Saturday, March 19, 2022

"व्यासपर्व"

 



लेखक : दुर्गा भागवत

प्रकाशक : मौज प्रकाशन

पृष्ठे- १११, मूूल्य- १५० रुपये                                                                           

 

वाल्मिकींचं "रामायण" आणि व्यासांचं "महाभारत" ही भारतीय संस्कृतीतील महाकाव्येच! या दोन्हींकडे भारतीय इतिहास म्हणून बघा अथवा महाकाव्य, जितक्या वेळा यांचा अभ्यास केला जातो त्या प्रत्येक वेळी यांतून नवीन काहीतरी बोध होतोच. इरावती कर्वे यांचं "युगान्त" हे आधुनिक काळात झालेल्या संशोधनाच्या आधारे महाभारतातील पात्रांची नव्याने ओळख करून देणारं पुस्तक मी काही दिवसांपूर्वी वाचलं होतं. इरावती कर्वे यांनी कोणत्याही प्रकारचं देवपण न देता स्वतःच्या नजरेतून विश्लेषण करून प्रत्येक पात्राचं एक नवीनच रूप आपल्यासमोर उभं केलं आहे, जे वाचकाला विचारात पाडतं. आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा महाभारतातील पात्रांवरच लिहिलं गेलेलं "व्यासपर्व" हे दुर्गा भागवत यांचं पुस्तक वाचण्याचा योग आला. "युगान्त" आणि "व्यासपर्व" यांतील फरक सांगायचं म्हटलं तर "युगान्त"मधे कर्वे यांच्या नजरेतून महाभारतातील पात्रांची आपल्याला ओळख होते तर "व्यासपर्व" ही महर्षी व्यासांनी त्यांचं हे महाकाव्य लिहिण्यापूर्वी त्यातील पात्रांबद्दल काय विचार करून ती पात्रे या काव्यात उतरवली असतील हे भागवत यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. महाभारतातील पात्रांची असणारी पारंपारिक ओळख पुसून टाकणारा वेध त्यांनी या पुस्तकातून घेतला आहे. हे करत असताना दुर्गा भागवत यांनी महाभारतातील १० महत्वाच्या पात्रांना डोळ्यासमोर ठेऊन लिहिलेलं आहे. तसं पाहिलं तर महाभारतातील कोणत्याही पात्राकडे पाहिलं तर आपल्याला त्याच्याभोवती नेहमी एक वेगळंच वलय जाणवत राहतं. व्यासांनी त्यांच्या काव्यात प्रत्येक पात्राचा समावेश जणू काही खास कारणासाठीच केला आहे असं वाटावं इतकी ही सर्व पात्रे एकमेकांत गुंतलेली आहेत आणि हाच धागा पकडून दुर्गा भागवत यांनी काही ठराविक पात्रांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला आहे. कृष्ण,  द्रोणाचार्य, अश्वत्थामा, दुर्योधन, कर्ण, अर्जुन, युधिष्ठिर, भीष्म, विदुर आणि द्रौपदी या पात्रांची नव्याने ओळख करून देत असतानाच सोबत इतरही काही पात्रे जशी धृतराष्ट्र, नकुल, सहदेव यांचाही या काव्यातील समावेश कशासाठी असू शकतो हेदेखील थोडक्यात सांगितलं आहे. पुस्तकातील बरेचसे शब्द सामान्य वाचकांना प्रथमच वाचनात किंवा ऐकण्यात येणारे असले तरी वाचक भागवत यांच्या सोबत शेवटपर्यंत टिकून राहतो हे त्यांनी केलेल्या विश्लेषणाचं सर्वांत मोठं यश आहे. आणि त्यामुळेच की काय पुस्तक वाचून झाल्यानंतर महाभारतातील या पात्रांसोबतच इतरही पात्रांविषयी आणखी जाणून घेण्याची आपली इच्छा होत राहते.

पहिलं प्रकरण आहे महाभारतातील अतिशय गूढ आणि केंद्रस्थानी असणारं व्यक्तिमत्व अर्थातच कृष्णाचं! "पूर्णपुरुष कृष्ण" या प्रकरणात भागवत यांनी कृष्णाच्या जन्मापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत प्रत्येक घटनेची, अवस्थेची आणि कृष्णाने घेतलेल्या बऱ्याच निर्णयांची संगत मांडली आहे. आयुष्यातील एक अवस्था अथवा घटना घडून गेल्यानंतर वास्तवाचे भान ठेवून त्या होऊन गेलेल्या गोष्टींकडे कधीही मागे न वळून पाहणाऱ्या कृष्णामुळेच खरंतर महाभारताचं कथानक वेगाने पुढं सरकतं. कृष्णाच्या प्रत्येक कृतीतून भागवत यांनी मानवी जीवनाचे सत्य मांडलं आहे. पुढे "मोहरीतील ठिणगी" या प्रकरणातून द्रोणाचार्यांचं एक वेगळंच रूप आपल्यासमोर येतं. गुरुदक्षिणेच्या नावाखाली एकलव्यासारख्या अर्जुनापेक्षा सरस धनुर्धराचे पंख छाटणारे द्रोण, अर्जुन आणि इतर शिष्यांपासून लपवून आपल्या मुलाला अधिकचं शिक्षण देणारे द्रोण आपल्याला विचार करायला लावतात. या प्रकरणातून द्रोणाचार्यांच्या मनात निपजलेला हिनतेचा एक वेगळाच पैलू आपल्या समोर येतो. द्रुपदाकडून झालेला अपमान, आपला लहान मुलगा अश्वत्थाम्याचं दुधासाठी होणारं हाल अशा आपल्यासोबत घडलेल्या काही घटनांतून द्रोणाचार्यांच्या स्वभावात होणारं परिवर्तन मानवी आयुष्यालासुद्धा तंतोतंत लागू होतं. द्रोणाचार्यांच्या या स्वभावामुळे जे दु:ख एकलव्याच्या वाट्याला आलं, जी भळभळती जखम घेऊन आजही अश्वत्थामा वणवण भटकतोय त्याला जबाबदार असणारे द्रोणाचार्य आयुष्यात कधीच सफल होत नाहीत. एक गुरू किंवा पिता म्हणून ते नेहमीच कुठे ना कुठे कमी पडतात. द्रोणाचार्यांचं हेच अतिशय किचकट असं पात्र भागवत यांनी थोड्या वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने वाचकांसमोर आणलं आहे. द्रोणाचार्यांच्या अशा स्वभावाचा अश्वत्थाम्याच्या आयुष्यावर होणारा परिणाम "कोंडलेले क्षितिज" या तिसऱ्या प्रकरणात दिसतो. अतिशय पराक्रमी असूनही अश्वत्थामा महाभारतात एकप्रकारे चोहोबाजूंनी कोंडलेलं आयुष्यच जगला. स्वतःमध्ये असणाऱ्या शक्तीचा अंदाज नसणारा, आपली बुद्धी नेहमी अयोग्य मार्गानेच चालवणारा, पराक्रमी असूनही नेहमी वाईट गोष्टींमध्येच ज्याच्या नावाचा उल्लेख होतो, अंध मातापित्यांच्या लाडात वाढलेला दुर्योधन "व्यक्तिरेखा हरवलेला माणुस" या प्रकरणातून स्वतःची एक वेगळी ओळख घेऊन येतो. दुर्योधनाचा परममित्र, सर्व असूनही सर्वांत एकाकी असणाऱ्या, कुंतेय असूनही सुतपुत्र म्हणवणाऱ्या कर्णाच्या जीवनाचा आढावा भागवत यांनी "एकाकी" या चौथ्या प्रकरणातून घेतला आहे. कर्ण आपल्यासमोर आणत असताना कर्णाने केलेल्या चुका आणि त्या चुकांचा त्याच्या आयुष्यावर झालेला परिणाम वाचकाला खूप काही शिकवून जातो. परंतु अशा चुकांसोबतच कर्णाची दुसरी बाजूही भागवत सांगायला विसरत नाहीत. कृष्णाने अगदी द्रौपदीचा मोह दाखविला तरी तो दुर्योधनाशी असलेल्या आपल्या मैत्रीच्या वचनाला जागतो. तर दुसऱ्या बाजूला स्वतःचे संरक्षण करणारी कवचकुंडले दान करून स्वतःचा दानशूरपणा सिद्ध करतो. कवचकुंडलांशिवाय आपल्यासोबतच आपल्या परममित्राचा पराभव होणं अटळ आहे हे माहीत असूनही कर्ण मागे हटत नाही. अस्सल हिऱ्याची लकाकी असणारा कर्ण शेवटपर्यंत "एकाकीच" राहतो. "परिकथेतून वास्तवाकडे" या प्रकरणातून भागवतांनी अर्जुनाचे व्यक्तिमत्व मांडलं आहे. कुंतिचा पुत्र, पांडवातला उत्कृष्ट धनुर्धर, द्रौपदीचा प्रियकर, कृष्णाचा प्राणसखा अशा अर्जुनाच्या पारंपरिक व्यक्तीमत्वाला छेद देणारं हे या प्रकरणातील विश्लेषण! पांडवांचा जेष्ठ बंधू, वचनाला जागणाऱ्या, धर्माने आणि न्यायाने वागणाऱ्या युधिष्ठिराची प्रतिमा व्यासांनी महाभारतात ज्या पद्धतीने रंगवली आहे त्या प्रतिमेला छेद देणारं विश्लेषण भागवत यांनी केलं आहे "मुक्त पथिक" मधून. पूर्णत्वाचा भोक्ता असणारा युधिष्ठिर पांडवांच्या प्रत्येक क्रियेमागे जाणवतो. कधी तो प्रोत्साहक म्हणून तर कधी न पटणाऱ्या गोष्टींचा विरोधक म्हणून. कौरव आणि पांडव या दोघांनाही आदरणीय असणारं महाभारतातील एक भारदार व्यक्तिमत्त्व म्हणजे 'भीष्म'! "अश्रु हरवल्यावर" या प्रकरणात भीष्माबद्दलचं विश्लेषण केलेलं आहे. या प्रकरणातून इतर पात्रांपेक्षा असणारी भीष्माची उंची सतत जाणवत राहते. भीष्मासोबतच महाभारतातील आणखी एक दुर्लक्षित पात्र विदुर, भागवतांनी ज्याचं विश्लेषण केलं आहे "माणसांत विरलेला माणूस" या प्रकरणात. एकाच पित्याची संतान असुनही दासीपुत्र म्हणूनच आयुष्य काढणाऱ्या विदुराने सत्याची कास शेवटपर्यंत सोडली नाही. पुस्तकातील शेवटचं प्रकरण आहे द्रौपदीचं! खरंतर "कामिनी" या नावावरून सुरुवातीला काहीच बोध न होणाऱ्या या प्रकरणातून भागवतांनी द्रौपदीची कथा आणि व्यथा दोन्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे. द्रौपदी हे महाभारतातील एक असं पात्र आहे की जिचे दु:ख कधीच कळूनही मांडता येत नाही. सर्वकाही मिळुनही शेवटी रिकामी झोळी घेऊन जिवंतपणीच जळत रहाणारी जणू ही एक शापित स्त्रीच!

महाभारतावर लिहिलेल्या बऱ्याच चिंतनपर पुस्तकांपैकी आवर्जून वाचावं असं एक पुस्तक "व्यासपर्व"!





संदीप प्रकाश जाधव

Thursday, March 10, 2022

"रक्तरंजीत वढू - तुळापूर"

 



लेखक : आण्णासाहेब चव्हाण

प्रकाशक : मावळा प्रकाशन

पृष्ठे- १५२, मूूल्य- २२० रुपये                                                                           


२३ नोव्हेंबर २०१३, या तारखेला मी पहिल्यांदा तुळापूरला जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतरही आजतागायत बऱ्याच वेळा महाराजांच्या समाधी दर्शनाचा योग आला पण पहिल्या वेळच्या दर्शनाचा हा दिवस माझ्या आजही अगदी लख्खपणे आठवणीत असण्याचं कारण म्हणजे त्यावेळी झालेली माझी अवस्था! शिवाजी सावंत यांची संभाजी महाराजांवर लिहिलेली "छावा" ही अजरामर कादंबरी नुकतीच मी वाचून पूर्ण केली होती त्यामुळे तुळापूरमधे पाय ठेवताच कादंबरीतील बरेच प्रसंग डोळ्यासमोर यायला लागले, खासकरून संभाजी महाराजांचे औरंगजेबाच्या छावणीतील तुळापूर मधील ते शेवटचे भयानक दिवस! जगाच्या इतिहासात असा एकमेव राजा असेल ज्याने आपल्या पित्याचं स्वप्न पुढं नेण्यासाठी इतका भयानक मृत्यू स्वीकारला! डोक्यात घुमत असलेल्या याच विचारात जेव्हा समाधीला स्पर्श करून मी हात जोडले तेव्हा एकाचवेळी अंगावर शहारे, डोळ्यात पाणी आणि उरात प्रचंड अभिमान अशी माझी अवस्था झाली होती. आयुष्यात पहिल्यांदाच आलेल्या या अशा अनुभवाने तो दिवस कायमचाच माझ्या मनात कोरला गेला. तुळापूरला जाऊन आल्यानंतर महाराष्ट्रातील लाखो लोकांप्रमाणे मलाही काही प्रश्न सतत अस्वस्थ करत होते ते म्हणजे मुकर्रबखानाने संभाजी महाराजांना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर या ठिकाणी पकडल्यानंतर तिथून जवळपास ३०० किलोमीटर दूरवर असणाऱ्या तुळापूरलाच का आणि कसं आणलं असावं? तेही आजूबाजूला मराठयांचं राज्य असताना! संगमेश्वरमधून अटक करून महाराजांना प्रथम बहादूरगड आणि तिथून नंतर ११० किलोमीटरचा प्रवास करून तुळापूरला आणलं गेलं. असं का? औरंगजेबासारख्या अतिशय धूर्त माणसाने संभाजी महाराजांची हत्या करण्यासाठी वढू-तुळापूर या गावाचीच निवड का केली असावी? वास्तविक तुळापूर म्हणजे भिमा-भामा-इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावरील हिंदूंचे एक पवित्र तीर्थक्षेत्र, मुसलमानी साम्राज्याच्या कोणत्याही खाणा-खुणा नसलेलं, कोणताही गड किंवा किल्ला आसपास नसलेलं ठिकाण. मराठ्यांच्या राजाला मारण्यासाठी औरंगजेबाने याच जागेची निवड का केली असावी? संभाजी महाराजांना तुळापूर सारख्या ठिकाणी अशी क्रूर शिक्षा देण्यामागे औरंगजेबाचा आणखीही काही हेतू असावा का? संभाजी महाराजांना पकडून देण्यात स्वराज्यातील आणखी कोण कोण सामील होते? त्याकाळी तुळापूरचं स्वराज्यात काय स्थान होतं? तुळापूरचा इतिहास काय असावा? या सर्व प्रश्नांसोबतच छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी केलेल्या बलिदानाच्या अनुषंगाने जे काही इतरही अनेक प्रश्न आपल्या मनात असतील त्याची उत्तरे आण्णासाहेब चव्हाण यांच्या "रक्तरंजीत वढू-तुळापूर" या पुस्तकातून आपल्याला मिळू शकतील. एकूण ३० प्रकरणे आणि १५८ पानांच्या "रक्तरंजीत वढू-तुळापूर" या पुस्तकातून आण्णासाहेब चव्हाण यांनी अगदी मुद्देसूदपणे वढू-तुळापूरचा रक्तरंजीत इतिहास वाचकासमोर मांडला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकाली जाण्याने पोरकं झालेलं स्वराज्य आपण सहज जिंकून घेऊ म्हणून मोठ्या दिमाखात दख्खनेत उतरलेल्या दिल्लीपती बादशाहला तब्बल ८ वर्षांपेक्षा जास्त काळ झुंजवत ठेऊन एकही किल्ला हाती लागू न देणारा सिंहाचा छावा जेव्हा मोगलांनी फंदफितुरीने पकडला तेव्हा औरंगजेबाला जणू आकाशच ठेंगणं झालं असणार हे नक्की. परंतु खरं तर हीच औरंजेबाच्या आणि मोगलाईच्या शेवटाची सुरुवात होती. स्वराज्यहितासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास तयार नसलेल्या छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाने ज्या पद्धतीने हत्या केली त्यातूनच उडालेल्या ठिणगीने पुढच्या २७ वर्षांत असं रौद्र रूप धारण केलं ज्यामधे आख्खी मोगलाई जळून खाक झाली. जे दख्खन घ्यायचं स्वप्न उराशी घेऊन औरंजेब दक्षिणेत आला होता त्याच स्वप्नासह तो या जमिनीत गाडला गेला. म्हणूनच कोणत्याही नेतृत्वाशिवाय मराठ्यांनी दिलेला हा लढा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. मराठ्यांच्या या देदीप्यमान लढ्याची ठिणगी ज्या जागी पडली ती दोन गावं म्हणजे "वढू-तुळापूर"! 'फाल्गुन वद्य अमावस्या ११ मार्च १६८९, हिंदू नववर्ष पाडव्याची पूर्वसंध्या' हाच तो स्वराज्याच्या इतिहासातील काळा दिवस जेव्हा औरंगजेबाने संभाजी महाराजांची "वढू-तुळापूर"मधे हत्या केली. पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्व असलेल्या तुळापूरमधील भीमा-भामा-इंद्रायणीचा त्रिवेणी संगम हा या क्रूर हत्येचा साक्षीदार ठरला. याच नदीच्या काठावर वसलेल्या वढू बु. या गावात संभाजी महाराज आणि कवी कलश या दोघांनाही नंतर अग्नी देण्यात आला. आण्णासाहेब चव्हाणांच्या या पुस्तकाची सुरुवात होते "वढू-तुळापूर"च्या प्राचीन इतिहासाने. पुढे एक-एक प्रकारणांमधून त्यांनी संभाजी महाराजांच्या तुळापूरातील हत्येपूर्वी आणि त्यानंतरही घडलेल्या बऱ्याच घटनांचा अगदी मुद्देसूद मागोवा घेतला आहे. तुळापूरचं हिंदू संस्कृतीमधील ऐतिहासिक महत्त्व सांगत असतानाच पंडित मुरारी जगदेवचं मोगलांना सामील असणं, शहाजी राजांचा इतिहास आणि त्यांचं तुळापूरशी असणारं नातं, निजामशाहीचा शेवट, शिवाजी महाराजांचा दरारा, कवी कलश आणि संभाजी महाराजांचं नातं, गणोजी शिर्के आणि त्याने मोगलांना स्वराज्याविरोधात केलेली मदत, पकडल्यानंतर महाराज आणि कवी कलशांची काढलेली धिंड, बहादूरगडावरून वढू-तुळापूरला जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी औरंगजेबाने फितूर मराठा सरदारांशी केलेली चर्चा, हत्येनंतर मोगलांकडून संभाजी महाराजांच्या प्रेताची केलेली चेष्टा, वढू-तुळापूरच्या गावकऱ्यांनी संभाजी महाराज आणि कवी कलशांना मृत्यूनंतर दिलेला अग्नी, त्यानंतर पेटून उठलेल्या मराठयांनी उघडलेल्या अनेक आघाड्या, संताजींची मोगलांवर पसरलेली दहशद आणि त्यांनी थेट औरंगजेबाच्या छावणीवर केलेला हल्ला, संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून तुळापूरला येऊन आपल्या वडिलांच्या समाधीची केली गेलेली बांधणी, होळकर घरण्याकडून तुळापूरातील शिवमंदिरांचा झालेला जीर्णोद्धार, संभाजी महाराजांच्या समाधीखालील ताम्रपत्रांचा अनुवाद, क्रूरकर्मा औरंगजेबाविषयी थोडक्यात माहिती आणि शेवटी शंभुवंदना यांसारख्या अनेक विषयांना स्पर्श करत आण्णासाहेब चव्हाण यांनी अतिशय वाचनीय पुस्तक आपल्यासमोर आणलं आहे.

