Sunday, October 11, 2020

"घर हरवलेली माणसं"

 



लेखक : व. पु. काळे

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

वसंत पुरुषोत्तम काळे म्हणजेच व.पु.काळे. मराठी साहित्यविश्वात वपु या नावाने ओळखले जाणारे अजरामर लेखक व.पु. काळे. वपु हे नाव ऐकले नसणारा किंवा वपुंचे लेखन माहीत नसणारा मराठी साहित्यविश्वातील माणूस मिळणे तसा दुर्मिळच. आपल्या लिखाणातून जगण्याचं तत्त्वज्ञान सोप्या पण तितक्याच रंजक पद्धतीने लोकांना सांगणारे थोर साहित्यिक म्हणून व.पु.काळे यांचे असे एक वेगळे स्थान मराठी साहित्यविश्वात आहे. पेशाने आर्किटेक्ट असल्याने त्यांना शब्दांचे महाल बांधणारा लेखक म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. ४० वर्षांमध्ये ६० हून अधिक पुस्तके लिहिलेल्या वपुंच्या  पुस्तकांचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे लिखाण हे आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांशी साधर्म्य दाखवणारे असते त्यामुळे वाचक त्यामध्ये हरवून जातो. बऱ्याच कथा कादंबऱ्या लिहिलेल्या वपुंची मी वाचलेली इतर पुस्तके "पार्टनर" आणि "वपुर्झा". ही दोन्ही पुस्तके वाचण्याचा अनुभवसुद्धा शब्दांत न सांगता येण्यासारखा. वाचता वाचता लाईफची फिलॉसॉफी शिकवणारे "पार्टनर" आणि कोणत्याही पानावरचे अगदी कोणतेही वाक्य वाचले तरी पुनःपुन्हा वाचण्याचा मोह न टाळता येणारे "वपुर्झा". वपुंच्या या आणि अशा अनेक पुस्तकांच्या पंगतीमधील आणखी एक सुंदर लेखन म्हणजे "घर हरवलेली माणसं". वपुंचे हे पुस्तक म्हणजे आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांचा एक कथासंग्रहच.

वपुंची कथा सांगण्याची पद्धत अतिशय भन्नाट आहे. आपण वाचन करता करता त्या कथांमध्ये अडकत जातो आणि आपले विचारचक्र सुरु होतच असते तोपर्यंतच ते आपल्याला कथेच्या शेवटी घेऊन येऊन ओपन एण्डेड, ओपन माईंडेड सोडून देतात आणि वाचक म्हणून आपण विचार करत राहतो की हे 'असे झाले असते तर' किंवा हे 'तसे झाले असते तर'. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनाच कथेत उतरल्यामुळे आपण नकळत त्या कथा रिलेट करत राहतो. "घर हरवलेली माणसं" या पुस्तकातील प्रत्येक कथासुद्धा याला अपवाद नाही. आपल्या आसपास राहणारे संसारी लोक आणि त्या संसारी स्त्री-पुरुषांना पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधणाऱ्या किंवा एक वाचक म्हणून आपल्याला ते शोधायला भाग पडणाऱ्या अशा या पुस्तकातील कथा. रोजच्या जगण्यात दु:खाशिवाय काहीच नाही आणि पावलापावलावर ज्यांच्या स्वप्नांना तडे जाताहेत पण तरीसुध्दा जीवनातील कोडे सोडवण्याचा प्रयत्न करणारी माणसं या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतील. त्याचप्रमाणे जगणं हे फार शुल्लक मानून स्वतःच्या जगण्याची मनमानी करून इतरांच्या जगण्याला चरे पाडणारी माणसंसुद्धा या पुस्तकात आहेत. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात एक आयुष्य असतं आणि हे ज्याला समजतं तो ते जगायचा, जपायचा प्रयत्न करत असतो. अशाच लोकांच्या कथा म्हणजे हे पुस्तक.  पुस्तकातील प्रत्येक कथेतील नायक किंवा नायिका दोन प्रकारच्या आयुष्याचे प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसतील. एक ज्यामध्ये  ते आपल्या जगण्यासाठी जिवंत घर शोधताना दिसतात तर दुसरे ज्यामध्ये ते आपल्या संसाराची, घराची विण उसवू नये याकरिता जीवाचं रान करताना दिसतात. आपल्याला किती आयुष्य मिळेल हे जरी कोणी सांगू शकत नसले तरी प्रत्येक व्यक्तीची असणारी इच्छा म्हणजे जे काही आयुष्य वाट्याला आले आहे ते आनंदात जगता यावे अशाच लोकांना समोर ठेऊन लिहिलेल्या या पुस्तकातील कथा. पण असं आयुष्य जगायला घरपण असणारं घर असणं महत्वाचं आहे. जरी प्रत्येकाच्या वाट्याला असं घर येत नसलं तरी नियती त्याला ते शोधण्याचे बळ नक्कीच देत असते. काहींचा शोध पूर्ण होतो तर काही वपुंच्या या पुस्तकातील "घर हरवलेली माणसं" होऊन जातात.

पुस्तकातील काही आवडलेली वाक्ये :-

  • ‌'उमरभर जिंदा रहा मगर जिंदगी देखी नही'
  • ‌'ज्यांना शब्दातली शक्ती नाही समजली, त्यांच्या कहाण्या कारुण्याने भरल्या आहेत'
  • ‌'काहीतरी लपवायचं असलं म्हणजे फार हसावं लागतं'
  • ‌'माणसाला बळ देतं ते दुसरं माणूसच'
  • ‌'कागदाच्या आहारी गेलेली यंत्रणा, दारूच्या आहारी गेलेल्या माणसांपेक्षा भयाण. फार म्हणजे फार जपावं लागतं'
  • ‌'कायम दुःखाच्या सावटाखाली असणारी आपल्यापेक्षाही अधिक सुखी असतात'
  • 'माणसं अकारण घोळ माजवतात आणि मुळातच वेगानं संपणारं आयुष्य आणखी कमी करतात'
  • 'स्वार्थी आणि निष्क्रिय माणूस जास्त चांगलं तत्वज्ञान सांगू शकतो'
  • 'पुष्कळदा सुखाची लाट भरतीसारखी आपण बेसावध असताना चिंब करून टाकते. त्यातलं काय लुटायचं ह्याचं आकलन होण्यापूर्वी ती लाट ओहोटीप्रमाणे दूर गेलेली असते'

शेवटी पुस्तकातील सर्व कथा वाचून होणारी जाणीव, घर कितीही मोठं असो ते घर तेव्हाच बनतं जेव्हा त्या घराला घरपण देणारी माणसं त्या घरामध्ये राहत असतात. खास वपुंच्या लेखनासाठी आवर्जून वाचावे असे पुस्तक "घर हरवलेली माणसं".





संदीप प्रकाश जाधव

Sunday, October 4, 2020

"बलुतं"


                                                       

लेखक : दया पवार

प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन


मराठीतील लिहिले गेलेलं पहिलं दलित आत्मकथन म्हणजे  दया पवार यांचं हे पुस्तक "बलुतं". यानंतर बऱ्याच आत्मकथा लिहिल्या गेल्या पण १९७८ साली लिहिलेलं हे आत्मकथन दलित समाजाचे अतिशय खडतर जीवन आजही तितक्याच प्रखरपणे वाचकांसमोर घेऊन येते. पूर्वापार चालत आलेली जातीव्यवस्था, दारिद्र्य यांतून येणाऱ्या अनेक संकटांचा सामना करत स्वतःचे असे वेगळे विश्व निर्माण करणाऱ्या 'दगडू मारुती पवार' म्हणजेच 'दया पवार' यांची ही वाचकाला आतून-बाहेरून हलवून सोडणारी आत्मकथा "बलुतं". आज एक कवी, साहित्यिक,  विचारवंत म्हणून लोकांमध्ये ओळखले जाणाऱ्या लेखकाचा दगडू पासून दया पर्यंतचा प्रवास म्हणजेच हे आत्मकथन "बलुतं".

जातीव्यस्थेमुळे म्हणा किंवा हिंदू समाजव्यवस्थेमुळे म्हणा जन्मतःच लेखकाच्या पदरी बांधलं गेलेलं हे दुःखाचं "बलुतं". महार जातीच्या आई-वडिलांच्या पोटी जन्म घेतला हा दगडूचा मुख्य अपराध. आपल्या देशात जातीचा एकप्रकारचा अदृश्य शिक्का आपल्या जन्मतःच बसलेला असतो. पु. ल. देशपांडेंनी लिहिल्याप्रमाणे " हिंदू धर्मात हा शिक्का पुसून दुसऱ्या जातीचा शिक्का उठवून घेण्याची हिंदूंच्या तेहतीस कोटी देवांपैकी एकाचीही आज्ञा नाही. ब्राम्हणाला कायस्थ होता येत नाही आणि साळ्याला माळी. एकही वेद न येणाऱ्या ब्राम्हणाला सुद्धा कधी कधी ऋग्वेदी, यजुर्वेदी ब्राम्हण हा शिक्का बसला की तो मेल्यानंतरही कायम राहतो". हिंदू समाजात दलित वगळता इतर जातींचा शिक्का असलेल्या मुलाचे पूर्ण जीवन तितकेसे विद्रूप नाही होत पण जर अस्पृश्य जातीच्या आई-वडिलांच्यापोटी कोणी जन्माला आलाच तर सारे संपलेच असे समजावे. त्याचे किड्या-मुंगी सारखे जगावे लागणारे जीवन आणि वाचकाला पानापानावर अस्वस्थ करणाऱ्या घटना म्हणजे हे दया पवारांचे आत्मकथन "बलुतं".

अतिशय प्रखर अशा वास्तवाचे जवळून दर्शन घडवणारे हे दया पवारांचे आत्मकथन वाचताना मन सुन्न करून टाकणारी जाणीव म्हणजे दलित समाजाचे जीवन हे केवळ आर्थिक दारिद्र्यामुळे आलेले नसून आपली समाजव्यवस्थाच त्याला पूर्णपणे कारणीभूत आहे. फक्त दारिद्र्यामुळे आलेले आयुष्य सगळेच मध्यमवर्गीय जगत, सोसत असतात पण भयानक दारिद्र्यासोबतच आपल्या समाजव्यवस्थेने अस्पृश्यांवर जे हीनत्व लादलेले आहे त्याचा या आत्मकथनामुळे येणारा प्रत्यय वाचकाला हादरवून टाकतो. अस्पृश्यांना त्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आणि नंतर दहन असो वा दफन, पावलापावलावर दिली जाणारी जनावरापेक्षाही भयंकर वागणूक दयाच्या लेखणीतून वाचताना मन गलबलून जाते. स्पृश्य आणि अस्पृश्य जरी एकाच मानवजातीचा भाग असले तरी स्वतःला स्पृश्य समाजणाऱ्यांनी जातिव्यवस्थेच्या नावाखाली मारलेला अस्पृश्यतेचा शिक्का एखाद्याच्या आयुष्याच्या चिंध्या कसे करून टाकतो हे "दगडूच्या" या आत्मकथनातून "दयाने" आपल्याला दाखवून दिले आहे. अस्पृश्य हा शिक्का बसलेली व्यक्ती हा जणू काही माणूसच नाही असे समजून वागणाऱ्या "सुसंस्कृतपणाची" कीव करावी वाटते. खेड्यात आणि मुंबईत दोन्हीकडे लहानाचा मोठा झाल्यामुळे दोन्हीकडचे आयुष्य जगलेला हा दगडू, पण शहर असो वा खेडे दोन्हीकडे अस्पृश्यांना दिली जाणारी वागणूक कशी सारखीच आहे याची अनेक उदाहरणे पुस्तकात वाचत असताना वाचकाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे एक माणूस म्हणून खेड्यापासून-शहरापर्यंत आपण केलेली प्रगती किती तकलादू आहे.

आपल्याला काल्पनिक वाटणाऱ्या कितीतरी घटना दगडूने अनुभवल्या आहेत याची काही उदाहरणे म्हणजे दारूच्या पूर्ण आहारी गेलेल्या दगडूच्या रसिक वडिलांकडून त्याला चोरीचा माल विकायचे शिक्षण मिळत असताना त्याच वेळी दगडू शाळेत 'बरे सत्य बोला' शिकत असतो. आणखी एक उदाहरण दगडूच्या जमनामावशीचे. देवाधर्माच्या नावाखाली दरिद्री आई-वडीलांनी यल्लमा देवीला वाहिलेल्या पोरांची पुढे वेश्या बाजारात विक्री होत असते आणि हेच आयुष्य जगणारी, वेश्याव्यवसाय करणारी दगडूची ही मावशी. वेश्याबाजारात पिंजऱ्यात बांधून ठेवलेल्या जमनामावशीचे दगडू साठी खाऊ हातात धरून त्याची वाट पाहणे, त्याच्यासोबत वेळ घालवून आपली वात्सल्याची भूक भागवणे आणि त्यानंतर बऱ्याच वर्षांनी तीच मावशी जेव्हा दयाला दादरच्या पुलाखाली भिकाऱ्यांच्या घोळक्यात भिक मागताना दिसते तेव्हा तिच्याशी साधा संवादही न करू शकणारा दया या घटना कितीही फिल्मी वाटल्या तरी लेखकांनी स्वतः अनुभवलेल्या आहेत. शिक्षणाशिवाय दलित समाजाची या सर्व जाचातून मुक्ती नाही होणार हे ओळखून आंबेडकरांनी दलितांसाठी शिक्षणसंस्था उभारल्या. बरेच दलित संघर्ष करून त्यातून शिक्षण घेऊन पुढे आले पण नंतर एक नवीनच पांढरपेशा दलित तयार झाला. जो आपल्याच अशिक्षित आणि पूर्णपणे दलित असणाऱ्या बांधवांपासून दूर जात गेला या नवीन वास्तवाचं दर्शन सुद्धा आपल्याला "बलुतं" मध्ये पाहायला मिळेल.

आपल्या विचित्र समाजव्यवस्थेविरुद्ध अतिशय चीड निर्माण करणारी या आत्मकथेतील एक घटना म्हणजे दयाला व्हेटर्नरी कॉलेजमध्ये क्लार्क-कम-लॅब-असिस्टंट म्हणून मिळालेली नोकरी. पूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या आजारी जनावरांच्या शेणाचे नमुने वेगळे ठेऊन तपासणे, मेल्यानंतर त्यांची कातडी सोलने अशी कामे करण्यास कोणी उच्चवर्णीय तयार नसल्यामुळे दयाला मिळालेली ही नोकरी. त्यावेळी दयाला पडलेला प्रश्न 'इतके शिकून पण आपल्या वाट्याला हे वडिलोपार्जित कामच का यावे?' या नोकरीसोबतच आपले शिक्षण चालू ठेऊन दया पवार घडत गेले. आपल्यावरील अस्पृश्यतेचा शिक्का पुसण्याचा प्रयत्न म्हणून दलित चळवळीत भाग घेतला पण तिथेसुद्धा त्यांना थोड्याफार फरकाने वेगळ्या वागणुकीचे अनुभव येतच राहिले. पुढे १९९० साली पश्चिम रेल्वेतून सिनिअर ऑडितर या पदावरून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.

