Sunday, May 15, 2022

"जिंजीचा प्रवास"

 



लेखक : वासुदेव सीताराम बेंद्रे

प्रकाशक : प्राकृत प्रकाशन

पृष्ठे- १०९, मूूल्य- २०० रुपये


छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीवर इतिहासकारांनी आजपर्यंत बरंच संशोधन केलं, बरीच नवनवीन माहिती लोकांपर्यंत पोहचवली. आज ३५० वर्षांपेक्षा जास्त काळ जाऊनही आपल्या मनातील त्यांच्याबद्दलचा अभिमान तसूभरही कमी नाही झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बादशाह औरंगजेबाशी मराठ्यांनी सुरू केलेला स्वातंत्र्यसंग्राम तर स्वराज्याच्या इतिहासातील एक सोनेरी पानच आहे. संभाजी महाराजांना पकडून त्यांचा अतोनात छळ करून त्यांना मारल्यानंतर मराठे संपले, मराठयांचे स्वराज्य संपले अशा भ्रमात औरंगजेब राहू लागला. मराठयांचा राजा मारला गेला, रायगड पडला, येसूबाई आणि लहान शाहू महाराज मोगलांच्या हाती सापडले अशा या कठीण काळात अनेक मोठ-मोठे मराठी सरदार मोगलांना जाऊन मिळाले त्यामुळे दख्खन जिंकून संपूर्ण हिंदुस्थानावर आपला अंमल प्रस्थापित करण्याचं आपलं स्वप्न पूर्ण झाल्याच्या आनंदात दिल्लीकडे परत जायची स्वप्ने बघणाऱ्या औरंगजेबाला आणि त्याच्या विशाल सागर सेनेला मराठ्यांनी आपली जिद्द आणि पराक्रमाच्या जोरावर पुढची २७ वर्षें लढत ठेवलं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी आलेल्या औरंगजेब बादशहाविरोधात छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या नेतृत्वाखाली हा लढा लढला गेला परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनंतरच्या मराठ्यांच्या या लढ्याची आणि त्याच्या नायकांची इतिहासकारांकडून तशी उपेक्षाच झाली. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची थोडीफार दखल घेतली गेली असली तरी त्याहून अधिक त्यांचे चारित्र्यहनन आणि बदनामीच करण्यात आली. नंतरचा राजाराम महाराज आणि ताराराणींचा इतिहास तर अगदीच उपेक्षित राहिला. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या तोडीचा पराक्रम करून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य राखणाऱ्या, स्वराज्याच्या तिसऱ्या छत्रपतींचा, राजाराम महाराजांचा "एक दुर्लक्षित छत्रपती" असाच उल्लेख आज बऱ्याच ठिकाणी वाचायला आणि ऐकायला मिळतो. असं असलं तरी एक गोष्ट मान्य करावीच लागेल ती म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्यूपश्चात रायगड पडल्यानंतर जवळपास धुळीस मिळालेल्या स्वराज्याच्या उभारणीचं शिवधनुष्य जर राजाराम महाराजांनी नसतं उचललं तर स्वराज्यासह संपूर्ण दख्खन मुघलांनी कधीच आपल्या टाचेखाली घेतला असता. छत्रपती राजाराम महाराजांच्या या महापराक्रमाची पहिली पायरी होती झुल्फिकार खानाने रायगडला दिलेल्या वेढ्यातून निघून जिंजीला पोहोचणं! छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाचा सरदार झुल्फिकारबखान याने रायगडला वेढा दिला. प्रत्यक्ष राजधानीच संकटात असल्यामुळे मराठ्यांचे राज्य आता बुडणार अशी शंका निर्माण झाली. अशा कठीण प्रसंगी आपल्या पतीच्या निधनाचं दुःख बाजूला सारून महाराणी येसूबाई यांनी राजाराम महाराजांचं मंचकारोहण केलं आणि त्यांना रायगडावरून सुरक्षित बाहेर जाण्यास सांगितलं, हेतू एकच - छत्रपती शिवरायांनी उभारलेलं स्वराज्य राखलं पाहिजे हा. रायगडावरून निघून सुरक्षित जागी पोहचण्यासाठी मराठ्यांनी दक्षिणेतील, तामिळनाडूतील जिंजीची निवड केली. काही निवडक आणि विश्वासू सरदारांसह महाराज प्रतापगड, पन्हाळगड मार्गे दक्षिणेत उतरले. अतिशय प्रदीर्घ प्रवास आणि चारी बाजूला मुघलांचा वावर अशा धोकादायक परिस्थितीत राजाराम महाराज जिंजीला पोहचले. पुन्हा एकदा एका अवघड प्रसंगी मराठ्यांचे छत्रपती शत्रूच्या वेढ्यातून सुखरूप बाहेर पडले. आज जर आपण नकाशावर रायगड पासून जिंजीपर्यंतचं अंतर बघितलं तर ते जवळपास १२०० किलोमीटर आहे तेव्हा आपण फक्त कल्पनाच केलेली बरी की राजाराम महाराजांचा हा "जिंजीचा प्रवास" किती धोकादायक होता आणि तो जर फसला असता तर त्यानंतर स्वराज्याचं भविष्य काय असतं. राजाराम महाराजांच्या या रायगडपासून ते जिंजीपर्यंतच्या संपूर्ण प्रवासाचे वर्णन करणारा "राजाराम चरित्रम" अर्थातच "जिंजीचा प्रवास" हा ग्रंथ राजाराम महाराजांचे समकालिन आणि शिवाजी महाराजांपासून राजदरबारात राजाश्रय असणारे कवी केशव पंडित यांनी संस्कृतमधे लिहिला होता. शिवकाळातील असणाऱ्या काही दुर्मिळ ग्रंथांपैकी केशव पंडितकृत "राजाराम चरित्रम" हा एक अत्यंत दुर्मिळ ग्रंथ आहे. एकूण पाच सर्ग आणि २७५ श्लोकांमधून लिहिल्या गेलेल्या या संस्कृत ग्रंथाचं मराठी भाषांतर वा. सी. बेंद्रे यांनी केलं आहे तेच हे पुस्तक "जिंजीचा प्रवास"!

छत्रपती राजाराम महाराजांचं कर्तृत्व किती अफाट होतं याची छोटीशी झलक देणारा, प्रत्येकाने आवर्जून वाचावा असा ग्रंथ "जिंजीचा प्रवास"!





संदीप प्रकाश जाधव


Sunday, May 8, 2022

"सार्थ"

 



लेखक : डॉ. एस. एल. भैरप्पा

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

मराठी अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी

पृष्ठे- २७२, मूूल्य- २९५ रुपये


"सार्थ" म्हणजे व्यापाऱ्यांचा तांडा! भैरप्पांच्या या कादंबरीची कथा आहे जवळपास ७व्या-८व्या शतकातील. कादंबरीच्या सुरुवातीलाच लेखक आपल्याला त्या कालखंडात घेऊन जातात. अगदी साधाच विषय पण मानवी मनाचे विविध पैलू उलगडत जाणारे कथानक. नागभट्ट हा या कादंबरीचा नायक. हा नागभट्ट म्हणजे तारावती नगरातील आमरुक राजाचा बालमित्र आणि अत्यंत जवळचा, विश्वासू असा राजदरबारातील एक व्यक्ती. गुरुकुलात वेदाध्ययन केलेल्या तरुण नागभट्टावर अचानकच आमरुक राजा एक गुप्त कामगिरी सोपवतो. देशोदेशी फिरणाऱ्या विविध व्यापारी 'तांड्यां'बरोबर फिरून ते करत असलेल्या व्यापाराची माहिती गोळा करण्याची ही कामगिरी, ज्या माहितीचा वापर आपण आपल्या राज्याच्या विकासासाठी करू असं आमरुक राजा नागभट्टला पटवून देतो. पण आमरुक राजाची ही खेळी खरं तर नागभट्टाच्या पत्नीला हस्तगत करण्यासाठी असते. आपल्या जिवलग मित्राने, तारावती नगराच्या राजाने आपल्याला अतिशय महत्त्वाची जबाबदारी पाड पाडण्यास निवडले या आनंदातच नागभट्ट प्रवासाला लागतो. व्यापारी 'तांड्यां'सोबत काही वर्षांचा काळ घालवल्यानंतर परत आपल्या गावी जाण्याच्या मनस्थितीत आलेल्या नागभट्टाला प्रवासातच एक धक्का बसतो जो त्याच्या पुढच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकतो. राजाच्या आज्ञेनुसार प्रवासाला निघालेल्या नागभट्टला वाटेतच आपल्या पत्नीच्या व्याभिचाराविषयी समजते. आपल्या पत्नीने आणि जिवलग मित्राने केलेल्या या विश्वासघाताने निराश होऊन घरी न परतता सार्थासोबतच वाट मिळेल तिकडे आणि नशीब नेईल तिथे जाण्याचे तो ठरवतो. इथून खऱ्या अर्थाने या कादंबरीची कथा सुरू होते. नागभट्टाच्या या प्रवासात त्याला अनेक व्यक्ती भेटतात. अनेक मानसिक स्थित्यंतरातून त्याला जावे लागते आणि मग त्यानंतर सुरू होते मानसिक द्वंद्व, "वैदीक विरुद्ध बौद्ध", "गृहस्थाश्रम विरुद्ध संन्यास", "जीवन विरुद्ध मृत्यू"! याच प्रवासाची, द्वंद्वाची कहाणी म्हणजे ही कादंबरी "सार्थ"! 

सुरुवातीला थोडंस फ्लॅशबॅकमधे जाणारी ही कथा जिथे नागभट्टाला एका "सार्थात" सामिल झाल्यानंतर आलेले अनुभव वाचत असताना नकळत आपणही त्या "सार्थात" सहभागी होऊन जातो. व्यापारातील अनेक खाचाखोचा समजून घेत असताना "सार्थ" म्हणजे आपल्यासारखा सामान्य माणूस कल्पनाही करू शकणार नाही असं प्रकरण असल्याची जाणीव नागभट्टाला येते. हा "सार्थ" साधासुधा नाही तर व्यापार्‍यांसाठी आवश्यक असलेले सामान लादलेले पंच्याहत्तर घोडे, दोनशे बैलगाड्या, शंभर गाढवं, दररोजच्या आहारासाठी लागणारं धान्य, इतर सामान, गाड्यांची, चाकाची धाव सुटली तर बसवायला सुतार, लोहार इतका प्रचंड काफीला ज्यात बहुतेक माणसं अशी ज्यांना तलवार चालवता येते आणि स्वतःच्या व इतरांच्याही जीवाचं सोबतच मौल्यवान वस्तूंचं संरक्षण करता येतं. अशा सार्थात सहभागी होऊन मार्गक्रमण करणारा नागभट्ट या मोहीमेतून जे काही शिकत जातो त्यातून वाचकालाही बऱ्याच गोष्टी समजत राहतात. हा वरवर दिसणारा फक्त एका भौगोलिक प्रदेशातील प्रवास नसून त्याच्या अंतरंगातही एक अविरत प्रवास चालू असल्याची जाणीव वाचकला विचारात पाडते. या प्रवासात नागभट्टाला अनेक धर्म- पंथातल्या तात्विक मतभेदालाही सामोरं जावं लागतं. काही काळ "सार्था"सोबत प्रवास केल्यानंतर, नागभट्ट एका नाटक मंडळीच्या संपर्कात येतो. कृष्णावर आधारित असणा-या नाटकात त्याला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळते. "कृष्णानंद" नावाने त्याची कीर्ती सर्वदूर पसरते. बायकोने केलेल्या विश्वासघाताने खचलेला नागभट्ट त्याच कृष्णाच्या नाटकातील नटी चंद्रिकाच्या प्रेमात पडतो. परंतु ध्यानमार्गाचा अवलंब करणारी चंद्रिका नागभट्टावर प्रेम करत असूनही ती ते मान्य करत नाही. त्यामुळे नागभट्ट तिच्यापासून दूर जाण्याचे ठरवतो. एक ब्राह्मण असूनही तो तंत्रसाधनेचा मार्गाला लागतो. अनेक अनुचित मार्ग तो अवलंबतो. हटयोग आणि अघोरी तंत्रविद्या आत्मसात करण्याच्या नादात त्याचे जीवन भरकटत जाते. पण तरीही एका वळणावर त्याची आणि चंद्रिकेची पुन्हा एकदा भेट होते. नागभट्टाच्या तंत्रविद्येतील एका विधीसाठी त्याला मदत करण्यास तयार होणारी चंद्रिका नंतर त्याला "सार्थ" जगणे काय असते ते शिकवते. नागभट्ट आणि चंद्रिका यांच्यामधील हे नाते लेखकाने अगदी तरलपणे उलगडले आहे. कादंबरीतील या ७व्या-८व्या शतकातील काळात बौध्द धर्माने बहुतांश भारत व्यापलेला होता. बौध्द धर्मीय लोक वैदिक लोकांना बौद्ध धर्माचे महत्व पटवून देत असल्याचा विलक्षण प्रसंग मोठ्या खुबीने भैरप्पांनी या कादंबरीत लिहिला आहे. नालंदा विद्यापीठ, पूर्वेचं सूर्यमंदिर या ऐतिहासिक स्थळांचं वर्णन वाचकाला आपल्या इतिहासाच्या भव्यतेची जाणीव करून देतात. नागभट्टाला येणारे उलटसुलट  अनुभव आयुष्यातला नेमका कोणता मार्ग खरा यावर विचार करायला वाचकाला भाग पाडतात. नागभट्टाची होणारी तगमग, सगळीकडे त्याला येणारा शून्याचा, अपूर्णत्वाचा अनुभव आणि तरीही त्याचं सतत सत्याचा शोध घेत राहाणं हा या कादंबरीतील कथेचा गाभा. चंद्रिकेसोबत राहत असताना पुढे नागभट्टाची गाठ गुरु कुमारील भट्टांशी पडते. तत्कालीन समाजामध्ये पंडित कुमारील भट्ट ही एक अतिशय आदरणीय अशी व्यक्ती होती. कुमारील भट्टांची वैदिक धर्मावर अपार श्रद्धा असूनदेखील बौध्द धर्म समजून घेण्यासाठी ते बौद्ध धर्माचा स्वीकार करतात. धर्मांतरण ही त्या काळात खूप निंदनीय गोष्ट असूनदेखील कुमारील भट्ट ते करतात. धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्माचा नैतिक अधिकार राहत नसे परंतु वैदिक धर्माचरण हा कुमारील भट्टांचा श्वास असल्यामुळे प्रायश्चित्त म्हणून सर्वांसमक्ष, स्वतः चिता रचून ते आत्मदहन करायचं ठरवतात. स्वधर्माची महती जाणून घेण्यासाठी प्रसंगी धर्मांतरणाचे पाप करून, प्रायश्चित्त म्हणून प्राणांचे बलिदान देणाऱ्या कुमारील भट्टांची धर्मनिष्ठा आणि चंद्रीकेचे निर्व्याज प्रेम या दोन गोष्टींमुळे नागभट्टाच्या भरकटलेल्या आयुष्यात खूप मोठा बदल होतो आणि शेवटी "सार्थासोबत" चालू झालेल्या या प्रवासात त्याला जीवनाची 'सार्थता' लाभते. 

आपले वाचन 'सार्थ' झाल्याचा अनुभव देणारी, आवर्जून वाचावी अशी कादंबरी, "सार्थ"!!






