Wednesday, December 21, 2022

"सुखाचा शोध"

 

लेखक : वि. स. खांडेकर

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

पृष्ठे- ११०, मूूल्य- १५० रुपये

Tuesday, December 6, 2022

"महा सम्राट"

 


लेखक : विश्वास पाटील

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

पृष्ठे- ४४२, मूूल्य- ५७५ रुपये

Monday, December 5, 2022

"सांजवात"


लेखक : वि. स. खांडेकर

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

पृष्ठे- ९०, मूूल्य- १२० रुपये

 

Tuesday, November 29, 2022

"कोहजाद"

 


लेखक : अभिषेक कुंभार

प्रकाशक : NEW ERA पब्लिशिंग हाऊस

पृष्ठे- ४९५, मूूल्य- ४५० रुपये


Friday, November 18, 2022

"शाडूचा शाप"

 

लेखक : नारायण धारप

प्रकाशक : साकेत प्रकाशन

पृष्ठे- १११, मूूल्य- १५० रुपये




Friday, November 4, 2022

"पोटमारा"

 


लेखक : रवींद्र पांढरे

प्रकाशक : लोकवाङ्मय गृह

पृष्ठे- १२८, मूूल्य- १६० रुपये  

Friday, October 21, 2022

"शिकस्त"

 


लेखक : ना. सं. इनामदार

प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन

पृष्ठे- ७०७, मूूल्य- ५०० रुपये  

Wednesday, October 12, 2022

"झेंडूची फुलें"

 


लेखक : प्रल्हाद केशव अत्रे

प्रकाशक : परचुरे प्रकाशन

पृष्ठे- २५७, मूूल्य- २५० रुपये 

Monday, October 10, 2022

"अ‍ॅट एनी कॉस्ट"

 



लेखक : अभिराम भडकमकर

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

पृष्ठे- ३७३, मूूल्य- ३२५ रुपये 

Thursday, September 29, 2022

"देव? छे!" परग्रहावरील अंतराळवीर

 


लेखक : बाळ भागवत

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

पृष्ठे- १७०, मूूल्य- २०० रुपये 

Monday, September 19, 2022

"झुंज"

 


लेखक : ना. सं. इनामदार

प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन

पृष्ठे- ५६८, मूूल्य- ५०० रुपये  


Monday, September 12, 2022

"सूर्याची सावली"


लेखक : नितीन थोरात

प्रकाशक : रायटर पब्लिकेशन

पृष्ठे- २६५, मूूल्य- २९९ रुपये  


 

Tuesday, August 9, 2022

"महायुग"

 

 

लेखक : स्वप्नील सोनवडेकर

प्रकाशक : -

पृष्ठे- २०२, मूूल्य- ३२० रुपये  



Saturday, July 30, 2022

"खंडोबा"

 


लेखक : नितीन थोरात

प्रकाशक : NEW ERA पब्लिशिंग हाऊस

पृष्ठे- ३२७, मूूल्य- ३२० रुपये  


नितीन थोरात यांच्या "खंडोबा" या कादंबरीची सध्या सोशल मेडियावर बरीच चर्चा चालू आहे. रोज एकदा न एकदा कोणाकडूनतरी कादंबरीच्या मुखपृष्ठाचे दर्शन मला होतच होतं तरीही आधीच रांगेत असणाऱ्या 'To Read' च्या यादीमुळे सुरुवातीला या कादंबरीकडं मी थोडंसं दुर्लक्षच केलं पण जसा एक दिवस या कादंबरीचा विषय समजला तेव्हा न रहावून 'To Read' ची यादी बाजूला ठेवली आणि थोरातांचा हा "खंडोबा" वाचायला घेतला! एखाद्या कर्तृत्ववान आणि पराक्रमी माणसाला जेव्हा 'अवतारी' किंवा 'देवमाणूस' हे लेबल चिकटवलं जातं तेव्हा आपसूकच त्या व्यक्तीच्या पराक्रमाकडं दुर्लक्ष व्हायला लागतं आणि रामापासून ते कृष्णापर्यंत याची अनेक उदाहरणे आपल्याला मिळतील. अगदी अलीकडच्या काळातील उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती शिवरायांचं देता येईल. शिवरायांसारख्या महापराक्रमी व्यक्तीला अवतारी पुरुषाच्या चौकटीत बसवून आपण खरं तर त्यांच्या कर्तृत्वार अन्यायच करतोय. या देवत्वाचा पगडाच आपल्या डोक्यावर असा आहे की त्यातून बाहेर पडून आपण कधी अशा महान लोकांकडे बघतच नाही. नितीन थोरात यांनी नेमकं हेच साधलं आहे त्यांच्या "खंडोबा" या कादंबरीतून. हजारो वर्षांपासून ज्याला आपण महादेवाचा अवतार म्हणून पूजत आलोय, अखंड महाराष्ट्राचं अराध्य दैवत म्हणून लाखो भाविक आजही ज्याच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर रांगा लावतात त्या "खंडोबा"ला देवत्वाच्या चौकटीतून बाहेर काढून त्याच्या संपूर्ण आयुष्याचा मागोवा नितीन थोरात यांनी "खंडोबा" मधून घेतला आहे. मणी आणि मल्ल या राक्षसांचा संहार करण्यासाठी महादेवाने खंडोबाचा अवतार धारण केला अशी महाराष्ट्राच्या या कुलदैवताची अख्यायिका आहे. पण, खंडोबाची कथा एवढीच होती का? खंडोबाचं खरं नाव काय होतं? मणी आणि मल्ल या राक्षसांचं खरं नाव काय होतं? खंडोबाचं आणि त्यांचं वैर काय होतं? खंडोबाचं मूळ गाव कोणतं? वंश कोणता? शिवाय राम, कृष्ण, हनुमान यांच्यासारखं खंडोबाचंही बालपण असेल का? काय होती खंडोबाच्या जगण्याची गोष्ट, त्याच्या संघर्षाची कथा? आपल्या सामर्थ्याचा अंदाज येईपर्यंत काय घडलं असावं खंडोबाच्या आयुष्यात? म्हाळसा ही पत्नी असतानाही खंडोबाने बाणूला आपलंसं करण्याचं कारण काय असावं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, खंडोबा देव होता की देवत्त्व लाभलेला शूर योद्धा? अशा प्रश्नांची सविस्तर उत्तरं "खंडोबा" या कादंबरीतून देण्याचा प्रयत्न थोरात यांनी केला आहे. खंडोबा, मल्हारी-मार्तंड, सदानंद, म्हाळसाकांत अशा वेगवेगळ्या नावांनी महाराष्ट्राला परिचित असणाऱ्या या 'अवतारी' देवाची किर्ती अनेक मालिका, चित्रपट आणि कथांमधून आपण आजपर्यंत ऐकत-वाचत आलो आहोत पण यांपैकी कुठेच "खंडोबा"च्या बालपणावर प्रकाश टाकण्यात आलेला नाही. नितीन थोरात यांची "खंडोबा" मात्र याला अपवाद आहे. थोरातांच्या या कादंबरीतून आपल्याला "खंडोबा"च्या बालपणाचा नव्याने उलगडा होतो. "खंडोबा"च्या जन्मापासून त्याच्या आयुष्याचा संपूर्ण संघर्ष आपल्याला या कादंबरीत वाचायला मिळतो तोही त्याचं देवत्व बाजूला ठेऊन! खंडोबाचा जन्म, त्याचे आई-वडील, भावंडं, सवंगडी, त्याचं राज्य, युद्ध, त्याचा एक सामान्य माणूस म्हणून चालणारा मानसिक संघर्ष, प्रेम आणि विवाह, जेजुरीची निर्मिती अशा अनेक गोष्टींना स्पर्श करत लेखक आपल्याला एका वेगळ्याच "खंडोबा"विश्वात घेऊन जातात. जरी ही कादंबरी काल्पनिक असली तरी पौराणिक संदर्भांच्या भोवताली गुंफलेल्या कथानकामुळे वाचक कथेत हरवून जातो. एक वीर योद्धा, अनभिषिक्त सम्राट या रुपात आपल्यासमोर येणाऱ्या "खंडोबा"च्या आयुष्यातदेखील सामान्य माणसाप्रमाणे अनेक चढउतार येतात आणि त्यामुळेच अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जात स्वतःचं अस्तित्व सिद्ध करून देवपण मिळवणारा "खंडोबा" वाचकाच्या मनाला भिडतो. सामान्यांतून पुढे येऊन, असामान्य कर्तृत्व गाजवून अजरामर झालेल्या एका अनभिषिक्त सम्राटाची ही कथा नक्कीच वाचनीय आहे. "खंडोबा"!!

एखाद्या चित्रपटाला शोभेलशी कथेची सुरुवात!! कादंबरीची सुरुवात होते कादंबरीच्या नायकाला, आदित्यला पडलेल्या एका स्वप्नाने. मराठी चित्रपट दिग्दर्शक असणाऱ्या आदित्यचे आई-वडील खंडोबाचे निस्सीम भक्त! आदित्यच्या लहानपणीच त्याच्या आईचं निधन झाल्याने वडिलांनी त्याला आई-वडील दोघांच्या प्रेमाने मोठं केलं पण तरीही आपले वडील "खंडोबा" भक्तीत तल्लीन झाल्यानेच आपल्या आईचा मृत्यू झाला असं मनाच्या एका कोपऱ्यात आदित्यला सतत टोचत राहतं. एक दिवस अचानकच आदित्यला खंडोबाच्या आयुष्यावर एक भव्य चित्रपट बनवण्याची संधी चालून येते. या चित्रपटाच्या निमित्ताने खंडोबाचा अभ्यास करत असताना आदित्यला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आजपर्यंतच्या कथा, पुराणांमध्ये कधी खंडोबाचं बालपणच दाखवण्यात आलेलं नाही आणि ही गोष्ट त्याला खूप अस्वस्थ करते. दरम्यानच्या काळात एका महाशिवरात्रीला आपल्या वडिलांसोबत तो जेजुरीला खंडोबाच्या दर्शनाला जातो. आदित्यच्या या जेजुरी भेटीत अशी एक घटना घडते ज्यामुळे तो थेट खंडोबाच्या काळात जातो आणि तिथून पुढे सुरू होतो खंडोबाच्या शोधाचा प्रवास. या प्रवासात लेखकाने आदित्यच्या नजरेतून दिसणारा "खंडोबा" या कादंबरीत उतरवला आहे. आदित्यच्या या टाईम ट्रॅव्हलनंतर कादंबरीची ही कथा खऱ्या अर्थाने वेग पकडते आणि वाचक त्यासोबत वाहवत जातो. खंडोबाच्या काळात आदित्यला खड्गवंशी राजकुमार रुद्रा आणि त्याचे मित्र भेटतात. त्यानंतर खंडोबाचा शोध, तिथल्या लोकांसोबत जुळवून घेण्याची त्याची कसरत, आदित्यची पुन्हा कलियुगात येण्याची धडपड, महालया आणि बाणूचा रुद्राच्या आयुष्यातील प्रवेश, रुद्राच्या जन्माची कहाणी, रुद्रा आणि कर्मस्थी-सुमनसेन यांच्यामध्ये ६ दिवस चाललेलं घनघोर युद्ध या सर्वांमधे वाचक अक्षरशः हरवून जातो. आदित्यला खंडोबा सापडतो का? रुद्रा आणि आदित्यचं नातं काय? रुद्रा आणि खंडोबाचं नातं काय? जेजुरी नगरीची स्थापना कशी झाली? कर्मस्थी-सुमनसेन हे कोण होते? या प्रश्नांसोबतच आदित्यचे पुढे काय होणार? तो परत वर्तमानात येणार की नाही? या प्रश्नांची उत्तरे वाचकांनी कादंबरीतच मिळवणे योग्य.

नितीन थोरात यांची एका वेगळ्या दृष्टीने "खंडोबा"चं दर्शन घडवून आणणारी, आवर्जून वाचावी अशी कादंबरी "खंडोबा"!!





संदीप प्रकाश जाधव


Monday, July 25, 2022

"अत्रारचा फास"

 




लेखक : नारायण धारप

प्रकाशक : साकेत प्रकाशन

पृष्ठे- १९२, मूूल्य- २२५ रुपये

 

Wednesday, July 20, 2022

"असूरवेद"

 


