Saturday, December 25, 2021

"तिसरा डुळा"

 


लेखक : किरण येले

प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन

                                                                           पृष्ठे- १९२, मूूल्य- २५० रुपये.

माणूस आणि प्राण्यांमध्ये निसर्गाने जर सर्वांत मोठा फरक कोणता ठेवला असेल तर तो म्हणजे माणसाची विचार करण्याची ताकद! "Survival of the Fittest” हा सृष्टीचा नियम आहे. जो बलवान आहे, प्रतिकूल परिस्थितीत तग धरु शकतो, त्यालाच या जगात जगण्याचा अधिकार आहे असे हा नियम सांगतो. आपण पाहतो की प्राण्यांमधे बलवान नर म्हाताऱ्या नराला पळवून कळपाचा ताबा घेतो. जनावरांचे कळप नव्याने जन्मलेल्या पिल्लांना मध्यभागी ठेवतात आणि म्हाताऱ्या तसेच आजारी प्राण्यांना मागे ठेवत प्रवास करतात. हेतू हा असतो की एखाद्या हिंस्त्र प्राण्याने हल्ला केला तर या नको असलेल्या प्राण्यांचा आधी बळी जावा. असे प्राणी मागे राहिले तर कळप त्यांना टाकून पुढे निघून जातो. माणसाचे वेगळेपण इथेच आहे! थकलेल्या, आजारी, कमकुवत माणसांना मध्यभागी ठेवत त्यांना तगवण्याचा, जगवण्याचा प्रयत्न करतो तो `माणूस’ अशी खरेतर माणूसपणाची व्याख्या आहे. पण हजारो वर्षांपासून समाजप्रिय म्हणून राहणाऱ्या या मानवरूपी प्राण्याची आजची वैचारिक पातळीच त्याने बनवलेल्या या समाजव्यवस्थेची आज सर्वांत मोठी शत्रू झाली आहे हे अगदी प्रकर्षाने जाणवले किरण येले यांचा "तिसरा डुळा" हा कथासंग्रह वाचत असताना! बऱ्याच दिवसांनंतर डोकं आणि मन सुन्न करणारं काहीतरी दर्जेदार साहित्य वाचनात आलं. आजच्या भावनाशून्य जगात माणसाला आपल्या आसपास घडणाऱ्या बऱ्याच घटना बघण्यासाठी आणि आपल्या खालावत जाणाऱ्या वैचारिक पातळीला पुन्हा एकदा सावरण्यासाठी आवश्यक असणारा 'तिसरा डोळा' उघडण्याची ताकद किरण येले यांच्या "तिसरा डुळा" या कथासंग्रहात आहे. या कथासंग्रहात असणारी प्रत्येक व्यक्तिरेखा कधी ना कधी आपल्या सर्वांच्या अनुभवात येऊन गेली आहे. आपल्या आसपासच्या जगात वावरणाऱ्या या व्यक्तिरेखा कितीही परिचयाच्या वाटल्या तरी अशा लोकांचं जग आणि त्यांचं जगणं यांच्याशी कधीही आपल्याला देणं-घेणं नसतं. त्यामुळंच त्यांचं सुख, दुःख, वेदना, हसणं आणि हसत हसत आयुष्याशी लढणं आपल्याला कधी माहीत होत नाही. फोटो फ्रेमचं दुकान असलेला हारुन, रोजंदारीवर काम करणारा जमील, साई मंदिराच्या दारात भीक मागून जगणारा धनकू, कचरा वेचणारी रखमा, मुसलमान असूनही हनुमान चालीसा म्हणणारा ईस्साक आणि जत्रेत रस्त्यावर महादेवाचं चित्र काढून स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरणारा जगल्या अशा या कथासंग्रहातील प्रत्येक व्यक्तिरेखा वाचकाला अस्वस्थ करतात. किरण येले यांनी वाचकांपुढे उभी केलेली या पुस्तकातील प्रत्येक व्यक्तिरेखा म्हणजे आपल्या समाजव्यवस्थेवर मारलेली एक चपराकच आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी असो वा स्वतःचं वेगळेपण सिद्ध करण्यासाठी असो गरीब तसेच परिस्तिथीने पिचलेल्या आपल्याच समाजबांधवांना पायाखाली घेण्याची काही लोकांची वृत्ती आपल्या मनात बरेच प्रश्नदेखील उपस्थित करते ज्यांची उत्तरं देण्याचं बळ आजतरी आपल्याजवळ नाही. समाजाचाच एक भाग असूनही समाजापासून अलिप्त राहणाऱ्या लोकांना वाचक या "तिसऱ्या डुळ्याने" अनुभवत राहतो आणि शेवटी न संपणाऱ्या विचारचक्रात हरवून जातो.

किरण येले यांनी अतिशय उत्तम पद्धतीने सर्व कथांची मांडणी केली आहे. संग्रहातील काही कथांना हिंदू-मुस्लिम दंगलीची पार्श्वभूमी दिली आहे, ज्यामधे धर्माच्या नावाखाली चालणारं चीड आणणारं राजकारण आपल्या डोळ्यासमोर येतं. या कथा वाचत असताना नकळत आपण आजच्या परिस्थिसोबत कथेतील पात्रांची तुलना करू लागतो आणि त्या पात्रांच्या रूपातील आपल्या आसपासचे चेहरे डोळ्यासमोर आणण्याचा एक केविलवाणा प्रयत्न करू लागतो. 'हारुन फ्रेम वर्क्स' मधे या दंगलीचं लोण हारुनच्या दुकानापर्यंत, घरापर्यंत  पोहोचतं आणि नंतर त्याचं अस्तित्वच गिळून टाकतं, उरते ती फक्त राख! 'ईस्साक पक्का हिंदू होता' कथेतला हनुमान चालीसा म्हणणारा ईस्साकही धर्माच्या या चक्रात भरडला जातो. 'जावेद जिवंत आहे' या कथेत नूर हॉटेलचा मालक नूर, जमील, जमीलशी निकाह करून मुसलमान झालेली रखमा, उस्मान, नवीनभाई अशा व्यक्तिरेखांमधून पुढे सरकत शेवटी जेव्हा जावेद कोण हे वाचकाला समजते तेव्हा एक अनामिक भीती वाचकाला स्पर्शून जाते. 'झुंबर' कथेत भेटतात धनकू, दगडूशेठ, शेठच्या मुलाची ती लग्नाची वरात. लग्नाच्या या वरातीमध्ये धनकूच्या डोक्यावर आहे लखलखतं झुंबर; दारिद्र्याचं! मिरवणुकीत धनुकच्या डोक्यावरील हे 'झुंबर' कोसळतं ते धनकूला घेऊनच. 'प्रॉपर्टी एक्झिबिशन' या कथेत बंद पडलेल्या फॅक्टरीचे सांगाडे, त्यांना चिकटलेलं कामगारांचं रक्त, घाम आणि तिथं उभी राहणारी टॉवर संस्कृती वाचकाला अस्वस्थ करते. या कथासंग्रहातील शेवटची कथा आहे 'तिसरा डुळा'. जत्रेत डोंबारी खेळ करणारी मंगळी आणि रस्त्यावर शंकराचं चित्र काढणाऱ्या जगल्याचा मुलगा यांची ही कथा. जगल्या मेल्यावर मंगळीवर उपासमारीची वेळ येते आणि तेव्हाच तिला जो मार्ग सापडतो त्यातून जन्माला येणारी ही शेवटची कथा. शंकरासारखं डमरू वाजवणाऱ्या, तांडव करणाऱ्या, शंकराची गाणी पाठ असणाऱ्या म्हादूला शंकराचं सोंग बनवून पैसे कमवण्याचा विचार मंगळीच्या डोक्यात येतो आणि त्यानंतर शंकरावर प्रचंड भक्ती असलेल्या आपल्या मुलाला, म्हादूला शंकर बनवून जत्रेत फिरवायला चालू केल्यानंतर जे होतं ते म्हणजे "तिसरा डुळा".

आवर्जून वाचावा असा कथासंग्रह "तिसरा डुळा"!




संदीप प्रकाश जाधव


Tuesday, December 14, 2021

"महानायक"

 



लेखक : विश्वास पाटील

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

                                                                           पृष्ठे- ६९३, मूूल्य- ५२५ रुपये.


"पानिपत" या आपल्या पहिल्या कादंबरीच्या माध्यमातून घराघरात पोहचलेल्या विश्वास पाटील या नावाला तसं स्वतंत्र परिचयाची गरज नाही. फक्त मराठीतच नाही तर इतरही भाषांमधील त्यांचं अनुवादित साहित्य लोकांनी डोक्यावर घेतलं. 'पानिपत' नंतर 'झाडाझडती' आणि 'पांगिरा' या त्यांच्या कादंबऱ्यादेखील मी वाचल्या. मराठ्यांच्या शौर्याची गाथा सांगणारी 'पानिपत', धरणग्रस्तांच्या उध्वस्त जीवनाचा जवळून परिचय करून देणारी 'झाडाझडती' आणि पाण्यासारख्या ज्वलंत विषयावर लिहिलेली, दुष्काळाचं विदारक चित्रण करणारी 'पांगिरा' या तीनही कादंबऱ्यांतून त्यांनी वाचकाच्या मनाला हात घातला. कादंबरीच्या माध्यमातून तो काळ किंवा त्या व्यक्तिरेखा वाचकांच्या समोर उभं करण्याचं सामर्थ्य असणाऱ्या मोजक्याच लेखकांची यादी विश्वास पाटील या नावाशिवाय पूर्णच नाही होऊ शकणार. "महानायक" ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर बेतलेली विश्वास पाटील यांची चरित्रात्मक कादंबरी मी बऱ्याच महिन्यांपूर्वी घेऊन ठेवली होती पण तिचा आवाका पाहूनच ठरवलं की ही निवांत वेळ काढूनच वाचली पाहिजे. खरंतर लहानपणापासूनच मला नेताजींबद्दल प्रचंड कुतूहल होतं, प्रत्येक सार्वजनिक किंवा शाळेतील एखाद्या कार्यक्रमात फोटोपूजनाच्या वेळी 'गांधीजी' आणि 'शिवाजी महाराजांसोबत' पुजल्या जाणाऱ्या तिसऱ्या फ्रेममधील पोलीसी वेशातील त्या गुटगुटीत हसऱ्या चेहऱ्याबद्दल नेहमीच एक कमालीचं आकर्षण वाटायचं. पण इतर असंख्य दुर्दैवी भारतीयांप्रमाणेच या थोर व्यक्तीबद्दल खूपच कमी माहिती असणाऱ्यांपैकी मी एक होतो. नेताजींबद्दल पसरणाऱ्या ऐकीव कथा आणि अफवांतून ते भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील एक गूढ पात्र बनून गेले. स्वातंत्र्याच्या इतिहासात जितकं इतर स्वातंत्र्य सैनिकांवर लिहिलं गेलं तितकं कधी नेताजींबद्दल लोकांपर्यंत पोहचलच नाही त्यामुळेच असेल कदाचित की या थोर देशभक्ताबद्दल माहिती नसणारे असंख्य भारतीय आजही सापडतील. विश्वास पाटील यांनी "महानायक" च्या माध्यमातून नेताजींचा अतिशय प्रेरणादायी जीवनप्रवास लोकांसमोर आणला आहे. भारताच्या अखेरच्या स्वातंत्र्यसंग्रामात कर्तृत्व गाजविणाऱ्या एका महानायकाच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि जीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न त्यांनी या कादंबरीतून केला आहे. नेताजींच्या आयुष्यातील बऱ्याच प्रसंगांचं अतिशय बारीक वर्णन या कादंबरीत आपल्याला वाचायला मिळेल. सुभाषचंद्र बोस यांच्या नाट्यमय आणि संघर्षपूर्ण जीवनावर आधारलेल्या या कादंबरीत महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचे परस्पर संबंध, नेताजींचे गुरू देशबंधू चित्तरंजनदास आणि सुभाषचंद्र बोस यांचं नातं, नेताजींच्या प्रत्येक कार्यात त्यांचे वाडीलबंधू शरदचंद्र यांचा असणारा पाठिंबा, तब्बल ११ वेळा नेताजींना झालेला तुरुंगवास, नेताजींचं आजारपण, अवघ्या ८ महिन्यांच्या तयारीतून ISS ची परीक्षा उत्तीर्ण होऊन क्लास वन दर्जाची ब्रिटिशांची नोकरी लाथाडणारे नेताजी, गांधींसारख्या मोठ्या आणि देशव्यापी नेत्यासमोर स्वतःची वेगळी प्रतिमा तयार करून त्यांना पर्याय म्हणून समोर येणारे नेताजी, सुभाषचंद्र बोस हे ब्रिटिश साम्राज्याचे क्रमांक एकचे शत्रू आहेत असं ठरवून त्यांना झालेली नजरकैद, आपल्या मातृभूमीला गुलामगिरीतून सोडवण्यासाठी नजरकैदेतून निसटून देशाबाहेर जाण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास, बाह्यजगाकडून मदत मिळवण्यासाठी नेताजींनी केलेली प्रचंड धडपड, हुकूमशाह हिटलरसोबतची भेट, आझाद हिंद सेनेची स्थापना, नेताजींचं वैवाहिक जीवन, त्या वेळेची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिस्थिती, भारतीय स्वातंत्र्य लढा, आझाद हिंद सेनेतील नेताजींच्या सहकार्‍यांनी केलेला त्याग, तत्कालीन वास्तवाला असलेले विविध आयाम, नेताजींची मानसिक, भावनिक आणि वैचारिक आंदोलने आणि शेवटी झालेला त्यांचा दारुण अंत या सर्वांचे अगदी तपशीलवार वर्णन आहे ज्यातून विश्वास पाटील यांनी घेतलेली प्रचंड मेहनत लक्षात येते. आपल्या मातृभूमीला इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त करायचा एकच ध्यास घेऊन अर्ध जग पालथं घालणाऱ्या या 'महानायकाचा' त्यांच्या शालेय जीवनापासून ते त्यांच्या अपघाती मृत्यूपर्यंतचा धगधगता आणि तितकाच प्रेरणादायी प्रवास म्हणजे ही कादंबरी "महानायक"! अडतीस कोटी देशबांधवांची गुलामगिरीतून मुक्तता या ध्येयासाठी एका कडव्या आणि लढवय्या देशभक्ताने अर्ध्या जगात मारलेली गरुडभरारी म्हणजे ही कादंबरी "महानायक"! आयुष्यभर स्वकीयांशी आणि ब्रिटिश साम्राज्यासारख्या परकियांशी संघर्ष करणाऱ्या नेताजींना एक व्यक्ती न मानता एक राष्ट्र म्हणून भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी जर्मनी-जपान ने केलेल्या मदतीनंतर इंफाळ-कोहिमा- ब्रम्हदेशच्या अरण्यात जुंपलेला घनघोर रणसंग्राम म्हणजे ही कादंबरी "महानायक"! खरंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची झळाळती कारकीर्द ७०४ पानांपुरती मर्यादित नक्कीच नाही पण तरीही विश्वास पाटील यांची ही कादंबरी वाचल्यानंतर वाचक नेताजींना मनोमन वंदन केल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.