संदीप प्रकाश जाधव

Thursday, April 28, 2022

"पडछाया"

 



लेखक : नारायण धारप

प्रकाशक : साकेत प्रकाशन

पृष्ठे- २४६, मूूल्य- ३०० रुपये


"अघटित" हा नारायण धारपांचा मी वाचलेला पहिला भयकथासंग्रह! भयकथा असोत की गूढकथा त्यांची परिणामकारकता लेखकाच्या कल्पनाशक्तीवर तसेच कथांच्या मंडणीवरच अवलंबून असते आणि या दोन्हीही बाबतीत नारायण धारप यांचं नाव अग्रस्थानी घ्यावं लागेल इतक्या त्यांच्या भयकथा-कादंबऱ्या परिणामकारक असतात. विषय साधेच पण प्रचंड कल्पनाशक्तीच्या जोरावर अशा विषयांची कथेत केलेली मांडणी वाचकाला त्यांच्या लेखनाच्या प्रेमात न पाडते तरच नवल. एखाद्या व्यक्तीला ठराविक साहित्य वाचनाचीदेखील 'चटक' लागू शकते याचा प्रत्यय मला खरंतर धारप आणि मतकरी यांच्या पुस्तक वाचनातून आला. माझ्या नेहमीच्या वाचनातून थोडासा बदल म्हणून जर मी कोणती पुस्तके वाचत असेल तर ती धारप आणि मतकरींचीच! "अघटित"नंतर धरपांची पुस्तके शोधून संग्रही घेण्याचा मी सपाटाच लावला आहे. आज नारायण धारप आणि रत्नाकर मतकरी यांची जवळपास २०हून अधिक पुस्तके माझ्या संग्रही आहेत आणि हा आकडा अजून वाढत जाईल यात शंकाच नाही. तर "अघटित"पासून धारपांसोबत चालू झालेल्या या माझ्या प्रवासात पुढे त्यांची "चेटकीण", "लुचाई", "वेडा विश्वनाथ", "स्वाहा", "देवाज्ञा", "ग्रहण" अशी एकाहून एक दर्जेदार पुस्तके मी वाचून काढली. प्रत्येकवेळी आलेला अनुभव खासच! या सर्व पुस्तकांच्या पंक्तीत आज आणखी एका उत्कृष्ठ कथा संग्रहाची भर पडली आणि तो म्हणजे "पडछाया"! "पडछाया" चा शब्दशः अर्थ "प्रतिबिंब"! १० वेगवेगळ्या कथांचा हा संग्रह आणि प्रत्येक कथेचा विषय वाचकाला खिळवून ठेवणारा असा आहे. आपल्या प्रचंड कल्पनाशक्तीच्या जोरावर धारपांनी प्रत्येक कथेमधून जी "पडछाया" वाचकांसमोर आणली आहे ती वाचकाला एका वेगळ्या जगात घेऊन जाते. कथा साध्याच पण जबरदस्त परिणामकारक! वाचत असताना धारपांच्या कल्पनाशक्तीला दाद दिल्याशिवाय राहवत नाही. पुस्तकातील पहिलीच कथा आहे "पडछाया" जी फिरते वामन या नायकाभोवती. पुण्यातील आपल्या वाड्यातून पळून गेलेला किशोरवयीन वामन जेव्हा जवळपास १८ वर्षांनी पुण्यात परत येतो त्यानंतर सुरुवात होते या कथेची. वामनच्या परत येण्याची १८ वर्षें वाट बघणारी त्याची मैत्रीण उर्मिला हे या कथेतील आणखी एक पात्र. १८ वर्षांपूर्वीच्या वामनची त्याच्या वाड्यात वावरणारी "पडछाया" आणि आज वर्तमानकाळात जगणारा वामन यांच्या संघर्षाची ही कथा जी प्रत्यक्ष वाचताना अंगावर शहारे आणते. दुसरी कथा आहे "मुक्ती"! खरंतर नावावरूनच वाचकाला कथेचा थोडाफार अंदाज येतो. या कथेचा नायक आहे नारायण आणि ही कथा आहे नायकाची बालमैत्रिण कमलच्या मृत्यूनंतरच्या "मुक्ती"ची! रस्तारुंदीकरणात आपला जुना वाडा पाडला जाणार म्हणून जवळपास ३० वर्षांनी वाड्याला शेवटची भेट देण्यासाठी म्हणून आलेल्या नारायणला त्या वाड्यात जाणवणारी कमलची "पडछाया" आणि फ्लॅशबॅकमधे कमलच्या मृत्यूचा होणारा उलगडा, नंतर नारायणकडून कमलला मिळणाऱ्या "मुक्ती"ने होणारा कथेचा शेवट. "तो कोण होता?" ही थोड्या वेगळ्या अंदाजाने सुरुवात होणारी या संग्रहातील तिसरी कथा. स्वतःला सिद्ध करण्यासाठी संघर्ष करणारा एक लेखक आणि त्याची पत्नी विमल ही या कथेतील महत्वाची पात्रे. आपल्या पत्नीच्या "पडछाये"सोबत राहणारा आणि शेवटी स्वतःचेच अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धडपडणारा हा नायक कथेच्या शेवटी वाचकालादेखील संभ्रमात टाकतो. "मन मोहाचे घर" ही चौथी कथा आहे शेखरची. एक मेल प्रॉस्टिट्यूट होऊन चैनीत आयुष्य जगणाऱ्या शेखरचं आयुष्य त्याच्या लग्नानंतर अचानक वादळी होतं आणि त्यातूनच त्याच्या हातून त्याच्या पत्नीचा खून होतो. पुढे त्याच्या पत्नीच्या "पडछाये"कडून घेतल्या गेलेल्या सूडाने या कथेचा शेवट होतो. धारपांनी या कथेतून निर्माण केलेली वातावरण निर्मिती अफलातून आहे. यानंतरची कथा आहे "तितू"! चित्रा ही या कथेची नायिका आणि प्रभाकर हा नायक. आपल्या सावत्र आईकडून  फसवून प्रभाकरसोबत लग्न लावून दिलेल्या चित्राचा प्रभाकरला दिसणाऱ्या "तितू"नामक "पडछाये"सोबत होणारा संघर्ष म्हणजे ही कथा. हे "तितू" काय प्रकरण आहे आणि त्याचा उद्देश काय आहे याचा उलगडा कथेच्या शेवटी प्रभाकरच्या मृत्यूनंतर होतो, तोदेखील फक्त चित्रापुरताच! लोकांच्या नजरेत वेड्याच्या इस्पितळात दाखल झालेला प्रभाकर हा खरंतर आता जिवंतच नाहीये याची चित्राला होणारी जाणीव आणि इथेच वाचकाला विचारात पाडून होणारा कथेचा शेवट. एका नवकवीच्या संघर्षाची ६वी कथा आहे "मोहन किरपेकर - एक शोकांतिका". चेटूक करून आपल्याच पतीचा जीव घेणाऱ्या बेबीची कथा आहे "चेटकिण". स्वतःच्या आईची मावशी म्हणून जगाला ओळख सांगणाऱ्या बेबीच्या बऱ्याच वर्षांनी आपल्या बालमैत्रिण सुमनसोबत अचानक होणाऱ्या भेटीने या कथेची सुरुवात होते. पुढे फ्लॅशबॅकमध्ये लहानपणी बेबीकडून घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करून लेखकांनी वाचकाला बेबीबद्दल विचार करायला भाग पाडलं आहे. या संग्रहातील इतरही कथा "बळी", "चौरस्ता", "अनाहूत" अतिशय दर्जेदार आहेत. प्रत्येक कथेत असणारं वेगळेपण आणि तरीही या सर्व कथांमध्ये असणारा सामाईक धागा "पडछाया" वाचकाला अक्षरशः खिळवून ठेवतात. या संग्रहातील ८वी कथा "बळी" ही अलीकडेच येऊन गेलेला चित्रपट "तुंबाड" ची आठवण करून देते. जवळपास याच कथानकावर बेतलेला हा चित्रपट जर आपण पहिला असेल तर धारपांनी लिहिलेल्या कथांचा आणि त्यांच्या जबरदस्त कल्पनाशक्तीचा आपण अंदाज लावू शकतो.

कथानकात पुढे काय होईल याची उत्सुकता कायम ठेवत, वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवत त्याला त्या वतावरणाचाच एक भाग बनवणाऱ्या नारायण धारप यांचा एक वाचनीय कथासंग्रह "पडछाया"!




संदीप प्रकाश जाधव

                                                                           

Wednesday, April 20, 2022

"अधर्मयुध्द"

 


लेखक : गिरीश कुबेर

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

पृष्ठे- २४४, मूूल्य- ३०० रुपये                                                              



गिरीश कुबेर यांच्या लेखनाबद्दल बरंच ऐकलं होतं आणि त्याच उत्सुकतेतून त्यांची काही पुस्तकेही खरेदी केली. त्यातीलच आज वाचून पूर्ण झालेलं एक उत्कृष्ट पुस्तक "अधर्मयुद्ध"! खरंतर त्यांचं "अधर्मयुद्ध" हे पुस्तक मी फक्त नाव आणि मुखपृष्ठ पाहूनच निवडलं होतं. गिरीश कुबेरांच्या या पुस्तकाने मला माझी निवड न चुकल्याचा आनंद आणि एक वेगळं तसंच आपल्या ज्ञानात भर घालणारं काहीतरी वाचायला मिळाल्याचं समाधान मिळवून दिलं. पुस्तकाचं नाव जरी "अधर्मयुद्ध" असलं तरी 'धर्म-अधर्माचा" कोणताही बाऊ न करता प्रत्यक्ष व्यवहारातील संघर्ष आपल्यासमोर आणणारी ही एक शोधकथा किंवा रहस्यकथा म्हटले तरी चालेल. ही कथा जितकी वाचकाला चीड आणते तितकीच ती अस्वस्थही करते. गिरीश कुबेरांनी एक अतिशय किचकट आणि गुंतागुंतीचा विषय तितक्याच सोप्या भाषेत या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर आणला आहे. आज सारं जग त्यांना धर्मांध, माथेफिरू म्हणून ओळखतं. अनेकदा त्यांचा धिक्कार केला जातो, तर कित्येकदा त्यांना चिरडण्यासाठी मोठमोठ्या लष्करी मोहिमा आखल्या जातात. त्यांच्या हातातलं इस्लामचं निशाण पाहून किंवा त्यांच्या तोंडची जिहादची भाषा ऐकून त्यांच्या धर्माबद्दलचे भलेबुरे, समज-गैरसमज पसरवले जातात. भस्मासुरासारखं अक्राळविक्राळ रूप धारण करणार्‍या अशा दहशतवाद्यांच्या मूळ प्रेरणा कोणत्या आणि स्वार्थासाठी त्यांना कठपुतळ्यांप्रमाणे नाचवणार्‍या साम्राज्यवादी सूत्रधारांचे मनसुबे कोणते, याचा नावनिशीवार केलेला हा पंचनामा म्हणजे वाचकांचे लक्ष खिळवून ठेवणारी एक रहस्यकथाच! गिरीश कुबेर यांचं हे पुस्तक म्हणजे या इस्लामी दहशतवादाचा इतिहास आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरू नये. आज जगभर ज्या इस्लामी दहशतवादाने थैमान घातलं आहे तो नेमका कधी, कसा, कुणी जन्माला घालून वाढवला याचं अतिशय विस्तृत वर्णन या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतं. आखाती देशात जन्माला आलेल्या आणि हळूहळू जगभर आपले हातपाय पसरलेल्या या इस्लामिक दहशतवादाचा मागोवा घेत असताना काही धर्मांध व्यक्तींनी शांतताप्रिय अशा इस्लामचा स्वतःच्या फायद्यासाठी हवा तसा अर्थ लावून त्याचं रूपांतर दहशतवादाच्या अधर्मयुद्धात कस केलं याचीच ही कहाणी "अधर्मयुद्ध"! जेव्हा धर्मकारण हेच राजकारण आहे असे विचार लोकांच्या मनावर वर्षानुवर्षे बिंबवले जातात आणि एखाद्या देशाच्या, समाजाच्या राजकारणाचा गाडा धर्मकारण खेचू लागते तेव्हा सुरु होणारं "अधर्मयुद्ध" म्हणजेच दहशतवाद हे सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न गिरीश कुबेर यांनी या पुस्तकातून केला आहे जो नक्कीच प्रशंसनीय आहे. अमेरिकेने काढता पाय घेतल्यानंतर सध्या अफगाणिस्तानवर वेगाने कब्जा मिळवत असलेलं 'तालिबान', काही महिन्यांपूर्वी इस्राईलवर हजारो रॉकेट्सचा मारा करणारं 'हमास' या सगळ्या इस्लामिक दहशतवादी संघटनांविषयी ऐकलं तर आपल्या मनात प्रश्न येतात की या सगळ्याची सुरुवात नेमकी कुठून झाली असावी? इस्लामची विचारधारा जरी सुरुवातीपासून आक्रमक व असहिष्णु असली तरी आधुनिक काळातील 'जिहादी' इस्लामच्या विचारधारेची सुरुवात कशी झाली? अशा अनेक प्रश्नांच्या खोलात जात असताना लेखकांनी अगदी इतिहासातून म्हणजे वहाबी आणि इब्न सौद यांची युती होऊन एक संपूर्ण देश कसा तयार झाला इथून पुस्तकाची सुरवात केली आहे. ज्यामधे पुढे ब्रदरहूडची स्थापना, ऑटोमन साम्राज्याचा झालेला ऱ्हास आणि त्यातून आपल्या ताटात काहीतरी पडावे म्हणून इंग्लड व इतर युरोपातील राष्ट्रांची चाललेली धडपड, विस्तारवादी भूमिकांमुळे एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी चालणारं जागतिक पातळीवरील राजकारण अशा विषयांवरदेखील आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळते. आजही जगातील जवळपास सर्व दहशतवादी संघटनांची नाळ कुठे ना कुठे या ब्रदरहूड संघटनेशी जुळते यावरूनच आपण अंदाज लावू शकतो की या संघटनेची व्याप्ती किती मोठी आहे. इजिप्तची क्रांती, अमेरिकेची दुट्टपी भूमिका त्यातून त्यांना स्वतःला बसलेल्या झळा, आजची गाझा पट्टी म्हणजे जगातील सर्वात असुरक्षित आणि संवेदनशील जागा कशी झाली, शीतयुद्धाच्या अफगाणिस्तानला बसलेल्या झळा आणि त्यातून आजअखेर उभारी घेऊ न शकलेला हा देश, दहशवादी संघटनांना आर्थिक रसद पुरवणारी अफूची शेती या सर्व विषयांचं अतिशय मुद्देसूद विवेचन गिरीश कुबेर यांनी केलेलं आहे. आपल्या स्वार्थासाठी जागतिक राजकारणात अमेरिकेने वेळोवेळी विविध दहशतवादी संघटनांना मदत केली, त्यांना पाठीशी घातलं आणि आज हाच दहशतवाद अख्ख्या जगाला धोकादायक ठरतो आहे ज्यातून खुद्द अमेरिकासुद्धा नाही सुटू शकली. स्वतःच पेरलेल्या कडू फळाची चव आज अमेरिकाही घेते आहे. एकेकाळी दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांना व्हाईट हाऊसवर चर्चेला बोलावणारी, ओसामाला व अल् कायदाला प्रोत्साहन देणारी अमेरिका ९ सप्टेंबर २००१ च्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याने खडबडून जागी झाली. इस्लामी देशांबद्दलचा त्यांचा दृष्टिकोनच बदलला. याचं सर्वांत चांगलं उदाहरण इराकचं देता येईल. स्वतःला 'लोकशाहीचा पुरस्कर्ता' म्हणवणाऱ्या अमेरिकेने 'कोणालातरी धडा शिकवायचाच' या हेतूने खोटे पुरावे दाखवून खोट्या आरोपांखाली तुलनेनं धर्मनिरपेक्ष अशा इराकच्या सद्दाम हुसेनच्या राजवटीचा घोट घेतानाही मागेपुढे पाहिले नाही. यातून इराकमध्ये जी अस्थिरता निर्माण झाली त्यातून तो देश आजतागायत सावरू शकला नाही. असंच उदाहरण म्हणून अफगाणिस्तानकडेही पाहता येईल. सद्दामनंतर इराकमध्ये 'आयसिस'चा उदय झाला तर अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबानी राजवट चालू झाली. ज्यांच्या क्रूरतेच्या कहाण्या ऐकून वाईट वाटतं. गिरीश कुबेर यांनी अमेरिकेच्या या बोटचेपी आणि दुटप्पी भूमिकेवरदेखील या पुस्तकातून प्रकाश टाकला आहे जे वाचत असताना या तथाकथित जागतिक महासत्तेबद्दल आपल्या मनात चीड निर्माण होते. यासर्वांसोबतच आखाती देशात चालू झालेल्या तेलाच्या राजकारणावरसुद्धा आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळेल. लेखकांनी पुस्तकात केलेली इस्लामी जगातील दहशतवादाची अनेक वर्णनं वाचकांना थक्क करून सोडतात. 'धर्म ही अफूची गोळी आहे' या कार्ल मार्क्सच्या वाक्याला सप्रमाण सिद्ध करणारं हे एक उत्कृष्ट पुस्तक "अधर्मयुद्ध"!

धर्माचा वापर करून, धर्माला अधर्माच्या वाटेवर घेऊन जाणारं हे "अधर्मयुद्ध" कशाप्रकारे सुरू झालं, याचा सुरुवातीपासूनचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर आवर्जून वाचावं असं गिरीश कुबेर यांचं हे पुस्तक "अधर्मयुद्ध"!