अत्यंत साध्या शब्दांत लिहिलेली आणि वाचकाला हादरवून टाकणाऱ्या बऱ्याच घटनांनी भरलेली ही आत्मकथा आपल्याला वास्तवाचे जवळून दर्शन घडवून आणते. लेखकाचा "दगडूपासून" सुरू झालेला आणि "दयापर्यंत" येऊन संपलेला या आत्मकथनातील प्रवास वाचल्यानंतर आपण माणुसकीच्या आणखी जवळ जाऊन जगायचा नक्कीच विचार करतो. एक माणूस म्हणून वाचकाला अंतर्मुख होण्यास भाग पाडणारे दया पवारांचे आवर्जून वाचण्यासारखे हे आत्मकथन "बलुतं".




संदीप प्रकाश जाधव


Sunday, September 27, 2020

"अघटित"

 


लेखक : नारायण धारप

प्रकाशक : साकेत प्रकाशन


रहस्यकथा, भयकथा लेखनातील एक वजनदार नाव आणि ज्यांचे लेखन आवर्जून वाचावे अशा मोजक्याच लेखकांपैकी एक लेखक म्हणजे नारायण धारप. आपल्या खास लेखनशैलीने, रहस्यमय लेखनाने एक काळ गाजवणारे नारायण धारप. रहस्य कथांचा एक भाग बनून, पुढे काय होणार या उत्सुकतेने वाचक कथेमध्ये शेवटपर्यंत गुंतून राहील अशा रितीने लिहिलेल्या त्यांच्या थरारक कथा वाचकांना एक वेगळाच रोमांचक अनुभव देतात. त्यांच्या रहस्यकथा वाचल्यानंतर मनावर एक गडद सावट पडून वाटणारी भीती आणि तरीसुध्दा नवीन कथा वाचायची उत्सुकता हे त्यांच्या कथांचे वैशिष्ट्य. त्यांचे गाजलेले काही कथासंग्रह चंद्राची सावली, चेटकीण, अंधारयात्रा, लुचाई, काळी जोगीण, वेडा विश्वनाथ, मृत्यूजाल, विधाता आणि इतरही बरीच. धारपांच्या  भयकथांपासून प्रेरणा घेऊन निर्माण केलेला "तुंबाड" सिनेमा बऱ्याच लोकांनी पहिला असणार, त्या कथेच्या मंडणीवरुनच धारपांच्या कल्पनाशक्तीचा अंदाज आपण लावू शकतो. नारायण धारप यांच्या अशाच ७ दर्जेदार भयकथांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक "अघटित".

माणसाचं जीवन खूप गुंतागुंतीनी भरलेलं आहे. आपल्या आयुष्यात कोणत्या क्षणी काय होईल याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. खरं तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अशा काही अचंबित करणा-या घटना घडत असतात ज्यांची आपण कधी कल्पनासुद्धा केलेली नसते. आपण काही तरी वेगळीच अपेक्षा करीत असतो आणि घडते नेमके त्याच्या उलटेच. वेगळं काही तरी करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असतात आणि अचानकपणे असं एखादं वळण येतं, की आपण मांडलेला सारा डाव एका क्षणात विस्कटून जातो. काय होत आहे ते आपल्याला कळण्याच्या, ते आपण समजून घेण्याच्या आधीच सर्व काही घडून गेलेलं असतं. "हे असं कसं घडलं?" हा प्रश्न आपण आपल्यालाच आश्चर्यचकित होऊन विचारत राहतो. अशावेळी एकूण घटनाक्रमच आपल्या तर्काच्या पलीकडे जाणारा असतो. कशाचा म्हणून काही अंदाज करता येत नाही. विचार करून आपलं डोकं बधीर होऊन जातं आणि तरीही आपल्याला घडलेल्या घटनांचा काहीच मेळ लागत नाही. कारण त्या घटनाच अशा अकल्पित, अगम्य आणि आपल्या कल्पनेपलीकडच्या असतात. आपली विचारशक्ती जिथे संपते तिथून त्या घटना सुरू होत असतात. अशावेळी आपण सारेच त्या काळाच्या, नियतीच्या हातातील बाहुले होऊन जातो. शेवटी एका पातळीवर जाऊन आपण हे सत्य स्वीकारतो पण तरीही दुस-या पातळीवर मात्र आपण विचार करीत असतो, शोध घेत असतो, "हे असं कसं घडलं?" कारण ते सर्व अघटित असतं. अशा अनेक थरारक आणि रोमहर्षक असलेल्या अकल्पित, अघटित घटनांनी भरलेला नारायण धारप यांचा हा कथासंग्रह "अघटित".

७ कथांच्या या पुस्तकातील कथा वाचत असताना त्या थोड्याफार प्रमाणात एकाच प्रकारच्या जरी वाटत असल्या तरी प्रत्येक कथेची मांडणी वेगळी आहे, विषय वेगळा आहे जे वाचकाला कथेमध्ये बांधून ठेवतात. पुढे काय होईल हे अपेक्षित असूनसुद्धा पुस्तक हातातून सोडवत नाही. वाचकाला एका वेगळ्याच जगात घेऊन जाणाऱ्या अशा कथा. प्रत्येक कथेमध्ये असणारे नायक किंवा नायिका यांच्यासोबत घडणाऱ्या तर्कापालिकडच्या घटना आणि त्यातून निर्माण होणारे, अंगावर सरसरून काटा आणणारे भय वाचकांपर्यंत पोहचवताना धारपांनी कुठेही अतिशयोक्ती होणार नाही याचीही तितकीच काळजी घेऊन लिहिलेल्या या कथा. 

भयकथांची आवड असणाऱ्यांना नारायण धारप हे नाव आणि त्यांचे लेखन वेगळ्याने सांगायची आवश्यकता नाही पण इतरांनीसुद्धा एक वेगळं वाचन, एक वेगळा अनुभव म्हणून आवर्जून वाचावे अशा धारपांच्या पुस्तकांपैकी एक पुस्तक "अघटित".




संदीप प्रकाश जाधव




Sunday, September 20, 2020

"समांतर"

 



लेखक : सुहास शिरवळकर

प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन


सुहास शिरवळकरांची "दुनियादारी" ही कादंबरी मी १४ वर्षांपूर्वी वाचली होती. चित्रपटाच्या माध्यमातून या कादंबरीची कथा बऱ्याच लोकांपर्यंत पोहचली, पण पुस्तकामध्ये कादंबरीरूपात सुशिंच्या लेखनातून उलगडत जाणारी "दुनियादारी" वाचण्याचा अनुभव खासच होता. आयुष्यात वाचलेली ही माझी पहिलीच कादंबरी आणि जिथून पुस्तक वाचनाला खरी गती मिळाली. त्यानंतर आजअखेर बऱ्याच लेखकांची पुस्तके वाचून झाली पण सुशिंचे एखादे पुस्तक वाचायचा योग इतक्या वर्षांनंतर पुन्हा आला तो "समांतर" या सुशिंच्या कादंबरीवर आधारीत वेब सिरिजमुळे. या वेब सिरीजची माध्यमांमध्ये जी चर्चा चालू होती त्यामुळे ती पाहण्याची खूप इच्छा होती पण "दुनियादारीच्या" असणाऱ्या अनुभवामुळे तो मोह टाळून मी पहिला पुस्तक वाचायचा निर्णय घेतला आणि तो निर्णय किती योग्य होता हे कादंबरी वाचनास सुरुवात केल्यानंतर जाणवले. आपल्या आयुष्यात भविष्यकाळात काय वाढून ठेवलंय याची कोणालाच कल्पना नसते पण तरीही अशी एकही व्यक्ती नाही सापडणार जीला आपले भविष्य जाणून घेण्याची इच्छा नसेल. याच इच्छेखातर आणि उत्सुकतेमुळे आपण कधी वर्तमानपत्रात तर कधी एखाद्या ज्योतिष्याकडे आपले भविष्य जाणून घेण्याचा निष्फळ प्रयत्न करत असतो. याच विषयावर आधारीत सुहास शिरवळकरांनी लिहिलेली ही १९६ पानांची, वाचकाला एका वेगळ्याच जगात घेऊन जाणारी, भविष्याचा वेध घेणारी थरारक आणि रहस्यमयी कादंबरी "समांतर". 

नशिबाला कंटाळलेली एक व्यक्ती, कुमार महाजन हा या कादंबरीचा नायक. मुंबईमध्ये आपली पत्नी आणि मुलासोबत राहणारा तिशीतला एक मध्यमवर्गीय तरुण म्हणजे हा कुमार महाजन. आयुष्यात घडू नयेत अशा घडणाऱ्या घटना आणि आर्थिक विवंचनेत नेहमीच संघर्षमय जीवन जगावे लागणारा हा कुमार. त्याला या परिस्थितीला कंटाळलेला पाहून आणि त्याच्यावर असलेल्या प्रेमाखातर त्याचा कार्यालयीन मित्र वाफगावकर त्याला एका प्रसिद्ध ज्योतिष्याकडे येण्यासाठी आग्रह करतो. देवांवर आणि ज्योतिष्यावर विश्वास नसणारा कुमार मित्राच्या आग्रहास्तव ज्योतिष्याकडे जातो खरा पण त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलेल्या काही अचूक गोष्टींमुळे त्याचा स्वामींवर विश्वास बसतो. पण कुमारचा हात पहायला घेताच स्वामी त्याला भविष्य सांगण्यास नकार देतात आणि अशा व्यक्तीचे नाव घेतात जे कुमारने पूर्वी कधीच ऐकलेलं नसतं. तीस वर्षांपूर्वी स्वामींकडे आलेला सुदर्शन चक्रपाणी आणि कुमार यांच्या भविष्यरेषा सारख्याच असल्याचं स्वामी कुमारला सांगतात. स्वामींनी अपले भविष्य सांगण्यास नकार दिल्याने चिडलेला कुमार दोन लोकांच्या हस्तरेषा समान असणं केवळ अशक्य आहे असं म्हणून तिथून बाहेर पडतो पण त्यानंतर त्याच्या आयुष्यात एकामागून एक घडणाऱ्या धक्कादायक गोष्टींमुळे अस्वस्थ होतो. स्वामींवर बसलेल्या विश्वासामुळे कुमार त्याचा मित्र वाफगावकरसोबत सुदर्शन चक्रपाणी बद्दल माहिती मिळवायला चालू करतो. शोध घेत असताना त्यांना कुमार आणि सुदर्शन चक्रपाणीच्या आयुष्यात घडलेल्या समान गोष्टीबद्दल समजतं आणि इथेच कुमारला झालेली, अंगावर काटा आणणारी जाणीव म्हणजे सुदर्शन चक्रपाणीचा भूतकाळ हा कुमारचा भविष्यकाळ आहे. "समांतर" म्हणजे एकाचा भूतकाळ तो दुसऱ्याचा भविष्यकाळ ! इथून सुरुवात होते या कादंबरीच्या थरारक आणि रहस्यमयी प्रवासाची.

कुमारने त्याच्या कंपनीमध्ये केलेल्या अफरातफरीमुळे त्याच्या पन्हाळ्याला झालेल्या बदलीनंतर ही कथा एका वेगळ्या वळणावर जाऊन वेग पकडते. या दरम्यान सुदर्शन चक्रपाणीच्या आयुष्यात घडून गेलेल्या बऱ्याच घटनांची कुमारला मिळालेली माहिती आणि त्या सर्व घटनांचे कुमारच्या आयुष्यात घडत असणाऱ्या घटनांशी असणारे साधर्म्य यामुळे कथेचं गूढ वाढत जाते. आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींचं चक्रपाणीच्या भूतकाळाशी असणारं साधर्म्य कुमारला बेचैन करत राहतं आणि त्यातूनच तो सुदर्शन चक्रपाणीला प्रत्यक्ष भेटता यावं यासाठी पुन्हा एकदा जोमाने त्याचा शोध चालू करतो. चक्रपाणीच्या शोधात कुमारचा मध्यप्रदेशातील पालान हे छोटेसे गाव आणि तिथून रेतीमैदानातील चक्रपाणीच्या हवेलीपर्यंतचा प्रवास यांचं सुशिंनी केलेलं थरारक, रोमांचक  वर्णन वाचकाला कथेत गुंतवून ठेवते. पालानमध्ये जेव्हा कुमार सुदर्शन चक्रपाणीला प्रत्यक्ष भेटतो तेव्हाही त्याला त्याच्या आयुष्यात घडत असणाऱ्या आणि सुदर्शन चक्रपाणीच्या आयुष्यात घडून गेलेल्या अनेक समांतर गोष्टींचा उलगडा होतो. कुमारला स्वतःचं भविष्य जाणून घेण्याची असणारी उत्सुकता आणि त्याने केलेल्या आग्रहामुळे चक्रपाणी त्याला आपण लिहिलेल्या डायरी वाचायला देतो पण त्यासाठीची असणारी अट म्हणजे कुमारला दररोज एकच पान वाचावं लागणार. डायरी मिळाल्यानंतर कुमारला स्वर्ग जणू दोन बोटे उरतो. पण नियती कोणाला चुकत नाही या उक्तीप्रमाणे चक्रपाणीच्या भूतकाळातील घटना कुमारच्या आयुष्यात घडत राहतात, भले त्या घडण्याचे कारण वेगळे असेल पण परिणाम तेच असतात जे चक्रपाणीने अनुभवलेले. डायरीतले प्रत्येक पान हे कुमारचा उद्याचा दिवस कसा आहे हे सांगत असतं, पण शेवट मात्र अधांतरीच असतो. सुदर्शन चक्रपाणीच्या भुतकाळात घडून गेलेल्या घटना आपल्या भविष्यकाळात घडू नयेत म्हणून कुमार काळजी घ्यायला सुरुवात करतो. तरीही मध्यंतरी त्याच्या आयुष्यात एक अशी घटना घडते की त्यामुळे त्याच्या पुढच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळते आणि ही कथा शेवटाकडे जायला लागते. कुमार महाजन भोवती फिरत राहणाऱ्या या कथेचा अतिशय अनपेक्षितरित्या होणारा शेवट वाचकाला धक्का देऊन जातो.

हातामध्ये डायऱ्यांच्या रुपात स्वतःचं भविष्य माहित असणारा कुमार महाजन भविष्यात होऊ घातलेल्या घटना टाळण्यात यशस्वी होतो की नाही हे आपल्याला कादंबरी वाचल्यावरच समजेल. वाचकाला कादंबरीमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवण्यात सुशिंनी प्रचंड यश मिळवलंय. रहस्यमय घटनांनी खचाखच भरलेली आणि वाचत असताना शेवट काय असेल या विचाराने सतत आपली उत्कंठा वाढवणारी आवर्जून वाचण्यासारखी  सुहास शिरवळकरांची ही कादंबरी "समांतर".