लेखक : संजय सोनवणी

प्रकाशक : प्राजक्त प्रकाशन

पृष्ठे- २३८, मूूल्य- २८० रुपये 

मुरलीधर खैरनार यांच्या "शोध" या थरारक आणि उत्कंठावर्धक कादंबरीनंतर बऱ्याच दिवसांनी एक रोमांचक कादंबरी वाचायला मिळाली. "असूरवेद" ही संजय सोनवणी यांची वाचकाला अक्षरशः खिळवून ठेवणारी एक काल्पनिक कादंबरी!! कादंबरीचा विषयच असा आहे की सुरुवातीलाच 'सांस्कृतिक उलथापालथ घडवणारी कादंबरी' असा उल्लेख लेखकांनी केलेला आहे. 'ऋग्वेद', 'यजुर्वेद', 'सामवेद' आणि 'अथर्ववेद' या चार वेदांचं सार म्हणजे हिंदू संस्कृती किंवा हिंदू धर्म ही आजपर्यंत आपल्याला माहित असलेली गोष्ट. परंतु असं असलं तरीही हिंदू धर्माची स्थापना कधी, कुठे, कशी आणि कोणी केली यावर आजही काही विद्वानांमधे मतभेद आहेत. इतर धर्मांना असणाऱ्या संस्थापकांप्रमाणे हिंदू धर्माचा कोणीही संस्थापक नाही त्यामुळे अशा मतभेदांना अगदीच दुर्लक्षित करूनही चालणार नाही. भारतभूमीवर आर्य आले आणि आर्यांनी चार वेद निर्माण केले इथूनच हिंदू संस्कृतीची सुरुवात झाली असं आपण ऐकत, वाचत आलेला इतिहास सांगतो. एकूण वेद चारच आहेत अशीच आजपर्यंत एक समजूत असली तरीही जागतिक कीर्तीचे विद्वान प्रो. एफ. मॅक्सम्युलर यांच्या "हाइम्स ऑफ अथर्व वेद" या महाग्रंथात त्यांनी 'असूरवेद', 'सर्पवेद', 'गंधर्ववेद' आणि 'पिशाच्चवेद' असे आणखी चार वेद भारतात अस्तित्वात होते हे दाखवून दिलेले आहे. भारताचा सांस्कृतिक इतिहास आज जसा सांगितला जातो तसा तो नाही आणि त्यात फार मोठी लपवाछपवी आहे हे आत्तापर्यंत अनेक संशोधकांनी सप्रमाण मांडलेलं आहे. आर्यांच्याही आधी अस्तित्वात असलेल्या आणि एक प्रगत समाजव्यवस्था असणाऱ्या अनार्यांचा आपण कधी विचारच नाही करत. आर्यांच्या आधीही आणखी काही संस्कृती भारतात होत्या आणि त्यांच्याकडून आर्यांनी लिहिलेल्या या चार वेदांपूर्वी आणखीही काही वेद खरंच लिहिले गेले नसतील कशावरून? अनार्यांच्या या सांस्कृतिक संहिता कालौघात नष्ट केल्याने किंवा दडपून टाकल्याने कदाचित आर्यांना आपलं सांस्कृतिक वर्चस्व निर्माण करता आलं असेल का? असे प्रश्नच खरं तर अंगावर शहारे आणतात. संजय सोनवणी यांनी याच विषयाला केंद्रस्थानी ठेवून त्यांची ही "असूरवेद" कादंबरी लिहिली आहे. आपलं सांस्कृतिक वर्चस्व अबाधित राखण्यासाठी आजही अखंड सावध असणाऱ्या आर्यांच्याच हाती जर अचानकपणे अनार्यांचा एखादा वेद लागला तर काय होईल? त्या वेदात हिंदू धर्मातील प्रथा-परंपरांना छेद देणाऱ्या काही गोष्टी असतील तर काय होईल? आपल्या सांस्कृतिक वर्चस्वाच्या आड येणाऱ्या कोणाचीही गय न करणारे आर्य यावर कशी प्रतिक्रिया देतील? यांची उत्तरे देणारी संजय सोनवणी यांची "असूरवेद" ही काल्पनिक कादंबरी! सोनवणींच्या या "असूरवेद"मधून वाचकाच्या सर्व परंपरागत समजुतींना धक्के तर बसतातच परंतु वाचक विचारात देखील पडतो. पंढरपूर, पांडुरंग, पुंडलिक यांवरील कादंबरीतील चर्चा तर सर्वांत जास्त धक्कादायक!! धर्माच्या नावाखाली उभ्या केलेल्या जातियवादाच्या भिंतीही लेखकांनी "असूरवेद"मधून पाडायचा धाडसी प्रयत्न केला आहे. आपल्या सर्व सांस्कृतिक श्रद्धा उद्ध्वस्त करणारी, अतिशय स्फोटक तितकीच थरारक आणि रोमांचकारी, वाचकाला खिळवून ठेवणारी एक काल्पनिक कहाणी म्हणजे ही संजय सोनवणी यांची कादंबरी "असूरवेद"!!

एखाद्या थ्रिलर चित्रपटाला शोभेल अशी कथेची सुरुवात!!सुरेश जोशी या भारतातील एका प्रसिद्ध इतिहास संशोधकाला अगदी अनपेक्षितपणे लागलेल्या एका शोधाने या कादंबरीची सुरुवात होते. आपल्या आयुष्यातील ४० वर्षांहून जास्त काळ महाराष्ट्राच्या खेडोपाडी हिंडून प्राचीन शिलालेख, प्राचीन मानवी वस्त्यांचे अवशेष, पाषाण युगापासून ते लोह युगापर्यंत सापडणारी हत्यारे शोधण्यासाठी जीवाचे रान करणारे हे सुरेश जोशी. आपल्या कारकिर्दीत लावलेल्या अनेक शोधांमुळे त्यांना जगभर प्रसिद्धी मिळाली असली तरीही सनातन वैदिक धर्माचे समाजावरील वर्चस्व कायम रहावे यासाठी काम करणाऱ्या एका संस्थेसाठी ते गुप्तपणे काम करत असतात आणि वैदिक धर्माचे महत्व कमी होईल असे संशोधन जगापुढे येऊच नये असे काही प्रयत्नही त्यांनी वेळोवेळी केलेले असतात. परंतु एके दिवशी त्यांच्या हाती एक धक्कादायक गोष्ट लागते, एक अतिशय प्राचीन 'बाड' म्हणजेच 'हस्तलिखित'! ते अतिप्राचीन हस्तलिखित वाचून तेही हादरून जातात. हिंदू संस्कृतीचा अर्थ बदलणारा पुरावा त्यांच्या हाती सापडला आहे याची जाणीव त्यांना होते आणि इथून सुरू झालेल्या थरारक घटनाक्रमात वाचक अडकत जातो. जोशींना सापडलेला तो ऐतिहासिक दस्तावेज जनतेपुढे येण्याआधीच त्यांचा राहत्या घरीच रहस्यमय पध्दतीने खून होतो. पोलिसांकडून जोशींना मूर्तीतस्कर ठरवलं जातं आणि याच हस्तलिखितापाई अमेरिकेत राहणाऱ्या जोशींच्या मोठ्या मुलावर प्राणघातक हल्ला होतो. कथेतील इथून पुढे घडणाऱ्या घटना अतिशय वेगवान आहेत. ज्यामधे नंतर कादंबरीतील इतर पात्रांचा समावेश होतो. जोशींची मुलगी सायली आणि तरुण इतिहास संशोधक गौतम कांबळे ही त्यातील मुख्य पात्रे. मृत्यूपूर्वी जोशी 'असूर वरूण' या नावाने एक दुवा मागे ठेऊन जातात ज्यावरून सायली आणि गौतमचा एक थरारक प्रवास चालू होतो. हे 'असूर वरुण' काय आहे? जोशींचा खून का व कोणी केला? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी चालू झालेला सायली आणि गौतमचा शोध वाचकाला अक्षरशः खिळवून ठेवतो. याचं सारं श्रेय संजय सोनवणी यांनाच!! ब्राह्मणी समाजाचं प्रतिनिधीत्व करत असणारी सायली आणि मागास समाजातील गौतम, धर्माविषयीची दोन विरुध्द टोकाची मते असणाऱ्या या दोन व्यक्ती एका अज्ञात रहस्याच्या मागावर निघतात. या प्रवासात सायली आणि गौतम यांच्यात होणारी बौद्धिक चर्चाही आपल्यासमोर अनेक प्रश्न घेऊन येते. हिंदू आणि सनातन वैदिक धर्म एकच आहेत का? आर्य कुठून आले? ते जेते होते की शरणार्थी? शैव नक्की कोण होते? सुर आणि असुर म्हणजे नेमके काय? हा 'असूर वरुण' कोण होता? रामायण, महाभारत यांमध्ये लिहिलेल्या कोणत्या गोष्टी खऱ्या आणि कोणत्या नंतर घुसवलेल्या? पंढरपूर हे नाव विठ्ठलामुळे मिळालं की पुंडलिकामुळे? मग पुंडलिक कोण होता? विठ्ठल लोकजनांचा देव होता की आणखी कोणी? पौन्ड्रिक, पुंडरीक, पांडुरंग ही नावे नेमके काय सुचवतात? यांचा परस्पर काय संबंध? पुंडलिकाची समाधी म्हणजे शिवालय आहे का? हरी-हर ऐक्य साधण्यासाठी पांडुरंग महात्म्य तयार करण्यात आले काय? अशा काही प्रश्नांवरील चर्चा वाचकाला सुन्न करतात. शेवटी सायली आणि गौतमचा हा शोध पूर्ण होतो का? जोशींना समजलेलं रहस्य जगापुढे आणण्यात ते दोघे यशस्वी होतात का? या प्रश्नांच्या उत्तराने या थरारक आणि रोमहर्षक कादंबरीचा शेवट होतो. कादंबरीतील सर्वच गोष्टी जरी आपल्याला पटत नसल्या तरी एक अतिशय रहस्यमय, रोमांचक आणि थरारक कादंबरी वाचल्याचं समाधान नक्कीच मिळतं.

काल्पनिक-थ्रिलर कथांची आवड असणाऱ्यांनी आवर्जून वाचावी अशी कादंबरी "असूरवेद"!!






संदीप प्रकाश जाधव


Sunday, July 10, 2022

"वंशवृक्ष"

 



लेखक : डॉ. एस. एल. भैरप्पा

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

मराठी अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी

पृष्ठे- ३२२, मूूल्य- ३०० रुपये


साधारणपणे १.५ वर्षांपूर्वी कोणीतरी एस. एल. भैरप्पांची "साक्षी" ही कादंबरी मला वाचायला सुचवली होती. 'साक्षी' नंतर भैरप्पा असं काही माझ्या डोक्यात बसले की त्यांची मिळतील ती पुस्तके संग्रही घेण्यास मी सुरुवात केली. आज भैरप्पांची जवळपास १०-१२ पुस्तके माझ्या संग्रही आहेत आणि ही यादी अशी वाढतच जाईल यात शंकाच नाही. 'साक्षी' नंतर 'आवरण', 'उत्तरकांड', 'पारखा', 'परिशोध', 'तडा' आणि 'सार्थ' हे माझ्या वाचनात आलेलं भैरप्पांचं इतर साहित्य! या प्रत्येक पुस्तकातील कथांचा, विषयांचा आवाकाच इतका मोठा आहे की तो वाचण्याच्या अनुभव शब्दांत न सांगता येण्यासारखा आणि प्रत्येक वाचकाने तो स्वतः अनुभवला पाहिजे असाच! माझ्याबाबतीत सांगायचं झालं तर भैरप्पांचं यातील प्रत्येक पुस्तक एक वाचक म्हणून मला त्यांच्या साहित्याच्या आणखीनच प्रेमात पाडत गेलं. भैरप्पांच्या अशाच दर्जेदार पुस्तकांच्या पंक्तीतील "वंशवृक्ष" ही कादंबरी मी आज वाचून पूर्ण केली. धर्म आणि नात्यांची गुंतागुंत दाखवणारी या कादंबरीची कथा. सुरुवातीला थोडीशी कंटाळवाणी वाटणारी या कादंबरीची कथा काही पानांनातर मात्र वाचकाला असं काही घेरून टाकते की पुस्तक पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही. धर्मानुसार आचरण करणारे श्रीनिवास श्रोत्री आणि इतिहास संशोधनात स्वतःला पूर्णपणे झोकून देणारे सदाशिवराव ही या कथेतील मुख्य पात्रे. एका बाजूला अखंड वेदाभ्यासात बुडालेले आणि गृहस्थाश्रमाचा मुळ उद्देश हा फक्त "वंशवृद्धी"च आहे, पती-पत्नी नातेसंबंध हे पुत्रप्राप्ती आणि पर्यायाने वंशवेल वाढविण्यासाठी तसेच धार्मिक विधीला जोडीदार मिळावा यासाठीच असते असं मानणारे हे श्रीनीवास श्रोत्री. तर दुसऱ्या बाजूला फक्त वंशवेलीच्या माध्यमातूनच या जगात आपण शिल्लक राहतो, आपली ओळख राहते या संकल्पनेवर विश्वास नसणारे, सतत पुस्तकांमधे रममाण होणारे, संशोधन करून लहिलेली पुस्तके हीच आपली खरी वंशवेल आहे असं मानणारे सदाशिवराव. अपत्त्यावर पहिला अधिकार पित्याचा की मातेचा? बीजाचा की क्षेत्राचा? या दोन प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात चालू झालेल्या कादंबरीच्या या कथेला श्रीनिवास श्रोत्री यांची पत्नी भागीरथम्मा, घरकाम करणारी लक्ष्मी, इतिहास संशोधक सदाशिरावांची पत्नी नागलक्ष्मी, सदाशिवरावांच्या संशोधनात त्यांना मदत करणारी करुणारत्ने, परदेशात शिक्षण घेऊन आलेला साहित्याचा प्राध्यापक सदाशिवरावांचा भाऊ राज, श्रीनिवास श्रोत्री यांचा मुलगा नंजुंड आणि सून कात्यायनी या सर्वांच्या नातेसंबंधाची पार्श्वभूमी आहे. श्रीनीवास श्रोत्री आणि त्यांच्या कुटुंबात होणाऱ्या चढ उतारात वाचक ओढला जाऊन त्या कथेसोबतच नकळत त्याचाही प्रवास चालू होतो. कथेच्या एका टप्प्यावर तर वाचक अक्षरशः सुन्न होऊन जातो आणि नेहमीप्रमाणेच वाचकाला विचारात पाडून भैरप्पा या कथेचा शेवट करतात. सनातन धर्म पद्धती विरुद्ध बुद्धिवाद यांच्यातलं द्वंद्व आपल्या कथेतून रेखाटत असताना या द्वंद्वात विजयी कोण झाले याचा निर्णय भैरप्पांनी वाचकांवर सोडला आहे. भैरप्पांच्या या कादंबरीच्या कथेचा काळ आहे पहिल्या महायुद्धानंतरचा. कपिला नदीला आलेल्या पुरात श्रीनिवास श्रोत्रींचा तरुण मुलगा नंजुंड वाहून जातो जिथून या कथेची सुरुवात होते. नंजुंडच्या पश्चात त्याच्या तरुण पत्नीचा स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळ करणाऱ्या श्रोत्रींच्या एका निर्णयामुळे कथानकाला वेगळे वळण लागायला सुरुवात होते. अनपेक्षित झालेल्या मृत्यूने नंजुंडचं शिक्षणही थांबून जातं त्यामुळे आपल्या पतीचं अपूर्ण राहिलेलं काम मला पुढचं शिक्षण घेऊन पूर्ण करायचं आहे या कात्यायनीच्या इच्छेला श्रीनिवास श्रोत्रींनी दिलेला होकार या कथेत पुढे येऊ घातलेल्या वादळाची पहिली पायरी आहे. म्हैसूरच्या कॉलेजमधे शिकायला जाणारी श्रोत्रींची विधवा सून कात्यायनी त्याच कॉलेजमधे प्राध्यापक असणाऱ्या सदाशिवरावांचा भाऊ राजच्या प्रेमात पडते. तर दुसरीकडे सदाशिवरावांच्या संशोधनात त्यांना मदत करणाऱ्या करुणारत्ने आणि सदाशिवरावांमधे वाढलेली जवळीक. या दोन गोष्टींमुळे या कथेत जो धर्म-अधर्म, निती-अनिती आणि भावनिक गुंतागुंतींचा धुरळा उडतो तो वाचकाला सुन्न करून जातो. राजच्या प्रेमाखातर स्वतःच्या मुलाचा त्याग करणारी कात्यायनी आणि आपल्या संशोधनावरील प्रेमाखातर आपल्या पत्नीचा त्याग करणारे सदाशिवरावांचं वागणं चुकीचं वाटत असूनही आपल्याला मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटतच राहते ज्याचं श्रेय जातं सर्वस्वी भैरप्पांना, त्यांनी कथेतून उभ्या केलेल्या वातावरणाला! हे जरी खरं असलं तरीही कात्यायनीचा मुलगा चिनी आणि सदाशिवरावांची पत्नी नागलक्ष्मी यांच्याबद्दल वाचकाला शेवटपर्यंत वाईट वाटतच राहतं. असंच वाचकाला सोबत घेऊन थोडं फ्लॅशबॅक आणि थोडं वर्तमान अशी ही कथा पुढे सरकत राहते. सुन्न मनाने कथेसोबत जोडला गेलेला वाचक दोन्ही कुटुंबातील कोण व्यक्ती चुकीची आणि कोण बरोबर या विचारात हरवलेला असताना कथेच्या एका वळणावर भैरप्पा एका जबरदस्त धक्क्याने त्याला विचारांच्या खाईत लोटून देतात जिथून तो अनुत्तरितच परत येतो. भैरप्पांनी ज्या पद्धतीने कथेचा शेवट केला आहे त्याला खरोखरच तोड नाही. या मूळ कन्नड कादंबरीतील कथेचा सौ उमा कुलकर्णी यांनी केलेला हा अनुवाद पुस्तकात वाचनेच योग्य!

