती या पुस्तकातून येते. ज्ञानलालसेपोटी अधांतरी फिरून, पडेल ती कामे करून, ज्ञानार्जन करून आयुष्य संपेपर्यंत निष्णात कर्मयोग्याप्रमाणे समाजासाठी झटलेल्या, बंधन नको म्हणून आजन्म अविवाहित राहिलेल्या, समाजसेवेसाठी जीवन वाहिलेल्या डॉक्टर कार्व्हर यांची महानता "एक होता कार्व्हर" च्या माध्यमातून वीणा गवाणकर यांनी आपल्यासमोर मांडली आहे. कार्व्हर यांनी लावलेले फक्त शोधच नाहीत तर प्रतिकूल परिस्तिथीवर मात करून जगण्याची कला आणि अपल्या ज्ञानाचा समाजाच्या भल्यासाठी त्यांनी केलेला वापर याचे सार्थ दर्शन या पुस्तकामधून होते. अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ जॉर्ज वाँश्गिंटन कार्व्हर यांच्या संघर्षमय, प्रेरणादायी जीवनाची गाथा आणि त्यांचा खडतर जीवनप्रवास वीणा गवाणकर यांनी रेखाटला आहे त्यांच्या या १८० पानी पुस्तकात "एक होता कार्व्हर" मधे. हृदय पिळवटून टाकणारा आयुष्याचा प्रवास आणि खडतर गुलामाचे आयुष्य जगूनसुद्धा फक्त आपली मायभूमी आणि स्वतःच्या समाजासाठी झटणाऱ्या एका निस्वार्थी, महान, असामान्य व्यक्तीची ही कहाणी "एक होता कार्व्हर".

अमेरिकेतील मिसोरी प्रांतातील डायमंड ग्रोव्ह पाड्यावर मोझेस कार्व्हर या दांपत्याकडे काम करणारी मेरी ही गुलाम निग्रो स्री अमेरिकेत गुलामांना पळवून विकण्याचा धंदा तेजीत असताना एका टोळीकडून आपल्या २ महिन्यांच्या मुलासोबतच पळवून नेली जाते. पुढे एका उमद्या घोड्याच्या मोबदल्यात मेरीचा दोन महिन्याचा मरणोन्मुख, दमेकरी, दुबळा मुलगा मोझेस दांपत्याला परत मिळाला आणि इथूनच सुरू झाली या महानायकाच्या संघर्षाची. एकाकी आणि अबोल राहणाऱ्या कार्व्हरचं बालपण कामाच्या रगाडयात हरवुन गेलं, सोबत कोणीच नसल्याने संपूर्ण स्वावलंबन अंगी रुजलं, कितीही तडाखे बसले तरी कोणाच्या मदतीशिवाय आपण ताठ उभे राहू शकतो याची जाणीव त्यांना बालपणातच झाली. उन्हाळ्याच्या सुट्टीत मजुरी, स्वयंपाकी, लाकडं फोडणं, लोहाराच्या हाताखाली राबायला जाणं अशी हरप्रकारची कामं करत कार्व्हर शिकत राहिले. पक्ष्यांची पिल्लं, डबक्यातील छोटे मासे, रानावनातील झाडेझुडपे हेच त्यांचे मित्र बनले. दिवसभर शाळा आणि त्यानंतर पोटाचा प्रश्न मिटवण्यासाठी मिळतील ती कामं ते करायचं. त्यांचं  शिक्षण हे असंच चाललं होतं, जिथून आणि जसं मिळेल तसं! पुढे अधिकाधिक वाढत जाणाऱ्या ज्ञानलालसेमुळे पडतील ते कष्ट उपसून ते शिकत राहिले. कामधंदा करून पैसे मिळवायचे, मग शाळेत नाव घालायचं. शिकत असताना पैसे संपले की शाळा सोडायची. परत काम करायचं. 'आपण इतकं शिकावं, इतकं शिकावं की एक दिवस कुठल्याच शिक्षकाने शिकवावं असं ज्ञान उरणार नाही आणि मग या सृष्टीचा विधाता त्याचं रहस्य आपल्यापुढे उलगडून ठेवेल.' असं स्वप्न उराशी बाळगणारा कार्व्हर वयाच्या केवळ दहाव्या वर्षी  शिक्षणासाठी आपलं गाव ‘डायमंड ग्रोव्ह’, आपले मालक ‘मोझेस आणि सूझन कार्व्हर’ या सगळ्यांना सोडून एकटाच नीओशे गावात गेला. निओशे येथे प्राथमिक शिक्षण घेत असताना दिवसभर शाळा आणि त्यानंतर पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी मरमर काबाडकष्ट करून रात्री झोपायला जुना पडका गोठा अशी कार्व्हरची अवस्था होती. लहानपणापासूनच कोणतीही गोष्ट कलाकाराच्या वृत्तीने शिकणारे जॉर्ज एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून घडू लागले. आभाळाएवढं दारिद्र्य आणि नशिबी आलेला अनाथपणा या अवस्थेत जॉर्ज यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. कृष्णवर्णीय असल्याने पात्रता असूनदेखील हायलड युनिव्हर्सिटीने जेव्हा कॉलेज प्रवेश नाकारला गेला तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला. तरीही त्यांची शिकण्याची इच्छा काही कमी नाही झाली. निग्रो लोकांसाठी खास असणाऱ्या सिंपसन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि माणुस म्हणून जगणं ही काय चीज असते याचा पहिला निखळ अनुभव त्यांना इथे मिळाला. १८६५ साली कृष्णवर्णीयांच्या स्वातंत्र्याला अधिकृत मान्यता मिळूनही निग्रो समाज हिंसाचार आणि जाळपोळ यांमध्ये होरपळून निघत होता. अमेरिकेतील वर्णद्वेषाची यादवी कायद्याने नष्ट करण्यात आली होती, परंतु सामान्य लोकांच्या मनातील गुलामगिरीची धग कायम होती. एका कृष्णवर्णीय कैद्याला जिवंत जाळण्याचा प्रकार बघितल्यानंतर जॉर्ज मुळापासून हादरले, काळ्या कातडीचा अर्थ तेव्हा त्यांना पूर्णपणे समजला. अशा अतिशय प्रतिकूल परिस्तिथीवर मात करून कार्व्हर यांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. १८९४ साली विज्ञान शाखेची पदवी मिळवल्यावर त्याच कॉलेजमध्ये कार्व्हर यांची प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. पुढे १८९६ साली त्यांनी Agricultural and Bacterial Botany या विषयाची उच्च पदवी, MS संपादन केली.