प्रत्येकाने एकवेळ अवश्य वाचावं असं पुस्तक "रक्तरंजीत वढू तुळापूर"!





संदीप प्रकाश जाधव

Sunday, March 6, 2022

"द अल्केमिस्ट"

 



लेखक : पाउलो कोएलो

प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन

मराठी अनुवाद :नितीन कोत्तापल्ले

पृष्ठे- १६०, मूूल्य- १३० रुपये


पाउलो कोएलो यांची प्रचंड खपली गेलेली, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमधे नोंद असणारी ही अजरामर कादंबरी वाचनात आलेल्या लाखो वाचकांप्रमाणेच या कादंबरीसाठी माझीही पहिली प्रतिक्रिया एकच असेल ती म्हणजे "एक अतिशय अप्रतिम कादंबरी"!

"द अल्केमिस्ट" या नावाचा मराठी अर्थ "किमयागार"!

स्वप्ने तर सगळेच पाहतात पण त्यांचा पाठलाग करून ती पूर्णत्त्वास नेणारे मोजकेच असतात. याचं कारण म्हणजे त्या स्वप्नांचा जास्त विचार न करता ती तशीच सोडून दिली जातात. बऱ्याच वेळा आपल्याला त्या स्वप्नांच्या जवळ जाण्याचे मार्ग समोर असूनही दिसत नाहीत आणि आपलं भविष्य सुधारण्याची संधी आपण गमावून बसतो. कधी कधी जी गोष्ट आपल्याला खूप लांब आहे असं वाटतं ती प्रत्यक्षात आपल्या खूप जवळ असते, गरज असते ती फक्त तिला ओळखण्याची. "कोणत्याही खजिन्याचा शोध हा बाहेर नाही तर स्वतःमधेच घेतला पाहिजे", "स्वतःमधील खजिन्याचा शोध घेत असताना, वेळोवेळी समोर येणारी प्रतीकं आणि शकुन-अपशकुन यांचं भान ठेवून आपली स्वप्ने साकार करण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे" असा अतिशय सुंदर संदेश देणारी ही कादंबरी आहे. मूळ पोर्तुगीज भाषेत लिहिल्या गेलेल्या या कादंबरीचे ५५ पेक्षा अधिक भाषांमधे अनुवाद झालेले आहेत आणि त्यातीलच नितीन कोत्तापल्ले यांनी केलेल्या मराठी अनुवादित कादंबरीचा हा थोडक्यात परिचय! 

कथेचा नायक आहे स्पेनमधील 'सॅंतियागो' नावाचा एक मेंढपाळ! शिकलेला असूनही भटकंतीच्या माध्यमातून जग पाहता यावं, निरनिराळे अनुभव घेता यावेत म्हणून घरच्यांचा विरोध झुगारून रानोमाळ भटकणाऱ्या मेंढपाळाचा पेशा स्वीकारणारा असा हा सॅंतियागो. रानोमाळ भटकत असला तरी नव-नवीन पुस्तके घेऊन आपल्या पुस्तक वाचनाची हौस जपणारा हा कथेचा नायक. असेच एकदा भटकंतीदरम्यान पडक्या चर्चमधील त्याच्या एका मुक्कामात या कथेची सुरुवात होते. चर्चमधील उगवणारी ती पहाट त्याच्या आयुष्यातील पुढच्या संघर्षाची चाहूल घेऊन येते. पहाटे उठल्यानंतर त्याच्या एक गोष्ट लक्षात येते की काही दिवसांपासून आपल्याला एकाच प्रकारचं, एका खजिन्याबद्दलचं स्वप्न सतत पडत आहे. वारंवार पडणाऱ्या या स्वप्नाचा अर्थ जाणून घेण्यासाठी तरीफा नावाच्या गावातील एका वृद्ध स्त्रीला भेटण्याचा निर्णय तो घेतो. त्या वृद्ध स्त्रीकडून त्याला त्याच्या स्वप्नात दिसणारा खजिना इजिप्तमधे पिरॅमिडजवळ मिळेल असं सांगितलं जातं. इथून सुरुवात होते त्याच्या खजिन्याच्या दिशेने होणाऱ्या प्रवासाची! ज्या प्रवासातून नायकासोबतच वाचकही खूप काही शिकत जातो. आता इजिप्तला कसं जायचं? त्यासाठी लागणाऱ्या पैशांची जुळणा कशी करायची? या विचारात असतानाच त्याची एका वृद्ध माणसासोबत भेट होते, जो खरंतर वेषांतर करुन फिरणारा सालेमचा राजा असतो. राजासोबत चर्चा करत असताना, त्याच्याकडून मिळालेल्या तत्त्वज्ञानाने सॅंतियागोची आपल्या स्वप्नाचा पाठलाग करण्याची इच्छा आणखीनच प्रबळ होते. राजाकडून त्याला इजिप्तला जाण्यासाठी प्रोत्साहन मिळते. नंतर इजिप्तला जायचा रस्ता आणि नायकाला निर्णय घेण्यात मदत करू शकतील अशा दोन रत्नांच्या बदल्यात सॅंतियागोच्या मेंढ्यांच्या कळपाचा १० वा हिस्सा राजा ठेऊन घेतो. उरलेल्या मेंढ्या आपल्या मित्राला विकून आलेल्या पैशातून सॅंतियागोची इजिप्तच्या दिशेने वाटचाल चालू होते.

इजिप्तच्या वाटेवरील सॅंतियागोचा पहिला टप्पा असतो आफ्रिकेतील टॅंजिअर, जिथे तो होडीने पोहचतो! इथे नायकाच्या प्रवासाची सुरुवातच त्याला मिळणाऱ्या एका धक्क्याने होते जेव्हा त्याला मदत करण्याचे खोटे आमिष दाखवून एकजण त्याच्याकडील सर्व रक्कम घेऊन पळून जातो. आपल्या स्वप्नाचा पाठलाग करताना मिळालेल्या या पहिल्याच धक्क्याने खचून न जाता सॅंतियागो आफ्रिकेतच एका काचसामानाच्या दुकानात नोकरीस लागतो. स्वतःच्या हुशारीने दुकानातल्या वस्तूंचा खप वाढवतो, आपल्या कामाने दुकानदाराचे मन जिंकून एका वर्षातच इजिप्तच्या प्रवासापुरते पैसे कमवून तो पुन्हा आपल्या स्वप्नाचा पाठलाग चालू करायचं ठरवतो. इजिप्तला जाणारा रस्ता आफ्रिकेच्या वाळवंटातून जात असल्याने काचसामानाचे व्यापारी तांडे जे वाळवंटातून प्रवास करत असतात त्यांच्याबरोबर जायचं तो नक्की करतो. दुसऱ्या टप्प्यात वाळवंटातील या जीवघेण्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी त्याची भेट होते किमयागाराच्या शोधासाठी अल फय्यूम मरुद्यानाकडे निघालेल्या रसायनशास्त्राचा अभ्यासक असणाऱ्या एका इंग्लिश माणसासोबत. वाळवंटातील दीर्घ प्रवासात नायकाची त्या इंग्लिश माणसासोबत विविध गोष्टींवर  होणारी चर्चा वाचत असताना वाचकसुद्धा कधी त्यांच्या प्रवासाचा भाग होऊन जातो हे त्याचं त्यालाही नाही समजत. वाळवंटातल्या प्रवासात सँतियागो वाळवंटाची आणि उंटांची भाषा तसेच शकुन-अपशकुन ओळखायला शिकतो. वाळवंटातील दोन जमातींमधे चाललेल्या युद्धात लपत-छपत हा तांडा मरुद्यानात पोहचतो जिथे युद्ध वर्ज्य असते. मरुद्यानात किमयागाराचा पत्ता शोधता असताना सँतियागोची भेट फातिमा नावाच्या तरुणीशी होते. फातिमाच्या प्रेमात आपलं स्वप्न विसरणाऱ्या नायकाला फातिमाच पुन्हा एकदा खजिना शोधण्याच्या त्याच्या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी प्रोत्साहित करते आणि तो परत येईपर्यंत त्याची वाट पाहण्याचं वचन देते. मरुद्यानातील सँतियागोच्या वास्तव्यादरम्यान घडलेल्या काही थरारक घटनांनंतर त्याची शेवटी किमयागारासोबत भेट होते. सँतियागोच्या हुशारीचा, धाडसाचा आणि विश्वाच्या अंतरात्म्याशी एकरुप होणा-या त्याच्या ह्रदयाचा प्रत्यय आल्यानंतर खुश होऊन किमयागार त्याला खजिन्याचा रस्ता दाखवण्याचे कबूल करतो आणि नायकसोबत प्रवास चालू करतो. प्रवासातील या तिसऱ्या टप्प्यात किमयागाराकडून त्याला जीवनाविषयक अनेक तत्वज्ञान शिकायला मिळतात आणि शेवटी सँतियागो जेव्हा त्याच्या ध्येयाच्या जवळ पोहचतो तेव्हा किमयागार त्याचा निरोप घेतो. प्रवासाचा हा अंतिम टप्पा सँतियागोला एकट्यानेच, स्वत:च्या ह्रदयावर विश्वास ठेऊन, शकुन-अपशकुन ओळखून पार करायचा असतो. तो पिरॅमिडपर्यंत पोहचतो का? तिथे पोहोचण्यासाठी त्याला आणखी कोण-कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो? पिरॅमिडजवळ त्याला त्याच्या स्वप्नात दिसणारा खजिना सापडतो का? परत तो त्याच्या मायदेशी येतो की मरुद्यानात फातिमासोबतच राहतो? या व अशा इतरही प्रश्नांची उत्तरे आपल्याला कादंबरीच्या शेवटी मिळतील आणि त्यासाठी या कादंबरीचा अतिशय रंजक प्रवास आपल्याला वाचायला लागेल.

कादंबरीचा शेवट आपल्याला ‘तुझं आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी’ या तुकोबांच्या अभंगातील ओळीची आठवण करून देतो. जीवनाला एक वेगळी दृष्टी देणारी आणि अंतर्मुख करणारी आवर्जून वाचावी अशी कादंबरी "द अल्केमिस्ट"!





संदीप प्रकाश जाधव




Sunday, February 27, 2022

"रारंग ढांग"



 लेखक : प्रभाकर पेंढारकर

प्रकाशक : मौज प्रकाशन

पृष्ठे- १६६, मूूल्य- २०० रुपये                                                                           


साधारणपणे ४५ वर्षांपूर्वी, आंध्रप्रदेशच्या सागरकिनाऱ्यावर घोंगावत आलेल्या एका राक्षसी चक्रीवादळाच्या तडाख्यात उडालेल्या हाहाकाराची विदारक कहाणी सांगणारी "चक्रीवादळ" ही प्रभाकर पेंढारकरकरांची कादंबरी काही दिवसांपूर्वी माझ्या वाचनात आली होती. "चक्रीवादळ"च्या माझ्या पुस्तक परिचयानंतर बऱ्याच लोकांनी पेंढारकरांची "रारंग ढांग" ही कादंबरी आवर्जून वाचण्यासाठी सुचवली. मधील काळात माझ्या 'To Read' च्या रांगेतील काही पुस्तके वाचून झाल्यानंतर शेवटी आज मधेच "रारंग ढांग" हातात घेतलं. १६६ पानांची आणि साधारण १ किंवा २ बैठकींतच वाचून पूर्ण होणारी, एका अतिशय वेगळ्या विषयावर बेतलेली ही कादंबरी वाचकाला ज्या जगात घेऊन जाते तिथून वाचक परत येतो तोच मुळी आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी बॉर्डरवर प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या जवनांप्रती अत्युच्च अभिमानान घेऊन! खरंतर पेंढारकरांनी वाचकाला या कादंबरीच्या माध्यमातून ज्या वातावरणात घेऊन गेलं आहे तिथून मानसिकदृष्ट्या बाहेर येण्यासाठी वाचकाला बराच वेळ लागतो इतका तो या कथेसोबत एकरूप होऊन जातो. "रारंग ढांग" या नावातच असणारं वेगळेपण कादंबरीच्या विषयातदेखील आहे. 'रारंग' हे भारताच्या ईशान्येकडील सीमेजवळ असलेलं एक गाव आहे आणि 'ढांग' म्हणजे तेथील स्थानिक भाषेत अतिशय उंच अशा डोंगराची कडा. या कादंबरीची कथा आहे अशाच हिमालयाच्या 'ढांगातील'! हिमालयातील पर्वतांच्या एवढ्या उंचीवर रस्ते बनवणारा जगात भारत हा असा बहुधा एकमेव देश असावा. रस्ते बनवण्याचं हे काम बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (Border Road Organization BRO) ही संस्था भारतीय सैन्याच्या अधिकाराखाली करते. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनकडून बांधण्यात येणाऱ्या अशाच एका उंच 'ढांगातील' रस्त्याच्या उभारणीचा अतिशय खडतर प्रवास पेंढारकरांनी आपल्यासमोर आणला आहे. एका बाजूला हिमालय आणि लहरी निसर्ग तर दुस-या बाजूला वेगवेगळी स्वभाव-वैशिष्ट्ये असलेली अनेक माणसं. मात्र ही सगळी माणसं एकाच जिद्दीची. निसर्गात आणि माणसांत रस्सीखेच आणि संघर्ष सातत्याने चालूच असतो. या कादंबरीत निसर्गासोबत संघर्ष करणाऱ्या अशाच माणसांची कथा गुंफली आहे. "रारंग ढांग"च्या कथेचा काळ स्वातंत्र्यानंतरचा आहे जेव्हा भारतात विविध पायाभूत सुविधा निर्माणाचे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले होते. त्यामुळे आताच्या काळाशी जर तुलना केली तर त्याकाळी हिमालयातील अशा उंच ठिकाणी रस्ते बांधण्यातील आव्हानाचा आपण सहज अंदाज बांधू शकतो. हिमालयाची ही उंची आणि हे काम माणसांनाच काय पण त्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रांनासुद्धा थकवते. कमी कमी होत जाणारा ऑक्सिजन, प्रचंड थंडी, लहरी निसर्ग, अचानक होणारे लँडस्लाईड एवढंच काय तर हिवाळ्यात रस्त्यांवर साठणारे बर्फ ह्या साऱ्या आव्हानांचा सामना करत चालणारं हे रस्तेबांधणीचं काम म्हणूनच अलौकिक असंच आहे. "ह्या प्रवासाला रिटर्न तिकीटच नाही, मग कसले निरोप समारंभ आणि कशाला ती सेंटीमेंट्सची ओझी खांद्यावरून वहायची?”, ”दोस्त इथे ८ दिवसांची रजा मिळणे मुश्किल. पण कायमची सुट्टी कधीच मंजूर झालेली असते”. "आदमी मरता है तो क्या रह जाता है?", राहते ती फक्त "यादगारी", "आठवण"! असे काही संवाद बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमधे काम करणारे जवान आणि त्यांच्यासोबतीला राबणारे 'लोकल लेबर' कोणत्या परिस्थितीत हे देशहिताचे काम करतात याची जाणीव करून देतात. मनाला भिडणाऱ्या कथेमुळे १९८१ साली प्रकाशित झालेल्या "रारंग ढांग"ची जादू आजही कायम आहे.