संदीप प्रकाश जाधव

Sunday, September 13, 2020

"धग"

 


लेखक : उद्धव ज. शेळके

प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन


स्त्री म्हणजे शक्ती, शुद्ध ऊर्जा यांचे मूर्त स्वरूप. या शक्तीची विशालता परिमाणापलीकडे आहे. मनात आणले तर एक स्त्री काय करू शकते याची शेकडो उदाहरणे अगदी हजारो वर्षांपूर्वीपासून सुद्धा आपल्याला मिळू शकतील. आजच्या युगातसुद्धा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून, स्वतःचं वेगळं असं अस्तिव निर्माण करून, ताठ मानेने समाजात वावरत असणाऱ्या बऱ्याच स्त्रियांची उदाहरणे आहेत. उद्धव शेळके यांची ही कादंबरी, "धग" म्हणजे अशाच एका सामान्य स्त्रीची असामान्य कहाणी आहे.

उद्धव शेळकेंनी १९६० साली लिहिलेल्या या कादंबरीची वास्तवता वाचकाला आजही जाणवत राहते. ही कादंबरी म्हणजे अमरावती जिल्ह्यातल्या एका शिंपी कुटुंबाची कहाणी. कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे "कौतिक" नावाची शिंपीण. जरी कौतिकला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली ही कहाणी असली तरी सोबतच या कादंबरीतील इतर पात्रे जसे कौतिकचा भाऊ गोविंदा भाऊजय गंगा, तिची आई गोदूबाई, नवरा महादेव, त्यांची मुलं भीमा-नामा-यसोदी, सासरा रघुनाथ, शेजारणी सीता-सकीना आणि कासम सुद्धा तितकीच महत्वाची. अनेक चढ-उतारांनी भरलेली अशी ही कादंबरी. वर्‍हाडी भाषेत लिहिलेली ही कादंबरी सुरुवातीला थोडी कठीण वाटते, पण संदर्भातून पुढे सगळे स्पष्ट होत जाते. कौतिकचा नवरा महादेव तिच्या मानाने सगळ्याच बाबतीत कमी उत्साही. तो प्रयत्न करत नाही असं नाही, पण निरुत्साह आणि अपयशामुळे ढेपाळतो. त्याला शिवणकाम येत असतं पण त्यात मन रमत नाही. सुरुवातीला कौतिकच्या भावासोबत शिवणकाम करणारा महादेव अचानकच सर्व सोडून कुटुंबासह आपल्या मूळ गावी येतो आणि इथूनच चालू होते कौतिकची कहाणी. वावरात मोलमजूरी करण्याबाबत कंटाळा - कमीपणा वाटणारा महादेव आणि आपली २ मुले  भीमा-नामा यांना सोबत घेऊन चालू होते कौतिकची धडपड, स्वाभिमानाने जगण्यासाठी.

पूर्णतः ग्रामीण वातावरणातील या कादंबरीतून विदर्भातले दैनंदिन ग्रामीण जीवन उद्धव शेळकेंनी आपल्यासमोर मांडले आहे. कादंबरीच्या सुरुवातीला लहान असणारी तिची दोन मुलं - भीमा आणि नामा, शेवट होईपर्यंत मोठी होऊन आपापल्या परीने आयुष्य जगायला लागतात. भीमा गुंड बनतो, जे काय हवं ते हिसकावून घेतल्याशिवाय मिळत नाही हा धडा परिस्थितीच त्याला शिकवते. याउलट नामाला कोणतीही गोष्ट मनापासून शिकायची हौस असते आणि शेवटी परिस्थितीसोबत आपल्या आशा-अपेक्षांची तडजोड करायला तो शिकतो. कादंबरीमध्ये कौतिक केंद्रस्थानी असली तरी कादंबरीचे अंत:करण हा नामा आहे, हे वाचकाला हळूहळू उलगडत जातं. नामाच्या डोळ्यातूनच वाचक शेवटी वास्तवाकडे पाहतो. नकळतपणे जीवनाची जबाबदारी कौतिककडून नामाकडे सोपवली जाते. जातीव्यवस्थेमुळे पारंपरिकरित्या महादेवकडे आलेलं शिंपीपण या कुटुंबाला रोजगार आणि सामाजिक आधार देण्यात कमी पडते. पारंपारिक विद्या जोपासायचं आणि वारसा चालवायचं उत्तम साधन म्हणून जातसंस्थेच्या अस्तित्वाचं कारण आजही सांगितलं जातं पण ते किती तकलादू आहे हे या कुटुंबाची होणारी परवड वाचताना समजते आणि वाचकाला अंतर्मुख होण्यास भाग पाडते. महादेवाला ही विद्या त्याच्या वडिलांकडून कमीजास्त प्रमाणात मिळते, पण त्याच्या पुढच्या पिढीतला नामा मात्र दोन्हीकडे फसतो. ही पारंपारिक जातीची विद्या त्यांच्या जातसमूहातून तर त्याला मिळतच नाही, पण त्याला आधुनिक शाळेतील शिक्षणही गरिबीमुळे मिळत नाही. कथानकाच्या शेवटी गहाण ठेवलेलं मशीन परत आणताना त्याचं ओझं कौतिकला पेलवत नाही आणि तिच्या पाठीला जखम होते, जणू काही त्या सर्व पारंपारिक साच्यातल्या अपेक्षांखाली ती शेवटी कोसळते. पारंपारिक नात्यांचा कोणताच आधार उरत नाही आणि शेवटी सगळ्यांची फारकत होते. भीमा आणि महादेव भटकत राहतात आणि नामा-कौतिक हे दोघे सोबत राहूनही खर्‍या अर्थाने एकत्र राहत नाहीत.

कौतिकची आपला संसार उभारण्याची धडपड आणि जिद्द वाचून आपल्याला नवीन आशा मिळते. कितीही कठीण प्रसंगापुढे गुढघे न टेकता त्याला सामोरी जाणारी कौतिक वाचत असताना आपल्यालाही एक प्रकारची ऊर्जा देऊन जाते. भूतकाळात लिहीलेली ही संपूर्ण कादंबरी शेवटी मात्र वर्तमानकाळाचा वापर करून, जातीव्यवस्था आजही कायम असल्याचे बिंबवते. वाचकाला कमालीचे अस्वस्थ करून होणारा या कादंबरीचा शेवट.

एका सामान्य शिंपिणीची, परिस्थितीविरुद्ध तिने दिलेल्या लढ्याची ही कहाणी. कठोर वास्तवाचे दर्शन घडवणारी, आवर्जून वाचावी अशी उद्धव शेळकेंची कादंबरी "धग".




संदीप प्रकाश जाधव

Sunday, September 6, 2020

"घनगर्द"

 

लेखक : हृषीकेश गुप्ते

प्रकाशक : रोहन प्रकाशन


आजच्या घडीला ज्यांच्या भयकथा - गूढकथा आवर्जून वाचाव्यात असे आणि ज्यांच्या "दंशकाल" या कादंबरी वाचनानंतर माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक झालेले लेखक म्हणजे हृषीकेश गुप्ते. "दंशकाल" शिवाय त्यांची इतर पुस्तके "चौरंग", "दैत्यालय", "अंधारवारी", "कालनिर्णय", "हाकामारी", "काळजुगारी" सुद्धा खासच आहेत. भयकथा - गूढकथा या कल्पनेवर आधारित असतात आणि हृषीकेश गुप्ते यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची जबरदस्त कल्पनाशक्ती. पण कल्पनाशक्तीतून साकारलेल्या कथा या तेव्हाच परिणामकारक होतात जेव्हा त्यांची उत्कृष्ट मांडणी केली जाते. हृषीकेश गुप्तेनीं लिहिलेलं प्रत्येक पुस्तक आणि कथा परिणामकारक असण्याचं सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्या कथांची केलेली मांडणी, जी वाचकाला त्या घटना आपल्या डोळ्यासमोर उभ्या करते. याशिवाय काल्पनिक जरी असल्या तरी काही काही कथांमधून नकळत दिला जाणारा संदेश जो वाचकाला अंतर्मुख होण्यास भाग पाडतो. हृषीकेश गुप्ते यांच्या कल्पनेतून साकारलेल्या अशाच ५ वेगवेगळ्या रोमांचक आणि थरारक कथांचा हा कथासंग्रह म्हणजे "घनगर्द".

पहिली कथा "घनगर्द" फिरते नुकत्याच तारुण्यात प्रवेश केलेल्या गार्गी भोवती. कथेची सुरुवात होते माथेरानच्या डोंगरकड्यावरून, मंकी पॉइंटवरून एका माकडाच्या हल्ल्यात दरीमध्ये कोसळणारी गार्गी आणि तिला वाचवायला जाऊन तोल गेल्याने तिच्यासोबतच दरीत कोसळणारे तिचे वडिल या घटनेपासून. गार्गीला केंद्रस्थानी ठेवून भय आणि त्याच्या वेगवेगळ्या रुपांतून पुढे सरकणारे हे पहिल्या कथेचे कथानक. मंकी पॉइंटवरून दरीत पडताना वाटणारी मरणाची भीती, तारुण्यात प्रवेश करताना वाटणारी नैसर्गिक भीती, आई-वडिलांच्या सततच्या तणावपूर्ण नात्यामुळे वाटणारी भीती, एक मुलगी म्हणून समाजात वावरत असताना वाटणारी भीती अशा वेगवेगळ्या भीतीच्या छटांमधून उलगडत जाणारी ही पहिली कथा वाचताना हृषीकेश गुप्ते यांच्या लिखाणाचे वेगळेपण जाणवत राहते. डोंगरकड्यावरून खोल दरीत कोसळताना झाडाच्या फांद्यांमध्ये अडकलेल्या गार्गीला, त्या गर्द अंधारात खोल दरीमध्ये अधांतरी लटकत असताना फ्लॅशबॅकमधे आठवणाऱ्या काही घटना आणि त्या घटनांना जोडून येणारे भय यांचे अगदी अफलातून वर्णन या पहिल्या कथेत वाचायला मिळेल. यासर्वांबरोबरच आपल्यासोबत दरीत पडलेल्या वडिलांच्या आठवणीने वाटणारे भय, त्यांना शोधण्यासाठी गार्गीने त्या गर्द अंधारात केलेली धडपड, अर्धमेल्या अवस्थेत नजरेस पडलेल्या वडिलांना पाहून गार्गीची झालेली अवस्था, त्याच परिस्थितीत वडिलांशेजारी झोपून काढलेली रात्र आणि तिथून सुटका होईपर्यंत वडिलांचा झालेला मृत्यू हे सर्व कथेत मांडत असताना हृषीकेश गुप्ते यांनी ती घटनाच आपल्यापुढे उभी केली आहे. अगदी चंद्राच्या प्रकाशात पडलेली डोंगराची सावलीसुद्धा त्यांच्या शब्दरचनेमुळे आपल्या पुढ्यात येते. वडिलांचे छत्र हरवल्यानंतर आपल्या आयुष्यात अक्राळविक्राळ, भीतिदायक माणसांच्या "घनगर्द" जंगलाची झालेली सुरुवात आणि त्यातून  बाहेर पडण्याची वाट आता स्वतःलाच शोधावी लागणार या गार्गीला झालेल्या जाणीवेने झालेला या कथेचा शेवट.

दुसरी कथा "पावसात आला कोणी" ही फिरते एका लेखकाभोवती. वास्तव आणि कल्पना यांच्या एकत्रिकरणातून निर्माण होणारे भय आणि त्यातून पुढे सरकणारे असे या कथेचे कथानक. एका प्रतिभावान लेखकाच्या कल्पनांना अचानक लागलेला ब्रेक आणि त्यामुळे तब्बल ३ वर्षांहून अधिक काळ कोणतेच लिखान न झाल्याने त्याच्या मनाची होणारी घालमेल ही या कथेत भयाच्या केंद्रस्थानी आहे. एक दिवस अचानकच मुसळधार पावसात लेखकाच्या घरी आलेली एक व्यक्ती आणि त्याच्यासोबतच्या संवादातून उलघडत जाणारे रहस्य म्हणजे ही कथा. लेखकाने लिहिलेल्या प्रत्येक पुस्तकाची कथा ही लेखकाने लिहिण्यापूर्वी, त्या कथेची कल्पना फार आधी मला सुचली होती आणि ती कल्पना लेखकाने चोरली असा दावा करणारी ही पावसात आलेली व्यक्ती. एखाद्याच्या डोक्यातील विचार किंवा कल्पना चोरता येणं निव्वळ अशक्य आहे असे म्हणून सुरुवातीला त्या व्यक्तीवर विश्वास न ठेवणाऱ्या लेखकला शेवटी त्या व्यक्तीसोबत झालेल्या संवादातून, त्याने दिलेल्या पुराव्यातून आपल्या कल्पनाशक्तीला ३ वर्षे ब्रेक कशामुळे लागला याचं लेखकाला मिळालेलं उत्तर म्हणजे ही कथा. सत्य आणि कल्पना यांचा परस्परांवर होणारा परिणाम किती खोलवर असतो याच्या जाणिवेसह झालेला या कथेचा शेवट.

तिसरी कथा "पानगळ" लिहिली गेलेय कोकणातील फुलवर्धन या गावातील देवधर वाड्याला केंद्रस्थानी ठेवून. कथा फिरते नाथा आणि त्याचा मित्र रघू यांच्याभोवती. या कथेतील भय हे नाथा आणि रघू यांनी लहानपणी नकळत केलेल्या अपराधाशी निगडित आहे. देवधर काकू आणि त्यांचा देवधर वाडा हा संपूर्ण गावासाठी एक भीतीयुक्त कुतूहलाचा विषय. याच देवधर वाड्यातील एका हापूस आंब्याच्या लहानपणी गंमत म्हणून केलेल्या चोरीमुळे नाथा आणि रघू यांच्या आयुष्याची कशी वाताहत होते याची ही एक थरारक कहाणी. आंब्याच्या चोरीनंतर एखाद्या "पानगळीप्रमाणे" नाथाच्या कुटुंबातील व्यक्तींच्या झालेल्या मृत्यूमुळे आपल्या आईसोबत फुलवर्धन सोडलेला नाथा पुढे २० वर्षे याच भीतीखाली जगला की आपल्या कुटुंबाची झालेली ही "पानगळ" म्हणजे देवधर काकूंनी दिलेल्या शापाचाच परिणाम. आणि याच भितीमुळे भिकेला लागून गावची वेस सुद्धा ओलांडू न शकलेला रघू. फ्लॅशबॅकमधे उलगडत जाणाऱ्या या कथेत नाथा आणि रघू जेव्हा लहानपणी पहिल्यांदाच देवधर वाड्यात जातात त्यावेळचे वाड्याच्या आतील आणि आजूबाजूच्या परिसराचे हृषीकेश गुप्ते यांनी केलेलं थरारक वर्णन एखाद्या हॉरर चित्रपटाचा प्रसंगच आपल्यासमोर उभा करते. पुढे तब्बल २० वर्षांनी देवधर वाड्यात हापूस बहरल्यानंतर रघूने नाथाला फुलवर्धनला बोलावून घेणे आणि दोघांच्याही आयुष्याची अशी वाताहत नेमकी का झाली याचा लागलेला शोध म्हणजे ही थरारक कहाणी.