कार्व्हर यांनी केलेल्या कष्टाला खरी झळाळी मिळाली ती त्यांचे 'बुकर टी वाँशिग्टन' यांच्याशी जोडले गेल्यानंतर. मानवाला सुजाण बनवणारा शिक्षणतज्ज्ञ म्हणुन अलाबामा टस्कगी शाळेचे बुकर टी वाँशिग्टन यांची ख्याती झाली होती. बुकर टी वाँशिग्टन यांनी जॉर्ज कार्व्हर यांना शतकानुशतके दारिद्रयाने गांजलेल्या, गुलामीच्या चिखलात रुतलेल्या त्यांच्या समाजबांधवांना उद्धारुन त्यांना सुजाण बनवण्याच्या कामात मदतीचे आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कार्व्हर दक्षिण अमेरिकेत, अलाबामात पाऊल ठेवले आणि सुरुवात झाली जगाला स्तिमित करणाऱ्या एकाहून एक संशोधन मालिकांची! आपल्या शिक्षणाचा आपल्या बांधवांना उपयोग झाला पाहिजे अशी भावना असणाऱ्या कार्व्हर यांनी आपल्या आयुष्याची पुढची जवळपास ४० हून अधिक वर्षें अलाबामा येथे काढली. अलाबामा टस्कगी शिक्षणसंस्थेच्या शेतकरी विभागाचे पहिले डायरेक्टर म्हणून कार्व्हर यांची नेमणुक झाल्यानंतर त्यांचा पगार होता वार्षिक १५०० डॉलर्स. या संस्थेत डॉ. कार्व्हर शेतीतज्ञ म्हणून दाखल झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या अचाट कामगिरीने आपल्या बांधवांच्या अनेक समस्यांचे निराकरण केले. शेतकऱ्यांचे समृध्द जीवनच राष्ट्राचा विकास घडवते हा एकच मंत्र मनात ठेवून डॉ. कार्व्हर यांनी समाजाच्या तळागाळातील घटकांच्या गरजा ओळखून आपल्या संशोधनाला दिशा दिली. कार्व्हर यांनी आपल्या अपार मेहनत आणि चिकाटीने दक्षीण अमेरिकेला स्वयंपूर्ण बनवण्याच्या दृष्टीने लोकांच्या आयुष्यवार दूरगामी परिणाम करणारे संशोधन केलं. कार्व्हर यांच्या बुद्धीचातुर्याने आणि संशोधनाने सारं जग स्तिमित झालं. डॉक्टर कार्व्हर यांनी अमेरिकन निग्रो आणि गो-या या दोन्ही समाजासाठी केलेलं कार्य अजरामर आहे. वर्णभेदाच्या भिंती ओलांडून कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या अष्टपैलू बुद्धीचातुर्याने संगीत, कला, फुल-फळझाडे, विविध शेतपीके, वैद्यकशास्त्र यामध्ये त्यांनी केलेलं संशोधन आज इतक्या वर्षांनंतरदेखील अमेरिकेसाठी एक संजीवनी आहे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या ज्ञानाचा उपयोग गरजू लोकांसाठी करणाऱ्या कार्व्हर यांनी अलाबामामधे आपला अखेरचा श्वास घेतला. कार्व्हर यांच्याबद्दल जितकं लिहावं तितकं कमीच आहे परंतु वीणा गवाणकर यांनी थोडक्यात पण अतिशय उत्कृष्टपणे कार्व्हर यांचं चरित्र ज्या पद्धतीने "एक होता कार्व्हर" मधून लोकांपर्यंत पोहोचवलं आहे ते नक्कीच प्रत्येकाला प्रेरणादायी आहे.

संग्रही ठेवून प्रत्येकाने अगदी आवर्जून वाचावं असं पुस्तक "एक होता कार्व्हर".




संदीप प्रकाश जाधव




Monday, May 17, 2021

"उत्तरकांड"

 


लेखक : डॉ. एस. एल. भैरप्पा

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

मराठी अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी


एस. एल. भैरप्पा यांचं प्रत्येक साहित्य वाचकाच्या मन आणि मेंदूचा ताबा घेणारं असतं, वाचत असताना वाचक एका वेगळ्याच विचारचक्रात हरवून जातो आणि याचाच प्रत्यय मला पुन्हा एकदा आला त्यांची रामायणावर आधारित कादंबरी "उत्तरकांड" वाचत असताना! "साक्षी" आणि "आवरण" या कादंबऱ्या वाचल्यानंतर "उत्तरकांड" ही त्यांची तिसरी कादंबरी आज वाचून पूर्ण झाली. प्रत्येक कादंबरीचा विषय जरी वेगळा असला तरी भैरप्पांच्या साहित्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं साहित्य हे मानसिक पातळीवर वाचून संपत नाही असं वाटतं कारण पुस्तक वाचून झाल्यानंतर त्याचा विचार बराच वेळ आपल्या डोक्यात घोळतच राहतो. "उत्तरकांड" ही रामायणावर आधारित कादंबरी रामाने सीतेचा त्याग केल्यानंतर वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात राहत असताना सीतेच्या निवेदनातून उलगडत जाते. रामायणात घडलेल्या घटनांसोबत बरेच चांगले-वाईट प्रसंग सीतेच्या दृष्टिकोनातून उलगडत असताना सीतेचा वर्तमानकाळ आणि भूतकाळ यामधे वाचकाला गुंतवून ठेवत ही कादंबरी पुढे सरकत राहते. रामाची पत्नी म्हणून सीतेच्या वाट्याला जे भोग आले, त्याचं मनोविश्लेषणात्मक चित्रण भैरप्पांनी या कादंबरीत केलेलं आहे. राम, सीता आणि लक्ष्मणाबरोबरच रामायणातील इतरही पात्रांचे जे वर्णन भैरप्पा यांनी केलं आहे ते वाचत असताना आजपर्यंत ज्या पारंपारिक चौकटींमध्ये आपण या पात्रांना पाहत आलो आहोत त्या सर्व भेदून ही पात्रे आपल्यासमोर उभी राहतात. शिवाय रामायणात घडलेल्या सर्वच घटना कोणताही दैवी मुलामा न देता वर्णन केल्याने आणि प्रत्येक व्यक्तिरेखेला मानवी पातळीवर आणून मांडल्यामुळे सीतेच्या वाट्याला आलेलं आयुष्य म्हणजे आजच्या समाजात, आपल्या आसपास घडत असणारी एखादी कथाच असल्याचा भास वाचकाला होत राहतो आणि त्यामुळेच सीतेच्या निवेदनातून पुढे सरकत असताना कादंबरीत एकप्रकारचं नाट्य निर्माण झालं आहे जे रामायणाचा एक नवा अर्थ आपल्यासमोर घेऊन येते. 'पतिव्रता', 'सोशिकतेचं एक मूर्तिमंत उदाहरण' फक्त याच नजरेतून आजपर्यंत सीतेकडे पाहिलं गेलं आणि पुढच्या पिढीतील स्त्रियांसाठी एक आदर्श म्हणून समाजापुढे त्याचं इतकं उदात्तीकरण केलं गेलं की सीतेवर एक स्त्री म्हणून झालेला अन्याय आपसूकच झाकला गेला, तिचा आवाज दबला गेला. एस. एल. भैरप्पांनी सीतेवर झालेल्या याच अन्यायाला वाचा फोडण्याचा, सीतेला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या या "उत्तरकांड" कादंबरीमधून केला आहे. सीतेला एका वेगळ्याच रुपात भैरप्पांनी या कादंबरीतून आपल्यासमोर आणलं आहे ज्यामुळे सीता जणूकाही आजच्या काळातली एखादी स्त्रीवादी व्यक्तिरेखाच वाटत राहते. "उत्तरकांड" या कादंबरीमधे भैरप्पांनी सीतेच्या माध्यमातून स्त्रीची एक तेजस्वी बाजू आपल्यासमोर आणली आहे. रावणाकडून सुटका केल्यानंतर रामाने सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली परंतु सीता जशी रामापासून दूर होती तसाच रामही सीतेपासून दूर होता, मग जो न्याय सीतेला तोच रामाला का नाही? असा सवाल दबक्या आवाजात अनेकदा केला जातो पण सीता ही एक "स्त्री" असल्या कारणाने रामाने जे केलं ते कसं योग्य होतं असंच आजपर्यंत सांगितलं गेलं. भैरप्पांचं "उत्तरकांड" याला अपवाद आहे, भैरप्पांच्या "उत्तरकांड" मधील सीता नेमका असाच सवाल रामाला भर धर्मसभेत करते - ‘रामा माझ्या शीलाबद्दल तुला शंका आहे, पण तुझ्या स्वतःच्या शीलाचं काय?’ आणि राम निरुत्तर राहतो. भैरप्पांनी सीतेच्या माध्यमातून विचारलेला हा प्रश्न म्हणजे एका अर्थाने रामसारखंच दुटप्पीपणे वागणाऱ्या आजच्या समाजपुरुषाला दाखवलेला आरसा आहे. त्यामुळेच पौराणिक पार्श्वभूमी असली तरी आजच्या वास्तविक जगाला अगदी तंतोतंत लागू होणारी भैरप्पांची ही ३०४ पानी कादंबरी "उत्तरकांड" वाचकाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावते.