पेंढारकरांच्या या कथेचा नायक आहे विश्वनाथ मेहेंदळे. विश्वनाथसोबतच मेजर बंबा, कॅप्टन बहल, कॅप्टन नायर, कॅप्टन मिनू, कामगारांचा सरदार बहादूर, विश्वनाथला मुंबईत असताना आर्ट गॅलरीत भेटलेली तरुणी उमा, या सर्वच पात्रांनी कथेला रंग आणला आहे. तर, विश्वनाथ एक असा अभियंता जो मुंबईतील युनायटेड कन्स्ट्रक्शन या नावाजलेल्या कंपनीतील आपली अतिशय सुखासीन खासगी नोकरी सोडून हिमालयातील दुर्गम, सीमा भागातील रस्ते बांधणीच्या प्रकल्पासाठी सरकारी नोकरीवर रुजू होतो. हिमालयातील हे रस्ते प्रामुख्याने भारतीय सैन्याच्या दळणवळणाकरिता, सीमेच्या सुरक्षेसाठी आवश्यक असल्याने भारतीय सैन्यअधिकाऱ्यांचे या कामावर लक्ष आणि नियंत्रण असते. विश्वनाथ हा त्या प्रकापातील एक सिव्हिलियन अभियंता असल्याने बॉर्डरवरील लष्करी शिस्त बऱ्याच वेळा त्याच्या प्रामाणिक कामाआढ येते. प्रत्येक गोष्टीकडे फक्त लष्करी शिस्तीच्या भिंगातून न पाहता त्या गोष्टींना असणाऱ्या दुसऱ्या बाजूचा भावनिकदृष्ट्या विचार करून निर्णय घेणाऱ्या विश्वनाथचे लष्करी अधिकाऱ्यांसोबत वरचेवर खटके उडायला चालू होतात. आपण बांधत असलेल्या रस्त्यावर आपल्याच लोकांची स्मारके बांधायला लागू नयेत ही माफक अपेक्षा असणारा विश्वनाथ काही ठिकाणी लष्करी शिस्तीच्या विरोधात जाऊन काम करतो. याची दोन उदाहरणे म्हणजे त्याने सर्जेराव गायकवाड या जवानाच्या सुट्टीसाठी प्रसंगी मोठ्या अधिकाऱ्यांच्या मनाविरुद्ध केलेली धडपड आणि दुसरे उदाहरण 'ढांगातील' रस्ता जवळपास पूर्ण झाल्यानंतर, त्याची चाचणी चालू असताना अचानकच एक कडा कोसळून झालेल्या अपघातात सर्जेराव आणि काही कामगारांचा त्याखाली गाडून मृत्यू होतो, त्या धक्क्यानंतर विश्वनाथने घेतलेला एक अतिशय भावनिक निर्णय! विश्वनाथचा हा निर्णय एक माणूस म्हणून अगदी योग्य असला तरी लष्कराच्या शिस्तीत बसणारा नव्हता त्यामुळे त्याच्या या निर्णयामुळे त्याला लष्करी कारवाईला(कोर्ट मार्शल) सामोरं जावं लगतं. कोर्ट मार्शल दरम्यानच्या चौकशीत विश्वनाथ आपल्यावरील आरोप तर फेटाळतोच शिवाय 'ढांगातील' कडा कोसळल्यानंतर आपण असा लष्कराच्या शिस्तीत न बसणारा निर्णय का घेतला याचंही कारण कोर्टाला सांगतो. अशी कडा कोसळण्याची त्या जागेवर शक्यता आहे आणि त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे हे आधीच वरिष्ठांच्या लक्षात आणून देऊनही केवळ ते लष्करी शिस्तीत बसत नसल्याचं कारण देऊन त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं हे कोर्टात सांगत असताना मानवी प्रयत्न आणि लष्कराची शिस्त यातील भेदही तो स्पष्ट शब्दात परखडपणे मांडतो. दोन्ही बाजू ऐकून कोर्ट प्रत्यक्ष अपघात झालेल्या जागी विश्वनाथने नव्याने केलेल्या बांधकामाची पाहणी करते आणि एक चकीत करणारा निकाल देते. नंतर त्याची त्या अन्यायकारक आरोपांतून मुक्तता होते, पण त्याची लष्कराची सेवा संपुष्टात येते, त्याचा करार रद्द होतो आणि त्याला अतिशय खंत मनाने बॉर्डर वरील त्या गावातून बाहेर पडावं लागतं. कादंबरीच्या शेवटी रस्त्यात मृत्यू पावलेल्या जवानांच्या स्मृतिस्थळाला फुले वाहून परतीच्या वाटेवर प्रवास करणाऱ्या विश्‍वनाथची प्रतिमा वाचकांच्या नजरेसमोर बराच वेळ तरळत राहते. ही इतकी सहज-सुंदर वाटणारी कादंबरीची कथा वाचताना खरंतर आपण त्यात हरवून जातो. बऱ्याच घटना अंगावर शहारे आणतात तर कधी डोळ्यांत पाणी. पेंढारकरांनी या कथेतून उभा केलेला माणूस विरुद्ध निसर्ग, माणूस विरुद्ध माणूस आणि माणूस विरुद्ध तो स्वतः हा संघर्ष आपल्याला खूप काही शिकवून जातो. हिमालयाच्या कड्यांवर चालणारा हा संघर्ष वाचून झाल्यानंतर आपल्यासाठी बॉर्डरवर पहारा देणाऱ्या सैनिकांना वाचक मनोमन सलाम करतो यातच या कादंबरीचं खरं यश आहे म्हटलं तरी ते चुकीचं ठरू नये.

प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावी आणि आवर्जून वाचावी अशी कादंबरी "रारंग ढांग"!





संदीप प्रकाश जाधव



Sunday, February 13, 2022

"अभयारण्य"


 

लेखक : जयंत नारळीकर

प्रकाशक : मौज प्रकाशन

पृष्ठे- ९६, मूूल्य- १५० रुपये                                                                           

 

"यक्षांची देणगी" आणि "प्रेषित" नंतर बऱ्याच वर्षांनी जयंत नारळीकरांचं एखादं पुस्तक वाचायचा योग आला. नारळीकरांच्या वैज्ञानिक कादंबऱ्या नेहमीच वाचकाला एका वेगळ्या जगात घेऊन जातात आणि शेवटी वाचकाला विचारात पाडून नकळत भविष्यात येऊ घातलेल्या धोक्याचा इशाराही देतात. त्यांच्या प्रत्येक कादंबरीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कादंबरीतील विषयांमधे जाणवणारी त्यांची दूरदृष्टी! इतक्या वर्षांपूर्वी लिहिलेल्या त्यांच्या कादंबरीतील कथा आज वाचताना आपल्याला भविष्यात १००-२०० वर्षें पुढे घेऊन जातात. भविष्यातील त्या वातावरणात गेल्यानंतर वाचक बऱ्याच वेळा स्थब्ध होऊन जातो याचं कारण म्हणजे नारळीकरांनी कादंबरी लिहील्यापासून ते आज वर्तमानकाळात आपण वाचत असताना मधल्या काळात मानवाने जी प्रगती केली आहे त्या टप्प्यातील बऱ्याच घटना, माणसाच्या आयुष्यात झालेले बरेच बदल हे अगदी त्या कथांमधील घटनांशी साम्य दाखवतात. वाचत असताना अनेक वेळा आपण कथेतील घटना आज वर्तमानकाळाशी रिलेट करत राहतो. कथेत घडणाऱ्या इतरही घटनांप्रमाणे जर खरंच भविष्यात पृथ्वीवर काही घडलं तर काय? या विचाराने वाचकाच्या अंगावर नकळत शहारे येतात. नारळीकरांची "अभयारण्य" सुद्धा याच पठडीतील एक विज्ञान कादंबरी! "अभयारण्य" चा शब्दशः अर्थ जर पहायचा झाला तर तो म्हणजे एक असं ठिकाण जिथं राहणाऱ्या प्रत्येक प्राणिमात्राला 'अभय' असेल, त्यांच्या जीवाला कोणत्याच प्रकारचा धोका नसेल, प्रत्येक प्राणी जिथे मुक्त संचार करू शकेल आणि नेहमी एक संरक्षक कवच त्यांच्या भोवती राहिल. तर, पृथ्वी म्हणजे मनुष्यप्राण्यासाठी परग्रहवासीयांकडून निर्माण केलेलं एक "अभयारण्य"च समजून नारळीकरांनी लिहिलेली ही एक भन्नाट विज्ञान कादंबरी! अतिशय प्रगत परग्रहवासीयांकडून मानवाची उत्क्रांती कशी झाली याचा अभ्यास करण्यासाठी घातलेला हा पृथ्वीवरील अभयारण्याचा घाट. संपूर्ण मानवजातीवर नजर ठेवून तटस्थपणे मानवी उत्क्रांतीचा अभ्यास करत असताना जिथे जिथे गरज भासेल तिथे मानवाच्या नकळत त्याला मदत करणारे या कादंबरीतील परग्रहवासी! परंतु मानवी उत्क्रांतीच्या या प्रवासात एक वळण असं येतं जिथं प्रगतीच्या गोंडस नावाखाली माणसाने बनवलेली अण्वस्त्रेच पृथ्वीला विनाशाच्या टप्प्यावर घेऊन जातात. अशा वेळी तटस्थ राहणारे परग्रहवासी काय भूमिका घेतात? मानवी आयुष्यात सहसा कोणताच हस्तक्षेप न करणारे हे परग्रहवासी पृथ्वीला अर्थातच त्यांनी बनवलेल्या या "अभयारण्याला" वाचवण्यासाठी काय करतात? अण्वस्त्रांच्या या जीवघेण्या स्पर्धेचा शेवट काय? माणसाच्या प्रगतीला अंत आहे की नाही? या सर्वांची मनोरंजनात्मक पण तितकीच आपल्याला एक माणूस म्हणून विचार करायला लावणारी उत्तरे नारळीकरांच्या या "अभयारण्यातून" आपल्याला मिळतील. पृथ्वीवरील मानवी संस्कृती, पृथ्वीवर आपली वसाहत स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणारा आणखी एक परग्रह 'चटम-४' वरील परग्रहवासी आणि पृथ्वी या आपल्या "अभयारण्याचे" रक्षण करणारे परग्रहवासी यांच्यामधे झालेला छोटासा संघर्ष, अग्नीचा शोध लावणारा गुहामानव टंबू, दुसरे महायुध्द संपण्याच्या काळातील अमेरिका, व्हिक्टोरियन काळातील इंग्लंड, इ.स.पू. ४३० मधील विद्याकलांची समृध्द नगरी अथेन्स, अथेन्सचा प्लेग, कृषिसंस्कृतीचा उदय आणि विस्तार, विसाव्या शतकात जिवशास्त्राने मारलेली मुसंडी, रशियाने स्फुटनिक हा उपग्रह अवकाशात सोडल्यानंतर चालू झालेलं अंतराळयुग, वाढत्या स्पर्धेत संहारक शस्त्रांबरोबर वाढलेली माणसाची हिंसक सत्तालालसा या सर्वांना स्पर्शून नारळीकरांनी हे अतिशय भन्नाट असं "अभयारण्य" साकारलं आहे.

एक पृथ्वीवासी म्हणून जयंत नारळीकर आपल्याला या कादंबरीतून अस्वस्थ, अंतर्मुख करतात. शिवाय विश्वाच्या या अफाट पसार्‍यात पृथ्वी एक नगण्य बिंदू असली तरीही माणसाच्या हाती असलेल्या आतापर्यंतच्या खगोलशास्त्रीय पुराव्यानुसार पृथ्वीच हे एकमेव असं स्थान आहे जिथे सध्या जीवसृष्टी नांदत आहे आणि त्यामुळे या एकमेवाद्वितीय अशा आपल्या पृथ्वीचे रक्षण करण्याची जबाबदारी, पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकवून ठेवण्याची जबाबदारी माणसाचीच आहे हेसुद्धा आपल्याला पटवून देण्यात नारळीकर यशस्वी झाले आहेत.

प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी एक दर्जेदार विज्ञान कादंबरी  "अभयारण्य".