वंश सातत्त्याच्या कल्पनेला छेद देणारी आणि आवर्जून वाचावी अशी कादंबरी "वंशवृक्ष"!






संदीप प्रकाश जाधव


Friday, July 8, 2022

"बँको"

 



लेखक : हेन्री शॅरीयर

प्रकाशक : श्रीराम बुक एजन्सी

मराठी अनुवाद : रवींद्र गुर्जर

पृष्ठे- १७५, मूूल्य- १५० रुपये

Wednesday, June 29, 2022

"संभवामि युगेयुगे"

          


लेखक : अजिंक्य कुलकर्णी

प्रकाशक : शिवसमर्थ सेवा प्रकाशन

पृष्ठे- ३०६, मूूल्य- ३६० रुपये


'टाईम ट्रॅव्हल' अर्थातच 'कालभ्रमण', शास्त्रीयदृष्टीने सिध्द झालेली पण प्रत्यक्षात शक्य नसणारी अशी गोष्ट. प्रत्येक माणसाचं कुतूहल जागं करणाऱ्या या कल्पनेवर आधारित बरेच चित्रपट, मालिका, कथा आपण पाहिल्या-वाचल्या आहेत जिथे वर्तमानकाळातून भविष्यकाळात आणि भूतकाळात जाऊन येणारा एखादा नायक आपली मती गुंग करतो. आज एखाद्याला 'कालभ्रमण' करून कोणत्या काळात जायला आवडेल असा प्रश्न विचारला तर प्रत्येकाचं उत्तर हे वेगळं असू शकतं पण माझ्यासारख्या इतिहासप्रेमी माणसाचं उत्तर एकच असेल ते म्हणजे 'छत्रपती शिवरायांचा काळ'!!  आज ३५० वर्षांहून जास्त काळ लोटूनही ज्यांच्या फक्त नावानेच आपल्यात एक ऊर्जा निर्माण होते अशा युगपुरुषाचं दर्शन जर आपल्याला प्रत्यक्ष घेता आलं तर? छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांना प्रत्यक्ष लढाई करताना आपल्याला पाहता आलं तर? बाजीराव पेशव्यांसारख्या रणधुरंधर सेनानीला रणांगणावर तांडव करताना आपल्याला प्रत्यक्ष पाहता आलं तर? छत्रपती शिवाजी महाराज यांचा अकाली मृत्यू आणि संभाजी महाराजांचा फितुरीमुळे झालेला शेवट या घटना कालभ्रमण करून आपण बदलू शकलो तर? भूतकाळात जाऊन स्वराज्याचा इतिहास जर आपण बदलू शकलो तर आज आपला वर्तमान काय असता? अशा विचारांनीच आपल्या अंगावर शहारे येतात. जरी या गोष्टी प्रत्यक्षात शक्य नसल्या तरी 'टाईम ट्रॅव्हल' ची ही कल्पनाच अफलातून वाटते. लेखक अजिंक्य कुलकर्णी यांनी 'कलभ्रमणाच्या' याच कल्पनेला केंद्रस्थानी ठेऊन,  शिवरायांपासून ते पानिपतपर्यंतचा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास आणि कालभ्रमण या दोन धाग्यांना पकडून लिहिलेली ही एक भन्नाट काल्पनिक कादंबरी "संभवामि युगेयुगे"! आजपर्यंत कधी वाचनात न आलेलं असं या कादंबरीचं रोमांचकारी कथानक! पानापानावर वाढत जाणारा थरार आणि क्षणाक्षणाला रोमांच उभे करणाऱ्या घटनांतून अजिंक्य कुलकर्णी यांनी साकारलेला हा कल्पनाविष्कार आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातो. अजिंक्य कुलकर्णी यांनी या काल्पनिक कथेसाठी निवडला आहे पानिपतचा महासंग्राम! अहमदशाह अब्दाली सोबत मराठ्यांनी लढलेलं पानिपतचं युद्ध हिंदुस्थानच्या कपाळावरील भळभळती जखम आहे. हिंदुस्थानच्या सुरक्षेसाठी पानिपतावर मराठे प्राणपणाने लढले पण दुर्दैवाने त्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला आणि हिंदुस्थानचे पुढचे भविष्यच बदलून गेले. पण विचार करा जर मराठे पानिपतावर हरलेच नसते तर? छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, भाऊसाहेब, विश्वासराव, होळकर, शिंदे, नानासाहेब इतिहासातील सर्व मराठा सरदारांसोबत पानिपतच्या रणभूमीवर अब्दालीविरुद्ध एकत्र उभे राहिले असते तर? छत्रपती शिवराय आणि बाजीराव पेशवा दोघांनी मिळून जर अब्दालीचा पराभव केला असता तर? जरी या 'तर' ला आज काहीच अर्थ नसला तरी अजिंक्य कुलकर्णी यांनी त्यांच्या या काल्पनिक कादंबरीतून प्रत्येक इतिहासप्रेमीच्या मनाला हात घातला आहे. वाचक अक्षरशः हरवून जावा अशी ही कादंबरी "संभवामि युगेयुगे"!

तर कादंबरीची सुरुवात होते ऋषभ या इतिहासप्रेमी तरुणाच्या एका शोधापासून! असं म्हणतात की पानिपतच्या युद्धात महाराष्ट्रातील प्रत्येक घरातून एकजण कामी आला होता आणि हेच डोक्यात ठेऊन आपल्या घराण्यातील कोणते पूर्वज पानिपतावर गेले होते का याचा शोध घेणारा हा ऋषभ! त्याचा हा शोध त्याला पुण्याहून नाशिकला घेऊन येतो आणि याचवेळी भारत-पाकिस्तान दरम्यान चालू असलेल्या युद्धात अशा काही घटना घडतात की ऋषभच्या डोक्यातील इतिहास त्याला आपल्यासोबत थेट इ.स. १७६० मधे घेऊन जातो. इ. स. १७६० हा काळ मराठ्यांच्या, स्वराज्याच्या आणि पर्यायाने हिंदुस्थानच्या इतिहासातील खूप धामधुमीचा काळ. अटकेपार झेंडे लावून अखंड हिंदुस्थानावर वचक बसवलेल्या मराठा साम्राज्याच्या कसोटीचा हा काळ. ऋषभ जेव्हा या काळात पोहचतो तेव्हाची परिस्थिती अतिशय स्फोटक असते. काही दिवसांपूर्वीच दत्ताजी शिंदेसारख्या मातब्बर सरदाराची झालेली हत्या आणि त्यामुळे नजीब खान, कुतुबजंग, अहमदशाह अब्दालीवर चिडलेलं मराठा सैन्य! याच मनःस्थितीत सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली अनेक पराक्रमी मराठा सरदार नजीब खान आणि अब्दालीचा बिमोड करण्यासाठी उत्तरेकडे, दिल्लीच्या रोखाने निघतात. 'कालभ्रमण' करून भूतकाळात नेमका या मोहिमेच्या वेळीच आलेल्या ऋषभला मग एकामागून एक धक्के बसायला चालू होतात. भाऊंची ही मोहिम पुढे सरकण्यापूर्वीच ऋषभ भविष्यातील घडणाऱ्या घटना त्यांना सांगून इतिहासाची उलथापालथ करून टाकतो. कथेच्या या टप्प्यावर वाचक जो या कथेत गुरफटून जातो तो अगदी शेवटपर्यंत! प्रत्येक पानावर वाचक अक्षरशः भारावून जातो कारण इतिहासाची झालेली ही उलथापालथ फक्त इथेच नाही थांबत तर दोन्ही बाजूंनी कालभ्रमण करून आलेल्या इतरही अनेक व्यक्तिरेखा या कथेत सामील होतात. पानिपतच्या रणभूमीवर एकीकडे उभा असतो ३५५ वर्षें भविष्यात आलेला तैमूर, १३ वर्षें भविष्यात आलेला नादिरशाह, १०३ वर्षें भूतकाळात आलेला जॉन निकोलसन आणि स्वतःच्याच काळात असणारा अहमदशाह अब्दाली! तर दुसऱ्या बाजूला हिंदुस्थानचे रक्षण करण्यासाठी पुन्हा एकदा या भूमीवर अवतरतात साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांना साथ असते ती २० वर्षें भविष्यात आलेल्या रणधुरंधर बाजीराव पेशव्यांची, सोबतच सारा हिंदुस्थान!! एकाबाजूला हिंदुस्थानचा घास घेण्यासाठी आलेल्या परकीय सत्ता तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली एकछत्री हिंदुस्थान! कथेच्या शेवटी या लढाईचा निकाल काय लागू शकतो याची वाचकाला आधीच जाणीव होत असली तरीही अस्तित्वासाठी चालू झालेल्या या लढाईच्या रक्तरंजित आणि काल्पनिक इतिहासातून बाहेरच येऊ नये अशी काहीशी भावना आपल्या मनात येते.

अजिंक्य कुलकर्णी यांचा, प्रत्येकाने आवर्जून वाचावा असा एक जबरदस्त कल्पनाविष्कार "संभवामि युगेयुगे"!





संदीप प्रकाश जाधव


Tuesday, June 14, 2022

"युद्ध जिवांचे"

 


लेखक : गिरीश कुबेर

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

पृष्ठे- २२२, मूूल्य- २९० रुपये


गिरीश कुबेर यांचं "अधर्मयुद्ध" हे पुस्तक जेव्हा वाचून पूर्ण झालं त्याच वेळी मनात एक गोष्ट पक्की झाली होती ती म्हणजे या लेखकाची मिळतील ती सर्व पुस्तके वाचून काढायची आणि त्याचं कारणही तसंच आहे. आपल्या आसपास असो वा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात सतत घडणाऱ्या घटना ज्यांचा आपण सहसा कधी विचारही करत नाही त्यांचा आपल्या आयुष्यावर होणारा थेट परिणाम किती भयानक आणि दूरगामी असू शकतो याची जाणीव करून देणारं त्यांचं लेखन! आपल्याला खडबडून जागं करून वास्तवाचं भान करून देणारं त्यांचं लेखन! गिरीश कुबेर यांचं हेच वेगळंपण "अधर्मयुद्ध" मधून जाणवलं आणि आपसूकच त्यांच्या इतर पुस्तकांची यादी बनवायला घेतली. त्या यादीतीलच हे पुढचं पुस्तक "युद्ध जिवांचे"! वाचकाच्या मन आणि मेंदूचा ताबा घेणारा, वाचून मन सुन्न करणारा आणि अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा असा या पुस्तकाचा विषय. वास्तव जीवनाशी निगडीत प्रश्नांचं सखोल संशोधन व अभ्यास करून लिहिलं गेलेलं असं हे साहित्य. जैविक व रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य इतिहास ही टॅगलाईन डोक्यात ठेऊन वाचायला सुरुवात करणाऱ्या वाचकाला पहिल्या २-४ पानांतच दोन वर्षांपूर्वी अख्ख्या जगभर धुमाकूळ घालायला सुरुवात केलेला 'कोरोना' आठवला नाही तरच नवल. लेखकांनी पुस्तकात पुढे पुढे तर अशा काही गोष्टींचा उलगडा केला आहे की कोरोनाने घातलेला थैमानही त्यापुढे कवडीमोल वाटावा. भारतात बर्ड फ्लू आणि स्वाईन फ्लूची साथ पसरल्यानंतर अचानक अशा साथी का पसरतात, याचा शोध घेत असताना गिरीश कुबेर यांना अचानक जन्माला येणाऱ्या साथींमागचं जे 'राजकारण' जाणवलं त्याचा शोध त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला आहे. बर्ड फ्लू किंवा स्वाईन फ्लूचे जंतू अचानकपणे, एका विशिष्ट ठिकाणीच कसे उगवतात आणि जसे अचानक येतात तसे निघूनही कसे जातात? हे असे जंतू प्रयोगशाळेत तयार करून कोणीतरी त्याची चाचणी तर घेत नसेल ना? अशा प्रशांची उत्तरे शोधत लेखकासोबतच वाचकदेखील पहिल्या महायुद्धाच्या कालखंडात ओढला जातो. ज्या पहिल्या महायुद्धाने जैविक व रासायनिक अस्त्रांना जन्माला घातलं त्या काळातील घटनांचा अभ्यास करून या रासायनिक अस्त्रांचा जन्म कसा झाला, प्राचीन इतिहासातील युद्धांत त्याची पाळंमुळं कुठवर आहेत आणि येणाऱ्या काळात या अस्त्रांचं रूप कसं असेल याचा अगदी सखोल अभ्यास करून जो वेधक आढावा गिरीश कुबेर यांनी घेतला आहे तो आपल्याला या "युद्ध जिवांचे" पुस्तकातून वाचायला मिळेल. पारंपरिक पद्धतीच्या युद्धातील डावपेचांनी जेव्हा समोरच्या शत्रूला हरवणं अवघड होऊ लागलं तेव्हा जन्माला आलेली ही नवीन कल्पना जैविक-रासायनिक हल्ला! अशा जैविक अस्त्रांचा जनक कोण? कोणत्या देशांनी या संशोधनाला पाठिशी घातलं? या जैविक अस्त्रांची चाचणी कशी घेतली जायची? चाचणी घेत असताना आणि प्रत्यक्ष त्याच्या वापरावेळी माणसावर त्याचा काय परिणाम झाला? किती लोक मारले गेले? कोणकोणत्या देशांनी अशा अस्त्रांचा वापर कधी, कोणाविरुद्ध आणि कसा केला? त्याचे जागतिक राजकारणावर काय परिणाम झाले? पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात या अस्त्रांचा वापर कसा आणि कोणी केला? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जेव्हा आपल्याला या पुस्तकात मिळतात तेव्हा एक मनुष्य जात म्हणून स्वतःचीच चीड आल्याशिवाय राहत नाही. गिरीश कुबेर यांनी काही अतिशय जुन्या, इसवी सनपूर्व घटनांचा संदर्भदेखील या पुस्तकात दिला आहे ज्यामधे शत्रू राष्ट्राच्या हद्दीत प्लेग सारख्या रोगांचा फैलाव कशा पद्धतीने केला जायचा याचं वर्णन आहे. असाध्य रोगाने मरण पावलेल्या लोकांची प्रेते शत्रू राष्ट्राच्या लोकांवर बॉम्बहल्ले करावेत अशा पद्धतीने टाकून तो रोग कसा पसरवला जायचा हे पुस्तकात वाचून मन सुन्न होते. अलीकडच्या काळात हिटलरचा अशा अस्त्रांच्या निमिर्तीतील वाटा आणि वापर तर जगजाहीर आहेच, पण दुसऱ्या महायुद्धाच्या विजयाचे शिल्पकार मानले जाणारे तथाकथित मानवतावादी चचिर्ल, रुझवेल्ट आदींनीही नरसंहारासाठी जैविक अस्त्रांच्या निमिर्तीला चालना देऊन त्याचा केलेला वापर आणि त्याचा परिणाम आपला थरकाप उडवून जातो. पुस्तकातील बऱ्याच गोष्टी वाचत असताना हिटलरचा क्रूरपणा आपल्याला इतर राष्ट्रांनी केलेल्या अत्याचारासमोर खूपच नगण्य वाटतो. उदाहरणच द्यायचे झाले तर अमेरिकेने हिरोशिमा-नागासाकीवर केलेल्या अणुबॉम्ब हल्ल्यानंतर बेचिराख झालेल्या जपानने नंतर जी फिनिक्स भरारी घेतली त्याचं नेहमीच कौतुक केलेलं आपण ऐकत आलोय पण गिरीश कुबेर यांनी या पुस्तकात दिलेले जपानी लोकांनी चीनमधील नागरिकांवर केलेल्या अत्याचाराचे तपशील वाचत असताना जपानबद्दल आपल्या मनात असणारी सहानुभूती आपोआप कमी होते. ज्यांचा युध्दाशी काहीही संबंध नव्हता अशा चिनी लोकांवर जपानने जे अत्याचार केले ते मानवतेच्या सर्व सीमा पार करणारे होते. जपान्यांनी ग्लँडर्स या जंतूंचा वापर चिनी लोकांवर केला आणि ते अघोरी कृत्य झाकण्यासाठी अणुबॉम्ब टाकून अमेरिकेने त्याहून अघोरी कृत्य केले. जैविक हल्ला केल्यानंतर कुठलाही प्रतिकार करण्याची संधी न देता अख्ख्या गावाचे तेथील पशुपक्षी आणि गुराढोरांसकट स्मशानभूमीत होणारे रूपांतर पुस्तकात वाचत असताना अंगावर शहारे येतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानात माणसाने केलेली प्रगती आपल्याला कोणत्या वाटेवर घेऊन जाणार आहे याचीही कल्पना आपल्याला पुस्तकाच्या पाना-पानावर येत राहते. आज या जैविक आणि रासायनिक अस्त्रांनी शत्रू सैनिकांना मारण्यासाठी बंदूक आणि माणसांची गरजच संपवून टाकली आहे. जागतिक राजकारणात एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की जर ही रासायनिक अस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती लागली तर मानवजातीचा विनाश अटळ आहे आणि या गोष्टीचीही जाणीव गिरीश कुबेर यांनी काही काही घटनांतून आपल्याला करून दिली आहे. सत्य हे वास्तवाहून किती भयानक असू शकतं याची जाणीव करून देणारं एक जबरदस्त पुस्तक "युद्ध जिवांचे"!