रामायण असो वा महाभारत ही महाकाव्ये आहेत की खरंच आपला इतिहास हा नेहमीच एक वादाचा विषय राहिला आहे. परंतु जर या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर एक गोष्ट नक्की की या दोन्हींमधील घटनांचा भारतीय जनमानसावर भरपूर प्रभाव आहे. रामायणातील जवळपास सर्वच घटना लोकांच्या मनामध्ये खूप खोलवर रुजल्या आहेत, सीतेइतकी लोकप्रिय आणि जनमानसात रुजलेली पौराणिक व्यक्तिरेखा तर दुसरी कोणतीच सापडणार नाही. त्यामुळेच रामायणातील सीता या उत्तुंग पात्राभोवती गुंफलेले हे "उत्तरकांड" वाचकाला कमालीचे घेरून टाकते. सीता स्वयंवर, रामाचा वनवास आणि त्याची पार्श्वभूमी, शूर्पणखा प्रकरण, सीताहरण, सुग्रीवाला वालीविरुद्ध रामाने केलेली मदत, हनुमान भेट, समुद्रापार जाऊन रामाने लंकेवर केलेली स्वारी, रावणाचा वध करून केलेली सीतेची सुटका, विजयी होऊन अयोध्येत परत आल्यानंतर लोकाभिचाराला सामोरं जाऊन रामाने केलेला सीतात्याग, त्यानंतर सीतेच्या मनातील विचारांचे काहूर आणि त्यावर तिने केलेली मात, जनकाने भूमीतून सापडलेल्या एका कन्येचा केलेला सांभाळ, त्या भूमीबद्दल सीतेची असणारी ओढ आणि त्या ओढीमुळेच रामाने त्यागल्यानंतर कृषक म्हणून केलेली शेतीची कामे, सीतेने महर्षी वाल्मीकींच्या आश्रमात व्यतीत केलेला काळ, आपली सखी सुकेशीच्या मदतीने लव-कुश यांचं केलेलं संगोपन, लव-कुश यांनी पकडलेला अश्वमेध यज्ञाचा घोडा सोडून न देता वाल्मिकी ऋषींनी केलेल्या मध्यस्थीतून अयोध्येत भरवली गेलेली धर्मसभा आणि त्यात सीतेने बजावलेली स्त्रीच्या हक्कासाठीची भूमिका. अशा अगदी तोंडपाठ असणाऱ्या रामायणातील घटना भैरप्पांनी ज्या पद्धतीने त्यांच्या "उत्तरकांड" मधून आपल्यासमोर आणल्या आहेत त्यातून सीतेच्या पारंपरिक रुपाला छेद देणारी एक वेगळीच प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते.

संग्रही ठेऊन आवर्जून वाचण्यासारखी कादंबरी.





संदीप प्रकाश जाधव


Monday, May 10, 2021

"तांडव"

 



लेखक : महाबळेश्वर सैल

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

महाबळेश्वर सैल यांच्या "तांडव" या कादंबरीबद्दल बऱ्याच लोकांकडून ऐकून होतो. "धर्म" या संकल्पनेवर लिहिलेली एक रोखठोक आणि तटस्थपणे वाचकांपर्यंत पोहोचवली गेलेली ही ऐतिहासिक घटनेवर आधारीत कादंबरी बऱ्याच जणांनी आवर्जून वाचण्यासाठी सुचवली होती. जितकं काही ऐकलं होतं त्या सर्व गोष्टींवर अगदी पुरेपूर उतरणारी अशी ही कादंबरी "तांडव". धर्मांतरावर आधारीत या कादंबरीचे मुखपृष्ठच इतकं जबरदस्त आणि बोलकं आहे की त्यावरूनच कादंबरीतील "पसाऱ्याचा" अंदाज यावा. ५ शतकांपूर्वी सातासमुद्रापारहून येऊन पोर्तुगीजांनी आदिलशाहीकडून गोवा जिंकून घेतले. परंतु गोवा जिंकल्यानंतर फक्त त्या प्रदेशावर आपली सत्ता स्थापन करून ते थांबले नाहीत तर जो राजाचा धर्म तोच प्रजेचादेखील असला पाहिजे अशा धर्मवेडानं पछाडलेल्या पोर्तुगीजांनी गोव्यातील प्रजेचं जबरदस्तीने धर्मांतर करण्यासाठी आणि त्यांना ख्रिश्चन धर्मात आणण्यासाठी त्यांच्यावर पाशवी अत्याचार चालू केले, त्यांचा अतोनात छळ चालू केला या अत्याचारांचंच रौद्र रूप म्हणजे महाबळेश्वर सैल यांनी लिहिलेली ही कादंबरी "तांडव". पूर्वापारपासून चालत आलेल्या आपल्या रूढी-परंपरांना जपत, वेगवेगळ्या जाती-धर्माच्या चौकटीत स्वतःला बांधून घेऊन आपलं आयुष्य जगणाऱ्या लोकांवर सातासमुद्रापारहून आलेला पोर्तुगीज आणि त्यांचा ख्रिस्ती धर्म अचानकच चक्रीवादळासारखा येऊन धडकल्यानंतर गोव्याच्या धरतीवर धर्मांतराचा जो "तांडव" सुरू झाला त्याचीच ही कहाणी. धर्मांतराची जबरदस्ती, धार्मिक अत्याचारातून विस्कळीत झालेली सामाजिक घडी, देवा-धर्माला डोक्यावर घेऊन, जीवावर उदार होऊन अनेकांनी केलेली पलायनं आणि या साऱ्या घडामोडींमध्ये देशोधडीला लागलेली अनेक कुटुंबं यांचं अतिशय विदारक चित्रण महाबळेश्वर सैल यांनी "तांडव" मध्ये केलेलं पहायला मिळेल. धर्माच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांना वेठीस धरत असताना त्या धर्मातून येणारी क्रूरता कादंबरीतून लोकांपर्यंत पोहचवण्याचा यशस्वी प्रयत्न लेखकांनी केला आहे. अत्याचारातून झालेलं धर्मांतर आणि आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्मात गेल्यानंतर त्या लोकांची होणारी घालमेल वाचकालासुद्धा अस्वस्थ करून जाते. ५ शतकांपूर्वी घडलेल्या या ऐतिहासिक घटनेला कादंबरी स्वरूपात लोकांसमोर आणत असताना महाबळेश्वर सैल यांनी कल्पनेची जी जोड त्या घटनांना दिलेली आहे त्यामुळे त्या धर्मांतराची दाहकता जाणवत राहते जी पुढे वाचकाच्या मनामध्ये देखील विचारांचा "तांडव" चालू करते. "धर्म" या अतिशय संवेदनशील संकल्पनेवर बेतलेली, ऐतिहासिक सत्यावर आधारीत ही कादंबरी महाबळेश्वर सैल यांनी जितक्या तटस्थपणे लिहिली आहे तितक्याच तटस्थपणे एक वाचक म्हणून ती वाचनंदेखील आवश्यक आहे. ३६३ पानांच्या या कादंबरीतून गोवा आणि आसपासच्या परिसरातील गावांमध्ये ५ शतकांपूर्वी धर्मांतराच्या नावाखाली झालेल्या स्थित्यंतराचा अचूक धागा पकडून महाबळेश्वर सैल यांनी उभा केलेला हा "तांडव".