संदीप प्रकाश जाधव

Monday, February 7, 2022

"युद्धखोर अमेरिका"

 


लेखक : अतुल कहाते

प्रकाशक : रोहन प्रकाशन

पृष्ठे- ३३३, मूूल्य- ३४० रुपये                                                                           

 

अतुल कहाते यांच्या "अणुबॉम्ब" आणि "पॅलेस्टाईन - इस्रायल : एका अस्तित्वाचा संघर्ष" या दोन पुस्तकांनंतर त्यांचं आणखी एक दर्जेदार पुस्तक "युद्धखोर अमेरिका" आज वाचून काढलं. अतुल कहातेंच्या या तीनही पुस्तकांचं वैशिष्ट्य म्हणजे खोलात जाऊन त्यांनी या अतिशय किचकट विषयांवर केलेलं संशोधन आणि तितक्याच ओघवत्या भाषेत, वाचकाला सहजपणे समजेल अशा पद्धतीने पुस्तकात केलेली मांडणी! एक अतिशय प्रगत देश, जागतिक महासत्ता आणि लोकशाहीचा सर्वांत मोठा पुरस्कर्ता असा टेंभा मिरवणाऱ्या अमेरिकेचा खरा चेहरा "युद्धखोर अमेरिका" मधून आपल्या समोर येतो. अतुल कहातेंनी त्यांच्या या पुस्तकातील एकूण १६ प्रकरणांमधून अमेरिकेचा उदारमतवादीपणाचा बुरखा फाडून आपल्याला खऱ्या अमेरिकेची नव्याने ओळख करून दिली आहे. लोकशाहीवादी, खुल्या विचारांचा, संपन्न व समृद्ध देश अशी अमेरिकेची आपल्या मनात तयार आणारी प्रतिमा बदलायला अतुल कहातेंचं हे अभ्यासपूर्ण पुस्तक भाग पाडतं. स्वतःची प्रगती करण्यात गैर काहीच नाही पण ही प्रगती जर दुसऱ्याच्या पोटावर पाय देऊ होत असेल तर ती कवडीमोलाची ठरते. अमेरिकेचा हा प्रगतीचा डोलारा कसा लाखो लोकांच्या पोटावर पाय देऊन उभा राहिला आहे हे जाणून घ्यायचं असेल तर अतुल कहातेंचं हे पुस्तक "युद्धखोर अमेरिका" त्याला उत्तम पर्याय ठरू शकेल. आज युद्धखोर देश कोणता असा प्रश्न जर एखाद्याला विचारला तर एका क्षणाचाही उशीर न होता आपल्याला नावे मिळतील ती इराण, इराक, अफगाणिस्तान, उत्तर कोरिया, चीन या देशांची! पण जगातील सर्वांत युद्धखोर देश जर अमेरिका आहे असं कोणी बोललं तर आपला त्यावर चटकन विश्वास बसणं कठीणच, अमेरिकेसारखा देश युद्धखोर कसा असू शकतो? हा एकच प्रश्न आपल्या डोक्यात फेर धरून नाचू लागेल. अतुल कहातेंच्या "युद्धखोर अमेरिका" पुस्तकात आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल. स्वतःच्या देशाची साखरेची गरज भागवण्यासाठी उद्ध्वस्त केलेली हवाई बेटे. एका खासगी कंपनीमार्फत गिळंकृत केलेला हाँडुरस देश. आपल्या स्वार्थासाठी दहशतवाद्यांना पुरवलेली शस्त्रास्त्रं आणि बेचिराख केलेला अफगाणिस्तान. तेलाच्या राजकारणात देशोधडीला लावलेला इराण. व्हीएतनाममध्ये केलेला नरसंहार. विनाकारण घुसून सद्दामचा काढलेला काटा आणि त्यामधे उध्वस्त झालेला इराक. अशी अनेक उदाहरणे देता येतील जिथे आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेने ढवळाढवळ केली. कधी त्यांनी तिथली सरकारं उलथवून लावली तर कधी बंडखोरांना शस्त्रास्त्रसाठा पुरवला तर कधी थेट आक्रमणंच केली. या सर्वांतून अमेरिकेने अशा अनेक देशांत आपलं वर्चस्व नक्कीच प्रस्थापित केलं असेल पण या वर्चस्ववादात अशा प्रत्येक देशातील लाखो निरपराध सामान्य लोकांचा बळी गेला, लाखो कुटुंबे कायमची रस्त्यावर आली, स्वतःच्याच देशात लोकांना निर्वासित आयुष्य जगायला भाग पडलं, प्रगतीच्या वाटेवर असणारे काही देश पुन्हा एकदा काही दशके मागे निघून गेली. अशा एकूण १६ 'अमेरिकापीडित' देशांचा 'केस स्टडी' म्हणजे हे अतुल कहाते यांचं पुस्तक "युद्धखोर अमेरिका"!

या पुस्तकातील पहिले प्रकरण आहे 'हवाई बेटांचं"! बाहेरच्या जगाशी कोणताच संपर्क नसलेल्या या हवाई बेटांचा शोध लागला साधारपणे १७७८ मधे. या बेटांच्या शोधानंतर अमेरिकेने ही बेटे आपल्याच वर्चस्वाखाली ठेऊन या बेटांवरून व्यापार चालू केला. बेटावरील मूळ लोकांच्या भावनांचा कोणताच विचार न करता तेथील जमिनीचा आपल्याला हवा तसा वापर चालू करून, प्रगतीकडे वाटचाल करणाऱ्या आपल्या देशाची भविष्यातील साखरेची गरज ओळखून ही बेटे अक्षरशः उध्वस्त करण्याचं काम अमेरिकेने केलं. त्यानंतर "क्यूबा", "पोर्तो रिको", "फिलिपिन्स", "निकारागुआ", "हाँडुरस" अशा एकामागून एक देशांत अमेरिकेने ढवळाढवळ करून तेथील लोकांचं आयुष्य उध्वस्त करून टाकलं. त्यासाठी अमेरिकेकडून खेळले गेलेले राजकारणाचे वेगवेगळे डावपेच पुस्तकात वाचत असताना अमेरिकेबद्दल चीड निर्माण करतात. प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या अमेरिकेच्या अशा हस्तक्षेपापूर्वीची पार्श्वभूमी अतुल कहातेंनी अतिशय विस्तारत सांगितली आहे ज्यामुळे वाचकाला एका वेगळ्याच आंतरराष्ट्रीय राजकारणाची सफर घडून येते. नव्वदच्या दशकात अमेरिकेची जागतिक पातळीवरील इतर देशांतील ढवळाढवळ मोठ्या प्रमाणात आणि उघडपणे सर्वांना जाणवायला लागली. त्याचं मुख्य कारण संपूर्ण जगाला आवश्यक असणारं खनिज तेल ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे अशा आखाती देशांत तेलाभोवती चालू झालेलं राजकारण! शिवाय अमेरिकेला आव्हान देऊ शकेल अशा सोव्हिएत युनियनचे देखील केव्हाच तुकडे पडले होते! याच तेलाच्या राजकारणादरम्यान इस्लामी दहशतवादाच्या कथा लोकांच्या मनावर अतिशय नियोजनबद्धपणे बिंबवल्या गेल्या. दहशतवादाला आपला विरोध आहे, आपण लोकशाहीचे समर्थक आहोत असं म्हणणारी अमेरिकाच खरे तर या दहशतवादाला पडद्याआडून कसं खतपाणी घालत आलेय हे इथून पुढच्या प्रकरणांतून आपल्या लक्षात येते. पडद्याआडून दहशतवादी वृत्तीला पोसताना या आखाती देशांचं झालेलं खच्चीकरण आपल्या मनाला पीळ पाडतं. इराणमध्ये महमंद रझा शाहची सत्ता जाऊन आयातुल्ला खेमनीसारख्या कट्टरवादी माणसाची सत्ता आणण्यात अमेरिकेचाच हातभार होता हे इराणचे प्रकरण वाचत असताना समजते. शिवाय अमेरिकेच्या दुटप्पीपणाचे एक उदाहरणसुद्धा याच प्रकरणात वाचायला मिळेल. ते म्हणजे आपण कट्टरवादाच्या विरोधात आहोत हे जगाला दाखवून देण्यासाठी कोणत्याही देशाने इराणला शस्त्रास्त्रे विकू नये असं म्हणणारी अमेरिकाच इस्त्रायलच्या मदतीने इराणला शस्त्रास्त्रे विकत होती. दुसरे अशाच प्रकारचे उदाहरण म्हणजे इराण-इराक यांच्या युद्धाचं देता येईल. तेलाच्या राजकारणात चालू झालेल्या इराण-इराकच्या युद्धात अमेरिका एका बाजूला इराणला मदत करत राहिली आणि त्याच वेळी इराक या युद्धात हरणार नाही याचीही काळजी घेत राहिली. यादरम्यान अमेरिकेला आव्हान देणाऱ्या सद्दाम हुसेनचा खात्मा करण्यासाठी इराककडे अस्तित्वातच नसणाऱ्या आण्विक अस्त्रांचं कारण पुढे करून जगासाठी इराक धोकादायक आहे असं सांगत अमेरिकेने इराकला बेचिराख करून टाकलं ज्यातून इराक आजही उभा राहू शकला नाही. पुढे इतर मुस्लिम देशांसोबातच रशियावर आपलं वर्चस्व राखण्यासाठी अमेरिकेने जे राजकारण खेळले त्यातून अफगाणिस्तानात ओसामा बिन लादेनच्या अल-कायदाचा जन्म झाला. ज्याला पोसणं नंतर अमेरिकेच्याच कसं अंगाशी आलं हे ९/११ ला संपूर्ण जगाने पाहिलं. आपणच पोसलेला दहशतवाद जेव्हा स्वतःवरच उलटला तेव्हा अमेरिकेला थोडीफार जाग आली खरी पण आज हाच दहशतवाद संपूर्ण जगाची डोकेदुखी ठरतोय हे वास्तव आहे. अल-कायदाला संपवण्यासाठी अफगाणिस्तानात अमेरिकेने छेडलेल्या युद्धाने त्या देशाला इराकप्रमाणेच पुरतं उध्वस्त करून टाकलं. युद्धानंतर अमेरिकेने तिथून काढता पाय घेतल्यानंतर अफगाणिस्तानात सामान्य लोकांचं झालेलं हाल संपूर्ण जगाने टेलिव्हिजनवर पाहिले. परंतु प्रत्येक ठिकाणी जसे अपवाद असतात त्याप्रमाणे अमेरिकेच्या या अन्यायकारक आणि अमानवी कारवायांच्या इतिहासालादेखील एक अपवाद आहे. १६ विविध देशांत अमेरिकेने चालवलेल्या वर्चस्ववादी आणि दुटप्पी राजकारणात बहुतांशी देशांनी अमेरिकेपुढे गुडघे टेकले असले तरी क्युबाचा फिडेल कॅस्ट्रो अमेरिकेला पुरून उरला. क्युबा गिळंकृत करण्याचे अमेरिकेचे सर्व प्रयत्न कॅस्ट्रोने रशियाच्या मदतीने हाणून पाडले. अमेरिकेच्या वर्चस्ववादात भरडणाऱ्या आणि त्याला विरोध करण्याची इच्छा असणाऱ्या देशांसाठी क्युबाचा हा लढा प्रेरणादायी आहे. अतुल कहातेंनी ज्याप्रमाणे क्युबाचा हा लढा आपल्यासमोर आणला आहे तो वाचत असताना आपल्याला क्युबासारख्या या छोट्याशा देशाचा अभिमान वाटल्यावाचून राहत नाही.

अख्या जगात लोकशाही आणि शांतता प्रस्थापित करायचा मक्ता फक्त आपणच घेतला आहे अशा अविर्भावात वावरणाऱ्या अमेरिकेचं पडद्यामागचं राजकारण नेमकं याच्या विरोधी आहे. अमेरिकेच्या तोंडावरील हा बुरखा अतुल कहाते यांनी त्यांच्या या पुस्तकाच्या माध्यमातून फाडला आहे आणि नाण्याची दुसरी बाजू, जी अमेरिकेला जगातील सर्वांत युद्धखोर देश सिद्ध करते ती आपल्या पुढे आणली आहे.

आवर्जून वाचण्यासारखं अतुल कहातेंचं एक दर्जेदार पुस्तक "युद्धखोर अमेरिका"!





संदीप प्रकाश जाधव


Monday, January 31, 2022

"तडा"

 



 

लेखक : डॉ. एस. एल. भैरप्पा

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

मराठी अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी

पृष्ठे- २८६, मूूल्य- २८० रुपये


"तडा"! 

"तडा" मग तो एखाद्या वस्तूला जावो अगर नात्याला,  एकदा जर गेला तर परत सांधता येणं केवळ आणि केवळ अशक्यच! कितीही सांधण्याचा प्रयत्न केला तरी एक पुसटसं का असेना अंतर राहतंच.

एस. एल. भैरप्पा यांची याच नावाची, मराठी अनुवादित "तडा" ही कादंबरी नुकतीच वाचून पूर्ण झाली. 'स्त्री-स्वातंत्र्य आणि स्त्री-मुक्ती' यांचा आपल्या सोयीनुसार अर्थ लावून स्वतःसोबतच आपल्या जवळच्या लोकांचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या सुधारणावादी किंवा पुढारलेल्या स्त्रियांच्या मानसिकतेची विदारक कहाणी सांगणारी ही कादंबरी आहे! स्त्रियांच्या हक्कासाठी बनवलेल्या कायद्यांचा गैरवापर करून त्यांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत असताना एखादा कर्तृत्ववान पुरुष कसा देशोधडीला लागू शकतो याची विदारक कहाणी म्हणजे ही कादंबरी "तडा"! भैरप्पांनी लिहिलेल्या "आवरण", "साक्षी", "उत्तरकांड", "परिशोध" आणि "पारखा" अशा एकाहून एक दर्जेदार कादंबऱ्या वाचून झाल्यानंतर त्यांची "तडा" ही कादंबरी खूप उत्साहाने मी वाचायला घेतली होती पण खरं सांगायचं झालं तर या कादंबरीने तशी थोडी निराशाच केली. याचं सर्वांत महत्त्वाचं आणि एकमेव कारण म्हणजे त्यांनी सरसकट एकाच नजरेतून सुधारणावादी स्त्रीकडे पाहण्याचा केलेला प्रयत्न! जो कोणत्याही सुज्ञ वाचकाला नक्कीच खटकणारा आहे. पण ही एक गोष्ट थोडी बाजूला ठेऊन जर "तडा" कडे पहायचं झालं तर एस. एल. भैरप्पांचा या कादंबरीतील विषय एक समाज म्हणून आज आपल्याला खूप विचार करायला लावणारा आहे. काही मूठभर स्त्रियांच्या अशा या विदारक मानसिकतेमुळे भारतीय समाजजीवनाला जाऊ पाहणारा "तडा" रोखण्याचे महत्व अधोरेखित करणारी ही कादंबरी आहे! कधी फ्लॅशबॅक तर कधी वर्तमानकाळातून पुढे सरकणाऱ्या या कादंबरीच्या प्रवासातून भारतातील स्त्रीमुक्तीवादी विचारांच्या तीन स्त्रिया आणि त्यांच्या स्वार्थी कारवायांनी होरपळलेले त्यांचे स्वकीय तसेच अमेरिकेतील स्त्री-मुक्तीचे चटके खाल्लेल्या नचिकेत या भारतीय तरुणाचं आयुष्य भैरप्पांनी आपल्या समोर आणलं आहे. स्त्री-मुक्तीवादी विचारांच्या कारवायांनी त्रस्त-हैराण झालेल्या पुरुषाची कहाणी या कादंबरीच्या माध्यमातून आपल्यासमोर आणत असताना भैरप्पांनी स्त्रियांच्या या विदारक मानसिकतेची अक्षरशः चिरफाड केली आहे. त्यामुळे भैरप्पांच्या इतरही कादंबर्‍यांप्रमाणे या कादंबरीनेही कन्नड साहित्य विश्वात आणलेलं वादळ साहजिकच होतं. परंतु तथाकथित स्त्रीमुक्तीचा भयानक चेहरा दाखवणारी ही कादंबरी कितीही विवादास्पद असली, तरीही त्यातील अनेक प्रसंगांनी काही क्षण का असेना वाचक भैरप्पांच्या या विचाराशी सहमत होतो हे नक्की! कादंबरीतील हे प्रसंग समाजातील काही मोजक्याच वर्गाशी निगडित असल्याने स्त्रीमुक्तीच्या या सापळ्यात अडकून आयुष्य पोळलं गेलेल्या लोकांची संख्या तशीही फार मोठी नाही पण तरीही पाश्चात्य देशांप्रमाणे आपल्या समाजातील हे बदलणारे चित्र आपण नाकारू शकत नाही. स्त्रियांसाठी असलेल्या कायद्यांचा वापर तत्कालीन परिस्थितीनुसार स्त्रियांनी नक्कीच केला पाहिजे पण त्यातून आपल्या मजबूत कुटुंबव्यवस्थेला आणि समाजव्यवस्थतेला हादरे बसून "तडा" जाणार नाही याचीही काळजी घेण्याची आज गरज आहे याची जाणीव भैरप्पांनी वाचकाला त्यांच्या या "तडा"मधून करून दिली आहे. ही कादंबरी आणखी एका गोष्टीचा वाचकाला विचार करायला लावते ती म्हणजे सदोष कायदा व्यवस्थेमुळे समाजातील संसारांना जाणारा "तडा" जर रोखायचा असेल तर स्त्रीमुक्ती, स्त्रियांचे स्वातंत्र्य आणि समाजव्यवस्था याबद्दलचा विचार बदलत्या काळाचे भान ठेवूनच झाला पाहिजे. कायद्याचा धाक असावा पण अतिरेक असू नये! संपूर्ण कादंबरीमधे जरी स्त्रियांच्या या विदारक मानसिकतेमुळे पोळल्या जाणाऱ्या पुरुषांचं चित्रण भैरप्पांनी केलेलं असलं तरी अशा गोष्टींचा आघात जितका पुरुषांना बसतो त्यापेक्षा जास्त स्त्रियांनाही बसतो आणि बसत आलाय हेदेखील कादंबरीच्या शेवटी वाचकाला पटवून देण्यात भैरप्पा यशस्वी झाले आहेत. इर्षेच्या आणि रागाच्या भरात कायद्याच्या जोरावर मोडलेला संसार काही काळानंतर पुरुषासोबतच स्त्रीलासुद्धा पश्चातापाच्या खाईत लोटून देतो हेच "तडा" मधून सांगण्याचा प्रयत्न भैरप्पांनी केला आहे. 