संदीप प्रकाश जाधव


Tuesday, April 12, 2022

"भाऊ परतौनी आला"

 


लेखक : संजय सोनवणी

प्रकाशक : प्राजक्त प्रकाशन

पृष्ठे- १२४, मूूल्य- १६० रुपये                                                                         


खरंतर इतिहासाला आपण कधीच आव्हान नाही देऊ शकत, एका ठराविक वेळेनंतर जे घडलंय ते असंच घडलं असेल किंवा घडलं असू शकेल अस मान्य करूनच त्या घटनांकडे पहावं लागतं. परंतु असं असलं तरी आज इतिहासात डोकावताना अशा बऱ्याच घटना आपल्या समोर येतील जिथे अजूनही आपले विचार थांबतात, आपण एका ठाम मताला पोहचूच शकत नाही. याचं सर्वांत मोठं आणि भल्याभल्यांची मती गुंग करणारं उदाहरण म्हणून शिवाजी महाराजांनी आग्ऱ्याहून औरंगजेबाच्या कैदेतून संभाजी महाराज आणि आपल्या इतर साथीदारांसोबत केलेलं यशस्वी पलायन या घटनेकडे पाहता येईल. आज तब्बल ३५० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटून गेला तरीही आपण एका ठाम मताला नाही पोहचू शकलो की आग्ऱ्यातून महाराज नक्की कसे निसटले. आग्ऱ्यातील या वादळी घटनेनंतर जवळपास ९५ वर्षांनी आणखी अशी एक घटना इतिहास घडली ज्याबद्दल अजूनही संभ्रम आहे. आणि ती घटना म्हणजे पानिपतात अब्दालीसोबतच्या महासंग्रामात सदाशिवराव पेशवा अर्थातच भाऊसाहेब पेशवा यांचं रणभूमीवरुन नाहीसं होणं आणि तब्बल १३ वर्षांनी दख्खनेत पुन्हा प्रकट होणं. सदाशिवरावांच्या अशा इतक्या वर्षांनी अचानक प्रकटल्याने त्यावेळच्या राजकारणात उडालेला धुरळा आणि आपल्याच लोकांकडून तोतया ठरवून त्यांना दिलेल्या देहदंडाच्या शिक्षेने झालेला या सर्वाचा शेवट. पण खरंच ही घटना इतकी साधी आणि सहज बाजूला ठेऊन पुढे जाण्यासारखी आहे का? मातृभूमीच्या संरक्षणासाठी अब्दालीसोबत लढलेले पानिपतचे युद्ध म्हणजे मराठा साम्राज्याच्या डोक्यावरची भळभळती जखमच. पेशव्यांच्या काळात अटकेपार गेलेल्या मराठा साम्राज्यास पानिपतच्या युद्धातील पराभवानंतर उतरती कळा लागली. पेशव्यांच्या गादीचे उत्तराधिकारी असलेले विश्वासराव युद्धात धारातीर्थी पडले. पानिपतावर सैन्याचे सेनापती म्हणून गेलेले सदाशिवराव भाऊ युद्धाच्या धामधूमीत कुठे गायब झाले हे कोणालाच समजले नाही. नानासाहेब पेशव्यांना काशीराजकडून आलेल्या पत्रात विश्वासराव आणि सदाशिवभाऊ यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्याचे कळवण्यात आले होते. बऱ्याच लोकांचा आणि साक्षात भाऊंच्या पत्नी पार्वतीबाईंचा असा विश्वास होता की भाऊ अजूनही जिवंत आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी सदाशिवराव भाऊंचे तोतया प्रकटले होते. यातील एखादा तोतया खरेच सदाशिवराव भाऊ नसेल कशावरून? राघोबादादांसोबत एकाहून एक पराक्रम करत अटकेपार गेलेले भाऊ खरंच पानिपतात कामी आले असतील की ते खरंच परत आले असतील? त्यांच्या अनुपस्थितीत १३ वर्षांमधे बदलेल्या राजकारणाचा ते कशावरून बळी ठरले नसतील? कशावरून त्यांना तोतया ठरवून परस्पर शिक्षा नसेल दिली? जर खरंच परत आलेली व्यक्ती तोतया होती तर पानिपतच्या युद्धानंतर भाऊ गेले असं समजून त्यांचं श्राद्ध घातल्यानंतरसुद्धा आपल्या कपाळी कुंकू लावून त्यांची वाट पाहणाऱ्या पार्वतीबाईंसमोर त्यांना का नाही उभं केलं गेलं? का नाही पार्वतीबाईंसमोर त्या तोतयाची शहानिशा केली गेली? ती व्यक्ती जर खरंच तोतया होती तर कोकणातून पुण्यावर स्वारी करताना इतकं मोठं सैन्य त्याच्या सोबत का उभं राहिलं? असे एक ना अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. पानिपतच्या युद्धात सदाशिवराव भाऊ वाचले होते याचा खरंतर कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही पण 'तोतयाचे बंड' हे प्रकरण पेशवेकाळात खूप गाजले होते. सुखलाल नावाचा कनोजी ब्राह्मण माधवराव पेशव्यांच्या काळात सदाशिवराव भाऊंचा तोतया म्हणून प्रकट झाला होता आणि काही कारस्थानी लोकांच्या मदतीने त्याने पेशवाई विरुद्ध बंड पुकारले होते याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत, तोच धागा पकडून संजय सोनवणी यांनी  ऐतिहासिक घटनेला कल्पनेची जोड देऊन लिहिलेली ही कादंबरी आपल्याला विचारात नक्कीच पाडते. कथा काल्पनिक असली तरी बरेचसे ऐतिहासिक संदर्भ लेखकांनी यामधे दिलेले आहेत. संजय सोनवणी यांची १२४ पानांची, एकाच बैठकीत वाचून पूर्ण होणारी "भाऊ परतौनी आला" ही छोटेखानी कादंबरी ज्या वादग्रस्त 'तोतया प्रकरणावर' बेतली आहे तो सदाशिवराव भाऊंचा पानिपत पासून पुण्यापर्यंतचा एक काल्पनिक प्रवास आहे! हा प्रवास इतिहास म्हणून न पाहता एक कलाकृती म्हणून पहिला तर वाचकाला नक्कीच एक वेगळी सफर घडवून आणतो.

संजय सोनवणी यांची एक वाचनीय कलाकृती "भाऊ परतौनी आला"!





संदीप प्रकाश जाधव



Tuesday, April 5, 2022

"शहीद"

 



लेखक : कुलदीप नय्यर

प्रकाशक : रोहन प्रकाशन

मराठी अनुवाद : भगवान दातार

पृष्ठे- २१४, मूूल्य- ३०० रुपये




सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है|

देखना है ज़ोर कितना बाज़ु-ए-क़ातिल में है|

वक़्त आने दे बता देंगे तुझे ऐ आसमाँ|

हम अभी से क्या बतायें क्या हमारे दिल में है|

 

अवघ्या २३ वर्षांच्या आयुष्यात देशासाठी हसत हसत फासावर चढलेल्या आणि इतक्या कमी वेळात अख्या ब्रिटिश साम्राज्याला हादरे देऊन स्वतःची दखल घेण्यास भाग पाडणाऱ्या भगतसिंगांसारख्या व्यक्तीचं चरित्र खरं तर २१४ पानांमध्ये मांडणं अशक्यच! पण तरीही कुलदीप नय्यर यांनी त्यांच्या "शहीद" मधून ज्या पद्धतीने भगतसिंग यांचं चरित्र आपल्यासमोर मांडलं आहे त्याला तोड नाही. भगवान दातार यांनीही तितक्याच ताकदीने याचं मराठी अनुवादन केलं आहे. खरं तर दोन व्यक्तींची तुलना कधीच केली जाऊ शकत नाही पण तरीही "शहीद" वाचत असताना राहून राहून छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर येत होती आणि नकळत दोघांनी दिलेल्या बलिदानांचे विचार डोक्यात नाचू लागले. या दोन्ही बलिदानांची तुलना जरी होऊ शकत नसली तरी उद्देश मात्र एकच होता तो म्हणजे स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन लोकांच्या मनातील स्वातंत्र्याच्या, क्रांतीच्या ठिणगीचे वणव्यात रूपांतर करणे. एक छोटीशी माघार कदाचित त्यांचं आयुष्य वाचवू शकली असती पण परकीय सत्तेविरुद्ध लोकभावना तयार होण्यासाठी हसत हसत मृत्यूला सामोरे जाणं त्यांनी पसंत केलं. भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी स्वातंत्र्य चळवळीला दिलेला वेळ भलेही कमी असेल पण त्यांच्या बलिदानाने जो क्रांतीचा वणवा देशभर पेटला त्यामुळे पुढच्या अवघ्या १६ वर्षांत इंग्रजांनी भारतातून काढता पाय घेतला. २३ मार्च १९३१ रोजी या तीन तरुणांनी अख्या जगाला दाखवून दिलं देशभक्ती म्हणजे काय असते. भगतसिंग आणि त्यांच्या क्रांतिकारक सहकाऱ्यांच्या कामांची काही लोक दहशतवादी कारवायांसोबत तुलना करत. अशा लोकांना भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांनी जेलमधे असताना ६३ दिवस उपवास करून दाखवून दिलं की स्वातंत्र्यासाठी कोणत्याही प्रकारची लढाई लढण्याची तयारी या क्रांतीकारकांमधे आहे. भगतसिंग यांनी तर तब्बल ११६ दिवस आपलं उपोषण चालू ठेवलं जो एकप्रकारे विश्वविक्रमच आहे. खरंतर फाळणीनंतर बरीचशी ऐतिहासिक कागदपत्रे पाकिस्तानच्या सरकारी दफ्तरी जमा असल्याने भगत सिंगांबद्दल, त्यांनी केलेल्या कामांबद्दल माहिती मिळवणं खूप मुश्किलीचं काम होतं पण कुलदीप नय्यर यांनी अतिशय सखोल संशोधन करून, गरज असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या जागेवर जाऊन अभ्यास करून आणि प्रसंगी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या नातेवाईकांना भेटून हे अतिशय उत्कृष्ट पुस्तक वाचकांच्या भेटीला आणलं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रकाशात आलेल्या भगत सिंग यांच्या साहित्याचा अभ्यास करून आणि काही प्रकाशात न आलेल्या कागदपत्रांचा शोध घेऊन कुलदीप नय्यर यांनी हे चरित्र लिहिलं आहे. भगतसिंग यांच्यावर असलेला मार्क्स, लेनिन आदी क्रांतिकारक विचारवंताचा प्रभाव, त्यांच्याबद्दलची त्यांची मतं, आणि त्यांनी पाहिलेलं समाजवादी-धर्मनिरपेक्ष भारताचं स्वप्न आदी गोष्टींचं नय्यर यांनी अगदी अभ्यासपूर्ण विवेचन या पुस्तकात केलं आहे. भगतसिंग यांच्यावर चालवण्यात आलेल्या खटल्याचं तपशीलवार वर्णन आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळेल तसंच हंसराज व्होरा यांच्या माफीचे साक्षीदार राहण्याबाबतचे तपशीलही प्रथमच प्रकाशात आलेले आहेत. या सर्वांसोबतच या पुस्तकात महात्मा गांधींच्या अहिंसात्मक तत्त्वज्ञानाबद्दलचे भगतसिंग यांचे विचारही मांडण्यात आले आहेत. भगत सिंग यांची फाशी टाळण्यासाठी महात्मा गांधींनी कोणते प्रयत्न केले हेही कुलदीप नय्यर यांनी यात यष्ट केलं आहे. "व्यक्ती मेला तरी त्याचे विचार कायम राहतात" याचं सर्वांत चांगलं उदाहरण म्हणून भगत सिंगांच्या फाशीकडे बघता येईल. आपल्या शेवटच्या लाहोर तुरुंगवासात मृत्यू समोर दिसत असताना भगतसिंग अखंडपणे वाचन करत होते, टिपणं काढत होते, नोंदी ठेवत होते. तुरुंगातील त्यांच्या नोंदवहीत एकूण १०७ लेखकांची नावे आणि अवतरणे आढळतात. या नोंदींचाच आकार १४० छापील पानांइतका आहे. यावरून भगतसिंगांनी वाचलेल्या ग्रंथांची आपण कल्पना करू शकतो. आज दुर्दैवाने भगतसिंग म्हटलं की राजगुरू आणि सुखदेव यांच्यासमवेत त्यांचं फासावर जाणं हेच ठळकपणे आपल्यासमोर येतं. परंतु कुलदीप नय्यर यांच्या "शहीद" मधून आपल्यासमोर येणारं भागातसिंगांचं रूप खूप वेगळं आहे. त्याला अनेक छटा आहेत ज्या एकामागून एक उलगडत जातात. या छटांमधून एक भारतीय म्हणून आपल्याला विचारात पाडणारा क्रांतिकारक, आपल्या चौफेर ज्ञानाने आपल्या विचारांना दिशा देणारा, एक कुशल संघटक, मार्गदर्शक, देशासाठी बलिदान देण्यात सर्वांत पुढे असणारा तरुण, प्रचंड बुद्धिमान, जहाल क्रांतिकारक, दूरदृष्टी असणारा, आपल्या कार्याची दिशा पक्की ठाऊक असलेला, जगातल्या सगळ्या दु:ख-दैन्याबाबत मनात करुणा बाळगणारा, आपल्या अखेरच्या तुरुंगवासात फाशीच्या कोठडीत असंख्य पुस्तके वाचून टिपणे काढणारा व्यासंगी, भारतीय तसेच जागतिक साहित्याची सूक्ष्म जाण असलेला समीक्षक, अतिशय प्रगल्भ असा विचारवंत आणि तरीही स्वप्नाळू, कविमनाचा उमदा तरुण अशी एक ना अनेक रूपे आपल्या समोर येतात. भागतसिंगांचं हे सारं कर्तृत्व आहे अवघ्या २३ वर्षें ५ महिन्यांच्या अल्पायुष्यातलं! जे खरंतर आपल्या मनाला चटका लावून जातं. पुस्तक वाचून झाल्यानंतर राहून राहून वाटत राहतं की असा नेता स्वतंत्र भारतात असता तर आज भारताची जागतिक ओळख किती वेगळी असती!

प्रत्येक भारतीयाने संग्रही घेऊन आवर्जून वाचावं असं पुस्तक "शहीद"!






संदीप प्रकाश जाधव


Sunday, March 27, 2022

"हसरे दुःख"

 


लेखक : भा. द. खेर

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

पृष्ठे- ५१४, मूूल्य- ५०० रुपये

                                                                           

'प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे एक दुःख लपलेलं असतं', हे आपण कितीतरी वेळा ऐकून-वाचून गुळगुळीत झालेलं वाक्य! या वाक्याचा आज मला खरा प्रत्यय आला भा. द. खेर यांनी लिहिलेली 'चार्ली चॅप्लिन' यांची चरित्रात्मक कादंबरी वाचत असताना. 'चार्ली चॅप्लिन' नाव ऐकताच डोक्यावर हॅट, हातात काठी, ढगळी पॅन्ट, लांब कोट आणि मोठाले बूट घालून तुरुतुरु धावणारी एक आकृती डोळ्यासमोर येते. अनेक पिढ्यांना केवळ आपल्या देहबोलीतून विनोद निर्मिती करून हसवणारा हा कलाकार इतक्या वर्षांनंतर आजही जगातील सर्वश्रेष्ठ विनोदवीर म्हणूनच ओळखला जातो. मनोरंजनाचे शेकडो पर्याय समोर असूनही आजची पिढी ५ मिनिटे देखील त्याचा आनंद घेऊ शकत नाही पण एक काळ असा होता जिथे पडद्यावर येणारा चार्ली चॅप्लिन काहीही न बोलता लोकांना आपली दुःखे विसरायला लावायचा, पडद्यावर चालणारी त्याची ती विनोदांची उधळण थांबूच नये असं वाटायचं. परंतु लोकांना मनमुराद हसवणाऱ्या या अवलियाने किती प्रतिकूल परिस्थितीशी झगडून आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलंय ते या कादंबरीत वाचताना वाचक अतिशय भावनिक होऊन जातो. चार्ली चॅप्लिनचा हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे, जो आपल्याला प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याची ताकद देतो. एका गायनाच्या कार्यक्रमात अचानकपणे आपल्या आईचा आवाज गेल्याने वयाच्या अवघ्या ५व्या वर्षी चार्लीने रंगमंचावर प्रवेश करून तो कार्यक्रम पुढे पूर्ण केला आणि इथूनच त्याचं रंगमंचाशी नातं जोडलं गेलं ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत! भा. द. खेर यांनी चार्लीचा हाच प्रवास या कादंबरीतून आपल्यासमोर आणला आहे. भा. द. खेर यांनी इतक्या ओघवत्या आणि हृदयस्पर्शी भाषेत चार्लीचं हे चरित्र मांडलं आहे की वाचताना अनेक ठिकाणी डोळ्यांत पाणी आल्याशिवाय रहात नाही. स्वतःचे आयुष्य एक शोकांतिका असूनही जगाला केवळ आपल्या मूक अभिनयाने हसवणारा हा अभिनयसम्राट केवळ प्रेरणादायीच नाही तर अतिशय वंदनीय आहे हे पानापानावर आपल्याला जाणवत राहते. लोकांना नेहमी त्याच्या चेहऱ्यावरचे बालिशपण, निरागसता दिसली पण त्यामागचे दुःख कोणालाच दिसले नाही. चार्लीने त्याच्या आयुष्यात घडलेल्या बऱ्याच घटना, गोष्टी पडद्यावर विनोदीरूपाने सादर केल्या आणि प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतले पण विनोद निर्मिती करून लोकांना हसवणारे त्याच्या आयुष्यातील असे प्रसंग प्रत्यक्ष अनुभवनारा चार्ली किती महान होता याची जाणीव भा. द. खेर यांनी आपल्याला करून दिली आहे. उदाहरणार्थ, चार्लीच्या बेकरीतून पाव घेऊन पळण्याला लोकांनी हसून हसून दाद दिली पण त्या पावाच्या तुकड्यासाठी त्याने आपल्या खऱ्या आयुष्यात किती संघर्ष केलाय याची पुसटशी कल्पनाही अशा हसणाऱ्या लोकांना नाही. खेर यांची ही चार्लीची चरित्रात्मक कादंबरी वाचून जेव्हा आपण तुरुतुरु पळणाऱ्या चार्लीला डोळ्यासमोर आणतो तेव्हा एक वेगळाच चार्ली आपल्यासमोर उभा राहतो ज्याच्यासमोर आपण मनोमन नतमस्तक होऊन जातो. अविरत कष्ट करणारी आणि मधूनच वेडाचे झटके येणारी आई, त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारा त्याचा सावत्र भाऊ यांच्या पाठिंब्यावरच चार्ली उभा राहिला. गरिबीतही त्यांच्या आईने दोन्ही मुलांवर योग्य संस्कार केले, त्यांना माणूस म्हणून जगायला शिकवले. प्रसिद्ध माणसे आपल्याला बरीच मिळतील पण अजरामर फारच कमी होतात, त्यांपैकीच एक "चार्ली चॅप्लिन"!