आज गोवा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो गोव्याचा स्वच्छ समुद्र, गोव्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे, ओसंडून वाहणारे मद्याचे प्याले, असंख्य चर्च आणि बऱ्याच "फिरंगी" गोष्टी. पण खरंच पूर्वीचं गोवा असं होतं का? तर नाही! पोर्तुगीजांनी आक्रमण करण्यापूर्वीचं गोव्याचं एक अतिशय वेगळं दर्शन आपल्याला "तांडव" मधून वाचायला मिळेल. पश्चिम घाटाच्या कुशीत, गर्द जंगलात वसलेल्या छोट्या छोट्या वाड्या - गावं यांनी सजलेलं गोवा! याच गोव्यातील आदोळशी या गावात घडणारी या कादंबरीची कथा ५ शतकापूर्वीच्या संपूर्ण गोव्याची एक सामाजिक आणि मानसिक अवस्था आपल्यासमोर उभी करते. आदोळशी गावाची ही कथा प्रातिनिधिक स्वरूपात आपल्यासमोर मांडत असताना लेखकांनी संपूर्ण गोव्याची त्याकाळातील अवस्था सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आदोळशी गावावर धाड टाकल्यानंतर सातासमुद्रापलीकडून आलेल्या या "सुसंस्कृत" ख्रिस्तांनी धर्मांतराचा जो "तांडव" चालू केला त्यामध्ये आदोळशी सारखी अशी असंख्य गावं होरपळून निघाली, गावंच्या गावं ख्रिश्चन झाली आणि सोबतच संपूर्ण गोवा! लोकांच्या अंगणातील तुळस, बायकांच्या गळ्यातील मंगळसूत्र, घरांचे कळस जाऊन त्या जागी क्रॉस आले तरीही हा जबरदस्तीचा क्रॉस घेऊन आणि अत्याचार सहन करूनदेखील असंख्य घरातील हळदी-कुंकू जपले जात होते. स्वधर्म टिकवला जात होता. धर्मांतराच्या तडाख्यातून वाचण्यासाठी जीवावर उदार होऊन असंख्य पलायने केली जात होती. जीवनाचा सर्व हवाला देवावर टाकलेला, जगण्यासाठी शेती हा एकमेव आधार असणारा आदोळशी गावातील समाजात आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी फक्त देवाच्याच हातात असतात आणि देऊळ पाडणाऱ्यालाही देवच शिक्षा करील ही भावना इतकी खोलवर रुजली होती की त्यांना पोर्तुगीजांच्या अन्याया विरोधात पेटून उठण्याची, विद्रोह करण्याची बुद्धीच कधी सुचली नाही. त्या काळच्या गरीब समाजाचं, देवावर सारी भिस्त ठेवून जगणाऱ्या गरीब लोकांचं चित्रण कादंबरीत वाचत असताना वाईट तर वाटतंच पण अशा देवा-धर्माच्या खुळचट समजुतींना कवटाळून घेऊन स्वतःहून या धर्मांतराला पायघड्या अंथरणाऱ्या लोकांची चीडपण येते. हिंदू धर्मातल्या लोकांना बाटवणं हे नको इतकं सोपं आहे, केवळ घरात पाणी शिंपडून किंवा परधर्माच्या माणसानं प्रवेश केल्यानं त्या घराचा वा कुटुंबाचा धर्म बदलतो अशी समजूत असणाऱ्या लोकांना पोर्तुगीजांनी अगदी चतुराईने धर्मांतरास भाग पाडले. साम, दाम, दंड या सर्व मार्गांनी लोकांचे धर्मांतर चालू असताना देवच आपल्याला यातून वाचवू शकेल या भोळ्या विश्वासानेच त्यांचा घात केला आणि बरीच कुटुंबं रस्त्यावर आली. शेतजमिनीच्या बदल्यात, चाकरीच्या बदल्यात, स्वतःचं मुल परत हवं असेल, शील वाचवायचं असेल तर ख्रिश्चन धर्म स्वीकारा आणि नाही स्वीकारला तर घरं जाळण्यात येतील, तलवारीच्या जोरावर तुम्हाला तो स्वीकारणं भाग पाडू म्हणणाऱ्या मूठभर पोर्तुगीजांच्या अत्याचाराविरोधात संघर्ष करायच्या ऐवजी गावकरी गाव सोडून दिगंतराला जाऊ लागले. त्यांच्या याच असहाय्यतेचा फायदा घेऊन, घरं जाळून, संसार उद्ध्वस्त करून असंख्य कुटुंबांना जबरदस्तीने बाप्तिस्मा देऊन ख्रिश्चन करण्यात आलं. त्या काळातील हे "तांडव" वाचत असताना वाचक गलबलून जातो. गावकऱ्यांना ख्रिश्चन झाल्याशिवाय जगणंही मुश्कील व्हावं इतका टोकाचा अत्याचार! यासर्वांपासून सुटका करून घेण्याचे तीनच उपाय एक तर हिंदू धर्म सोडणे, गाव सोडणे किंवा जगणं सोडणे! जे लोक धर्म सोडत होते त्यांचीही तशी सुटका होतच नव्हती कारण ख्रिश्चन झाल्यानंतर चुकून जरी हिंदू धर्मातील एखादी परंपरा पाळली गेली किंवा नव्या धर्माचा अपमान झाला तर इनिक्विझिशनच्या क्रूर शिक्षांना सामोरं जावं लागणार, म्हणजे इथेही पुन्हा मरणच! अशा विदारक परिस्थितीचे कादंबरीतील वर्णन अंगावर काटा आणते.

धर्मसंकटात सापडलेल्या माणसाच्या आयुष्यात घडणारे विविध प्रसंग कादंबरीत आपल्याला वाचायला मिळतील. धाकातून, निराशेतून, स्वार्थातून, दुःखातून, अविचारातून, चिंतेतून, नाईलाजातून, द्वेषातून परधर्म स्वीकारणाऱ्या माणसांचं दर्शन आपल्याला कादंबरीत पानापानावर होत राहते. धर्मांतर करून दुसऱ्या धर्मात जाऊनही आपल्या मनाची तगमग शांत न झालेले, अस्वस्थ लोकसुद्धा आपल्याला कादंबरीत वाचायला मिळतील आणि आपण आपल्या जुन्या धर्मातलं काय गमावलं आणि नव्या धर्मातलं काय कमावलं याचा हिशोब कधीच न लागलेले संभ्रमी लोकही इथे आपल्याला दिसतील. किमान देवाला तरी या दुष्टचक्रातून बाहेर काढूत असं म्हणून देवासह परागंदा झालेली माणसं दिसतील. आपण ख्रिश्चन झाल्यावर एका क्षणात दुरावलेली आपली जुनी माणसं आणि ती दुरावलेली माणसं पुढे स्वतःच ख्रिश्चन झाल्याने पुन्हा जवळ आल्याचे चमत्कारिक प्रसंगही वाचायला मिळतील. श्रद्धेने धर्मपालन करणाऱ्या लोकांवर एका लादल्या गेलेल्या धर्मामुळे जी जी म्हणून उलथापालथ होऊ शकते ती ती सगळी आपल्याला या कादंबरीत वाचायला मिळेल. हे सर्व मांडत असताना हिंदू धर्मातील काही गोष्टी या धर्मांतरास कसे हातभार लावत होत्या याचंही तितकंच तटस्थ वर्णन कादंबरीत लेखकांनी केलेलं आहे. देव, धर्मावर नितांत श्रद्धा असणाऱ्या गावकऱ्यांच्या मनात ठाण मांडून बसलेल्या खुळचट धारणा जसे की 'ख्रिश्चनांच्या नुसत्या स्पर्शाने आणि त्यांचं उष्टं खाल्ल्याने आपण बाटले जातो!' ही एक अशी मूर्ख समजूत ज्यामुळे आपल्या कितीतरी आप्तेष्टांना आपण आपल्यापासून तोडून टाकलं आणि स्वतःहूनच धर्मांतर करायला भाग पाडलं याचा हिशोबच लागत नाही. शिवाय जातिश्रेष्ठत्वाच्या अहंकारातून समाजातल्या अनेक घटकांना कसं दूर लोटलं याबद्दलही परखड भाष्य कादंबरीत आपल्याला वाचायला मिळेल. 

महाबळेश्वर सैल यांनी साकारलेला धर्मांतराचा हा "तांडव" कोणत्याही धर्माविषयी पूर्वग्रह मनात न ठेवता वाचला तर नक्कीच एक दर्जेदार साहित्य वाचल्याचं समाधान देऊन जातो. आवर्जून वाचण्यासारखी कादंबरी "तांडव".