खास भैरप्पांच्या लेखनासाठी नक्कीच वाचावी अशी कादंबरी "तडा"!





संदीप प्रकाश जाधव


Sunday, January 23, 2022

"काहून"

 




लेखक : अभिषेक कुंभार

प्रकाशक : NEW ERA पब्लिशिंग हाऊस

पृष्ठे- २४४, मूूल्य- ३०० रुपये                                                                           


पुस्तकाचा परिचय देण्यापूर्वी लेखक अभिषेक कुंभार यांना मनापासून धन्यवाद द्यावसं वाटतं कारण वैयक्तिकरित्या तरी माझ्यासाठी मराठ्यांचा हा पराक्रम अपरिचितच होता, ज्याबद्दल कधी कोणाकडून ऐकलंदेखील नव्हतं असा इतिहासातील हा मराठ्यांचा पराक्रम कादंबरीरूपात वाचत असताना आलेला अनुभव शब्दांत न सांगता येण्यासारखा असाच!!!


आता थोडंस पुस्तकाबद्दल.....

भारताचा इतिहास 'मराठ्यांच्या' उल्लेखाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. अशक्यप्राय असणाऱ्या हिंदवी स्वराज्य निर्मितीपासून ते अटकेपार झेंडा रोवून अखंड हिंदुस्थानभर आपलं राज्य स्थापन करणाऱ्या मराठा साम्राज्याचा इतिहास अनंत पराक्रमांनी भरलेला आहे. पण 'दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा' असं अभिमानाने बोलणाऱ्या आपल्यापैकी किती लोकांना 'पानिपतच्या' महासंग्रामाशिवाय मराठ्यांचे इतर पराक्रम माहित आहेत ही शंकाच आहे. आपलं दुर्दैव असं की तुकड्या-तुकड्यांनी लिहिल्या गेलेल्या मराठ्यांच्या या इतिहासातील फारच कमी आणि ठराविक गोष्टीच आज आपल्याला माहित आहेत. एक वेळ अशी होती की मराठ्यांच्या सल्ल्याशिवाय आणि मध्यस्थीशिवाय हिंदुस्थानातील कोणत्याही संस्थानचे काम होत नसे, कोणतंही राजकारण पूर्णत्वास जात नसे पण परिस्थिती हळूहळू बदलत गेली आणि मराठ्यांच्या अधिपत्याखालील एक-एक संस्थान सातासमुद्रापारहून आलेल्या मूठभर ब्रिटिशांनी आपल्या टाचेखाली घेतले. साधारणपणे १८१८ च्या दरम्यान ब्रिटिशांनी स्वराज्यातील जवळपास सर्वच किल्ले आपल्या ताब्यात घेतले. त्यांपैकीच एक किल्ला सिंहगड आणि त्याच्या पायथ्याशी असलेल्या 'कल्याण' या गावापासून या कादंबरीची कथा सुरू होते जी संपते तिथून शेकडो मैल दूर असणाऱ्या अफगाणिस्तानच्या सीमेवरील 'काहून' या ठिकाणी. एका अपरिचित ऐतिहासिक घटनेला कल्पनेची जोड देऊन पुस्तकबद्ध केलेला 'कल्याण'पासून ते 'काहून'पर्यंतचा प्रवास म्हणजेच ही कादंबरी "काहून"! मातृभूमीपासून शेकडो मैल दूर जाऊन, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मराठ्यांनी दिलेला "काहूनचा" हा लढा २४३ पानांमधून अभिषेक कुंभार यांनी ज्या पद्धतीने आपल्यासमोर उभा केला आहे तो वाचत असताना अंगावर येणारा काटा आणि शिवरायांच्या त्या मावळ्यांच्या अतुल्य पराक्रमाने होणारा अभिमान अशा दुहेरी अनुभवातून जाणारा वाचक कादंबरीच्या शेवटी भावनिक होऊन जातो. "काहून" ही एक सत्य युद्धकथा आहे जिचा संदर्भ इंग्रजी पत्रव्यवहारात सापडतो. काहूनच्या या युद्धाची आठवण म्हणून पुण्यातील एका रोडला ब्रिटिशांकडून दिलं गेलेलं 'काहून रोड' हे नावच आपल्याला मराठ्यांच्या त्या अपरिचित पराक्रमाची उंची सांगून जातं. या ऐतिहासिक घटनेबद्दल अतिषय कमी संदर्भ आणि साहित्य उपलब्ध असतानादेखील अभिषेक कुंभार यांनी या युद्धातील मराठा वीरांचा पराक्रम अतिशय सविस्तरपणे त्यांच्या कादंबरीतून मांडला आहे. कथेत गरजेनुसार काही काल्पनिक पात्रांचा समावेश लेखकांनी केला असला तरी या पराक्रमात कुठेही अतिशयोक्ती होऊ दिलेली नाही. काहूनसारख्या ठिकाणी फक्त मराठेच लढाई करू शकतात असं ब्रिटिशांना का वाटत होतं याचं उत्तरही आपल्याला कादंबरी वाचत असताना मिळून जाते. मूठभर मराठी सैनिकांनी हजारो अफगाणी टोळीवाल्यांसोबत केलेला संघर्ष आपल्याला अलीकडेच येऊन गेलेल्या 'केसरी' या चित्रपटाची आठवण करून देतो. इंग्रजांकडून लढलेल्या शीख जवानांचे 'केसरी' मधील हे युद्ध झाले होते साधारणपणे १८९७ मध्ये पण मराठ्यांनी लढलेली 'काहून'ची ही लढाई त्याच्याही आधी ५० वर्षें म्हणजे १८४० मधे लढली गेली होती. "काहून"मधील मराठ्यांचं युद्ध हे फक्त अफगाण टोळीवाल्यांसोबत नव्हतं तर मातृभूमीपासून शेकडो मैल दूर येऊन समोर उभी ठाकलेली अतिशय प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती आणि नियती यांच्याशीदेखील होतं. मराठ्यांच्या याच धगधगत्या पराक्रमाची ही अपरिचित शौर्य गाथा म्हणजे "काहून"!

एक मोठं साम्राज्य म्हणून उदयास येत असताना ब्रिटिशांचा जागतिक राजकारणातील दबदबा वाढत होता आणि याच जागतिक राजकारणाचा भाग म्हणून त्यांच्याकडून आखली गेलेली अफगाणिस्तान मोहिम म्हणजे "काहून"मधील मराठ्यांच्या पराक्रमाची सुरुवात! मातृभूमीच्या रक्षणासाठी पानिपतच्या महासंग्रामात ज्या अहमदशाह अब्दाली सोबत मराठे प्राणपणाने लढले त्याच अहमदशाहचा नातू शाह शूजा याला अफगाणिस्तानच्या गादीवर बसवण्यासाठी ब्रिटिशांनी उघडलेली ही मोहिम! स्वराज्यनिर्मितीपूर्वी आणि नंतरही मराठी सैनिकांनी आपल्या पराक्रमाने अनेक लढाया गाजवल्या, शासनकर्ते बदलत गेले पण मराठा तलवार आपल्या पराक्रमाने येणाऱ्या प्रत्येक दुश्मनाला पाणी पाजतच राहिली. म्हणूनच मराठी सैनिकांची ही ताकद जाणून असणाऱ्या ब्रटिशांची खात्री झाली होती की अफगाणिस्तानची ही अतिशय कठीण कामगिरी फक्त आणि फक्त मराठेच करू शकतात आणि त्यासाठी ब्रिटिशांनी आपल्या "बॉम्बे रेजिमेंट" अर्थातच "मराठा लाईफ इन्फंट्री"च्या तुकडीवर ही मोहिम सोपवली. अफगाणिस्तानच्या या मोहिमेत "मराठा लाईफ इन्फंट्री"कडून गझनी किल्ल्याचा पाडाव झाल्यानंतर ब्रिटिशांनी अहमदशाह अब्दालीचा नातू शाह शूजाला अफगाणिस्तानच्या गादीवर बसवले. पुढे या म्हाताऱ्या शाह शुजाला मदत करता यावी तसेच तेथील राजकारणात आपलाही वचक राहिला पाहिजे या हेतूने अफगाणिस्तानात सैन्य ठेवणं गरजेचं आहे याची जाणीव ब्रिटिशांना झाली. त्यामुळे या कामासाठी अफगाणिस्तानात येणाऱ्या आपल्या सैन्यास परतीच्या मार्गावर विसावा मिळावा म्हणून एका ठाण्याची असणारी आवश्यकता लक्षात घेऊन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बलुची टोळीवाल्यांच्या ताब्यात असणाऱ्या, अफगाणिस्तान सीमेवरील 'काहून' या गावाची निवड केली. गझनीचा पाडाव करताना सोबत असणाऱ्या मराठा सैनिकांच्या जीवावरच ही दुसरी "काहून" जिंकण्याची मोहिम आखली गेली. गझनी किल्ल्यापासून काहूनच्या गढी पर्यंतच्या मराठा सैन्याच्या खडतर प्रवासाचं लेखकांनी केलेलं वर्णन या मोहिमेत मराठ्यांच्यापुढे काय वाढून ठेवलं असेल याचा अंदाज देऊन जातं. उंचच उंच डोंगर, खोल दऱ्या, दिवसा आग ओकणारा सूर्य आणि रात्री हाडे गोठवणारी थंडी असा हा सैन्याचा प्रवास मजल-दरमजल करत "काहून"च्या गढीवर येऊन पोहचतो आणि सुरू होतो खरा संघर्ष! टोळीवाल्यांकडून "काहून"ची गढी तर सहजच ताब्यात येते पण मराठ्यांची खरी कसोटी लागते ती ही गढी राखण्यात! तब्बल ५ महिने अपुऱ्या अन्न, पाणी, दारुगोळा आणि मनुष्यबळाच्या जोरावर मराठे टोळीवाल्यांशी लढत राहतात. या ५ महिन्यांमध्ये युद्धाचे अनेक पदर अभिषेक कुंभार यांनी आपल्यासमोर उलगडून दाखवले आहेत. ५ महिने काहूनच्या पठारावर चाललेला हा थरार अंगावर शहारे आणतो. अखेर नाईलाजास्तव मराठ्यांना माघार घ्यावी लागते पण तोपर्यंत अफगाणी टोळ्यांमधे मराठ्यांच्या या शौर्याची अशी काही भीती पसरते की शेवटी होणाऱ्या तहात सर्व गोष्टी मराठ्यांच्या मनाप्रमाणेच पार पडतात आणि मातृभूमीपासून इतक्या दूर जाऊन दाखवलेल्या अतुल्य अशा पराक्रमानंतर सुरू होतो मराठ्यांचा काहून मधून परतीचा प्रवास! त्याच खडतर रस्त्यावरून!

प्रत्येकाने वाचलीच पाहिजे अशी मराठ्यांची अपरिचित शौर्यगाथा "काहून"!





संदीप प्रकाश जाधव







Wednesday, January 19, 2022

"ईश्वर डॉट कॉम"

 


लेखक : विश्राम गुप्ते

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

पृष्ठे- २९१, मूूल्य- ३०० रुपये                                                                           


"ईश्वर डॉट कॉम"! पुस्तकाचं नाव आणि मुखपृष्ठ पाहूनच खरं तर हे पुस्तक मी विकत घेतलं होतं. मुखपृष्ठावरील शीर्षासनाच्या पवित्र्यातील तीन धर्माच्या तीन व्यक्ती आपलं या पुस्तकाबद्दलचं कुतूहल वाढवतात. डोकं घरीच ठेऊन एखादा चित्रपट पहायला चित्रपटगृहात जाणं आणि निखळ मनोरंजनाच्या आस्वादासोबतच अंतर्मुख होऊन काही गोष्टींचा नव्याने विचार करायला लागणं, असंच काहीसं होतं हे पुस्तक वाचून झाल्यानंतर. "ईश्वर डॉट कॉम" ही विश्राम गुप्ते यांची एक धमाल काल्पनिक कादंबरी! अगदी हसतखेळत आणि विनोदी अंगाने पुढे सरकणारी या कादंबरीची कथा जरी काल्पनिक असली तरी यातील विषय आज प्रत्येक माणसाने विचार केलाच पाहिजे असा आहे. आपल्या आसपासच घडणारी ही कथा पण त्यासाठी आवश्यकता आहे ती उघड्या डोळयांनी तिला पाहण्याची. देव, धर्म, संस्कृती आणि परंपरेच्या व्यापारीकरणात आज माणसाच्या हृदयातला ईश्वर हृदयातच हरवतो आहे. क्षणाक्षणाला प्रगती करत फक्त आणि फक्त पुढेच वाटचाल करणाऱ्या माणसाने थोडं थांबून मागं वळून बघण्याची आज गरज आहे. सध्या जरी हे आपल्याकडून होत नसलं तरी येणाऱ्या आधुनिक काळात तरी आपण 'विवेक हा तारणहार', 'समता हा ईश्वर' आणि 'प्रेम ही सर्वात टिकाऊ परंपरा' असते ही त्रिसूत्री मानणार आहोत का? निकोप समाजजीवन आणि विवेकशील नागरिकत्व डोळसपणे अंगात मुरवणार आहोत का? या प्रश्नांची उत्तरे लेखकांनी या कादंबरीच्या माध्यमातून आपल्याला शोधायला भाग पाडलं आहे. विश्राम गुप्ते यांच्या काल्पनिक जगात, अर्थातच 'देवनगरीत' आपल्याला ही कथा घेऊन जाते. 'देवनगरीत' राहणारे वेगवेगळ्या स्तरांवरचे लोक, त्यांचं आपापसातील मानसिक व भावनिक नातं, धर्म-संस्कृतीबद्दल असणारे त्यांचे विचार या सर्वांतून आकारास येणारं एक वैचारिक आणि सांस्कृतिक नाट्य असं थोडक्यात वर्णन या कादंबरीचं करता येईल. लेखकांच्या मते जिथे देवाची सत्ता चालते ती जागा म्हणजे 'देवनगरी'! विश्राम गुप्ते यांच्या कथेतील ही काल्पनिक 'देवनगरी' आहे भारत आणि सारे भारतीय आहेत या देवनगरीतील रहिवाशी! देव, धर्म, संस्कृती आणि परंपरांच्या नावाखाली आपल्या देशात म्हणजेच देवनगरीत होणाऱ्या व्यापारीकरणाच्या या धमाल विनोदी कथेत इतरही अनेक उपकथा जन्माला येतात ज्या आजच्या आपल्या देशातील वातावरणाशी मेळ तर खातातच पण सोबतच वाचकाला विचारात पाडतात. एकप्रकारे आजच्या समाजाची जी मानसिकता आहे तीच आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न गुप्ते यांनी विनोदाच्या माध्यमातून केला आहे. देवनगरीतील लोकांचा देव-धर्म या संकल्पनेवर असणारा टोकाचा विश्वास बऱ्याच ठिकाणी आपल्याला आजच्या आपल्या सामाजिक परिस्थितीच्या जवळ घेऊन जाणारा आहे. बऱ्याचशा घटना या आजच्या वातावरणाशी मिळत असल्याने एक समाज म्हणून आपला प्रवास आज कोणत्या दिशेला चालला आहे आणि त्याचा शेवट काय होऊ शकतो याचाही अंदाज वाचकाला येत राहतो. आज आपल्या देशात धर्म आणि संस्कृतीवरील खोट्या प्रेमाच्या नावाखाली जो नवीनच एक भयावह समाज तयार होऊ पाहतोय त्याचं प्रातिनिधिक स्वरूपातील, देवनगरीतील हे काल्पनिक पण सत्याच्या जवळ जाणारं चित्र म्हणजे विश्राम गुप्ते यांची कादंबरी "ईश्वर डॉट कॉम"!