चौथी कथा आहे "मुआवजा". या कथेतील भय फिरते गावाकडच्या उरुसामध्ये घडलेली एक घटना आणि सुखी आयुष्य जगायला मिळवण्यासाठी चुकते करावे लागणाऱ्या अज्ञात मोबदल्याभोवती. कथेचा नायक जो गावामध्ये वर्षानुवर्षे भरणाऱ्या उरुसामध्ये एका म्हाताऱ्याकडून स्वतःसाठी आयुष्यभराचे सुख मागून घेतो पण त्यासाठी असणारी अट म्हणजे त्या म्हाताऱ्याला द्यावा लागणारा मोबदला जो नायकासाठी अज्ञात असेल. मग तो कदाचित त्याने त्या म्हाताऱ्याकडे येण्यापूर्वीच चुकता केला असेल किंवा त्याला तो नंतरच्या आयुष्यात द्यावा लागेल. २१ वर्षे आपल्याला हवे तसे आयुष्य जगल्यानंतर तो मोबदला जाणून घेण्यासाठी नायक जेव्हा गावात परत येतो तेव्हा फ्लॅशबॅकमधे उलगडत जाणारे या कथेचे कथानक. पुस्तकातील बाकी कथांप्रमाणेच या कथेमधील पार्श्वभूमीचे वर्णनसुद्धा नायकासोबत घडलेल्या घटना आपल्या डोळ्यासमोर घेऊन येते. खासकरून हृषीकेश गुप्ते यांनी जे उरुसाचे अगदी अप्रतिम वर्णन कथेत केलेलं आहे ते ज्या वाचकांनी असा उरुस बालपणी अनुभवला आहे त्यांना त्याची नक्कीच आठवण करून देईल. २१ वर्षे तो अज्ञात "मुआवजा" काय असेल या भीतीमध्ये गेल्यानंतर, तो "मुआवजा" नेमका काय आहे हे जेव्हा नायकाला समजते तेव्हा त्या भीतीचे रूपांतर अधिकच भयानक चिंतेमध्ये होऊन संपणारी ही कथा. कथेतील म्हाताऱ्याच्या तोंडचे एक आवडलेलं वाक्य - " डोळ्यांतल्या पाण्यावरून दुःखाची, वा गालांवर उमललेल्या खळीवरून सुखाची कल्पना नाही करता येत. खरं दुःख जेव्हा वाट्याला येतं तेव्हा विंचवाच्या नांगीनं काळीज कुरतडतं आणि खरं सुख जेव्हा लाभतं तेव्हा जगण्याची मनीषाच संपते."

शेवटची पाचवी कथा आहे "रमलवाटा". थोड्याश्या वेगळ्या प्रकारचे भय आपल्यासमोर घेऊन येणारे या कथेचे कथानक. एका मोठ्या लेखकाभोती फिरणारी ही कथा. वास्तव आणि कल्पना या दोन्हींच्यामध्ये जो एक सामायिक प्रदेश असतो त्या प्रदेशात लेखकाच्या आयुष्यात घडलेली घटना म्हणजे ही कथा. भयकथा लेखनाने प्रसिद्धी मिळाल्यानंतर भयकथांचा मार्ग सोडून इतर लेखनाकडे वळलेला लेखक आणि त्यामुळे अर्ध्यावर सोडून दिलेल्या काही भयकथा यांतून जन्म घेणारे या कथेचे कथानक. वि.वि. दिवेकर नामक एका व्यक्तीचे एक चाहता म्हणून लेखकाच्या आयुष्यात आल्यानंतर सुरुवात होते या कथेची. "सांगितल्या नाहीत, तर कथा मरतात." असे म्हणणारा हा दिवेकर. कथेचा शेवट काय होणार याचा थोडासाही अंदाज न लागू देता वाचकाला एका वेगळ्याच वळणावर घेऊन जाऊन संपलेली अशी ही कथा. दिवेकरांसोबत सुरुवातीला कुतूहल म्हणून लेखकाने चालू केलेली चर्चा नंतर त्याला भीतीकडे घेऊन जाते आणि एक विस्मयकारक शेवट करते. दिवेकर ही व्यक्ती कोण आणि ती लेखकाच्या आयुष्यात अचानकपणे का आली याच्या धक्कादायक शोधानंतर लेखकाचे पुन्हा भयकथा लेखनास सुरू करणे हा या कथेचा शेवट.

हृषीकेश गुप्ते यांनी या पुस्तकामध्ये लिहिलेल्या ५ कथा म्हणजे भय कथांची आवड असणाऱ्यांसाठी पंचपक्वानासारख्याच. हृषीकेश गुप्ते यांच्या खास शैलीतील लिखाणासाठी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक "घनगर्द".




संदीप प्रकाश जाधव




Sunday, August 30, 2020

"अमृतवेल"


लेखक : वि. स. खांडेकर

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस



ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक वि.स.खांडेकर यांची "ययाती" ही अजरामर कादंबरी खूप आधी वाचली होती, त्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांचे पुस्तक वाचण्याचा योग आला तो त्यांनी लिहिलेल्या "अमृतवेल" या कादंबरीमुळे. १९६७ साली प्रकाशीत झालेली १५० पानांची ही छोटेखानी कादंबरी आजही वाचायला घेेतली तरी वाचताना त्यामध्ये आपण हरवून जावे असे कथानक. मानवी मन किती विचित्र आहे आणि त्याच्या विविध छटा ही कादंबरी वाचत असताना आपल्याला जाणवत राहतात. मानवी मन हे एकाचवेळी वर्तमान, भूत आणि भविष्यकाळ असे फिरत असते, पण त्याला कधीच भूतकाळाच्या आठवणींनी जखडून ठेवता येत नाही. ते नेहमीच झेपावत असते भविष्यातील स्वप्नांकडे आणि हे करत असताना ते वर्तमानकाळात समोर आलेल्या परिस्थितीचा, प्रसंगांचा आपल्या सोयीने चांगले-वाईट अर्थ लावत असते. माणसाच्या आयुष्यात काही प्रसंग अगदी विचित्र असतात, अशा वेळी आपले मन अगदी जवळच्या माणसाशीसुद्धा बोलायला धजावत नाही आणि काहीवेळा हेच मन अनोळखी व्यक्तींकडेसुद्धा ओढले जाते. मानवी मनाचा अचूक वेध घेणारी वि. स.खांडेकरांनी लिहिलेली ही कादंबरी "अमृतवेल".

कादंबरीची कथा फिरते नंदाभोवती. कादंबरीच्या कथेचे मुख्य पात्र जरी नंदा ही एक उच्चशिक्षित तरुणी असली तरी इतर पात्रे जसे दादा, माई, मिलिंद, दासबाबू, वसुंधरा, देवदत्त, मधुरा, बापू, मोहन, पार्वती आणि गंगाराम यांच्याशिवाय कथा अपूर्णच ठरेल. सोबतच चंचल हे हरणाचे  पाडससुद्धा तितकेच महत्वाचे आहे या कथेमध्ये. दुःख हा मानवजातीला लागलेला शापच आहे असे म्हटले तरी चालेल पण कधी कधी हेच दुःख माणसाला अंतर्मुख करते, दुसऱ्यांशी असलेलं आपलं नातं अधिक दृढ आणि स्पष्ट करते. कथेची सुरुवात दादा, माई आणि नंदाच्या आयुष्यात आलेल्या अशाच दुःखाने होते. आपला वैमानिक प्रियकर शेखरसोबत सुखी वैवाहिक आयुष्याची स्वप्ने रंगवत असताना अचानकच विमान अपघातात झालेला शेखरचा मृत्यू नंदाला दुःखाच्या खाईत घेऊन जातो. याच दुःखातून आलेल्या नैराश्यामुळे आत्महत्या करायला गेलेली नंदा तिला आलेल्या दादा, माई आणि छोट्या मिलिंदच्या आठवणीने परत फिरते. त्यानंतर दादांसोबतच्या पत्रातून झालेल्या संवादामध्ये तिला तिच्यापेक्षाही जास्त दुःख सहन करून खंबीरपणे आयुष्याला सामोरे जाणारे दादा समजतात. या पत्राच्या माध्यमातून दोघांमध्ये झालेला संवाद आणि त्यांद्वारे दोघांचे एकमेकांजवळ व्यक्त होण्यातून प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे, दुःख कितीही मोठे असले तरी जवळच्या माणसाशी बोलल्याने त्यातून बाहेर पडण्याचे बळ नक्कीच मिळते. याच पत्रात दादांनी नंदाला दिलेला सल्ला म्हणजे स्वप्नभंग हा माणसाचा कायमच सोबती आहे, पण माणसाचं मोठेपण आपल्या वाट्याला आलेलं सारं दुःख सहन करून नवीन स्वप्नं पाहण्यात आहे. दुःखाच्या पिंजऱ्यात स्वतःला बंदिवान करून घेऊ नकोस. पिंजऱ्याचं दार उघड, पंख पसर आणि आकाशात भरारी मार. जीवनाचा अर्थ त्या आकाशाला विचार. नंदासोबतच आपण सर्वांनीसुद्धा अनुसरण करावे असे हे विचार. दादांच्या बोलांनी मनोबल उंचावलेल्या नंदाने स्वत:ला सावरत, प्रीतीचा, आयुष्याचा खरा अर्थ नेमका काय असतो याचा घेतलेला शोध म्हणजेच ही कादंबरी "अमृतवेल".

दादांच्या सल्ल्यानुसार आपली पी. एच. डी. पूर्ण करण्यासाठी दासबाबूंकडे गेलेल्या नंदाला अगदी अनपेक्षितपणे तिची जुनी मैत्रीण वसुंधरा हिची कंपॅनिअन बनून फिट्स येणारी तिची मुलगी मधुरा हिला सांभाळण्याचा प्रस्ताव येतो. वसुंधरा एक अनाथ मुलगी, नंदाची कॉलेजमधील मैत्रीण, जी शिक्षण अर्धवट सोडावे लागून देवदत्त सोबत झालेल्या लग्नानंतर विलासपूरची जहागिरदारीण झाली. जरी विलासपूर हे मुंबईपासून दूर असले तरी दादा आणि माई हा एकच विचार करून परवानगी देतात की यानिमित्ताने नंदा आपले शेखरचे दुःख विसरून जाईल. पुढे वसुंधरासोबत विलासपूरला आल्यानंतर तिच्या ऐश्वर्याने चकित झालेल्या नंदाचे मधुरासोबत एक भावनिक नाते तयार होते. पण इतके ऐश्वर्य असूनसुद्धा नेहमी दुःखात असणारी वसुंधरा नंदाला जाणवते. सतत देवदत्तचा तिरस्कार करणारी, मधुराला त्याच्यापासून नेहमी दूर ठेवणारी वसुंधरा नेमक्या कोणत्या दुःखात आहे याचा नंदाने घेतलेला शोध आपल्याला कादंबरीत वाचायला  मिळेल. हा शोध घेत असताना नंदाला वसुच्या कुटुंबातील अनेक रहस्ये समजतात, जसे देवदत्तचा त्याच्या आई- वडिलांसोबतच्या नात्याचा इतिहास, वयाच्या १०व्याच वर्षी देवदत्तचं व्यसनी बनण्याचं नेमकं कारण, वसुच्या आत्मकेंद्री होण्यासाठी जबाबदार गोष्टी आणि मधुराला फिट्स येण्यास कारणीभूत घटना. देवदत्त-वसुच्या नात्यात निर्माण झालेल्या दरीचे नेमके कारण समजल्यानंतर नंदाला स्वतःचे दुःखसुद्धा लहान वाटू लागते.  देवदत्तसोबत झालेल्या नंदाच्या ओळखीनंतर त्याच्या वाचनाच्या आवडीने प्रभावित होऊन, नकळत त्याच्यावर प्रेम करू लागणारी नंदा स्वत:चं दु:ख बाजूला ठेऊन  देवदत्त आणि वसुंधरा यांच्या नात्याला पुन्हा जोडणारा पूल कसा बनते, दुःखाच्या डोहात तुटून गेलेली त्यांची नात्याची दोर कशी जोडते याचं अतिशय सुंदर आणि वाचकाला अंतर्मुख करायला लावणारे वर्णन वि. स. खांडेकरांनी "अमृतवेल"मधे केलेलं आहे.

मानवी मनाचा वेध घेणारी आणि जीवनाचा अर्थ समजावत असताना आपल्याला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी, सर्वांनी आवर्जून वाचावी अशी वि. स. खांडेकरांची अप्रतिम कादंबरी "अमृतवेल"






संदीप प्रकाश जाधव

Sunday, August 23, 2020

"अंतर्बाह्य"



लेखक : रत्नाकर मतकरी

प्रकाशक : मनोविकास प्रकाशन



‌मराठी साहित्यामधे गूढकथा हा प्रकार ज्या लेखकांनी लोकप्रिय केला त्यांमध्ये सर्वात प्रथम ज्यांचे नाव घ्यावं लागेल ते म्हणजे रत्नाकर मतकरी यांचे. यावर्षीच १७ मे २०२० रोजी त्यांचा वयाच्या ८१ व्या वर्षी कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. रंगभूमी आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात मोठं नाव असलेल्या काही मोजक्याच लोकांपैकी ते एक होते. रत्नाकर मतकरी यांनी वेगवेगळ्या विषयांवर बरीच पुस्तके, एकांकिका, नाटके लिहिली पण त्यांनी हटके अंदाजात लिहिलेल्या गूढकथा थोड्या खासच. जवळपास २०० पेक्षा जास्त गूढकथा त्यांनी लिहिल्या आणि वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत पोहचल्या. त्यांनी लिहिलेली काही पुस्तके खेकडा, गहिरे पाणी, बकासुर, कबंध, रंगांधळा, अ‍ॅडम, रंगयात्री आणि बरीच. रत्नाकर मतकरींनी जवळपास २३ कथासंग्रह लिहिले त्यांपैकीच एक गूढकथासंग्रह म्हणजे "अंतर्बाह्य".

गूढकथा आणि भयकथा यांमधील नेमका फरक जो एक वाचक म्हणून माहीत असणं महत्त्वाचं आहे, तो रत्नाकर मतकरी यांनी अगदी सहज, सोप्या भाषेत त्यांच्या या "अंतर्बाह्य" पुस्तकाच्या सुरुवातीलाच सांगितला आहे. नेहमीच्या पाहण्यात नसलेलं, ज्याची कदाचित भीती वाटू शकेल पण ते भीतिदायक नाही ते म्हणजे गूढ. एखाद्याला भीती का वाटते हे शोधणे म्हणजे सुद्धा एकप्रकारचे गूढच. नेहमीच्या वास्तवापेक्षा वेगळ्या आणि अतर्क्य गोष्टींची कथेत मांडणी केली तर गूढकथा बनतात, मतकरींनी लिहिलेल्या अशाच १० अतर्क्य गोष्टींचा संग्रह म्हणजे हे पुस्तक "अंतर्बाह्य". रोजचे आयुष्य जगणाऱ्या मनुष्याचे व्यक्तिमत्त्व कधी कधी अचानकच गूढ वाटू लागते, अशा "अंतर्बाह्य" बदलणाऱ्या व्यक्तिमत्वाला केंद्रस्थानी ठेवून लिहील्या गेलेल्या १० गूढकथा आपल्याला या पुस्तकामधे वाचायला मिळतील. १८० पाने आणि १० गूढकथांचे हे पुस्तक वाचत असताना आपणही नकळत त्या कथांमधे हरवून जातो. गूढकथा या तेव्हाच पटण्यासारख्या किंवा परिपूर्ण वाटतात जेव्हा कथेतील पात्रे, घटना, वातावरण आणि आशय यांची योग्य भाषेत मांडणी केली जाते. रत्नाकर मतकरींच्या इतर पुस्तकांप्रमाणे "अंतर्बाह्य" मधेसुद्धा आपल्याला परिपूर्ण अशा गूढकथा वाचायला मिळतील.