संदीप प्रकाश जाधव

Monday, May 3, 2021

"परत्या"

 



लेखक : उत्तम कांबळे

प्रकाशक : मनोविकास प्रकाशन

उत्तम कांबळे यांच्या "काळजात धावतोय ससा" नंतर त्यांचं  "परत्या" हे दुसरं पुस्तक आज वाचनात आलं. दोन्ही पुस्तके वाचताना मनाला भावणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या लिखाणातील साधेपणा. अगदी सहज सुंदर भाषेत आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमधूनच साकारलेली त्यांची पुस्तके म्हणूनच मनाला भुरळ घालतात. "काळजात धावतोय ससा" हा कथासंग्रह त्यांना त्यांच्या आयुष्याच्या प्रवासात भेटलेल्या विविध लोकांना आलेल्या अनुभवांच्या कथांनी सजला आहे ज्यामध्ये उत्तम कांबळे यांनी आधुनिक जगातल्या माणसाच्या जगण्यातला विरोधाभास, अपरिहार्य दु:खाची धग व आगतिकता अतिशय संवेदनशीलतेने व्यक्त केली आहे जी वाचकाला अंतर्मुख होण्यास भाग पाडते. त्यांच्या संवेदनशील मनाचा प्रत्यय देणारा, ज्वलंत अशा सामाजिक विषयांना हात घालत असताना सोबतच वाचकालासुद्धा अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा आणि काही काही पानांवर मन सुन्न करणाऱ्या घटनांनी साकारलेला आणखी एक कथा संग्रह "परत्या". ११९ पानांच्या या छोट्याशाच कथासंग्रहातील एकूण ९ कथा या मुख्यतः दलित आणि अतिशय दारिद्र्यात राहणाऱ्या लोकांभोवती फिरणाऱ्या आहेत. प्रत्येक कथेचा  आशय जरी वेगळा असला तरी त्यातून दिला जाणारा संदेश एक समाज म्हणून आपण कुठे आहोत आणि कुठे असलं पाहिजे याचा विचार करायला लावतो. साध्याच गोष्टी ज्या आपण आपल्या आसपास वेगळ्या पद्धतीने अनुभवल्या देखील असतील पण उत्तम कांबळेंच्या लिखाणाची शैलीच अशी आहे की या कथा वाचत असताना डोळ्यासमोर त्या घटना उभ्या राहतात ज्या वाचकाच्या डोळ्यांच्या कडा नकळत ओल्या करून जातात. माणूस म्हणून आपण कितीही प्रगती केलेली असली तरी आजही लहान लहान खेड्यांमध्ये जातिव्यवस्थेच्या नावाखाली घडणाऱ्या काही काही घटना एक समाज म्हणून आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा बाकी आहे हेच सांगून जातात. याचंच एक प्रातिनिधिक चित्र आपल्याला उत्तम कांबळेंच्या "परत्या" मधील काही कथांमध्ये वाचायला मिळेल. "नवं स्मशान", "जातीचा मुका मार", "किरळ", "संस्कार", "टेडी बेअरचे डोळे", "जखमा", "अपराधीपणा", "एका मड्याची भटकंती" आणि "परत्या" या ९ कथांमधून उत्तम कांबळेंच्या लिखाणाचे वेगळेपण जाणवत राहते. 

पहिली कथा "नवं स्मशान" फिरते एका अतिशय गरीब, दलित कुटुंबातील १५ वर्षीय मुलाच्या मृत्यूभोवती. विटांनी भरलेल्या ट्रॉलीखाली चिरडून झालेल्या अपघातानंतर सिद्धार्थ या अतिशय होतकरू तरुणाचा झालेला मृत्यू आणि त्यानंतर फक्त पंचनाम्यासाठी तसाच ट्रॉलीखाली तब्बल ३० तासांहून अधिक वेळ पडून राहिलेला त्याचा मृतदेह अशी विदारक पार्श्वभूमी असणारी ही कथा. दलित म्हणून असणारा शिक्का आणि स्मशानासाठी देखील दुसऱ्यांच्या जमिनीवर अवलंबून राहणारा हा समाज सिद्धार्थचा मृतदेह हाती लागल्यानंतरसुद्धा त्याच्या दफनविधीसाठी संघर्ष करत राहतो. शेवटी स्वतःच्या जागेत दलित समाजाची वेगळी स्मशानभूमी उभी करायचा निश्चय करून होणारा कथेचा शेवट. आपल्या समाजात जातीव्यवस्था किती खोलवर रुजली आहे आणि स्वार्थी राजकारणापायी याबाबतीत आपली न्यायव्यवस्था कशी कमजोर होऊन गेली आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही दुसरी कथा "जातीचा मुका मार". दिपक कुरणे हा दलित समाजातील मुलगा स्वकर्तुत्वावर शिकून सनदी अधिकारी बनतो, नवनवीन योजनांच्या माध्यमातून स्वतःच्या गावचा विकास करतो पण गावातील जत्रेत देवाच्या पालखीला हात लावल्याचे निमित्त होऊन त्याला जातिव्यवस्थेचा असा काही दणका बसतो की न्याय मिळवण्यासाठी तब्बल २५ वर्षें संघर्ष करून देखील त्याच्या हाती काहीच लागत नाही. कथा संपत असताना डोक्यात एकच विचार ठेऊन संपते की इतक्या मोठ्या अधिकाऱ्यासोबत असं होत असेल तर बाकी दलित समजातील लोकांची काय अवस्था असेल. तिसरी कथा "किरळ" ही दुष्काळाने होरपळत असणाऱ्या गावातील एका डोळ्याने अंध जनी या म्हातारीची. दुष्काळामुळे गाव सोडून शहरात गेलेल्या आपल्या मुलांच्या आठवणीत गावात एकटीच राहणारी जना. सोबत देवाला सोडलेला एक बोकड आणि अधून मधून थेंबभर दूध देणारी एक शेळी. तिचा अशा अतिशय कठीण परिस्थितीत जगण्यासाठीचा संघर्ष आपल्याला ऊर्जा तर देतोच पण जनाच्या एकुलत्या एक शेळीच्या दुर्दैवी मृत्यूने होणारा कथेचा शेवट मनाला चटका लावून जातो. जातीधर्माच्या पलिकडे जाऊन ब्राह्मण - दलित कुटुंबातील दोन मुलांची मैत्री आणि पालकांकडून मुलांवर होणाऱ्या संस्काराचे महत्व सांगणारी कथा "संस्कार". कथेच्या नायकाला एका अंध मुलीकडून विचारला जाणारा हळवा प्रश्न "टेडी बेअरचे डोळे" मला चालतील का हा नायकासोबतच वाचकालादेखील काही क्षण स्तब्ध करून विचारात पाडतो. प्रत्येकाच्या आयुष्यात घडणाऱ्या वाईट घटना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या "जखमा" मनाला देऊनच जातात. आंतरजातीय प्रेमविवाहानंतर झालेला घटस्फोट नायकाच्या मनावर खोलवर "जखमा" देऊन जातो तसाच वेश्याव्यवसाय करून आपले पोट भरणाऱ्या एका स्त्रीने स्वतःहून करून घेतलेल्या "जखमा" यांपैकी कोणती जखम जास्त त्रासदायक या विचारात संपणारी ही कथा. समाज म्हणून जगत असताना आपण त्या समाजाचे काहीतरी देणे लागत असतो, आपण जेव्हा पोटभर जेवत असतो त्याच वेळी बाहेर असे लाखो जीव असतात जे २ घास अन्न मिळवण्यासाठी धडपडत असतात. त्याचंच एक प्रतिनिधिक उदाहरण एका भिकारणीच्या माध्यमातून देऊन लेखकांनी सामाजिक भान जपण्याचा संदेश "अपराधीपणा" या कथेतून दिला आहे. भटके आयुष्य जगणारी आणि भीक मागून खाणारी एक जमात 'डवरी' यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारी कथा "एका मड्याची भटकंती". मृत्यूनंतर आपल्यातीलच एकाचा मृतदेह सोबत घेऊन फूटभर जागेसाठी मैलोंमैल करावी लागणारी या लोकांची पायपीट मन पिळवटून टाकते.