आज जर आपण समाजाकडे डोळे उघडून पाहिले तर ढोबळमानाने तीन प्रकारचे लोक आपल्याला समाजात दिसतील एक 'जे पूर्णपणे नास्तिक आहेत ज्यांना धर्म आणि धर्मावर आधारित संकल्पनेवर अजिबात विश्वास नाही', दोन 'ज्यांना धर्म आणि धर्मापलिकडे काहीच दिसत नाही' आणि तीन 'जे देव-धर्म तर मानतात पण देवा-धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या कर्मकांडांवर ज्यांना संशय आहे'. भले मग हे तीनही गट कोणत्याही धर्माचे असोत कमीअधिक प्रमाणात प्रत्येक ठिकाणची वैचारिक पातळी ही सारखीच असल्याची आपल्याला जाणवेल. एक वाचक म्हणून विश्राम गुप्ते यांची ही कादंबरी आवडणं किंवा न आवडणं आपण समाजातील यांपैकी कोणत्या गटात मोडतो यावर बऱ्याच अंशी अवलंबून आहे. पण तरीही या सर्वांच्या पलिकडे जाऊन, तटस्थपणे जर आपण ही कादंबरी वाचली तर नक्कीच काहीतरी वेगळं वाचन केल्याचं समाधान देऊन जाते. देशातील आजच्या वातावरणातील संदर्भ सतत डोळ्यासमोर येत राहिल्याने कादंबरीची कथा अधिकच वाचनीय होऊन जाते. धर्म संकल्पना आणि आपले व्यवहार यावर आपण नक्कीच थोडा विचार करायला भाग पडतो.

एक वेगळं वाचन म्हणून नक्की वाचावी अशी कादंबरी "ईश्वर डॉट कॉम"!





संदीप प्रकाश जाधव


Tuesday, January 11, 2022

"झाडाझडती"

 


लेखक : विश्वास पाटील

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

पृष्ठे- ४७३, मूूल्य- ४०० रुपये                                                                           


धरणं बांधल्यामुळे राज्याची प्रगती झाली, त्या धरणाच्या पाण्यावर शेती आणि इतर उद्योग करणाऱ्या लाखो लोकांचं आयुष्य सुधारलं, एकच नाही तर आपल्या पुढच्या अनेक पिढ्या सुखी राहतील अशी व्यवस्था अनेकांनी करून ठेवली ती फक्त त्या धरणाच्या पाण्यामुळे झालेल्या प्रगतीतूनच! पण त्या लोकांचं काय ज्यांच्या शेतजमिनीवर ही धरणे बांधली गेली? त्या लोकांचं काय जी शतकानुशतके निवांत वसलेल्या गावांमध्ये आपल्या पारंपरिक जाती, निष्ठा, सण, मूल्ये जपत सुखासमाधानाने राहत होती? त्या लोकांचं काय ज्यांच्या येणाऱ्या पुढच्या सगळ्याच पिढ्यांचं कधीच न भरून येणारं नुकसान केलं या धरणाने? त्या लोकांचं काय जे "धरणग्रस्त", "विस्थापित" या नावाखाली खरंतर कायमचे बेघरच झाले? धरणामुळे सुरू झालेल्या वीज निर्मितीतून संपूर्ण राज्य जिथे आज विजेच्या प्रकाशात लखलखत आहे तिथे ज्या लोकांच्या जमिनीवर, घरांवर नांगर फिरवून ही धरणे बांधली गेली ते लोक आजही अंधारातच आहेत. याच धरणग्रस्तांच्या जीवनावर बेतलेली, त्यांच्यावर झालेल्या आणि आजही होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडणारी, त्यांच्या वेदनेचा वेध घेणारी, वास्तववादी कादंबरी म्हणजे "झाडाझडती! कोणत्याही संवेदनशील वाचकाला अक्षरशः सुन्न करून सोडणारी ही कादंबरी वाचत असताना आपल्यातीलच काही लोकांच्या वाट्याला आलेलं आयुष्य पाहून मती गुंग होऊन जाते. पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहूनच वाचकाला थोडी कल्पना येऊन जाते की विश्वास पाटलांची ही कादंबरी आपल्याला कोणत्या जगात घेऊन जाणारी आहे.  स्वतःच्या मुलासाठी साखर कारखाना काढता यावा आणि त्याला पाणी मिळावं म्हणून एक खासदार धरणाचा प्रस्ताव मांडतो. साध्या भोळ्या लोकांना आश्वासनाची साखर चारतो. या धरणामुळे काही गावं दुसर्‍या जागी विस्थापित होणार असतात. गावातील लोक या गोष्टिला विरोध करतात कारण पिढ्यान पिढ्या इथे राहिल्याने त्या मातीशी जडलेलं त्यांचं नातं! स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळलेल्या बागायती शेती, आंबा-पेरूच्या बागा! घाम गाळून उभं केलेलं स्वतःच घर! या गोष्टी सोडून जाणं त्यांना पटत नाही. पण शेवटी सरकारच्या जोरापुढे त्यांना माघार घ्यावीच लागते आणि सुरू होतो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होणारा एक मन सुन्न करणारा प्रवास! या विस्थापित होऊ घातलेल्या गावांपैकीच एक गाव 'जांभळीगाव'. विश्वास पाटील यांनी जांभळीगावाला केंद्रस्थानी ठेवून ही कादंबरी जरी लिहिली असली तरी ही व्यथा आहे त्या सर्व धरणग्रस्तांच्या आयुष्याची जे देशाच्या कित्येक भागांत "धरणग्रस्त, "विस्थापित" म्हणून वर्षानुवर्षे धडपड करत आहेत समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन आपलं गेलेलं वैभव परत मिळवण्याची. याच लोकांच्या ससेहोलपटीची ही विश्वास पाटील यांची कादंबरी "झाडाझडती"!

कादंबरीची सुरुवात होते गोम्या कोळी आणि त्याचा हल्या(रेडा) यांच्यापसून. पखालितून हल्याच्या पाठीवर पाणी आणायचं आणि ते गावात लोकांच्या रांजणात भरून द्यायचं. त्यावर मिळणाऱ्या भाजी-भाकरीवर अगदी सुखात राहणारा गोम्या हे या कादंबरीतील पहिलं पात्र ज्याचं हे सहज, सुंदर जीवन धरणाच्या पाण्यात वाहून जातं. कादंबरी जसजशी पुढे सरकत जाते तसे जांभळी गावातील एक-एक पात्र आपल्यापुढे येऊ लागते. विश्वास पाटलांनी ज्या पद्धतीने या कादंबरीतील पात्रांना जिवंतपणा आणला आहे त्याला तोड नाही. वाचकाला ही कथा अशी काही घेरायला चालू करते की जणूकाही आपण त्या गावातील लोकांच्या व्यथा प्रत्यक्ष त्याठिकाणी उभं राहूनच अनुभवतोय आणि त्यामुळेच की काय कादंबरी वाचून झाल्यानंतर वाचक अक्षरशः सुन्न होऊन जातो हे नक्की! तर जांभळी हे एक साधेसे गाव. तिथले बहुतांश लोक अडाणी, भोळेभाबडे. फार संपन्न नसले तरी खाऊन पिऊन सुखी असलेले या गावातील लोक. अचानक एक दिवस जांभळी गावासह आजूबाजूच्या काही छोट्या खेड्यांची जमीन संपादित करून सरकार धरणाचा प्रकल्प घोषित करते. आता आपलं गावच धरणाखाली जाणार म्हणजे आपली जमीन, आपले घर, आपला परिसर आपले लोक या सर्वांना सोडून कुठल्यातरी परमुलुखात आयुष्याची घडी बसवायला जायला लागणार या एकाच विचाराने गावचे स्वास्थ्य बिघडायला चालू होते, लोक काळजीत पडतात. त्यांचं उरलेलं आयुष्य आणि पुढच्या सर्व पिढ्या एक "धरणग्रस्त", "विस्थापित" म्हणून जगायला भाग पडणार. का? कशासाठी? तर त्या धरणाच्या पाण्यावर इतरांचे मळे फुलवण्यासाठी, स्वतः अंधारात राहून इतरांना प्रकाश देण्यासाठी! एका धरणग्रस्त गावातूनच आपल्या नोकरीचा श्रीगणेशा करणारे जांभळी गावातीलच खैरमोडे गुरुजी या प्रकल्पाला विरोध करतात आणि लोकांनी याविरोधात आवाज उठवावा यासाठी प्रयत्न चालू करतात. कारण अशा धरणग्रस्त लोकांचे प्रश्न कसे वर्षानुवर्षे सुटत नाहीत, त्यांची अक्खी पिढी कशी या धरणामुळे बरबाद होते हे त्यांनी अगदी जवळून पाहिलेलं असतं. आपल्या गावाचे, गावातील लोकांचे असे होऊ नये यासाठी ते निर्धाराने विरोध करतात आणि एक चळवळच उभी करतात. धरण होणार हे निश्चित आहे हे गुरुजींना माहित असल्याने त्यांचा लढा असतो तो गावकऱ्यांच्या होणाऱ्या पुनर्वसनासाठी. आधी पुनर्वसन आणि मग धरण असा त्यांचा आग्रह असतो कारण सरकारचे प्राधान्य धरण बांधण्यास आहे आणि त्यानंतर पुनर्वसन कायमचं लटकत राहणार हे मागच्या किती तरी धरणांच्या बांधणीतून सिद्ध झालेलं असतं. या संघर्षात गुरुजी आणि त्यांची ही चळवळ काही मोजक्याच लोकांच्या विकासातील अडथळा ठरू लागते आणि त्याची परिणती गुरुजींना त्यांच्या सहकाऱ्यांसोबत होणाऱ्या तुरुंगवसात होते. पोलिसांच्या बंदोबस्तात धरणाचे काम सुरु होते. तरीही लोकांच्या भल्यासाठी गुरुजींचा या प्रकल्पाला विरोध चालूच राहतो. सरकारकडून आणि त्या जिल्ह्यातील खासदाराकडून गावातील लोकांना दररोज नव-नवी आमिषे दिली जातात. शेवटी योग्य पुनर्वसन आणि धरणग्रस्तांना नोकऱ्या या घोषणेनंतर गावकऱ्यांचा विरोध थोडा कमी होतो. त्यानंतर चालू होतो या प्रकल्पाचा नवीन अध्याय - "भूसंपादन"! भूसंपादन सुरु होते, सरकारी अधिकारी गावात येऊन जमिनी घरदार यांची मोजणी करून मुल्यमापन सुरु करतात आणि सुरुवात होते भ्रष्टाचाराला. गावातील सधन आणि राजकारणी लोकांकडून जेव्हा आपल्याच लोकांची एकप्रकारे लूट चालू होते तेव्हा खूप वाईट वाटतं. शेतकऱ्याचं कर्ज परस्पर कापून घेऊन सरकारकडून त्यांना पैसा मिळायला चालू होतो. अशाच एका भूसंपादनानंतर एका शेतकऱ्याला त्याच्या वडिलांचे कर्ज कापून, उरलेली रक्कम परस्पर अल्पबचत योजनेसाठी ठेऊन सरकारकडून शेवटी जेव्हा फक्त ५० रुपये हातात मिळतात तेव्हा या लोकांच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलं असेल याचा अंदाज न केलेलाच बरा. गावातल्या जमिनीचं मुल्यांकन, तिचा मोबदला, त्या गावातून नव्या गावात जाण्यासाठीची व्यवस्था, नव्या गावात जमिनी आणि घरासाठीच्या जागांचे वाटप, तिथे घर बांधण्यासाठी मिळणारी मदत, तिथल्या सुविधांची बांधकामे, या सगळ्या गोष्टीत फक्त घोटाळेच होत राहतात. या सर्वांत कारण नसताना भरडला जातो तो असा माणूस जो इतरांच्या सुखासाठी स्वतःच्या आयुष्याचं मातेरं करून घेतो. भ्रष्टाचारानंतरची या धरणग्रस्तांची ही ससेहोलपट इथेच संपत नाही. नव्या ठिकाणी ज्या जमिनी धरणग्रस्त लोकांना देण्यासाठी नोंद झालेल्या असतात त्या आपल्या जमिनी तेथील मूळ मालक काही न काही कारणाने काढून घ्यायला सुरुवात करतात, त्यासाठी कोर्टात सरकार विरुद्ध खटले दाखल करतात. याची परिणीती या धरणग्रस्तांचं पुनर्वसन लांबण्यात होते. शेवटी धरणग्रस्तांना निकृष्ट जमिनी मिळतात. राहण्यासाठी गावाबाहेर खराब जागा मिळते. ज्यांच्या त्यागामुळे आपल्या गावात धरणाचं पाणी आलं त्या लोकांनाच मिळणारी अशी वाईट वागणून पाहून मनाला चिरे पडतात. गुरुजींच्या नेतृत्वाखाली असणारा पुनर्वसनाच्या विरोधातील लढा त्यांच्या अखेरपर्यंत लढला जातो पण तरीही त्यांच्या पुढच्या पिढ्यांची "झाडाझडती" अखंड चालूच राहते.

धरणासारख्या गोष्टीचा हजारो लोकांच्या आयुष्यावर होणारा तितकाच मोठा परिणाम कोणत्याही प्रकारची अतिशयोक्ती न होऊ देता विश्वास पाटलांनी ज्या पद्धतीने आपल्यासमोर आणला आहे त्याला खरंच तोड नाही. मेलेल्या माणसाच्या टाळूवरील लोणी खाणारे राजकारणी, स्वतःच्या फायद्यासाठी आपल्याच लोकांना देशोधडीला लावणारे काही मोजकेच स्वार्थी लोक, अतिशय टोकाचा अन्याय होऊन सुद्धा आपल्यामुळे इतर लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन निर्वासित होऊन राहणारे 'धरणग्रस्त' अशा बऱ्याच गोष्टींमधून विश्वास पाटील यांनी वाचकाला अंतर्मुख केलं आहे. कादंबरी वाचून झाल्यानंतर आपल्या वाट्याला आलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबासोबत अशा लाखो "धरणग्रस्तांचा" विचार नकळत आपल्या डोक्यात येत राहतो हेच या कादंबरीचं यश आहे. संग्रही घेऊन आवर्जून वाचवीच अशी वास्तववादी कादंबरी "झाडाझडती".





संदीप प्रकाश जाधव

Wednesday, January 5, 2022

"पॅपिलॉन"

 