"हसरे दुःख" हे भा. द. खेर यांनी या कादंबरीला दिलेलं नावच आपल्याला खूप काही सांगून जातं. ही कहाणी आहे जगाला हसवणाऱ्या चार्ली चॅप्लिनच्या आयुष्यातील संघर्षाची. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून चार्लीच्या आयुष्याचा हा प्रवास सुरु होतो. चार्लीचे वडील चार्ल्स चॅप्लिन हे एक उत्कृष्ट नट होते तर चार्लीची आई हॅना एक उत्कृष्ट नटी, गाणं आणि नृत्य करणारी स्टेज आर्टिस्ट होती. पण चार्ल्सच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून हॅनाने चार्ल्सकडून घटस्फोट घेतल्यानंतर चार्लीचा मोठाभाऊ सिडने आणि चार्ली यांचा एकटीने सांभाळ केला पण दुर्दैवानं अचानकच तिच्या गळ्याने साथ सोडली आणि चॅप्लिन कुटुंबाच्या आयुष्याला उतरती कळा लागली. त्यांना अगदी दोन वेळचं अन्न मिळणेही कठीण झालं. लंडनमधल्या 'तीन पावनेल टेरेस' या पत्त्यावर राहणाऱ्या या कुटुंबाचं जगणं दिवसेंदिवस खूपच हलाखीचं होत गेलं. गरिबी, उपासमार आणि तुटपुंज्या मिळकतीसाठी पडणारे प्रचंड कष्ट यामुळे हे कुटुंब अक्षरशः गांजून गेलं होतं. दोन वेळच्या खाण्यासाठीही पैसे मिळत नसल्याने चॅप्लिन कुटुंबाला काही काळ वर्कहाऊसमध्ये राहावं लागलं त्यात गरीब मुलांचे होणारे हाल पाहून आधीच हळवा आणि प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणारा चार्ली अधिकच दुःखी बनला. हे दुःख त्याने ना कधी कोणाला सांगितलं ना कधी त्याचं प्रदर्शन केलं. मुलांची काळजी, वर्कहाऊस मध्ये होणारा त्रास, सततचा मानसिक ताण यामुळे हॅनाला वेडाचा झटका आला ज्यामुळे सिडने आणि चार्लीचं आयुष्य आणखीनच वेदनामय झालं. याकाळात काहीकाळ आपल्या वडिलांकडे सावत्र आईसोबत राहणारा चार्ली तिथे होणाऱ्या त्रासाने जास्तच संवेदनशील बनला. कधी सावत्र आईचा जुलूम, कधी वर्कहाऊस मधील जगणे तर कधी अन्नासाठी धडपड अशा प्रसंगात प्रचंड मोठे दुःख सहन करत चार्ली घडत गेला. या संघर्षमय आयुष्याच्या प्रत्येक पावलावर आई हॅना चॅप्लिनने त्याला कायम ईश्वरावर विश्वास ठेवायला शिकवले. प्रत्येक कठीण प्रसंगात सिडने त्याच्या पाठीशी उभा राहिला. एकेकाळच्या वैभवातून अचानक गरिबीत ढकललं गेलेल्या या छोट्याशा कुटुंबाची कठीण परिस्थितीत टिकून राहण्याची इच्छा वाचकाला थक्क करते. चार्ली लहान असताना लोकांचे कपडे शिवून कुटुंब सांभाळणारी हॅना आणि पेपर विकून, बोटीवर कामे करून कुटुंबाला हातभार लावणारा चार्लीचा मोठा सावत्र भाऊ सिडने या दोन व्यक्तींमुळेच खरं तर चार्ली घडला असं म्हटलं तरी चालेल. चार्लीच्या या कठीण दिवसातल्या प्रसंगांचा त्याच्या कलेवर, सिनेमांवर आणि एकूणच त्याच्या व्यक्तिमत्त्वावर खोल प्रभाव कायमच राहिला. फ्रेड कार्नोच्या नाटक कंपनीतून त्याने आपल्या अभिनयाची सुरुवात केली. मग पुढे तो अमेरिकेत गेला. तिथे 'किस्टोन कंपनीत' कॉमेडी सिनेमे केले. तिथेच तो दिग्दर्शन शिकला. 'कीडस् ऑटो रेसेस ऑफ व्हेनिस' या सिनेमात त्याला 'ट्रॅम्प' या त्याच्या अजरामर भूमिकेचा शोधही लागला. नाकाखाली छोटीशी मिशी असणारा, डोक्यावर काळी हॅट घालणारा, ढगळी पॅन्ट कमरेला करकचून बांधणारा आणि दोन्ही टाचा एकमेकांना टेकवून हातातली काठी फिरवत चालणाऱ्या या मिश्किल ट्रॅम्पने नंतर जगभर धुमाकूळ उडवून दिला. चार्लीनं आपल्या केलेने अमेरिकेसह संपूर्ण जगाला वेडं केलं. कधीकाळी अन्नानदशा असलेलं चॅप्लिन कुटुंब प्रसिद्धी आणि श्रीमंतीच्या परमोच्च शिखरावर आलं पण त्याचा चार्लीला कधी अभिमान किंवा गर्व नव्हता. चित्रपट सृष्टीत यशाची कारकीर्द गाजवणारा चार्ली संसारात मात्र दुःखीच राहिला, त्याची चार लग्नं झाली पण पहिली ३ अल्पावधीतच मोडली. चौथं लग्न ऊना ओनिल हिच्या सोबत झालं ते त्याला शेवट पर्यंत साथ देणारं ठरलं. दुसऱ्या महायुध्याचा काळात चार्लीला अमेरिकेत बराच त्रास झाला. हिटलरच्या विरोधात कणखरपणे उभं राहून चार्लीने 'द डिक्टेटर' हा सिनेमा काढला! या सिनेमातून चार्लीने जगभरातल्या हुकूमशाहीवर टीका केली. चार्ली स्वतःच्या सिनेमाचे संगीत स्वतःच द्यायचा. त्याला संगीतातील मोठी जाण होती. चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन, अभिनय, निर्मिती, संपादन अशी सगळी कामे तो स्वतःच करायचा. त्याला परिपूर्णतेचा ध्यास होता. एखादा चित्रपट त्याच्या मनाप्रमाणे तयार होण्यासाठी तो खूप कष्ट करायचा. कोर्ट कचेऱ्यांमुळे आणि अफवांमुळे त्याचे मीडियामधले आयुष्य नेहमी वादळीच राहिले. अमेरिकन सरकारने त्याला कम्युनिस्ट ठरवून त्याच्यावर निर्बंध लादायचा सारखा प्रयत्न केला. त्याच्यावर काहीकाळ अमेरिकेत प्रवेशाला बंदी घालण्यात आली. ज्या अमेरिकेने त्याला भरभराट दिली तिनेच मानसिक त्रास दिला. आयुष्याच्या शेवटी अमेरिका सोडून चार्ली स्वित्झर्लंडमध्ये राहायला गेला. स्वित्झर्लंडमधेच त्याने वयाच्या ८८ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.

परिस्थितीशी दोन हात करून स्वतःला सिद्ध करणाऱ्या, आपल्या हसर्‍या मुखवट्यातून जीवनाच्या वेदनेचा सूक्ष्म वेध घेणार्‍या मनस्वी कलावंताच्या आयुष्याची प्रत्येकाने वाचलीच पाहिजे अशी प्रेरणादायी कहाणी "हसरे दुःख"!





संदीप प्रकाश जाधव

Saturday, March 19, 2022

"व्यासपर्व"

 



लेखक : दुर्गा भागवत

प्रकाशक : मौज प्रकाशन

पृष्ठे- १११, मूूल्य- १५० रुपये                                                                           

 

वाल्मिकींचं "रामायण" आणि व्यासांचं "महाभारत" ही भारतीय संस्कृतीतील महाकाव्येच! या दोन्हींकडे भारतीय इतिहास म्हणून बघा अथवा महाकाव्य, जितक्या वेळा यांचा अभ्यास केला जातो त्या प्रत्येक वेळी यांतून नवीन काहीतरी बोध होतोच. इरावती कर्वे यांचं "युगान्त" हे आधुनिक काळात झालेल्या संशोधनाच्या आधारे महाभारतातील पात्रांची नव्याने ओळख करून देणारं पुस्तक मी काही दिवसांपूर्वी वाचलं होतं. इरावती कर्वे यांनी कोणत्याही प्रकारचं देवपण न देता स्वतःच्या नजरेतून विश्लेषण करून प्रत्येक पात्राचं एक नवीनच रूप आपल्यासमोर उभं केलं आहे, जे वाचकाला विचारात पाडतं. आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा महाभारतातील पात्रांवरच लिहिलं गेलेलं "व्यासपर्व" हे दुर्गा भागवत यांचं पुस्तक वाचण्याचा योग आला. "युगान्त" आणि "व्यासपर्व" यांतील फरक सांगायचं म्हटलं तर "युगान्त"मधे कर्वे यांच्या नजरेतून महाभारतातील पात्रांची आपल्याला ओळख होते तर "व्यासपर्व" ही महर्षी व्यासांनी त्यांचं हे महाकाव्य लिहिण्यापूर्वी त्यातील पात्रांबद्दल काय विचार करून ती पात्रे या काव्यात उतरवली असतील हे भागवत यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. महाभारतातील पात्रांची असणारी पारंपारिक ओळख पुसून टाकणारा वेध त्यांनी या पुस्तकातून घेतला आहे. हे करत असताना दुर्गा भागवत यांनी महाभारतातील १० महत्वाच्या पात्रांना डोळ्यासमोर ठेऊन लिहिलेलं आहे. तसं पाहिलं तर महाभारतातील कोणत्याही पात्राकडे पाहिलं तर आपल्याला त्याच्याभोवती नेहमी एक वेगळंच वलय जाणवत राहतं. व्यासांनी त्यांच्या काव्यात प्रत्येक पात्राचा समावेश जणू काही खास कारणासाठीच केला आहे असं वाटावं इतकी ही सर्व पात्रे एकमेकांत गुंतलेली आहेत आणि हाच धागा पकडून दुर्गा भागवत यांनी काही ठराविक पात्रांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला आहे. कृष्ण,  द्रोणाचार्य, अश्वत्थामा, दुर्योधन, कर्ण, अर्जुन, युधिष्ठिर, भीष्म, विदुर आणि द्रौपदी या पात्रांची नव्याने ओळख करून देत असतानाच सोबत इतरही काही पात्रे जशी धृतराष्ट्र, नकुल, सहदेव यांचाही या काव्यातील समावेश कशासाठी असू शकतो हेदेखील थोडक्यात सांगितलं आहे. पुस्तकातील बरेचसे शब्द सामान्य वाचकांना प्रथमच वाचनात किंवा ऐकण्यात येणारे असले तरी वाचक भागवत यांच्या सोबत शेवटपर्यंत टिकून राहतो हे त्यांनी केलेल्या विश्लेषणाचं सर्वांत मोठं यश आहे. आणि त्यामुळेच की काय पुस्तक वाचून झाल्यानंतर महाभारतातील या पात्रांसोबतच इतरही पात्रांविषयी आणखी जाणून घेण्याची आपली इच्छा होत राहते.

पहिलं प्रकरण आहे महाभारतातील अतिशय गूढ आणि केंद्रस्थानी असणारं व्यक्तिमत्व अर्थातच कृष्णाचं! "पूर्णपुरुष कृष्ण" या प्रकरणात भागवत यांनी कृष्णाच्या जन्मापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत प्रत्येक घटनेची, अवस्थेची आणि कृष्णाने घेतलेल्या बऱ्याच निर्णयांची संगत मांडली आहे. आयुष्यातील एक अवस्था अथवा घटना घडून गेल्यानंतर वास्तवाचे भान ठेवून त्या होऊन गेलेल्या गोष्टींकडे कधीही मागे न वळून पाहणाऱ्या कृष्णामुळेच खरंतर महाभारताचं कथानक वेगाने पुढं सरकतं. कृष्णाच्या प्रत्येक कृतीतून भागवत यांनी मानवी जीवनाचे सत्य मांडलं आहे. पुढे "मोहरीतील ठिणगी" या प्रकरणातून द्रोणाचार्यांचं एक वेगळंच रूप आपल्यासमोर येतं. गुरुदक्षिणेच्या नावाखाली एकलव्यासारख्या अर्जुनापेक्षा सरस धनुर्धराचे पंख छाटणारे द्रोण, अर्जुन आणि इतर शिष्यांपासून लपवून आपल्या मुलाला अधिकचं शिक्षण देणारे द्रोण आपल्याला विचार करायला लावतात. या प्रकरणातून द्रोणाचार्यांच्या मनात निपजलेला हिनतेचा एक वेगळाच पैलू आपल्या समोर येतो. द्रुपदाकडून झालेला अपमान, आपला लहान मुलगा अश्वत्थाम्याचं दुधासाठी होणारं हाल अशा आपल्यासोबत घडलेल्या काही घटनांतून द्रोणाचार्यांच्या स्वभावात होणारं परिवर्तन मानवी आयुष्यालासुद्धा तंतोतंत लागू होतं. द्रोणाचार्यांच्या या स्वभावामुळे जे दु:ख एकलव्याच्या वाट्याला आलं, जी भळभळती जखम घेऊन आजही अश्वत्थामा वणवण भटकतोय त्याला जबाबदार असणारे द्रोणाचार्य आयुष्यात कधीच सफल होत नाहीत. एक गुरू किंवा पिता म्हणून ते नेहमीच कुठे ना कुठे कमी पडतात. द्रोणाचार्यांचं हेच अतिशय किचकट असं पात्र भागवत यांनी थोड्या वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने वाचकांसमोर आणलं आहे. द्रोणाचार्यांच्या अशा स्वभावाचा अश्वत्थाम्याच्या आयुष्यावर होणारा परिणाम "कोंडलेले क्षितिज" या तिसऱ्या प्रकरणात दिसतो. अतिशय पराक्रमी असूनही अश्वत्थामा महाभारतात एकप्रकारे चोहोबाजूंनी कोंडलेलं आयुष्यच जगला. स्वतःमध्ये असणाऱ्या शक्तीचा अंदाज नसणारा, आपली बुद्धी नेहमी अयोग्य मार्गानेच चालवणारा, पराक्रमी असूनही नेहमी वाईट गोष्टींमध्येच ज्याच्या नावाचा उल्लेख होतो, अंध मातापित्यांच्या लाडात वाढलेला दुर्योधन "व्यक्तिरेखा हरवलेला माणुस" या प्रकरणातून स्वतःची एक वेगळी ओळख घेऊन येतो. दुर्योधनाचा परममित्र, सर्व असूनही सर्वांत एकाकी असणाऱ्या, कुंतेय असूनही सुतपुत्र म्हणवणाऱ्या कर्णाच्या जीवनाचा आढावा भागवत यांनी "एकाकी" या चौथ्या प्रकरणातून घेतला आहे. कर्ण आपल्यासमोर आणत असताना कर्णाने केलेल्या चुका आणि त्या चुकांचा त्याच्या आयुष्यावर झालेला परिणाम वाचकाला खूप काही शिकवून जातो. परंतु अशा चुकांसोबतच कर्णाची दुसरी बाजूही भागवत सांगायला विसरत नाहीत. कृष्णाने अगदी द्रौपदीचा मोह दाखविला तरी तो दुर्योधनाशी असलेल्या आपल्या मैत्रीच्या वचनाला जागतो. तर दुसऱ्या बाजूला स्वतःचे संरक्षण करणारी कवचकुंडले दान करून स्वतःचा दानशूरपणा सिद्ध करतो. कवचकुंडलांशिवाय आपल्यासोबतच आपल्या परममित्राचा पराभव होणं अटळ आहे हे माहीत असूनही कर्ण मागे हटत नाही. अस्सल हिऱ्याची लकाकी असणारा कर्ण शेवटपर्यंत "एकाकीच" राहतो. "परिकथेतून वास्तवाकडे" या प्रकरणातून भागवतांनी अर्जुनाचे व्यक्तिमत्व मांडलं आहे. कुंतिचा पुत्र, पांडवातला उत्कृष्ट धनुर्धर, द्रौपदीचा प्रियकर, कृष्णाचा प्राणसखा अशा अर्जुनाच्या पारंपरिक व्यक्तीमत्वाला छेद देणारं हे या प्रकरणातील विश्लेषण! पांडवांचा जेष्ठ बंधू, वचनाला जागणाऱ्या, धर्माने आणि न्यायाने वागणाऱ्या युधिष्ठिराची प्रतिमा व्यासांनी महाभारतात ज्या पद्धतीने रंगवली आहे त्या प्रतिमेला छेद देणारं विश्लेषण भागवत यांनी केलं आहे "मुक्त पथिक" मधून. पूर्णत्वाचा भोक्ता असणारा युधिष्ठिर पांडवांच्या प्रत्येक क्रियेमागे जाणवतो. कधी तो प्रोत्साहक म्हणून तर कधी न पटणाऱ्या गोष्टींचा विरोधक म्हणून. कौरव आणि पांडव या दोघांनाही आदरणीय असणारं महाभारतातील एक भारदार व्यक्तिमत्त्व म्हणजे 'भीष्म'! "अश्रु हरवल्यावर" या प्रकरणात भीष्माबद्दलचं विश्लेषण केलेलं आहे. या प्रकरणातून इतर पात्रांपेक्षा असणारी भीष्माची उंची सतत जाणवत राहते. भीष्मासोबतच महाभारतातील आणखी एक दुर्लक्षित पात्र विदुर, भागवतांनी ज्याचं विश्लेषण केलं आहे "माणसांत विरलेला माणूस" या प्रकरणात. एकाच पित्याची संतान असुनही दासीपुत्र म्हणूनच आयुष्य काढणाऱ्या विदुराने सत्याची कास शेवटपर्यंत सोडली नाही. पुस्तकातील शेवटचं प्रकरण आहे द्रौपदीचं! खरंतर "कामिनी" या नावावरून सुरुवातीला काहीच बोध न होणाऱ्या या प्रकरणातून भागवतांनी द्रौपदीची कथा आणि व्यथा दोन्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे. द्रौपदी हे महाभारतातील एक असं पात्र आहे की जिचे दु:ख कधीच कळूनही मांडता येत नाही. सर्वकाही मिळुनही शेवटी रिकामी झोळी घेऊन जिवंतपणीच जळत रहाणारी जणू ही एक शापित स्त्रीच!