देशोदेशींच्या दफ्तरखान्यात आजवर अडकून पडलेल्या दुर्मिळ दस्तावेजांचा, नव्याने संशोधन केलेल्या कागदपत्रांचा अभ्यास करून आणि आझाद हिंद सेनेने तुडवलेल्या त्या 'रणवाटां'वरून भ्रमण करून विश्वास पाटील यांनी चितारलेली, प्रत्येकाने आवर्जून वाचलीच पाहिजे अशी नेताजींची अपरिचित जीवनकहाणी "महानायक"!!!






संदीप प्रकाश जाधव

Tuesday, December 7, 2021

"ग्रहण"

 


लेखक : नारायण धारप

प्रकाशक : साकेत प्रकाशन

                                                                           पृष्ठे- २२३, मूूल्य- २५० रुपये.


भयकथा असोत की गूढकथा नारायण धारप आणि रत्नाकर मतकरी या दोन नावांचा विचार डोक्यात आल्याशिवाय मराठी वाचक पुढे जाऊच शकत नाही! मराठी साहित्यविश्वात गूढकथा आणि भयकथा हा साहित्य प्रकार खऱ्या अर्थाने समृद्ध केला असेल तर तो या दोन व्यक्तींनीच! या दोन दिग्गजांची तुलना करणं तसं चुकीचंच होईल कारण दोघांचीही वाचकाला गुंतवून ठेवण्याची शैली वेगळी आहे पण दोघांमध्ये समान धागा जर कोणता असेल तर तो त्यांची प्रचंड कल्पनाशक्ती! दोघांनीही त्यांच्या प्रचंड कल्पनाशक्तीच्या जोरावर लिहिलेले एकाहून एक कथासंग्रह, कादंबऱ्या आजही वाचकाला भुरळ घालतात. तरीही मला जास्त आकर्षित करतात ती धारपांचीच पुस्तके. आपल्या खास लेखनशैलीने वाचकाला रहस्यकथेचाच एक भाग बनवून टाकण्याची त्यांची जादू खासच! पुढे काय होणार या उत्सुकतेने वाचक त्या कथेसोबतच जोडला राहतो. धारपांची जवळपास ६-७ पुस्तके आजपर्यंत मी वाचली आणि आणखीन बरीच संग्रहीदेखील घेऊन ठेवली आहेत पुढच्या 'मेजवानीसाठी'. याच पुस्तकांच्या पंक्तीमधील वाचून हातावेगळी केलेली एक भन्नाट रहस्य कादंबरी "ग्रहण"! एखाद्या गूढ चित्रपटाला लाजवेल असं कथानक! कादंबरीच्या चौथ्याच पानावर धारपांनी वाचकाला असा काही जबरदस्त धक्का दिला आहे की कादंबरी पूर्ण वाचल्याशिवाय ती बाजूलाच नाही ठेवता येणार. जवळपास निम्म्याहून अधिक कथा पुढे गेल्यानंतरही वाचक या धक्क्यातून बाहेर नाही येत. अगदी नेहमीप्रमाणे होणारी या कथेची सुरुवात. आपला नवरा अरविंद आणि दोन मुलांसोबत स्वतःच्या प्रशस्त वाड्यात आनंदाने राहणाऱ्या मिसेस पोतदार यांच्याभोवती फिरणारी या कादंबरीची गूढकथा. एके संध्याकाळी मुलांसाठी आईस्क्रीम आणण्याच्या निमित्ताने वाड्यातून बाहेर पडलेल्या मिसेस पोतदारांच्या आयुष्यात वाड्यापासून अवघ्या १०० पावलांवरील दुकानातून परतत असताना असा काही प्रकार घडतो की त्यांच्या पुढच्या आयुष्यालाच कलाटणी मिळते आणि या घटनेने धारपांनी ज्या पद्धतीने वाचकाला सुरुवातीलाच सुन्न करून सोडलं आहे त्याला तोड नाही. ही कथा पुढे हळूहळू उलगडत जाताना कथेत होणारा इतर पात्रांचा प्रवेश जसे सारंग आणि त्याचं कुटुंब सोबतच डॉ. शेखर आणि त्याचं कुटुंब शिवाय मिसेस पोतदारांच्या दोन समांतर आयुष्यातील इतर पात्रे या सर्वांत वाचक असा काही अडकून जातो की नकळत वाचकाच्या डोक्यातही एक विचारचक्र चालू होते ज्यात मिसेस पोतदार नेमक्या कोण आहेत? त्या कुठून आल्या आहेत? त्यांच्यासोबत पुढे काय होईल? त्यांचं कोणतं आयुष्य नेमकं खरं असेल? आईस्क्रीम आणायला जाण्यापूर्वीचं की ते घेऊन परत येताना समोर आलेलं नवीन आयुष्य? त्यांच्या आयुष्यातील कोणत्या व्यक्ती खरेच अस्तित्वात असतील? हेच विचार नाचत राहतात. मिसेस पोतदारांची ही कथा पुढे सरकत असताना इतरही अनेक ठिकाणी धारपांनी वाचकांची मती गुंग केली आहे जसे मिसेस पोतदारांच्या आधीच्या आयुष्यात आईचे होणारे निधन आणि या नवीन आयुष्यात त्यांच्या वडिलांचं अस्तित्वात नसणं, बँकेत अचानकच अरविंदचं तिच्या समोर येणं, नंतर अरविंदच्या वेगळ्या आयुष्याची होणारी ओळख, पूर्वायुष्यातील आपल्या घरी शहानिशा करण्यासाठी गेल्यानंतर तिच्या आईनेच तिला नाकारणे परंतु टायगर या त्यांच्या घरातील कुत्र्याकडून होणारं विचित्र वर्तन या सर्व गोष्टी कथेतील रहस्य आणखीनच वाढवतात. एक अतिशय गूढ रहस्य आपल्या डोळ्यासमोरून उलगडत जात असल्याचा अनुभव धारपांनी त्यांच्या खास शैलीतून वाचकांना करून दिला आहे.

गूढकथा - रहस्यकथा वाचनाची आवड असणाऱ्यांनी आवर्जून वाचण्यासारखी कादंबरी "ग्रहण".





संदीप प्रकाश जाधव



Tuesday, November 30, 2021

"राऊ"

 



लेखक : ना. सं. इनामदार

प्रकाशक : कॉन्टिनेन्टल प्रकाशन

                                                                           पृष्ठे- ४८३, मूूल्य- ४०० रुपये.


मराठी साहित्यविश्वातील पहिल्या १० ऐतिहासिक कादंबरींची जर यादी बनवायची म्हटलं तर ना.सं.इनामदार यांच्या "राऊ"चा उल्लेख त्यात आवर्जून करावाच लागेल. बाजीराव म्हटलं की मस्तानी हे नाव आपसूकच ओठांवर येतं. आजच्या पिढीत असे बरेच लोक सापडतील ज्यांना मस्तानीच्या पलीकडे बाजीराव माहीतच नाही पण खरं तर मस्तानी हे प्रकरण बाजीराव पेशव्यांच्या झळाळत्या कारकिर्दीतील फक्त एक पान होतं. अवघं ४१ वर्षांचं आयुष्य! २० वर्षांची वादळी कारकीर्द आणि त्यात लढलेल्या ४० लढायांपैकी एकही लढाई न हरलेला एक थोर सेनानायक म्हणजे बाजीराव पेशवा! मराठा साम्राज्याची विजयी पताका चारी दिशांना फडकवणाऱ्या, मराठा साम्राज्याचा विस्तार करणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीमहाराज यांचा संकल्प पुढे नेऊन महाराष्ट्राला ४०० वर्षं वाकुल्या दाखवणारी दिल्ली काबीज करणाऱ्या या शूरवीराच्या जीवनात सौंदर्यवती मस्तानीने प्रवेश केला आणि एकच वादळ उठले. त्याच वादळाला केंद्रस्थानी ठेवून इनामदार यांनी ही कादंबरी लिहिली आहे. थोरले बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्यातील नाते जरी या कादंबरीच्या केंद्रस्थानी असले तरी एका मनस्वी प्रियकरासोबतच राजकारण धुरंधर सेनानीची ओळख आपल्याला लेखकांनी करून दिली आहे. इतिहासातील या वादळी प्रेमकहाणीला कल्पनेची जोड देताना ऐतिहासिक घटनांना कोणताही धक्का लागणार नाही याची पुरेपूर काळजी ना.सं. इनामदार यांनी घेतली आहे. अत्यंत रसाळ, ओघवत्या भाषेत ही प्रेमकहाणी रंगवत असताना बाजीरावांचा पराक्रम, त्यांनी बदलेली युद्धशैली, पायदळ-तोफखाना यांना बाजूला ठेऊन प्रचंड वेगाने शत्रूवर आक्रमण करून त्यांनी लढलेल्या लढाया, त्यांचं राजकारण, थोरल्या महाराजांप्रती असणारी त्यांची श्रद्धा, त्यांची स्वराज्यनिष्ठा, काशीबाई-बाजीरावांचं आणि बाजीराव-चिमाजी अप्पांचं नातं, बाजीरावांचं त्यांची आई राधाबाईंसोबतचं नातं अशा अनेक अंगांना इनामदार यांनी स्पर्श केला आहे. २० वर्षांत लढलेल्या जवळपास ४० हून अधिक लढाया जिंकून अजिंक्य राहणारा हा थोर सेनानी घरातील इतर नाती जपत असताना कुटूंबकलहात अडकून आपल्याच माणसांकडून पराभूत होतो तेव्हा दुःखात व्याकुळ होणारा बाजीरावसुद्धा इनामदारांनी अतिशय ताकदीने रंगवला आहे. काशीबाईंच्या मनात आपल्या पतीविषयीची असणारी प्रतिमा आणि श्रद्धा यांचा मेळ घालताना मस्तानीबद्दल असणाऱ्या बऱ्याच गैरसमजांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न इनामदार यांनी या कादंबरीतून केला आहे. धर्म, जात, रूढी, परंपरा या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन जुळलेली ही प्रेमकहाणी! सत्ता सांभाळत असताना, युद्धभूमीवर आवश्यक असणाऱ्या कणखरपणासोबतच थोरल्या बाजीरावांच्या मनात असलेला त्यांच्या प्राणप्रिय मस्तानीसाठीचा हळवा कोपरादेखील लेखकांनी वाचकांसमोर आणला आहे. नवऱ्याचं वागणं पटत नसलं तरी सामाजिक आणि कौटुंबिक बंधनांमुळे तसेच राऊवर असणाऱ्या श्रद्धेमुळे काशीबाईंची होणारी घुसमट वाचकाच्या मनालाही जाणवत राहते. शनिवार वाड्यातील राजकारण, श्रीमंतांची पत्नी काशीबाई यांची अगतिकता, श्रीमंतांच्या भावंडांचे हेवेदावे, सत्तासंघर्ष हे सर्व असूनही बाजीराव-मस्तानी ही वादळी प्रेमकहाणी बहरतच राहते. कादंबरीची सुरुवात होते शनिवारवाड्याच्या वैभवशाली वास्तू पासून! कादंबरी जसजशी पुढे सरकत जाते तेव्हा जाणवते ही कहाणी फक्त बाजीराव पेशव्यांचीच नाही तर अवघ्या हिंदुस्थानाचं सत्ताकेंद्र असणाऱ्या शनिवारवाड्याचीदेखील आहे. सात मजली शनिवारवाड्याचं कादंबरीतील वर्णन आणि स्थापत्यशास्त्राच्या नमुन्यांतून लेखकांनी वाचकांसमोर ती भव्य वास्तू अक्षरशः जीवंत केली आहे. ना.सं. इनामदारांनी आपल्या शब्दांतून बाजीराव पेशव्यांची संपूर्ण कारकिर्दच वाचकांच्या डोळ्यांसमोर उभी केली आहे. त्यामुळेच की काय १९७४ साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीची जादू आजही कायम आहे.

आजपर्यंत फक्त प्रेमवीर म्हणून रंगवलं गेलेल्या बाजीराव पेशव्यांबद्दलचे विचार बदलायला भाग पाडणारी, आवर्जून संग्रही घेऊन वाचावी अशी कादंबरी "राऊ".






संदीप प्रकाश जाधव


Tuesday, November 23, 2021

"बटाट्याची चाळ"


 

लेखक : पु. ल. देशपांडे

प्रकाशक : मौज प्रकाशन

                                                                           पृष्ठे- १७१, मूूल्य- २०० रुपये.