लेखक : हेन्री शॅरीयर

प्रकाशक : श्रीराम बुक एजन्सी

मराठी अनुवाद : रवींद्र गुर्जर

पृष्ठे- ३८९, मूूल्य- ३५० रुपये


वाचन चालू केल्यापासून आजपर्यंत बऱ्याच प्रेरणादायी आत्मकथा वाचून काढल्या. बहुतांशी आत्मकथा किंवा आत्मचरित्रांमध्ये नेहमीच एक समान धागा असतो, तो म्हणजे  अतिशय खडतर आणि प्रतिकूल परिस्तिमध्ये स्वतःला घडवून जगासमोर सिद्ध करणाऱ्या व्यक्तीमत्वांच्या आयुष्याचा प्रवास! माझ्या वाचनात आलेलं याचं सर्वांत चांगलं आणि अतिशय प्रेरणादायी उदाहरण म्हणजे 'आनंद यादव' यांचं आत्मचरित्र! "पॅपिलॉन" ही हेन्री शॅरीयर यांची आत्मचारित्रात्मक कादंबरी मात्र याला थोडी अपवाद आहे. या पुस्तकाबद्दल खूप काही ऐकल्यानंतर ते खरेदीही केलं पण एका गुन्हेगाराची आत्मकथा वाचावी की नको याच विचारात बरेच दिवस हे पुस्तक पडून होते. आज जेव्हा वाचून झालं तेव्हा जाणवलं की आत्मविश्वास, धाडस आणि बळकट शरीराच्या जोरावर मनुष्य किती सामर्थ्य दाखवू शकतो हे जवळून अनुभवायचं असेल तर प्रत्येकाने हे पुस्तक वाचलंच पाहिजे. "पॅपिलॉन"चा फ्रेंच भाषेतील अर्थ फुलपाखरु! हेन्री शॅरीयरचं हे गुन्हेगारी जगतातील टोपण नाव. तरुण वयात गुन्हेगारी जगतात येण्यापूर्वी शॅरीयर यांनी नौदलात काम केलं होतं नंतर पुढे मनुष्यवधाच्या खोट्या गुन्ह्यात अटक होऊन त्यांना फ्रान्सच्या न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा झाली. पंच आणि खोट्या साक्षीदारांमुळे हेन्री हा समाजाला कसा घातक आहे, त्याला समाजापासून दूरच ठेवणं कसं भल्याचं आहे हे न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर गयानाच्या नरकासमान तुरुंगात हेन्रीची रवानगी झाली. आपल्यावर झालेल्या या अत्याचाराचा बदला घायचा या एकाच वेडापायी हेन्रीने  तुरूंगातून पळून जाण्यासाठी तब्बल ७ अयशस्वी प्रयत्न केले आणि ८ व्या प्रयत्नात तो यशस्वी झाला. या सुटकेच्या प्रवासात त्यांनी केलेली धडपड, हजारो मैलांचा थरारक समुद्रप्रवास आणि प्रत्येक अयशस्वी पलायनानंतर त्यावेळची त्यांच्या मनाची अवस्था याचा अतिशय रोमांचकारी अनुभव आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळेल. हेन्री शॅरीयर यांची ही आत्मकथा म्हणजे त्यांचा 'अटक ते मुक्ती' हा प्रवास आहे. तुरुंगातील वातावरण, तेथील कैदी, त्यांचे राहणीमान, त्यांची वर्तणूक या सर्वांतून एक वेगळं जगच त्यांनी अतिशय खुमासदार शैलीत आपल्या या आत्मचरित्रात्मक कादंबरीतून जगासमोर आणलं आहे. रवींद्र गुर्जर यांनी तितक्याच प्रभावीपणे याचा मराठी अनुवाद केला आहे जो वाचकाला शेवटपर्यंत हेन्रीच्या या थरारक प्रवासात गुंतवून ठेवतो. वाचनाला सुरुवात केल्यानंतर वाचक त्या कादंबरीत इतका हरवून जातो की त्याला काळ-वेळ कशाचेही भान राहत नाही. एकवेळ तर अशी येते की वाचक विसरूनच जातो की आपण एका गुन्हेगाराचा जीवनप्रवास वाचत आहोत. 'पॅपि' ने केलेले प्रयत्न, त्याचं नशीब, चिकाटी, संयम, चारित्र्य, प्रामाणिकपणा, सचोटी, संघभावना, जीवापाड प्रेम, मैत्री, त्याग, वचन या सर्वांतून गुन्हेगाराच्या आतमध्ये असणारा एक वेगळाच माणूस वाचकांसमोर उभा राहतो. फ्रान्समधे कैद्यांना मिळणारी अतिशय हीन वागणूक आणि त्यांच्यावर होणारा अत्याचार यांच्या वर्णनातून एका कैद्याचं आयुष्य किती भयंकर असू शकतं हेदेखील या आत्मकथेच्या माध्यमातून हेन्री यांनी लोकांसमोर आणलं आहे. तुरुंगवासातील या अंधःकारमय जगातून बाहेर पडण्यासाठी 'पॅपिने' केलेले तब्बल ७ प्रयत्न अयशस्वी होतात आणि या सातही प्रयत्नांमधील त्याचे अनुभव आपल्याला स्वातंत्र्याची किंमत शिकवून जातात. सुटकेच्या प्रयत्नांत 'पॅपि' ज्या विविध बेटांवर जातो तिथे भेटलेल्या लोकांबद्दल वाचताना कळतं की आपलं दुःख तर यांच्यापुढे खुपच क्षुल्लक आहे. अशा बेटांवरील बऱ्याच लोकांनी केवळ हेन्रीच्या स्वभावामुळे आणि त्याच्या प्रचंड आत्मविश्वासामुळे त्याला अनेक प्रकारे मदत केली. 'पॅपिने' देखील इतरांना दिलेला शब्द कधीच मोडला नाही. सुटकेच्या या सर्व प्रयत्नांत पॅपिची त्याच्या मित्रांसोबत अनेकवेळा ताटातुट झाली, काही मित्र कायमचे दुरावले गेले, काहींचा मृत्यु झाला परंतु त्यांच्यातील मैत्री कधीच तुटली नाही. या छोट्या-छोट्या गोष्टी वाचकाला खूप काही शिकवून जातात. पॅपिने सुटकेसाठी केलेल्या ८ व्या प्रयत्नात त्याच्या साथीदाराचा एका छोट्याशा चुकीमुळे होणारा मृत्यू आयुष्यात संयम किती महत्वाचा आहे हे नकळत आपल्याला सांगून जातो. पॅपिलॉन खरंच फुलपाखरासारखं आयुष्य जगला जे ही कादंबरी वाचत असताना पाना-पानावर जाणवत राहते. पॅपिलॉनच्या यशस्वी पलायनानंतरच्या आयुष्यावर बेतलेल्या "बँको" या कादंबरीबद्दल देखील आता खूप उत्सुकता वाढली आहे. पॅपिलॉनचा "बँको" मधील हा प्रवास देखील नक्कीच वाचण्यासारखा असणार यात शंकाच नाही.

शेवटी पॅपिलॉनने दिलेला आणखी एक चांगला संदेश - "अडचणींच्या काळात आपल्या मनात सतत वेगवेगळे विचार येत राहतात, सतत अपयशाची भीती वाटत राहते प्रत्येकवेळी आपल्या विचारांवर आपला ताबा असतोच असं नाही. त्यामुळे अशावेळी ते विचार दाबून टाकण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्या विचारांची दिशा बदलावी कारण प्रवाहाला थोपवणं हे अत्यंत कठीण असतं पण त्याला दिलेली योग्य दिशा माणसाचं आयुष्य बदलू शकतं." 

आत्मविश्वास, बळकट शरीरसंपदा आणि अशक्य वाटणार्‍या गोष्टी करण्याचं धाडस यांच्या जोरावर एक माणूस आयुष्यात किती प्रचंड साहस करू शकतो हे 'पॅपिलॉन' वरून समजेल. प्रत्येकाने संग्रही घेऊन आवर्जून वाचावं असं पुस्तक!





संदीप प्रकाश जाधव

Saturday, December 25, 2021

"तिसरा डुळा"

 


लेखक : किरण येले

प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन

                                                                           पृष्ठे- १९२, मूूल्य- २५० रुपये.

माणूस आणि प्राण्यांमध्ये निसर्गाने जर सर्वांत मोठा फरक कोणता ठेवला असेल तर तो म्हणजे माणसाची विचार करण्याची ताकद! "Survival of the Fittest” हा सृष्टीचा नियम आहे. जो बलवान आहे, प्रतिकूल परिस्थितीत तग धरु शकतो, त्यालाच या जगात जगण्याचा अधिकार आहे असे हा नियम सांगतो. आपण पाहतो की प्राण्यांमधे बलवान नर म्हाताऱ्या नराला पळवून कळपाचा ताबा घेतो. जनावरांचे कळप नव्याने जन्मलेल्या पिल्लांना मध्यभागी ठेवतात आणि म्हाताऱ्या तसेच आजारी प्राण्यांना मागे ठेवत प्रवास करतात. हेतू हा असतो की एखाद्या हिंस्त्र प्राण्याने हल्ला केला तर या नको असलेल्या प्राण्यांचा आधी बळी जावा. असे प्राणी मागे राहिले तर कळप त्यांना टाकून पुढे निघून जातो. माणसाचे वेगळेपण इथेच आहे! थकलेल्या, आजारी, कमकुवत माणसांना मध्यभागी ठेवत त्यांना तगवण्याचा, जगवण्याचा प्रयत्न करतो तो `माणूस’ अशी खरेतर माणूसपणाची व्याख्या आहे. पण हजारो वर्षांपासून समाजप्रिय म्हणून राहणाऱ्या या मानवरूपी प्राण्याची आजची वैचारिक पातळीच त्याने बनवलेल्या या समाजव्यवस्थेची आज सर्वांत मोठी शत्रू झाली आहे हे अगदी प्रकर्षाने जाणवले किरण येले यांचा "तिसरा डुळा" हा कथासंग्रह वाचत असताना! बऱ्याच दिवसांनंतर डोकं आणि मन सुन्न करणारं काहीतरी दर्जेदार साहित्य वाचनात आलं. आजच्या भावनाशून्य जगात माणसाला आपल्या आसपास घडणाऱ्या बऱ्याच घटना बघण्यासाठी आणि आपल्या खालावत जाणाऱ्या वैचारिक पातळीला पुन्हा एकदा सावरण्यासाठी आवश्यक असणारा 'तिसरा डोळा' उघडण्याची ताकद किरण येले यांच्या "तिसरा डुळा" या कथासंग्रहात आहे. या कथासंग्रहात असणारी प्रत्येक व्यक्तिरेखा कधी ना कधी आपल्या सर्वांच्या अनुभवात येऊन गेली आहे. आपल्या आसपासच्या जगात वावरणाऱ्या या व्यक्तिरेखा कितीही परिचयाच्या वाटल्या तरी अशा लोकांचं जग आणि त्यांचं जगणं यांच्याशी कधीही आपल्याला देणं-घेणं नसतं. त्यामुळंच त्यांचं सुख, दुःख, वेदना, हसणं आणि हसत हसत आयुष्याशी लढणं आपल्याला कधी माहीत होत नाही. फोटो फ्रेमचं दुकान असलेला हारुन, रोजंदारीवर काम करणारा जमील, साई मंदिराच्या दारात भीक मागून जगणारा धनकू, कचरा वेचणारी रखमा, मुसलमान असूनही हनुमान चालीसा म्हणणारा ईस्साक आणि जत्रेत रस्त्यावर महादेवाचं चित्र काढून स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरणारा जगल्या अशा या कथासंग्रहातील प्रत्येक व्यक्तिरेखा वाचकाला अस्वस्थ करतात. किरण येले यांनी वाचकांपुढे उभी केलेली या पुस्तकातील प्रत्येक व्यक्तिरेखा म्हणजे आपल्या समाजव्यवस्थेवर मारलेली एक चपराकच आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी असो वा स्वतःचं वेगळेपण सिद्ध करण्यासाठी असो गरीब तसेच परिस्तिथीने पिचलेल्या आपल्याच समाजबांधवांना पायाखाली घेण्याची काही लोकांची वृत्ती आपल्या मनात बरेच प्रश्नदेखील उपस्थित करते ज्यांची उत्तरं देण्याचं बळ आजतरी आपल्याजवळ नाही. समाजाचाच एक भाग असूनही समाजापासून अलिप्त राहणाऱ्या लोकांना वाचक या "तिसऱ्या डुळ्याने" अनुभवत राहतो आणि शेवटी न संपणाऱ्या विचारचक्रात हरवून जातो.

किरण येले यांनी अतिशय उत्तम पद्धतीने सर्व कथांची मांडणी केली आहे. संग्रहातील काही कथांना हिंदू-मुस्लिम दंगलीची पार्श्वभूमी दिली आहे, ज्यामधे धर्माच्या नावाखाली चालणारं चीड आणणारं राजकारण आपल्या डोळ्यासमोर येतं. या कथा वाचत असताना नकळत आपण आजच्या परिस्थिसोबत कथेतील पात्रांची तुलना करू लागतो आणि त्या पात्रांच्या रूपातील आपल्या आसपासचे चेहरे डोळ्यासमोर आणण्याचा एक केविलवाणा प्रयत्न करू लागतो. 'हारुन फ्रेम वर्क्स' मधे या दंगलीचं लोण हारुनच्या दुकानापर्यंत, घरापर्यंत  पोहोचतं आणि नंतर त्याचं अस्तित्वच गिळून टाकतं, उरते ती फक्त राख! 'ईस्साक पक्का हिंदू होता' कथेतला हनुमान चालीसा म्हणणारा ईस्साकही धर्माच्या या चक्रात भरडला जातो. 'जावेद जिवंत आहे' या कथेत नूर हॉटेलचा मालक नूर, जमील, जमीलशी निकाह करून मुसलमान झालेली रखमा, उस्मान, नवीनभाई अशा व्यक्तिरेखांमधून पुढे सरकत शेवटी जेव्हा जावेद कोण हे वाचकाला समजते तेव्हा एक अनामिक भीती वाचकाला स्पर्शून जाते. 'झुंबर' कथेत भेटतात धनकू, दगडूशेठ, शेठच्या मुलाची ती लग्नाची वरात. लग्नाच्या या वरातीमध्ये धनकूच्या डोक्यावर आहे लखलखतं झुंबर; दारिद्र्याचं! मिरवणुकीत धनुकच्या डोक्यावरील हे 'झुंबर' कोसळतं ते धनकूला घेऊनच. 'प्रॉपर्टी एक्झिबिशन' या कथेत बंद पडलेल्या फॅक्टरीचे सांगाडे, त्यांना चिकटलेलं कामगारांचं रक्त, घाम आणि तिथं उभी राहणारी टॉवर संस्कृती वाचकाला अस्वस्थ करते. या कथासंग्रहातील शेवटची कथा आहे 'तिसरा डुळा'. जत्रेत डोंबारी खेळ करणारी मंगळी आणि रस्त्यावर शंकराचं चित्र काढणाऱ्या जगल्याचा मुलगा यांची ही कथा. जगल्या मेल्यावर मंगळीवर उपासमारीची वेळ येते आणि तेव्हाच तिला जो मार्ग सापडतो त्यातून जन्माला येणारी ही शेवटची कथा. शंकरासारखं डमरू वाजवणाऱ्या, तांडव करणाऱ्या, शंकराची गाणी पाठ असणाऱ्या म्हादूला शंकराचं सोंग बनवून पैसे कमवण्याचा विचार मंगळीच्या डोक्यात येतो आणि त्यानंतर शंकरावर प्रचंड भक्ती असलेल्या आपल्या मुलाला, म्हादूला शंकर बनवून जत्रेत फिरवायला चालू केल्यानंतर जे होतं ते म्हणजे "तिसरा डुळा".

आवर्जून वाचावा असा कथासंग्रह "तिसरा डुळा"!




संदीप प्रकाश जाधव


Tuesday, December 14, 2021

"महानायक"

 



लेखक : विश्वास पाटील

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

                                                                           पृष्ठे- ६९३, मूूल्य- ५२५ रुपये.