जैविक-रासायनिक अस्त्रांचा रक्तरंजित इतिहास आणि माणसाने तयार केलेला हा जैविक अस्त्रांचा भस्मासुर आज माणसाचाच घास कसा घेऊ पाहतोय हे जाणून घ्यायचं असेल तर प्रत्येकाने आवर्जून वाचावं अस पुस्तक "युद्ध जिवांचे"!





संदीप प्रकाश जाधव


Tuesday, June 7, 2022

"असुर"

                  



लेखक : आनंद नीलकंठन

अनुवाद : डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

प्रकाशक : मंजुल पब्लिशिंग हाऊस

पृष्ठे- ४५५, मूूल्य- ३९९ रुपये


रामायण या महाकाव्याची आपल्या मनावर असणारी मोहिनी आज हजारो वर्षें होऊनही कायम आहे. एक इतिहास म्हणून असो वा काव्य म्हणून, आजवर अखंड संशोधन होऊन पुढे येणाऱ्या माहितीच्या आधारे रामायणाच्या मुख्य कथानकाला अनेक उपकथानाकं जोडली गेली. प्रत्येकाने आपल्याला रामायण कसं हवं त्या दृष्टीने कथेत काही न काही बदल केले आणि त्यामुळेच बऱ्याचशा घटनांतील सत्यतेबद्दल आपल्या मनात एक संभ्रम निर्माण होतो. परंतु असं असलं तरीही रावणाकडून झालेलं सीतेचं अपहरण आणि आपल्या पत्नीला सोडवण्यासाठी ईश्वररूपी रामाकडून राक्षसराज रावणाचा झालेला वध हा रामायणाचा शेवट कोणत्याही कथानकात नाही बदलला. वाईटावर झालेला चांगल्याचा विजय याचं एक उत्तम उदाहरण म्हणूनच हा शेवट आपण पिढ्यानपिढ्या ऐकत, वाचत आलो. राम म्हणजे ईश्वराचा अवतार ज्याने राक्षसरुपी रावणाचा नाश केला. रावण म्हणजे दैत्य, रावण म्हणजे अंधःकार हाच इतिहास आपण आजपर्यंत वाचला. जो लिहिला 'जेत्यांनी'! पराजिताचा इतिहास कधी मांडलाच जात नाही, गुणगान होतं ते फक्त जेत्यांचंच! प्रत्येक युद्धाचा इतिहास हा जरी फक्त जेत्यांकडूनच लिहिला जात असला तरी पराभूतांचीसुद्धा कहाणी असतेच आणि जी शक्यतो आपल्यासमोर कधी येत नाही. जेत्यांकडून लिहिल्या गेलेल्या इतिहासात पराभूतांचा आवाज नेहमीच दडपून टाकला जातो. यालाच अनुसरून रावणाबद्दल केवळ नकारात्मक लेखनच केलं गेलं. परंतु रामायणात पराभूत झालेल्या रावण आणि त्याच्या साथीदारांना स्वतःबद्दल काही वेगळी गाथा सांगायची असेल तर? याचा आपण कधी विचारच नाही केला. असुरराज सुमालीची कन्या कैकसी आणि पुलस्त्य ऋषींचा पुत्र विश्रवा यांच्या पोटी जन्माला आलेली रावण, कुंभकर्ण, बिभीषण आणि शूर्पणखा ही चार भावंडं. ऋषिपुत्र असूनही कैकसी आणि विश्रवांची 'संकरीत मुले' म्हणून नेहमीच ही भावंडे अपमानित होत राहिली. लहानपणापासून या भावंडांना ऋषिंकडून नेहमी हीन वागणूकच मिळत गेली आणि इथंच रावणाच्या मनात देवांबद्दलच्या तिरस्काराची मुळे रुजली. बालपणी विश्रवा ऋषिंच्या आश्रमात राहून एक ऋषिपुत्र म्हणून अभिमानाने स्वतःची ओळख करून देणारा "दशग्रीव" म्हणजेच "रावण" पुढे जाऊन असुरराज लंकाधिपती झाला. रक्ताने ऋषिपुत्र असणाऱ्या या असुराचा पुढे रामाच्या हातून अंत झाला. एका ऋषिपुत्रापासून ते असुरांचा राजा, लंकाधिश होण्यापर्यंतचा रावणाचा प्रवास नेहमीच दुर्लक्षित राहिला. जो आपल्याला या "असुर"मधे वाचायला मिळेल. रावणाच्या पूर्वार्धाबद्दल नेहमीच आदराने बोललं जातं. अतिशय कठीण संघर्षातून स्वतःला घडवणारा, आपल्या भावंडांवर भरपूर प्रेम करणारा, आई, आजोबा आणि समस्त असुर जातीवर झालेल्या अत्याचाराने हळवा होणारा, सर्वप्रकारच्या ज्ञानार्जनासाठी नेहमीच भुकेला असणारा, महत्वकांक्षा, प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासासोबतच धैर्य, सामर्थ्य, न्याय-नितीमत्ता अशा गुणांनी संपन्न असणारा, महादेवाचा निस्सीम भक्त, शिवतांडवस्तोत्र - रावणसंहिता आणि कुमारतंत्र लिहिणारा, बुद्धिबळ व रुद्रवीणा निर्मिती करणारा विद्वान, आयुर्वेद, व्यापार, वेदशास्त्र, राज्यशास्त्र, दर्शनशास्त्र यांसारख्या अनेक विषयांमधे पांडित्य मिळवणारा, दशग्रंथी ब्राम्हण, उत्तम विणावादक, अनेक रागांचा निर्माता, आपल्या प्रजेचा पाठीराखा अशा अनेक रुपांतून आपल्या समोर येणाऱ्या रावणाच्या आयुष्याने कलाटणी मारली ती राम आणि सीता यांनी त्याच्या आयुष्यात प्रवेश केल्यानंतर! तसं पाहिलं तर सुर-असुर, मानव-दानव या तर फक्त प्रवृत्ती आहेत. प्रत्येकाच्या मनात या प्रवृत्तींचे अंश दडलेलेच असतात आणि ज्या प्रवृत्तीचा आपल्यावर प्रभाव जास्त तसाच आपला स्वभाव घडत असतो. म्हणूनच बालपणापासून ते मरणापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर एक वेगळा रावण आपल्यासमोर येत राहतो. तो रावण आपल्याला या "असुर" मधून भेटीस येतो. "असुर" या कादंबरीत आनंद नीलकंठन यांनी रावण आणि त्याचा सेवक भद्र यांच्या मनोगतातून रावणाच्या अपरिचित आयुष्यावर प्रकाश टाकला आहे ! "असुर"मधून लेखकांनी रावणाचा मनोव्यापार तर उलगडला आहेच पण सोबतच शक्तिशाली असुर साम्राज्याचा उदय आणि अस्त याचंदेखील अगदी सविस्तर वर्णन केलं आहे. एकूण ५२ प्रकरणे आणि ४६० पानांमधून आनंद नीलकंठन यांनी रावण आणि राक्षसकुळाची अज्ञातकथा त्यांच्या "असुर" मधून आपल्यासमोर मांडली आहे, ज्याचा अतिशय उत्कृष्ट अनुवाद केला आहे डॉ. शुचिता नांदापूरकर यांनी. रामायणातील आपल्याला माहीत असलेल्या घटनांशी विसंगत आणि धक्कादायक अशा बऱ्याच गोष्टी या पुस्तकात आहेत त्यामुळे सर्वमान्य रामायण मनात ठेवून हे पुस्तक वाचत असताना आपल्याला एकामागून एक धक्के बसल्यावाचून राहत नाहीत. तरीही या सर्व गोष्टी बाजूला ठेऊन एक कलाकृती म्हणून आस्वाद घेण्यासारखी ही कादंबरी "असुर"!

कादंबरीची सुरुवात होते रणभूमीवर मृत्यूशय्येवर पडलेला रावण आणि कोल्ह्या-कुत्र्यांनी त्याच्या शरीराचे लचके तोडायला चालू केलेल्या घटनेपासून. रणांगणातील अशा परिस्थितीत, शेवटच्या क्षणी आपल्या मनोगतातून स्वतःची बाजू मांडणारा रावण आपल्याला खूप निराश आणि हतबल वाटतो. संपन्नतेच्या शिखरावर असणारी असुर संस्कृती इंद्राने केलेल्या हल्ल्यात पार धुळीस मिळाली. महान राजा "बळी" अर्थातच "महाबली"सुद्धा पराभूत होऊन परागंदा आयुष्य जगत होता. अशा वेळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपल्या भावंडांसोबत बाहेर पडलेल्या रावणाची भेट महाबलीसोबत होते. त्या महान असुर राजाला आपला गुरू बनवून रावण आपल्या पुढच्या आयुष्याची सुरुवात करतो. देवांना हरवून असुर साम्राज्य पुन्हा उभं करण्याचं तो मनाशी ठरवतो. महाबली कडून शिक्षा घेत असताना "दशानन" म्हणजे काय यावर होणाऱ्या चर्चेत बळीकडून रावणाला 'बुद्धिमत्ता' सोडून इतर १० गुणांचा त्याग करायचा सल्ला दिला जातो. परंतु बुद्धिमत्ता, राग, गर्व, द्वेष, दुःख, लोभ, आनंद, भीती, स्वार्थ आणि महत्वाकांक्षा या सर्वच्या सर्व १० गुणांमुळेच मी परिपूर्ण आहे, "दशानन" आहे असं ठामपणे सांगणारा रावण हे सर्व गुण एक सामान्य माणूस म्हणून आपल्यात का महत्त्वाचे आहेत हे सांगून महाबळीलासुध्दा निरुत्तर करतो. हे वाचत असताना पावित्र्याचं उसने अवसान न आणता आपण जसे आहोत तसेच स्वतःला समोर आणणारा रावण आपल्याला खूप वेगळा भासतो. यादरम्यान देवांच्या अत्याचारात आपल्या पत्नी आणि मुलीला गमावलेला असुर साम्राज्यातील एक सामान्य नागरिक "भद्र" रावणाच्या आयुष्यात येतो. रावणाच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक महत्वाच्या गोष्टीचा साक्षीदार असणारा हा "भद्र". रावणाच्या मनोगतातून उलगडणाऱ्या रामायणात जी अनेक महत्वाची वळणे आहेत त्यात "भद्र" हे एक प्रमुख प्रमुख पात्र आहे. असं असूनही नेहमी त्याचा तिरस्कार करणारा रावण आपल्या आयुष्यातून त्याला टाळू मात्र शकत नाही. रावणासोबतच भद्राच्या मनोगतानेही या रामायणाचे विविध पैलू लेखकांनी आपल्याला उलगडून दाखवले आहेत. महाबलीचं सैन्य घेऊन आपला मामा मारिच आणि प्रहस्त यांच्या सहाय्याने आपल्या सावत्र भावाचा, कुबेराचा पराभव करून रावणाने लंका जिंकली त्यात या भद्राचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर एकामागून एक राज्ये जिंकत जाऊन असुर साम्राज्याचा विस्तार करणाऱ्या रावणाने अयोध्येचा राजा अनर्ण्यला ठार मारून त्याचं छोटंसं राज्य सहज जिंकलं. यानंतर घडणाऱ्या काही घटना म्हणजे रावणाच्या आयुष्यात पुढे येऊ घातलेल्या वादळाची नांदीच! मंदोदरीपासून रावणाला झालेली पहिली मुलगी भविष्यात असुरांच्या नाशाला कारणीभूत ठरेल अशी एका जोतिष्याने केलेली भविष्यवाणी रावणाच्या सर्व जवळच्या लोकांना भीतीच्या गडद छायेत घेऊन जाते. नंतर याच भितीपोटी रावणाच्या गैरहजेरीत त्याच्या या मुलीला संपवण्याची जबाबदारी भद्रावर सोपवली जाते आणि पुढे अशा काही घटना घडतात की ती छोटीशी मुलगी जनक राजाला मिळते जिला आपण सर्वमान्य रामायणात "सीता" म्हणून ओळखतो. खरंतर संघदास रामायण, अद्भुत रामायण यामध्ये सीता ही रावणाची मुलगी आहे असा उल्लेख वाचायला मिळतो पण तरीही हे माहीत नसलेल्या माझ्यासारख्या वाचकाला "असुर" मधला हा धक्का पचवायला जड जातो. पुढे वाली आणि रावणाचं नातं, सीता स्वयंवर, रामाचा वनवास, रावणाकडून आपल्या मुलीचं म्हणजेच सीतेचं अपहरण, वाली-सुग्रीव तंटा आणि त्यातील रामाचा हस्तक्षेप, धोक्याने रामाकडून वालीला मारलं जाणं, वानरसेना घेऊन रामाचं लंकेत पोहोचणं आणि ते शेवटचं निर्यायक युद्ध या प्रवासातून मिळणारे नवनवीन धक्के पचवत वाचक सुन्न डोक्याने कथेसोबत पुढे सरकत राहतो. रणांगणात आपल्या शेवटच्या घटका मोजणाऱ्या रावणाच्या मृत्यूसमयी त्याच्या जवळ असणारा भद्र रामाकडून झालेल्या या पराभवाचा आपण सूड घेऊ असं रावणाला आश्वासन देतो आणि पुढे तो अयोध्येत राहण्यास जातो. अयोध्येत आल्यानंतर घडणाऱ्या घटना, त्यातूनच पुढे रामाच्या आयुष्यावर झालेला परिणाम आणि रामायणाचा शेवट कादंबरीतच वाचनं योग्य. रावणाच्या नजरेतून घडलेलं, ज्यामधे राम नाही तर सीता महत्वाच्या स्थानी आहे शिवाय भद्रासारखा अतिसामान्य आणि शूद्र माणूस एका समाजासाठी किती महत्वाचा होऊ शकतो हे दाखवणारं एक वेगळं रामायण आनंद नीलकंठन यांनी "असुर" मधून आपल्या भेटीला आणलं आहे. 