पु. ल देशपांडे अर्थातच महाराष्ट्राचे लाडके भाई. मराठी साहित्यविश्वाला मिळालेलं एक रत्नच. जगामध्ये असे मोजकेच साहित्यिक असतील ज्यांचं नाव अगदी तळागाळातील लोकांपर्यंत पोहचले आणि मराठी साहित्यविश्वातील अशा एका नावाला स्वतंत्र परिचयाची गरज नक्कीच नाही. वाचनाची आवड असो वा नसो पु.लंच्या एखाद्या तरी पुस्तकाचे नाव प्रत्येक मराठी माणूस नक्कीच सांगू शकेल इतकं ते आणि त्यांचं साहित्य लोकांपर्यंत पोहचले. भाई नावाने ओळखल्या जाणाऱ्या पु.लंची जादू आजच्या मोबाईल युगातही कायम आहे. अगदी माझ्यापुरतंच सांगायचं झालं तर रिकाम्या वेळेत मोबाइल हातात असताना माझा सर्वांत जास्त वेळ पु.लंचे कथाकथन ऐकण्यातच जातो. कितीही वेळा ऐकलं तरी ऐकतच रहावं असं अगदी सहज, सुंदर आणि हसतखेळत होणारं सादरीकरण! 'स्टँड-अप' कॉमेडी हा प्रकार आजच्या पिढीला नवीन वाटत असला तरी बऱ्याच वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या एक-दोन पिढ्यांना पु. ल. देशपांडेंनी त्यांच्या कथाकथनांमधून अगदी खळखळून हसवलंय. आज पु.लंच्या लेखणीची ताकद न अनुभवणारे लोक अपवादानेच सापडतील. अगदी सहज सुंदर भाषेत लिहिलेल्या त्यांच्या लेखनाची जादूच अशी आहे की आपण मनाच्या आनंदी अवस्थेत पु.लंचे एखादे पुस्तक जर वाचले तर आपला आनंद द्विगुणित होईल तसेच जर दु:खी अवस्थेत वाचले तर त्या दु:खाची तीव्रता खूप कमी होईल आणि या गोष्टीचा अनुभव बऱ्याच वाचकांनी घेतलाही असेल. पु.लंनी त्यांच्या आयुष्यात अनेक लेख, कथा, कादंबऱ्या लिहिल्या ज्या लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या त्यांपैकीच एक अतिशय सुंदर आणि अजरामर पुस्तक म्हणजे "बटाट्याची चाळ". शाळेत असतानाचा "बटाट्याची चाळ" नावाचा पाठ्यपुस्तकातील धडा ज्यामध्ये पंतांचे वजन वाढल्याने ते डायट करायचे ठरवतात नंतर त्या डायटचा कसा बोजवारा उडतो हे आजही आठवते पण तेव्हा असणाऱ्या विनोद समजण्याच्या 'कुवतीनुसार' त्याचा आनंद घेताच नाही आला आणि असे माझ्यासारखे बरेच वाचक असणार यात शंकाच नाही. 'बटाट्याची चाळ" च्या माध्यमातून पु. ल. देशपांडेंनी चाळ संस्कृतीची नेटकी मांडणी, चाळीत राहणाऱ्यांची सुख-दुःखं, आचार विचार, सणवार, सर्वांना सामावून घेण्याची तेथील लोकांची वृत्ती आणि प्रत्येकाच्या पोटात असलेली उदंड माया या सगळ्याचं समर्पक जिवंत चित्र उभं केलं आहे. आज विकासाच्या नावाखाली प्रत्येक छोट्यामोठ्या शहरांत उभारल्या जाणाऱ्या 'आधुनिक चाळी' बघताना, तिथे वावरताना प्रकर्षाने जाणीव होते ती याच हरवलेल्या संस्कृतीची! "बटाट्याची चाळ" या पुस्तकाचं लक्ष वेधून घेणारं मुखपृष्ठच या चाळ संस्कृतीबद्दल खूप काही सांगून जातं. एक डेरेदार वृक्ष आणि त्याच्या बुंध्यामध्ये वसलेली "बटाट्याची चाळ"! एखाद्या डेरेदार वृक्षाच्या पसरलेल्या हजारो फांद्या ज्याप्रमाणे त्याच्या बुंध्याशी एकरुप होतात त्याचप्रमाणे या चाळीतील वेगवेगळ्या विचारांचे लोक या चाळ संस्कृतीशी एकरुप होऊन राहतात. वरवर बघितले तर ही चाळ प्रचंड गजबजलेली दिसते परंतु इथली नाती एखाद्या वृक्षाइतकीच भक्कम आहेत हेच सांगणारं असं हे मुखपृष्ठ. चाळ संस्कृतीचे वैभव दाखवताना पु.लंनी 'बटाट्याच्या चाळीतील' काही इरसाल पात्रांना घेऊन जी धमाल उडवलेली आहे ती हसता हसता प्रत्येकाला अंतर्मुखसुद्धा करते. पु.लंनी उभी केलेली या पुस्तकातील प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्याला आपलीशी वाटते कारण या व्यक्तिरेखा आपल्या आजूबाजूला फिरत असतात, रोजच्या आयुष्यात येतात आणि भेटतात. त्यामुळेच पुस्तक वाचताना आपण चाळीतील या पात्रांमधील आपलेपणात हरवून जातो. १९५८ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची जादू आजही तशीच असण्याचं हेदेखील एक कारण आहे. पु.लंच्या सूक्ष्म निरीक्षणातून साकारलेली प्रत्येक व्यक्तिरेखा मग ती सोकाजी दादा त्रिलोकेकर असोत किंवा आचार्य बाबा बर्वे, अण्णा पावशे, राघू नाना सोमण, कोचरेकर मास्तर, काशिनाथ नाडकर्णी असोत सर्वचजण वाचकाला मनमुराद हसवून जातात. विनोदाच्या माध्यमातून व्यक्ति-व्यक्तींमध्ये असणारे दोषही पु.लंनी तितक्याच सफाईदारपणे वाचकांसमोर आणले आहेत. १२ प्रकरणांची ही "बटाटयाची चाळ" जितकं हसवते तितकंच तिच्या शेवटच्या टप्प्यात ती वाचकाच्या डोळ्यात अश्रूदेखील उभं करते, ‘एक चिंतन’ हे प्रकरण वाचताना! वेगळं काहीतरी वाचन आणि भरपूर करमणूक देणारी पु.लंची ही "बटाट्याची चाळ"! एक सांस्कृतिक वैभव दाखवणारी कथा आणि त्या कथेतील जिवंत पात्रांसोबत भाई जणू काही वाचकाचं बोट धरून त्याला "बटाट्याच्या चाळी"तूनच फिरवून आणतात. 

आज जवळपास लोप पावलेल्या चाळ संस्कृतीचं जवळून दर्शन घडवणारं, प्रत्येकाने आवर्जून वाचावं आणि संग्रही ठेवावं असं पुस्तक "बटाट्याची चाळ".





संदीप प्रकाश जाधव



Sunday, November 14, 2021

"दशक्रिया"

 


लेखक : बाबा भांड

प्रकाशक : साकेत प्रकाशन

                                                                           पृष्ठे- २०८, मूूल्य- २०० रुपये.


अलीकडेच येऊन गेलेला मराठी चित्रपट "दशक्रिया" ज्या मराठी कादंबरीवर बेतला आहे ती बाबा भांड यांची कादंबरी म्हणजे "दशक्रिया"! खरंतर चित्रपटाचा विषय ऐकूनच या कादंबरीबद्दल एक कुतूहल निर्माण झालं होतं त्यामुळेच चित्रपट न पाहता प्रथम कादंबरी वाचायचं ठरवलं आणि कादंबरी संग्रही घेतली पण आज बऱ्याच दिवसांनी ती वाचायचा योग आला. हिंदू संस्कृतीत माणसाच्या मरणानंतर केला जाणारा एक महत्त्वाचा विधी म्हणून 'दशक्रियेकडे' पाहिले जातं. मरणानंतर माणसाचं काय होतं हा जरी स्वतंत्र संशोधनाचा विषय असला तरी मेलेल्या माणसाच्या आत्म्याला शांती मिळावी या शुद्ध हेतूने आणि श्रद्धेने वर्षानुवर्षांपासून केला जाणारा हा 'दहाव्याचा' विधी आज खरंच त्याचं पावित्र्य राखून आहे का? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे आणि त्याचंच अगदी विदारक चित्रण बाबा भांड यांनी त्यांच्या "दशक्रिया" मधून केलेलं आहे. "दशक्रिया" ही कहाणी जरी भानुदास नावाच्या एका शाळकरी मुलाच्या आयुष्याभोवती फिरत असली तरी त्या कहाणीच्या माध्यमातून बाबा भांड यांनी ज्या विषयाला हात घातला आहे त्याने वाचक सुन्न आणि निःशब्द होऊन जातो. आज शेकडो घाटांवर पार पडणाऱ्या या 'दशक्रियेच्या' विधींवर एखाद्या गरिबाचं आयुष्य कसं अवलंबून असतं, याचा शोकांत वेध बाबा भांड यांनी या कादंबरीतून घेतला आहे जो बऱ्याच वेळा वाचकाला अतिशय भावनिक करतो. गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं ऐतिहासिक पैठण शहर आणि पैठणचा घाट बाबा भांड यांनी त्यांच्या लेखणीतून वाचकांसमोर उभा केला आहे. 'दशक्रियेच्या' नावाखाली पैठणच्या घाटावर घडणारे वास्तव तर लेखकांनी उजेडात आणलंच आहे शिवाय मरणानंतरच्या विधी, रुढी - परंपरांचे स्तोम, विदारक जातीव्यवस्था, अर्थार्जनाचे संतापजनक पण तितकेच करुणाजनक प्रकारदेखील वाचकांसमोर येतात जे वाचकाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावतात. घाटावरचं हे वास्तव बघून वाचक अस्वस्थ होतो आणि यातच या कादंबरीचं यश आहे म्हटलं तरी ते चुकीचं नाही होणार. जर तटस्थपणे पाहिलं तर सामाजिक वास्तवाचं एक वेगळंच दर्शन या कादंबरीतून होतं. कादंबरीचं नाव जरी "दशक्रिया" असलं तरी दहाव्याच्या विधीपेक्षा समाजातील उच्च-नीच अशा अनेक वर्गांना पोटासाठी एकाच पातळीवर येऊन करावा लागणारा विदारक संघर्ष हाच या कादंबरीचा मूळ गाभा आहे. शाळेत जाणारा लहान भानुदास हा या कादंबरीचा नायक! पैठणला गोदावरीच्या घाटावर दररोज दशक्रियेचे विधी होत असतात. हे विधी सुरू होण्यापूर्वी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांकडून त्या व्यक्तीच्या अस्थी असलेली राख पाण्याकडे पाठ करुन खांद्यावरुन पाण्यात सोडली जाते. अशा अस्थींची राख पाण्यात सोडत असताना काही मुलं पाण्यात उभं राहून त्या राखेखाली लोखंडी चाळण धरतात. हे करत असताना जर कधी राख पाण्यात पडली तर थेट पाण्यात बुडी मारुन राख-माती उपसत राहतात, कारण या राखेत त्यांना सापडतं रुपया-दोन रुपयाचं एखादं नाणं किंवा क्वचितप्रसंगी एखादा सोन्याचा तुकडादेखील! अशा मुलांच्या घोळक्यातीलच एक मुलगा म्हणजे हा कादंबरीचा नायक भानुदास! एक पाय मोडल्याने नोकरी गमावून कायमचा घरात बसून राहणारा भानुदासचा बाप, नवऱ्याच्या मदतीशिवाय आपल्या संसाराचा गाडा जिद्दीने ओढणारी भानुदासची आई, भानुदासच्या दोन छोट्या बहिणी, शिक्षणासोबतच शिवणकाम शिकणारा भानुदासचा भाऊ निवृत्ती, नदीतील राख चाळण्यासाठी मुलांना चाळण भाड्याने देणारा पत्रे सावकार, घाटावर दशक्रियेचे विधी करणारे केशव भटजी, लहुजीनगरमधील म्हातारी आत्याबाई, भगत कुटुंबातील सदस्य, घाटावर अंत्यविधीसाठी लाकडे पुरवणारा बाबा आणि इतरही काही पात्रे कादंबरीत तितकीच महत्त्वाची आहेत. भानुदासचं रोजचं काम म्हणजे शाळेत जाताना घाटावर कोणी दशक्रियेसाठी आलेलं सावज दिसतंय का, कुणाची राख येतेय का ते पाहायचं आणि त्यातून दिवसाकाठी मिळालेल्या पैशातून घराला हातभार लावायचा. दारिद्र्याने पूर्णपणे ढासळून गेलेल्या आपल्या कुटुंबाला आधार देण्याचे स्वप्न पाहणार्‍या भानुदासची ही कहाणी हळूहळू विस्तारत जाते आणि रोगट रूढींमुळे धर्माला आलेली अवकळा, विदारक जातीव्यवस्था, अर्थार्जनाचे एकाच वेळी संतापजनक व करुणाजनक वाटणारे पर्याय, पार कोलमडलेली कुटुंबव्यवस्था, उच्च-नीच अशा अनेक वर्गांना पोटासाठी एकाच पातळीवर आणणारी विचित्र समाजस्थिती, आधुनिकीकरण आणि पारंपरिक व्यवसाय यांच्या कात्रीत सापडलेली एक पिढी, पैशांमुळे मानवी नात्यांचे पटापट बदलत जाणारे रंग, मृत्यू आणि धर्माबाबतचे चिंतन, सोनेरी इतिहासाचे सडलेले कातडे अंगावर ओढून सुस्त पडलेली नगरी अशा अनेक गोष्टींना कवेत घेऊन सद्य:स्थितीचं अतिशय क्लेशदायक चित्रण आपल्यासमोर उभी करते. भानुदास आणि घाटावर चालणाऱ्या "दशक्रिया" यांच्या विचारात गढून गेलेल्या वाचकाच्या मनाला कादंबरीचा शेवट चटका लावून जातो. घाटावर जितक्या जास्त "दशक्रिया" तितके जास्त अर्थार्जन या एकाच भावनेने घाटावर लोकांच्या राखेची वाट बघणाऱ्या भानुदासला जेव्हा त्याच्याच लाडक्या मामेबहिणीची राख घाटावर विसर्जनासाठी आलेली समजते तेव्हा त्याच्या बालमनाला जो धक्का बसतो त्याठिकाणी ही कादंबरी संपते. वाचकाला सुन्न करून होणारा हा कादंबरीचा शेवट वाचकाच्या मनात बरेच अनुत्तरित प्रश्न सोडून जातो.

तटस्थ आणि वास्तववादी शैलीमुळे बाबा भांड यांची ही कादंबरी मराठी साहित्यविश्वात स्वतःचं वेगळेपण सिद्ध करते. संग्रही घेऊन आवर्जून वाचण्यासारखी कादंबरी "दशक्रिया".





संदीप प्रकाश जाधव

Sunday, November 7, 2021

"देवाज्ञा"

 


लेखक : नारायण धारप

प्रकाशक : साकेत प्रकाशन

                                                                           पृष्ठे- २८६, मूूल्य- ३०० रुपये.


"देवाज्ञा"! नारायण धारप यांच्या कल्पनाशक्तीच्या पेटाऱ्यातून निघालेली एक भन्नाट भयकादंबरी! वेगवेगळ्या मार्गांनी मृत्यूला स्पर्श करून आलेल्या लोकांना हेरून, संमोहित करून परत त्यांना त्याच मृत्यूसमयीच्या अवस्थेत घेऊन जाऊन निरनिराळे प्रयोग करणारा एक आचार्य आणि त्याचा मठ यांच्याभोवती फिरणारे कथानक! मृत्यूच्या दारातून परत आलेल्या लोकांना जीवन आणि मृत्यूच्या मधेच अडकवून गैरकृत्यांसाठी वापर करता यावा म्हणून स्वतःच्या मठात त्यांना रहायला बोलावणारा हा आचार्य म्हणजे या कादंबरीतील एक गूढ पात्र आहे! नेहमी रहस्यांकडे आकर्षित होणाऱ्या मानवी मनाची नेमकी नस पकडून धारप यांनी एकाहून एक सरस भयकथा-कादंबऱ्या लिहिल्या आणि प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं कथानक वाचकांसमोर आणून ठेवलं जे वाचताना त्यांच्या प्रचंड कल्पनाशक्तीचा अंदाज येतो. "देवाज्ञा" मधील विषयदेखील अगदी असाच अफलातून आहे. प्रत्येक व्यक्तीला मरणानंतर माणसाचे काय होते हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा असते, मृत्यूनंतरच्या आयुष्याचे हे कुतूहल हाच एक धागा पकडून धारपांची ही कादंबरी सजली आहे. त्यांच्या या रहस्यकथेचा एक भाग बनून वाचक कथेसोबत जोडला जातो आणि त्यामुळेच कादंबरीत घडणाऱ्या बऱ्याच घटना अक्षरशः आपल्याच अंगावर आल्याचा भास वाचत असताना कित्येकदा होतो. वाचक कथेत पूर्णपणे गुंतून गेला असताना अनपेक्षित धक्क्यातून वेगळे वळण घेऊन शेवटाकडे जाणारे कथानक आणि त्यातून निर्माण होणारा क्लायमॅक्स हे धारपांच्या भयकथांचं वैशिष्ट्य ज्याला ही "देवाज्ञा" देखील अपवाद नाही. संगीता या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणीने केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नाने या कादंबरीची सुरुवात होते. या आत्महत्येच्या प्रयत्नातून अगदी मृत्यूला स्पर्शून आलेल्या संगीताचा हॉस्पिटलमधे असताना परिचय होतो तो आचार्यांशी! निःस्वार्थी भावनेने आचार्य करत असलेल्या सामाजिक कार्याने संगीता प्रभावीत होते आणि त्यामुळेच आचार्यांकडून त्यांच्या मठात रहायला येण्याचं निमंत्रण ती अगदी निःसंकोचपणे स्वीकारते. मठातील संगीताच्या प्रवेशानंतर कादंबरी खऱ्या अर्थाने वेग पकडते आणि वाचक कथेत गुंतायला चालू होतो. संगीताप्रमाणेच वेगवेगळ्या प्रकारे मृत्यूला स्पर्श करून आलेल्या, समाजाच्या विविध स्तरातील आणि वयोगटातील मठात राहणाऱ्या इतर काही पात्रांच्या आयुष्याचा फ्लॅशबॅकमधे जाऊन परिचय करून देताना धारपांनी अगदी एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी मांडणी, वातावरण निर्मिती केली आहे. शिवाय मठात आलेल्या लोकांना तिथे राहण्याची कोणतीच सक्ती नसल्याने मधेच मठ सोडून गेलेल्या काही लोकांच्या कथादेखील वाचकाच्या कुतूहलात भर टाकतात. आचार्य करत असलेल्या प्रयोगातून त्यांना नेमकं काय साध्य करायचं आहे हे संगीतासोबतच वाचकासाठीसुध्दा हळूहळू एक गूढ प्रकरण होऊ लागते. मठात सध्या राहत असलेल्या तसेच पूर्वी काही विचित्र अनुभव आल्यामुळे मठ सोडून गेलेल्या पात्रांची मदत घेऊन संगीताने आचार्यांच्या या मठाच्या माध्यमातून चालणाऱ्या गूढ, रहस्यमय प्रयोगाचा लावलेला छडा आणि या सर्व प्रवासादरम्यान घडणाऱ्या अंगावर काटा आणणाऱ्या घटनांतून होणारा कादंबरीचा शेवट! अनपेक्षित धक्क्यातून होणारा शेवट हा या कथानकाचा कळस आहे. मृत्यूरेषेच्या पलीकडे कशाला तरी स्पर्शून आलेल्या लोकांमध्ये झालेले बदल मग ते काहींना स्पर्शून गेलेल्या अनामिक अशा चांगल्या शक्तीमुळे झालेले असोत अथवा काहींना झालेल्या वाईट शक्तीच्या संसर्गाने झालेले असोत, या दोन टोकाच्या शक्तींमधील संघर्ष हा या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. शेवटी वाईटावर चांगल्याचा विजय हा अगदी नेहमीच्याच पठडीतील शेवट धारपांनी केला असला तरी ज्या पध्दतीने धारप यांनी कथेत गुंतून गेलेल्या वाचकाला धक्का देऊन शेवट केला आहे त्याला तोड नाही. 

अतिशय रोमहर्षक, अकल्पित आणि एक भन्नाट विषय! वाचकाला जागेवर खिळवून ठेवणारं, एखाद्या भयपटाला शोभणारं कथानक! भयकथांचं वेड असणाऱ्यांनी आर्जून वाचण्यासारखी नारायण धारप यांची कादंबरी "देवाज्ञा".





संदीप प्रकाश जाधव

Sunday, October 31, 2021

"उद्या"

 


लेखक : नंदा खरे

प्रकाशक : मनोविकास प्रकाशन

                                                                           पृष्ठे- २८५, मूूल्य- ३०० रुपये.

'मनुष्य हा प्रगतशील प्राणी आहे' हे लहान असताना शालेय पाठ्यपुस्तकात वाचलेलं वाक्य! आज माणसाच्या आयुष्यात हरघडी काही न काही नवीन शोध लागून त्यामार्फत अविरतपणे त्याची प्रगती चालू आहे. इतिहासावर नजर टाकली तर मागच्या १०० वर्षांत माणसाने अफाट प्रगती केली आहे, खास करून या एका शतकाच्या उत्तरार्धात माणसाने केलेली प्रगती अविश्वसनीय अशी आहे. आज अगदी सामन्यातला सामान्य माणूस घरबसल्या अशा अनेक गोष्टी करू शकतो ज्याचा २०-२५ वर्षांपूर्वी कोणी विचारही केला नसेल. या पावलापावलावर होत जाणाऱ्या प्रगतीने मानवी आयुष्य अधिकाधिक सुखकर होत चालले आहे यात शंकाच नाही परंतु सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून होणारी प्रगती भविष्यात संपूर्ण मानवजातीलाच आव्हान ठरू शकते हीदेखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मोठमोठया शास्त्रज्ञांनी या भविष्यातील धोक्याची कल्पना आधीच देऊन ठेवली आहे शिवाय आपण नक्की कुठं थांबलं पाहिजे हे ठरवूनच आता पुढचं पाऊल टाकायची वेळ आली आहे हेदेखील वेळोवेळी सांगितलं जातं. कारण माणसाची ही उत्तरोत्तर होणारी प्रगती जितकी 'तारक' आहे तितकीच ती 'मारक' आहे याची बरीच उदाहरणे आज मिळतील. हे सर्व लिहायचे कारण म्हणजे अलीकडेच माझ्या वाचनात आलेली नंदा खरे यांची एक अतिशय उत्तम कादंबरी "उद्या"! मानवाच्या प्रगतीला डोळ्यासमोर ठेऊन भविष्याचा वेध घेऊन लिहिलेली नंदा खरे यांची ही कादंबरी "उद्या"! नजीकच्या भविष्यकाळातलं एक मोठं, वैश्विक पातळीवरचं साम्राज्यवादी जाळं हे या कादंबरीतून डोकावतं. माणूस करत असलेल्या प्रगतीमुळे येऊ घातलेला भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन नंदा खरे यांनी “उद्या” मध्ये विविध गोष्टींची सांगड घालून, आपल्या स्वातंत्र्यावर कशाप्रकारे अतिक्रमण होऊ शकतं हे खूप स्पष्टपणे मांडलेलं आहे. त्यासाठी नंदा खरे यांनी आठ प्रकरणांतून ही कादंबरी उलगडत नेली आहे. "अस्तित्व", "सर्व्हलन्स", "लोगो न् पेनं", "जंगलात शेतं",  "बचके कहाँ जाओगे", "मुळं-पारंब्या", "लांडगेतोड" आणि "कुत्रे" अशा अतिशय सूचक शीर्षकांतून उलगडत जाणाऱ्या, मानवी अस्तित्वावरच प्रशचिन्ह उभं करणाऱ्या भविष्यवेधी कथांमधून ही कादंबरी आकार घेते. माणसाचं आयुष्य आज इतकं वेगानं बदलतंय की एखाद्या वर्षातच बऱ्याच गोष्टी कालबाह्य वाटायला लागल्या आहे, रोज-रोज बदलत जाणारं तंत्रज्ञान माणसाची मुळं उखडून एका वेगळ्या भूमीत, विश्वात रुजायला भाग पाडतंय. आजवर स्थलकाळातीत मानली जाणारी अनेक मूल्यं प्रगतीच्या या वावटळीत पाचोळ्यासारखी उडून गेली आहेत. कधी काळचं आपलं स्थिर जगणं विसरून माणूस आज या गतीमान प्रगतीचाच एक भाग झाला आहे. आपलं आजचं, उद्याचं आणि असलोच तर परवाच्याही आयुष्याचा विचार करून नंदा खरे यांनी त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या या कादंबरी "उद्या" मधून. “उद्या” कांदबरीत भविष्यातील विविध पात्रांच्या जीवनात, प्रगतीच्या नावाखाली त्यांची कशाप्रकारे कोंडी झालेली आहे हे दिसून येते. अगदी जीवनाश्यक वस्तूंच्या बाजारीकरणामुळे सामान्य लोकांवरील आर्थिक ताण व त्यामधून तयार झालेली समाजातील प्रचंड मोठी दरी, यामुळे माणसाचे जीवन हे अगदी असह्य आणि निरस झालेलं पहायला मिळते. लोकांच्या जीवनातील प्रेम, करुणा या भावनेचे स्थान आता जवळपास नाहीसं झालेलं आहे. त्याचा परिणाम म्हणजे समाजात मोठ्या प्रमाणात वाढलेली गुन्हेगारी. निसर्गात कमजोर मानल्या जाणाऱ्या स्त्रीवर या सर्वांचा होणार वाईट परिणाम आणि अशा परिस्थितीत स्त्रियांचे एकट्याने बाहेर पडण्याचे हिरावलेलं स्वातंत्र्य. नियंत्रणाबाहेर गेलेल्या लोकसंख्येत आपलं अस्तित्व प्लास्टिक कार्डापुरतं मर्यादित होत जाणं. रोल नंबर्स, बारकोड्स, वेगवेगळी प्रकारची कार्डच्या माध्यमातून मानवी आयुष्य चिन्हरूप, अंकरूप होत जाणं. या अपरिहार्य स्थितीत आपल्या अस्तित्वाचा कोंब त्यातल्या सत्त्वानिशी जपायचा कसा हा कळीचा प्रश्न घेऊन जगणारी ही भविष्यातील "उद्याची" पात्रे. नंदा खरेंची ही कादंबरी वाचत असताना बऱ्याच वेळा यातील अनेक गोष्टी "उद्याच्या" नसून आजच घडताहेत की काय असा भास होतो. भविष्यकाळातील एक मोठं, वैश्विक पातळीवरचं साम्राज्यवादी जाळं आणि त्यामधे अगदी अलगद अडकत जाणारा माणूस हे या कादंबरीचं मुख्य कथानक आहे. माणसाकडूनच निर्माण झालेल्या या जाळ्यात जितक्या तांत्रिक सुखसोयी उपलब्ध आहेत, तितकीच तांत्रिक पातळीवर प्रत्येक माणसावर पाळत ठेवली जात आहे. इथे प्रचंड प्रमाणात सर्वेलन्स आहे, सर्वत्र कॅमेरे आहेत, चेहऱ्यांवरचे बारीक हावभाव ओळखण्याचं सॉफ्टवेअर आहे, 'अस्तित्व कार्डा'सारख्या तांत्रिक सेवांतून जीवनाचं, अस्तित्वाचं प्रचंड केंद्रीकरण, एकीकरण झालं आहे या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे माणसाच्या आयुष्यातून निघून गेलेला खाजगीपणा. प्रत्येक संभाषण, प्रत्येक देवाण-घेवाण हे सगळं कॅमेऱ्यांना लक्षात घेऊनच करावं लागतं. सर्वेलन्स दैनंदिन जीवनात किती मुरलाय याचं वर्णन कादंबरीत काही ठिकाणी अगदी सहज आलं आहे. राज्यव्यवस्था आणि भांडवलदारांची म्हणावी तर स्वतंत्र वर्तुळं आणि उतरंडी आहेत, पण त्यांच्यातली रेषा धूसर आहे. लोकशाही तत्त्वाला धरून एकमेकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार केलेल्या पदांवर एकाच छोट्या, सत्ताधारी वर्तुळातली तीच तीच माणसं आलटून-पालटून बसतात. राज्य कुठे संपतं आणि कॉर्पोरेशन कुठे सुरू होते, हे सांगणं अशक्य झालं आहे. तीच परिस्थिती संरक्षणव्यवस्था आणि सर्वेलन्स मधली. आम जनतेला पोलिसांकडून संरक्षण कमी आणि तिच्यावर पाळत ठेवणं जास्त जातंय. या सगळ्यात काळजी करण्यासारखी गोष्ट म्हणजे मुलींचं होणारं 'हंटिंग', स्त्रियांचं घटत जाणारं प्रमाण. याचाच फायदा घेऊन ठिकठिकाणी श्रीमंतांना बायका-सुना-वेश्या म्हणून मुली पुरवण्यासाठी अनेक राजकीय दलं आणि अधिकारी यांचा चालणारा "कारभार". परंतु सिस्टिमवर 'भरोसा' ठेवल्याशिवाय पर्याय नसल्याने नंदा खरेंच्या "उद्या" मधील सर्व पात्रे नाईलाजाने हे सर्व सहन करत आहेत. वेगवेगळ्या प्रकरणांतून निरनिराळ्या पातळ्यांवर, खेड्यांपासून महानगरांपर्यंत, सगळेच समाजातले घटक या जाळ्यात कसे अडकले आहेत हे नंदा खरे यांनी अतिशय तपशिलात मांडलं आहे. समाजातील वेगवेगळ्या वर्तुळांत राहणारी कादंबरीतील पात्रे हळूहळू एकत्र येऊन कादंबरीची "उद्याची" कथा पूर्णत्वास येते.

कुत्रीचं एक पिलू आईची नजर चुकवून रस्त्यावर गेलं, मोठी कार भरपूर आवाज करत येत होती. पिलू घाबरून चारी पाय फाकवून रस्त्यावर पसरलं. आई ताठरली, जास्त सावध झाली. गाडी गेली, पिलाच्या दोन्ही बाजूने गेली, योजनापूर्वक नव्हे, सहज. पिलू उठून आईकडे पळालं, आज-आत्ता वाचलंही, पण उद्या...? उद्या कशावरून वाचेल? नंदा खरेंच्या "उद्या" या कादंबरीचा हा शेवट वाचकाला फक्त प्रश्नच विचारात नाही तर भविष्यात येऊ घातलेल्या संकटाची भीतीदायक कल्पना देणारा आहे. प्रगतीच्या नावाखाली आपण आज खरोखर कुठल्या दिशेने जात आहोत आणि त्याचा भविष्यात आपल्या आयुष्यावर, येणाऱ्या पिढ्यांवर काय परिणाम होऊ शकतो याचा प्रत्यय घेण्यासाठी प्रत्येकाने वाचावी अशी कादंबरी "उद्या"! आज आपण वाचूही पण उद्या......?? उद्याचे काय??






संदीप प्रकाश जाधव

Monday, October 25, 2021

"परिशोध"

 




लेखक : डॉ. एस. एल. भैरप्पा

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

मराठी अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी

पृष्ठे- २१२, मूूल्य- २२० रुपये


डॉ. एस. एल. भैरप्पा! "साक्षी", "आवरण", "उत्तरकांड", "पारखा" आणि आता "परिशोध"! जितकं वाचत जावं तितकं अधिकच वाचक त्यांच्या लेखनाच्या प्रेमात पडेल असे विषय! आजपर्यंत त्यांची वरील जी पुस्तके मी वाचली ती सगळीच वाचकाला त्याच्या वैचारिक पातळीच्या पुढे जाऊन विचार करायला लावणारी आहेत हे जाणवलं! प्रत्येकवेळी एक काहीतरी दर्जेदार वाचन केल्याचा अनुभव देणारे विषय! वाचकाच्या मन आणि मेंदूवर ताबा घेणारे त्यांच्या हर-एक पुस्तकातील विषय मानसिक पातळीवर न संपता वाचकाला नेहमी अंतर्मुख होऊन विचार करायला लावतात. "अन्वेषण" या मूळ कन्नड कादंबरीचा सौ. उमा कुलकर्णी यांनी केलेला मराठी अनुवाद म्हणजे ही कादंबरी "परिशोध"! "अन्वेषण" चा शब्दशः अर्थ "शोध". ही कादंबरी म्हणजे कहाणी आहे मानवी जीवनाच्या "परिशोधाची" आणि भैरप्पांनी हा शोध विश्वनाथ अरसीकेरे या अनाथ मुलाच्या माध्यमातून वाचकांसमोर आणला आहे. ‘मरण समजल्याशिवाय जीवनाची किंमत समजत नाही. आत्महत्त्या करावी इतकं उत्कट दु:खही कधी आयुष्यात जाणवलं नाही. मग मला जीवनाची किंमत ठाऊक आहे असं म्हणता येईल काय?’ या प्रश्नात कादंबरीच्या कथेचे सार आहे. या कादंबरीचं वैशिष्ट्य म्हणजे, भैरप्पांनी विश्वनाथचा हा शोध त्याच्या स्वतःच्या तोंडून नव्हे तर त्याच्या आयुष्यात आलेल्या विविध लोकांच्या अनुभवातून उलगडत नेला आहे. जक्काजी मास्तर, रंगनाथ स्वामी, गंगण्णा, सुनंदा, हेडमास्तर, देशपांडे वकील अशा अनेकांच्या जीवनात काही काळ विश्व येऊन जातो आणि यातला प्रत्येकजण आपापल्या दृष्टिकोनातून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. या शोधातून साकारलेली, जीवनातील गुंतागुंत दर्शवणारी ही कादंबरी "परिशोध"! एका जीवघेण्या संघर्षाचा अविरत चाललेला शोध म्हणजे ही कादंबरी "परिशोध"!

वयाच्या ९-१० व्या वर्षीच आई-बहीण-आजी यांचा प्लेगच्या साथीत झालेला मृत्यू आणि पुढे वडिलांनी केलेल्या दुसऱ्या लग्नानंतर अनाथ झालेला 'विश्वा' अर्थातच 'विश्वनाथ'! घर आणि गाव सुटल्यानंतर सुरुवातीच्या काळात शेजारच्या गावातील एका जंगमाकडून त्याचा सांभाळ सुरू होतो. जंगमाच्या आधाराने रुळावर येणारी विश्वाच्या आयुष्याची गाडी पूर्णपणे भरकटून जाते ती जंगमाच्या मृत्यूनंतर! नंतर पोटासाठी त्याचा प्रवास चालू होतो वेगवेगळ्या गावांतून. याच प्रवासादरम्यान त्याच्या आयुष्यात येणाऱ्या लोकांच्या निवेदनातून "विश्वाचे" आयुष्य वाचक अनुभवत राहतात. सुरूवातीला कंठीजोईस म्हणजेच विश्वनाथच्या आजोबांपासून सुरू झालेला या शोधाचा प्रवास विश्वनाथच्या शाळेतील मुख्याध्यापकांपर्यंत येऊन थांबतो. वेगवेगळी वळणे घेत जाणारा, विश्वाच्या माध्यमातून वाचकाला विचारमग्न करणारा हा प्रवास माणसा माणसातील नातेसंबंध आणि स्त्री-पुरुष संबंधातीळ पीळ उलगडून तर दाखवतोच पण सोबतच माणसाच्या मनात सतत चाललेल्या नैतिक- अनैतिकतेच्या द्वंद्वावरसुद्धा विचार करायला भाग पाडतो. जंगमाच्या मृत्यूनंतर पूर्णपणे आधार हरवलेल्या विश्वाने केलेले आत्महत्येचे प्रयत्न, अनपेक्षितपणे मिळालेल्या शरीरसुखाच्या अनुभवाने त्याला पुन्हा एकदा जगण्याची निर्माण झालेली इच्छा, देशपांडे वकिलांच्या घरी काम करून रहायला जाणे आणि त्यादरम्यान घडलेल्या एका घटनेनंतर कोणालाही न सांगता त्याचं तिथून निघून जाणं, नाटक कंपनीतील नोकरी, मुंबईत व्हिक्टोरिया (घोडागाडी) चालक म्हणून काम करत असताना वेश्यावस्तीतील त्याचा मुक्काम, साधुच्या मठातील वास्तव्य, शिक्षण घेता येण्याच्या आशेने केलेले लग्न आणि सासऱ्याने केलेल्या फसवणुकीमुळे केलेला पत्नीचा त्याग, विश्वाच्या या निर्णयामुळे त्याच्या पत्नीने केलेला आत्महत्येचा प्रयत्न आणि या प्रयत्नात विश्वाच्या मुलाचा झालेला मृत्यू - अशा क्रमाने विश्वाचे आयुष्य सतत ढवळत राहते, त्याच्याशी संबंध येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो एक गूढ वाटत राहातो. विश्वाच्या या प्रवासात गुंतून गेलेल्या वाचकाच्या मनातही नकळत विश्वाचा ‘शोध’ चालू होतो. जगणे, उपभोग घेणे, सुख मिळविणे, यशस्वी होणे या सर्वसामान्य माणसाला हव्या असणाऱ्या गोष्टी विश्वाला मोहवू शकत नाहीत की गुंतवून ठेवू शकत नाहीत. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आयुष्य जगण्याचा प्रयत्न विश्वा करत राहतो. या प्रयत्नाला वाचक त्याच्या आयुष्यातीलच एखादे पात्र असल्याप्रमाणे सुरुवातीपासूनच चिकटून राहतो. कादंबरीतील शेवटच्या प्रकरणात विश्वनाथच्या दैनंदिनीतील काही उतारे हेडमास्तरांच्या माध्यमातून वाचकांसमोर येतात. विश्वनाथ लिहीत असलेल्या त्याच डायरीतील एक विचार - "आयुष्य रेल्वेसारखं नसलं पाहिजे. रेल्वेत आपण जरी चालक असलो तरी कुणी दुसऱ्याने ट्रॅक बदलला तर आपली दिशा बदलते. आपण फक्त वेग नियंत्रित करू शकतो पण दिशा आपल्या हातात नसते. आयुष्य बस सारखं असलं पाहिजे. दिशा आणि वेग या दोन्हीवर आपलं नियंत्रण असतं. आपल्या आयुष्याची दिशा आपल्याला पाहिजे तिकडे वळवता आलं पाहिजे." जो वाचकाच्या डोक्यात कितीतरी वेळ घोळतच राहतो. वाचक आपल्या आयुष्याला या एका विचारासोबत 'रिलेट' केल्याशिवाय राहूच शकत नाही. शेवटी कादंबरी संपते तीदेखील प्रश्नचिन्हांवरच! विश्वाला प्रत्यक्ष भेटायचं आणि त्याच्याकडूनच सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवायची असं ठरवणारे हेडमास्तर स्वत:लाच प्रश्न विचारतात - 'समोर बोलत असतानाही विश्वा आपल्याला कितपत सत्य सांगू शकेल? आणि 'त्यातलं मी किती जाणू शकेन?' या प्रश्नांसोबतच वाचकाला विचारात गुंतवून भैरप्पांनी मानवी आयुष्याचा हा न संपणारा "परिशोध" थांबवला आहे.

संग्रही घेऊन आवर्जून वाचावी अशी कादंबरी!





संदीप प्रकाश जाधव

Saturday, October 16, 2021

"आग्ऱ्याहून सुटका"

 



लेखक : डॉ. अजित जोशी

प्रकाशक : शिवप्रताप प्रकाशन

                                                                           पृष्ठे- २९२, मूूल्य- ३३० रुपये.


तसे पहायला गेले तर शिवचरित्रातील प्रत्येक घटना ही स्वतंत्र कादंबरीचा विषय आहे. आजपर्यंत बऱ्याच लेखकांनी शिवचरित्रातील घटनांना केंद्रस्थानी ठेवून वेगवेगळ्या ऐतिहासिक कादंबऱ्यादेखील लिहिल्या ज्याच्या माध्यमातून त्यांनी इतिहासाचे अनेक पैलू लोकांसमोर उलघडून दाखवले. कादंबरीच्या स्वरूपात मांडलेल्या अशा ऐतिहासिक घटना आणि पात्रे जरी प्रेरणादायी असले तरी त्यांना नेहमीच एक कल्पनेची जोड असते, त्यामुळे कादंबरीतून मांडलेला इतिहास हा पूर्णपणे खरा कधीच मानता येत नाही परंतु तो सत्याच्या अधिक जवळ जाणारा असतो असं नक्कीच म्हणता येईल. इतिहासाचं जतन न केल्याने म्हणा अथवा तटस्थपणे न लिहिला गेल्याने म्हणा स्वराज्याचा, शिवरायांचा, संभाजी महाराजांचा बराचसा इतिहास हा एकतर अंधारातच राहिला किंवा कादंबऱ्यांतील काही काल्पनिक घटनांनाच खरा इतिहास मानला गेला. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीवर संशोधनात्मक लिखाण खूपच कमी झाले आहे हेदेखील त्यामागील एक कारण आहे असं म्हटलं तरी चालेल. शिवचरित्रात अनेक अद्भुत, थरारक, रोमांचकारी प्रसंग आहेत आणि त्यातीलच एक सर्वांत चित्तथरारक प्रसंग म्हणजे औरंगजेब बादशहाच्या आग्ऱ्यातील नजरकैदेतून महाराजांची झालेली सुटका. फक्त मराठे किंवा स्वराज्याच्याच नाही तर अखंड हिंदुस्थानाच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. मुघल आणि स्वराज्याच्या इतिहासाला कलाटणी देणारा हा प्रसंग! मिर्झाराजा जयसिंग याच्याबरोबर झालेल्या पुरंदरच्या तहात स्वराज्याचा बराच मोठा मुलुख, बरेच किल्ले मुघलांना द्यावे लागले. अशा परिस्थितीत जर शिवाजी महाराज कायमचे आग्ऱ्यात अडकले गेले असते तर हे श्रीं चे राज्य उभे तरी राहिले असते का? आणि याचीच दुसरी बाजू, जर महाराज तिथेच अडकून पडले असते तर औरंगजेबाला आपल्या आयुष्याच्या शेवटची जवळपास २७ वर्षें दख्खनेत घालवावी लागली असती का? त्याला याच दख्खनच्या मातीत गुडघे घासत जीव सोडावा लागला असता का? हे विचार करायला लावणारे प्रश्न आहेत. औरंगजेबाच्या तोंडून निघालेलं वाक्य, "हमारी जिंदगी की सबसे बडी गलती यह है की हमनें सिवा को आगरा से भागने दिया"! हे सांगण्यास पुरेसे आहेत की इतिहासावर या एका घटनेचा किती मोठा प्रभाव आहे आणि याचा काय परिणाम झाला आहे. औरंगजेबासारख्या महाकपटी, धूर्त बादशहाच्या कडेकोट पहाऱ्यातून महाराज आपले सर्व सहकारी आणि संभाजी महाराजांसोबत सहीसलामत कसे निसटले असतील या प्रश्नाचे उत्तर म्हणजे सध्या सर्वमान्य असणारी "मिठाईच्या पेटाऱ्यांची कथा"! महाराज आग्ऱ्याच्या नजरकैदेतून मिठाईच्या पेटाऱ्यात बसून संभाजी महाराजांसोबत पळाले असेच आपण आजपर्यंत ऐकत, वाचत आलो. परंतु खरंच महाराजांना संभाजी महाराजांसोबत पेटाऱ्यातून पळून जाणं शक्य होतं का? हा विचारच आपण कधी केला नाही. शिवाजी महाराजांच्या इतर मोहिमांवर नजर टाकली तर नेहमी काळाची पावले ओळखून आपली वाटचाल करणारे महाराज हा पेटाऱ्यांचा, जोखमीचा मार्ग निवडून त्या नजरकैदेतून सुटतील हे मनाला पटत नाही. शिवाय एकाचवेळी स्वराज्यातील दोन महत्त्वाच्या व्यक्तींचा जीव (महाराज स्वतः आणि संभाजी महाराज) धोक्यात घालण्यासारखे पाऊलदेखील महाराज उचलतील का? हासुद्धा एक प्रश्नच आहे. शिवाय आग्ऱ्यातून सुटल्यानंतर महाराज राजगडावर कसे पोहचले? कोणत्या मार्गाने पोहचले? नंतर संभाजी महाराज राजगडावर कसे पोहचले? याच्याही सर्वमान्य अशा सुरस कथा आहेत. आग्ऱ्यातून सुटकेबद्दलचे हे सर्व समज तांत्रिकदृष्ट्या शक्य आहेत का याचा आपण कधी विचारच नाही केला. "मोठे कारस्थान उपयोगी पडले" हे शब्द आहेत खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचे! आग्ऱ्यातील नजरकैदेतून सुटकेच्या कटाला खुद्द छत्रपतीच जर "मोठे कारस्थान" म्हणत असतील तर तो कट किती गुंतागुंतीचा आणि कुटील असला पाहिजे याचा फक्त विचारच केलेला बरा. डॉ. अजित जोशी यांनी याच ऐतिहासिक घटनेवर नव्याने सखोल संशोधन करून, जुन्या आणि नव्या ऐतिहासिक पुराव्यांचा पुन्हा एकदा अभ्यास केल्यानंतर, याघटनेदरम्यान तसेच या घटनेपूर्वी झालेल्या बऱ्याच ऐतिहासिक प्रसंगांचा तांत्रिकदृष्ट्या विचार करून जी सांगड घातली आहे त्यातून हे पुस्तक, "आग्ऱ्याहून सुटका" साकारलं आहे. इ. स. १६६६ मध्ये आग्ऱ्यात काय घडले? शिवाजीराजे नजरकैदेत का व कसे अडकले? आग्ऱ्याहून निसटण्यासाठी राजांनी कोणता कट रचला? मुघलांच्या कडेकोट पहाऱ्यातील सैनिकांची दिशाभूल करून महाराज नजरकैदेतून कसे निसटले? त्यांना त्यासाठी बादशहाच्या लोकांपैकी कोणी मदत केली असेल का? महाराज संभाजीराजांसोबत त्या नजरकैदेतून एकाच वेळी, एकाच मार्गाने निसटले की संभाजीराजांना नंतर स्वतंत्रपणे सोडवले गेले? तसे असेल तर संभाजी महाराज नंतर राजगडी कसे पोहचले? या सर्व प्रश्नांची उत्तरे डॉ. अजित जोशी यांनी त्यांच्या नवीन संशोधनाच्या आधारे "आग्ऱ्याहून सुटका" या पुस्तकाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.

अस्सल ऐतिहासिक कागदपत्रे आणि बखरी, तत्कालीन परिस्थिती, संदेशवहन आणि राजकारण तसेच शिवाजी महाराज, औरंगजेब, मिर्झा राजा जयसिंग आणि त्याचा पुत्र रामसिंग यांचे स्वभावविशेष या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करून, तर्कशास्त्राच्या आधाराने घेतलेला शिवाजी महाराजांच्या आग्ऱ्याहून सुटकेचा हा थरारक वेध. डॉ. अजित जोशी यांच्या मेहनतीतून साकार झालेला, आवर्जून वाचावा असा एक संशोधनात्मक ग्रंथ "आग्र्याहून सुटका".





संदीप प्रकाश जाधव

Monday, October 11, 2021

"तहान"

 



लेखक : सदानंद देशमुख

प्रकाशक : कॉन्टिनेन्टल प्रकाशन


                                             पृष्ठे- २०५, मूूल्य- २५० रुपये.

विश्वास पाटलांची "पांगिरा" ही पाण्यासारख्या ज्वलंत विषयाला हात घालणारी, अस्सल ग्रामीण कादंबरी ८-९ महिन्यांपूर्वी वाचली होती. त्यावेळी सदानंद देशमुख यांची "तहान" ही अशाच विषयावरील कादंबरी बऱ्याच लोकांनी वाचायला सुचवली. नंतर "तहान" संग्रही घेतली खरी पण इतर पुस्तके वाचण्याच्या नादात बरेच दिवस तशीच पडून राहिली. अलीकडेच Pustakexpress.Com वर "तहान"चा परिचय वाचल्यानंतर या कादंबरी वाचनाची "तहान" आणखी न वाढवता लगेचच वाचायला हातात घेतली. "तहान" ही कोणत्याही प्रकारची असू शकते सत्तेची, भोगाची, आसक्तीची आणि ती भागवण्यासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो हे जरी खरे असले तरी या गोष्टींसाठी माणूस स्वतःच्या मनाला मुरड घालू शकतो प्रसंगी पूर्णपणे दुर्लक्षसुद्धा करू शकतो परंतु पाणी ही एक अशी गोष्ट आहे जिथे माणूस पूर्णपणे हतबल होऊन जातो. 'पाणी म्हणजे जीवन' हे फक्त पुस्तकांत वाचून माहिती असणाऱ्या माझ्यासारख्या असंख्य लोकांना पाण्याचं दुर्भिक्ष काय असतं, तहानेने व्याकुळ होणाऱ्या खेड्यांतील लोकांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि पाण्यावर पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे पाण्याशिवाय काय हाल होतात याचं विदारक आणि तितकंच प्रत्ययकारी चित्रण सदानंद देशमुख यांनी "तहान" मधून केलेलं आहे. १-२ बैठकींत पूर्ण होऊ शकणाऱ्या या २०५ पानी छोटेखानी कादंबरीच्या माध्यमातून ज्या मोठ्या आणि गहन विषयाला सदानंद देशमुख यांनी लोकांसमोर मांडले आहे ते खरेच विचार करायला लावणारे आहे. १९९८ साली लिहिल्या गेलेल्या या कादंबरीतील बऱ्याच घटना वाचत असताना आज २०२१ मध्ये महाराष्ट्रातील अशी हजारो खेडी डोळ्यांसमोर येतात जिथे प्रत्यक्ष त्या घटना घडत आहेत. वाचत असताना प्रत्येक पानावर वाचकाच्या मनात एकच विचार येत राहतो की जर हे असंच चालू राहिलं तर पुढच्या पिढीचं भविष्य काय असेल? पाण्याच्या तहानेनं व्याकूळ होणाऱ्या हजारो खेड्यांचं चित्रण पारखेड या गावाला प्रातिनिधिक स्वरूपात घेऊन देशमुख यांनी केलेलं आहे. शहरात राहून आपण टाळत असलेल्या किंवा दुर्लक्ष करत असलेल्या वास्तवाकडे आपल्याला ही कादंबरी खेचून नेते. या गावातील पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष, तळ गाठलेल्या विहिरी, कोरडा धुरळा, पाण्यापायी एका कोवळ्या मुलीचा कोरड्या विहिरीत पडून झालेला मृत्यू, अधम परिस्थितीत तेथील लोकांचं जगणं, खेडे आणि शहर  यांच्यात असणाऱ्या अंतराची होणारी जाणीव, घाणेरडा वास मारत असतानाही नाईलाजास्तव ते पाणी पिऊन जगणारे, आजारी पडणारे लोक हे सर्व कादंबरीतून अनुभवनाऱ्या वाचकाला कादंबरीच्या शेवटी शेवटी हे वातावरण अक्षरशः घेरून टाकते. वाचून झाल्यानंतर कितीतरी वेळ हा विषय, यातील लोक, यातील घटना आपल्या डोक्यात घोळतच राहतात आणि अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडतात. 

पारखेड गावातील शेवाळे या शेतकरी कुटुंबाला प्रातिनिधिक स्वरूपात केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली ही कादंबरी. कृषिसंस्कृतीचा प्रतिनिधी असणारा राघोजी शेवाळे, बदलणाऱ्या काळानुसार जगलं पाहिजे असं म्हणणारा त्याचा तरुण मुलगा बबन शेवाळे, राघोजीची सतत भांडणारी बायको रामकोर, लग्नाला आलेली तरुण मुलगी वर्षा आणि राघोजीचं जीवापाड प्रेम असणारी एक बैलजोडी मुरल्या-छबिल्या यांच्याभोवती फिरणाऱ्या कथानकातून सदानंद देशमुख यांनी हा पाण्यासारखा गंभीर विषय मांडला आहे. "तहान" ही कादंबरी पाण्याच्या या दुर्भिक्षासोबतच दोन पिढ्यांचा संघर्षदेखील चित्रित करते. आपल्या शेतात राबणारी आपली बैलजोडी ही आपल्या संसाराचा अविभाज्य भाग आहे अशी श्रद्धा असणारा राघोजी! आपलं आयुष्य हे या दोन बैलांच्या जीवावर चाललं आहे याची जाणीव ठेवून त्यांना जीवापाड जपणारा राघोजी हा छबिल्या आणि मुरल्या यांच्यासोबत भावनिकदृष्ट्या जोडला गेला आहे. याउलट केवळ आर्थिक आणि व्यावहारिक दृष्टीने या बैलांकडे पाहणारा त्याचा मुलगा बबन! पाणीटंचाईच्या काळात संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी याच बैलजोडीचा आधार घेऊन बबन पाण्याचा व्यवसाय चालू करतो. त्यातून मिळणाऱ्या पैशांतून त्यांचं राहणीमान तर बदलत जातंच पण अधिकाधिक पैसे कमावण्याच्या नादात बैलांकडे होणारं त्याचं दुर्लक्ष राघोजीसोबतच वाचकाच्या डोळ्यांतसुद्धा पाणी घेऊन येतं. पाण्याचा हा व्यवसाय करत असताना रत्नाचा बबनच्या आयुष्यात झालेला प्रवेश, तिच्यावर त्याने उडवलेला पैसा, अतिपैसे कमावण्यासाठी त्याने चालू केलेली बैलांची कुतरओढ, त्यातून बैलांचे होणारे हाल, पाण्यासाठी चालू झालेलं गावाचं आंदोलन, पाण्याचा प्रश्न मिटला की आपल्या बैलांना आराम मिळेल या एकाच भावनेने आंदोलनात सामील झालेला राघोजी, आंदोलनादरम्यान उसळल्या गेलेल्या दंगलीत स्वतःचा पाय मोडून घेऊन असहाय होऊन घराच्या ओसरीवर पडून राहणारा, पैशाच्या मागे लागलेल्या कुटुंबाकडून दुर्लक्षित होणारा, आपलं दुखणं विसरून बैलांसाठी तडपडणारा राघोजी शेवाळे, गावात सरकारकडून टँकरने पाणीपुरवठा चालू झाल्यानंतर बबनच्या धंद्याला लागलेली घरघर, रत्नासोबत असणारं बबनचं नातं समजल्यानंतर त्याला धमकावून त्याच्याकडून पैसे उकळणारा पोलिस आणि गावातीलच त्याच्या परिचयाचे काही लोक, पाण्याचा धंदा जवळपास बंद झालेला असताना झालेली ही पैशांची मागणी पूर्ण करण्यासाठी बबनची होणारी कसरत, पाण्याच्या पैशातून घरात आणलेल्या गोष्टींचे परत घरातून बाहेर जात असताना शेवटी बबनला झालेला पश्चात्ताप आणि बैलांप्रति उफाळून आलेलं प्रेम या सर्वांतून पुढे सरकत असताना पावला-पावलावर पाण्याचं महत्व सांगणारी ही अतिशय उत्कृष्ट कादंबरी "तहान". शेवटी एका असहाय्य तडफडीचा वाचकाला अनुभव देत ही कादंबरी जिथे संपते तिथेच आपल्या मनात पुन्हा सुरू होते आणि आपल्याला अस्वस्थ करत राहते. शेवाळे कुटुंबाच्या माध्यमातून सदानंद देशमुख यांनी पाण्याच्या दुर्भिक्षाकडे ज्या पद्धतीने लक्ष वेधलं आहे ते खूप विचार करायला लावतं. 

आवर्जून वाचावी अशी कादंबरी.





संदीप प्रकाश जाधव

Saturday, October 2, 2021

"महात्म्याची अखेर"

 


लेखक : जगन फडणीस

प्रकाशक : लोकवाङ्मय गृह


                                             पृष्ठे- १३९, मूूल्य- १५० रुपये.


'कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळंच दिसतं' अशी एक मराठी म्हण आहे. हे खरं की खोटं हा जरी संशोधनाचा विषय असला तरी गांधींचा द्वेष करणाऱ्यांच्या बाबतीत ही म्हण अगदी तंतोतंत लागू होते. "गांधीदोष" झालेल्या माणसाला "गांधी" ही व्यक्ती सर्व ठिकाणी चुकीचीच दिसते. बऱ्याच वेळा इतिहासातील थोर लोकांबद्दल जाणून न घेता आपण ऐकीव गोष्टींवरच त्यांच्याबद्दल आपले मत बनवत असतो आणि गांधी, टिळक, सावरकर, आंबेडकर या लोकांबाबत हे थोडं जास्तच झालंय असं माझं वयक्तिक मत आहे. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर चंद्रकांत वानखडे यांचं "गांधी का मरत नाही" हे वाचण्यापूर्वी गांधींबद्दल अशा बऱ्याच ऐकीव गोष्टी डोक्यात घर करून होत्या आणि त्यानुसारच गांधींची एक प्रतिमा(खलनायकी) नेहमी समोर उभी रहायची, पण या पुस्तक वाचनानंतर त्या प्रतिमेला तडा तर गेलाच शिवाय गांधींच्या समकालीन लोकांबद्दल जाणून घेण्याची इच्छादेखील निर्माण झाली. गांधींच्या वाट्याला टोकाचं प्रेम आणि टोकाचा विरोध या दोन्ही गोष्टी आल्या हे चंद्रकांत वानखडे यांचं पुस्तक वाचल्यानंतर प्रकर्षाने जाणवलं. परंतु "गांधी का मरत नाही" हे पुस्तक वाचल्यानंतर डोक्यात नवीनच एका प्रश्नाने उचल खाल्ली तो म्हणजे गांधींसारख्या अशा निस्वार्थी माणसाची हत्या का झाली असावी? गांधींची हत्या का केली असावी असं जेव्हा जेव्हा कोणालाही विचारलं तेव्हा फाळणी, पंचावन्न कोटी आणि गांधींच्या मुस्लिमधार्जिणेपणामुळे हिंदूंवर होणारा अन्याय ही कारणे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे समोर येत आणि इतकी वर्षे मीही हेच समजत होतो. परंतु जगन फडणीस यांच्या "महात्म्याची अखेर" या पुस्तकाने गांधी हत्येबद्दलचा माझा हा समज पूर्णपणे खोडून काढला. हे पुस्तक हातात आलं आणि त्यांच्या हत्येचं कारण त्यामुळे उलगडलं. अगदी एकाच शब्दात सांगायचं, तर फक्त आणि फक्त "द्वेष" हे एकच कारण त्यांच्या हत्येमागे होतं हेच हे पुस्तक वाचून लक्षात येतं. जगन फडणीस यांनी तत्कालीन घटनांना जे संदर्भ आणि पुरावे दिलेले आहेत त्यावरून आजपर्यंत आपल्या मनात असणाऱ्या बऱ्याच गैरसमजांचे निरसन होते. गांधींमुळे फाळणी झाली, गांधींनी पाकिस्तानला ५५ कोटी द्यायला भाग पाडले, गांधी मुस्लिमधार्जिणे होते अशी कारणे देऊन नथुराम गोडसे कडून झालेल्या त्यांच्या खुनाचे नेहमीच समर्थन केले जाते. गांधीद्वेष करणारे हे लोक नेहमी गांधी हत्येचेदेखील समर्थन करत असतात, पण या हत्येचे असे समर्थन करणाऱ्यांपैकी किती जणांनी खरोखरच गांधी समजून घेतलाय हा एक प्रश्नच आहे. ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेने गांधींचा खून केला आणि त्यानंतर आजतागायत वरील कारणे देऊन गांधींना मारणे देशहितासाठी कसे योग्य होते म्हणणारे सोयीस्करपणे एका गोष्टीकडे साफ दुर्लक्ष करतात. ती म्हणजे १९४८ पूर्वीसुध्दा गांधींना मारण्याचे जवळपास ७ वेळा प्रयत्न केले गेले आणि तेदेखील तेव्हा, जेव्हा फाळणी आणि ५५ कोटी हे विषय चर्चेतसुद्धा नव्हते. इतकेच काय तर देशाला स्वातंत्र्य कधी मिळेल हे देखील अजून कोणी सांगू शकत नव्हते तेव्हा! म्हणजे १९३४ पासून गांधींना मारण्याचे प्रयत्न झाले. ते का? कशासाठी? याची उत्तरे न देता ३० जानेवारी १९४८ ला झालेली त्यांची हत्या खोटी कारणे देऊन कशी योग्य होती हेच सांगितले गेले आणि तोच खरा इतिहास समजून पुढच्या पिढीने या "महात्म्याला" चेष्टेचा विषय करून टाकले. अलिकडील काही वर्षांत तर हा गांधीविरोध काही लोकांनी इतका टोकाला नेऊन ठेवला आहे की गांधींना 'राष्ट्रपिता' मानण्यासदेखील विरोधाची भाषा चालू झाली आहे. जगन फडणीस यांचं हे पुस्तक गांधी द्वेष करणाऱ्या लोकांना, ते करत असलेल्या चुकीच्या प्रचाराला दिलेलं एक प्रकारचं उत्तरच आहे. सुरुवातीलाच लेखकांनी म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक म्हणजे काही महात्मा गांधींचे चरित्र नाही, गांधींवर आतापर्यंत देश-विदेशातील विद्वानांनी बरेच लिखाण केले आहे पण या सर्वांतून एक विचार सुटला आहे आणि तो म्हणजे गांधींचा खून कोणत्या कारणांतून करण्यात आला हा! गांधींच्या खुनाचे तसेच खुन्याचे सामर्थन करणारे कधी फाळणी तर कधी ५५ कोटींचे कारण पुढे करतात, पण गांधींचा खून या दोन कारणांनी नाही तर त्याहीपलीकडे असलेल्या काही कारणांमुळे झाला हे पुराव्यानिशी सांगण्याचा प्रयत्न जगन फडणीस यांनी केला आहे. महात्मा गांधींच्या आयुष्याची अखेर आणि त्यांच्या राजकारणातील काही अखेरच्या घटना यावर या पुस्तकातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न लेखकांनी केला आहे  त्यामुळे "महात्म्याची अखेर" हे नाव सुद्धा तितकंच समर्पक वाटतं. ९ प्रकरणे आणि १३९ पानांतून जगन फडणीस यांनी १९३४ पासून १९४६ पर्यंत घडलेल्या बऱ्याच घटनांचा पुराव्यानिशी उल्लेख करून गांधी हत्येच्या कारणांचा नव्याने शोध घेतला आहे.

प्रत्येकाने आवर्जून वाचावे असं पुस्तक "महात्म्याची अखेर".




संदीप प्रकाश जाधव



Monday, September 27, 2021

"काळाचा संक्षिप्त इतिहास"

 


लेखक : स्टीफन हॉकिंग

प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन

मराठी अनुवाद : डॉ. सुभाष के. देसाई

पृष्ठे- २२६, मूूल्य- ३०० रुपये


शास्त्रज्ञ म्हणजे काय किंवा हे शास्त्रज्ञ म्हणवणारे लोक नेमकं करतात काय हेदेखील जेव्हा कळत नव्हतं त्या वयापासून ते आजतागायत मला दोन लोकांविषयी कमालीचं कुतूहल होतं, आहे. ते म्हणजे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि डॉ. स्टीफन हॉकिंग. दोघांनीही आपापल्या देशांत राहून जागतिक संशोधन क्षेत्राला दिलेलं योगदान खूप मोठं आहे. इतर क्षेत्रात मिळते तशी लोकप्रियता शक्यतो शास्त्रज्ञांच्या वाट्याला येत नाही कारण त्यांचं काम नेहमीच पडद्यामागे राहून अविरतपणे चाललेलं असतं. माणसाचे वयक्तिक आणि सामाजिक आयुष्य सुखकर करणाऱ्या अशा हजारो गोष्टी पडद्यामागे अपार मेहनत करून "शास्त्रज्ञ" बनवत असतात पण लोकप्रियता ही नेहमी त्यांच्यापासून चार हात दूरच राहते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि डॉ. स्टीफन हॉकिंग हे सध्याच्या घडीला याला अपवाद मानता येतील. एखाद्या नेत्याच्या किंवा अभिनेत्याच्यादेखील वाट्याला येणार नाही अशी लोकप्रियता मिळवणारे हे दोन महान शास्त्रज्ञ! डॉ. हॉकिंग यांच्याबद्दल बोलायचं झालं ते आजच्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय शास्त्रज्ञ होते. 'मोटार न्यूरॉन डिसीज' या दुर्धर रोगाशी आयुष्यभर झटत, शरीराच्या सर्व प्रतिकूलतेवर मात करीत, मृत्यूशी झुंज देत देशाच्याच नाही तर भाषेच्याही सीमा ओलांडून सामान्य माणसांपर्यंत पोहचलेल्या डॉ. हॉकिंग यांनी केलेल्या कामाला तोड नाही. वयाच्या एकविसाव्या वर्षी ही व्याधी जडल्यानंतर अवघ्या दोन वर्षांचे आयुष्य डॉक्टरांनी दिलेले असताना, मृत्यूवर मात करीत ते पुढे अर्ध्या शतकाहून अधिक काळ कार्यरत राहिले. त्यांची हालचाल मंदावली, जवळजवळ थांबली, वाचा गेली, परंतु ते हरले नाहीत! आपले काम करीत राहिले. त्यांना विश्व जाणून घ्यायचे होते, ते का अस्तित्वात आले आणि ते जसे आहे तसे का आहे, याचा शोध घ्यायचा होता! आपले पाऊणशे वर्षांचे सारे आयुष्य हॉकिंग यांनी या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात खर्ची केली आणि त्यातून जे हाती आले ते त्यांनी शास्त्रीय चौकटीत मांडले. भौतिकशास्त्राच्या, खगोलशास्त्राच्या रूढ सिद्धान्तांना धक्का देणारं संशोधन त्यांनी केलं. ज्यावर इतर शास्त्रज्ञांसोबत त्यांचे मतभेदही झाले पण त्यामुळे पुढील संशोधनास एक दिशा मिळाली. विश्वनिर्मिती आणि कृष्णविवर यांवरील त्यांच्या संशोधनावरदेखील नेहमी शास्त्रीय वाद होत असले तरी भावी संशोधनासाठी अनेक द्वारे त्यांनी खुली केली. अशाच पद्धतीने काळाबद्दल संशोधन करून ऐंशीच्या दशकात त्यांनी "काळाचा संक्षिप्त इतिहास" लिहिला ज्याने पुढे इतिहास घडवला. भयकथा, गूढकथा, कादंबऱ्या लिहिणाऱ्या लेखकांच्या पुस्तकांवर वाचकांच्या जशा उड्या पडतात, तशा त्या शास्त्रीय पुस्तकांवर पडणं कठीणच! मात्र, डॉ. स्टिफन हॉकिंग यांनी ही कठीण गोष्ट अगदी सहज साध्य करून दाखविली. त्यांनी लिहिलेल्या "काळाचा संक्षिप्त इतिहास". पुस्तकाला मिळालेल्या प्रतिसादाने इतिहास घडविला. जगभरातील ४० भाषांत अनुवादित झालेले हे पुस्तक तब्बल २३७ आठवडे 'बेस्ट सेलर' ठरले होते. त्यामुळे या पुस्तकाची नोंद 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'नेही घेतली. सामान्य लोकांना समजेल अशा सहज सोप्या भाषेत महास्फोटापासून कृष्णविवरापर्यंतच्या "काळाचा संक्षिप्त इतिहास" डॉ. हॉकिंग यांनी या पुस्तकातून मांडला आहे. हे जग कसे आहे ते समजून न घेताच आपण आपले रोजचे आयुष्य जगत असतो. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? सूर्यप्रकाश कसा तयार होतो? त्यांचं आपल्या जगण्यासाठी असणारं महत्व काय? हा निसर्ग असा का आहे? हे विश्व कुठून निर्माण झाले? काळाची दिशा उलट फिरली तर काय होईल? मानवी ज्ञानाला मर्यादा आहेत का?कृष्णविवर म्हणजे काय? आपल्याला भूतकाळ आठवतो पण भविष्यकाळ माहीत नसतो, असे का? या विश्वाचा आरंभ कसा झाला? या विश्वाला अंत आहे की अंतहीन आहे? या विश्वाला सीमा आहे की नाही? अवकाशात तीन सोडून आणखी किती मिती आहेत? काळाच्या प्रवाहाला एकच दिशा आहे का? लहान मुलांचा अपवाद सोडला तर असे प्रश्न पडणारी व्यक्ती क्वचितच सापडेल. डॉ. स्टिफन हॉकिंग यांनी या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे सामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीने त्यांच्या या "काळाचा संक्षिप्त इतिहास" मधून दिलेली आहेत.

आपल्याला हे एकमेव आयुष्य लाभले असून, याच आयुष्यात विश्वाला समजून घ्यायचे आहे आणि मी तेच करतो आहे, असे म्हणणाऱ्या डॉ. स्टिफन हॉकिंग यांनी संपूर्ण आयुष्यभर विश्वाच्या रहस्याचा शोध घेतला. त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची साक्ष देणारं आवर्जून वाचण्यासारखं पुस्तक "काळाचा संक्षिप्त इतिहास".









संदीप प्रकाश जाधव



Wednesday, September 15, 2021

"मुकद्दर"

 



 

लेखक : स्वप्निल कोलते

प्रकाशक : NEW ERA पब्लिशिंग हाऊस

                                                                           पृष्ठे- २११, मूूल्य- ३०० रुपये.


औरंगजेब तसा ना.सं.इनामदार यांच्या "शहेनशहा" या कादंबरीत वाचला होता. ते चरित्र जरी बादशाह औरंगजेबाचं असलं तरी मराठ्यांच्या पराक्रमाची उंची सांगणारं होतं. जवळपास ५० वर्षें दिल्लीच्या तख्तावर बसून राज्य केलेल्या या शहेनशहाची अर्ध्याहून अधिक कारकीर्द मराठ्यांशी लढण्यात गेली आणि पूर्ण ताकदीनिशी, मोठमोठ्या पराक्रमी सरदारांची सोबत असताना शिवाय बऱ्याच मराठा सरदारांना फितवूनही शेवटी त्याच्या पदरी पराभवच आला. तरीही स्वराज्याचा इतिहास हा खरेतर औरंगजेबाशिवाय पूर्णच नाही होऊ शकत! भोसले घराण्याच्या तीन पिढ्या पाहिलेला आणि त्यांच्याशी रणभूमीवर लढणारा हा शहेनशहा क्रूर होता, कपटी होता, धूर्त होता, हुशार होता, द्रष्टा होता ह्या सोबतच भयंकर महत्वाकांक्षी होता! थंड रक्ताचा आणि धोरणी मेंदूचा होता. लोभी होता पण फकीराप्रमाणे राहायचा. धर्मवेडा किंवा धर्मांध नव्हता पण धार्मिक वर्तन करून लोकांना भावनिक करण्याचे अद्भुत कसब त्याच्याकडे होते. त्याच्या ह्या सर्व गुणांचा वापर करून त्याच्या इतक्याच ताकदीच्या सगळ्या शत्रूंना संपवून तो मुघल तख्तावर बसला खरा, पण स्वतःला नियती म्हणजेच "मुकद्दर" समजणारा हा सुलतान अखेर स्वतःचेच "मुकद्दर" लिहू शकला नाही. दख्खनच्या पहाडांनीच त्याचं "मुक़द्दर" लिहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर दख्खनचा घास गिळून, संपूर्ण हिंदुस्थानावर आपला अंमल प्रस्थापित करायची स्वप्ने बघत, आपल्या विशाल सागर सेनेसह दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाच्या स्वप्नांना पहिला सुरुंग लावला तो छत्रपती संभाजी महाराजांनी! तब्बल ९ वर्षें, लाखो सैन्य आणि एकाहून एक मातब्बर सरदार सोबत असूनदेखील हा दिल्लीश्वर स्वराज्यापुढे हतबल झाला. शेवटी स्वकीयांच्या फंदफितुरीनेच घात केला आणि संभाजी महाराज पकडले गेले. त्यांचा अतोनात छळ करून त्यांना मारल्यानंतर आता मराठे संपले, मराठयांचे स्वराज्य संपले अशा भ्रमात राहणाऱ्या औरंगजेबाचं "मुकद्दर" खरं तर त्याच दिवशी मराठ्यांच्या हातात गेलं. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर चवताळून उठलेले मराठे सुरुवातीला राजाराम महाराज आणि नंतर ताराबाई महाराणी यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य वाचवण्यासाठी लढत राहिले. आपली जिद्द आणि पराक्रमाच्या जोरावर २७ वर्षें मराठयांनी औरंगजेबाला लढत ठेवलं. बादशाह औरंगजेबाला त्याच्या मनसुब्यांसोबतच महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकलं. फक्त स्वराज्य वाचवलंच नाही तर शंभूपुत्र थोरल्या शाहू महाराजांच्या कारकिर्दीत दिल्लीचेही तख्त राखलं आणि मुघलांना नाममात्र बादशाह केलं. मराठ्यांकडून झालेला हा अफाट पराक्रम एखाद्या चमत्कारापेक्षा नक्कीच कमी नाही. आशिया खंडातील सर्वांत सामर्थ्यवान सुलताना विरुद्धचा मराठ्यांचा हा संघर्ष किती मोठा आणि प्रेरणादायी आहे याची जाणीव औरंगजेब वाचल्याशिवाय नाही येत. स्वप्नील कोलते यांनी त्यांच्या या "मुकद्दर" मधून औरंगजेबाच्या दक्षिणेतील शेवटच्या दिवसांचे वर्णन आणि मराठ्यांसोबत चाललेला संघर्ष रेखाटला आहे. हे चरित्र जरी औरंगजेबाचं असलं तरी पानापानावर दिसत राहतो तो मराठ्यांचा पराक्रम! आपल्या शेवटच्या दिवसांत औरंगजेबाला त्याने केलेल्या दख्खन स्वारीचा पावला-पावलावर होणारा पश्चात्तापच खूप काही सांगून जातो. औरंगजेब जितक्या कट्टरतेने मराठ्यांशी लढला, तेवढीच मराठ्यांची स्वराज्यासाठी लढण्याची तळमळ वाढली आणि तेवढाच कडवा प्रतिकार मराठ्यांनी केला. रायगडावर बत्तीस मण तख्तावर पेटलेली क्रांतीची ही ठिणगी शहेनशहा औरंगजेबाला नेस्तनाबूत करूनच शांत झाली. मृत्यू शय्येवर असताना, आपल्या मुलीसोबत बोलताना औरंगजेबाच्या तोंडून बाहेर पडलेली शेवटची वाक्ये मराठ्यांच्या या अफाट पराक्रमाची साक्षच देतात. "हमारी जिंदगी की सबसे बडी गलती यह है की हमनें सिवा को आगरा से भागने दिया! इस्लाम में पुनर्जन्म नहीं मानते, पर फिर भी कभी खुदा के करम से हम वापिस इंसान की जात में पैदा हुए तो हम इन पहाडों से और मराठो से लडने नही आऐंगे, कभी नही..."

स्वप्नील कोलते यांनी एका वेगळ्या पद्धतीने लिहिलेली, आवर्जून वाचण्यासारखी मराठ्यांच्या पराक्रमाची ही गाथा "मुकद्दर".




संदीप प्रकाश जाधव

Tuesday, September 7, 2021

"कबंध"

 


 

लेखक : रत्नाकर मतकरी

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

                                                                           पृष्ठे- १५३, मूूल्य- १८० रुपये.


गूढकथा किंवा रहास्यकथांचा उल्लेख आल्यानंतर सर्वात प्रथम डोळ्यासमोर येणारी नावे नारायण धारप आणि रत्नाकर मतकरी! गूढ आणि रहास्यकथांचा मराठीतील साहित्यप्रकार या दोन नावांशिवाय पूर्णच नाही होऊ शकत! मराठी साहित्यविश्वात गूढ आणि रहास्यकथांचं दालन समृद्ध करण्यात या दोन व्यक्तींचं खूप मोठं योगदान आहे. ६०-७० च्या दशकात लिहिल्या गेलेल्या यांच्या कथा आजही लोक तितक्याच आवडीने वाचतात यातच त्यांच्या लेखनाचं वेगळेपण लक्षात येतं. नेहमीच्या पाहण्यात नसलेलं, ज्याची कदाचित भीती वाटू शकेल पण ते भीतिदायक नाही ते म्हणजे गूढ. एखाद्याला भीती का वाटते हे शोधणे म्हणजे सुद्धा एकप्रकारचे गूढच. गूढकथा म्हणजे आयुष्याच्या एखाद्या मुलुखावेगळ्या गूढपैलूविषयी लिहिलेली कथा. मृत्यू ही गोष्ट अशीच एक गूढ आहे. मृत्यू होताना नेमके काय होते याचे रहस्य अजून उमगलेले नाही. विज्ञानाने मानवी शरीर नष्ट होण्याचे स्वरूप उलगडले परंतु मानवी मन, त्याच्या भावना, वासना हे शरीराबरोबरच नष्ट होते का? याचे समाधानकारक उत्तर अजून मिळालेले नाही. अशा सर्व गूढ गोष्टींचे सर्वसामान्यांना नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. याच आकर्षणाला केंद्रस्थानी ठेवून, आपल्या प्रचंड कल्पनाशक्तीच्या जोरावर या दोन्ही लेखकांचे बरेच कथासंग्रह प्रकाशित झाले. अशाच दर्जेदार कथासंग्रहातील रत्नाकर मतकरी यांचा एक गूढकथासंग्रह "कबंध". भेदक रहस्यांची गुंफण करत लिहिला गेलेला रत्नाकर मतकरींचा प्रत्येक कथासंग्रह खासच आहे आणि "कबंध" देखील त्याला अपवाद नाही. रहस्यकथेतील रहस्य हे त्या कथेसोबतच संपून जाते पण गूढकथांचं वैशिष्ट म्हणजे कथा संपल्यानंतरसुद्धा वाचकाच्या मनात राहून जाणारी त्या गूढतेची एक अदृश्य किनार! "कबंध" मधील प्रत्येक कथा वाचकाला त्या गूढ वातावरणात घेऊन जाते. "कबंध" चा अर्थ शिरावेगळे धड! यावरच बेतलेल्या या कथासंग्रहातील पहिल्या गूढकथेचे नावच या संग्रहाला दिलेलं आहे, "कबंध". अशाच इतर ११ गूढकथांमधून, कथेच्या नायकाला येणाऱ्या वेगवेगळ्या पातळ्यांवरील गूढ अनुभव व तर्कापलीकडील घटना यांची सांगड घालून रत्नाकर मतकरींनी अतिशय प्रभावी शैलीने या कथा पेश केल्या आहेत ज्या वाचत असताना त्यांच्या कल्पनाशक्तीला दाद दिल्याशिवाय वाचक राहूच शकत नाही. १५३ पाने आणि १२ कथांचा एका बैठकीत वाचून पूर्ण होण्यासारखा, गूढतेने खचाखच भरलेला असा हा कथासंग्रह "कबंध".

"कबंध" या पहिल्याच कथेत मतकरींनी अतिशय भन्नाट वातावरणनिर्मिती केली आहे. नायकाचा भूतकाळ अचानक त्याच्या समोर उभा राहिल्यानंतर हळूहळू त्या रहस्यमय घटनांचा फ्लॅशबॅकमधे होणारा उलगडा म्हणजे ही कथा. मधुरा आणि रवी हे नवविवाहित दांपत्य लग्नानंतर जेव्हा पहिल्यांदाच एका लांबच्या बंगल्यात, निसर्गरम्य वातावरणात येतात त्याच रात्री सुरुवात होते या गूढ प्रकरणाची. पहिल्याच रात्री रवीला एका स्त्रीचं शीर नसलेलं फक्त धड दिसतं. तिचा आणि रवीचा काय संबंध? ती त्याचा पाठलाग का करते? या पाठलागाचा शेवट काय होतो? या गोष्टी रत्नाकर मतकरी यांनी अतिशय ताकदीने रंगवल्या आहेत. दुसरी कथा "श्रीमंत"! अत्यंत गरिबीत जगणारा रमाकांत व त्याची पत्नी रजनी यांच्याभोवती फिरणारी ही कथा. कामधंदा नसल्यामुळे होणारी आर्थिक ओढाताण, औषध न मिळाल्याने त्याच्या लहान मुलीचं झालेलं निधन आणि हताश झालेली पत्नी रजनी. अशा वातावरणात, झटपट श्रीमंत होण्यासाठी रमाकांत अघोरी मार्गाला लागतो. हा मार्ग त्याला श्रीमंतीकडे कसा घेऊन जातो? त्याचे काय परिणाम होतात? या सर्वांत त्याला काय अनुभव येतात? याचं थरारक चित्रण या कथेत वाचायला मिळेल. "दृष्टा" अशीच वेगळ्या पद्धतीची कथा! लहानपणापासून बुद्धी नसलेल्या, पूर्णपणे आपल्या आईवर अवलंबून असणाऱ्या मुलाची, पंडितची ही कथा. बुद्धीने कमी असला तरी एक असाधारण अशी शक्ती लाभलेला हा पंडीत. म्हणूनच स्वत:च्या आईचं मरण, साने वकिलांनी केलेला आपल्या सुंदर पत्नीचा खून अशा गोष्टी त्याला आधीच दिसतात आणि या अतिशय वेगळ्या धाटणीच्या कथेचा शेवटही अगदी तसाच धक्का देणारा असा आहे. "लपा-छपी" ही लहानपणीच जन्म देऊन आई वारल्याने वडिलांचा रोष निर्माण झालेल्या विल्कूची कथा. वडील त्याला मुंबईला घेऊन जात नसल्याने आजीकडे शहाड या छोट्याशा गावी राहणाऱ्या विल्कूची खुनशी वृत्ती कशी उफाळते आणि शेवटी तो आपल्या आजीलाच कसा ठार मारतो याचं अतिशय परिणामकारक चित्रण कथेत वाचायला मिळेल. प्रेम, माया न मिळाल्याने एकाच शरीरात वावरणारे दोन विल्कू कसे वागतात हे अतिशय रोमांचक पद्धतीने मतकरींनी या कथेत रंगवले आहे. "म्हणे कोण मागे आले"! एकाच सुंदर नर्सवर प्रेम करणाऱ्या दोन डॉक्टर मित्रांभोवती फिरणारी ही कथा. आपल्या प्रतिस्पर्ध्याचा काटा काढण्यासाठी डॉ. दिवेकर यांनी निवडलेला, कोणाच्याही लक्षात न आलेला एक अफलातून मार्ग! पण आपल्या प्रतिस्पर्ध्याला मारल्यानंतर खरेच ते सुखी होऊ शकले का? त्यांना त्यांची प्रेयसी नीलिमा मिळाली का? हे वाचनीय आहे. स्वत:पासून स्वतंत्र होऊन कुठेही संचार करू शकणाऱ्या माणसाच्या इच्छा–देहाची कल्पना "इच्छा-देह" या कथेतून मतकरींनी मांडली आहे त्याचप्रमाणे अपघातात मृत्यू आला असताना फक्त आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या सामर्थ्यावर त्याला दूर ठेवून इष्ट कार्यसिद्धीसाठी देहरूपाने जगणाऱ्या नानांची कथा "लांबणीवर". नानांना आपल्या मुलीचे लग्न जमविण्यासाठी लागलेला ध्यास आणि त्याच ध्यासापायी मृत्यूलाही "लांबणीवर" टाकून काही दिवसांसाठी वाट पहायला लावणारे नाना यांच्याभोवती फिरणारी ही कथा. कथेचा शेवटही धक्कादायक! अंधश्रद्धेवर आधारित असणारी पुढची कथा "बाबल्या रावळाचा पेटारा". मुलबाळ नसलेलं दांपत्य बाबल्या आणि त्याची पत्नी गोकुळा! मुलबाळ नसणारी गोकुळा करणी करते या संशयातून होळीच्या आगीत होणारा गोकुळाचा शेवट! हा शेवट वाचकाच्या मनाला आणखीच चटका लावून जातो कारण बाबल्याने होळीला अर्पण केलेल्या पेटाऱ्यात काय आहे हे बाबल्याच माहित नसते. वाद्यं जोरजोरात वाजवली जातात. होळीची बोंब सुरू होते आणि होळीच्या आगीत पेटारा टाकला जातो. नंतर गोकुळा गावकऱ्यांना परत कधीच दिसत नाही. "असाही एक कलावंत" आणि "ट्रिंग-ट्रिंग-हॅलो क्लिक" या कथा खून, व्यभिचार, फसवणूक या माध्यमातून आपला गुढपणा टिकवून असल्या तरी यांचं वेगळेपण म्हणजे गूढ असूनही विनोदी अंगाने केलेली या कथांची मांडणी. यानंतर थोडीशी चमत्कारिक वाटणारी कथा "एक माणूस आणि एक पशू"! एका डॉक्टरने दुसऱ्याच्या पत्नीवर डोळा ठेवून, इंजेक्शन देऊन त्याला माणसाचा पशू केल्यानंतर घडणारी ही कथा. शेवटी त्याच पशू झालेल्या माणसाकडून डॉक्टरचाच जीव घेतला जातो आणि त्यानंतर पशूच्या धक्कादायक शेवटाने संपणारी ही कथा. रहस्यमय गूढ निर्माण करणाऱ्या या कथासंग्रहातील सगळ्याच कथा वाचनीय आहेत.

आवर्जून वाचण्यासारखा गूढकथासंग्रह "कबंध".





संदीप प्रकाश जाधव


"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये सह्याद्रीचा श्वास आणि पेशवाईचा रक्तरंजित इतिहास: ना...