"पानिपत" या आपल्या पहिल्या कादंबरीच्या माध्यमातून घराघरात पोहचलेल्या विश्वास पाटील या नावाला तसं स्वतंत्र परिचयाची गरज नाही. फक्त मराठीतच नाही तर इतरही भाषांमधील त्यांचं अनुवादित साहित्य लोकांनी डोक्यावर घेतलं. 'पानिपत' नंतर 'झाडाझडती' आणि 'पांगिरा' या त्यांच्या कादंबऱ्यादेखील मी वाचल्या. मराठ्यांच्या शौर्याची गाथा सांगणारी 'पानिपत', धरणग्रस्तांच्या उध्वस्त जीवनाचा जवळून परिचय करून देणारी 'झाडाझडती' आणि पाण्यासारख्या ज्वलंत विषयावर लिहिलेली, दुष्काळाचं विदारक चित्रण करणारी 'पांगिरा' या तीनही कादंबऱ्यांतून त्यांनी वाचकाच्या मनाला हात घातला. कादंबरीच्या माध्यमातून तो काळ किंवा त्या व्यक्तिरेखा वाचकांच्या समोर उभं करण्याचं सामर्थ्य असणाऱ्या मोजक्याच लेखकांची यादी विश्वास पाटील या नावाशिवाय पूर्णच नाही होऊ शकणार. "महानायक" ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर बेतलेली विश्वास पाटील यांची चरित्रात्मक कादंबरी मी बऱ्याच महिन्यांपूर्वी घेऊन ठेवली होती पण तिचा आवाका पाहूनच ठरवलं की ही निवांत वेळ काढूनच वाचली पाहिजे. खरंतर लहानपणापासूनच मला नेताजींबद्दल प्रचंड कुतूहल होतं, प्रत्येक सार्वजनिक किंवा शाळेतील एखाद्या कार्यक्रमात फोटोपूजनाच्या वेळी 'गांधीजी' आणि 'शिवाजी महाराजांसोबत' पुजल्या जाणाऱ्या तिसऱ्या फ्रेममधील पोलीसी वेशातील त्या गुटगुटीत हसऱ्या चेहऱ्याबद्दल नेहमीच एक कमालीचं आकर्षण वाटायचं. पण इतर असंख्य दुर्दैवी भारतीयांप्रमाणेच या थोर व्यक्तीबद्दल खूपच कमी माहिती असणाऱ्यांपैकी मी एक होतो. नेताजींबद्दल पसरणाऱ्या ऐकीव कथा आणि अफवांतून ते भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील एक गूढ पात्र बनून गेले. स्वातंत्र्याच्या इतिहासात जितकं इतर स्वातंत्र्य सैनिकांवर लिहिलं गेलं तितकं कधी नेताजींबद्दल लोकांपर्यंत पोहचलच नाही त्यामुळेच असेल कदाचित की या थोर देशभक्ताबद्दल माहिती नसणारे असंख्य भारतीय आजही सापडतील. विश्वास पाटील यांनी "महानायक" च्या माध्यमातून नेताजींचा अतिशय प्रेरणादायी जीवनप्रवास लोकांसमोर आणला आहे. भारताच्या अखेरच्या स्वातंत्र्यसंग्रामात कर्तृत्व गाजविणाऱ्या एका महानायकाच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि जीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न त्यांनी या कादंबरीतून केला आहे. नेताजींच्या आयुष्यातील बऱ्याच प्रसंगांचं अतिशय बारीक वर्णन या कादंबरीत आपल्याला वाचायला मिळेल. सुभाषचंद्र बोस यांच्या नाट्यमय आणि संघर्षपूर्ण जीवनावर आधारलेल्या या कादंबरीत महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचे परस्पर संबंध, नेताजींचे गुरू देशबंधू चित्तरंजनदास आणि सुभाषचंद्र बोस यांचं नातं, नेताजींच्या प्रत्येक कार्यात त्यांचे वाडीलबंधू शरदचंद्र यांचा असणारा पाठिंबा, तब्बल ११ वेळा नेताजींना झालेला तुरुंगवास, नेताजींचं आजारपण, अवघ्या ८ महिन्यांच्या तयारीतून ISS ची परीक्षा उत्तीर्ण होऊन क्लास वन दर्जाची ब्रिटिशांची नोकरी लाथाडणारे नेताजी, गांधींसारख्या मोठ्या आणि देशव्यापी नेत्यासमोर स्वतःची वेगळी प्रतिमा तयार करून त्यांना पर्याय म्हणून समोर येणारे नेताजी, सुभाषचंद्र बोस हे ब्रिटिश साम्राज्याचे क्रमांक एकचे शत्रू आहेत असं ठरवून त्यांना झालेली नजरकैद, आपल्या मातृभूमीला गुलामगिरीतून सोडवण्यासाठी नजरकैदेतून निसटून देशाबाहेर जाण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास, बाह्यजगाकडून मदत मिळवण्यासाठी नेताजींनी केलेली प्रचंड धडपड, हुकूमशाह हिटलरसोबतची भेट, आझाद हिंद सेनेची स्थापना, नेताजींचं वैवाहिक जीवन, त्या वेळेची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिस्थिती, भारतीय स्वातंत्र्य लढा, आझाद हिंद सेनेतील नेताजींच्या सहकार्‍यांनी केलेला त्याग, तत्कालीन वास्तवाला असलेले विविध आयाम, नेताजींची मानसिक, भावनिक आणि वैचारिक आंदोलने आणि शेवटी झालेला त्यांचा दारुण अंत या सर्वांचे अगदी तपशीलवार वर्णन आहे ज्यातून विश्वास पाटील यांनी घेतलेली प्रचंड मेहनत लक्षात येते. आपल्या मातृभूमीला इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त करायचा एकच ध्यास घेऊन अर्ध जग पालथं घालणाऱ्या या 'महानायकाचा' त्यांच्या शालेय जीवनापासून ते त्यांच्या अपघाती मृत्यूपर्यंतचा धगधगता आणि तितकाच प्रेरणादायी प्रवास म्हणजे ही कादंबरी "महानायक"! अडतीस कोटी देशबांधवांची गुलामगिरीतून मुक्तता या ध्येयासाठी एका कडव्या आणि लढवय्या देशभक्ताने अर्ध्या जगात मारलेली गरुडभरारी म्हणजे ही कादंबरी "महानायक"! आयुष्यभर स्वकीयांशी आणि ब्रिटिश साम्राज्यासारख्या परकियांशी संघर्ष करणाऱ्या नेताजींना एक व्यक्ती न मानता एक राष्ट्र म्हणून भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी जर्मनी-जपान ने केलेल्या मदतीनंतर इंफाळ-कोहिमा- ब्रम्हदेशच्या अरण्यात जुंपलेला घनघोर रणसंग्राम म्हणजे ही कादंबरी "महानायक"! खरंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची झळाळती कारकीर्द ७०४ पानांपुरती मर्यादित नक्कीच नाही पण तरीही विश्वास पाटील यांची ही कादंबरी वाचल्यानंतर वाचक नेताजींना मनोमन वंदन केल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.

देशोदेशींच्या दफ्तरखान्यात आजवर अडकून पडलेल्या दुर्मिळ दस्तावेजांचा, नव्याने संशोधन केलेल्या कागदपत्रांचा अभ्यास करून आणि आझाद हिंद सेनेने तुडवलेल्या त्या 'रणवाटां'वरून भ्रमण करून विश्वास पाटील यांनी चितारलेली, प्रत्येकाने आवर्जून वाचलीच पाहिजे अशी नेताजींची अपरिचित जीवनकहाणी "महानायक"!!!






संदीप प्रकाश जाधव

Tuesday, December 7, 2021

"ग्रहण"

 


लेखक : नारायण धारप

प्रकाशक : साकेत प्रकाशन

                                                                           पृष्ठे- २२३, मूूल्य- २५० रुपये.


भयकथा असोत की गूढकथा नारायण धारप आणि रत्नाकर मतकरी या दोन नावांचा विचार डोक्यात आल्याशिवाय मराठी वाचक पुढे जाऊच शकत नाही! मराठी साहित्यविश्वात गूढकथा आणि भयकथा हा साहित्य प्रकार खऱ्या अर्थाने समृद्ध केला असेल तर तो या दोन व्यक्तींनीच! या दोन दिग्गजांची तुलना करणं तसं चुकीचंच होईल कारण दोघांचीही वाचकाला गुंतवून ठेवण्याची शैली वेगळी आहे पण दोघांमध्ये समान धागा जर कोणता असेल तर तो त्यांची प्रचंड कल्पनाशक्ती! दोघांनीही त्यांच्या प्रचंड कल्पनाशक्तीच्या जोरावर लिहिलेले एकाहून एक कथासंग्रह, कादंबऱ्या आजही वाचकाला भुरळ घालतात. तरीही मला जास्त आकर्षित करतात ती धारपांचीच पुस्तके. आपल्या खास लेखनशैलीने वाचकाला रहस्यकथेचाच एक भाग बनवून टाकण्याची त्यांची जादू खासच! पुढे काय होणार या उत्सुकतेने वाचक त्या कथेसोबतच जोडला राहतो. धारपांची जवळपास ६-७ पुस्तके आजपर्यंत मी वाचली आणि आणखीन बरीच संग्रहीदेखील घेऊन ठेवली आहेत पुढच्या 'मेजवानीसाठी'. याच पुस्तकांच्या पंक्तीमधील वाचून हातावेगळी केलेली एक भन्नाट रहस्य कादंबरी "ग्रहण"! एखाद्या गूढ चित्रपटाला लाजवेल असं कथानक! कादंबरीच्या चौथ्याच पानावर धारपांनी वाचकाला असा काही जबरदस्त धक्का दिला आहे की कादंबरी पूर्ण वाचल्याशिवाय ती बाजूलाच नाही ठेवता येणार. जवळपास निम्म्याहून अधिक कथा पुढे गेल्यानंतरही वाचक या धक्क्यातून बाहेर नाही येत. अगदी नेहमीप्रमाणे होणारी या कथेची सुरुवात. आपला नवरा अरविंद आणि दोन मुलांसोबत स्वतःच्या प्रशस्त वाड्यात आनंदाने राहणाऱ्या मिसेस पोतदार यांच्याभोवती फिरणारी या कादंबरीची गूढकथा. एके संध्याकाळी मुलांसाठी आईस्क्रीम आणण्याच्या निमित्ताने वाड्यातून बाहेर पडलेल्या मिसेस पोतदारांच्या आयुष्यात वाड्यापासून अवघ्या १०० पावलांवरील दुकानातून परतत असताना असा काही प्रकार घडतो की त्यांच्या पुढच्या आयुष्यालाच कलाटणी मिळते आणि या घटनेने धारपांनी ज्या पद्धतीने वाचकाला सुरुवातीलाच सुन्न करून सोडलं आहे त्याला तोड नाही. ही कथा पुढे हळूहळू उलगडत जाताना कथेत होणारा इतर पात्रांचा प्रवेश जसे सारंग आणि त्याचं कुटुंब सोबतच डॉ. शेखर आणि त्याचं कुटुंब शिवाय मिसेस पोतदारांच्या दोन समांतर आयुष्यातील इतर पात्रे या सर्वांत वाचक असा काही अडकून जातो की नकळत वाचकाच्या डोक्यातही एक विचारचक्र चालू होते ज्यात मिसेस पोतदार नेमक्या कोण आहेत? त्या कुठून आल्या आहेत? त्यांच्यासोबत पुढे काय होईल? त्यांचं कोणतं आयुष्य नेमकं खरं असेल? आईस्क्रीम आणायला जाण्यापूर्वीचं की ते घेऊन परत येताना समोर आलेलं नवीन आयुष्य? त्यांच्या आयुष्यातील कोणत्या व्यक्ती खरेच अस्तित्वात असतील? हेच विचार नाचत राहतात. मिसेस पोतदारांची ही कथा पुढे सरकत असताना इतरही अनेक ठिकाणी धारपांनी वाचकांची मती गुंग केली आहे जसे मिसेस पोतदारांच्या आधीच्या आयुष्यात आईचे होणारे निधन आणि या नवीन आयुष्यात त्यांच्या वडिलांचं अस्तित्वात नसणं, बँकेत अचानकच अरविंदचं तिच्या समोर येणं, नंतर अरविंदच्या वेगळ्या आयुष्याची होणारी ओळख, पूर्वायुष्यातील आपल्या घरी शहानिशा करण्यासाठी गेल्यानंतर तिच्या आईनेच तिला नाकारणे परंतु टायगर या त्यांच्या घरातील कुत्र्याकडून होणारं विचित्र वर्तन या सर्व गोष्टी कथेतील रहस्य आणखीनच वाढवतात. एक अतिशय गूढ रहस्य आपल्या डोळ्यासमोरून उलगडत जात असल्याचा अनुभव धारपांनी त्यांच्या खास शैलीतून वाचकांना करून दिला आहे.

गूढकथा - रहस्यकथा वाचनाची आवड असणाऱ्यांनी आवर्जून वाचण्यासारखी कादंबरी "ग्रहण".





संदीप प्रकाश जाधव



Tuesday, November 30, 2021

"राऊ"

 



लेखक : ना. सं. इनामदार

प्रकाशक : कॉन्टिनेन्टल प्रकाशन

                                                                           पृष्ठे- ४८३, मूूल्य- ४०० रुपये.


मराठी साहित्यविश्वातील पहिल्या १० ऐतिहासिक कादंबरींची जर यादी बनवायची म्हटलं तर ना.सं.इनामदार यांच्या "राऊ"चा उल्लेख त्यात आवर्जून करावाच लागेल. बाजीराव म्हटलं की मस्तानी हे नाव आपसूकच ओठांवर येतं. आजच्या पिढीत असे बरेच लोक सापडतील ज्यांना मस्तानीच्या पलीकडे बाजीराव माहीतच नाही पण खरं तर मस्तानी हे प्रकरण बाजीराव पेशव्यांच्या झळाळत्या कारकिर्दीतील फक्त एक पान होतं. अवघं ४१ वर्षांचं आयुष्य! २० वर्षांची वादळी कारकीर्द आणि त्यात लढलेल्या ४० लढायांपैकी एकही लढाई न हरलेला एक थोर सेनानायक म्हणजे बाजीराव पेशवा! मराठा साम्राज्याची विजयी पताका चारी दिशांना फडकवणाऱ्या, मराठा साम्राज्याचा विस्तार करणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीमहाराज यांचा संकल्प पुढे नेऊन महाराष्ट्राला ४०० वर्षं वाकुल्या दाखवणारी दिल्ली काबीज करणाऱ्या या शूरवीराच्या जीवनात सौंदर्यवती मस्तानीने प्रवेश केला आणि एकच वादळ उठले. त्याच वादळाला केंद्रस्थानी ठेवून इनामदार यांनी ही कादंबरी लिहिली आहे. थोरले बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्यातील नाते जरी या कादंबरीच्या केंद्रस्थानी असले तरी एका मनस्वी प्रियकरासोबतच राजकारण धुरंधर सेनानीची ओळख आपल्याला लेखकांनी करून दिली आहे. इतिहासातील या वादळी प्रेमकहाणीला कल्पनेची जोड देताना ऐतिहासिक घटनांना कोणताही धक्का लागणार नाही याची पुरेपूर काळजी ना.सं. इनामदार यांनी घेतली आहे. अत्यंत रसाळ, ओघवत्या भाषेत ही प्रेमकहाणी रंगवत असताना बाजीरावांचा पराक्रम, त्यांनी बदलेली युद्धशैली, पायदळ-तोफखाना यांना बाजूला ठेऊन प्रचंड वेगाने शत्रूवर आक्रमण करून त्यांनी लढलेल्या लढाया, त्यांचं राजकारण, थोरल्या महाराजांप्रती असणारी त्यांची श्रद्धा, त्यांची स्वराज्यनिष्ठा, काशीबाई-बाजीरावांचं आणि बाजीराव-चिमाजी अप्पांचं नातं, बाजीरावांचं त्यांची आई राधाबाईंसोबतचं नातं अशा अनेक अंगांना इनामदार यांनी स्पर्श केला आहे. २० वर्षांत लढलेल्या जवळपास ४० हून अधिक लढाया जिंकून अजिंक्य राहणारा हा थोर सेनानी घरातील इतर नाती जपत असताना कुटूंबकलहात अडकून आपल्याच माणसांकडून पराभूत होतो तेव्हा दुःखात व्याकुळ होणारा बाजीरावसुद्धा इनामदारांनी अतिशय ताकदीने रंगवला आहे. काशीबाईंच्या मनात आपल्या पतीविषयीची असणारी प्रतिमा आणि श्रद्धा यांचा मेळ घालताना मस्तानीबद्दल असणाऱ्या बऱ्याच गैरसमजांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न इनामदार यांनी या कादंबरीतून केला आहे. धर्म, जात, रूढी, परंपरा या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन जुळलेली ही प्रेमकहाणी! सत्ता सांभाळत असताना, युद्धभूमीवर आवश्यक असणाऱ्या कणखरपणासोबतच थोरल्या बाजीरावांच्या मनात असलेला त्यांच्या प्राणप्रिय मस्तानीसाठीचा हळवा कोपरादेखील लेखकांनी वाचकांसमोर आणला आहे. नवऱ्याचं वागणं पटत नसलं तरी सामाजिक आणि कौटुंबिक बंधनांमुळे तसेच राऊवर असणाऱ्या श्रद्धेमुळे काशीबाईंची होणारी घुसमट वाचकाच्या मनालाही जाणवत राहते. शनिवार वाड्यातील राजकारण, श्रीमंतांची पत्नी काशीबाई यांची अगतिकता, श्रीमंतांच्या भावंडांचे हेवेदावे, सत्तासंघर्ष हे सर्व असूनही बाजीराव-मस्तानी ही वादळी प्रेमकहाणी बहरतच राहते. कादंबरीची सुरुवात होते शनिवारवाड्याच्या वैभवशाली वास्तू पासून! कादंबरी जसजशी पुढे सरकत जाते तेव्हा जाणवते ही कहाणी फक्त बाजीराव पेशव्यांचीच नाही तर अवघ्या हिंदुस्थानाचं सत्ताकेंद्र असणाऱ्या शनिवारवाड्याचीदेखील आहे. सात मजली शनिवारवाड्याचं कादंबरीतील वर्णन आणि स्थापत्यशास्त्राच्या नमुन्यांतून लेखकांनी वाचकांसमोर ती भव्य वास्तू अक्षरशः जीवंत केली आहे. ना.सं. इनामदारांनी आपल्या शब्दांतून बाजीराव पेशव्यांची संपूर्ण कारकिर्दच वाचकांच्या डोळ्यांसमोर उभी केली आहे. त्यामुळेच की काय १९७४ साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीची जादू आजही कायम आहे.

आजपर्यंत फक्त प्रेमवीर म्हणून रंगवलं गेलेल्या बाजीराव पेशव्यांबद्दलचे विचार बदलायला भाग पाडणारी, आवर्जून संग्रही घेऊन वाचावी अशी कादंबरी "राऊ".






संदीप प्रकाश जाधव


"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये सह्याद्रीचा श्वास आणि पेशवाईचा रक्तरंजित इतिहास: ना...