या संग्रहातील शेवटची कथा "परत्या" फिरते एका असहाय मातेभोवती. काळीज पिळवटून टाकणा-या एका विलक्षण मातेची ही कथा. घरातील दारिद्र्याला कंटाळून वडिलांकडून जबरदस्तीने लग्न लावून दिल्यानंतर जेव्हा धुरपी शहरात येते तिथून ही कथा चालू होते. नवऱ्याकडून फसवलं गेल्यानंतर होणारी तिची फरफट आपल्या सामाजिक मूल्यांबद्दल आपल्याला खूप काही सांगून जाते. आपली पुरुषप्रधान व्यवस्था भुलभुलैय्याचा मार्ग वापरून, तर कधी स्वप्नांचे मृगजळ तयार करून, तर कधी वासनेची शिकार बनवून अनेक स्त्रियांना नको असताना 'गर्भदान' करते. पुढे गर्भाला अंकुर फुटायला लागला, पाय फुटायला लागले, की मग महागंभीर प्रश्न तयार होतात. या प्रश्नांचे डंख असह्य झाल्यानंतर काही जणी गर्भाचा देठच खुडून टाकतात, काही जणी गर्भच फेकून देतात, तर काही जणी गुपचूप त्या गर्भाचा गोळा विक्रीला काढतात. विक्री झाल्यानंतरही जेव्हा काळीज तडफडायला लागतं, समाजाचा दबाव वाढायला लागतो तेव्हा हात-पाय हलवणारा आपला गर्भगोळा परत आणणाऱ्या स्त्रियाही काही कमी नाहीत. अशाच पुरुषप्रधान संस्कृतीची बळी पडलेली या कथेची नायिका 'धुरपी'. पोटचा गोळा विकणारी आणि त्याला परत आणून झालेल्या चुकीबद्दल पश्चाताप करणारी 'धुरपी' उत्तम कांबळे यांनी खूप ताकदीने या कथेत साकारली आहे. 

एक संवेदनशील आणि वाचनिय कथासंग्रह.




संदीप प्रकाश जाधव

Monday, April 26, 2021

"द्रोहपर्व"

 मराठ्यांच्या अभूतपूर्व पराक्रमाची विजयगाथा


लेखक : अजेय झणकर

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

१४ जानेवारी १७६१ ला झालेला पानिपतचा महासंग्राम कोणताच हिंदुस्थानी विसरू शकणार नाही कारण अब्दालीने केलेलं ते आक्रमण फक्त मराठा साम्राज्यावरचं नव्हतं तर अखंड हिंदुस्थानाचा घास घेण्यासाठी उचलेलं पाऊल होतं. धर्माच्या रक्षणाची चिथावणी देऊन अफगाणिस्तानातून हिंदुस्थानात आणला गेलेल्या पराक्रमी अब्दालीसमोर जेव्हा इतर हिंदुस्थानी साम्राज्ये लढायला धजत नव्हती तेव्हा देशहितासाठी मराठ्यांनी ती जबाबदारी स्वतःवर घेतली. सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठे पानिपतात त्वेषाने लढले, मराठ्यांच्या तब्बल सव्वा लाख बांगड्या त्या महासंग्रामात फुटल्या. पानिपतच्या या संग्रामात मराठ्यांनी दिलेला हा लढा एका धर्माविरुद्ध नव्हता तर तो देशहितासाठी होता आणि देशहितासाठी झालेला सर्वांत मोठा संग्राम म्हणून इतिहासात तो सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. मराठ्यांनी या लढाईत केलेला पराक्रमच इतका मोठा होता की ही लढाई जिंकूनदेखील अब्दालीला रिकाम्या हातानेच अफगाणिस्तानला परत जावं लागलं तेही परत कधीच हिंदुस्थानावर आक्रमण न करण्याचा विचार मनात घेऊनच! पानिपतच्या या महासंग्रामानंतर अशीच एक लढाई महाराष्ट्राच्या मातीवर लढली गेली, जी इतिहासात "वडगावची लढाई" म्हणून ओळखली जाते. हिंदुस्थानच्या जवळपास दोन तृतीयांश भागावर पसरलेल्या मराठा साम्राज्यावर पानिपतानंतर  तब्बल १८ वर्षांनी परकीय आक्रमण झालं. पहिलं मराठा-इंग्रज युद्ध म्हणून इतिहासात नोंदवल्या गेलेल्या, पुण्यापासून साधारण ४० किलोमीटरवर असणाऱ्या "वडगाव" या ठिकाणी झालेल्या या युद्धात मराठ्यांनी दाखवलेला पराक्रम हा पानिपतपेक्षा नक्कीच कमी नव्हता. त्याचे कारण म्हणजे फिरंगी जरी सातासमुद्रापारहून आले असले तरी त्यांना जाऊन मिळालेल्या राघोबादादांसारख्या, अटकेपार झेंडा लावून पराक्रम गाजवणाऱ्या पेशव्यांनी गादीसाठी मराठी साम्राज्यासोबत केलेल्या "द्रोहाची" जखम घेऊन आपल्याच लोकांसोबत लढणे मानसिकदृष्टया खूपच आव्हानात्मक होतं. परंतु पानिपतच्या इतिहासापासून धडा घेऊन कारभाऱ्यांनी आखलेल्या योजना आणि त्यानंतर सैन्याने दाखवलेल्या अतुल्य पराक्रमाने "वडगाव" इथल्या लढाईत इंग्रजांचा मराठ्यांकडून दारूण पराभव झाला. याच "वडगावच्या लढाईला" केंद्रस्थानी ठेवून, इतिहासाला थोडीशी कल्पनेची जोड देऊन अजेय झणकर यांनी लिहिलेली कादंबरी, मराठ्यांची एक अभूतपूर्व विजयगाथा "द्रोहपर्व". जवळपास सात वर्षे अभ्यास व संशोधन करून लिहिल्या गेलेल्या "द्रोहपर्व" या ऐतिहासिक घटनांवर आधारित कादंबरीमधे काही काल्पनिक पात्रं निर्माण करुन अजेय झणकर यांनी पुस्तकात एकप्रकारचा जिवंतपणा निर्माण केला आहे. "द्रोहपर्व" मधे अजेय झणकर यांनी पानिपतानंतरचा १७७३ ते १७७९ हा काळ रेखाटत असताना या काळात मराठा साम्राज्यात घडलेल्या प्रमुख घटनांचा आढावादेखील घेतला आहे. शनिवारवाड्यात ऐन गणेशोत्सवात नारायणराव पेशव्यांचा झालेला अमानुष खून!! लबाडीनं पेशवाईची वस्त्रं धारण करून राघोबांनी पुन्हा सुरू केलेली राघोभरारी!! गंगाबाईंच्या पोटात वाढत असलेला नारायणरावांचा अंकुर चिरडण्यासाठी आसमंतात घोंघावणारी कारस्थानं!! नाना फडणीस आणि बारभाईंनी तो अंकुर वाचवण्यासाठी केलेला जिवाचा आटापिटा!! रामशास्त्री प्रभुण्यांनी राघोबांस दोषी ठरवल्यावर राघोबांच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ठ!! निजाम, हैदर आणि इंग्रजांच्या कारवाया!! सदाशिवरावभाऊंच्या तोतयानं सुरु केलेला उत्पात आणि त्याचा निःपात!! संधिसाधू इंग्रजांनी राघोबांशी हातमिळवणी केल्यावर मराठ्यांच्या पुण्यभूमीवर ओढवलेलं पहिलं फिरंग्यांचं परचक्र!! ते उलटवून लावण्यासाठी उभ्या हिंदुस्थानभर पसरलेल्या प्रबळ मराठा सरदारांची झालेली अभूतपूर्व एकजूट!! या सर्व घटनांचा विस्तृत मागोवा घेणारी ही अजेय झणकर यांची ४९२ पानी कादंबरी "द्रोहपर्व".