पराजीतांची बाजू मांडणारं एक वेगळं पुस्तक, एक वेगळी कलाकृती म्हणून नक्की वाचावं असं "असुर"!





संदीप प्रकाश जाधव






Sunday, May 29, 2022

"या सम हा"

 



लेखक : मे. जनरल शशिकांत गिरीधर पित्रे

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

पृष्ठे- ३३१, मूूल्य- ४३० रुपये


बाजीराव म्हटलं आजही कित्येक लोकांचे विचार मस्तानीच्या पुढे जातच नाहीत. मस्तानीच्या पलीकडे बाजीराव माहीतच नाही असे शेकडो लोक आपल्याला आजही सहज सापडतील आणि हे खरं तर आपलं खूप मोठं दुर्दैव आहे. मस्तानी हे प्रकरण बाजीराव पेशव्यांच्या झळाळत्या कारकिर्दीतील फक्त एक पान होतं आणि लोक त्याची इतकी चर्चा करत राहिले की बाजीराव पेशवा म्हणजे एक प्रेमवेडा अशी एक छबीच बनून गेली. या आपल्या दुर्दैवाचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे अशा थोर लोकांना जातीच्या कोंदनात घालून आपापल्या सोयीने त्यांचा इतिहास लोकांपुढे आणणारे काही ठराविक गट! परंतु खरं तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि बाजीराव पेशव्यांसारख्या व्यक्ती या जातींसाठी जन्मल्याच नव्हत्या मुळी, जातीपातींच्या पलीकडे जाऊन पुढच्या शेकडो पिढ्यांना प्रेरणादायी ठरावं असं आयुष्य ते जगले. या अशा थोर लोकांपैकी बाजीरावांचा आपल्याला ठाउक नसलेला आणि वाचून अंगावर रोमांच उभे राहतील असा इतिहास म्हणजे हे मेजर जनरल शशिकांत गिरीधर पित्रे यांचं पुस्तक "या सम हा"! शशिकांत पित्रे यांनी लिहिलेल्या या ग्रंथात बाजीरावांच्या विशाल कर्तृत्वाचा एक कुशल सेनानी म्हणून परिचय करून दिला आहे. छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्याचं एका विशाल साम्राज्यात रूपांतर करणारा रणधुरंधर म्हणजे बाजीराव पेशवा! अवघं ४१ वर्षांचं आयुष्य, २० वर्षांची वादळी कारकीर्द आणि त्यात लढलेल्या ४० लढायांपैकी एकही लढाई न हरलेला सेनानायक म्हणजे बाजीराव पेशवा! मराठा साम्राज्याची विजयी पताका चारी दिशांना फडकवणारा, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीमहाराज यांचा संकल्प पुढे नेऊन महाराष्ट्राला ४०० वर्षें वाकुल्या दाखवणारी दिल्ली काबीज करणारा पराक्रमी योद्धा म्हणजे बाजीराव पेशवा! राजमुद्रेतील छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले ‘वर्धिष्णू’ आणि ‘विश्ववंदिता’ हे शब्द सार्थ करून अवघ्या हिंदुस्थानात तांडव करणारा रुद्र म्हणजे बाजीराव पेशवा! स्वतःच्या कष्टाने पेशवेपद मिळवलेल्या बाळाजी विश्वनाथांच्या अकस्मात मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांनी वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी बाजीरावच्या खांद्यावर पेशवाईची जबाबदारी दिली आणि पुढच्या ४च वर्षांत या मिसरूड फुटलेल्या तरुणाने स्वतःला असं काही सिद्ध केलं की विस्कळीत होऊ घातलेलं स्वराज्य पुन्हा एकदा नव्या जोमाने उभं राहू लागलं. बाजीराव पेशव्यांच्या अल्पशा कारकिर्दीत स्वराज्य फक्त उभंच नाही राहिलं तर त्यांच्या या २ दशकांच्या कारकिर्दीत मोगल, पोर्तुगीज आणि सिद्दी यांसारख्या प्रतिस्पर्ध्याना नमवून त्यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे एका साम्राज्यात रूपांतर केलं. पित्रे यांनी बाजीरावांच्या कर्तृत्वावर लिहिलेलं "या सम हा" हे पुस्तक म्हणजे अजिंक्य बाजीरावाच्या युद्धनेतृत्त्वाची लोकविलक्षण यशोगाथाच आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरू नये. लेखकांनी पुस्तकाच्या  सुरुवातीलाच बाजीराव पेशव्यांच्या व्यक्तिमत्वाचं केलेलं वर्णन वाचकांच्या मनाचा ठाव घेतं. चैतन्य, ऊर्जा, अभिनिवेश, स्वामिनिष्ठा यांनी ओतपोत भरलेली तसंच आपल्या मातृभूमीवर नितांत प्रेम करणाऱ्या योध्याची ही रांगडी प्रतिमा संपूर्ण पुस्तक वाचून होईपर्यंत सतत आपल्या डोळ्यासमोर तरळत राहते. म्हणूनच शशिकांत पित्रे यांनी लिहिलेला ३३१ पाने, १० प्रकरणे आणि एकूण २० नकाशांतून साकार झालेला हा ग्रंथ बाजीराव पेशव्यांसारख्या वीरश्रेष्ठाच्या शौर्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून शेकडो वर्षांपासून फक्त एक प्रेमवेडा, प्रेमांध म्हणून त्याच्या प्रेमविलासाचं उदात्तीकरण  करणाऱ्यांसाठी एक सणसणीत चपराक आहे. अशा मूठभर लोकांच्या डोळ्यात घातलेलं हे एक झणझणीत अंजनच आहे.

"स्वराज्याचे पुनरुत्थान" या पहिल्या प्रकरणापासून या ग्रंथाची सुरुवात होते. लेखकांनी या पहिल्या प्रकरणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेला अतिशय गुंतागुंतीचा घटनाक्रम अगदी सोप्या भाषेत सांगितला आहे. शाहू महाराजांचं औरंगजेबाकडून पुन्हा स्वराज्यात येणं, कोल्हापूरच्या गादीसोबत चालू झालेला शाहू महाराजांचा संघर्ष, बाजीराव पेशव्यांचे वडील बाळाजी विश्वनाथांचं स्वराज्यासाठीचं योगदान, बाळाजीने आखलेली महसूल पद्धती, स्वराज्याभोवतालच्या इतर शाह्यांसोबतचं संघटन आणि पेशवाईचा घातलेला मजबूत पाया, लहानपणापासूनचं बाजीराव आणि चिमाजी यांचं नातं, बाळाजींचा झालेला अकस्मात मृत्यू, बाजीराव पेशव्यांच्या शिरावर अचानकपणे पडलेली पेशवेपदाची जबाबदारी, उमद्या वयातील बाजीरावाचं आपल्याहून वयाने आणि अनुभवाने मोठ्या सरदारांसोबत असणारं नातं, त्याकाळातील एकूण मोगल साम्राज्य आणि स्वराज्य यांची भौगोलिक पार्श्वभूमी, बाजीरावाच्या संबंधित असलेल्या सरदारांची ओळख या सर्वांची अगदी विस्तृत माहिती पहिल्या प्रकरणात आपल्याला वाचायला मिळते. यानंतरच्या प्रकरणांतून पेशवेपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बाजीरावांनी स्वराज्याची उत्तरोत्तर केलेली प्रगती वाचण्यास मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलेले लष्कराचे प्रमुख भाग, लष्कराची रचना आणि त्यातील हुद्दे बाजीरावांच्या काळात कसे होते याचीही रोचक माहिती आपल्याला या ग्रंथात मिळते. शिवरायांनी आपल्या सेनेत रुजवलेली मूल्यं बाजीरावांच्या काळातही प्राणपणाने कशी जपली जात होती हे पुस्तकात वाचताना अतिशय अभिमान होतो. बाजीराव पेशव्यांचं कार्यक्षेत्र आणि त्यांच्यापुढे असलेल्या डोंगरासमान आव्हानांसोबतच त्यांनी लढलेल्या लढायांची अगदी विस्तृत माहिती आपल्याला या ग्रंथात मिळते. खांडवा, बाळापूर,  फत्तेखर्डा, माळवा, गुजरात, कर्नाटक, डभई अशा अनेक यशस्वी  मोहिमा तसंच ठिकठिकाणी निजामाला दिलेला शह, आग्ऱ्यातील सैन्याला चाहूलही न लागू देता त्यांच्यामधूनच पुढे जात दिल्लीत  पोहचणाऱ्या आक्रमक बाजीरावाच्या रोमांचकारी प्रवासाचं  अद्भुत दर्शन लेखकांनी आपल्याला घडवलं आहे. पित्रे यांनी बाजीरावांनी लढलेली प्रत्येक लढाई एका क्रमाने घेऊन ती लढण्यामागचा त्यांचा मुख्य उद्देश स्पष्ट करून सांगितला आहे. मोहिमेआधी निरीक्षण करून, शत्रूचं वैगुण्य अचूक हेरून बाजीरावने घेतलेले महत्वाचे निर्णय, युद्धाच्या पूर्वीच्या हालचाली, लढाईच्या मैदानाचे गुणधर्म, अभिजात व्यूहरचना आणि प्रत्यक्ष लढाई असं सगळं लेखकांनी ठिकठिकाणी नकाशाच्या सहाय्याने मांडलेलं आहे. बाजीरावांनी लढलेल्या प्रत्येक लढाईचं लष्करी तत्त्वांवर मूल्यमापन आणि त्याचा तत्कालीन राजकारणावर झालेला दूरगामी परिणाम या गोष्टींचंही लेखकांनी संदर्भासह दिलेलं सविस्तर स्पष्टीकरण आपल्याला अचंबित करतं! चातुर्याने हालचाली केल्या तर आपले कमीतकमी नुकसान करुन रणमैदानात काय चमत्कार करुन दाखवता येतो याचं उत्तम उदाहरण म्हणून बाजीरावांनी लढलेल्या प्रत्येक लढाईकडे पाहता येईल. बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीत शिवरायांच्या गनिमीकावा या युद्धनीतीचा विकास झालेला दिसून येतो. याचं अगदी ठळक उदाहरण म्हणजे फेब्रुवारी १७२८ मधे झालेला पालखेडचा संग्राम! शिंदे, होळकरांसारख्या विश्वासू आणि कर्तबगार सरदारांना घेऊन आपल्या बुद्धी आणि बाहुबलाच्या जोरावर तीन शतकांपूर्वी बाजीराव पेशव्यांनी जिंकलेल्या पालखेडच्या लढाईकडे आजही युद्धशास्त्राचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून पाहिलं जातं. अवजड तोफा, हत्ती, जनाना, बुणगे  यांसह सुस्त चालणाऱ्या मोगल सैन्याविरुद्ध विजेच्या चपळाईने गतिमान होत त्यांचं नेतृत्व करणारा झपाटलेला बाजीराव वाचत असताना उर अभिमानाने भरून येतो. फक्त आधुनिक तंत्रज्ञान वा शस्त्रांनी नव्हे तर दृढनिश्चयी मन आणि कुशाग्र बुद्धीच्या जोरावर लढाई जिंकली जाते हे बाजीरावांनी जगाला दाखवून दिलं. पित्रे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाबद्दल बोलावं तितकं कमीच. बाजीरावांच्या अल्पशा कारकिर्दीवर नजर टाकताना "या सम हा" हे शिर्षक किती योग्य आहे याची जाणीव या पुस्तकाच्या पाना-पानावर होत राहते.

प्रेमवीर ही बाजीराव पेशव्यांची प्रतिमा पुसून एक रणधुरंधर, अतिशय हुशार असा सेनानायक, रणपंडित म्हणून त्यांना समोर आणण्याचं लाखमोलाचं काम शशिकांत पित्रे यांचं हे पुस्तक करते. बाजीराव पेशवा जाणून घ्यायचा असेल तर आवर्जून वाचावं असं पुस्तक "या सम हा"!