महाभारतावर लिहिलेल्या बऱ्याच चिंतनपर पुस्तकांपैकी आवर्जून वाचावं असं एक पुस्तक "व्यासपर्व"!





संदीप प्रकाश जाधव

Thursday, March 10, 2022

"रक्तरंजीत वढू - तुळापूर"

 



लेखक : आण्णासाहेब चव्हाण

प्रकाशक : मावळा प्रकाशन

पृष्ठे- १५२, मूूल्य- २२० रुपये                                                                           


२३ नोव्हेंबर २०१३, या तारखेला मी पहिल्यांदा तुळापूरला जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतरही आजतागायत बऱ्याच वेळा महाराजांच्या समाधी दर्शनाचा योग आला पण पहिल्या वेळच्या दर्शनाचा हा दिवस माझ्या आजही अगदी लख्खपणे आठवणीत असण्याचं कारण म्हणजे त्यावेळी झालेली माझी अवस्था! शिवाजी सावंत यांची संभाजी महाराजांवर लिहिलेली "छावा" ही अजरामर कादंबरी नुकतीच मी वाचून पूर्ण केली होती त्यामुळे तुळापूरमधे पाय ठेवताच कादंबरीतील बरेच प्रसंग डोळ्यासमोर यायला लागले, खासकरून संभाजी महाराजांचे औरंगजेबाच्या छावणीतील तुळापूर मधील ते शेवटचे भयानक दिवस! जगाच्या इतिहासात असा एकमेव राजा असेल ज्याने आपल्या पित्याचं स्वप्न पुढं नेण्यासाठी इतका भयानक मृत्यू स्वीकारला! डोक्यात घुमत असलेल्या याच विचारात जेव्हा समाधीला स्पर्श करून मी हात जोडले तेव्हा एकाचवेळी अंगावर शहारे, डोळ्यात पाणी आणि उरात प्रचंड अभिमान अशी माझी अवस्था झाली होती. आयुष्यात पहिल्यांदाच आलेल्या या अशा अनुभवाने तो दिवस कायमचाच माझ्या मनात कोरला गेला. तुळापूरला जाऊन आल्यानंतर महाराष्ट्रातील लाखो लोकांप्रमाणे मलाही काही प्रश्न सतत अस्वस्थ करत होते ते म्हणजे मुकर्रबखानाने संभाजी महाराजांना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर या ठिकाणी पकडल्यानंतर तिथून जवळपास ३०० किलोमीटर दूरवर असणाऱ्या तुळापूरलाच का आणि कसं आणलं असावं? तेही आजूबाजूला मराठयांचं राज्य असताना! संगमेश्वरमधून अटक करून महाराजांना प्रथम बहादूरगड आणि तिथून नंतर ११० किलोमीटरचा प्रवास करून तुळापूरला आणलं गेलं. असं का? औरंगजेबासारख्या अतिशय धूर्त माणसाने संभाजी महाराजांची हत्या करण्यासाठी वढू-तुळापूर या गावाचीच निवड का केली असावी? वास्तविक तुळापूर म्हणजे भिमा-भामा-इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावरील हिंदूंचे एक पवित्र तीर्थक्षेत्र, मुसलमानी साम्राज्याच्या कोणत्याही खाणा-खुणा नसलेलं, कोणताही गड किंवा किल्ला आसपास नसलेलं ठिकाण. मराठ्यांच्या राजाला मारण्यासाठी औरंगजेबाने याच जागेची निवड का केली असावी? संभाजी महाराजांना तुळापूर सारख्या ठिकाणी अशी क्रूर शिक्षा देण्यामागे औरंगजेबाचा आणखीही काही हेतू असावा का? संभाजी महाराजांना पकडून देण्यात स्वराज्यातील आणखी कोण कोण सामील होते? त्याकाळी तुळापूरचं स्वराज्यात काय स्थान होतं? तुळापूरचा इतिहास काय असावा? या सर्व प्रश्नांसोबतच छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी केलेल्या बलिदानाच्या अनुषंगाने जे काही इतरही अनेक प्रश्न आपल्या मनात असतील त्याची उत्तरे आण्णासाहेब चव्हाण यांच्या "रक्तरंजीत वढू-तुळापूर" या पुस्तकातून आपल्याला मिळू शकतील. एकूण ३० प्रकरणे आणि १५८ पानांच्या "रक्तरंजीत वढू-तुळापूर" या पुस्तकातून आण्णासाहेब चव्हाण यांनी अगदी मुद्देसूदपणे वढू-तुळापूरचा रक्तरंजीत इतिहास वाचकासमोर मांडला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकाली जाण्याने पोरकं झालेलं स्वराज्य आपण सहज जिंकून घेऊ म्हणून मोठ्या दिमाखात दख्खनेत उतरलेल्या दिल्लीपती बादशाहला तब्बल ८ वर्षांपेक्षा जास्त काळ झुंजवत ठेऊन एकही किल्ला हाती लागू न देणारा सिंहाचा छावा जेव्हा मोगलांनी फंदफितुरीने पकडला तेव्हा औरंगजेबाला जणू आकाशच ठेंगणं झालं असणार हे नक्की. परंतु खरं तर हीच औरंजेबाच्या आणि मोगलाईच्या शेवटाची सुरुवात होती. स्वराज्यहितासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास तयार नसलेल्या छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाने ज्या पद्धतीने हत्या केली त्यातूनच उडालेल्या ठिणगीने पुढच्या २७ वर्षांत असं रौद्र रूप धारण केलं ज्यामधे आख्खी मोगलाई जळून खाक झाली. जे दख्खन घ्यायचं स्वप्न उराशी घेऊन औरंजेब दक्षिणेत आला होता त्याच स्वप्नासह तो या जमिनीत गाडला गेला. म्हणूनच कोणत्याही नेतृत्वाशिवाय मराठ्यांनी दिलेला हा लढा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. मराठ्यांच्या या देदीप्यमान लढ्याची ठिणगी ज्या जागी पडली ती दोन गावं म्हणजे "वढू-तुळापूर"! 'फाल्गुन वद्य अमावस्या ११ मार्च १६८९, हिंदू नववर्ष पाडव्याची पूर्वसंध्या' हाच तो स्वराज्याच्या इतिहासातील काळा दिवस जेव्हा औरंगजेबाने संभाजी महाराजांची "वढू-तुळापूर"मधे हत्या केली. पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्व असलेल्या तुळापूरमधील भीमा-भामा-इंद्रायणीचा त्रिवेणी संगम हा या क्रूर हत्येचा साक्षीदार ठरला. याच नदीच्या काठावर वसलेल्या वढू बु. या गावात संभाजी महाराज आणि कवी कलश या दोघांनाही नंतर अग्नी देण्यात आला. आण्णासाहेब चव्हाणांच्या या पुस्तकाची सुरुवात होते "वढू-तुळापूर"च्या प्राचीन इतिहासाने. पुढे एक-एक प्रकारणांमधून त्यांनी संभाजी महाराजांच्या तुळापूरातील हत्येपूर्वी आणि त्यानंतरही घडलेल्या बऱ्याच घटनांचा अगदी मुद्देसूद मागोवा घेतला आहे. तुळापूरचं हिंदू संस्कृतीमधील ऐतिहासिक महत्त्व सांगत असतानाच पंडित मुरारी जगदेवचं मोगलांना सामील असणं, शहाजी राजांचा इतिहास आणि त्यांचं तुळापूरशी असणारं नातं, निजामशाहीचा शेवट, शिवाजी महाराजांचा दरारा, कवी कलश आणि संभाजी महाराजांचं नातं, गणोजी शिर्के आणि त्याने मोगलांना स्वराज्याविरोधात केलेली मदत, पकडल्यानंतर महाराज आणि कवी कलशांची काढलेली धिंड, बहादूरगडावरून वढू-तुळापूरला जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी औरंगजेबाने फितूर मराठा सरदारांशी केलेली चर्चा, हत्येनंतर मोगलांकडून संभाजी महाराजांच्या प्रेताची केलेली चेष्टा, वढू-तुळापूरच्या गावकऱ्यांनी संभाजी महाराज आणि कवी कलशांना मृत्यूनंतर दिलेला अग्नी, त्यानंतर पेटून उठलेल्या मराठयांनी उघडलेल्या अनेक आघाड्या, संताजींची मोगलांवर पसरलेली दहशद आणि त्यांनी थेट औरंगजेबाच्या छावणीवर केलेला हल्ला, संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून तुळापूरला येऊन आपल्या वडिलांच्या समाधीची केली गेलेली बांधणी, होळकर घरण्याकडून तुळापूरातील शिवमंदिरांचा झालेला जीर्णोद्धार, संभाजी महाराजांच्या समाधीखालील ताम्रपत्रांचा अनुवाद, क्रूरकर्मा औरंगजेबाविषयी थोडक्यात माहिती आणि शेवटी शंभुवंदना यांसारख्या अनेक विषयांना स्पर्श करत आण्णासाहेब चव्हाण यांनी अतिशय वाचनीय पुस्तक आपल्यासमोर आणलं आहे.

प्रत्येकाने एकवेळ अवश्य वाचावं असं पुस्तक "रक्तरंजीत वढू तुळापूर"!





संदीप प्रकाश जाधव

Sunday, March 6, 2022

"द अल्केमिस्ट"

 



लेखक : पाउलो कोएलो

प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन

मराठी अनुवाद :नितीन कोत्तापल्ले

पृष्ठे- १६०, मूूल्य- १३० रुपये


पाउलो कोएलो यांची प्रचंड खपली गेलेली, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमधे नोंद असणारी ही अजरामर कादंबरी वाचनात आलेल्या लाखो वाचकांप्रमाणेच या कादंबरीसाठी माझीही पहिली प्रतिक्रिया एकच असेल ती म्हणजे "एक अतिशय अप्रतिम कादंबरी"!

"द अल्केमिस्ट" या नावाचा मराठी अर्थ "किमयागार"!

स्वप्ने तर सगळेच पाहतात पण त्यांचा पाठलाग करून ती पूर्णत्त्वास नेणारे मोजकेच असतात. याचं कारण म्हणजे त्या स्वप्नांचा जास्त विचार न करता ती तशीच सोडून दिली जातात. बऱ्याच वेळा आपल्याला त्या स्वप्नांच्या जवळ जाण्याचे मार्ग समोर असूनही दिसत नाहीत आणि आपलं भविष्य सुधारण्याची संधी आपण गमावून बसतो. कधी कधी जी गोष्ट आपल्याला खूप लांब आहे असं वाटतं ती प्रत्यक्षात आपल्या खूप जवळ असते, गरज असते ती फक्त तिला ओळखण्याची. "कोणत्याही खजिन्याचा शोध हा बाहेर नाही तर स्वतःमधेच घेतला पाहिजे", "स्वतःमधील खजिन्याचा शोध घेत असताना, वेळोवेळी समोर येणारी प्रतीकं आणि शकुन-अपशकुन यांचं भान ठेवून आपली स्वप्ने साकार करण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे" असा अतिशय सुंदर संदेश देणारी ही कादंबरी आहे. मूळ पोर्तुगीज भाषेत लिहिल्या गेलेल्या या कादंबरीचे ५५ पेक्षा अधिक भाषांमधे अनुवाद झालेले आहेत आणि त्यातीलच नितीन कोत्तापल्ले यांनी केलेल्या मराठी अनुवादित कादंबरीचा हा थोडक्यात परिचय! 

कथेचा नायक आहे स्पेनमधील 'सॅंतियागो' नावाचा एक मेंढपाळ! शिकलेला असूनही भटकंतीच्या माध्यमातून जग पाहता यावं, निरनिराळे अनुभव घेता यावेत म्हणून घरच्यांचा विरोध झुगारून रानोमाळ भटकणाऱ्या मेंढपाळाचा पेशा स्वीकारणारा असा हा सॅंतियागो. रानोमाळ भटकत असला तरी नव-नवीन पुस्तके घेऊन आपल्या पुस्तक वाचनाची हौस जपणारा हा कथेचा नायक. असेच एकदा भटकंतीदरम्यान पडक्या चर्चमधील त्याच्या एका मुक्कामात या कथेची सुरुवात होते. चर्चमधील उगवणारी ती पहाट त्याच्या आयुष्यातील पुढच्या संघर्षाची चाहूल घेऊन येते. पहाटे उठल्यानंतर त्याच्या एक गोष्ट लक्षात येते की काही दिवसांपासून आपल्याला एकाच प्रकारचं, एका खजिन्याबद्दलचं स्वप्न सतत पडत आहे. वारंवार पडणाऱ्या या स्वप्नाचा अर्थ जाणून घेण्यासाठी तरीफा नावाच्या गावातील एका वृद्ध स्त्रीला भेटण्याचा निर्णय तो घेतो. त्या वृद्ध स्त्रीकडून त्याला त्याच्या स्वप्नात दिसणारा खजिना इजिप्तमधे पिरॅमिडजवळ मिळेल असं सांगितलं जातं. इथून सुरुवात होते त्याच्या खजिन्याच्या दिशेने होणाऱ्या प्रवासाची! ज्या प्रवासातून नायकासोबतच वाचकही खूप काही शिकत जातो. आता इजिप्तला कसं जायचं? त्यासाठी लागणाऱ्या पैशांची जुळणा कशी करायची? या विचारात असतानाच त्याची एका वृद्ध माणसासोबत भेट होते, जो खरंतर वेषांतर करुन फिरणारा सालेमचा राजा असतो. राजासोबत चर्चा करत असताना, त्याच्याकडून मिळालेल्या तत्त्वज्ञानाने सॅंतियागोची आपल्या स्वप्नाचा पाठलाग करण्याची इच्छा आणखीनच प्रबळ होते. राजाकडून त्याला इजिप्तला जाण्यासाठी प्रोत्साहन मिळते. नंतर इजिप्तला जायचा रस्ता आणि नायकाला निर्णय घेण्यात मदत करू शकतील अशा दोन रत्नांच्या बदल्यात सॅंतियागोच्या मेंढ्यांच्या कळपाचा १० वा हिस्सा राजा ठेऊन घेतो. उरलेल्या मेंढ्या आपल्या मित्राला विकून आलेल्या पैशातून सॅंतियागोची इजिप्तच्या दिशेने वाटचाल चालू होते.