"काका मला वाचवा" म्हणून राघोबादादांच्या पायावर लोटांगण घालणाऱ्या नारायणराव पेशव्यांचा राघोबादादांच्या माणसांकडून शनिवार वाड्यात झालेल्या अमानुष खुनाने या कादंबरीची सुरुवात होते. कादंबरीची सुरुवातीची जवळपास १०० पाने "नारायणराव पेशव्यांचा खून" या घटनेशी संबंधित आहेत. या खुन-नाट्याला असणारी पार्श्वभूमी आपल्याला सुरुवातीच्या या १०० पानांमध्ये वाचायला मिळेल. ज्यामध्ये नानासाहेबांनंतर माधवराव पेशव्यांकडे आलेली पेशवाईची सूत्रे, त्यांची छोटीशीच पण यशस्वी कारकिर्द, त्यादरम्यानच राघोबादादांना खुणावणारी पेशवाईची गादी, त्यासाठी त्यांनी चालवलेल्या ना ना खटाटोपी, त्या करत असताना शरण आलेल्या निजामाशी परस्पर केलेल्या सलोख्यामुळे मधवरावांकडून त्यांना बदामी महालात दिला गेलेला बंदिवास, नंतर अचानकच माधवराव पेशव्यांच्या निधनानंतर अवघ्या १७ वर्षें वयाच्या नारायणरावांकडे आलेलं पेशवेपद, पेशवाईच्या कारभारात नारायणरावांना मिळणारी नाना फडणीसांच्या मुत्सद्दीपणाची साथ, नाना फडणीसांचा दौलतीतील लोकांमध्ये असणारा दरारा, बंदिवासात राहूनही राघोबादादांचे गादी काबीज करण्यासाठी चालू असणारे अविरत प्रयत्न आणि शेवटी आनंदीबाईंनी केलेल्या "ध" चा "मा" मुळे ऐन गणेशोत्सवात  शनिवार वाड्यात गारद्यांकडून नारायणारावांचा झालेला अमानुष खून या आणि अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. हे सर्व वाचकांसमोर सादर करत असताना लेखकांनी ऐतिहासिक संदर्भांना जी कल्पनेची जोड दिली आहे त्यामुळे हे खून-नाट्य अजूनच थरारक वाटते. नारायणारावांच्या खुनानंतर ही कादंबरी मराठे, इंग्रज आणि राघोबादादांमधे चाललेल्या राजकारणाचे विविध पैलू उलगडत वेग पकडते. नारायणारावांनंतर नानासाहेब पेशव्यांचा वंशच संपल्याने पेशवाई आपसूकच राघोबादादांकडे आल्यामुळे खुनाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी स्वत:च्या नावाची द्वाही पुण्यात फिरवली आणि साताऱ्याच्या छ्त्रपतींकडून पेशवाईची वस्त्रे मागवण्यासाठी पत्र पाठवलं. परंतु गंगाबाईंच्या पोटी पुत्र जन्माला यावा आणि त्याने पेशवाईच्या राजगादीवर बसून राज्य सांभाळावे अशी इच्छा असणाऱ्या काही स्वराज्यनिष्ठ कारभारी आणि सरदार मंडळींनी गरोदर असणाऱ्या गंगाबाईंना सुरक्षेच्या कारणास्तव पुरंदरला कडेकोट बंदोबस्तात ठेवले. तिथेच पुढे "सवाई माधवरावांचा" जन्म झाला. त्याचदरम्यान रामशास्त्री प्रभूण्यांनी नारायणरावांच्या खुनाची चौकशी सुरु केली आणि मुख्य आरोपी म्हणून श्रीमंत राघोबादादांच्या नावाची घोषणा करून, त्यांना भर दरबारात देहदंडाची शिक्षा सुनावली. नंतर याच दरबारात राघोबादादांनी पेशवाईची वस्त्रे घेऊन आपला शिक्का बनवून घेतला आणि चवताळून पुरंदरावर हल्ल्याची योजना आखू लागले. गेल्या कित्येक वर्षांपासून ही राजगादी मिळवण्याची त्यांची प्रबळ इच्छा आता कुठे पूर्ण झाली होती आणि ती संधी अशी सहजासहजी सोडायला ते तयार नव्हते. राजगादीसाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी असणारे राघोबा दौलतीस कसे धोकादायक ठरू शकतात हे साताऱ्याच्या गादीस पटवून देण्यात नानांचा मुत्सद्दीपणा कामी येतो शिवाय पेशवाईच्या वारसाची रक्षा करण्यासोबतच दौलतीची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याची गरज ते महादजी शिंदे आणि होळकर यांसारख्या मतब्बर सरदारांना देखील पटवून देऊन आपल्या बाजूने वळवून घेतात. पुढे साताऱ्याच्या छत्रपतींनी राघोबादादांची पेशवाई रद्द केली आणि नानांनी राघोबादादांची सर्व बाजूंनी कोंडी करायला सुरुवात केली. परंतु पेशवाईसाठी पेटून उठलेले राघोबादादा इंग्रजांच्या वळचणीला लागले आणि इथेच ठिणगी पडली पुढे येऊ घातलेल्या "मराठा-इंग्रज" या महासंग्रामाची!

इंग्रजांनी सुरुवातीला कितीही यासर्वांपासून अलिप्त राहायचा प्रयत्न केला तरी त्यांचीही इच्छा हिंदुस्थानावर राज्य करण्याचीच होती आणि त्यातील सर्वांत मोठा अडसर होता हिंदुस्थानभर पसरलेलं मराठा साम्राज्य. पेशवाईच्या निमित्ताने चालू झालेल्या या राजकारणामुळे राघोबादादा आयतेच इंग्रजांकडे मदतीसाठी चालून आले होते आणि हिंदुस्थानावर राज्य करण्याची संधीच जणू इंग्रजांना यामध्ये दिसू लागली. प्रदीर्घ चर्चा आणि छोटे-मोठे वाद झाल्यावर इंग्रज अधिकाऱ्यांनी शेवटी राघोबादादांना मदत करण्याचे आश्वासन दिले परंतु त्याबदल्यात इंग्रजांना किनारपट्टी परिसरात असलेले महत्त्वाचे किल्ले जसे वसई, साष्टी आणि युद्धाचा संपूर्ण खर्च देण्याचे राघोबांकडून कबूल करून घेतले. त्यानंतर आपल्या कवायती तुकड्या सज्ज करून इंग्रज मराठ्यांविरुद्ध लढायला तयार झाले. या सर्व गोष्टींची आधीपासूनच कल्पना असणाऱ्या मुत्सद्दी नानांनी अवघ्या मराठी सरदारांनी पुन्हा एकत्र येऊन इंग्रजांचा पाडाव करावा असे आवाहन केले आणि मोहिमेची सर्व सूत्रे पाटीलबाबा म्हणजे महादजी शिंद्यांकडे दिली. परंतु ही लढाई वाटते तितकी सोपी नक्कीच नव्हती कारण मराठ्यांच्या अफाट सैन्यासमोर इंग्रज संख्येने जरी कमी असले तरी त्यांच्याकडे असणारी आधुनिक हत्यारे युद्धाचे पारडे त्यांच्याबाजूने फिरवण्यास पुरेशी होती. असे असले तरी मराठ्यांनी थोरल्या महाराजांच्या म्हणजेच छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याचा असा काही प्रभावी वापर केला की फिरंगी फौजांनी खंडाळ्याचा घाट उतरल्यानंतर त्यांचे मुंबईला परतीचे मार्गच बंद झाले आणि शेवटी निर्णायक युद्धासाठी त्यांना मैदानात उतरावे लागले. कार्ल्याजवळच्या वडगाव येथे इंग्रजांना कोंडीत पकडून जो महासंग्राम झाला त्यात मराठ्यांनी विजय मिळवला. या "वडगावच्या लढाईत" इंग्रजांचा दारूण पराभव करून मराठ्यांनी आणखी एकदा हिंदुस्थानाला परकीय सत्तेच्या हाती जाण्यापासून थोपवले होते. योगायोगाने मकरसंक्रांतीच्याच दिवशी मिळवलेल्या या मोठ्या विजयाने १८ वर्षांपूर्वी पानिपतात झालेल्या जखमांवर जणू फुंकर घालायचेच काम केले. कादंबरीत अजेय झणकर यांच्या लेखणीतून साकारलेले प्रत्यक्ष युद्धाचे वर्णन वाचकांसमोर तो थरार उभा करण्यात कमालीचे यशस्वी झाले आहे.

"वडगावच्या लढाईत" जर इंग्रज जिंकले असते तर हिंदुस्थान १७७९ सालीच पारतंत्र्यात गेला असता. इतिहासापासून धडा घेतला, तरच भविष्याचा डोळस वेध घेता येतो याचा प्रत्यय आणून देणारी आवर्जून वाचण्यासारखी ही ४९२ पानी ऐतिहासिक कादंबरी "द्रोहपर्व". 





संदीप प्रकाश जाधव





Monday, April 19, 2021

"इंधन"

 


लेखक : हमीद दलवाई

प्रकाशक : मौज प्रकाशन


हमीद दलवाई यांनी लिहिलेली एकमेव कादंबरी "इंधन". या आत्मचरित्रात्मक कादंबरीबद्दल बऱ्याच लोकांकडून ऐकून होतो, बऱ्याच लोकांनी ही आवर्जून वाचण्यासाठी सुचवली आणि अखेर ही उत्कृष्ठ कादंबरी संग्रही घेऊन वाचून काढली. अगदी छोटेखानी आणि एका बैठकीत वाचून पूर्ण होणाऱ्या या कादंबरीमध्ये ज्या विषयाला दलवाई यांनी लोकांसमोर मांडलं आहे ते खरंच शब्दांत वर्णन न करता येण्यासारखं आहे. १९६५ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी आजही वाचकाच्या मनावर तितकाच प्रभाव पाडत आहे, एका गावातील विविध घटनांचा आणि त्यांच्या आपापसातील नात्यांचा वेध घेणारी ही कादंबरी. कादंबरीमध्ये शेवटपर्यंत ज्याच्या नावाचा उल्लेखच नाही झाला असा हा कादंबरीचा नायक जेव्हा १५ वर्षांनी गावात परत येतो तेव्हा त्याच्या निवेदनातून उलगडत जाणारी या कादंबरीची कथा. स्वातंत्र्याच्या दोन दशकानंतरच्या वातावरणात घडलेली या कादंबरीची कथा आज वर्तमान काळातील वातावरणाला देखील तितकीच लागू होते. देशाच्या फाळणीमुळे झालेली जखम मनात ठेवून स्वतःचे अस्तित्व शोधणारा मागासलेला समाज आणि त्याच वेळी खोती-जमिनदारी यांसारख्या सरंजामी प्रवृत्तींना बसत जाणारा चाप या काळामधे घडणारी ही कथा. आपल्या तत्त्वापेक्षाही अहंकाराला जपण्याचा आणि स्वत:चंच खरं करण्याच्या सामूहिक अट्टहासाचा एकत्रित परिपाक म्हणजे ही कादंबरी. तसं पाहिलं तर भडका उडण्यासाठी वाऱ्याचा एक झोतदेखील पुरेसा असतो पण त्या परिस्थितीत जर त्यामध्ये इंधन ओतले गेल्यानंतरचा वणवा ज्या पद्धतीने पेटू शकतो तसाच गावातल्या काही छोट्या छोट्या घटनांमुळे संपूर्ण गाव कसं गढळून निघते, त्याचे चित्रण म्हणजे ही कादंबरी "इंधन". स्वतःच्याच समाजातल्या वाईट प्रवृत्ती आणि चालीरितींच्या विरोधात ठामपणे उभा राहणारा या कादंबरीचा नायक! धर्म या संकल्पनेवरच विश्वास नसणारा, कधीही नमाज न पडणारा, अतिशय विवेकवादी असला तरी चांगले-वाईट, उच्च-नीच या गोष्टींची जाणीव ठेवून आपली वैयक्तिक मूल्ये जपणारा आणि ती कधीही इतरांवर न थोपवता समाजपरिवर्तनासाठी प्रयत्न करणारा नायक! गांधी टोपी मुस्लिमांसाठी निषिद्ध असताना ती टोपी घालून राष्ट्रसेवादलात सामील होऊन समाजकारणात स्वतःला झोकून देणारा नायक! याच समाजकारणातून पुढे कुणबी आणि मुस्लिम खोतांमध्ये असणाऱ्या जमिनीच्या वादात त्याने मुस्लिमांच्या विरोधात कुणब्यांना दिलेल्या सल्ल्यामुळे घरातील लोकांसोबतच गावातील इतर मुसलमान त्याच्यासोबत अंतर राखून रहायला चालू करतात. नायकामधला प्रखर विवेकीवाद गावामधे कुणालाच आवडत नसल्याने शेवटी गाव सोडून मुंबईला जाऊन राजकारण-समाजकारणात नाव कमावणारा नायक तब्बल १५ वर्षांनी जेव्हा गावात परत येतो त्यानंतर उलगडत जाणारी ही कादंबरी "इंधन".

मुंबईमध्ये राजकारण आणि समाजकारणासोबत समाज प्रबोधनाचे काम करत असणारा नायक हर्ट-अटॅकच्या दुखण्यातून सावरून गावी विश्रांतीसाठी येतो. गावात पाऊल ठेवल्यानंतर त्याला होणारी पहिली जाणीव म्हणजे त्याच्याबद्दल असणारा तिरस्कार लोकांच्या मनातून कमी झाल्याची. १५ वर्षांनी परिस्थिती बरीच बदलेली त्याला जाणवते, आता गावातील लोकांना आपल्या गावच्या या नेत्याचे कौतुक आहे हेसुद्धा त्याच्या लक्षात येते. १५ वर्षांनंतर आलेला नायक मात्र शक्य तितके तटस्थ राहून गावातल्या नात्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. गावामधील मुस्लिम, ब्राह्मण, परीट, न्हावी, वाणी, कुळवाडी, कुणबी आणि पूर्वीचे महार पण आता बौद्ध झालेले दलित अशा अनेक समाजघटकांमधे या १५ वर्षांत झालेले बदल तसेच काही ठिकाणी अजिबातच न झालेले बदल नायक टिपत जातो. गावातील सगळेच लोक रोजच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या कारणासाठी एकमेकांवर अवलंबून असले तरी सर्वांच्या मनामधे एकमेकांबद्दल असणारी सूक्ष्म अढी लेखकाला खटकते. असे असूनदेखील गावामध्ये “भानगडी” करणाऱ्या लोकांची काहीच कमी नाही याचे नायकाला आश्चर्य वाटते. अशा अनेक "भानगडींमध्ये" खुद्द नायकाच्या भावाची एका ब्राह्मण विद्यार्थिनीसोबत असणारी "भानगड" नायकाला धक्का देऊन जाते. गावात घडणाऱ्या अशा गोष्टी गावाला नवीन नसल्याने गावातील सलोखा कधीच बिघडला नव्हता, एकमेकांबद्दल असणारी अढी मनातच धुमसत राही पण कधी त्याचा गावातील वातावरणावर परिणाम नाही झाला. परंतु गावामधे नवीन घर बांधणारा इसाक त्याच्या बांधकामावर मजुरी करणार्‍या बौद्धाच्या लक्षुमीला घरी ठेवून घेतो आणि इथे ठिणगी पडते पुढे येऊ घातलेल्या वणव्याची. आताच्या बदललेल्या काळात एका मुसलमान खोताने राजरोसपणे एका विवाहित स्त्रीला आपल्या घरात ठेवून घेणं बौद्धांना रूचत नाही. आपल्या स्वतंत्र अस्तित्त्वाची, आपल्या स्त्रियांच्या अब्रू इज्जतीची त्यांना झालेली जाणीव गावात एक वेगळाच संघर्ष उभा करते. या संघर्षामधे दोन्ही बाजूंचं कधीही भरून न निघणारं नुकसान होणार हे सर्वांना समजत असलं तरीदेखील तो संघर्ष वाढतच जातो कारण ही लढाई असते स्वत:च्या धर्माभिमानाची, जातीच्या अभिमानाची! शिमग्याला निघणाऱ्या पालखीच्या मिरवणुकीत हा संघर्ष अत्यंत रौद्र आणि भेसूर रूप धारण करतो जो नायकसोबतच वाचकालादेखील विचारात पाडतो. त्या धक्कादायक घटनेनंतर नायक गाव सोडून परत मुंबईला निघून जातो, पण तरीही गावामधे घटनांची साखळी पुढे चालूच राहते. नायक गावामधून बाहेर पडल्यानंतर वर्तमानात चालू असणारं या कथेचं निवेदन भविष्यकाळात चालू होतं. इथून पुढच्या भविष्यकाळातील घटना म्हणजे “हे असंच घडेल” अशी नायकाच्या मनाची धारणा आहे की नायकाच्या आजपर्यंतच्या अनुभवावरून “हे असं घडायला हवं” हा त्याचा स्वप्नविलास या विचारत वाचकाला सोडून देऊन कथेचा शेवट होतो.

जितकं लोकांकडून ऐकलं होतं त्या सर्व अपेक्षांना खरं उतरणारी, आवर्जून वाचण्यासारखी कादंबरी "इंधन".


संदीप प्रकाश जाधव

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये सह्याद्रीचा श्वास आणि पेशवाईचा रक्तरंजित इतिहास: ना...