संदीप प्रकाश जाधव


Sunday, May 22, 2022

"अश्वत्थामा"

 




लेखक : संजय सोनवणी

प्रकाशक : प्राजक्त प्रकाशन

पृष्ठे- १९२, मूूल्य- २४० रुपये 


महाभारताला महर्षी व्यासांनी लिहिलेलं काव्य म्हणा अगर भारताचा प्राचीन इतिहास म्हणा त्यातील प्रत्येक पात्र, घटना आपल्याला काही न काही शिकवून जातातच. महाभारताचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील कोणत्याही पात्राच्या नजरेतून, कितीही वेळा आपण महाभारताकडे पाहिलं तर ते पात्रच योग्य आणि इतर पात्रे त्याच्यासमोर चुकीची वाटतात. परंतु असं असलं तरी हजारो वर्षांपासून नितीचा अनितीवर, धर्माचा अधर्मावर आणि वाईटाचा चांगल्यावर झालेला विजय म्हणूनच महाभारत आपल्यासमोर सादर केलं गेलंय. पांडव चांगले आणि कौरव वाईट, पांडव नितीने आणि कौरव अनितीने वागले हे सांगत असताना त्यादरम्यान घडलेल्या घटनांमधील विरोधाभास मात्र नेहमीच दुर्लक्षित केला जातो. महाभारताच्या जितकं खोलात जाऊ तितका हा विरोधाभास अधिकच जाणवत राहतो. निती-अनितीवर शंका घेणारे शेकडो अनुत्तरीत प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. परंतु या सर्व गोष्टी बाजूला ठेऊन महाभारत का घडलं असा प्रश्न जर कोणाला विचारला तर त्याची वेगवेगळी उत्तरे आपल्याला मिळतील, कोणी म्हणेल कौरव-पांडवांमधील सत्तासंघर्षामुळे महाभारत घडलं तर कोणी म्हणेल द्रौपदीमुळे महाभारत घडलं. कोणाला भीष्म दोषी दिसेल तर कोणाला धृतराष्ट्र. कोणाला कुंती तर कोणाला कर्ण. पण खरंच यांच्यामुळे घडलं का महाभारत? तर नाही, महाभारत घडलं ते भारद्वाजपुत्र द्रोणामुळे! आपल्या पुत्राच्या, अश्वत्थाम्याच्या चांगल्या भविष्यासाठी घेतलेल्या द्रोणांच्या एका निर्णयामुळे! द्रुपद राजाने द्रोणाचा अपमान केल्यानंतर त्या अपमानाच्या आगीत सुडाने पेटलेल्या द्रोणांनी द्रुपदाचा बदला घेण्यासाठी कौरव-पांडवांचे गुरु बनत द्रुपद राजावर हल्ला चढवून त्याचा पराभव केला. या पराभवानंतर द्रुपदाने यज्ञातून निर्माण केलेले धृष्टद्युम्न आणि द्रौपदी हे या सूडनाट्याची पुढची पायरी! इथून सुरुवात झालेल्या या सूडनाट्याने पुढे महाभारत घडवलं आणि त्याचा शेवट न्याय्य बाजूलाच बदनाम करण्यात झाला. या सुडनाट्याच्या सुरुवातीची मुळे ज्याच्या बालहट्टाने रुजवली गेली त्या द्रोणपुत्र "अश्वत्थाम्याला" चिरकाल ती भळभळती जखम आपल्या भाळावर वागवावी लागली. "अश्वत्थामा" ही संजय सोनवणी यांची याच द्रोणपुत्राच्या आयुष्यावर बेतलेली आणि अश्वत्थाम्याच्या नजरेतून आपल्याला महाभारत दाखवणारी कादंबरी!

द्रोणांच्या निवेदनातून या कादंबरीची सुरुवात होते. द्रोणांचं बालपण, द्रोण लहान असतानाच त्यांच्या वडिलांचा-भारद्वाज ऋषींचा झालेला मृत्यू, अग्निवेशांकडून द्रोणांचं झालेलं संगोपन, द्रोण-कृपी यांचा संसार, द्रोणांनी प्रत्यक्ष परशुरामाकडून मिळवलेली विद्या या सर्वांना तशा परिचयाच्याच गोष्टींतून ही कथा पुढे सरकत राहते. जंगलातील आश्रमात जन्माला आलेला द्रोण आणि कृपी यांचा पुत्र "अश्वत्थामा"! द्रोणांनी भगवान शंकराला प्रसन्न करून शिवासारखा पराक्रमी आणि चिरंजीवी असा हा पुत्र जन्माला घातला खरा पण द्रोणांच्या आश्रमातील साध्या राहणीमानामुळे "अश्वत्थाम्याचे" बालपण खूपच कठीण जायला लागते. युद्धशास्त्रात निष्णात असणाऱ्या द्रोणांचा मानी स्वभाव त्यांच्या पुत्राच्या साध्या-साध्या ईच्छादेखील पुऱ्या करण्यास असमर्थ ठरतो. परंतु अश्वत्थाम्याने दुधासाठी केलेला हट्ट आणि तो पूर्ण करण्यासाठी असणारी आपली असमर्थता द्रोणांना त्यांच्या स्वभावाविरुद्ध निर्णय घेण्यास भाग पाडते. कधीही कोणासमोर हात न पसरवणारे द्रोण शेवटी आपल्या बालमित्राची, द्रुपदाची मदत घेण्याचे ठरवतात आणि इथेच ठिणगी पडते भविष्यात होऊ घातलेल्या महाभारताची! अश्वत्थाम्यावरील प्रेमाखातर द्रुपदासमोर गेलेले द्रोण अपमानित होऊन परत येतात. राजा आणि भिकारी हे कधीच मित्र असू शकत नाहीत असं बोलून भर दरबारात द्रुपदाकडून द्रोणाचा अपमान केला जातो. आपल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी द्रोण कुटुंबासह हस्तिनापुरात येऊन कौरव-पांडवांचे गुरू म्हणून रहायला लागतात. नंतर पांडवांकडून द्रुपदाचा पराभव करवून ते आपल्या अपमानाचा सूड घेतात परंतु ज्या पुत्रप्रेमाखातर हे सगळे घडले तो "अश्वत्थामा" मात्र त्यांच्यापासून दुःखावतो, दुरावतो. पुत्राच्या एका साध्या इच्छापूर्तीसाठी ब्राम्हधर्म सोडून क्षात्रधर्म स्वीकारणारे द्रोणाचार्य अशा वळणावर येऊन पोहचतात जिथून माघार अशक्य! या सर्व प्रवासात द्रोण आणि अश्वत्थामा या दोघांमध्ये होणारी धर्म-अधर्मावर, निती-अनितीवर, कौरव-पांडवांवर कादंबरीतील चर्चा वाचकाला विचारात पाडते. आजपर्यंत आपण जे ऐकत-वाचत आलो त्यावर नव्याने विचार करायला वाचक भाग पडतो. अश्वत्थाम्याच्या नजरेतून कृष्ण, अर्जुन, दुर्योधन, दुःशासन, विदुर, कर्ण, एकलव्य, भीष्म, युधिष्ठिर, धृतराष्ट्र, द्रौपदी आणि साक्षात द्रोण यांच्याकडे पाहताना महाभारताचं एक वेगळं रूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. या पात्रांच्या आजपर्यंत आपल्या मनात असणाऱ्या प्रतिमांना छेद देण्याचं काम "अश्वत्थामा"चं या कादंबरीतील निवेदन करतं. पांडव अनितीने वागत आहेत हे माहित असूनही पांडवांना झुकते माप देणाऱ्यांबद्दल द्रोणांजवळ स्पष्टपणे नाराजी व्यक्त करून शेवटपर्यंत दुर्योधनाला साथ देणारा हा "अश्वत्थामा" आपल्याला सर्वांहून मोठा भासतो. (असं खरं तर महाभारतातील प्रत्येक पात्राबद्दल वाटते जेव्हा आपण त्याच्या नजरेतून महाभारत पाहतो). प्रत्यक्ष युद्धास सुरुवात झाल्यानंतर द्रोणाचार्य कौरवांचे सेनापतीपद स्वीकारतात आणि पांडवसेनेवर तिखट हल्ला चालू करतात. पांडवांची बाजू मार खायला लागताच कृष्णाकडून अनितीने द्रोणाचार्यांना शस्त्र खाली ठेवण्यास लावले जाते. भीमाद्वारे अश्वत्थामा नावाच्या एका हत्तीचा वध घडवून कृष्णाने 'अश्वत्थामा मेला' अशी आवई उठवली. आपला पुत्र "अश्वत्थामा" चिरंजीवी आहे, तो अमर आहे हे माहित असूनही द्रोण या आवईने विचलित होतात. सर्वांत विश्वसनीय आणि सत्यवादी युधिष्ठिराकडूनही जेव्हा त्यांना ’अश्वत्थामा मेला’ हेच ऐकायला मिळते तेव्हा बसणाऱ्या मानसिक धक्क्याने ते शस्त्र खाली ठेवतात. त्यानंतर दृष्टद्युम्नाने याचा फायदा उचलत त्यांचा वध केला. पुढे अश्वत्थाम्यानेही दृष्टद्युम्नाचा वध करून आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतला. "अश्वत्थामा" हा महाभारतात कौरवांचा शेवटचा सेनापती म्हणून लढला. युद्ध संपल्यानंतर आणि दुर्योधन मृत्यू पंथास लागला असताना अश्वत्थाम्याने त्याला "पांडवांची शिरे कापून आणतो" असे आश्वासन दिले. परंतु अंधार असल्याने त्याला पाच पांडवपुत्रांचीच मुंडकी आणणे शक्य झाले. आपला निर्वंश झाला हे पाहून पांडव संतप्त होतात. अर्जुन आणि अश्वत्थामा दोघे एकमेकांवर ब्रह्मास्त्र फेकतात. यामुळे सृष्टीचा विनाश होऊ नये म्हणून कृष्ण दोघांना आपापले ब्रह्मास्त्र परत घ्यायला सांगतो. परंतु अश्वत्थाम्याला अस्त्र परत घेण्याची कला माहीत नसल्यामुळे तो अभिमन्यूची पत्‍नी उत्तरेच्या गर्भात ते सोडतो. यावर क्रोधित होऊन कृष्ण त्याच्या कपाळावरचा दिव्य मणी काढून घेतो आणि त्याला शाप देतो की कल्पकल्पांतापर्यंत ही जखम कपाळी घेऊन तू तेल मागत दारोदार फिरशील. पुत्राच्या दुधाच्या इच्छेखातर द्रोणांकडून नकळत चालू झालेलं हे सूडनाट्य महाभारताच्या शेवटी त्याच पुत्रावर आपल्या भाळी भळभळती जखम घेऊन फिरण्याची वेळ आणते आणि सिद्ध करते 'विधिलिखित अटळ आहे'.

संजय सोनवणी यांचं अतिशय वाचनीय पुस्तक "अश्वत्थामा"!





संदीप प्रकाश जाधव


 


Sunday, May 15, 2022

"जिंजीचा प्रवास"

 



लेखक : वासुदेव सीताराम बेंद्रे

प्रकाशक : प्राकृत प्रकाशन

पृष्ठे- १०९, मूूल्य- २०० रुपये


छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीवर इतिहासकारांनी आजपर्यंत बरंच संशोधन केलं, बरीच नवनवीन माहिती लोकांपर्यंत पोहचवली. आज ३५० वर्षांपेक्षा जास्त काळ जाऊनही आपल्या मनातील त्यांच्याबद्दलचा अभिमान तसूभरही कमी नाही झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बादशाह औरंगजेबाशी मराठ्यांनी सुरू केलेला स्वातंत्र्यसंग्राम तर स्वराज्याच्या इतिहासातील एक सोनेरी पानच आहे. संभाजी महाराजांना पकडून त्यांचा अतोनात छळ करून त्यांना मारल्यानंतर मराठे संपले, मराठयांचे स्वराज्य संपले अशा भ्रमात औरंगजेब राहू लागला. मराठयांचा राजा मारला गेला, रायगड पडला, येसूबाई आणि लहान शाहू महाराज मोगलांच्या हाती सापडले अशा या कठीण काळात अनेक मोठ-मोठे मराठी सरदार मोगलांना जाऊन मिळाले त्यामुळे दख्खन जिंकून संपूर्ण हिंदुस्थानावर आपला अंमल प्रस्थापित करण्याचं आपलं स्वप्न पूर्ण झाल्याच्या आनंदात दिल्लीकडे परत जायची स्वप्ने बघणाऱ्या औरंगजेबाला आणि त्याच्या विशाल सागर सेनेला मराठ्यांनी आपली जिद्द आणि पराक्रमाच्या जोरावर पुढची २७ वर्षें लढत ठेवलं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी आलेल्या औरंगजेब बादशहाविरोधात छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या नेतृत्वाखाली हा लढा लढला गेला परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनंतरच्या मराठ्यांच्या या लढ्याची आणि त्याच्या नायकांची इतिहासकारांकडून तशी उपेक्षाच झाली. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची थोडीफार दखल घेतली गेली असली तरी त्याहून अधिक त्यांचे चारित्र्यहनन आणि बदनामीच करण्यात आली. नंतरचा राजाराम महाराज आणि ताराराणींचा इतिहास तर अगदीच उपेक्षित राहिला. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या तोडीचा पराक्रम करून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य राखणाऱ्या, स्वराज्याच्या तिसऱ्या छत्रपतींचा, राजाराम महाराजांचा "एक दुर्लक्षित छत्रपती" असाच उल्लेख आज बऱ्याच ठिकाणी वाचायला आणि ऐकायला मिळतो. असं असलं तरी एक गोष्ट मान्य करावीच लागेल ती म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्यूपश्चात रायगड पडल्यानंतर जवळपास धुळीस मिळालेल्या स्वराज्याच्या उभारणीचं शिवधनुष्य जर राजाराम महाराजांनी नसतं उचललं तर स्वराज्यासह संपूर्ण दख्खन मुघलांनी कधीच आपल्या टाचेखाली घेतला असता. छत्रपती राजाराम महाराजांच्या या महापराक्रमाची पहिली पायरी होती झुल्फिकार खानाने रायगडला दिलेल्या वेढ्यातून निघून जिंजीला पोहोचणं! छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाचा सरदार झुल्फिकारबखान याने रायगडला वेढा दिला. प्रत्यक्ष राजधानीच संकटात असल्यामुळे मराठ्यांचे राज्य आता बुडणार अशी शंका निर्माण झाली. अशा कठीण प्रसंगी आपल्या पतीच्या निधनाचं दुःख बाजूला सारून महाराणी येसूबाई यांनी राजाराम महाराजांचं मंचकारोहण केलं आणि त्यांना रायगडावरून सुरक्षित बाहेर जाण्यास सांगितलं, हेतू एकच - छत्रपती शिवरायांनी उभारलेलं स्वराज्य राखलं पाहिजे हा. रायगडावरून निघून सुरक्षित जागी पोहचण्यासाठी मराठ्यांनी दक्षिणेतील, तामिळनाडूतील जिंजीची निवड केली. काही निवडक आणि विश्वासू सरदारांसह महाराज प्रतापगड, पन्हाळगड मार्गे दक्षिणेत उतरले. अतिशय प्रदीर्घ प्रवास आणि चारी बाजूला मुघलांचा वावर अशा धोकादायक परिस्थितीत राजाराम महाराज जिंजीला पोहचले. पुन्हा एकदा एका अवघड प्रसंगी मराठ्यांचे छत्रपती शत्रूच्या वेढ्यातून सुखरूप बाहेर पडले. आज जर आपण नकाशावर रायगड पासून जिंजीपर्यंतचं अंतर बघितलं तर ते जवळपास १२०० किलोमीटर आहे तेव्हा आपण फक्त कल्पनाच केलेली बरी की राजाराम महाराजांचा हा "जिंजीचा प्रवास" किती धोकादायक होता आणि तो जर फसला असता तर त्यानंतर स्वराज्याचं भविष्य काय असतं. राजाराम महाराजांच्या या रायगडपासून ते जिंजीपर्यंतच्या संपूर्ण प्रवासाचे वर्णन करणारा "राजाराम चरित्रम" अर्थातच "जिंजीचा प्रवास" हा ग्रंथ राजाराम महाराजांचे समकालिन आणि शिवाजी महाराजांपासून राजदरबारात राजाश्रय असणारे कवी केशव पंडित यांनी संस्कृतमधे लिहिला होता. शिवकाळातील असणाऱ्या काही दुर्मिळ ग्रंथांपैकी केशव पंडितकृत "राजाराम चरित्रम" हा एक अत्यंत दुर्मिळ ग्रंथ आहे. एकूण पाच सर्ग आणि २७५ श्लोकांमधून लिहिल्या गेलेल्या या संस्कृत ग्रंथाचं मराठी भाषांतर वा. सी. बेंद्रे यांनी केलं आहे तेच हे पुस्तक "जिंजीचा प्रवास"!