इजिप्तच्या वाटेवरील सॅंतियागोचा पहिला टप्पा असतो आफ्रिकेतील टॅंजिअर, जिथे तो होडीने पोहचतो! इथे नायकाच्या प्रवासाची सुरुवातच त्याला मिळणाऱ्या एका धक्क्याने होते जेव्हा त्याला मदत करण्याचे खोटे आमिष दाखवून एकजण त्याच्याकडील सर्व रक्कम घेऊन पळून जातो. आपल्या स्वप्नाचा पाठलाग करताना मिळालेल्या या पहिल्याच धक्क्याने खचून न जाता सॅंतियागो आफ्रिकेतच एका काचसामानाच्या दुकानात नोकरीस लागतो. स्वतःच्या हुशारीने दुकानातल्या वस्तूंचा खप वाढवतो, आपल्या कामाने दुकानदाराचे मन जिंकून एका वर्षातच इजिप्तच्या प्रवासापुरते पैसे कमवून तो पुन्हा आपल्या स्वप्नाचा पाठलाग चालू करायचं ठरवतो. इजिप्तला जाणारा रस्ता आफ्रिकेच्या वाळवंटातून जात असल्याने काचसामानाचे व्यापारी तांडे जे वाळवंटातून प्रवास करत असतात त्यांच्याबरोबर जायचं तो नक्की करतो. दुसऱ्या टप्प्यात वाळवंटातील या जीवघेण्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी त्याची भेट होते किमयागाराच्या शोधासाठी अल फय्यूम मरुद्यानाकडे निघालेल्या रसायनशास्त्राचा अभ्यासक असणाऱ्या एका इंग्लिश माणसासोबत. वाळवंटातील दीर्घ प्रवासात नायकाची त्या इंग्लिश माणसासोबत विविध गोष्टींवर  होणारी चर्चा वाचत असताना वाचकसुद्धा कधी त्यांच्या प्रवासाचा भाग होऊन जातो हे त्याचं त्यालाही नाही समजत. वाळवंटातल्या प्रवासात सँतियागो वाळवंटाची आणि उंटांची भाषा तसेच शकुन-अपशकुन ओळखायला शिकतो. वाळवंटातील दोन जमातींमधे चाललेल्या युद्धात लपत-छपत हा तांडा मरुद्यानात पोहचतो जिथे युद्ध वर्ज्य असते. मरुद्यानात किमयागाराचा पत्ता शोधता असताना सँतियागोची भेट फातिमा नावाच्या तरुणीशी होते. फातिमाच्या प्रेमात आपलं स्वप्न विसरणाऱ्या नायकाला फातिमाच पुन्हा एकदा खजिना शोधण्याच्या त्याच्या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी प्रोत्साहित करते आणि तो परत येईपर्यंत त्याची वाट पाहण्याचं वचन देते. मरुद्यानातील सँतियागोच्या वास्तव्यादरम्यान घडलेल्या काही थरारक घटनांनंतर त्याची शेवटी किमयागारासोबत भेट होते. सँतियागोच्या हुशारीचा, धाडसाचा आणि विश्वाच्या अंतरात्म्याशी एकरुप होणा-या त्याच्या ह्रदयाचा प्रत्यय आल्यानंतर खुश होऊन किमयागार त्याला खजिन्याचा रस्ता दाखवण्याचे कबूल करतो आणि नायकसोबत प्रवास चालू करतो. प्रवासातील या तिसऱ्या टप्प्यात किमयागाराकडून त्याला जीवनाविषयक अनेक तत्वज्ञान शिकायला मिळतात आणि शेवटी सँतियागो जेव्हा त्याच्या ध्येयाच्या जवळ पोहचतो तेव्हा किमयागार त्याचा निरोप घेतो. प्रवासाचा हा अंतिम टप्पा सँतियागोला एकट्यानेच, स्वत:च्या ह्रदयावर विश्वास ठेऊन, शकुन-अपशकुन ओळखून पार करायचा असतो. तो पिरॅमिडपर्यंत पोहचतो का? तिथे पोहोचण्यासाठी त्याला आणखी कोण-कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो? पिरॅमिडजवळ त्याला त्याच्या स्वप्नात दिसणारा खजिना सापडतो का? परत तो त्याच्या मायदेशी येतो की मरुद्यानात फातिमासोबतच राहतो? या व अशा इतरही प्रश्नांची उत्तरे आपल्याला कादंबरीच्या शेवटी मिळतील आणि त्यासाठी या कादंबरीचा अतिशय रंजक प्रवास आपल्याला वाचायला लागेल.

कादंबरीचा शेवट आपल्याला ‘तुझं आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी’ या तुकोबांच्या अभंगातील ओळीची आठवण करून देतो. जीवनाला एक वेगळी दृष्टी देणारी आणि अंतर्मुख करणारी आवर्जून वाचावी अशी कादंबरी "द अल्केमिस्ट"!





संदीप प्रकाश जाधव




Sunday, February 27, 2022

"रारंग ढांग"



 लेखक : प्रभाकर पेंढारकर

प्रकाशक : मौज प्रकाशन

पृष्ठे- १६६, मूूल्य- २०० रुपये                                                                           


साधारणपणे ४५ वर्षांपूर्वी, आंध्रप्रदेशच्या सागरकिनाऱ्यावर घोंगावत आलेल्या एका राक्षसी चक्रीवादळाच्या तडाख्यात उडालेल्या हाहाकाराची विदारक कहाणी सांगणारी "चक्रीवादळ" ही प्रभाकर पेंढारकरकरांची कादंबरी काही दिवसांपूर्वी माझ्या वाचनात आली होती. "चक्रीवादळ"च्या माझ्या पुस्तक परिचयानंतर बऱ्याच लोकांनी पेंढारकरांची "रारंग ढांग" ही कादंबरी आवर्जून वाचण्यासाठी सुचवली. मधील काळात माझ्या 'To Read' च्या रांगेतील काही पुस्तके वाचून झाल्यानंतर शेवटी आज मधेच "रारंग ढांग" हातात घेतलं. १६६ पानांची आणि साधारण १ किंवा २ बैठकींतच वाचून पूर्ण होणारी, एका अतिशय वेगळ्या विषयावर बेतलेली ही कादंबरी वाचकाला ज्या जगात घेऊन जाते तिथून वाचक परत येतो तोच मुळी आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी बॉर्डरवर प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या जवनांप्रती अत्युच्च अभिमानान घेऊन! खरंतर पेंढारकरांनी वाचकाला या कादंबरीच्या माध्यमातून ज्या वातावरणात घेऊन गेलं आहे तिथून मानसिकदृष्ट्या बाहेर येण्यासाठी वाचकाला बराच वेळ लागतो इतका तो या कथेसोबत एकरूप होऊन जातो. "रारंग ढांग" या नावातच असणारं वेगळेपण कादंबरीच्या विषयातदेखील आहे. 'रारंग' हे भारताच्या ईशान्येकडील सीमेजवळ असलेलं एक गाव आहे आणि 'ढांग' म्हणजे तेथील स्थानिक भाषेत अतिशय उंच अशा डोंगराची कडा. या कादंबरीची कथा आहे अशाच हिमालयाच्या 'ढांगातील'! हिमालयातील पर्वतांच्या एवढ्या उंचीवर रस्ते बनवणारा जगात भारत हा असा बहुधा एकमेव देश असावा. रस्ते बनवण्याचं हे काम बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (Border Road Organization BRO) ही संस्था भारतीय सैन्याच्या अधिकाराखाली करते. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनकडून बांधण्यात येणाऱ्या अशाच एका उंच 'ढांगातील' रस्त्याच्या उभारणीचा अतिशय खडतर प्रवास पेंढारकरांनी आपल्यासमोर आणला आहे. एका बाजूला हिमालय आणि लहरी निसर्ग तर दुस-या बाजूला वेगवेगळी स्वभाव-वैशिष्ट्ये असलेली अनेक माणसं. मात्र ही सगळी माणसं एकाच जिद्दीची. निसर्गात आणि माणसांत रस्सीखेच आणि संघर्ष सातत्याने चालूच असतो. या कादंबरीत निसर्गासोबत संघर्ष करणाऱ्या अशाच माणसांची कथा गुंफली आहे. "रारंग ढांग"च्या कथेचा काळ स्वातंत्र्यानंतरचा आहे जेव्हा भारतात विविध पायाभूत सुविधा निर्माणाचे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले होते. त्यामुळे आताच्या काळाशी जर तुलना केली तर त्याकाळी हिमालयातील अशा उंच ठिकाणी रस्ते बांधण्यातील आव्हानाचा आपण सहज अंदाज बांधू शकतो. हिमालयाची ही उंची आणि हे काम माणसांनाच काय पण त्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रांनासुद्धा थकवते. कमी कमी होत जाणारा ऑक्सिजन, प्रचंड थंडी, लहरी निसर्ग, अचानक होणारे लँडस्लाईड एवढंच काय तर हिवाळ्यात रस्त्यांवर साठणारे बर्फ ह्या साऱ्या आव्हानांचा सामना करत चालणारं हे रस्तेबांधणीचं काम म्हणूनच अलौकिक असंच आहे. "ह्या प्रवासाला रिटर्न तिकीटच नाही, मग कसले निरोप समारंभ आणि कशाला ती सेंटीमेंट्सची ओझी खांद्यावरून वहायची?”, ”दोस्त इथे ८ दिवसांची रजा मिळणे मुश्किल. पण कायमची सुट्टी कधीच मंजूर झालेली असते”. "आदमी मरता है तो क्या रह जाता है?", राहते ती फक्त "यादगारी", "आठवण"! असे काही संवाद बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमधे काम करणारे जवान आणि त्यांच्यासोबतीला राबणारे 'लोकल लेबर' कोणत्या परिस्थितीत हे देशहिताचे काम करतात याची जाणीव करून देतात. मनाला भिडणाऱ्या कथेमुळे १९८१ साली प्रकाशित झालेल्या "रारंग ढांग"ची जादू आजही कायम आहे.

पेंढारकरांच्या या कथेचा नायक आहे विश्वनाथ मेहेंदळे. विश्वनाथसोबतच मेजर बंबा, कॅप्टन बहल, कॅप्टन नायर, कॅप्टन मिनू, कामगारांचा सरदार बहादूर, विश्वनाथला मुंबईत असताना आर्ट गॅलरीत भेटलेली तरुणी उमा, या सर्वच पात्रांनी कथेला रंग आणला आहे. तर, विश्वनाथ एक असा अभियंता जो मुंबईतील युनायटेड कन्स्ट्रक्शन या नावाजलेल्या कंपनीतील आपली अतिशय सुखासीन खासगी नोकरी सोडून हिमालयातील दुर्गम, सीमा भागातील रस्ते बांधणीच्या प्रकल्पासाठी सरकारी नोकरीवर रुजू होतो. हिमालयातील हे रस्ते प्रामुख्याने भारतीय सैन्याच्या दळणवळणाकरिता, सीमेच्या सुरक्षेसाठी आवश्यक असल्याने भारतीय सैन्यअधिकाऱ्यांचे या कामावर लक्ष आणि नियंत्रण असते. विश्वनाथ हा त्या प्रकापातील एक सिव्हिलियन अभियंता असल्याने बॉर्डरवरील लष्करी शिस्त बऱ्याच वेळा त्याच्या प्रामाणिक कामाआढ येते. प्रत्येक गोष्टीकडे फक्त लष्करी शिस्तीच्या भिंगातून न पाहता त्या गोष्टींना असणाऱ्या दुसऱ्या बाजूचा भावनिकदृष्ट्या विचार करून निर्णय घेणाऱ्या विश्वनाथचे लष्करी अधिकाऱ्यांसोबत वरचेवर खटके उडायला चालू होतात. आपण बांधत असलेल्या रस्त्यावर आपल्याच लोकांची स्मारके बांधायला लागू नयेत ही माफक अपेक्षा असणारा विश्वनाथ काही ठिकाणी लष्करी शिस्तीच्या विरोधात जाऊन काम करतो. याची दोन उदाहरणे म्हणजे त्याने सर्जेराव गायकवाड या जवानाच्या सुट्टीसाठी प्रसंगी मोठ्या अधिकाऱ्यांच्या मनाविरुद्ध केलेली धडपड आणि दुसरे उदाहरण 'ढांगातील' रस्ता जवळपास पूर्ण झाल्यानंतर, त्याची चाचणी चालू असताना अचानकच एक कडा कोसळून झालेल्या अपघातात सर्जेराव आणि काही कामगारांचा त्याखाली गाडून मृत्यू होतो, त्या धक्क्यानंतर विश्वनाथने घेतलेला एक अतिशय भावनिक निर्णय! विश्वनाथचा हा निर्णय एक माणूस म्हणून अगदी योग्य असला तरी लष्कराच्या शिस्तीत बसणारा नव्हता त्यामुळे त्याच्या या निर्णयामुळे त्याला लष्करी कारवाईला(कोर्ट मार्शल) सामोरं जावं लगतं. कोर्ट मार्शल दरम्यानच्या चौकशीत विश्वनाथ आपल्यावरील आरोप तर फेटाळतोच शिवाय 'ढांगातील' कडा कोसळल्यानंतर आपण असा लष्कराच्या शिस्तीत न बसणारा निर्णय का घेतला याचंही कारण कोर्टाला सांगतो. अशी कडा कोसळण्याची त्या जागेवर शक्यता आहे आणि त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे हे आधीच वरिष्ठांच्या लक्षात आणून देऊनही केवळ ते लष्करी शिस्तीत बसत नसल्याचं कारण देऊन त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं हे कोर्टात सांगत असताना मानवी प्रयत्न आणि लष्कराची शिस्त यातील भेदही तो स्पष्ट शब्दात परखडपणे मांडतो. दोन्ही बाजू ऐकून कोर्ट प्रत्यक्ष अपघात झालेल्या जागी विश्वनाथने नव्याने केलेल्या बांधकामाची पाहणी करते आणि एक चकीत करणारा निकाल देते. नंतर त्याची त्या अन्यायकारक आरोपांतून मुक्तता होते, पण त्याची लष्कराची सेवा संपुष्टात येते, त्याचा करार रद्द होतो आणि त्याला अतिशय खंत मनाने बॉर्डर वरील त्या गावातून बाहेर पडावं लागतं. कादंबरीच्या शेवटी रस्त्यात मृत्यू पावलेल्या जवानांच्या स्मृतिस्थळाला फुले वाहून परतीच्या वाटेवर प्रवास करणाऱ्या विश्‍वनाथची प्रतिमा वाचकांच्या नजरेसमोर बराच वेळ तरळत राहते. ही इतकी सहज-सुंदर वाटणारी कादंबरीची कथा वाचताना खरंतर आपण त्यात हरवून जातो. बऱ्याच घटना अंगावर शहारे आणतात तर कधी डोळ्यांत पाणी. पेंढारकरांनी या कथेतून उभा केलेला माणूस विरुद्ध निसर्ग, माणूस विरुद्ध माणूस आणि माणूस विरुद्ध तो स्वतः हा संघर्ष आपल्याला खूप काही शिकवून जातो. हिमालयाच्या कड्यांवर चालणारा हा संघर्ष वाचून झाल्यानंतर आपल्यासाठी बॉर्डरवर पहारा देणाऱ्या सैनिकांना वाचक मनोमन सलाम करतो यातच या कादंबरीचं खरं यश आहे म्हटलं तरी ते चुकीचं ठरू नये.

प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावी आणि आवर्जून वाचावी अशी कादंबरी "रारंग ढांग"!