"अंतर्बाह्य" या नावाप्रमाणेच रत्नाकर मतकरींची या पुस्तकातील प्रत्येक गूढकथा मानवी मनाच्या विविध भावनांतून जन्म घेते. जसे प्रेमातून गूढतेकडे जाणारी पहिली कथा "अंतर्बाह्य", सूडातून जन्माला येणारी "सावळी", कौटुंबिक अत्याचारतून येणारा एकटेपणा आणि त्यातूनच पूढचे गूढ घेऊन येणारी "कोळसा", दुर्बलतेमुळे आलेली अगतिकता त्यावर आधारित "हे सारे...पूर्वी कधीतरी", तीव्र मानसिक धक्क्याने एखाद्याचे बिघडणारे संतुलन आणि त्याचा गुढकतेतून सुखद शेवट करणारी "ती गेली", जवळच्या प्रिय व्यक्तीकडून दिला जाणारा धोका आणि सतत दुसऱ्याशी केली जाणारी तुलना यातूनच स्वतःला सिध्द करण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून घडलेली "दुसऱ्यासारखा एखादा", स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरदार सोडून मुंबईत आल्यानंतर घडणारी "पत्ता", पुनर्जन्मावर आधारित आठवणींतून घडणारी "जन्मोजन्मी", झपाटलेल्या पुरातन वास्तूत एका रिऍलिटी शोमध्ये भीतीदायक वातावरणात घडलेली "हॉंटेड हाउस" आणि जातीय दंगलीतून समोर आलेली शेवटची कथा "शेला". प्रत्येक कथेचे वेगळेपण आणि वेगळ्या प्रकारचे गूढ हीच रत्नाकर मतकरींनी लिहिलेल्या गूढकथांची खासियत जी आपल्याला "अंतर्बाह्य" वाचत असताना जाणवत राहील.

गूढकथांची आवड असणाऱ्यांनी हे पुस्तक नक्कीच वाचावं पण त्याचबरोबर काहीतरी वेगळं वाचन करावं म्हणून इतरांनीसुद्धा आवर्जून वाचावं असं हे रत्नाकर मतकरी यांचे पुस्तक "अंतर्बाह्य".






संदीप प्रकाश जाधव

Sunday, August 16, 2020

"महाभारताचे रहस्य"


लेखक : क्रिस्टोफर सी. डॉयल

प्रकाशक : मंजुळ पब्लिशिंग हाऊस



ख्रिस्टोफर सी. डॉयल यांच्या "The Mahabharata Secret" या पुस्तकाचा मराठी अनुवाद म्हणजे ही कादंबरी "महाभारताचे रहस्य".
 
डॉयल यांची ही पहिलीच कादंबरी.

महर्षी व्यासांनी हजारो वर्षांपूर्वी लिहिलेला एक काव्यग्रंथ, याच काव्यग्रंथावर आधारीत असलेलं कौरव-पांडवांमधील कौटुंबिक वैर आणि त्यांच्यामधे झालेलं महायुद्ध म्हणजे महाभारत. तर हे महाभारत घडलं असण्या-नसण्याबद्दल बऱ्याच लोकांची मते तशी वेगवेगळी आहेत.आजही जगभरात हा एक संशोधनाचा विषय आहे.अशा वेगवेगळ्या संशोधनातून पुढे आलेले प्रासंगिक पुरावे सिध्द करतात की महाभारत हा ग्रंथ म्हणजे हजारो वर्षांपूर्वी भारतामधे घडून गेलेली एक खरी घटना असण्याची दाट शक्यता आहे. महाभारतामधील बऱ्याच घटना आपण लहानपणापासून गोष्टींच्या रुपात ऐकत आलेलो आहोत. महाभारत म्हटले की श्रीकृष्ण, कौरव-पांडव, द्रौपदी, भीष्म, शकुनी मामा, कुंती, गांधारी, द्रोणाचार्य, अश्वत्थामा ही आणि अशा बऱ्याच पात्रांची नावे सहजपणे आपल्या बोलण्यात येतात. कुरुक्षेत्रावर १८ दिवस चाललेले कौरव-पांडवांमधील युद्ध आणि त्याच युद्धभूमीवर श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले, आजही लोकांना जीवनाचा अर्थ समजावून सांगणारे गीतासार या गोष्टी माहीत नसणारा माणूस दुर्मिळच. याच महाभारतातील रहस्यावर आधारित अशी ही थरारक कादंबरी "महाभारताचे रहस्य".

ही एक रहस्यमय कादंबरी, शोधकथा आहे हे पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहूनच लक्षात येते.कथा फिरते नायक विजय आणि त्याच्या साथीदारांभोवती. महाभारताचे युध्द संपल्यानंतर त्यातील रहस्ये २३०० वर्षांपूर्वी खोलवर गाडून टाकण्यात आली. याच प्राचीन आणि भयावह रहस्याचा शोध ख्रि.पू.२४४ मधे सम्राट अशोकाला लागला होता. त्या रहास्यमधे जगाचा विनाश करण्याची ताकद होती. ते रहस्य सम्राट अशोक आपला सेनापती सुरसेन मार्फत अतिशय गुप्त ठिकाणी  लपवून ठेवतो जेणेकरून ते वाईट लोकांच्या नजरेपासून दूर रहावे. त्याच्या संरक्षणाची जबाबदारी खास ९ लोकांना दिली जाते आणि ही जबाबदारी पिढ्यांन-पिढ्या हे लोक सांभाळत राहतात.आजही,म्हणजे वर्तमानकाळातसुध्दा त्या रहस्याचे संरक्षण करणारे हे लोक. यांपैकीच एक असणारे निवृत्त अनुशास्त्रज्ञ विक्रम सिंग. एक दिवस विक्रम सिंगांचा अचानक खून होतो आणि मरण्यापूर्वी ते आपल्या अमेरिकेत असणाऱ्या पुतण्याला, विजयला ई-मेल मार्फत सांकेतिक भाषेमधे एक पत्र पाठवतात. इथूनच सुरुवात होते या थरारक कादंबरीची. 

गुप्त सांकेतिक लिपीतील संकेतानुसार तसेच २००० वर्षांपूर्वीच्या अवशेषांवरून विजय आपला मित्र कोलीन, राधा आणि काकांचे मित्र शुक्ला यांच्या मदतीने त्या ई-मेलची उकल करतो. आणि चालू होते एक थरारक शोधमोहिम महाभारतातील त्या रहस्याची. याच रहस्याच्या शोधावर असणाऱ्या अजूनही काही दुष्ट शक्ती आणि त्यासाठी त्यांनी घेतलेली तालिबान्यांची मदत, रहस्य मिळवण्यासाठी करत असलेले त्यांचे वेगवेगळे प्रयत्न डॉयल यांनी अगदी रोमांचक, थरारक पद्धतीने या कादंबरीत रंगवले आहेत.जे वाचताना एक वेगळेच थ्रिल देऊन जाते. या शोधमोहीमेदरम्यान विजय आणि त्याच्या साथीदारांचा अतिशय ताकदवान अशा दुष्ट शक्तींकडून पावला पावलावर होणारा पाठलाग, त्यामुळे भूतकाळातील रहस्ये आणि वर्तमानकाळात होणारी कारस्थाने यांच्या कात्रीत त्यांचे सापडले जाणे हा सगळा थरार डॉयल यांनी या कादंबरीमधून आपल्या डोळ्यासमोर उभा केला आहे. वर्तमानकाळात चालणाऱ्या या शोधमोहीमेत अधूनमधून भूतकाळात घडलेल्या घटनांची सांगड घालून हजारो वर्षांपूर्वीचे संदर्भ देत असताना वाचक मूळ कथेसोबतच जोडलेला राहील याची काळजी लेखकाने अगदी व्यवस्थित घेतली आहे.

अत्यंत वेगवान आणि थरारक पद्धतीने पुढे सरकणाऱ्या शोधमोहिमेसह प्रत्येक टप्प्यावर मिळणारे वेगवेगळे सांकेतिक संकेत आणि त्यांची उकल करत, दुष्ट शक्तींच्या कारस्थानांना मात देत विजयचे आपल्या साथीदारांसोबत त्या रहस्यापर्यंत पोहचणे आणि ते प्राचीन रहस्यमय गूढ उकलून काढण्यापर्यंतचा प्रवास अतिशय रोमांचक पध्दतीने डॉयल यांनी त्यांच्या या कादंबरीमधे मांडलाय. पहिल्यापासून शेवटपर्यंत प्रत्येक पानावरचा या थरारक शोधमोहिमेचा प्रवास वाचत असताना एखादा थ्रिलर चित्रपटच आपल्या डोळ्यासमोर चालू असल्याचा भास व्हावा अशी ही कादंबरी.

रहस्यकथा आणि शोधकथांची आवड असणाऱ्यांनी आवर्जून वाचावी अशी ख्रिस्टोफर सी. डॉयल यांची कादंबरी "महाभारताचे रहस्य".




संदीप प्रकाश जाधव


Sunday, August 9, 2020

"पावनखिंड"



लेखक : रणजित देसाई

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस


ज्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या आवर्जून वाचाव्यात अशा मोजक्याच कादंबरीकरांपैकी एक म्हणजे रणजित देसाई.
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र श्रीमानयोगी सारख्या अजरामर कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी लोकांसमोर आणले. त्यांनीच लिहिलेल्या आणखीन ही काही कादंबऱ्या स्वामी,राधेय,मेख मोगरी,लक्ष्यवेध. रणजित देसाईंच्या प्रत्येक कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे, ती वाचत असताना त्यातील घटना, पात्रे आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात ज्यामुळे वाचनाचा एक वेगळाच अनुभव येतो. मूळ विषयाला जराही धक्का न लावता कादंबरीच्या माध्यमातून तो वाचकांपर्यंत पोहचवण्याची त्यांची खासियत. त्यांच्या "लक्ष्यवेध" या शिवाजी महाराज - अफजलखान ऐतिहासिक भेटीवर आधारित कादंबरीचा पुस्तक परिचय मी इथे आधी दिला होता आणि तेव्हा लिहिल्याप्रमाणेच शिवचरित्रातील प्रत्येक घटना ही एक स्वतंत्र कादंबरीचा विषय आणि अशा घटनांवर लिहावे - बोलावे तेवढे कमीच. शिवचरित्रातील अशाच एका ऐतिहासिक घटनेवर आधारीत आणि एका पराक्रमी व्यक्तीवर लिहिली गेलेली रणजित देसाई यांची ही कादंबरी "पावनखिंड". रणजित देसाई यांनी लिहिलेली "पावनखिंड" ही त्यांची शेवटची ऐतिहासिक कादंबरी. 

शिवचरित्रातील अशा बऱ्याच घटना आहेत ज्या आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलो आहोत, अगदी त्यांचे पारायण झाले म्हटले तरी ते चुकीचे नाही ठरणार. पण कितीही वेळा ऐकले तरी प्रत्येक वेळी एक नवीन ऊर्जा देणाऱ्या अशा या घटना. या कादंबरीचा विषयसुद्धा असाच. शिवचरित्रातील एक मानाचे पान म्हणजे  बाजीप्रभू देशपांडेंचा घोडखिंड म्हणजेच पावनखिंड याठिकाणी केलेला पराक्रम. इतिहासाला कलाटणी देणाऱ्या घटनांपैकी एक अशी ही घटना. याच बाजीप्रभू देशपांडे आणि ३०० मावळ्यांच्या अतुलनीय पराक्रमावर लिहिलेली ही कादंबरी. जरी ही घटना सर्वांना माहीत असली तरी रणजित देसाईंनी लिहिलेल्या कादंबरी रुपात ती वाचत असताना एक वेगळाच अनुभव देऊन जाते. बाजीप्रभू देशपांडेंना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या या कादंबरीमधे, रणजित देसाईंनी बाजीप्रभूंच्या शिवाजी महाराजांना भेटण्यापूर्वीच्या आयुष्यावरसुध्दा प्रकाश टाकला आहे. १२ मावळातील लोकांना स्वराज्यात जोडत असताना बांदल-देशमुखांसोबत झालेल्या एका लढाईत शत्रू म्हणून समोर आलेल्या बाजीप्रभूंना शिवरायांनी कसे आपलेसे केले? सोबतच बाजींचे थोरले बंधू फुलाजी हे सुद्धा महाराजांकडे कसे आले? याचे वर्णन रणजित देसाईंनी या कादंबरीच्या सुरुवातीला केलेलं आहे. आधी विरोध करणारे आणि नंतर महाराजांच्या स्वराज्य उभारणीच्या कार्याने प्रभावित होऊन, स्वराज्यात येऊन अतुल्य पराक्रम गाजवणारे बाजी आपल्याला या कादंबरीमधे वाचायला मिळतील. स्वराज्यनिष्ठा, स्वामिनिष्ठा आणि पराक्रम म्हणजे काय असतो हे बाजी आणि ३०० मावळ्यांनी घोडखिंडीत जगाला दाखवून दिले. या अचाट पराक्रमात घोडखिंडीची "पावनखिंड" कशी झाली याचे थरारक वर्णन कादंबरीत करत असताना, पन्हाळा किल्ल्याचा दिलेला परिचय, सिद्दीच्या वेढ्याबद्दलचे वर्णन, तो वेढा फोडण्यासाठी वेळोवेळी केले गेलेले प्रयत्न आणि नाइलाजास्तव वेढ्यातून निसटून पन्हाळगडाहून विशाळगडाकडे जाण्याचा धाडसी निर्णय घेताना महाराजांच्या काळजीने सर्वांची झालेली मानसिक अवस्था, तसेच या ऐतिहासिक घटनेपूर्वीच्या इतर गोष्टींची पार्श्वभूमी जसे अफझलखान वध आणि त्यानंतर एकामागून एक महाराजांनी जिंकलेले किल्ले या सर्व गोष्टींमधून रणजित देसाईंनी तो काळ आपल्यासमोर उभा केला आहे.

बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी महाराज हे  फक्त पावनखिंडी पुरते मर्यादित नाहीत. अफजलखान भेटीच्या वेळीसुद्धा महत्वपूर्ण जबाबदारी बाजींनी पार पडली होती त्याचेही सविस्तर वर्णन आपल्याला या कादंबरीमध्ये वाचायला मिळेल. रणजित देसाईंनी बाजींचे केलेले या कादंबरीतील वर्णन धिप्पाड शरीरयष्टीचा एक शूर मावळा आपल्या डोळ्यासमोर घेऊन येते. असा धिप्पाड शरीरयष्टीचा शूर माणूससुद्धा किती हळवा असू शकतो हे महाराज पन्हाळ्यातून विशाळगडाकडे निघण्यापूर्वी भावनिक झालेला बाजी वाचताना समजते. भर पावसात, काटे, चिखल तुडवत, पाठलाग करणाऱ्या जवळपास २००० पेक्ष्या जास्त असणाऱ्या सिद्दीच्या सैन्याचा मागोवा घेत, १२-१३ तासांच्या अथक वाटचालीनंतर पन्हाळा ते घोडखिंड हे जवळपास ६० किलोमीटरचे अंतर पार करून राजांसह बाजी आणि ६०० मावळे जेव्हा घोडखिंडीत पोहचतात तेव्हा पन्हाळ्यावर हळवे झालेले हेच बाजी कठोर होऊन राजांना विशाळगड जवळ करण्याचा आग्रह करताना दिसतात. 'लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे' हे एकच वाक्य डोक्यात ठेऊन बाजीप्रभू, फुलाजी आणि त्यांच्यासोबतच्या ३०० मावळ्यांनी स्वराज्यासाठी महाराजांना अखेरच्या श्वासापर्यंत साथ दिली, मरतानासुद्धा महाराजांना मुजरा करुनच प्राण सोडले. बाजींच्या आधी धारातीर्थी पडलेला आपला मोठा भाऊ फुलाजींच्या देहाकडे पाहत, "भाऊ जगण्याचं सार्थक केलंस.. गेलास.. म्हणजे जातोस कुठं.. तू मोठा ना.. तुझा मान पहिला... मी मागून आलोच" असे बोलणारे बाजी कादंबरीमध्ये वाचताना डोळ्यात नकळत पाणी आणतात. अंगावर झालेल्या अगणित जखमा, त्यातून वाहणारे रक्त घेऊन त्वेषाने लढणाऱ्या, "तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला" असे ठणकावून सांगत मावळ्यांचा लढण्याचा उत्साह वाढवणाऱ्या बाजींनी महाराज विशाळगाडी सुखरूप पोहचल्यानंतरच आपला देह ठेवला. बाजीप्रभू आणि इतर अनेक मावळ्यांच्या बलिदानाने, स्वराज्यासाठी सांडलेल्या रक्ताने घोडखिंड पावन झाली, "पावनखिंड" झाली.

जरी अगदी लहानपणापासून सर्वांना माहीत असलेली अशी ही ऐतिहासिक घटना असली तरीही रणजित देसाईंनी लिहिलेल्या उत्कृष्ट लिखाणासाठी आणि एका नरवीराच्या पराक्रमाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आवर्जून वाचण्यासारखे कादंबरीरूपातील पुस्तक "पावनखिंड".





संदीप प्रकाश जाधव


Sunday, August 2, 2020

"वादळ"





लेखक : दिलीप बर्वे

प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन


"वादळ" म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहणारे चित्र म्हणजे अतिशय वेगाने घोंगावत येणारा वारा, त्या वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे उन्मळून पडणारे मोठ-मोठाले वृक्ष, उडून जाणारी घरांची छपरे, उघड्यावर पडलेले संसार, घाबरून भांबावून गेलेले प्राणी-पक्षी आणि त्या प्रचंड वाऱ्यामुळे झालेला विध्वंस. "वादळ" तशी एक अचानक येणारी नैसर्गिक आपत्ती पण अशा वादळाची विध्वंसकता ते शांत झाल्यानंतर त्याने केलेली उलथापालथ पाहूनच समजते.माणूस म्हणून जगत असताना प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही घटना घडत असतात किंवा घडून जातात ज्यामुळे आयुष्याची बरीच उलथापालथ होते आणि त्यामुळे होऊन गेलेलं नुकसान आपल्या मनावर खोलवर आघात देऊन जाते. अशा घटनांमुळे एखाद्याचे होणारे मानसिक, सामाजिक आणि शारीरिक नुकसान नैसर्गिक वादळांमुळे होणाऱ्या विध्वंसापेक्षा नक्कीच कमी नसते. म्हणूनच मग लोक या घटनांचा उल्लेख आपल्या आयुष्यात आलेलं "वादळ" असं करतात. तीन मध्यमवर्गीय कुटुंबांवर ओढवलेल्या अशाच वादळी घटनांवर आधारीत, दिलीप बर्वे यांनी आपल्या खास शैलीत, सहज, सुंदर शब्दांत लिहिलेली  कादंबरी म्हणजे "वादळ". अशा वादळी घटनांबरोबरच लेखकाने अजून एका चिंताजनक विषयाला इथे हात घातला आहे तो म्हणजे तरुण पिढीमध्ये अगदी कमी वयात फोफावत चाललेली व्यसनाधीनता.

कादंबरीची कथा फिरते जोशी, प्रधान, वैद्य या तीन मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय आणि एक अरोरा नामक पंजाबी कुटुंबाभोवती. सातारा बस स्टॉपवरील एका पेपर विक्रेत्याचा मुलगा म्हणजेच माधवराव जोशी. जो आपल्या मेहनतीवर शिकून शिक्षक बनतो आणि सांगली सारख्या शहरामधून आपल्या नोकरीचा श्रीगणेशा करतो. इथूनच होते या कथेची सुरुवात. सांगलीतील नोकरी करत असतानाच माधवच्या आयुष्यात अतिशय रूपवान अशी माधवी येते आणि त्यानंतर अगदी अनपेक्षितरित्या त्याला पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमधून आलेल्या नोकरीच्या ऑफरमुळे तो आपला संसार हलवतो पुण्यमधील नारायण पेठेतील देशपांडे वाडयात. इथून पुढे अगदी एखाद्या चित्रपटाला शोभावे असे या कादंबरीचे कथानक पुढे सरकत जाते. इथे देशपांडे वाड्यातच झालेली जोशी आणि प्रधान कुटुंबाची भेट, माधवराव-माधवीच्या जुळ्या मुली ज्योती-स्मृती यांची प्रधान कुटुंबातील दिपक-स्वाती सोबत झालेली घट्ट मैत्री, दोन्ही कुटुंबांमधे निर्माण झालेले एक भावनिक नाते, अगदी लहानपणापासून एकत्र असलेले दिपक आणि स्मृती यांच्यामध्ये जुळलेले प्रेम, त्यांनी एकत्र बघितलेली स्वप्ने,त्यांच्या प्रेमाला असलेला घरच्यांचा अबोल पाठिंबा, दिपकचे एम.बी.बी.एस. पूर्ण करून डॉक्टर होणे, ज्योतीचा प्रकाश वैद्य या केमिकल इंजिनिअर सोबत साखरपुडा होऊन जोशी-वैद्य कुटुंबांचे जोडले जाणे या आणि अशा बऱ्याच गोष्टी लेखकाने इतक्या सहज,सुंदर भाषेत लिहिल्या आहेत की वाटते जणू आपल्या आसपासच्याच कुटुंबांमधे हे सर्व घडत असावे. इथेपर्यंत अगदी सरळमार्गी आयुष्य चालणाऱ्या या तिनही कुटुंबांना पुढे येऊ घातलेल्या "वादळाची" पुसटशीही कल्पना नसते.

ज्योतीच्या साखरपुड्यानंतर स्मृतीचे अचानक तेजा अरोरा या पंजाबी मुलासोबत पळून जाणे आणि त्यामुळे जोशी कुटुंबावर झालेला मानसिक आघात म्हणजे या वादळाची सुरुवात. त्यानंतर एकामागून एक घडत जाणाऱ्या घटना जसे स्मृतीच्या जाण्याने डॉक्टर दिपकचे दिल्लीतील मेडिकल कॉन्फरन्सच्या निमित्ताने कायमचे घर सोडून आत्महत्या करण्यासाठी निघून जाणे, केमिकल फॅक्टरीत झालेल्या स्फोटामधे ज्योतीचा पती प्रकाश वैद्य याची दृष्टी गेल्यामुळे माधवरावांचा प्रकाश-ज्योतीच्या लग्नाला विरोध करणे या आणि अशा अनेक धक्कादायक घटनांमुळे या तीनही कुटुंबांच्या आयुष्यात झालेली उलथापालथ कादंबरी रुपात वाचत असताना लक्षात येते की दिलिप बर्वे यांनी दिलेलं "वादळ" हे या कादंबरीचे नाव किती सार्थ आहे.

डॉक्टर दिपक प्रधानचा स्वामी दिव्यानंद होण्यापर्यंतचा प्रवास वाचून जाणवते की काही वादळी घटनांचा आघात एखाद्याच्या मनावर किती खोलवर होऊ शकतो. आत्महत्येपासून परावृत्त होऊन दिपकचे स्वतःला सामाजिक कार्यात वाहून घेणे अशा लोकांसाठी आदर्श आहे  जे आयुष्यात आलेल्या वादळांनी खचून जातात.

भरपूर आणि फटाफट पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी तेजाचा ब्राउन शुगर स्मगलिंग पर्यंतचा प्रवास आणि त्यामुळे होणारी अरोरा कुटुंबाची वाताहत विचार करायला लावतेच पण त्याचबरोबर हेच ब्राउन शुगरचे व्यसन तेजा-स्मृतीचा किशोरवयीन मुलगा अमरला सुद्धा आहे हे समजल्यानंतर वाईट वाटते. स्वातीचा पती ए.सि.पि. धनंजय जाधव याच्याकडे आलेली ब्राउन शुगर स्मगलिंगची केस, एका पिढीला व्यसनाधीन होण्यापासून वाचवण्यासाठी धनंजयने केलेले प्रयत्न आणि हे सर्व करत असताना त्याचे तेजा पर्यंत जाऊन पोहचणे कादंबरीरुपात वाचताना एक वेगळाच अनुभव येतो. सुरवातीपासून शेवटपर्यंत घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीचे लेखकांनी अगदी साध्या भाषेत केलेले वर्णन त्या घटना आपल्या डोळ्यासमोर घेऊन येते.

कितीही वाईट, धक्कादायक घटनांनी भरलेल्या एखाद्या चित्रपटाचा शेवट जसा नेहमी आनंदीच होतो तसाच काहीसा या कादंबरीचा शेवट. स्मृतीचे जोशी कुटुंबात परत येणे, दिपकचे स्वामी दिव्यानंद म्हणून प्रधान कुटुंबाला २०-२२ वर्षांनी भेटणे, तेजाला आपण केलेल्या कृत्याचा झालेला पश्चात्ताप, दिव्यानंद स्वामींच्या आश्रमात अमरची ब्राउन शुगरसारख्या व्यसनातून झालेली मुक्ती आणि निपुत्रिक प्रकाश-ज्योतीच्या आयुष्यात झालेला अमरचा प्रवेश असा या "वादळाचा" दिलिप बर्वे यांनी केलेला अगदी सहज,सुंदर,आनंदी शेवट.

काहीतरी वेगळे वाचन म्हणून आवर्जून वाचावी अशी दिलिप बर्वे यांची कादंबरी "वादळ".




संदीप प्रकाश जाधव

Sunday, July 26, 2020

"रावण"...राजा राक्षसांचा


लेखक : शरद तांदळे

प्रकाशक : New Era Publications


रावण म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येणारी पहिली प्रतिमा म्हणजे एक दहा तोंडी क्रूर राक्षस. रावणाबद्दल अगदी लहानपणापासून वेगवेगळ्या पुस्तकांमधून, गोष्टींमधून, सिनेमांमधून जे ऐकत-वाचत-पाहत आलो तीच त्याची प्रतिमा डोळ्यासमोर ठेऊन त्याला आपण खलनायक ठरवून टाकलं. सीता हरण आणि त्यामुळे रामाकडून मारला गेलेला एक क्रूर,अहंकारी राक्षस-असुर म्हणजे रावण इतकीच काय ती आपल्याला त्याच्याबद्दल असणारी माहिती. सीता हरण आणि त्यातून रावणाचा झालेला अंत हा कालावधी जवळपास १२ महिन्यांचा.सीता रावणाच्या लंकेत फक्त ११ महिने १४ दिवस राहिली आणि १३ दिवस चाललेल्या राम-रावण यांच्या युध्दात रावणाचा अंत झाला, परंतु या १२ महिन्यांव्यतिरिक्तचे रावणाचे आयुष्य नेहमी अंधारातच राहिले आणि आपणही कधी ते जाणून घेण्याचा प्रयत्न नाही केला. लंकेचा असुर राजा सुमालीची मुलगी कैकसी आणि पराक्रमी ऋषि महर्षि विश्रवा यांचा "रावण" हा संकरित पुत्र. बालपणी विश्रवा ऋषिंच्या आश्रमात राहून एक ऋषिपुत्र म्हणून अभिमानाने स्वतःची ओळख करून देणारा "दशग्रीव" म्हणजेच "रावण" पुढे जाऊन लंकाधिपती झाला आणि एक असुर राजा म्हणून रामाच्या हातून त्याचा अंत झाला.एका ऋषिपुत्रापासून ते असुरांचा राजा, लंकाधिश होण्यापर्यंतचा रावणाचा प्रवास नेहमीच दुर्लक्षित राहिला. रावणाच्या आपल्याला माहिती नसलेल्या आयुष्यावर प्रकाश टाकणारी आणि एक वेगळाच रावण आपल्यासमोर उभा करणारी शरद तांदळे यांनी लिहिलेली ही कादंबरी "रावण" राजा राक्षसांचा.

विश्रवा ऋषींच्या आश्रमात जन्मल्यामुळे स्वतःला आर्य कुळातील ऋषीपुत्र समजणाऱ्या रावण आणि त्याच्या इतर भावंडांना एक दिवस अचानकच आपण असुर कुळातील असल्याचे समजल्यानंतर मिळणाऱ्या धक्क्यातून सुरुवात होते या कादंबरीची. या धक्क्यामुळे त्यांच्या बालमनावर झालेल्या आघातातून पुढे स्वतःला सिद्ध करण्यासाठी रावणाचा चालू झालेला संघर्ष आपल्याला या कादंबरीमधे वाचायला मिळेल. बालपणीच विश्रवा ऋषींचे आश्रम सोडल्यामुळे, इंद्र-विष्णुसोबतच्या युद्धानंतर लंकेतून परागंदा झालेले आपले आजोबा सुमाली आणि इतर असुरांसोबत भटकंतीचे जीवन जगत अतिशय कठीण संघर्षातून स्वतःला घडवणारा रावण, हेच सिद्ध करतो की जन्मजात मिळालेल्या कुळाने कोणीही श्रेष्ठ ठरत नाही. ज्ञान, कर्म आणि कर्तृत्वावर श्रेष्ठत्व ठरवलं जातं. हाच मंत्र जपत रावणाने स्वकर्तुत्वावर स्वतःला सिद्ध केलं. आपल्या भावंडांवर भरपूर प्रेम करणारा,आई,आजोबा आणि समस्त असुर जातीवर झालेल्या अत्याचाराने हळवा होणारा, सर्वप्रकारच्या ज्ञानार्जनासाठी नेहमीच भुकेला असणारा, महत्वकांक्षा, प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासासोबतच धैर्य,सामर्थ्य, न्याय-नितीमत्ता अशा गुणांनी संपन्न असा रावण आपल्याला या कादंबरीमधे वाचायला मिळेल. वैदिक संस्कृतीसारखी नवी राक्षस संस्कृती निर्माण करण्याची महत्वकांक्षा असणारा रावण जरी बंडखोर वाटत असला तरी असा बंडखोरच आपल्याला प्राप्त असलेल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावून नवनिर्मिती करू शकतो हे रावणाच्या आयुष्याकडे पाहून लक्षात येते.

रावणाच्या अंतास कारणीभूत असे, सीता हरण हे प्रकरण जर आपण थोडंसं बाजूला ठेवलं तर उर्वरित आयुष्यातील त्याचा संघर्ष, पराक्रम आणि कठीण परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व सिद्ध करून, लंकाधिपती राक्षसांचा राजा म्हणून एक वेगळं  साम्राज्य उभं करण्यापर्यंतचा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. दैवी किंवा काल्पनिक गोष्टींना बाजूला सारून, शरद तांदळे यांनी एक सामान्य राजा डोळ्यासमोर ठेऊन रावण लिहिल्यामुळे त्याचा संघर्ष वाचकाला जाणवत राहतो. इंद्र आणि विष्णुसोबतच्या युद्धात सुमालीने गमावलेली लंका कुबेराकडून परत मिळवणारा, समस्त विखुरलेल्या भटक्या जमाती,दैत्य,असुर, दानव यांना एका छताखाली आणून एका नवीन राक्षस संस्कृतीचा पाया रचनारा आणि स्वतःसोबतच आपल्या प्रजेलासुद्धा सोन्याच्या घरात ठेवणारा असा हा प्रजादक्ष राजा. २९ प्रकरणे आणि ४३२ पानांच्या या कादंबरीतून शरद तांदळे यांनी रावणाचे जे आयुष्य आपल्यासमोर मांडलं आहे ते वाचत असताना लेखकाप्रमाणेच आपल्यालासुद्धा पडणारे काही प्रश्न म्हणजे, आजपर्यंत आपण ज्या रावणाची दुर्गुणी,क्रूर,अहंकारी अशी विशेषणे लावून अवहेलना केली ती खरंच योग्य आहे का? महादेवाचा निस्सीम भक्त असणारा, शिवतांडवस्तोत्र, रावणसंहिता, कुमारतंत्र लिहिणारा, बुद्धिबळ व रुद्रवीणा निर्मिती करणारा विद्वान रावण खलनायक कसा काय असू शकतो?आयुर्वेद, व्यापार, वेदशास्त्र, राज्यशास्त्र, दर्शनशास्त्र यांसारख्या अनेक विषयांमधे पांडित्य मिळवूनसुद्धा  रावणाच्या वाट्याला अवहेलनाच कशी? हजारो वर्षांपासून आपण त्याचे दहन करत आलो तरी आजही न संपलेला रावण खरंच खलनायक असू शकतो का? यांसारख्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे या कादंबरीमध्ये आपल्याला मिळू शकतील आणि त्यानंतर एक वाचक म्हणून आपण ठरवू शकतो की रावण खरोखरच एक खलनायक होता की स्वतःच्या सामर्थ्यावर उभा राहिलेला एक महानायक.

कादंबरीतील काही आवडलेली वाक्ये - 

"स्वाभिमान हा कर्तृत्वाने वाढतो आणि कर्तृत्वाला मर्यादा कुळानं नाही, तर न्यूनगंडानं येतात"

"शारीरिक संघर्षापेक्षा वैचारिक संघर्ष हा मोठं यश संपादन करून देतो"

"अहंकार हा अर्धवट ज्ञानाने तयार होत असतो, ज्ञान प्राप्त झाल्यावर मत व्यक्त केलं तर अहंकारी नाही तर बंडखोर तयार होतात"

"निसर्गानं निर्माण केलेल्या गोष्टी निषिद्ध आणि अपवित्र ठरवतो,तो नास्तिक. नास्तिकपणा हा मानवनिर्मित धर्म आणि वेदांना न माननं यावरून नाही ठरत"

"युद्धातील विजय आपल्याला सामर्थ्यशाली बनवतो, पण आपण शक्तिशाली तेव्हाच होतो जेव्हा आपल्याला शस्त्र उचलण्याची गरज पडत नाही"

"ज्या धर्माच्या धारणा कालानुरूप बदलत नाहीत तो धर्म गुलामांची फौज तयार करत असतो"

"स्वकीयांवर दाखवलेला अविश्वास संकटाकडे घेऊन जातो"

"अति सुख उपभोगलं की संघर्षाची अभिलाषा कमी होते"

"स्वतःशी केलेला संवाद हा ज्ञानाच्या कक्षा रुंदावत असतो"

"धर्म, न्याय आणि भूमिका सगळं काही स्वार्थावर निर्भर असतं"


शरद तांदळे यांनी बऱ्याच अभ्यासाअंती आणि संशोधनात्मकदृष्ट्या संदर्भ शोधून, काल्पनिक घटनांना फाटा देऊन रावणाचे आयुष्य आपल्या समोर कादंबरी रुपात मांडले आहे. एक वेगळा रावण जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी ही कादंबरी "रावण" राजा राक्षसांचा.






संदीप प्रकाश जाधव






Sunday, July 19, 2020

"रॉ" भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा



लेखक : रवी आमले

प्रकाशक : मनोविकास प्रकाशन


गुप्तचरसंस्था किंवा हेरखाते हा शब्द ऐकला तर माझ्यासारख्या मराठी माणसाच्या ओठांवर येेेणारेे पहिले नाव म्हणजे स्वराज्याच्या हेरखात्याचे प्रमुख म्हणून इतिहासात नोंद असलेले बहिर्जी नाईक - जाधव यांचे. पण खरे तर गुप्तचरसंस्था ही हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेली संकल्पना आहे, अगदी महाभारतपासून त्याचे पुरावे मिळतील. कोणतेही साम्राज्य, देश राखायचे असेल तर हेरखात्याचे महत्व हे अनन्यसाधारण. इतिहासात डोकावून पाहिले तर अशी बरीच उदाहरणे मिळतील जिथे शत्रूशी समोरासमोर न लढता सुद्धा बरीच साम्राज्ये नष्ट झाली आहेत आणि त्याचे सगळे श्रेय शत्रूच्या मजबूत,प्रभावी गुप्तचरसंस्थेला तसेच पडद्यामागे राहून काम करणाऱ्या त्यांच्या हेरांना. म्हणूनच गुप्तचरसंस्था किंवा हेरखाते जितके प्रभावी तितकी त्या देशाची सुरक्षितता अबाधित. कोणत्याही देशाची गुप्तचरसंस्था ही त्या देशाचे डोळे आणि कान असतात असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. इतिहास लिहिणे एकवेळ सोपे पण एखाद्या देशाच्या गुप्तचरसंस्थेच्या कामांबद्दल, मोहिमांबद्दल लिहिणे अवघड कारण कोणत्याही गुप्तचरसंस्थेचे कामच हे इतके गुप्तपणे चालत असते की त्यांनी केलेल्या कामाचा कागदोपत्री पुरावा मिळणे महाकठीण. तरी झालेल्या किंवा होत असलेल्या घटनांची सांगड घालून अशा मोहिमांची सत्यता आणि वस्तुस्थिती यांच्या जवळ नक्कीच जाता येऊ शकते. रवि आमले यांच्या मेहनतीतून साकारलेले हे पुस्तक म्हणजे "रॉ"...रिसर्च अँड अनालिसिस विंग या संस्थेची बखरच.

"रॉ" हा प्रत्येक भारतीय माणसाच्या मनात नेहमीच असलेला कुतूहलाचा शब्द. त्याच कुतूहलामुळे "रॉ" च्या थरारक मोहिमांवर आधारलेले बरेच थ्रिलर चित्रपट सुद्धा आपण अगदी आवडीने पाहतो. पण रवि आमलेंचं हे पुस्तक वाचल्यानंतर त्या आवडीच्या जागी "रॉ" बद्दल अभिमान नक्कीच जागृत होईल. "रॉ" ने केलेल्या अनेक खऱ्याखुऱ्या थरारक, अविश्वसनीय मोहिमांबद्दल फारच कमी माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहचत असते, त्यामुळे पडद्यामागे राहून देशासाठी काम करणाऱ्या अनेक वीर हेरांना जितका मिळाला पाहिजे तितका सन्मान नाही मिळत. रवि आमले यांनी लिहिलेली ही "रॉ" ची यशोगाथा म्हणजे "रॉ" ने केलेल्या अनेक पराक्रमी मोहिमांची अभिमानास्पद कहाणी. "रॉ" ची निर्मिती करण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या काही घटना, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकारण यांचे अगदी विस्तृत वर्णन या पुस्तकामध्ये वाचायला मिळेल.  देशाची सुरक्षितता लक्षात घेऊन इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाच्या काळात २१ सप्टेंबर १९६८ मधे झालेला "रॉ" चा जन्म आणि तेव्हापासून आजअखेरपर्यंत "रॉ" ने केलेल्या अनेक कारवायांच्या कहाण्या या पुस्तकामध्ये वाचायला मिळतील. स्वातंत्र्यानंतर भारत हा एक देश म्हणून घडत असताना त्या वाटचालीमधे असणारे "रॉ" चे महत्त्व आणि पडद्यामागे  राहून त्यांनी देशाचे सार्वभौमत्व - एकात्मता टिकून राहण्यासाठी केलेल्या कारवाया या पुस्तकात वाचताना उर अभिमानाने भरून येतो. 

"रॉ" चे पहिले प्रमुख रामेश्वरनाथ काव यांच्यापासून सुरू झालेला प्रवास आजही ५२ वर्षे अविरतपणे चालू आहे तो सध्याचे प्रमुख समंत गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली. "रॉ" ने केलेल्या सगळ्याच मोहिमांची माहिती जरी या पुस्तकामध्ये नसली तरी जी २४ प्रकरणे लेखकाने मांडली आहेत ती वाचताना एक गोष्ट नक्कीच जाणवते, ती म्हणजे अमेरिकेच्या "सि.आय.ए" किंवा इस्रालायच्या "मोसाद" या अतिशय भक्कम, शक्तिशाली आणि प्रभावी मानल्या जाणाऱ्या गुप्तचरसंस्थांइतकी प्रसिद्धी जरी "रॉ" ला मिळाली नसली तरी "रॉ"ने केलेल्या धाडसी मोहिमा या दोघांहून सरस नक्कीच आहेत. जगाच्या पाठीवर "रॉ" ही अशी एकमेव गुप्तचरसंस्था आहे जिच्यामुळे स्वदेशाचा भौगोलिक नकाशा वाढला आहे आणि शत्रूराष्ट्राचा नकाशा बिघडून गेला आहे. याचे या पुस्तकामध्ये दिलेले उत्तम उदाहरण म्हणजे बांगलादेश मुक्तियुद्ध आणि त्यातून झालेली पाकिस्तानची फाळणी तसेच सिक्कीमचे भारतामध्ये झालेले सामिलीकरण. "रॉ" च्या गुप्तचरांनी केलेल्या अशा बऱ्याच थरारक, रोमांचक आणि धाडसी कारवायांचा उल्लेख रवि आमले यांनी या पुस्तकामध्ये केलेला आहे. यासोबतच "रॉ" भोवती फिरणारे भारतीय राजकारण आणि काही राजकारणी मंडळींचा हस्तक्षेप यांचाही बऱ्याच ठिकाणी उल्लेख आपल्याला पुस्तकात वाचायला मिळेल.आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचे सरकार जाऊन जनता सरकार सत्तेत आले, त्यानंतर पंतप्रधानपदी बसलेल्या मोरारजी देसाईंनी "रॉ" सोबतचे सूडबुद्धीने घेतलेले निर्णय वाचून थोडं वाईट नक्कीच वाटतं. तरीही अशा राजकारणापासून स्वतःला अलिप्त ठेऊन, फक्त आणि फक्त देशाच्या सुरक्षिततेचा विचार करून निरंतर काम करणाऱ्या "रॉ" च्या सर्व पडद्यामागच्या वीरांचे कौतुक करावे तेवढे कमीच.

जगाच्या पाठीवर दररोज कुठे ना कुठे गुप्तचारांच्या कारवाया या अखंडपणे चालूच असतात आणि त्यांना पार्श्वभूमी असते ती राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चालणाऱ्या राजकारणाची. ज्या देशाचे राजकारणी अधिक मुत्सद्दी तितक्याच त्या देशाच्या गुप्तचरसंस्थेच्या कारवाया धाडसी आणि थरारक असतात. "रॉ" सोबतसुध्दा असंच काहीसं घडलं इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाच्या काळात. इंदिरा गांधींनी घेतलेले मुत्सद्दी निर्णय आणि त्याला "रॉ" च्या मोहिमांची मिळालेली साथ हे या पुस्तकात एकत्रितपणे वाचताना आपण एका वेगळ्याच विश्वात हरवून जातो. "जसं दिसतं तसं नसतं" या वाक्याची प्रचिती पुस्तकातील प्रत्येक प्रकरण वाचताना येत राहते. स्वातंत्र्यानंतरच्या अर्धशतकापेक्षा जास्त काळात एक देश म्हणून आपण काय केलं हे जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तक नक्कीच वाचावं.

भारतीय गुप्तचरसंस्था "रॉ" चा पडद्याआडचा इतिहास, त्यांची काम करण्याची पद्धत यांबद्दल जाणून घेण्यासाठी प्रत्येक भारतीयाने अभिमानाने वाचावे असे रवि आमले यांचे पुस्तक "रॉ"...भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा.



संदीप प्रकाश जाधव



 








Sunday, July 12, 2020

"होरपळ"


लेखक : ल. सि. जाधव

प्रकाशक : रोहन प्रकाशन


एखाद्या व्यक्तीच्या आत्मकथनाचे विश्लेषण करणं तसं थोडंसं कठीणच, कारण त्यांच्या नजरेतून त्यांनी पाहिलेलं - जगलेलं त्यांचं आयुष्यच त्यांनी पुस्तकरूपात लिहिलेलं असल्यामुळे आपण ते आपल्या भाषेत इतरांना सांगणं तसं अवघडच. बऱ्याच लोकांच्या आत्मकथा मी आजपर्यंत वाचल्या त्यांपैकीच एक मनाला भावलेली आणि अत्यंत प्रेरणादायी अशी ल.सि. जाधव यांची आत्मकथा "होरपळ".

स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरसुध्दा मातंगवस्ती किंवा महारवाडा असे शब्द ऐकल्यानंतर नाके मुरडणाऱ्या लोकांची आपल्या देशात काहीच कमी नाही, अशा लोकांची नेहमीच मला कीव करावीशी वाटते. देशाच्या कोणत्याही गावा - शहराच्या हद्दीबाहेर वसवलेल्या मांगामहारांच्या वस्त्या पाहून जाणवते की आजही आपल्याला एक समाज म्हणून खूप मोठा पल्ला गाठायचा बाकी आहे. कर्मठ रूढी-परंपरा जपणाऱ्या जाचक समाजव्यवस्थेमुळे कित्येक पिढ्यांची "होरपळ" आजही होतच आहे. अशाच  एका सोलापूरातील मातंग वस्तीत जन्मलेले या पुस्तकाचे लेखक. आपण मातंग समाजात जन्माला आलो म्हणून दुःख करत बसण्यापेक्षा आपल्या बुद्धिमत्ता आणि मेहनतीच्या जोरावर आपले शिक्षण पूर्ण करून भारतीय स्टेट बँकेमधून सेवानिवृत्त झालेले ल.सि. जाधव, त्यांनी लिहिलेलं सर्वांना प्रेरणादायक असं त्यांचं आत्मकथन म्हणजेच हे पुस्तक "होरपळ".लेखकांचे हे आत्मकथन म्हणजे मातंग समाजाचा आपल्या या समाजव्यवस्थेसोबत जगत असताना दाखवलेला व्यावसायिक, सामाजिक, शैक्षणिक जीवनाचा खडतर प्रवास तर आहेच शिवाय अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा आपल्यातील माणुसकी न सोडता जगण्याची असलेली या समाजाची कला. सोबतच शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे असे हे आत्मकथन - "होरपळ". 

लेखकाचा जन्म स्वातंत्र्यापूर्वीचा, १९४५ चा. शहराच्या हद्दीबाहेर स्वतंत्र प्लॉटींग करून, पाटबंधारे विभागाने शेतीसाठी खोदलेल्या एका मोठ्या कॅनॉलच्या बाजूला वसवलेली दलित वस्ती आणि त्याचाच एक भाग असलेला मांगवाडा जिथे लहानाचे मोठे झाले ल.सि. जाधव. या वस्तीभोवतीचे निसर्गाचे जे वर्णन लेखकाने केलेलं आहे ते माझ्यासारख्या ८० - ९० आणि त्यापूर्वीच्या दशकात जन्माला आलेल्या प्रत्येक वाचकाला त्याच्या बालपणात घेऊन जाते. कारण आजकाल सिमेंटच्या जंगलात हरवलेलं असं निसर्ग सौंदर्य फक्त लहान-सहान खेड्यापाड्यातच शिल्लक राहिलंय. लेखकाचे आपल्या मित्रांच्या टोळक्याने कॅनॉलच्या काठाने निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त फिरणे, पारधी लोकांची शिकार करण्याची पध्दत, कॅनॉलच्या बारमाही पाण्यामुळे आसपास वाढलेली दाट झाडीं आणि त्यामुळे नेहमीच असणारी वेगवेगळ्या पक्ष्यांची हजेरी, वड-पिंपळ असे मोठमोठाले वृक्ष,कॅनॉलच्या जवळच असणारे घनदाट शिंदीचं बन यासह आणखीही बऱ्याच गोष्टींचे या वस्तीभोवतीचे जे वर्णन आत्मकथनाच्या सुरवातीलाच लेखकाने केलेलं आहे ते खरंच खूप सुंदर. इथेच दलीतवस्तीच्या आजूबाजूच्या परिसरात निसर्गतःच उपलब्ध असणाऱ्या बऱ्याच गोष्टींचा उपयोग करून या वस्तीतील कुटुंबे आपली पोटं भरायची. गरीबी असूनसुद्धा प्रत्येक सण अगदी आनंदाने - उत्साहाने साजरा करणारा असा हा समाज. लेखकाच्या आयुष्यातील काही घटना पुस्तक वाचून संपेपर्यंत आपल्यालासुध्दा आठवत राहतात, जसे वस्तीमध्ये भीक मागायला येणारा लहान मुलगा त्यांचाच वर्गमित्र असल्याचं लक्षात येणं किंवा मनाला चटका लावून जाणारा लेखकाचा चुलत मामा येडा कोंड्या याचा झालेला भयानक मृत्यू. स्मशानभूमीत राहून, दिवसरात्र काम करणारा आणि तिथेच येणाऱ्या पिंडाच्या निवदावर जगणारा हा येडा कोंड्या. पुढे महारोग होऊन स्मशानभूमीत रात्री अगोदरच जळत असणाऱ्या एका चितेच्या बाजूला भाजून होणारा त्याचा मृत्यू मन हेलावून टाकतो. या आणि अशा बऱ्याच गोष्टी या समाजाचे आयुष्य किती खडतर असतं हे सांगतात.दलित वस्तीमध्ये जरी इतरही समाज जसे भंगी, लोहार, चांभार,वडार राहत असले तरी सामाजिक भान ठेवून त्यांचे आपापसातील व्यवहार, वेगवेगळे उत्सव यांचे चित्रण लेखकाने या आत्मकथनात केलेलं आहे.थोडक्यात, दलितवस्तीतील चांगल्या - वाईट अशा अनेक अनुभवांसोबतच तेथील लोकांचे  दैनंदिन जीवन लेखकाने अगदी बारकाईने मांडलंय आपल्या या आत्मकथनात. जे वाचताना प्रतिकूल परिस्थितीमध्ये - वातावरणामध्ये लेखक ल.सि. जाधव यांनी मिळवलेले यश नक्कीच आपल्या सर्वांना प्रेरणा देते.

जन्मजातच असणाऱ्या हुशारीमुळे आणि ती हुशारी हेरून लहानपणीच शाळेतील शिक्षकांनी केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे लेखक शिकत गेले.लेखकाला प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणात मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा आवर्जून उल्लेख त्यांनी या आत्मकथनात केलेला आहे. योग्यवेळी मिळणारे मार्गदर्शन किती महत्त्वाचे असते हे लेखकाच्या कारकिर्दीकडे पाहूनच लक्षात येते. पाचवीलाच पुजलेले दारिद्र्य, अगतिकता आणि अज्ञानामुळे वाढीस लागलेली अंधश्रद्धा अशा या दलित समाजात त्याकाळी जिथे मुले शाळेत जायचा विचारसुध्दा करत नसत आणि कोणी गेलेच तर त्यांचा प्रवास मॅट्रिकपर्यंतच थांबे, त्यावेळी लेखकांनी त्यांना असणाऱ्या शिक्षणाच्या आवडीमुळे तसेच आपल्या अपार कष्टाच्या जोरावर, आई-वडिलांच्या पाठिंब्याने,महानगरपालिकेत काम करत बी.ए. आणि त्यानंतर एम. ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.या दरम्यान जवळपास १० वर्षे त्यांनी महानगरपालिकेत काम केले. पुढे महानगरपालिकेतील नोकरी सोडून ते भारतीय स्टेट बँकेत रुजू झाले आणि अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी साहित्यलेखनास सुरुवात केली.त्यांच्या आत्मकथनाबरोबरच त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या आणि कवितासंग्रह सुध्दा खासच. 

ज्या मनुष्याचे अर्ध्याहून जास्त आयुष्य गावाबाहेरच्या दलित वस्तीमध्ये गेले.जिथे पिढ्यान पिढ्या कोणाला साधी अक्षरओळख सुध्दा नव्हती. तिथून त्यांनी घडवलेलं त्यांचं आयुष्य जितकं आपल्याला थक्क करते तितकेच ते प्रेरणादायी सुध्दा आहे.

आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवणारे आणि प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे ल.सि. जाधव यांचे प्रेरणादायी आत्मकथन "होरपळ".




संदीप प्रकाश जाधव


Sunday, July 5, 2020

"अद्भुत शक्तींचे मायाजाल"


लेखक : बाळ भागवत

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस


आज माणसाने कितीही प्रगती केली असली तरी काही प्रश्नांची उत्तरे आजही त्याच्यापाशी नाहीत आणि भविष्यातपण ती मिळण्याची शक्यताही तशी कमीच. जसे की मृत्यूनंतर माणसाचे काय होते? भविष्यात होणारी एखादी घटना काही लोकांना आधिच कशी काय समजते? स्वतःच्याच मृत्यूची चाहूल एखाद्याला कशी काय लागू शकते? सतत आपल्यासोबत कोणीतरी अदृश्यपणे असल्याचा भास का होतो? अगदी धडधाकट असणाऱ्या व्यक्तीचा अचानक कसा काय मृत्यू होतो?माझा पुनर्जन्म झालाय असं जेव्हा एखादा पुराव्यानिशी सांगत असतो तेव्हा खरंच त्याचा पुनर्जन्म झालेला असतो का?आत्मा किंवा भूत नावाची गोष्ट असणे व तिचे लोकांसोबत वावरणे, बोलणे हे खरे का? अतिशय साधे आयुष्य जगत असणाऱ्या काही लोकांसोबत अचानकच विचित्र घटना का घडू लागतात? या आणि अशा अनेक प्रश्नांसोबतच आपल्या या सृष्टीमधे आपल्यासोबत असल्याची जाणीव होणाऱ्या अद्भुत, अदृश्य, अमानवीय, अविश्वसनीय शक्तींचा असण्याचा ठोस पुरावा जरी नसला तरी त्यांचे अस्तित्व आपल्याला कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या प्रकारे सतत जाणवत राहते.आपल्या आसपास घडणाऱ्या काही घटनांची उत्तरे आपल्याकडे नसल्यामुळे अशा शक्तींचे अस्तित्व नाकारताही येत नाही.या अद्भुत, अदृश्य शक्तींबद्दल जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असणारी उत्सुकता, भीती ही एकाच प्रकारची आहे.आजही अनेक ठिकाणी करणी झाली,शाप दिला असे कळल्यावरच त्या धक्क्याने माणसे अन्न-पाणी सोडून देतात आणि मृत्यूचे खरे कारण अंधारातच राहते. अशा घटना सतत विज्ञानाला आव्हान देत राहतात. बाळ भागवतांनी अशा जगभरात घडलेल्या घटनांचे वर्णन त्यांच्या या "अद्भुत शक्तींचे मायाजाल" पुस्तकामध्ये केले आहे.

या गूढ शक्तींविषयी सांगताना भागवतांनी जगभरात घडलेल्या अशा अविश्वासनिय,अदृश्य घटनांची जंत्रीच या पुस्तकामध्ये दिली आहे आणि त्यासाठी त्यांनी आधार घेतला आहे तो  Arthur C. Clarke यांच्या ' The World Of Strange Powers'  या पुस्तकाचा. यामधे दिलेल्या घटना आणि त्यांचे संदर्भ वाचले की आपण एवढेच म्हणू शकतो की आपल्याला जे दिसतं,समजतं तेच फक्त खरं आहे असे म्हणणे साफ चुकीचे आहे. शिवाय या पुस्तकातील  घटना वाचताना आणखी एक गोष्ट जी सतत मनाला जाणवत राहते ती म्हणजे आपल्याला न दिसणारे, स्पर्श न करता येणारे अपल्यासोबतच असलेले अजून एक जग अस्तित्वातच नाही असे म्हणणेसुद्धा धाडसाचेच ठरेल. अशा शक्तींचा खरोखरच विचार केला पाहिजे जोपर्यंत त्यांचं असणं किंवा नसणं पुराव्यानिशी सिद्ध होत नाही.

बाळ भागवतांनी या पुस्तकामध्ये ज्या घटनांचा उल्लेख केला आहे त्या खरेच विचार करायला लावणाऱ्या आहेत.पुस्तक वाचताना त्या आपली उत्कंठा वाढवल्याशिवाय राहणार  नाहीत. १३६ पानांचे हे छोटेखानी पुस्तक वाचताना जगातील विविध देशांमध्ये या अमानवी, अदृश्य शक्तींनी आपले "मायाजाल" कसे पसरवले आहे याची जाणीव होते.पुस्तकामध्ये दिलेल्या काही काही घटना तर अशा आहेत जिथे या अदृश्य, अनाकलनीय शक्तींसामोर मोठ मोठया डॉक्टरांनी आणि मानसोपचारतज्ञांनी सुद्धा हात टेकलेत.जगभरातील अनेक थोर संशोधकांना सुद्धा बुचकळ्यात टाकणाऱ्या घटनांची नोंद बाळ भागवत यांनी या पुस्तकामध्ये केली आहे, विज्ञानाला आव्हान देत राहणाऱ्या या अदृश्य शक्ती आपण कितीही नाकारत राहिलो तरी जगभरात घडलेल्या ज्या घटनांचा उल्लेख लेखकाने इथे केला आहे त्या आपले कुतूहल वाढवण्यासाठी पुरेशा आहेत. 

पुस्तकामध्ये दिल्या गेलेल्या बऱ्याचश्या घटना वाचताना समजते की मानवी मनाची शक्ती खरंच किती आश्चर्यकारक आहे.मानवी मन हे वर्तमानकाळात राहून भूतकाळ आणि भविष्यकाळ यांसोबत नेहमीच जोडले गेलेले असते. केवळ आपल्यामध्ये असणाऱ्या मनःशक्तीचा वापर करून बऱ्याच अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी घडवून आणणारे लोक नेहमीच विज्ञानाला आव्हान देत राहतात,त्यांच्यामध्ये असणारी अदृश्य शक्ती एक कोडेच बनून राहते.हे सांगताना बाळ भागवत यांनी बऱ्याच घटनांचे संदर्भ या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. बाळ भगवतांचे हे पुस्तक वाचल्यानंतर, कुतूहल आणि आश्चर्य सोडून आता एका वेगळ्या दृष्टिकोनातून या शक्तींचा विचार करायला हवा असे वाटून जाते.मृत्यूनंतर सुद्धा माणसाचे आयुष्य असू शकतं हे दाखवणाऱ्या किंवा तसा विचार करायला लावणाऱ्या बऱ्याच घटनांचा उल्लेख या पुस्तकामध्ये आहे.अदृश्य शक्तीचे आणखी एक उदाहरण म्हणजे टेलिपथी, त्याचीही बरीच उदाहरणे पुस्तकात वाचायला मिळतील. या उदाहरणांची सत्यता पडताळण्यासाठी शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगातून ठोस काही हाती आले नसले तरी त्या शक्ती असण्याची शक्यताही नाकारता आलेली नाही. दैवी शक्ती असणारी किंवा दैवी देणगी असणारी व्यक्ती, असे आपण जेव्हा एखाद्यबद्दल ऐकतो तेव्हा खरेच अशी शक्ती असू शकते का? असा प्रश्न आपल्याला पडतो.अशा प्रश्नांची उत्तरे सुद्धा या पुस्तकामध्ये दिलेल्या घटनांमधून आपल्याला शोधता येतील.

पुस्तकामध्ये दिलेल्या घटनांवरून निष्कर्ष हा शेवटी वाचकालाच काढायचा आहे.जरी अशा अनाकलनीय, अदृश्य, गूढ शक्तींच्या असण्याबद्दल लोकांची वेगवेगळी मते असली तरी आजही बऱ्याच प्रगत देशांमध्ये हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय होऊन गेला आहे. त्यामुळेच एका रोमांचकारी अनुभवासाठी आणि आपल्या कुतुहलामध्ये आणखी भर घालण्यासाठी आपण आवर्जून वाचावे असे हे बाळ भागवत यांचे "अद्भुत शक्तींचे मायाजाल".




संदीप प्रकाश जाधव

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये सह्याद्रीचा श्वास आणि पेशवाईचा रक्तरंजित इतिहास: ना...