छत्रपती राजाराम महाराजांचं कर्तृत्व किती अफाट होतं याची छोटीशी झलक देणारा, प्रत्येकाने आवर्जून वाचावा असा ग्रंथ "जिंजीचा प्रवास"!





संदीप प्रकाश जाधव


Sunday, May 8, 2022

"सार्थ"

 



लेखक : डॉ. एस. एल. भैरप्पा

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

मराठी अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी

पृष्ठे- २७२, मूूल्य- २९५ रुपये


"सार्थ" म्हणजे व्यापाऱ्यांचा तांडा! भैरप्पांच्या या कादंबरीची कथा आहे जवळपास ७व्या-८व्या शतकातील. कादंबरीच्या सुरुवातीलाच लेखक आपल्याला त्या कालखंडात घेऊन जातात. अगदी साधाच विषय पण मानवी मनाचे विविध पैलू उलगडत जाणारे कथानक. नागभट्ट हा या कादंबरीचा नायक. हा नागभट्ट म्हणजे तारावती नगरातील आमरुक राजाचा बालमित्र आणि अत्यंत जवळचा, विश्वासू असा राजदरबारातील एक व्यक्ती. गुरुकुलात वेदाध्ययन केलेल्या तरुण नागभट्टावर अचानकच आमरुक राजा एक गुप्त कामगिरी सोपवतो. देशोदेशी फिरणाऱ्या विविध व्यापारी 'तांड्यां'बरोबर फिरून ते करत असलेल्या व्यापाराची माहिती गोळा करण्याची ही कामगिरी, ज्या माहितीचा वापर आपण आपल्या राज्याच्या विकासासाठी करू असं आमरुक राजा नागभट्टला पटवून देतो. पण आमरुक राजाची ही खेळी खरं तर नागभट्टाच्या पत्नीला हस्तगत करण्यासाठी असते. आपल्या जिवलग मित्राने, तारावती नगराच्या राजाने आपल्याला अतिशय महत्त्वाची जबाबदारी पाड पाडण्यास निवडले या आनंदातच नागभट्ट प्रवासाला लागतो. व्यापारी 'तांड्यां'सोबत काही वर्षांचा काळ घालवल्यानंतर परत आपल्या गावी जाण्याच्या मनस्थितीत आलेल्या नागभट्टाला प्रवासातच एक धक्का बसतो जो त्याच्या पुढच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकतो. राजाच्या आज्ञेनुसार प्रवासाला निघालेल्या नागभट्टला वाटेतच आपल्या पत्नीच्या व्याभिचाराविषयी समजते. आपल्या पत्नीने आणि जिवलग मित्राने केलेल्या या विश्वासघाताने निराश होऊन घरी न परतता सार्थासोबतच वाट मिळेल तिकडे आणि नशीब नेईल तिथे जाण्याचे तो ठरवतो. इथून खऱ्या अर्थाने या कादंबरीची कथा सुरू होते. नागभट्टाच्या या प्रवासात त्याला अनेक व्यक्ती भेटतात. अनेक मानसिक स्थित्यंतरातून त्याला जावे लागते आणि मग त्यानंतर सुरू होते मानसिक द्वंद्व, "वैदीक विरुद्ध बौद्ध", "गृहस्थाश्रम विरुद्ध संन्यास", "जीवन विरुद्ध मृत्यू"! याच प्रवासाची, द्वंद्वाची कहाणी म्हणजे ही कादंबरी "सार्थ"! 

सुरुवातीला थोडंस फ्लॅशबॅकमधे जाणारी ही कथा जिथे नागभट्टाला एका "सार्थात" सामिल झाल्यानंतर आलेले अनुभव वाचत असताना नकळत आपणही त्या "सार्थात" सहभागी होऊन जातो. व्यापारातील अनेक खाचाखोचा समजून घेत असताना "सार्थ" म्हणजे आपल्यासारखा सामान्य माणूस कल्पनाही करू शकणार नाही असं प्रकरण असल्याची जाणीव नागभट्टाला येते. हा "सार्थ" साधासुधा नाही तर व्यापार्‍यांसाठी आवश्यक असलेले सामान लादलेले पंच्याहत्तर घोडे, दोनशे बैलगाड्या, शंभर गाढवं, दररोजच्या आहारासाठी लागणारं धान्य, इतर सामान, गाड्यांची, चाकाची धाव सुटली तर बसवायला सुतार, लोहार इतका प्रचंड काफीला ज्यात बहुतेक माणसं अशी ज्यांना तलवार चालवता येते आणि स्वतःच्या व इतरांच्याही जीवाचं सोबतच मौल्यवान वस्तूंचं संरक्षण करता येतं. अशा सार्थात सहभागी होऊन मार्गक्रमण करणारा नागभट्ट या मोहीमेतून जे काही शिकत जातो त्यातून वाचकालाही बऱ्याच गोष्टी समजत राहतात. हा वरवर दिसणारा फक्त एका भौगोलिक प्रदेशातील प्रवास नसून त्याच्या अंतरंगातही एक अविरत प्रवास चालू असल्याची जाणीव वाचकला विचारात पाडते. या प्रवासात नागभट्टाला अनेक धर्म- पंथातल्या तात्विक मतभेदालाही सामोरं जावं लागतं. काही काळ "सार्था"सोबत प्रवास केल्यानंतर, नागभट्ट एका नाटक मंडळीच्या संपर्कात येतो. कृष्णावर आधारित असणा-या नाटकात त्याला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळते. "कृष्णानंद" नावाने त्याची कीर्ती सर्वदूर पसरते. बायकोने केलेल्या विश्वासघाताने खचलेला नागभट्ट त्याच कृष्णाच्या नाटकातील नटी चंद्रिकाच्या प्रेमात पडतो. परंतु ध्यानमार्गाचा अवलंब करणारी चंद्रिका नागभट्टावर प्रेम करत असूनही ती ते मान्य करत नाही. त्यामुळे नागभट्ट तिच्यापासून दूर जाण्याचे ठरवतो. एक ब्राह्मण असूनही तो तंत्रसाधनेचा मार्गाला लागतो. अनेक अनुचित मार्ग तो अवलंबतो. हटयोग आणि अघोरी तंत्रविद्या आत्मसात करण्याच्या नादात त्याचे जीवन भरकटत जाते. पण तरीही एका वळणावर त्याची आणि चंद्रिकेची पुन्हा एकदा भेट होते. नागभट्टाच्या तंत्रविद्येतील एका विधीसाठी त्याला मदत करण्यास तयार होणारी चंद्रिका नंतर त्याला "सार्थ" जगणे काय असते ते शिकवते. नागभट्ट आणि चंद्रिका यांच्यामधील हे नाते लेखकाने अगदी तरलपणे उलगडले आहे. कादंबरीतील या ७व्या-८व्या शतकातील काळात बौध्द धर्माने बहुतांश भारत व्यापलेला होता. बौध्द धर्मीय लोक वैदिक लोकांना बौद्ध धर्माचे महत्व पटवून देत असल्याचा विलक्षण प्रसंग मोठ्या खुबीने भैरप्पांनी या कादंबरीत लिहिला आहे. नालंदा विद्यापीठ, पूर्वेचं सूर्यमंदिर या ऐतिहासिक स्थळांचं वर्णन वाचकाला आपल्या इतिहासाच्या भव्यतेची जाणीव करून देतात. नागभट्टाला येणारे उलटसुलट  अनुभव आयुष्यातला नेमका कोणता मार्ग खरा यावर विचार करायला वाचकाला भाग पाडतात. नागभट्टाची होणारी तगमग, सगळीकडे त्याला येणारा शून्याचा, अपूर्णत्वाचा अनुभव आणि तरीही त्याचं सतत सत्याचा शोध घेत राहाणं हा या कादंबरीतील कथेचा गाभा. चंद्रिकेसोबत राहत असताना पुढे नागभट्टाची गाठ गुरु कुमारील भट्टांशी पडते. तत्कालीन समाजामध्ये पंडित कुमारील भट्ट ही एक अतिशय आदरणीय अशी व्यक्ती होती. कुमारील भट्टांची वैदिक धर्मावर अपार श्रद्धा असूनदेखील बौध्द धर्म समजून घेण्यासाठी ते बौद्ध धर्माचा स्वीकार करतात. धर्मांतरण ही त्या काळात खूप निंदनीय गोष्ट असूनदेखील कुमारील भट्ट ते करतात. धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्माचा नैतिक अधिकार राहत नसे परंतु वैदिक धर्माचरण हा कुमारील भट्टांचा श्वास असल्यामुळे प्रायश्चित्त म्हणून सर्वांसमक्ष, स्वतः चिता रचून ते आत्मदहन करायचं ठरवतात. स्वधर्माची महती जाणून घेण्यासाठी प्रसंगी धर्मांतरणाचे पाप करून, प्रायश्चित्त म्हणून प्राणांचे बलिदान देणाऱ्या कुमारील भट्टांची धर्मनिष्ठा आणि चंद्रीकेचे निर्व्याज प्रेम या दोन गोष्टींमुळे नागभट्टाच्या भरकटलेल्या आयुष्यात खूप मोठा बदल होतो आणि शेवटी "सार्थासोबत" चालू झालेल्या या प्रवासात त्याला जीवनाची 'सार्थता' लाभते. 

आपले वाचन 'सार्थ' झाल्याचा अनुभव देणारी, आवर्जून वाचावी अशी कादंबरी, "सार्थ"!!






संदीप प्रकाश जाधव

Thursday, April 28, 2022

"पडछाया"

 