संदीप प्रकाश जाधव



Sunday, February 13, 2022

"अभयारण्य"


 

लेखक : जयंत नारळीकर

प्रकाशक : मौज प्रकाशन

पृष्ठे- ९६, मूूल्य- १५० रुपये                                                                           

 

"यक्षांची देणगी" आणि "प्रेषित" नंतर बऱ्याच वर्षांनी जयंत नारळीकरांचं एखादं पुस्तक वाचायचा योग आला. नारळीकरांच्या वैज्ञानिक कादंबऱ्या नेहमीच वाचकाला एका वेगळ्या जगात घेऊन जातात आणि शेवटी वाचकाला विचारात पाडून नकळत भविष्यात येऊ घातलेल्या धोक्याचा इशाराही देतात. त्यांच्या प्रत्येक कादंबरीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कादंबरीतील विषयांमधे जाणवणारी त्यांची दूरदृष्टी! इतक्या वर्षांपूर्वी लिहिलेल्या त्यांच्या कादंबरीतील कथा आज वाचताना आपल्याला भविष्यात १००-२०० वर्षें पुढे घेऊन जातात. भविष्यातील त्या वातावरणात गेल्यानंतर वाचक बऱ्याच वेळा स्थब्ध होऊन जातो याचं कारण म्हणजे नारळीकरांनी कादंबरी लिहील्यापासून ते आज वर्तमानकाळात आपण वाचत असताना मधल्या काळात मानवाने जी प्रगती केली आहे त्या टप्प्यातील बऱ्याच घटना, माणसाच्या आयुष्यात झालेले बरेच बदल हे अगदी त्या कथांमधील घटनांशी साम्य दाखवतात. वाचत असताना अनेक वेळा आपण कथेतील घटना आज वर्तमानकाळाशी रिलेट करत राहतो. कथेत घडणाऱ्या इतरही घटनांप्रमाणे जर खरंच भविष्यात पृथ्वीवर काही घडलं तर काय? या विचाराने वाचकाच्या अंगावर नकळत शहारे येतात. नारळीकरांची "अभयारण्य" सुद्धा याच पठडीतील एक विज्ञान कादंबरी! "अभयारण्य" चा शब्दशः अर्थ जर पहायचा झाला तर तो म्हणजे एक असं ठिकाण जिथं राहणाऱ्या प्रत्येक प्राणिमात्राला 'अभय' असेल, त्यांच्या जीवाला कोणत्याच प्रकारचा धोका नसेल, प्रत्येक प्राणी जिथे मुक्त संचार करू शकेल आणि नेहमी एक संरक्षक कवच त्यांच्या भोवती राहिल. तर, पृथ्वी म्हणजे मनुष्यप्राण्यासाठी परग्रहवासीयांकडून निर्माण केलेलं एक "अभयारण्य"च समजून नारळीकरांनी लिहिलेली ही एक भन्नाट विज्ञान कादंबरी! अतिशय प्रगत परग्रहवासीयांकडून मानवाची उत्क्रांती कशी झाली याचा अभ्यास करण्यासाठी घातलेला हा पृथ्वीवरील अभयारण्याचा घाट. संपूर्ण मानवजातीवर नजर ठेवून तटस्थपणे मानवी उत्क्रांतीचा अभ्यास करत असताना जिथे जिथे गरज भासेल तिथे मानवाच्या नकळत त्याला मदत करणारे या कादंबरीतील परग्रहवासी! परंतु मानवी उत्क्रांतीच्या या प्रवासात एक वळण असं येतं जिथं प्रगतीच्या गोंडस नावाखाली माणसाने बनवलेली अण्वस्त्रेच पृथ्वीला विनाशाच्या टप्प्यावर घेऊन जातात. अशा वेळी तटस्थ राहणारे परग्रहवासी काय भूमिका घेतात? मानवी आयुष्यात सहसा कोणताच हस्तक्षेप न करणारे हे परग्रहवासी पृथ्वीला अर्थातच त्यांनी बनवलेल्या या "अभयारण्याला" वाचवण्यासाठी काय करतात? अण्वस्त्रांच्या या जीवघेण्या स्पर्धेचा शेवट काय? माणसाच्या प्रगतीला अंत आहे की नाही? या सर्वांची मनोरंजनात्मक पण तितकीच आपल्याला एक माणूस म्हणून विचार करायला लावणारी उत्तरे नारळीकरांच्या या "अभयारण्यातून" आपल्याला मिळतील. पृथ्वीवरील मानवी संस्कृती, पृथ्वीवर आपली वसाहत स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणारा आणखी एक परग्रह 'चटम-४' वरील परग्रहवासी आणि पृथ्वी या आपल्या "अभयारण्याचे" रक्षण करणारे परग्रहवासी यांच्यामधे झालेला छोटासा संघर्ष, अग्नीचा शोध लावणारा गुहामानव टंबू, दुसरे महायुध्द संपण्याच्या काळातील अमेरिका, व्हिक्टोरियन काळातील इंग्लंड, इ.स.पू. ४३० मधील विद्याकलांची समृध्द नगरी अथेन्स, अथेन्सचा प्लेग, कृषिसंस्कृतीचा उदय आणि विस्तार, विसाव्या शतकात जिवशास्त्राने मारलेली मुसंडी, रशियाने स्फुटनिक हा उपग्रह अवकाशात सोडल्यानंतर चालू झालेलं अंतराळयुग, वाढत्या स्पर्धेत संहारक शस्त्रांबरोबर वाढलेली माणसाची हिंसक सत्तालालसा या सर्वांना स्पर्शून नारळीकरांनी हे अतिशय भन्नाट असं "अभयारण्य" साकारलं आहे.

एक पृथ्वीवासी म्हणून जयंत नारळीकर आपल्याला या कादंबरीतून अस्वस्थ, अंतर्मुख करतात. शिवाय विश्वाच्या या अफाट पसार्‍यात पृथ्वी एक नगण्य बिंदू असली तरीही माणसाच्या हाती असलेल्या आतापर्यंतच्या खगोलशास्त्रीय पुराव्यानुसार पृथ्वीच हे एकमेव असं स्थान आहे जिथे सध्या जीवसृष्टी नांदत आहे आणि त्यामुळे या एकमेवाद्वितीय अशा आपल्या पृथ्वीचे रक्षण करण्याची जबाबदारी, पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकवून ठेवण्याची जबाबदारी माणसाचीच आहे हेसुद्धा आपल्याला पटवून देण्यात नारळीकर यशस्वी झाले आहेत.

प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी एक दर्जेदार विज्ञान कादंबरी  "अभयारण्य".





संदीप प्रकाश जाधव

Monday, February 7, 2022

"युद्धखोर अमेरिका"

 


लेखक : अतुल कहाते

प्रकाशक : रोहन प्रकाशन

पृष्ठे- ३३३, मूूल्य- ३४० रुपये                                                                           

 

अतुल कहाते यांच्या "अणुबॉम्ब" आणि "पॅलेस्टाईन - इस्रायल : एका अस्तित्वाचा संघर्ष" या दोन पुस्तकांनंतर त्यांचं आणखी एक दर्जेदार पुस्तक "युद्धखोर अमेरिका" आज वाचून काढलं. अतुल कहातेंच्या या तीनही पुस्तकांचं वैशिष्ट्य म्हणजे खोलात जाऊन त्यांनी या अतिशय किचकट विषयांवर केलेलं संशोधन आणि तितक्याच ओघवत्या भाषेत, वाचकाला सहजपणे समजेल अशा पद्धतीने पुस्तकात केलेली मांडणी! एक अतिशय प्रगत देश, जागतिक महासत्ता आणि लोकशाहीचा सर्वांत मोठा पुरस्कर्ता असा टेंभा मिरवणाऱ्या अमेरिकेचा खरा चेहरा "युद्धखोर अमेरिका" मधून आपल्या समोर येतो. अतुल कहातेंनी त्यांच्या या पुस्तकातील एकूण १६ प्रकरणांमधून अमेरिकेचा उदारमतवादीपणाचा बुरखा फाडून आपल्याला खऱ्या अमेरिकेची नव्याने ओळख करून दिली आहे. लोकशाहीवादी, खुल्या विचारांचा, संपन्न व समृद्ध देश अशी अमेरिकेची आपल्या मनात तयार आणारी प्रतिमा बदलायला अतुल कहातेंचं हे अभ्यासपूर्ण पुस्तक भाग पाडतं. स्वतःची प्रगती करण्यात गैर काहीच नाही पण ही प्रगती जर दुसऱ्याच्या पोटावर पाय देऊ होत असेल तर ती कवडीमोलाची ठरते. अमेरिकेचा हा प्रगतीचा डोलारा कसा लाखो लोकांच्या पोटावर पाय देऊन उभा राहिला आहे हे जाणून घ्यायचं असेल तर अतुल कहातेंचं हे पुस्तक "युद्धखोर अमेरिका" त्याला उत्तम पर्याय ठरू शकेल. आज युद्धखोर देश कोणता असा प्रश्न जर एखाद्याला विचारला तर एका क्षणाचाही उशीर न होता आपल्याला नावे मिळतील ती इराण, इराक, अफगाणिस्तान, उत्तर कोरिया, चीन या देशांची! पण जगातील सर्वांत युद्धखोर देश जर अमेरिका आहे असं कोणी बोललं तर आपला त्यावर चटकन विश्वास बसणं कठीणच, अमेरिकेसारखा देश युद्धखोर कसा असू शकतो? हा एकच प्रश्न आपल्या डोक्यात फेर धरून नाचू लागेल. अतुल कहातेंच्या "युद्धखोर अमेरिका" पुस्तकात आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल. स्वतःच्या देशाची साखरेची गरज भागवण्यासाठी उद्ध्वस्त केलेली हवाई बेटे. एका खासगी कंपनीमार्फत गिळंकृत केलेला हाँडुरस देश. आपल्या स्वार्थासाठी दहशतवाद्यांना पुरवलेली शस्त्रास्त्रं आणि बेचिराख केलेला अफगाणिस्तान. तेलाच्या राजकारणात देशोधडीला लावलेला इराण. व्हीएतनाममध्ये केलेला नरसंहार. विनाकारण घुसून सद्दामचा काढलेला काटा आणि त्यामधे उध्वस्त झालेला इराक. अशी अनेक उदाहरणे देता येतील जिथे आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेने ढवळाढवळ केली. कधी त्यांनी तिथली सरकारं उलथवून लावली तर कधी बंडखोरांना शस्त्रास्त्रसाठा पुरवला तर कधी थेट आक्रमणंच केली. या सर्वांतून अमेरिकेने अशा अनेक देशांत आपलं वर्चस्व नक्कीच प्रस्थापित केलं असेल पण या वर्चस्ववादात अशा प्रत्येक देशातील लाखो निरपराध सामान्य लोकांचा बळी गेला, लाखो कुटुंबे कायमची रस्त्यावर आली, स्वतःच्याच देशात लोकांना निर्वासित आयुष्य जगायला भाग पडलं, प्रगतीच्या वाटेवर असणारे काही देश पुन्हा एकदा काही दशके मागे निघून गेली. अशा एकूण १६ 'अमेरिकापीडित' देशांचा 'केस स्टडी' म्हणजे हे अतुल कहाते यांचं पुस्तक "युद्धखोर अमेरिका"!

या पुस्तकातील पहिले प्रकरण आहे 'हवाई बेटांचं"! बाहेरच्या जगाशी कोणताच संपर्क नसलेल्या या हवाई बेटांचा शोध लागला साधारपणे १७७८ मधे. या बेटांच्या शोधानंतर अमेरिकेने ही बेटे आपल्याच वर्चस्वाखाली ठेऊन या बेटांवरून व्यापार चालू केला. बेटावरील मूळ लोकांच्या भावनांचा कोणताच विचार न करता तेथील जमिनीचा आपल्याला हवा तसा वापर चालू करून, प्रगतीकडे वाटचाल करणाऱ्या आपल्या देशाची भविष्यातील साखरेची गरज ओळखून ही बेटे अक्षरशः उध्वस्त करण्याचं काम अमेरिकेने केलं. त्यानंतर "क्यूबा", "पोर्तो रिको", "फिलिपिन्स", "निकारागुआ", "हाँडुरस" अशा एकामागून एक देशांत अमेरिकेने ढवळाढवळ करून तेथील लोकांचं आयुष्य उध्वस्त करून टाकलं. त्यासाठी अमेरिकेकडून खेळले गेलेले राजकारणाचे वेगवेगळे डावपेच पुस्तकात वाचत असताना अमेरिकेबद्दल चीड निर्माण करतात. प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या अमेरिकेच्या अशा हस्तक्षेपापूर्वीची पार्श्वभूमी अतुल कहातेंनी अतिशय विस्तारत सांगितली आहे ज्यामुळे वाचकाला एका वेगळ्याच आंतरराष्ट्रीय राजकारणाची सफर घडून येते. नव्वदच्या दशकात अमेरिकेची जागतिक पातळीवरील इतर देशांतील ढवळाढवळ मोठ्या प्रमाणात आणि उघडपणे सर्वांना जाणवायला लागली. त्याचं मुख्य कारण संपूर्ण जगाला आवश्यक असणारं खनिज तेल ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे अशा आखाती देशांत तेलाभोवती चालू झालेलं राजकारण! शिवाय अमेरिकेला आव्हान देऊ शकेल अशा सोव्हिएत युनियनचे देखील केव्हाच तुकडे पडले होते! याच तेलाच्या राजकारणादरम्यान इस्लामी दहशतवादाच्या कथा लोकांच्या मनावर अतिशय नियोजनबद्धपणे बिंबवल्या गेल्या. दहशतवादाला आपला विरोध आहे, आपण लोकशाहीचे समर्थक आहोत असं म्हणणारी अमेरिकाच खरे तर या दहशतवादाला पडद्याआडून कसं खतपाणी घालत आलेय हे इथून पुढच्या प्रकरणांतून आपल्या लक्षात येते. पडद्याआडून दहशतवादी वृत्तीला पोसताना या आखाती देशांचं झालेलं खच्चीकरण आपल्या मनाला पीळ पाडतं. इराणमध्ये महमंद रझा शाहची सत्ता जाऊन आयातुल्ला खेमनीसारख्या कट्टरवादी माणसाची सत्ता आणण्यात अमेरिकेचाच हातभार होता हे इराणचे प्रकरण वाचत असताना समजते. शिवाय अमेरिकेच्या दुटप्पीपणाचे एक उदाहरणसुद्धा याच प्रकरणात वाचायला मिळेल. ते म्हणजे आपण कट्टरवादाच्या विरोधात आहोत हे जगाला दाखवून देण्यासाठी कोणत्याही देशाने इराणला शस्त्रास्त्रे विकू नये असं म्हणणारी अमेरिकाच इस्त्रायलच्या मदतीने इराणला शस्त्रास्त्रे विकत होती. दुसरे अशाच प्रकारचे उदाहरण म्हणजे इराण-इराक यांच्या युद्धाचं देता येईल. तेलाच्या राजकारणात चालू झालेल्या इराण-इराकच्या युद्धात अमेरिका एका बाजूला इराणला मदत करत राहिली आणि त्याच वेळी इराक या युद्धात हरणार नाही याचीही काळजी घेत राहिली. यादरम्यान अमेरिकेला आव्हान देणाऱ्या सद्दाम हुसेनचा खात्मा करण्यासाठी इराककडे अस्तित्वातच नसणाऱ्या आण्विक अस्त्रांचं कारण पुढे करून जगासाठी इराक धोकादायक आहे असं सांगत अमेरिकेने इराकला बेचिराख करून टाकलं ज्यातून इराक आजही उभा राहू शकला नाही. पुढे इतर मुस्लिम देशांसोबातच रशियावर आपलं वर्चस्व राखण्यासाठी अमेरिकेने जे राजकारण खेळले त्यातून अफगाणिस्तानात ओसामा बिन लादेनच्या अल-कायदाचा जन्म झाला. ज्याला पोसणं नंतर अमेरिकेच्याच कसं अंगाशी आलं हे ९/११ ला संपूर्ण जगाने पाहिलं. आपणच पोसलेला दहशतवाद जेव्हा स्वतःवरच उलटला तेव्हा अमेरिकेला थोडीफार जाग आली खरी पण आज हाच दहशतवाद संपूर्ण जगाची डोकेदुखी ठरतोय हे वास्तव आहे. अल-कायदाला संपवण्यासाठी अफगाणिस्तानात अमेरिकेने छेडलेल्या युद्धाने त्या देशाला इराकप्रमाणेच पुरतं उध्वस्त करून टाकलं. युद्धानंतर अमेरिकेने तिथून काढता पाय घेतल्यानंतर अफगाणिस्तानात सामान्य लोकांचं झालेलं हाल संपूर्ण जगाने टेलिव्हिजनवर पाहिले. परंतु प्रत्येक ठिकाणी जसे अपवाद असतात त्याप्रमाणे अमेरिकेच्या या अन्यायकारक आणि अमानवी कारवायांच्या इतिहासालादेखील एक अपवाद आहे. १६ विविध देशांत अमेरिकेने चालवलेल्या वर्चस्ववादी आणि दुटप्पी राजकारणात बहुतांशी देशांनी अमेरिकेपुढे गुडघे टेकले असले तरी क्युबाचा फिडेल कॅस्ट्रो अमेरिकेला पुरून उरला. क्युबा गिळंकृत करण्याचे अमेरिकेचे सर्व प्रयत्न कॅस्ट्रोने रशियाच्या मदतीने हाणून पाडले. अमेरिकेच्या वर्चस्ववादात भरडणाऱ्या आणि त्याला विरोध करण्याची इच्छा असणाऱ्या देशांसाठी क्युबाचा हा लढा प्रेरणादायी आहे. अतुल कहातेंनी ज्याप्रमाणे क्युबाचा हा लढा आपल्यासमोर आणला आहे तो वाचत असताना आपल्याला क्युबासारख्या या छोट्याशा देशाचा अभिमान वाटल्यावाचून राहत नाही.

अख्या जगात लोकशाही आणि शांतता प्रस्थापित करायचा मक्ता फक्त आपणच घेतला आहे अशा अविर्भावात वावरणाऱ्या अमेरिकेचं पडद्यामागचं राजकारण नेमकं याच्या विरोधी आहे. अमेरिकेच्या तोंडावरील हा बुरखा अतुल कहाते यांनी त्यांच्या या पुस्तकाच्या माध्यमातून फाडला आहे आणि नाण्याची दुसरी बाजू, जी अमेरिकेला जगातील सर्वांत युद्धखोर देश सिद्ध करते ती आपल्या पुढे आणली आहे.

आवर्जून वाचण्यासारखं अतुल कहातेंचं एक दर्जेदार पुस्तक "युद्धखोर अमेरिका"!





संदीप प्रकाश जाधव


Monday, January 31, 2022

"तडा"

 



 

लेखक : डॉ. एस. एल. भैरप्पा

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

मराठी अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी

पृष्ठे- २८६, मूूल्य- २८० रुपये


"तडा"! 

"तडा" मग तो एखाद्या वस्तूला जावो अगर नात्याला,  एकदा जर गेला तर परत सांधता येणं केवळ आणि केवळ अशक्यच! कितीही सांधण्याचा प्रयत्न केला तरी एक पुसटसं का असेना अंतर राहतंच.

एस. एल. भैरप्पा यांची याच नावाची, मराठी अनुवादित "तडा" ही कादंबरी नुकतीच वाचून पूर्ण झाली. 'स्त्री-स्वातंत्र्य आणि स्त्री-मुक्ती' यांचा आपल्या सोयीनुसार अर्थ लावून स्वतःसोबतच आपल्या जवळच्या लोकांचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या सुधारणावादी किंवा पुढारलेल्या स्त्रियांच्या मानसिकतेची विदारक कहाणी सांगणारी ही कादंबरी आहे! स्त्रियांच्या हक्कासाठी बनवलेल्या कायद्यांचा गैरवापर करून त्यांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत असताना एखादा कर्तृत्ववान पुरुष कसा देशोधडीला लागू शकतो याची विदारक कहाणी म्हणजे ही कादंबरी "तडा"! भैरप्पांनी लिहिलेल्या "आवरण", "साक्षी", "उत्तरकांड", "परिशोध" आणि "पारखा" अशा एकाहून एक दर्जेदार कादंबऱ्या वाचून झाल्यानंतर त्यांची "तडा" ही कादंबरी खूप उत्साहाने मी वाचायला घेतली होती पण खरं सांगायचं झालं तर या कादंबरीने तशी थोडी निराशाच केली. याचं सर्वांत महत्त्वाचं आणि एकमेव कारण म्हणजे त्यांनी सरसकट एकाच नजरेतून सुधारणावादी स्त्रीकडे पाहण्याचा केलेला प्रयत्न! जो कोणत्याही सुज्ञ वाचकाला नक्कीच खटकणारा आहे. पण ही एक गोष्ट थोडी बाजूला ठेऊन जर "तडा" कडे पहायचं झालं तर एस. एल. भैरप्पांचा या कादंबरीतील विषय एक समाज म्हणून आज आपल्याला खूप विचार करायला लावणारा आहे. काही मूठभर स्त्रियांच्या अशा या विदारक मानसिकतेमुळे भारतीय समाजजीवनाला जाऊ पाहणारा "तडा" रोखण्याचे महत्व अधोरेखित करणारी ही कादंबरी आहे! कधी फ्लॅशबॅक तर कधी वर्तमानकाळातून पुढे सरकणाऱ्या या कादंबरीच्या प्रवासातून भारतातील स्त्रीमुक्तीवादी विचारांच्या तीन स्त्रिया आणि त्यांच्या स्वार्थी कारवायांनी होरपळलेले त्यांचे स्वकीय तसेच अमेरिकेतील स्त्री-मुक्तीचे चटके खाल्लेल्या नचिकेत या भारतीय तरुणाचं आयुष्य भैरप्पांनी आपल्या समोर आणलं आहे. स्त्री-मुक्तीवादी विचारांच्या कारवायांनी त्रस्त-हैराण झालेल्या पुरुषाची कहाणी या कादंबरीच्या माध्यमातून आपल्यासमोर आणत असताना भैरप्पांनी स्त्रियांच्या या विदारक मानसिकतेची अक्षरशः चिरफाड केली आहे. त्यामुळे भैरप्पांच्या इतरही कादंबर्‍यांप्रमाणे या कादंबरीनेही कन्नड साहित्य विश्वात आणलेलं वादळ साहजिकच होतं. परंतु तथाकथित स्त्रीमुक्तीचा भयानक चेहरा दाखवणारी ही कादंबरी कितीही विवादास्पद असली, तरीही त्यातील अनेक प्रसंगांनी काही क्षण का असेना वाचक भैरप्पांच्या या विचाराशी सहमत होतो हे नक्की! कादंबरीतील हे प्रसंग समाजातील काही मोजक्याच वर्गाशी निगडित असल्याने स्त्रीमुक्तीच्या या सापळ्यात अडकून आयुष्य पोळलं गेलेल्या लोकांची संख्या तशीही फार मोठी नाही पण तरीही पाश्चात्य देशांप्रमाणे आपल्या समाजातील हे बदलणारे चित्र आपण नाकारू शकत नाही. स्त्रियांसाठी असलेल्या कायद्यांचा वापर तत्कालीन परिस्थितीनुसार स्त्रियांनी नक्कीच केला पाहिजे पण त्यातून आपल्या मजबूत कुटुंबव्यवस्थेला आणि समाजव्यवस्थतेला हादरे बसून "तडा" जाणार नाही याचीही काळजी घेण्याची आज गरज आहे याची जाणीव भैरप्पांनी वाचकाला त्यांच्या या "तडा"मधून करून दिली आहे. ही कादंबरी आणखी एका गोष्टीचा वाचकाला विचार करायला लावते ती म्हणजे सदोष कायदा व्यवस्थेमुळे समाजातील संसारांना जाणारा "तडा" जर रोखायचा असेल तर स्त्रीमुक्ती, स्त्रियांचे स्वातंत्र्य आणि समाजव्यवस्था याबद्दलचा विचार बदलत्या काळाचे भान ठेवूनच झाला पाहिजे. कायद्याचा धाक असावा पण अतिरेक असू नये! संपूर्ण कादंबरीमधे जरी स्त्रियांच्या या विदारक मानसिकतेमुळे पोळल्या जाणाऱ्या पुरुषांचं चित्रण भैरप्पांनी केलेलं असलं तरी अशा गोष्टींचा आघात जितका पुरुषांना बसतो त्यापेक्षा जास्त स्त्रियांनाही बसतो आणि बसत आलाय हेदेखील कादंबरीच्या शेवटी वाचकाला पटवून देण्यात भैरप्पा यशस्वी झाले आहेत. इर्षेच्या आणि रागाच्या भरात कायद्याच्या जोरावर मोडलेला संसार काही काळानंतर पुरुषासोबतच स्त्रीलासुद्धा पश्चातापाच्या खाईत लोटून देतो हेच "तडा" मधून सांगण्याचा प्रयत्न भैरप्पांनी केला आहे. 

खास भैरप्पांच्या लेखनासाठी नक्कीच वाचावी अशी कादंबरी "तडा"!





संदीप प्रकाश जाधव


Sunday, January 23, 2022

"काहून"

 




लेखक : अभिषेक कुंभार

प्रकाशक : NEW ERA पब्लिशिंग हाऊस

पृष्ठे- २४४, मूूल्य- ३०० रुपये                                                                           


पुस्तकाचा परिचय देण्यापूर्वी लेखक अभिषेक कुंभार यांना मनापासून धन्यवाद द्यावसं वाटतं कारण वैयक्तिकरित्या तरी माझ्यासाठी मराठ्यांचा हा पराक्रम अपरिचितच होता, ज्याबद्दल कधी कोणाकडून ऐकलंदेखील नव्हतं असा इतिहासातील हा मराठ्यांचा पराक्रम कादंबरीरूपात वाचत असताना आलेला अनुभव शब्दांत न सांगता येण्यासारखा असाच!!!


आता थोडंस पुस्तकाबद्दल.....

भारताचा इतिहास 'मराठ्यांच्या' उल्लेखाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. अशक्यप्राय असणाऱ्या हिंदवी स्वराज्य निर्मितीपासून ते अटकेपार झेंडा रोवून अखंड हिंदुस्थानभर आपलं राज्य स्थापन करणाऱ्या मराठा साम्राज्याचा इतिहास अनंत पराक्रमांनी भरलेला आहे. पण 'दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा' असं अभिमानाने बोलणाऱ्या आपल्यापैकी किती लोकांना 'पानिपतच्या' महासंग्रामाशिवाय मराठ्यांचे इतर पराक्रम माहित आहेत ही शंकाच आहे. आपलं दुर्दैव असं की तुकड्या-तुकड्यांनी लिहिल्या गेलेल्या मराठ्यांच्या या इतिहासातील फारच कमी आणि ठराविक गोष्टीच आज आपल्याला माहित आहेत. एक वेळ अशी होती की मराठ्यांच्या सल्ल्याशिवाय आणि मध्यस्थीशिवाय हिंदुस्थानातील कोणत्याही संस्थानचे काम होत नसे, कोणतंही राजकारण पूर्णत्वास जात नसे पण परिस्थिती हळूहळू बदलत गेली आणि मराठ्यांच्या अधिपत्याखालील एक-एक संस्थान सातासमुद्रापारहून आलेल्या मूठभर ब्रिटिशांनी आपल्या टाचेखाली घेतले. साधारणपणे १८१८ च्या दरम्यान ब्रिटिशांनी स्वराज्यातील जवळपास सर्वच किल्ले आपल्या ताब्यात घेतले. त्यांपैकीच एक किल्ला सिंहगड आणि त्याच्या पायथ्याशी असलेल्या 'कल्याण' या गावापासून या कादंबरीची कथा सुरू होते जी संपते तिथून शेकडो मैल दूर असणाऱ्या अफगाणिस्तानच्या सीमेवरील 'काहून' या ठिकाणी. एका अपरिचित ऐतिहासिक घटनेला कल्पनेची जोड देऊन पुस्तकबद्ध केलेला 'कल्याण'पासून ते 'काहून'पर्यंतचा प्रवास म्हणजेच ही कादंबरी "काहून"! मातृभूमीपासून शेकडो मैल दूर जाऊन, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मराठ्यांनी दिलेला "काहूनचा" हा लढा २४३ पानांमधून अभिषेक कुंभार यांनी ज्या पद्धतीने आपल्यासमोर उभा केला आहे तो वाचत असताना अंगावर येणारा काटा आणि शिवरायांच्या त्या मावळ्यांच्या अतुल्य पराक्रमाने होणारा अभिमान अशा दुहेरी अनुभवातून जाणारा वाचक कादंबरीच्या शेवटी भावनिक होऊन जातो. "काहून" ही एक सत्य युद्धकथा आहे जिचा संदर्भ इंग्रजी पत्रव्यवहारात सापडतो. काहूनच्या या युद्धाची आठवण म्हणून पुण्यातील एका रोडला ब्रिटिशांकडून दिलं गेलेलं 'काहून रोड' हे नावच आपल्याला मराठ्यांच्या त्या अपरिचित पराक्रमाची उंची सांगून जातं. या ऐतिहासिक घटनेबद्दल अतिषय कमी संदर्भ आणि साहित्य उपलब्ध असतानादेखील अभिषेक कुंभार यांनी या युद्धातील मराठा वीरांचा पराक्रम अतिशय सविस्तरपणे त्यांच्या कादंबरीतून मांडला आहे. कथेत गरजेनुसार काही काल्पनिक पात्रांचा समावेश लेखकांनी केला असला तरी या पराक्रमात कुठेही अतिशयोक्ती होऊ दिलेली नाही. काहूनसारख्या ठिकाणी फक्त मराठेच लढाई करू शकतात असं ब्रिटिशांना का वाटत होतं याचं उत्तरही आपल्याला कादंबरी वाचत असताना मिळून जाते. मूठभर मराठी सैनिकांनी हजारो अफगाणी टोळीवाल्यांसोबत केलेला संघर्ष आपल्याला अलीकडेच येऊन गेलेल्या 'केसरी' या चित्रपटाची आठवण करून देतो. इंग्रजांकडून लढलेल्या शीख जवानांचे 'केसरी' मधील हे युद्ध झाले होते साधारणपणे १८९७ मध्ये पण मराठ्यांनी लढलेली 'काहून'ची ही लढाई त्याच्याही आधी ५० वर्षें म्हणजे १८४० मधे लढली गेली होती. "काहून"मधील मराठ्यांचं युद्ध हे फक्त अफगाण टोळीवाल्यांसोबत नव्हतं तर मातृभूमीपासून शेकडो मैल दूर येऊन समोर उभी ठाकलेली अतिशय प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती आणि नियती यांच्याशीदेखील होतं. मराठ्यांच्या याच धगधगत्या पराक्रमाची ही अपरिचित शौर्य गाथा म्हणजे "काहून"!

एक मोठं साम्राज्य म्हणून उदयास येत असताना ब्रिटिशांचा जागतिक राजकारणातील दबदबा वाढत होता आणि याच जागतिक राजकारणाचा भाग म्हणून त्यांच्याकडून आखली गेलेली अफगाणिस्तान मोहिम म्हणजे "काहून"मधील मराठ्यांच्या पराक्रमाची सुरुवात! मातृभूमीच्या रक्षणासाठी पानिपतच्या महासंग्रामात ज्या अहमदशाह अब्दाली सोबत मराठे प्राणपणाने लढले त्याच अहमदशाहचा नातू शाह शूजा याला अफगाणिस्तानच्या गादीवर बसवण्यासाठी ब्रिटिशांनी उघडलेली ही मोहिम! स्वराज्यनिर्मितीपूर्वी आणि नंतरही मराठी सैनिकांनी आपल्या पराक्रमाने अनेक लढाया गाजवल्या, शासनकर्ते बदलत गेले पण मराठा तलवार आपल्या पराक्रमाने येणाऱ्या प्रत्येक दुश्मनाला पाणी पाजतच राहिली. म्हणूनच मराठी सैनिकांची ही ताकद जाणून असणाऱ्या ब्रटिशांची खात्री झाली होती की अफगाणिस्तानची ही अतिशय कठीण कामगिरी फक्त आणि फक्त मराठेच करू शकतात आणि त्यासाठी ब्रिटिशांनी आपल्या "बॉम्बे रेजिमेंट" अर्थातच "मराठा लाईफ इन्फंट्री"च्या तुकडीवर ही मोहिम सोपवली. अफगाणिस्तानच्या या मोहिमेत "मराठा लाईफ इन्फंट्री"कडून गझनी किल्ल्याचा पाडाव झाल्यानंतर ब्रिटिशांनी अहमदशाह अब्दालीचा नातू शाह शूजाला अफगाणिस्तानच्या गादीवर बसवले. पुढे या म्हाताऱ्या शाह शुजाला मदत करता यावी तसेच तेथील राजकारणात आपलाही वचक राहिला पाहिजे या हेतूने अफगाणिस्तानात सैन्य ठेवणं गरजेचं आहे याची जाणीव ब्रिटिशांना झाली. त्यामुळे या कामासाठी अफगाणिस्तानात येणाऱ्या आपल्या सैन्यास परतीच्या मार्गावर विसावा मिळावा म्हणून एका ठाण्याची असणारी आवश्यकता लक्षात घेऊन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बलुची टोळीवाल्यांच्या ताब्यात असणाऱ्या, अफगाणिस्तान सीमेवरील 'काहून' या गावाची निवड केली. गझनीचा पाडाव करताना सोबत असणाऱ्या मराठा सैनिकांच्या जीवावरच ही दुसरी "काहून" जिंकण्याची मोहिम आखली गेली. गझनी किल्ल्यापासून काहूनच्या गढी पर्यंतच्या मराठा सैन्याच्या खडतर प्रवासाचं लेखकांनी केलेलं वर्णन या मोहिमेत मराठ्यांच्यापुढे काय वाढून ठेवलं असेल याचा अंदाज देऊन जातं. उंचच उंच डोंगर, खोल दऱ्या, दिवसा आग ओकणारा सूर्य आणि रात्री हाडे गोठवणारी थंडी असा हा सैन्याचा प्रवास मजल-दरमजल करत "काहून"च्या गढीवर येऊन पोहचतो आणि सुरू होतो खरा संघर्ष! टोळीवाल्यांकडून "काहून"ची गढी तर सहजच ताब्यात येते पण मराठ्यांची खरी कसोटी लागते ती ही गढी राखण्यात! तब्बल ५ महिने अपुऱ्या अन्न, पाणी, दारुगोळा आणि मनुष्यबळाच्या जोरावर मराठे टोळीवाल्यांशी लढत राहतात. या ५ महिन्यांमध्ये युद्धाचे अनेक पदर अभिषेक कुंभार यांनी आपल्यासमोर उलगडून दाखवले आहेत. ५ महिने काहूनच्या पठारावर चाललेला हा थरार अंगावर शहारे आणतो. अखेर नाईलाजास्तव मराठ्यांना माघार घ्यावी लागते पण तोपर्यंत अफगाणी टोळ्यांमधे मराठ्यांच्या या शौर्याची अशी काही भीती पसरते की शेवटी होणाऱ्या तहात सर्व गोष्टी मराठ्यांच्या मनाप्रमाणेच पार पडतात आणि मातृभूमीपासून इतक्या दूर जाऊन दाखवलेल्या अतुल्य अशा पराक्रमानंतर सुरू होतो मराठ्यांचा काहून मधून परतीचा प्रवास! त्याच खडतर रस्त्यावरून!

प्रत्येकाने वाचलीच पाहिजे अशी मराठ्यांची अपरिचित शौर्यगाथा "काहून"!





संदीप प्रकाश जाधव







"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये सह्याद्रीचा श्वास आणि पेशवाईचा रक्तरंजित इतिहास: ना...