लेखक : नारायण धारप

प्रकाशक : साकेत प्रकाशन

पृष्ठे- २४६, मूूल्य- ३०० रुपये


"अघटित" हा नारायण धारपांचा मी वाचलेला पहिला भयकथासंग्रह! भयकथा असोत की गूढकथा त्यांची परिणामकारकता लेखकाच्या कल्पनाशक्तीवर तसेच कथांच्या मंडणीवरच अवलंबून असते आणि या दोन्हीही बाबतीत नारायण धारप यांचं नाव अग्रस्थानी घ्यावं लागेल इतक्या त्यांच्या भयकथा-कादंबऱ्या परिणामकारक असतात. विषय साधेच पण प्रचंड कल्पनाशक्तीच्या जोरावर अशा विषयांची कथेत केलेली मांडणी वाचकाला त्यांच्या लेखनाच्या प्रेमात न पाडते तरच नवल. एखाद्या व्यक्तीला ठराविक साहित्य वाचनाचीदेखील 'चटक' लागू शकते याचा प्रत्यय मला खरंतर धारप आणि मतकरी यांच्या पुस्तक वाचनातून आला. माझ्या नेहमीच्या वाचनातून थोडासा बदल म्हणून जर मी कोणती पुस्तके वाचत असेल तर ती धारप आणि मतकरींचीच! "अघटित"नंतर धरपांची पुस्तके शोधून संग्रही घेण्याचा मी सपाटाच लावला आहे. आज नारायण धारप आणि रत्नाकर मतकरी यांची जवळपास २०हून अधिक पुस्तके माझ्या संग्रही आहेत आणि हा आकडा अजून वाढत जाईल यात शंकाच नाही. तर "अघटित"पासून धारपांसोबत चालू झालेल्या या माझ्या प्रवासात पुढे त्यांची "चेटकीण", "लुचाई", "वेडा विश्वनाथ", "स्वाहा", "देवाज्ञा", "ग्रहण" अशी एकाहून एक दर्जेदार पुस्तके मी वाचून काढली. प्रत्येकवेळी आलेला अनुभव खासच! या सर्व पुस्तकांच्या पंक्तीत आज आणखी एका उत्कृष्ठ कथा संग्रहाची भर पडली आणि तो म्हणजे "पडछाया"! "पडछाया" चा शब्दशः अर्थ "प्रतिबिंब"! १० वेगवेगळ्या कथांचा हा संग्रह आणि प्रत्येक कथेचा विषय वाचकाला खिळवून ठेवणारा असा आहे. आपल्या प्रचंड कल्पनाशक्तीच्या जोरावर धारपांनी प्रत्येक कथेमधून जी "पडछाया" वाचकांसमोर आणली आहे ती वाचकाला एका वेगळ्या जगात घेऊन जाते. कथा साध्याच पण जबरदस्त परिणामकारक! वाचत असताना धारपांच्या कल्पनाशक्तीला दाद दिल्याशिवाय राहवत नाही. पुस्तकातील पहिलीच कथा आहे "पडछाया" जी फिरते वामन या नायकाभोवती. पुण्यातील आपल्या वाड्यातून पळून गेलेला किशोरवयीन वामन जेव्हा जवळपास १८ वर्षांनी पुण्यात परत येतो त्यानंतर सुरुवात होते या कथेची. वामनच्या परत येण्याची १८ वर्षें वाट बघणारी त्याची मैत्रीण उर्मिला हे या कथेतील आणखी एक पात्र. १८ वर्षांपूर्वीच्या वामनची त्याच्या वाड्यात वावरणारी "पडछाया" आणि आज वर्तमानकाळात जगणारा वामन यांच्या संघर्षाची ही कथा जी प्रत्यक्ष वाचताना अंगावर शहारे आणते. दुसरी कथा आहे "मुक्ती"! खरंतर नावावरूनच वाचकाला कथेचा थोडाफार अंदाज येतो. या कथेचा नायक आहे नारायण आणि ही कथा आहे नायकाची बालमैत्रिण कमलच्या मृत्यूनंतरच्या "मुक्ती"ची! रस्तारुंदीकरणात आपला जुना वाडा पाडला जाणार म्हणून जवळपास ३० वर्षांनी वाड्याला शेवटची भेट देण्यासाठी म्हणून आलेल्या नारायणला त्या वाड्यात जाणवणारी कमलची "पडछाया" आणि फ्लॅशबॅकमधे कमलच्या मृत्यूचा होणारा उलगडा, नंतर नारायणकडून कमलला मिळणाऱ्या "मुक्ती"ने होणारा कथेचा शेवट. "तो कोण होता?" ही थोड्या वेगळ्या अंदाजाने सुरुवात होणारी या संग्रहातील तिसरी कथा. स्वतःला सिद्ध करण्यासाठी संघर्ष करणारा एक लेखक आणि त्याची पत्नी विमल ही या कथेतील महत्वाची पात्रे. आपल्या पत्नीच्या "पडछाये"सोबत राहणारा आणि शेवटी स्वतःचेच अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धडपडणारा हा नायक कथेच्या शेवटी वाचकालादेखील संभ्रमात टाकतो. "मन मोहाचे घर" ही चौथी कथा आहे शेखरची. एक मेल प्रॉस्टिट्यूट होऊन चैनीत आयुष्य जगणाऱ्या शेखरचं आयुष्य त्याच्या लग्नानंतर अचानक वादळी होतं आणि त्यातूनच त्याच्या हातून त्याच्या पत्नीचा खून होतो. पुढे त्याच्या पत्नीच्या "पडछाये"कडून घेतल्या गेलेल्या सूडाने या कथेचा शेवट होतो. धारपांनी या कथेतून निर्माण केलेली वातावरण निर्मिती अफलातून आहे. यानंतरची कथा आहे "तितू"! चित्रा ही या कथेची नायिका आणि प्रभाकर हा नायक. आपल्या सावत्र आईकडून  फसवून प्रभाकरसोबत लग्न लावून दिलेल्या चित्राचा प्रभाकरला दिसणाऱ्या "तितू"नामक "पडछाये"सोबत होणारा संघर्ष म्हणजे ही कथा. हे "तितू" काय प्रकरण आहे आणि त्याचा उद्देश काय आहे याचा उलगडा कथेच्या शेवटी प्रभाकरच्या मृत्यूनंतर होतो, तोदेखील फक्त चित्रापुरताच! लोकांच्या नजरेत वेड्याच्या इस्पितळात दाखल झालेला प्रभाकर हा खरंतर आता जिवंतच नाहीये याची चित्राला होणारी जाणीव आणि इथेच वाचकाला विचारात पाडून होणारा कथेचा शेवट. एका नवकवीच्या संघर्षाची ६वी कथा आहे "मोहन किरपेकर - एक शोकांतिका". चेटूक करून आपल्याच पतीचा जीव घेणाऱ्या बेबीची कथा आहे "चेटकिण". स्वतःच्या आईची मावशी म्हणून जगाला ओळख सांगणाऱ्या बेबीच्या बऱ्याच वर्षांनी आपल्या बालमैत्रिण सुमनसोबत अचानक होणाऱ्या भेटीने या कथेची सुरुवात होते. पुढे फ्लॅशबॅकमध्ये लहानपणी बेबीकडून घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करून लेखकांनी वाचकाला बेबीबद्दल विचार करायला भाग पाडलं आहे. या संग्रहातील इतरही कथा "बळी", "चौरस्ता", "अनाहूत" अतिशय दर्जेदार आहेत. प्रत्येक कथेत असणारं वेगळेपण आणि तरीही या सर्व कथांमध्ये असणारा सामाईक धागा "पडछाया" वाचकाला अक्षरशः खिळवून ठेवतात. या संग्रहातील ८वी कथा "बळी" ही अलीकडेच येऊन गेलेला चित्रपट "तुंबाड" ची आठवण करून देते. जवळपास याच कथानकावर बेतलेला हा चित्रपट जर आपण पहिला असेल तर धारपांनी लिहिलेल्या कथांचा आणि त्यांच्या जबरदस्त कल्पनाशक्तीचा आपण अंदाज लावू शकतो.

कथानकात पुढे काय होईल याची उत्सुकता कायम ठेवत, वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवत त्याला त्या वतावरणाचाच एक भाग बनवणाऱ्या नारायण धारप यांचा एक वाचनीय कथासंग्रह "पडछाया"!




संदीप प्रकाश जाधव

                                                                           

Wednesday, April 20, 2022

"अधर्मयुध्द"

 


लेखक : गिरीश कुबेर

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

पृष्ठे- २४४, मूूल्य- ३०० रुपये                                                              



गिरीश कुबेर यांच्या लेखनाबद्दल बरंच ऐकलं होतं आणि त्याच उत्सुकतेतून त्यांची काही पुस्तकेही खरेदी केली. त्यातीलच आज वाचून पूर्ण झालेलं एक उत्कृष्ट पुस्तक "अधर्मयुद्ध"! खरंतर त्यांचं "अधर्मयुद्ध" हे पुस्तक मी फक्त नाव आणि मुखपृष्ठ पाहूनच निवडलं होतं. गिरीश कुबेरांच्या या पुस्तकाने मला माझी निवड न चुकल्याचा आनंद आणि एक वेगळं तसंच आपल्या ज्ञानात भर घालणारं काहीतरी वाचायला मिळाल्याचं समाधान मिळवून दिलं. पुस्तकाचं नाव जरी "अधर्मयुद्ध" असलं तरी 'धर्म-अधर्माचा" कोणताही बाऊ न करता प्रत्यक्ष व्यवहारातील संघर्ष आपल्यासमोर आणणारी ही एक शोधकथा किंवा रहस्यकथा म्हटले तरी चालेल. ही कथा जितकी वाचकाला चीड आणते तितकीच ती अस्वस्थही करते. गिरीश कुबेरांनी एक अतिशय किचकट आणि गुंतागुंतीचा विषय तितक्याच सोप्या भाषेत या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर आणला आहे. आज सारं जग त्यांना धर्मांध, माथेफिरू म्हणून ओळखतं. अनेकदा त्यांचा धिक्कार केला जातो, तर कित्येकदा त्यांना चिरडण्यासाठी मोठमोठ्या लष्करी मोहिमा आखल्या जातात. त्यांच्या हातातलं इस्लामचं निशाण पाहून किंवा त्यांच्या तोंडची जिहादची भाषा ऐकून त्यांच्या धर्माबद्दलचे भलेबुरे, समज-गैरसमज पसरवले जातात. भस्मासुरासारखं अक्राळविक्राळ रूप धारण करणार्‍या अशा दहशतवाद्यांच्या मूळ प्रेरणा कोणत्या आणि स्वार्थासाठी त्यांना कठपुतळ्यांप्रमाणे नाचवणार्‍या साम्राज्यवादी सूत्रधारांचे मनसुबे कोणते, याचा नावनिशीवार केलेला हा पंचनामा म्हणजे वाचकांचे लक्ष खिळवून ठेवणारी एक रहस्यकथाच! गिरीश कुबेर यांचं हे पुस्तक म्हणजे या इस्लामी दहशतवादाचा इतिहास आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरू नये. आज जगभर ज्या इस्लामी दहशतवादाने थैमान घातलं आहे तो नेमका कधी, कसा, कुणी जन्माला घालून वाढवला याचं अतिशय विस्तृत वर्णन या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतं. आखाती देशात जन्माला आलेल्या आणि हळूहळू जगभर आपले हातपाय पसरलेल्या या इस्लामिक दहशतवादाचा मागोवा घेत असताना काही धर्मांध व्यक्तींनी शांतताप्रिय अशा इस्लामचा स्वतःच्या फायद्यासाठी हवा तसा अर्थ लावून त्याचं रूपांतर दहशतवादाच्या अधर्मयुद्धात कस केलं याचीच ही कहाणी "अधर्मयुद्ध"! जेव्हा धर्मकारण हेच राजकारण आहे असे विचार लोकांच्या मनावर वर्षानुवर्षे बिंबवले जातात आणि एखाद्या देशाच्या, समाजाच्या राजकारणाचा गाडा धर्मकारण खेचू लागते तेव्हा सुरु होणारं "अधर्मयुद्ध" म्हणजेच दहशतवाद हे सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न गिरीश कुबेर यांनी या पुस्तकातून केला आहे जो नक्कीच प्रशंसनीय आहे. अमेरिकेने काढता पाय घेतल्यानंतर सध्या अफगाणिस्तानवर वेगाने कब्जा मिळवत असलेलं 'तालिबान', काही महिन्यांपूर्वी इस्राईलवर हजारो रॉकेट्सचा मारा करणारं 'हमास' या सगळ्या इस्लामिक दहशतवादी संघटनांविषयी ऐकलं तर आपल्या मनात प्रश्न येतात की या सगळ्याची सुरुवात नेमकी कुठून झाली असावी? इस्लामची विचारधारा जरी सुरुवातीपासून आक्रमक व असहिष्णु असली तरी आधुनिक काळातील 'जिहादी' इस्लामच्या विचारधारेची सुरुवात कशी झाली? अशा अनेक प्रश्नांच्या खोलात जात असताना लेखकांनी अगदी इतिहासातून म्हणजे वहाबी आणि इब्न सौद यांची युती होऊन एक संपूर्ण देश कसा तयार झाला इथून पुस्तकाची सुरवात केली आहे. ज्यामधे पुढे ब्रदरहूडची स्थापना, ऑटोमन साम्राज्याचा झालेला ऱ्हास आणि त्यातून आपल्या ताटात काहीतरी पडावे म्हणून इंग्लड व इतर युरोपातील राष्ट्रांची चाललेली धडपड, विस्तारवादी भूमिकांमुळे एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी चालणारं जागतिक पातळीवरील राजकारण अशा विषयांवरदेखील आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळते. आजही जगातील जवळपास सर्व दहशतवादी संघटनांची नाळ कुठे ना कुठे या ब्रदरहूड संघटनेशी जुळते यावरूनच आपण अंदाज लावू शकतो की या संघटनेची व्याप्ती किती मोठी आहे. इजिप्तची क्रांती, अमेरिकेची दुट्टपी भूमिका त्यातून त्यांना स्वतःला बसलेल्या झळा, आजची गाझा पट्टी म्हणजे जगातील सर्वात असुरक्षित आणि संवेदनशील जागा कशी झाली, शीतयुद्धाच्या अफगाणिस्तानला बसलेल्या झळा आणि त्यातून आजअखेर उभारी घेऊ न शकलेला हा देश, दहशवादी संघटनांना आर्थिक रसद पुरवणारी अफूची शेती या सर्व विषयांचं अतिशय मुद्देसूद विवेचन गिरीश कुबेर यांनी केलेलं आहे. आपल्या स्वार्थासाठी जागतिक राजकारणात अमेरिकेने वेळोवेळी विविध दहशतवादी संघटनांना मदत केली, त्यांना पाठीशी घातलं आणि आज हाच दहशतवाद अख्ख्या जगाला धोकादायक ठरतो आहे ज्यातून खुद्द अमेरिकासुद्धा नाही सुटू शकली. स्वतःच पेरलेल्या कडू फळाची चव आज अमेरिकाही घेते आहे. एकेकाळी दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांना व्हाईट हाऊसवर चर्चेला बोलावणारी, ओसामाला व अल् कायदाला प्रोत्साहन देणारी अमेरिका ९ सप्टेंबर २००१ च्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याने खडबडून जागी झाली. इस्लामी देशांबद्दलचा त्यांचा दृष्टिकोनच बदलला. याचं सर्वांत चांगलं उदाहरण इराकचं देता येईल. स्वतःला 'लोकशाहीचा पुरस्कर्ता' म्हणवणाऱ्या अमेरिकेने 'कोणालातरी धडा शिकवायचाच' या हेतूने खोटे पुरावे दाखवून खोट्या आरोपांखाली तुलनेनं धर्मनिरपेक्ष अशा इराकच्या सद्दाम हुसेनच्या राजवटीचा घोट घेतानाही मागेपुढे पाहिले नाही. यातून इराकमध्ये जी अस्थिरता निर्माण झाली त्यातून तो देश आजतागायत सावरू शकला नाही. असंच उदाहरण म्हणून अफगाणिस्तानकडेही पाहता येईल. सद्दामनंतर इराकमध्ये 'आयसिस'चा उदय झाला तर अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबानी राजवट चालू झाली. ज्यांच्या क्रूरतेच्या कहाण्या ऐकून वाईट वाटतं. गिरीश कुबेर यांनी अमेरिकेच्या या बोटचेपी आणि दुटप्पी भूमिकेवरदेखील या पुस्तकातून प्रकाश टाकला आहे जे वाचत असताना या तथाकथित जागतिक महासत्तेबद्दल आपल्या मनात चीड निर्माण होते. यासर्वांसोबतच आखाती देशात चालू झालेल्या तेलाच्या राजकारणावरसुद्धा आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळेल. लेखकांनी पुस्तकात केलेली इस्लामी जगातील दहशतवादाची अनेक वर्णनं वाचकांना थक्क करून सोडतात. 'धर्म ही अफूची गोळी आहे' या कार्ल मार्क्सच्या वाक्याला सप्रमाण सिद्ध करणारं हे एक उत्कृष्ट पुस्तक "अधर्मयुद्ध"!

धर्माचा वापर करून, धर्माला अधर्माच्या वाटेवर घेऊन जाणारं हे "अधर्मयुद्ध" कशाप्रकारे सुरू झालं, याचा सुरुवातीपासूनचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर आवर्जून वाचावं असं गिरीश कुबेर यांचं हे पुस्तक "अधर्मयुद्ध"!






संदीप प्रकाश जाधव


"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये